👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-११ वे, बुद्धीरूपी सखीशी संवाद अभंग ८२८
सम्यक् करीं शांति बैसें एके पातीं । क्षेमेसी निवृत्ति वाड करीं ॥१॥ ऐसा हा उपदेश सखी सांगे जीवांस । झणी कासावीस होसी बाई ॥२॥ सज्ञानी विज्ञान ज्ञानी ज्ञानपण । अन्वयीं शोधून पाहा लक्षीं ॥३॥ ज्ञानदेवीं शिवा उन्मनी रिघावा । हरीचा विसावा सर्वांघटीं ॥४॥
अर्थ:-
अरे जीवा, चित्ताची तळमळ शांत करुन क्षमे सह वर्तमान निवृत्ति वाढवून परमात्म्याचे एका पंक्तीला बैस. नाही तर प्रपंचदुःखाने उगीच कासावीस होशील असा उपदेश एक सखी आपले जीवांस करते. अन्वय ज्ञानाने ज्ञानांत विज्ञान आणि विज्ञानात परमात्मज्ञान पाहून तेथेच लक्ष ठेव. शिवस्वरुपाच्या ठिकाणी मनांचे उन्मन होऊन प्रवेश झाल्यांमुळे सर्व शरीरांमध्ये असणाऱ्या श्रीहरि स्वरुपाच्या ठिकाणी विसांवा झाला.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
