👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके गौळणी अभंग ८६१
त्वचेचिया राना धाडूं नको मना । तेथें नंदाच्या कान्हा डोळा घाली गो आई यो ॥१॥ गाईचा गोंवळा यमुनेचा पाबळा । धरी माझा अचुला मग मी पळालिये गो ॥२॥ ताकपिरी गोंवळी केली मजसी रांडोळी । भावें नारली मग मी पळालिये गो ॥३॥ गळा गुंजमाळा गांठी डांगा मोरविसा वेठी । सोकरु लागे पाठी नंदरायाचा गो आई यो ॥४॥ एक्या करें घरीं बिजा करें वेढारी । चुंबन दे हरि मग मी पळालिये गो ॥५॥ ऐसी पळत पळत गेलिये कान्होनें मोहिलिये । माझी मीचि जालिये मग मी समोखिलिये गो ॥६॥ तुना चार लागते गोर तुना बोर लागते गोर । तुना नाहीं माझी चार माझी आईयो गो गो७ ॥ पूर्वपुण्य फळलें देहमुक्त जालें । बापरखुमादेविवर विठ्ठलें ऐसें केलें गो आई यो ॥८॥
अर्थ:-
एक गौळण भगवंताची सुंदर कांती बघून दुसऱ्या गौळणीला सांगते आहे. हे बघ तूं आपल्या मनाला त्या श्रीकृष्णाच्या शरीराकडे जाऊ देऊ नकोस.तो श्रीकृष्ण स्त्रीयांना फार डोळे मारतो. काय सांगू बाई यमुनेच्या तीरांवर गायी राखणाऱ्या, कृष्णानी माझा पदरच धरला. त्यासरसी मी पळून गेले.त्याच्याबरोबर असणाऱ्या ताक पिणाऱ्या गुराख्यांच्या पोरांनी माझी फजिती केली. म्हणजे भावाने मला घेरुन टाकले. पण त्यांच्यातून निष्टून मी पळून गेले. त्या श्रीकृष्णांच्या गळ्यांमध्ये गाठलेल्या गुंजाच्या माळा असून हातांत काठ्यां आहेत.आणि ज्याच्या मस्तकांवर मोराची पिसे खोवलेली आहेत. असे ते नंदाचे पोर माझ्या पाठीसी लागले. त्याने मला एका हाताने धरुन दुसऱ्या हाताने अलिंगन देऊन त्याकृष्णाने मला चुंबन दिले. मग मी त्याला सोडून पळून जाऊ लागले. पण त्याकृष्णाने मला मोहित करुन टाकले असल्यामुळे पळून जाता आले नाही. त्यामुळे मी जागच्याजागीच आत्मरुप होऊन संतोषित झाले त्यामुळे हे श्रीकृष्णा आतां मला तुझा आचार व बोलणे गोड लागू लागले. त्याच्या प्रमाणेच माझा आचार झाला.माझे पूर्वपुण्य फलद्रुप होऊन मी जीवन्मुक्त झाले. माझे पिता व रखुमाईचे
पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या कृपेने मला असे केले.असे माऊली सांगतात.