ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 14

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

 

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग १४

एकांती बाळ । कीं सोहं सुखशयन वेळा । पाहे चरण कमळा । सुंदराचे ॥ तेथे अरुण उदेला । कि सुमनी प्रगटला । कमळणी जाला । अंतरी विकासु ॥ ते चरण कमळ केवळ । भक्ता अळिउळ । सेविती सकळ । योगीजन ॥ तेणें तृप्त जालें । कीं हृदयी वोसंडले । म्हणोनि वाहावले ज्ञानडोही । तेचिं ते परमानंद गे माय ॥१॥ न संगवे माय परा पारुषली । दोंदिली दृष्टी जाली देखणेपणे ॥ मनाचा अंकुर उगमींच मुराला । तो कृष्णचि होऊनि ठेला अनुभविया ॥धृ॥ तये पंदांध्रीचे रज । तेणें तृप्ति वो सहज ॥ वरी त्रिवेणी उर्ध्ववज्र । मज पाहता ॥ तंव ते रेखा । वरी सखोल देखा ॥ त्यावरी ओळले । पीयुष पाणी ॥ तियेचेनि मागे । उध्दरणें जगें ॥ म्हणोनि संतसंगे । तया सोई ॥ ते दोहों भागीविस्तारलें जगीं । म्हणोनी तया भागी । चरणांगुष्ठ ॥ दृष्टीचा डोळा । न निवडेचि बाळा ॥ तेथें जाला एकवळा । मुनीजन गे माय ॥२॥ तेथे बिंबली नखे । कीं विवळणी विशेखें । काळेपणाचेनि द्वेषें । वाहावली पुढां ॥ उगमी न संचले कीं वियोगे बाहावले । पुनरपि जडले ॥ कृष्णपदीं । गंगा अंगुष्टधार ॥ कीं वाकीचा बडिवार । तेथें सप्तही स्वर । उमटताती ॥ स्वरुपीं रमली । म्हणोनि अधोमुख जाली । शोभती घाघुरली । पायीं प्रभावळी गे माये ॥ तंव ते निजानंद भरिते । नेणती आणिकांते । विसरली आपणातें । हास्य वदनें । म्हणती नेति नेति गर्जना । कीं माणिका खेवणा ॥ घोट्या अनुमाना । बाळसुर्यों ॥ पोटरिया निवाळा । कीं उभालिया सरळा । जानुद्वय सोज्वळा । उच्च स्तंभ ॥ उंच युगळ कटीं । माज सामावे मुष्टीं । सोहंभाव समदृष्टी । दोहीं भागीं गे माये ॥४॥ वरि वेठिला पिंवळा । कीं मिरवे सोवसळा । कीं कल्पतरु फुलला । नाभिस्थानीं । तेथे वेधु गोपीबाळ । कीं अंतरी सांवळा । पालवी मेखळा । अभिळाखिया ॥ तेथें मदनु गुढपणे । रतिशये रमणे । दुजे अनुभव अनुभवणे । न निवडे कहीं ॥ सखोल नाभिमंडळ । ते ब्रह्मस्थान केवळ । कैसे पाहाले विवळ । तेथें जगामाजिं गे माय ॥५॥ रोम राजवेळा । कीं वेणी एकवळा । दावी निराळा । उदरामध्ये ॥ हृदय निर्मळ । तेथें ध्येय ध्यान केवळ । वरी चरण कमळ । द्विजोत्तम ॥ वैजयंती माळा । शोभतसे गळा । उभलेनि वक्षस्थळा । उभारिली ॥ सरळ बाहुदंड । न कळे कानवड । अंगोळिया धडफुड । खुणा दावितो गे माये ॥६॥

अर्थ:-

जीनरुपीबाळा एकांतात सोहंसुखशयनात असताना त्या सुंदर परमात्म्याचे चरणकमळ पाहयचे असतात.तेथे सुर्य उगवला की फुल फुलले किंवा कमळदळ विकासले तसा अंतरीचा विकास करायचा. ते चरणकमळ भक्त व योगी सतत सेवीत असतात. त्यातुन मिळणाऱ्या ज्ञान मकरंदामुळे ते तृप्त होतात त्यांचे हृदय आनंदाने वोसांडते व ज्ञानडोहात ते वाहात जातात तेथे तो परमानंद त्यांना मिळतो. त्याचे वर्णन करताना पराही खुंटली त्याला पाहुन दृष्टीला ही समाधान झाले. मनाचा अंकुर मनातच मुराला व तो अनुभव कृष्ण होऊनच ठाकला.त्याच्या पायधुळीने सहज तृप्ती होते. चरण, पायधुळ,व भक्त ह्या त्रिवेणीमुळे मला उर्ध्व पाहता येत आहे. ती उर्ध्वरेखा जर सखोलपणे पाहिली तर ती अमृतरेखाच वाटते.म्हणुनच त्या योगाने व संतसंगामुळे जग उध्दरते. ते दोन भाग जरी विस्तारले तरी ते चरणागुष्टापाशीच पोहचतात.पण ते दृष्टीला येणे कठिण आहे तरी मुनीजनांच्या योगे तेथे एकत्व येते.त्या चरणांची नखे ही विशेष आहेत पण त्या काळेपणाच्या वाहणीत ती पुढे निघाल्यासारखी वाटतात. उगमालाच एकत्र झाले की वियोगात वाहले पण ते तर कृष्णरुपातच जडले आहे.ही गंगेची धार की त्याला त्या अंगुष्टामुळे मिळालेले अलंकाररुप की सप्त स्वरच तेथे उमटतात. त्या स्वरुपात ती मनोवृती रमली व त्यामुळे अधोमुख झाली व ती ही त्या पायात घोळली व पायाची प्रभावळ झाली. तेंव्हा ती निजानंदाने भारली स्वतःलाच हसत हसत विसरली दुसऱ्याचा काय पाड.नेती नेती गर्जना करत त्याला माणिकाच्या कोंदणात ठेवले त्याचे घोटे म्हणजे जणु बाळसुर्यच.त्याच्या पोटऱ्या व गुडघ्यापर्यंतचा भाग सरळ हे सरळ व ते जानुद्वय उंचस्तंभासारखे आहेत.उंच आशा कटीवर दोन्ही मुष्टी आवळुन तो सर्वाठायी समदृष्टी दोन्हीागात समच आहे.त्यावर वेढलेला पिवळा पिंतांबर व सोनसळा मिरवत आहे.जणुकाही नाभीपर्यंत फुललेला कल्पवृक्षच आहे.त्याचा वेध लागलेल्या त्या गोपी तो सावळा असला तरी त्या जणुकाही मेखळाच झाल्या आहेत.त्यारुपात गुढपणे तो मदन आला आहे. त्यामुळे त्या गोपीना रतीसुखाची इच्छा होत आहे. तिकडे दुसरे अनुभव येतच नाहीत. त्याचे सखोल नाभी त्या ब्रह्माची जागा आहे. असे विवळ होऊन जगात पाहणे सुरु आहे. त्याच्या पोटावरील केस वेणी सारखे दिसत आहेत.त्याचे हृदय निर्मळ आहे तेथे ध्येय व ध्यान एकच झाले आहे.व दोन चरणकमळे सर्वोत्तम आहेत. त्याच्या छातीवर ती वैजयंतीमाला उन्नत होऊन रुळत आहे.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading