ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 865

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
image

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके गौळणी अभंग ८६५

लेकुरे नसतील काय घरोघरी काय न विये ते माया । परी हे दशा वेगळी नवाई हो । हा न ये त्या आधीं जीव निघों पाहे । आला तरी उरों नेदी कांहीं जाय तरी जाये डोळे तळमळितां ठाये । लांचावला जिऊ राहें गे बाई ये ॥१॥ तमाळनिळे चांदिणें वो वारी वोवराल आपुलीयेस बये । हे मूळदृष्टि पुढे रिघोनियां झाडा घेत आहे । येणे कान्हयें कासावीस केलें गे माय ॥२॥ नेणों कैसें बाळसें डौरलें डोळां डोळसे । माजी महुरजता हे हांसे भोळिवेच देखिलियाची पुरे ॥ घालूनी दृष्टीचे भुरेरें । मग तें हृदयीं वाव रे इच्छावसे गे माये ॥३॥ थुरथुर करितु शक्ति भोळी वाचालवतु । मुद्गुलें गुणें बोलतु गे माय । असावतु सावळिया प्रभा डोळसु नभाचा गाभा । कटीं कर ठेऊनियां उभा हेचि जाण गे बाईये ॥४॥ पाहों याची नवलपरी बरवेपणाची हाऊली वरी । दृष्टीकर झोंबवी यासी कवण वारी । आम्हीच साहतों अळी परी हे चुबडी भली । रिघोनियां आड घाली । अंगकांती घे माये ॥५॥ पहा वो याचा खेळु आमचें । नासे कोपो तरी खदखदां हांसे । जी जी बाळा म्हणों तरी रुसे वो ॥ राहों नेदी सुखें नहाये निमिष एके । वारा कां गोडी सेविखे कान्हो दिठीचें माये ॥६॥ आतां येईल म्हणोनी सांपडऊं द्वारें । आडऊं तंव झळाळीत दिसता हे उजियेडें । भितरींच्या भितरी लांबा धुमाळू चाचरु । मांडी कामा पाडी आवारु गे माय ॥७॥ गाहाण्याचेंनी मिसें गौळणी उचंबळता हे ब्रह्मरसें वानवसे चोपसें कृष्णाचेनी ॥ मालाथून एक मोहरें देवपण धाडिलें अनुरे । भावो की देवो बैसवाल धुरें पुसे निवृत्तिदासु ॥८॥

अर्थ:-

घरोघरी काय लेकरे नाहीत? कोणी माता, आपल्या मुलांना काय प्रसवीत नाहीत? परंतु कृष्णाच्या स्वरुपाची स्थिती काही वेगळीच आहे. एक गौळण म्हणते काय सांगावे बाई हा घरी आला नाही तर त्याच्या वियोगाने प्राण जाण्याची पाळी येते. बरे आला तर घरांत दूध, दही, लोणी, कांही उरु देत नाही. परमार्थदृष्टीने देहभावही उरु देत नाही. जर येथून गेला तर त्याचे दर्शनाकरता डोळे तळमळत राहून जीव सारखा लाचावल्या सारखा होतो ग बाई. हा श्रीकृष्ण म्हणजे नीलवर्णाचे चांदणेच होय. त्याला नेहमी पाहाण्याच्या सवयीने घरांतून बाहेर घालवून दिला तरी पुन्हा वृत्ति त्यालाच वरते. हे श्रीकृष्णमूल आमच्या डोळ्यापुढे येऊन आमच्या सर्ववृत्तीच्या झाडा घेत आहे. किंवा घरांत काय आहे नाही याचा झाडा घेत आहे. काय सांगू? या कान्हाने जीव अगदी कासावीस करुन टाकला. काय सांगावे ! या श्रीकृष्णाचे रुप ! याच्या डोळ्यांतील तेजाने आमचा डोळा चोरला जातो त्याचे भोळेपणातील हंसणे किती मधुर आहे. आमच्या दृष्टीला भूल घालून आपल्या इच्छेने आमच्या मनांत शिरुन व्यवहार करतो. भोळ्याभावाच्या शक्तिने कसा तुरतुर चालतो आहे? कितीतरी त्याचे ठिकाणच्या उत्तम गुणांने बोलतो.याच्या नभाच्या गाभासारखा सांवळ्या कांतीने त्याची स्पष्ट प्रभा दिसत आहे. असा जो श्रीकृष्ण तोच या विटेवर पाय व कटेवर कर ठेवून उभा आहे. याच्या चांगलेपणाचा चमत्कार पाहू गेले असता त्याच्याकडे दृष्टि गेली तर तिचे निवारण कोण करील? त्याच्याकडे पाहाण्याचा आळ आमचेवर आला तर तो आमचा आम्ही सहन करु. पण त्या लौकिकाची पर्वा न करता ती अंगकांतीच लौकिकाचे आड प्रवेश करते. काय याचा खेळ आमच्या सर्व घरांदाराचा नाश करुन टाकतो. त्याच्यावर रागावयाला जावे तर खदखदा हासतो. मृदु भाषेने बाळा, असे करतोस म्हणावे तर रुसतो. सुखाने आम्हाला कधी क्षणभर राहू देत नाही. त्या सुंदरपणाकडे पाहून त्याला घालून देणे विषासारखे वाटते. असे त्याचे दृष्टित कौतुक आहे. आता हा घरांत येईल आपण त्याला घरांतच अडवून धरु असा विचारावा तर तो घराच्या आतच आपले प्रकाशांने दिसतो. आणि तेथेच मनाप्रमाणे धुमाकुळ घालून आम्हालाच आवारांत अडकवल्यासारखे करतो. त्या भान श्रीकृष्ण परमात्म्याची गाऱ्हाणी सांगण्याच्या निमित्ताने त्या गोपीच्या अंतःकरणात ब्रह्मरसाच्या उकळ्या फुटत आहेत.कृष्णांच्या सौदर्याकडे पाहून त्या गोपी एका निस्तेज होऊन जातात. त्यांनी आपला परमात्मभाव वस्तुतः निराळाच ठेवला आहे परंतु अशा श्रीकृष्णाला प्रमुखभावाच्या स्थांनी बसवाल की नाही असे निवृतीदास ज्ञानेश्वर महाराज विचारतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading