👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१० वे, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ८०९
आकार स्थूल नाशिवंत । हे तरी जाईल भूमि आंत । तयावरी हरि चालत । तेणे होईल कृतकृत्य ॥१॥ देहो जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ॥२॥ दुजा गुण आपी मिळे । तरी मी होईन गंगाजळे । हरि अभिषेक अनुदिनीं । सुखें सर्वांगावरी खेळे ॥३॥ तिजा गुण तेजरुप । तरी मी होईन महादीप । हरि रंगणीं दीपमाळा । दीप उजळीन समीप ॥४॥ वायु व्यापक चौथा गुण । तरी मी विंजणा होईन । हरि अष्टांगें निववीन मना । ऐशा दृढ धरीन खुणा ॥५॥
अर्थ:-
आकाश पांचवा गुण । तरी मी प्रासादी राहेन । बापरखुमादेविवरा । अखंड तुझें अनुसंधान ॥६॥ उपासकाची देहत्यागानंतरही भगवत्व उपासनेविषयी किती निष्ठा असते तें या अभंगांत सांगतात. स्थूल शरीराचा आकार नाशिवंत असल्यामुळे तो केव्हा तरी भूमीत जाणार तो अशा भूमीत मी घालीन की त्यावरुन भगवान श्रीहरि चालतील. त्यामुळे मी कृतकृत्य होईन. हा माझा देह जावो किंवा राहो पांडुरंगाच्या ठिकाणी माझा अत्यंत दृढभाव आहे. शरीरांतील दुसरा गुण जो पाण्याचा भाग आहे. तो मी गंगेमध्ये नेऊन मिळवीन, म्हणजे श्रीहरिला अभिषेक चालला असता त्या गंगाजळाच्या निमित्ताने श्रीहरिच्या सर्वांगावर मी खेळेन. शरीरातील जो तेजोरुप भाग तो मी श्रीहरिच्या पुढे लावलेल्या निरांजनांमध्ये नेऊन मेळवीन. किंवा श्रीहरिच्या अंगणांत ज्या दीपमाळा लावल्या जातील. त्यामध्येही माझ्या शरीरातील तेजोभाग नेऊन मेळवीन. शरीरातील चवथा गुण जो वायु तो श्रीहरिच्या अंगावर पंख्याने घातला जाणारा जो वारा त्या वाऱ्यामध्ये नेऊन मेळवीन. व त्यामध्ये श्रीहरिच्या आठही अंगांना शीतलता देऊन श्रीहरिला संतोषीत करीन. असा हा माझा दृढ निश्चय आहे. त्याप्रमाणे माझ्या शरीरातील पाचवा जो आकाश गुण तो श्रीहरिच्या मंदिरांत आकाश होऊन राहिन.माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठला यांचे अखंड अनुसंधान लागावे अशी माझी उत्कट इच्छा आहे. असे माऊली सांगतात.
