ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 848

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके गाईच्या रूपकाने हरीचे वर्णन अभंग ८४८

आधीं चरे पाठीं प्रसवे । कैसी प्रतिदिनीं गाभासी जाये रे । विऊनियां वांझ झाली रे । ती उन्हाळां मासां वोळली रे कान्हो ॥१॥ दुहतां पान्हा न संवरे रे । पैल पर्वता सुटले झरे रे कान्हो ॥२॥ मोहें चाटावयाच्या चाडा रे । दोहीं तयावरी पडे रे । वत्स देखोनी उफराटी उडे रे । तया केलिया तिन्ही वाडे रे कान्हो ॥३॥ तिहीं त्रिपुटी हे चरतां दिसे रे । तिहीं वाडियां वेगळी बैसे रे । ज्ञानदेव म्हणे गुरूतें पुसा रे । ते वोळतां लयलक्ष कैसें रे कान्हो ॥४॥

अर्थ:-

या अभंगामध्ये मनरूपी गाय असून ती अगोदर चरते, म्हणजे मनोरथ करते नंतर ती प्रसवते. म्हणजे त्या संकल्पाप्रमाणे जीवाला क्रिया करण्यास प्रवृत्त करते. अशा रितीने ती दररोज गाभाला जाते. परंतु जीवाचे ते संकल्प तृप्त न झाल्यामुळे शेवटी ती मनरूपी गाय वांझ असल्याप्रमाणे होते. परंतु पूर्व पुण्याईने सद्गुरूची भेट होऊन त्यांनी मनाला उपदेश केला म्हणजे निर्विषय जे ब्रह्म त्याठिकाणी ती लठ्ठ होते. म्हणजे तद्रुप होते. ब्रह्म सर्वात मोठे आहे. ती तद्रुप झाल्यामुळे लठ्ठ झाली. अज्ञानदशेत तिचा पान्हा दोहन करू लागले असता म्हणजे संकल्पाचा विचार करू लागले असता ते आकलन न होता जणू काय पर्वताला धारा सुटल्याप्रमाणे ते प्रतितीला येतात. मोहाने तिला चाटावयास गेले तर ती दोही म्हणजे दोहन करणाऱ्यावर पडते म्हणजे अधिकच संकल्प रचते. मात्र गुरूकृपेने मनांचे ठिकाणी बोध झाला तर त्याला पाहून नाहीसी होते. म्हणजे मनरूपाने राहात नाही. अज्ञानदशेत तिला राहण्याकरिता भोग्य, ती उलट भोग, भोक्ता ही त्रिपुटीरूपी वाडे केली आहे. ती या त्रिपुटीरूप तीन वाड्यामध्ये चरताना दिसते. परंतु बोध झाल्यामुळे या त्रिपुटीहून लांब जे ब्रह्म तेथे बसते. ती गाय कोणती हे श्रीगुरूंना जाऊन विचारा.व ती प्रसन्न झाली म्हणजे सर्वदोषविवर्जित झाली असता जीवाचे लक्ष्य जे आत्मस्वरूप त्याचे ठिकाणीच तिचा लय होतो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading