ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 15

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग १५

नभ नभाचेनि सळे । क्षोभु वाहिजे काळिंदीजळें । सासिन्नले जगाचे डोळे । तें रुप पहावया ॥ भलतैसी हाव । मना न पुरे तेथींची थाव । लावण्य सिंधुशीव । सांडुनि जातो गे माये ॥ सुलभ गे माये परमात्मा । मन मुरोनी देखणेपणा उरी । याचि कारणे उभा भिवरेतीरीं । अनुपम्य जयाची थोरी गे माये ॥धृ॥ काळिंदी जळाचा भोंवरा । कीं माझी वेढुनि इंदिरावरा । माळ बांधोनिया मधुकरा । मधें रोमामाजी ॥ सकल सिध्दिंचा मेळा । तेवीं विभुति शोभे भाळा । मुगुटी रत्न किळा । लिंग अनुपम्य गे माये ॥ क्षीरसागरींचे निवांत सुख । असो हे निमासुरें मुख । श्रीयेचें मनोहर देख । टवकारले दो भागी ॥ पहावया उरुंची शोभा । सकळ तेजाची प्रभा । तेथें तारांगणे कैची नभा । लेईला गे माये ॥ कटावरी ठेऊनी हात । जना दावी संकेत । भवजलाब्धीचा अंत । इतुलाची ॥ समचरणींच्या खुणा । उभा पंढरीचा राणा । तो आवडे जन मना । दुर्लभ गे माये ॥ कैवल्याचा गाभा । कीं ब्रह्मविद्येचा वालभा । निकटपणाचिया लोभा । कैसा उभा असे । देवा पायीची वीट । तेचि माये नीट । वरी येउनि भीमातट । वोळग दावी गे माये ॥ नेति नेतिचेनि विचारे । उभाउनिया श्री कराकरें । श्रुंगाराचेनि पडिभरें । चराचरें वोळगती ॥ हा मेखळेचा मध्यमणी । उदो केला ग्रहगणी । मध्य नायकुतरणी किरणीं । विराजितु गे माये ॥ आमुची हृदयीची श्रीमूर्ती । घेऊन विठ्ठलवेषाची बुंथी । आता चाळविसी किती । बापा पालटु नेघे । बापरखुमादेविवरा विठ्ठला । त्यां मजसी का अबोला धरिला । जीवीं जीव आहे उरला । तो निघो पाहें ॥

 अर्थ:-

नभासारख्या निळ्या रंगाचा व यमुनेतील निळ्या पाण्यासारखा दिसणारा त्याला बघायला जगाचे डोळे आतुर आहेत.मनही तेथे धाव घेते. भलती हाव मनाला पडते तरी त्या लावण्यसिंधुचे लावण्य शिव ओलांडून समुद्रासारखी धडकत असते. असा तो सुलभ परत्मामा भीमेतटी उभा असून त्याचे देखणेपण मनात भरून उरते अशी त्याची अनुपम्य थोरवी आहे. यमुनेतील भोवऱ्यांनी त्याला वेढले असावे असे वाटते. व त्याच्या गळ्यातील पुष्पाच्या माळांवर भक्त मधुकरासारखे गुंजारव करतात.तो म्हणजे सर्व सिध्दींचा मेळा आहे. त्याने कपाळावर विभूती रेखिली आहे मुकुटावर रत्नांची प्रभा आहे व मस्तकावर शिवलिंग आहे. क्षीरसागरातील निवांतपणाचे सुख त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे व ते मुख दोन्ही बाजूस राही रखमाबाई बघत आहेत.सर्व देवांची व तारांगणाची प्रभा छातीवर घेतली आहे. संसार माझ्या कमरेइतकाच आहे असे तो कमरेवर हात ठेवून त्याची खूण जगाला दाखवत आहे. समचरणावर उभा असणारा तो पंढरीचा राणा जनमानसाला आवडतो पण भक्तीशिवाय तो दुर्लभ आहे.

हा क्षोमाचा गाभा व ब्रह्मविद्येचा प्रियकर असून भक्ताच्या निकटतेसाठी उभा आहे. तो भक्ताऐक्यासाठी भीमातटी उभा राहून स्वतःची ओळख दाखवतो.हा नाही हा नाही असे सांगणाऱ्या श्रुतीवाचून दमलेल्या भक्तांना तो शृंगाराच्या शोभेने तो हात वर करून जगाला मोहित करतो.चंद्र सूर्याचे व ग्रहगणांचे त्याच्या गळ्यातील मेखळेच्या मध्यभागाच्या मण्यात आहे व तो सर्व ताऱ्यांमध्ये सूर्यासारखा शोभतो. कितीही वेष पालटून तो आम्हाला फसवायला गेला तरी ती विठ्ठलमूर्ती आमच्या ह्रद्यात आहे. हे विठ्ठला तू माझ्याशी का अबोला धरला आहेस म्हणून माझा जीव जाऊ पहात आहे असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading