ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 847

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
  प्रकरण :-१३ वे, मदालसा अभंग ८४७

मदालसा म्हणे पुत्रा तूं मुक्त होतासी । संसारमायामोहें कां रे बद्ध जालासी । सिद्ध तें विचारी पां जेणें सुखीया होसी ॥१॥ चेई तूं रे तानुलिया जाई श्रीगुरूशरण । देहभावी व्यापिलासी मग तुज शिकवील कवण । अज्ञानपण सांडूनियां तूं चुकवीं जन्ममरण । गर्भवास वोखटा रे गर्मी दुःख दारूण ॥२॥ जागृती आणि निद्रा तुज स्वप्नी भरू । सुषुप्ती वेळोवेळां तुज पडिला विसरु । तें जंव नेणसी रे तंव तुज नाहीं निर्धारू ॥३॥ देह तव नाशिवंत तूं कां रे भुललासी । अखंड तें विचारी पां जेणें सुखिया होसी । दुःख तें आठवीं रे गर्मी काय भोगिसी । जठराग्नी कृमीकुंडी वेळोवेळां पडसी ॥४॥ कोसलियाने घर रे सुदृढ पैं केलें । रिगुनिगु न विचारितां तेणें सुख मानिलें । जाहाले बाळा तुज तैसें यातायाती भोगविलें । मोक्षद्वार चुकलासी सकळही कर्म संचिलें ॥५॥ सर्प दर्दुर धरियेला रे मुखीं । तंव तेणें माशी तोंडी धरियेली शेखी । तैसा हा मायामोहो तुज कां रे नुपेक्षी । इंद्रिय व्यापूनियां संसारी सुखी दुःखी ॥६॥ मृग रे जळ जैसें हेलावत पै दिसे । तैसी हे भ्रांती माया तुज नाथिलीं आभासें । उत्पत्ती प्रळय दोन्ही ये तरी तुज सरीसे । स्थिर होउनी विचारी पां आणिक नाहीं बा तैसें ॥७॥ मृग पक्षी किटकु पतंगु होसी । आक्षेपी संचर रे नाना योनी पावसी । पूर्ण ज्ञानसुख जेणें तें तूं कां रे नेणसी । अविनाश तेंचि तूं रे वायां सबळ कां करिसी ॥८॥ परब्रह्म बाप तुझा इच्छा माया हे तुझी । अंश रे तूं तयाचा सबळ कां रे बुद्धि तुझी । अज्ञान तुज व्याली ते नव्हे का रे वांझी । तेणें तूं भुललासी ऐक शिकवण माझी ॥९॥ परतत्त्वा आणी तुज बाळा नाही रे भिन्न । अनादि तूं आहेसी रे परी हे न देखे मन । अकर्म कर्म केलें तेणें जालें अज्ञान । निष्कर्म होय जेणें तें तूं करी कां रे ज्ञान ॥१०॥ पुत्र म्हणे वो माते मी अनादि कैसा । मी माझें जाणता वो मी अज्ञान कैसा । उकलु केवीं होय तुज कैसा भरवंसा । जीवन्मुक्त होय दृष्टि दाखवी तैसा ॥११॥ पापपुण्य दोन्ही मजसवेंची असती । करणी माते थोर त्याची ते आहे चालती । उकलु केंवी होय होय ते सांग मजप्रती । बुझावी वो माझें माते ऐसी करी विनंति ॥१२॥ केली कर्मे जरी तुवां न सांडिवो पाठी । कवण ते प्रकाशील हे विपरीत गोष्टी । उकलु केवीं होय ते सांग मजप्रती । जेणें मी दृढ होय ते बुद्धी देई वो लाठी ॥१३॥ अनंत कर्मे मातें घडली वो मज । ती तव न संडिती ऐसें ज्ञान पैं तुज । तरी म्यां काय किजे केवीं पावणे सहज । दुर्घट वाट आहे कैशानी निफजेल काज ॥१४॥ उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड । साधु आणि संत जेथें असती बा उदंड । तयामाजी आत्मज्ञानी जो कां न बोले वितंड । तो तूं गुरू करी तो तुज बुझवील प्रचंड ॥१५॥ ज्ञानविज्ञान रें गुरूमुखे बुझसी । विचारूनी अनभऊ आपेआप जाणसी । जेणें जालें अनंत सिद्ध तें तूं कां रे नेणसी । हरिहर ब्रह्मादिक तेही ध्याती तयासी ॥१६॥ नव्हतां बाळा नादबिंद तैं तूं रे सहज । तेथेंची तूं होतासी ऐसें ज्ञान पैं तुज । तेथें तूं लीन होई करी आपुलें काज । संसार साभिमानें घेई तेथीचें व्याज ॥१७॥ उपजतां गर्भ अंधु जया नाहीं प्रकाशु । पूर्वी तो योगभ्रष्ट चुकवी गर्भवासु । गुरुवचनीं भजे पुत्रा परब्रह्मीं करी वासु । अमृत सेवी पारे झणीं होसी उदासु ॥१८॥ तुज ऐसें रत्न बाळा कवणें रे केलें । आणिक अनंत जीव चराचर भुतले । तेणें रे इच्छामात्रें क्षणामाजीं रचिलें । तें तूं रे नेणसीच येवढे कैसे चुकविलें ॥१९॥ सांडी बाळा कामक्रोधुं हा दुर्जन विचारू । जिहीं तुज अंतरविले त्याचा करी का संहारु । गुरुचरणीं भजे पुत्रा तो तुज देईल विचारू । अविनाशपद पावशी मग तुज होईल निर्धारू ॥२०॥ सहज यम नेम गुरूकृपा रे करी । आसने प्राणायामु प्रत्याहार उदरीं । धारणा होईल तुज मग ध्यान विचारी । समाधी होई पुत्रा तूं जाण निरंतरीं ॥२१॥ षड्चक्रा वेगळे रे तें जाणिजे कैसें । अनुभवें जाणसी रे तुज सहजें प्रकाशें । तैसा हा ज्ञानयोगु गुरूकृपा रे दिसे । अज्ञान निरसूनीयां ज्ञान पैं समरसें ॥२२॥ अव्यक्त तिहीं लोकींचें तुजमाजी रे असें । त्रैलोक्य जयामाजीं तैं तुज पैं दिसे । अविनाशपद होसी मग अज्ञान नासे । तुजमाजी अमूर्त रे आपेंआप प्रकाशे ॥२३॥ अव्यक्त अगोचर तुज होईल निरंतर । इंद्रियें स्थिर होती हे तुझे अंकुर । अविनाशपद होसी मग नाहीं येरझार । अष्टमहासिद्धी जया वोगळती तुझें द्वार ॥२४॥ ऋद्धिसिद्धी मायासिद्धी यासी दिधली । तुर्याचिया उपरी रे ज्ञान उन्मनी देखिली । आशापाश सबळ माया जीवबुद्धि निमाली । गर्भवास चुकला रे कैसी बुद्धी स्फुरली ॥२५॥ संतोषोनी कृपादृष्टी ज्ञान पैं लाधविला । आत्मतत्त्व बोधु तुज प्रकाशु रे जाला । समरसी सोहंसिद्धि प्रबोधु निमाला । निवृत्तिप्रसादें रे ज्ञानदेवो बोलिला ॥२६ ॥

अर्थ:-

मदालसा म्हणते हे पुत्रा तूं मूळचा ब्रह्मरूप आहेस पण या अनिर्वचनीय संसारमोहाने तुला बद्धतेची भ्रांती झाली आहे. म्हणून नित्यशुद्ध असलेल्या ब्रह्मस्वरूपाचा विचार करशील तर दुःखसंबंधरहित आनंदरूप होशील. गर्भात फार दुःख आहे. गर्भवास वाईट आहे.म्हणून श्रीगुरूला शरण हो व अज्ञानाचा नाश करून जन्ममरण चुकव. जर देहच मी आहे. असा तुझा दृढ निश्चय झाला तर तुला उपदेश कोण करील. जागृति स्वप्न व सुषुप्ती यांतच तुझा सर्वकाळ जात असल्याने तुला आत्मस्वरूपाचा विसर पडला व जोपर्यंत ते आत्मस्वरूप तूं जाणत नाही. तोपर्यंत तुझा निश्चय होणार नाही. ज्या देहाला तूं एवढा भुलला आहेस तो तर नाशवंत आहे. गर्भवासांत किती दुःख भोगलेस त्याची आठवण कर व अखंड म्हणजे सजातीय विजातीय स्वगतभेदशून्य जे ब्रह्म त्याचा निश्चय कर म्हणजे सुखी होशील. नाही तर मलमूत्र जंतूचा ज्यांत साठा आहे अशा गर्भवासात वारंवार जावे लागेल. ज्याप्रमाणे कोशकिडा आपल्या अंगाभोवती आपणास बाहेर निघण्यास रस्ता न ठेवता बळकट घर करून त्यांत सुख मानतो. तसेच तुला ही संचित कर्माचे योगाने मोक्षद्वार चुकवून जन्ममरण भोगविले. बेडूकांला सर्पाने तोंडात धरले असता सुद्धा शेवटपर्यंत तो बेडूक माशी गिळतो व शेवटी सर्पाच्या तोंडांत जातो. तसे संसारांत इंद्रियांनी विषय संपादून सुखदुःख भोगित असता हा मायारूपी मोह तुला ग्रासून टाकील. वस्तुतः नसलेल्या मृगजळांतील पाणी हलल्यासारखे दिसते. तसेच भ्रमाने नसलेली माया तुला दिसते. अंतर्मुखाने विचार केला तर उत्पत्ति प्रलय ही आत्मरूप असून, आत्म्या प्रमाणे परमार्थ सत्य दुसरी वस्तु नाही. मृग,पक्षी, कीटक, पतंग इत्यादी नानायोनीत या योनीतून त्या योनीत हिंडण्यापेक्षा ज्याच्या योगाने संपूर्ण सुख मिळते असे ज्ञान तूं कां प्राप्त करून घेत नाहीस. असले अविनाश ज्ञानस्वरूप ब्रह्म तूंच आहेस उगीच हेकडपणा का करतोस. परब्रह्म हे तुझे अधिष्ठान असून कल्पनारूपी आईपासून तुझी उत्पत्ती म्हणून तूं परमात्म्याचा अंश आहेस नसता जीवपणाचा छंद का घेतोस? ज्या अज्ञानरूपी कल्पनेपासून तुझी उत्पत्ती झाली व जिच्या योगाने तूं एवढा मोहून गेला आहेस तो वास्तव विचार केला तर वांझ आहे. हा उपदेश विसरू नको. परमात्म्याहून तूं मुळीच भिन्न नाही. पण अकर्म असा जो तूं त्याने अज्ञानामुळे कर्म केले असा जो निक्षय होतो. त्यामुळे मी अनादि बह्मरूप आहे असे पटत नाही. पुत्र म्हणतो माते मदालसे, मी अनादि बह्मरूप कसा? मी कोण आहे ? माझे काय आहे? अज्ञानरूपी कल्पनेपासून माझी उत्पत्ती कशी? जीवन्मुक्त कसा असतो हे मला स्पष्ट, ज्या तऱ्हेने समजेल, असे तुला वाटते, त्या तऱ्हेने मला सांग. तसेच पापपुण्यही मला आहेत व त्यापासून मिळणारा सुखदुःखाचा भोग मला होतो काय? याचा उलगडा कसा होईल ते मला कृपा करून सांग. अशी आईला विनंती करतो. काही लोक असे म्हणतात की कर्म स्वतः आपले फल देते म्हणून ईश्वराची आवश्यकता नाही परंतु कर्म जड आहे, म्हणून ते स्वतः फल देणे शक्य नाही. हे विपरीत वाटते तेव्हा यावरील शंकेचे पूर्ण समाधान होऊन मी निःशंक होईन अशा तऱ्हेची निक्षयात्मक बुद्धी मला दे.तसेच आई माझे हातून अनंत जन्मांत अनंत कमें झालेली असून जोपर्यंत शरीर संबंध आहे. तोपर्यंत अनंत कमें ही होणारच. म्हणून निष्कर्म होण्याचा मार्ग अत्यंत अवघड झाला आहे. तेव्हा मी काय करावे व माझे हे कार्य सहज कसे होईल याचे ज्ञान तुला आहे. ते मला सांग. मदालसा म्हणाली बाळा, ज्या ठिकाणी साधुसंत राहतात. अशा तीर्थयात्रा कराव्या व त्या संतांत उगीच शब्दपांडित्य न करता जो खरा आत्मनिष्ठ असेल अशा श्रीगुरूला शरण हो. तो तुझ्या सर्व शंकेचे समाधान करील. मग शब्दज्ञान काय किंवा अनुभवाचे ज्ञान काय हे तुला गुरूकडून यथार्थ समजेल तूं विचाराने त्याचा अनुभव घेतलास तर स्वतःलाच ब्रह्मरूपाने जाणशील हरिहर बह्मदेवादि ज्या ज्ञानाची स्तुति करितात, व ज्या ज्ञानाने पुष्कळ लोक उद्धरून गेले ते तुला समजणार नाही काय? ज्यावेळी आकाशादि प्रपंच नव्हता त्यावेळी तूं म्हणजे ब्रह्म आपल्या महिम्यामध्ये होतेच. संसाराचा अभिमान धरशील तर तूं अशा परमात्म्याला शरण होऊन आपले कार्य करण्याकरिता धर. पूर्वजन्मांत योगभ्रष्ट असल्याने जन्मल्याबरोबर त्याला परमात्म्याचे ज्ञान नसते. एवढ्याकरिता बाळा गुरूवचनावर विश्वास ठेऊन हे ज्ञानामृत पान करून ब्रह्मरूप हो.यांत आळस करू नको. तुझ्यासारखा बुद्धिमान मुलगा अनंत चेतन जीव, अचेतन सृष्टि ज्या परमात्म्याने एका क्षणांत केवळ इच्छेने उत्पन्न केली त्या परमात्म्याला जाणणे एवढी महत्वाची गोष्ट कशी चुकली. ज्यांनी तुला आत्मस्वरूप ज्ञानापासून दूर केले त्या कामक्रोधरूपी दुर्जनांचा विचार सोडून त्यांना ठार कर आणि गुरूचरणसेवेने नाशरहित ब्रह्मपदाची प्राप्ती करून घे. म्हणजे तुझा आत्मस्वरूपाविषयी निश्चय होईल. गुरूकृपा झाल्यावर यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यानधारणा ही सहज साधून निरंतर समाधी होईल. षट्चक्रावेगळे असणारे परमतत्त्व कसे जाणावे असे वाटेल पण जर तूं अनुभव घेण्याचा प्रयत्न केलास तर ते तुला सहज कळेल त्याप्रमाणे अज्ञानाचा नाश करून ज्ञानस्वरूप होणाचा ज्ञानमार्ग गुरूकृपेनेच समजेल.तिन्ही लोकांत व्याप्त असणारे, परमतत्त्व तुझ्यात आहे, त्या परमतत्त्वांत त्रैलोक्य आहे असे जाणलेस तर त्या अविनाश पदाचे ज्ञान तुला होईल व मग अज्ञानाचा नाश होऊन तुला अधिष्ठान असणारे अमूर्त परमतत्त्व स्वप्रकाशाने प्रकाशीत होईल. ही तुझी इंद्रिये परमतत्त्वाचे अंकूर होतील म्हणजे त्याची प्रवृत्ति विषयांत राहणार नाही. मग तूं नित्यमुक्त हो अष्टमहासिद्धी तुझी सेवा करण्यास तत्पर राहून अविनाश पदाला प्राप्त होशील व जन्ममरणाच्या फेऱ्यांतून सुटशील. तूर्यावस्थेच्या पलीकडे असणारी उन्मनी म्हणजे ज्ञानस्वरूप तूं झाल्यावर रिद्धिसिद्धि व माया ही सर्व तुझ्या ताब्यांत राहतील व ज्या मायेच्या योगाने आशारूपी पाश बळकट होतो. ती जीवबुद्धी नाहीसी झाली काय? माझी बुद्धी चांगली आहे आतां पुन्हा गर्भवासाचे नांव नाही. श्रीनिवृत्तीनाथांच्या प्रसादाने ज्ञानेश्वर महाराज संतोषाने म्हणतात गुरूकृपा दृष्टीने आत्मतत्त्व बोध स्पष्ट झाला व मी ज्ञानरूप झालो. एवढेच नव्हे तर त्या ब्रह्मरसात मी ब्रह्मरूप आहे. असे ज्ञान ही मावळले.असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading