ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 864

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
image

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१४ वे, रूपके गौळणी अभंग ८६४

जळधराच्या धारी सिंधुजळ जयापरी । पुरोनियां उरे महीवरी रे गोवळा । तें जें शोकलें काईं आणावया गेलें । तैसी नवल तुझी कुसरी रे गोंवळा ॥१॥ चाळा लाऊनी गोवितोसी दाऊनियां लपसी । लपोनी केउता जासी तैसी माव न करी आम्हांसी रे गोंवळा ॥२॥ वायु काय वोखट चांग विचारुनी वाजे । तयावीण कवण ठावो असे । तो आपुलिया चाडा करी कोडिवरी येरझारा । सेखीं गगनीं सामावला दिसे रे गोंवळा ॥३॥ आकाश तेंचि अवकाश तुजमाजीं । हे विश्व की तूं विश्वीं अससी । बापरखुमादेविवरा विठ्ठला न बोले । तुझें वर्म बोलतां निकरा झणे जासी रे गोंवळा ॥४॥

अर्थ:-

श्रीकृष्णपरमात्मा निर्गुण स्वरुपाने सर्व जगांत व्याप्त असून सगुणरुप घेऊन जगतांत कशी क्रीडा करतो हे या अभंगामध्ये वर्णन करतात. सूर्य आपल्या किरणांनी समुद्राचे पाणी शोषण करुन मेघाच्या रुपाने त्याचा पुन्हा वर्षाव करतो. ही स्थिति मनांत घेऊन मेघ त्यापासून जलाचा वर्षाव होतो. त्यांना प्रत्यक्ष किंवा परंपरेने सिंधुजळ ज्याप्रमाणे आश्रय असतो. त्या मेघांला आवश्यक तितके पाणी पुरवून पुन्हा आपण पृथ्वीवर जसा असावा तसा असतोच. सूर्यतेजाने शोषण केलेले पाणी आणण्याकरिता समुद्र जातो काय? त्याच्या ठिकाणी ते आपोआपच येऊन मिळतेच त्याप्रमाणे. तुझ्या स्वरुपाच्या ठिकाणी कितीही जगत व्यवहार झाला तरी त्याला आश्रय तूंच आणि शेवटी जगत च तुझ्याच स्वरुपांच्या ठिकाणी जाऊन मिळणार. याप्रमाणे तुझे हे कलाकौशल्य कांही विलक्षणच आहे. प्रपंचाचा चांगलेपणा दाखवून त्यांत जीवाला गुंतवून आपण लपतोस. जरी अज्ञानी जीवाला आपले स्वरुप लपविलेस तरी तुझी व्याप्ती सर्व ठिकाणी असल्यामुळे तूं कोठे जाशील परंतु आम्हांला मात्र असा मोह घालू नको. असे पहा की वारा जेव्हां जोराने वाहतो. त्यावेळेला हा भाग चांगला, हा भाग वाईट असा विचार करुन वाहतो का? त्याचे जोराने वाहणे हे विशेषरुप नाहीसे झाले तरी. त्याचा वायुरुपाने सर्वत्र वास आहेच. वायु नाही असे कोणते ठिकाण आहे सांगा? याप्रमाणे त्या वायुचे रुप सर्वत्र व्याप्त असूनही तो आपल्या इच्छेने कोट्यावधी येरझार करतो. येरझार संपल्यावर शेवटी आपले कारण जे आकाश त्यांत लय पावतो. त्या आकाशाला आश्रय देणारा जो तूं त्या तुझ्यामध्ये विश्व आहे. व विश्वांत तूं आहेस असा माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठला हे काय बोलावे लागते? कारण तुमच्या निर्गुण सगुण स्वरुपाचे मुख्य वर्म हेच आहे.तुझे हे वर्म बोलिलो म्हणजे तूं कदाचित निकरा म्हणजे चिडला जाशील. असे माऊली सांगतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading