ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 846

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१३ वे, मदालसा अभंग ८४६

श्रीगुरू देवराया प्रणिपातु जो माझा । मनादि मूळ तूंचि विश्वव्यापका बीजा । समाधी घेई पुत्रा स्वानंदाचिया भोजा । पालखी प्रौढलिया नाशिवंत रे माया ॥१॥ जाग रे पुत्रराया जाई श्रीगुरूशरण । देह तूं व्यापिलासी चुकवी जन्ममरण । गर्भवासु वोखटा रे तेथें दुःख दारूण । सावध होई का रे गुरूपुत्र तूं सुजाण ॥२॥ मदालसा म्हणे पुत्रा ऐक बोलणें माझें । चौऱ्यांशी घरांमाजी मन व्याकुळ तुझें । बहुत सीणतोसी पाहतां विषयासी वांझे । जाण हे स्वप्नरूप येथें नाहीं बा दुजें ॥३॥ सांडी रे सांडी बाळा सांडी संसारछंदु । माशिया मोहळ रे रचियेला रे कंदु । झाडूनि आणिखी नेला तया फुकटचि वेधु । तैसी परी होईल तुज उपदेशें आनु ॥४॥ सत्त्व रज तम हे तुज लाविती चाळा । काम क्रोध मदमत्सर तुज गोंविती खेळा । यासवें झणे जासी सुकुमारा रे बाळा । अपभ्रंशी घालतील मुकसील सर्वस्वाला ॥५॥ कोसलियाने घर सुदृढ पैं केलें । निर्गमु न विचारितां तेणे सुख मानियेलें । जालें रे तुज तैसें यातायाती भोगविलें । मोक्षद्वार चुकलासी दृढ कर्म जोडलें ॥६॥ सर्प दुर्दर धरिला रे मुखीं । तेणें हिरे माशी धरियेली पक्षी । तैसा नव्हे ज्ञानयोगु आपआपणातें भक्षी । इंद्रिया घाली पाणी संसारी होई रे सुखी ॥७॥ पक्षिया पक्षिणी रे निरंजनी ये वनीं । पिलिया कारणे रे गेली चारया दोन्ही । मोहोजाळे गुंतली रे प्राण दिधले टाकुनी । संसार दुर्घट हा विचारू पाहे परतुनी ॥८॥ जाणत्या उपदेशु नेणता भ्रांती पडिला । तैसा नव्हे ज्ञानप्रकाशु ज्ञानदेवो अनुवादला । अनुभवी गुरूपुत्र तोचि स्वयें बुझाला । ऐक त्या उद्धरणा गायक सहज उद्धरला ॥१०॥

अर्थ:-

जगांत व्याप्त असून मनादि साही इंद्रियांना व जगताला मूळ असणाऱ्या श्रीगुरूला अनन्यशरण हो. पुत्रा आत्मानंदाचा अनुभव घेण्याकरिता समाधीरूपी पालखीत बस. म्हणजे तुला माया व तिचे कार्य बाधयोग्य आहे असे समजेल. हे पुत्रराया आज तुझ्या देहाचे ठिकाणी अहंभाव आहे. त्यांने अत्यंत किळसवाणा व दुःख देणारा गर्भवास प्राप्त होईल. म्हणून सावध हो व श्रीगुरूंना शरण जा म्हणजे ते तुझे जन्ममरण चुकवितील. बुद्धिमान सत् शिष्य हो. मदालसा म्हणते पुत्रा, या चौऱ्यांशी लक्ष योनीतून हिंडताना विषयांत कष्ट होतात व मन व्याकुळ होते. एवढ्या करता संसार स्वप्नाप्रमाणे मिथ्या असून परमात्मव्यतिरिक्त दुसरा पदार्थच नाही, असा निश्चय कर. ज्याप्रमाणे मधमाशा पोळे बांधतात व कोणी तरी दुसरा ते मोहोळ काढून नेतो. त्यामुळे त्यांचे श्रम व्यर्थ होतात. त्याप्रमाणे तुझी स्थिती होईल. एवढ्याकरता संसाराचा नाद सोड व या उपदेशाने सुखी हो. हे बाळा तुला सत्त्व, रज, तम हे चाळा लावतात. तसेच काम क्रोध मद मत्सर संसाररूपी खेळाचा नाद लावून बळेच त्यांत ओढतील, तेंव्हा त्यांच्या नादी लागशील तर हे तुला दुःखांत लोटतील व तुझा सर्वस्वी घात करतील. ज्याप्रमाणे कोशकिडा आपल्याभोवती आपणच बाहेर निघण्यास रस्ता न ठेवता बळकट घर करून त्यांत सुख मानतो. त्याप्रमाणे तूही आपल्याभोवती प्रारब्ध कर्मरूपी घर केलेस.व ते प्रारब्ध कर्म तुला जन्ममरण भोगवित आहे. म्हणून मोक्षरूपी दार तुला सापडत नाही.सर्प बेडुकाला खातो. बेडुक पक्षाने धरलेले माशी हिरावून घेतो. अशा व्यवहारांत एकाने दुसऱ्याला खाण्याचा परिपाठ आहे. परंतु ज्ञानमार्गात ज्ञानदानाचाच म्हणजे परमात्मस्वरूपाचे ज्ञान, प्रपंचज्ञानाचा नाश व इंद्रियांचा बाध करते. असे करून तूं संसारात सुखी हो. आपल्या पिलाला चारा आणण्याकरिता पक्षी व पक्षीणी घोर अरण्यांत गेली व खाद्याच्या मोहाने जाळ्यात गुंतून त्यांना प्राणत्याग करावा लागला. अंतर्मुख दृष्टीने पाहिले तर संसार दुर्धट आहे असे समजेल.श्री ज्ञानेश्वर महाराजांनी जो वरील ज्ञानमार्गाचा अनुवाद केला. तो ज्ञानरूप प्रकाश शहाण्याला उपदेश व अज्ञानाला मोह उत्पन्न करील असा नाही. सत् शिष्य असेल तो याचा अनुभव घेऊन समाधान पावेल. एवढेच काय? पण हा उपदेश ऐकणारा उद्धरेल व म्हणणारा तर सहज उद्धरेल.असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading