
आज कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस. सगळ वातावरण उदास खिन्न! सगळ्या चराचरावर,अवकाशावर एक खिन्न दुःखी विमनस्कतेची छाया पसरले ली,सार्या सृष्टीवर,सृष्टी चक्रातल्या पंच महाभूतवर सुध्दा एक अवकळा पसरली होती.आणि इंद्रायणीच्या घाटावर विमनस्क अवस्थेत बसलेल्या सोपानदेवां चा …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! संत सोपानदेव चरित्र !!!
भाग – ३१.
सकाळची दैनंदिन काम आटोपल्यावर पद्मासन घालुन श्लोक पठणास बसले.सगळं म्हणुन झालं आणि गंगाच्या हंंबरण्याचा आबाजानं भानावर आले.तिचं चारापाणी झालं तरी तीचं हंबरणं सुरुच होतं.आणि त्यांना हंबरण्याचे कारण समजले तेव्हा आनंदाला पारावारच राहिला नाही. साक्षात निवृत्तीदादा समोर उभे होते. दोघेही एकमेकांच्या मिठीत सावरले.क्षेम कुशल विचारल्यावर,निवृत्तीदादासोबत नाथपंथातले जेष्ठ योगी स्वाती माधवनाथ यांनांही गहिनीनाथांनी अनुग्रह दिला आहे.सोपानांनी त्यांच्या चरणांवर मस्तक टेकवलं.दोघांनीही वृंदावनजवळ बसवलं त्यांनी गोठ्यातील गंगा गाईला पाहुन आश्चर्य व आनंद झाला.माधवनाथ म्हणाले,गाईचं पुन्हा इथे येणं म्हणजे गोपालकृष्णाचा आशिर्शादच आहे. तुमच्या कार्याला मिळालेलं सैध्दान्तिक पाठबळच आहे.नास्ता वगैरे आटोपल्या वर,सोपानानं लिहिलेलं हस्तलिखित निवृत्ती दादासमोर ठेवलं.एकापाठोपाठ एक पानं वाचुं लागले.डोळ्यातुन अश्रू वाहुं लागले,त्यांत होतं अपेक्षापूर्तीचं समाधान,कौतुक,ओसंडु लागले,म्हणाले, तू माझा शिष्य आहेस याचा मला अभिमान आहे.
सोपाना!अत्यंत नेमक्या चपलख शब्दात आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे सुबोध,सोप्या नागरी मराठीत नऊ अध्यायातील गीतार्थ उभा केलास.
मायबोली मराठी तुझी सदैव ऋणी राहिल.अशाच प्रतिभेनं पुढचे अध्याय लिहुन हा संकल्प सिध्दीस ने!आपण कृतार्थ झालो,धन्यता पावलो ही भावना त्यांच्या ओघळणार्या अश्रूतुन प्रतित होत होती.
दुसर्या दिवशी निवृत्तीदादा व माधवनाथ परत गेले.ब्रम्हमुहुर्तावस्था आधी उठुन दैनंदिन कामें आटोपुन प्रचंड उत्साहाने दहावा अध्याय लिहायला सुरुवात केली.श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनांतील शंकेचं निरसन करीत,आपलं अस्तित्व किती सर्वव्यापी,सर्वसाक्षी आहे हे ते सांगताहेत.सोपानांनी लिहिले….
“श्रीकृष्ण म्हणती अर्जुन।
हे एक परम वचन।
तूं सुखसंतोष होऊन।
ते सांगेन तुझ्या हितालागी ।।”
यानंतर भगवंतांनी जे सांगीतलं ते म्हणजे
त्यांच्या सर्वसमावेशकत्वाचा,सर्वव्यापक त्वाचा,सर्वभूती परमेश्वर आहे याचा साक्षात पुरावा होता.श्रीकृष्णातलं हे सर्व व्यापी अस्तित्व दाखवण्यासाठी सोपान लिहितात…
“तरी अर्जुना अवधारी ।
मी आत्मा सर्वभूत शरीरी।
आदि मध्य निर्धारी ।
सर्व भूतांसी मीच जाण ।।”
उत्पत्ती,स्थिती,लय या तिन्ही अवस्था माझ्याच अस्तित्वाशी निगडीत आहे. भगवंताचे हे वचन वाचुन सोपान स्तिमित झाले.भगवंताचं सर्वव्यापी अस्तित्व सांगणारा दहावा अध्याय संपवला.दुपारचे खाणेपिणे आटोपुन अकरावा अध्याय घेतला.यांत भगवान श्रीकृष्णाचं विराटरुप दर्शन होत.प्रत्येक रुपाचं,तेजाचं,शक्तीचं,आयुधाचं वर्णन लिहितांना सोपान रोमांचित होत होते. त्यांना वाटले अर्जुन किती भाग्यशाली? त्याला भगवंताच विराटरुप बघायला मिळालं आणि आपणही भाग्यवान आहो त्या विराटरुपाचं वर्णन करायला मिळालं.
अकरावा अध्याय लिहुन झाल्यावर सोपानांच्या नजरेसमोर परमेश्वराचं भव्य, दिव्य,अतिविशाल,चराचराला व्यापुन राहिलेलं विराट दर्शनापुढे सोपान अति अति लीन होऊन नतमस्तक झाले.आणि १२ व्या अध्ययाकडे वळले.देव हा भावाचा भुकेला आणि भक्तीचा तहानले ला,सामान्य माणसाला दिलासा देणारं, श्रध्देनं दोन हस्त आणि एक मस्तक या साधनेनं केललं भजन देवाला आवडतं हे सत्य दाखवलं.
तेराव्या अध्ययात भगवंतांनी भक्त
आणि भगवंत यातलं निर्वाज्य पण श्रध्देचं नातं सांगीतलं.
“पंचभूते आणि प्रकृति क्षोम।
जाणोनि बध्द तो परम गति पावे ।।देवाचं भक्तावरचं प्रेम,कल्याण,भक्ताच्या उत्तम गतीची त्याने वाहीलेली चिंता बघुन सोपान गहिवरले.
दुपारचे जेवण आटोपुन १४ वा अध्याय लिहायला घेतला.ही अवघी सृष्टी चराचर म्हणजे परमेश्वर आणि प्रकृती यांच्या समर्पणाची साक्षेपी अविष्कार आहे म्हणुनच सत्व,रज,तम,गुणांनी युक्त अशी ही सृष्टी आहे,त्यामुृळेच ज्ञानाचं महत्व अधिक आहे असं भगवंतांनी सांगीतलं.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ८-५-२०२१.
!!! सोपानदेव !!!
भाग -३२.
सोपानांनी १५ वा अध्याय लिहायला घेतला.इथ श्रीकृष्ण एका वेगळ्याच वृक्षाचं उदाहरण देऊन ज्ञानाचं महत्व सांगतो त्याचं अनुवाद त्यांनी केलं. “उर्ध्व मूळ आहे ज्या वृक्षाचे ।
अधःशाखा विस्तार ज्याचे ।
सत्य छेद वेदरुप तयाचे ।
परी त्याते जाणे तो चि ज्ञानी ।।
श्रीकृष्णाची भव्य प्रतिभा समजावुन सांगण्याची कला आणि मानव कल्याणार्थ केलेला उपदेश या त्रिदर्शनाने सोपान भारावुन गेले.
सोळावा अध्याय मात्र सोपानांना वेगळा वाटला.यांत मानवाचे गुण आणि अवगुण दोन्हीही सांगीतले.गुण देव सापेक्ष,तर अवगुण दानव सापेक्ष अशी मिमांसा केली.अवगुणांचं मुळ,मानवाचं अकल्याण,मानव्याचा नाश करणारं,देव बनण्याऐवजी दानव,असूर बनवणारे अवगुणाचं वर्णन श्रीकृष्ण करतो.खरचं! श्रीकृष्णांनी मानव कल्याणाचा किती बारकाईने,साक्षेपाने विचार केला होता. आणि हे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं भाग्य आपल्याला लाभलं हे पूर्वसंचिताचं फळच आहे.
याच आनंदात त्यांनी सतरावा अध्याय हाती घेतला नी ते थक्क झाले. या अध्ययात भगवान श्रीकृष्णांनी सात्विक,राजसी,तामसी व्यक्तीचे गुण, लक्षण,विचार,सवयी,आचार याचं समृध्द आणि समर्पक असं विवेचन केले होते.
श्रीकृष्णांनी सत्व,रज,तम, या गुणांची केलली मिमांसा लक्षणीय होती.या अध्यायाचा शेवट सोपानांनी असा केला..
“श्रध्दा नसता होम दान ।
तप आणि कर्म कारण ।
असभ्य शब्द जाण ।
इहलोकी परलोकी नव्हे बरवे ।।
सतरावा अध्याय संपला.अवघडलेलं अंग मोकळं केलं.आपल्या हातुन एवढ सारं लिहुन झालं याचं त्यांना आश्चर्य वाटले. जेवन झालं आणि थकलेला जीव आणि मन कधी झोपी गेलं कळलच नाही.
सकाळी लवकर उठुन नित्यकर्मे आटोपली.स्नान झाल्यावर आईच्या चरणमुद्रेची पुजा केली आणि लिखाणाचं साहित्य घेऊन बसले.आज शेवटचा १८ वा अध्याय लिहुन संकल्प पुर्णत्वास, सिध्दीस न्यायचा….श्रीकृष्णाला मनोमन भक्तीभावाने नमन करुन सुरुवात केली. सर्वसामान्य माणसाच्या मनांत नेहमी सतत उद्भवलेला प्रश्न अर्जुनाने श्रीकृष्णा ला विचारला,त्या प्रश्नाचे सोपानांनी केलेला अनुवाद असा…
“अजुन म्हणे जी नारायणा ।
मी इच्छितो जी तत्वलक्षणा ।
त्याग आणि सन्यास कवणा ।
हे वेगळे करुन सांगावे मज ।।
त्याग आणि सन्यास यातला भेद कोणता? या अर्जुनाच्या प्रश्नाला श्रीकृष्णाने दिलेल्या उत्तराचे सोपानांनी चपलख शब्दात केलेला अनुवाद…
” देव म्हणे अर्जुना परीवेसी ।
जो कामनेसहित टाकी कर्मासी ।
तया म्हणती सन्यासी ।
योगीराज महानुभव ।।
श्रीकृष्णाने ज्ञान,ज्ञाता,कर्म,कर्ता याचं मानवी जीवनातलं महत्व उलगडुन सांगीतलं ते सोपानांनी नागरी भाषेत लिहिले…” ज्ञान ज्ञय आणि ज्ञाता ।
कर्म कारण आणी कर्ता ।
ध्येय कर्म आणि कर्ता ।
हा संग्रह कर्माचा ।
ज्ञान कर्म आणि कर्ता ।
हे वेगाळले भेद गुणावे देखा ।।
तेथे त्रिगुणाचि असे सांख्या ।
तेथे बोलिजे ते ऐका ।।
श्रीकृष्णाने अर्जुनाला सत्य-असत्य
कर्म-अकर्म,धर्म-अधर्म,सत्व-रज-तम, पाप-पुण्य,काम-क्रोध-लोभ अशा अनेक संदर्भात विस्तारानं सांगुन अर्जुनाचा संभ्रम दूर केला.गीतार्थ संपला.संपूर्ण लिहुन झालं होतंआतां याच्या संपूर्ण पठणाचं फळ सोपानांनी लिहायला घेतला.
“तेणे किरिटसी बोध जाला ।
परब्रम्ही मिळणी मिळाला ।
आणि सकलही लोका मार्ग सापडला ।
भवसागर तरावया ।” आणि शेवटी लिहलं…
” शुध्दाशुध्द तरी कोणी ।
करावी गीतेची घोकणी ।
तेणे संतोषे चक्रपाणी ।
कर्मबंधने तोडील ।।” सोपानांनी शेवट केला.लेखणी खाली ठेवली.भगवद् गीतेवर माथा टेकला.कांही चुकलं असेल तर कृष्णाला माफी मागीतली.ईश्वराचे आभार,संकल्पाची पुर्तता झाल्याचं समाधान,कार्य घडल्याची सार्थकता, निवृत्तीदादा,ज्ञानदादा,मुक्ताईस लिखान दाखवण्याची उत्सुकता,आतुरता अशा अनेक भावनांची आवर्तने सोपानांच्या मनांत उठली होती.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ८-५-२०२१.
!!! सोपानदेव !!!
भाग – ३३.
दुसर्या दिवशी आईच्या चरण मुद्रेचा निरोप घेतांना त्यांना गलबलुन आले.लहानपणीच्या सार्या आठवणी डोळ्यासमोर तरळुन गेल्या.निग्रहाने डोळ्यातील अश्रू पुसले.गोठ्यातील गंगा गायीचे दावे सोडुन मोकळे केले.आणि उदास मनाने आळंदीकडे निघाले.पाठो पाठ गंगा गाय पण!वाटेत भोजलिंग काकांच घर होते,ते आता नाहीत,पण त्यांची मुलं होती.गंगा गाईसोबत सोपानास बघुन त्याला आश्चर्य वाटले. विष्णु नांवाचा मुलगा म्हणाला,आम्ही हीला खुप शोधलं.विठ्ठलपंतांनी ही गाय आबांकडे सुपुर्द केली होती.तुम्ही पर्ण कुटीत रहायला आल्यामुळ गंगा आली असेल तिकडे.गंगाची दोरी विष्णुकडे सोपवली.निरोप घेऊन सोपान निघाले.
वस्ती दिसल्यावर मात्र सोपानांना सगळ्यांना भेटायची तिव्र ओढ लागली.
झपाझप चालत सोपान झोपडीजवळ पोहोचले तर समोर मुक्ता!सोपानदादा आलास तू?आणि मिठीत शिरली.संध्या काळी आलेल्या निवृत्तीदादा व ज्ञानदादां ना सोपानास पाहुन अतिशय आनंद झाला.ज्ञानदादा प्रेमाने,आपुलकीने बोलत होते.स्वरांतुन काळजी,माया,प्रेम ओसंडत होतं आणि निवृत्तीदादा स्नेहाद्र नजरेनं बघत होते.नंतर हसत खेळत सगळ्यांची जेवणं झाली.गप्पा गोष्टी होऊन निद्रिस्त झाले.
दुसर्या दिवशी निवृत्तीदादा आणि ज्ञानदादा सोपानचे लिखान घेऊन बसले. श्रीमद् भगवद् गीतेवरची ती समश्लोकी टीका अत्यंत सोप्या,कोणत्याही उत् प्रेक्षा अलंकारांचा उपयोग न करतां सविस्तर विश्लेशन न देता सुबोध नागर मराठीत केलेला अनुवाद पाहुन कांहीशा अबोल असणार्या सोपानच्या व्यक्तीमत्वाप्रमाणे मित शब्दांचं आणि नेमकं,आणि कुठही गीतेच्या अर्थाला,अन्वयार्थाला किंचितही धक्का न लावतां,श्रीकृष्णाने सांगीतलेलं सगळं ज्ञान,विज्ञान,अध्यात्म,योग जसाच्या तसा नागरी भाषेत उतरवलेला पाहुन सोपानाच्या तेजबुध्दीचं कौतुक वाटलं. वाचतां वाचतां जणूं निवृत्तीदादांची समाधी लागली.त्या भावसमाधीत त्यांनी सोपानाचं संपूर्ण लिखाण वाचुन काढलं तेव्हा त्यांचे डोळे अश्रूंनी भरुन आले. भरल्या डोळ्याने सोपानाकडे बघुन, सोपानाsss माझ्या लाडक्याss सोपाना अशी आर्त हाक ऐकुन सोपानांना आपल्या अवघ्या आयुष्याचं सार्थक झालं अस वाटले,याक्षणी आपल्या जीवाची सांगता व्हावी असं क्षणभर वाटुन गेलं.ज्ञानदेवा जशी तुझी “ज्ञानदेवी तशी या सोपानाची “सोपानदेवी”!
संध्याकाळी सर्व संतमंडळींचा गोतावळा जमा झाला.सगळ्यांनी मिळुन “सोपानदेवी” वाचली.नामदेव म्हणाले, सोपानकाका!किती चपलख अनुवाद केला गीतेचा!सगळ्यांनी खुप कौतुक केले.चोखामेळांनी तर मानाचा जोहारच घातला.सर्वजन निघुन गेले.
सर्व पंचक्रोशीची,समाजाची ही भावंडं दैवतं झाली होती.चातुर्वर्णानी ग्रासलेला समाज मागे पडुन जातीभेद न मानणारा,वारकरी धर्मानं वागणाला नवीन समाज,जाती,धर्म,पंथ,भेद विरहित महाराष्र्टाचं नवीन चित्र प्रत्यक्षात आकाराला येत होतं.निवृत्ती-ज्ञानदेवाचं एकसंघ महाराष्र्टाचं स्वप्न साकारत होतं.
तोच संतमंडळींसह कांही प्रमुख
गांवकरी आलेत.नामदेव म्हणाले,सोपान काकांनी लिहिलेली “सोपानदेवी”पालखी तुन वाजतगाजत न्यावी म्हणुन सर्वजणं आले आहेत.सोपान संकोचल्यावर निवृतीदादा म्हणाले,सोपाना! संस्कृती सिध्द करणारी कोणतीही गोष्ट कुणा एकाच्या मालकीची असत नाही,ती सर्वां साठी असते. सोपानकाकांचा संकोच दूर होऊन प्रसन्न हास्य चेहर्यावर उमटले. उद्या “सोपानदेवी” पालखीत व पालखी संतांच्या खांद्यावर असेल.
दुसर्या दिवशी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या गजरांत सजलेली पालखी आणल्या गेली.निवृत्ती-ज्ञानदेवांनी गोपालकृष्णासमोर ठेवलेली “सोपानदेवी अंगणात आणली.नामदेवांनी लाल रंगाच्या रेशमी वस्रात तो ग्रंथ बांधुन डोक्यावर ठेवला व नाचत नाचत विठ्ठल गजरांत पालखी पर्यंत आणला.पालखीत ग्रंथ ठेवल्यावर निवृत्ती-ज्ञानेशांनी ग्रंथाची पुजा केली.आणि पालखीचे भोई झालेत. पालखीची नगरप्रदक्षिणा होत असतांना ठीकठीकाणी गुलाल, फुलांची उधळण,आरती, विठुनामाचा गजर करत वैष्णव नाचत होते.संपुर्ण नगरप्रदक्षिणा करुन पालखी मंदिरांत आली.आज नामदेवांचे किर्तन होणार होते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ८-५-२०२१.
!!! सोपानदेव !!!
भाग – ३४.
मंदिराचे आवार लोकांनी फुलुन गेले होते.नामदेवांचे किर्तन सुरु झाले. लोकं उत्सुकतेने ऐकु लागले.सोपाकाका आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणजे एक जण श्वास तर दुसरा उच्छश्वास,ज्ञानेश्वर माऊली म्हणजे नाम आणि सोपानकाका जप,ज्ञानेश्वर माऊली फुल तर सोपान काका सुगंध,ज्ञानेश्वर माऊली म्हणजे अर्थ आणि सोपानकाका अन्वय,माऊली नेत्र आणि सोपानकाका दृष्टी,म्हणुनच ही दोघं ईश्वराचे दोन्ही नेत्र आहेत.जिवा शिवाचे अद्वैत ऐक्य आहेत.विठुनामाचा गजर करुन कीर्तन संपले.पालखी पुन्हा घराच्या अंगणात आली.निवृत्तीदादा व ज्ञानदादांनी मोठ्या आदराने पालखीतील “सोपानदेवी” घरांत गोपालकृष्णासमोर आणुन ठेवली.चौघा भावंडांचा जयजय कार आणि विठुनामाचा गजर करत लोकं घरी गेले.रात्री सोपानांना झोपेत विचित्र स्वप्न पडले.उद्या दादांना अर्थ विचारु असा विचार करुन परत झोपी गेले.
सकाळी सोपानांना जरा उशीराच जाग आली.निवृत्तीदादा कांहीतरी सांगत ज्ञानदादाची समजुत काढत होते.मुक्ताई डोळे पुसत होती.तीला रडतांना पाहुन सोपान चटकन उठुन बसत,मुक्ते काय झाले गं? कां रडतेस? तीला आणखीनच हुंदका फुटला.आवेग ओसरल्यावर म्हणाली, अरे!आपला ज्ञानदादा… ज्ञानदादा संजीवनी समाधी घेणार आहे. काssय? काय म्हणालीस तू?ज्ञानदा तू.. तूं संजवनी समाधी घेणार? खरं आहे हे? होय माझं जिवितकार्य पूर्ण झालं,सर्व उदिष्ट,संकल्प सिध्दीस गेले म्हणुन मी हा निर्णय घेतला आहे.निवृत्तीदादा तूं दिली अनुमती?सोपाना! आपला ज्ञानेशा स्वयं सिध्द,स्वयंभू आहे.मी त्याला अडवण्या चा,समजावण्याचा खुप प्रयत्न केला,पण व्यर्थ!कितीही अप्रिय असलं तरी सत्य आपल्याला स्विकारायलाच हव सोपाना! निवृत्तीदादा दुःखी भिजलेल्या स्वरांत म्हणाले.ज्ञानेशाच्या पायावर लोळण घेत सोपान रडुं लागले.ज्ञानदाने त्यांना छातीशी धरुन कितीतरी वेळ थोपटत राहिले.सगळ्यांची समजुत काढुन ज्ञानदादा समाधिस्त झाले आणि इंद्रायणीच्या काठावर ज्ञानदादाच्या आठवणींना अश्रूंचा अभिषेक घालत सोपान आक्रोश करत होते.
खरंतर दुःखाचे दिवस संपलेहोते. पण ज्ञानदादांनी घेतलेल्या संजीवनी समाधिमुळे सगळा अंधकार पसरला होता.स्वप्नातील घटना प्रत्यक्षात घडली होती.आपल्याला पांडुरंगा हाती सोपवुन तसं अभिवचन घेऊन ज्ञानदा समाधिस्त झाले होते.मध्यरात्र झाली तरी सोपान इंद्रायणीकाठीच हुंदके देत बसले होते.तेवढ्यात त्यांना शोधत ओथंबलेल्या डोळ्यांनी व काळवंडलेल्या चेहर्याने नामदेव आले, त्यांना कुशीत घेतल्यावर सोपान पुन्हा आकांत करुं लागले.स्वतःस सावरुन नामदेव म्हणाले, सोपानदेव,सोपानकाका!घरी चला! निवृत्तीदादा,मुक्ताई वाट बघत आहे. बोलतां बोलतां नामदेवांचा गळा भरुन आला.नाही नामदेवा!ज्ञानदाशिवाय मी घरी नाही जाणार!सोपानकाका!माऊलीनं समाधी कां घेतली हे कां मी सांगाव? तरीसुध्दा सांगतो.”नश्वर हा देह। साधका सांधवी।एक तत्व धरुनी।तत्व बोध।देहावाचेनि माये पावे एक वत्ती। जीव शीव समरसा।ऐक्य झाले।
असं तुम्हीच सांगीतले आहे ना?
“शरीर निर्मळ।वासना टवाळ।कारे बरळा भक्तीविणा।पृथ्वी आप तेज।वायु आणि व्योम।पंचभूत सम।वर्तवसे।।” हे ही तुम्हाला माहित आहे ना सोपानकाका? मुक्ताबाईंना तुमच्याशिवाय कुणीच आवरुं शकत नाही,निदान तीच्यासाठी तरी चला.खरय!ती फार कोलमडुन गेली असेल.माझ्याशिवाय कुणीच नाही सांभाळु शकत. ज्ञानदांच्या आठवणीने टाहो फोडुन रडणारे सोपान एकदम प्रौढ झाले.अश्रू पुसले,इंद्रायणीला नमस्कार केला आणि नामदेवांसोबत थेट घरीआले
मध्यरात्र उलटली तरी अंगणांत संत मंडळी व गावकर्यांची गर्दी होती,प्रत्येका चे डोळे पाण्याने भरलेले होते.निवृत्तीदां ची व सोपानांची नजरभेट झाली.त्यांच्या नजरेतील कारुण्य पाहुन सोपानांना वाटले,असा गांभीर्याचा मुखवटा धारण करुन राहण्यापेक्षा ढसाढसा रडले तर बरं होईल.सोपान घरांत तिरासारखे धावले. गोपालकृष्णाच्या मूर्तीसमोर घायाळ, विध्द पक्षिणीसारखी बसलेल्या मुक्ताला मिठीत घेतले.सोपानदाss आपला ज्ञान दादाss …कितीतरी वेळ सोपानाच्या कुशीत मुक्ता रडत राहिली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ८-५-२०२१.
!!! सोपानदेव !!!
भाग – ३५.
दुसर्या दिवशीचा सूर्य उदासपणे उगवला.ज्ञानदादा आपल्यात नाही हा विचारच सहन होत नव्हता.पण निवृत्तींना सावरावेच लागले.योगाभ्यास झाला,पण घरांत सोपान,मुक्ताची चाहुल लागेना म्हणुन त्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला.अनेक आशंका मनात आल्या. ज्ञानेशांनी घेतलेल्या संजीवन समाधी नंतर मनाला झालेले दुःख,यातना, काळजाला पडलेली भेग,ह्रदयाच्या झालेल्या चिंध्या,मोठ्या भावाआधी धाकट्याने आषुष्य संपवल्याने झालेले क्लेश आणि ज्ञानेशाच्या समाधीमुळे सैरभैर झालेल्या लोकसागराला आवरण्यासाठी करावी लागलेली धडपड या सगळ्यांचा तान असह्य होऊन एक प्रकारची त्यांना ग्लानी आली होती. तेवढ्या वेळांत ही मनाने कोलमडलेली पोरं कुठ गेली असेल?कांही भलत सलत तर केलं नसेल ना?अशाच सैरभैर अवस्थेत आर्त आवाजांत त्यांनी नामदेवां ना हाक मारली.नामयाss ही पोरं कुठंच दिसत नाही रेss कुठे गेली असतील? समाधीनंतर खंबीरपणे सावरणार्या निवृत्तींची विकल अवस्था बघुन,नामदेव त्यांच्या हाताला धरुन सर्वीकडे शोधुनही न दिसल्याने ते ज्ञानेशांच्या समाधीस्थळी आलेत.त्या परिसरांतील निरव शांततेत त्यांना बारीकसा आवाज कानांवर पडला आवाजाच्या रोखाने गेल्यावर अजान वृक्षाच्या पाठीमागे सोपान-मुक्ता रडत रडत कुणाशी तरी बोलतांना दिसले.
सोपान बोलत होते,अरे ज्ञानदादा! संजीवनी समाधी घेऊन तूं परमार्थाचं सर्वौच्च शिखर गाठलस,पण आम्ही पांगळे झालो,पाय गेले म्हणुन नव्हे तर, वाटा संपल्या म्हणुन!सोपानांनी घुसमटुन हुंदका दिला तोच मुक्ता म्हणाली,आई बाबा म्हणजे काय? हे कळायच्या आधी ते सोडुन गेले,पण तुम्हा तिघांमुळे उणीव कधी भासली नाही.जिथं मायेचं प्राणतत्व ममतेची ऊर्जा नाही अशी निर्वात पोकळी म्हणजे पायाखाली जमीन नाही.आज आम्ही खरे निराधार,पोरके झालो.पोरके!
दोघांचे बोलणे ऐकुन निवृत्ती धावतच दोघांजवळ जाऊन त्यांना मिठीत घेत म्हणाले,अरे! माझा आधार नाहीसा झाला म्हणुन काय झाले?मी तुमचा आधार नाही कां?चला बाळांनो घरी चला घरी चला…
निवृत्तीदांच्या आश्वासक स्पर्शाने दोघांचाही बांध फुटला आणि आणखीन रडुं कोसळले.रडत रडत मुक्ता म्हणाली, दादा आम्ही ज्ञानदादाला खूप विनवलं, हट्ट धरला,पण तो आला नाही तो नाहीच आला रेss !तिचे डोळे पुसत निवृत्तीदादा म्हणाले,मुक्ते! समाधीस्त झालेला ज्ञानेशा परत या मर्त्य लोकांत प्रवेश करेल असं तुला वाटलच कस?आणि समजा तो परतलाच तर प्राणभयानं आला,हे तुला चालेल?सोपाना-मुक्ता! संजीवनी समाधी घेऊन परमार्थाचं शिखर ज्यानं गाठलं, तो ज्ञानदेव पुन्हा या ऐहिक मार्गात परतलेला चालेल तुम्हाला?नाही ना? तेव्हा त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करुं नका.उलट त्याची पारमार्थिक वाटचाल सुखनैव व्हावी म्हणुन स्वतःला आवरा,सावरा. तुमचा ज्ञानदा आत्मानुभवी होता.म्हणुन त्यानं भक्तीतील प्रेमसुखाचा,मुक्तितील आत्मसुखाचा आणि समाधीतल्या संजीवकाचा अनुभव घेतलाय.तेव्हा आतां दुःख आवरा.ज्ञानेश्वराचे सहानुभवी व्हा आणि घरी चला.
ज्ञानदादाच्या वियोगानं काळजात उठलेला दाह,मनांत उसळलेला आगीचा डोंब,ह्रदयाला जाळणारा लाव्हा,निवृत्ती दादांच्या शीतल शब्दांच्या सिंचनाने शांत झाले.सोपान-मुक्तानं मोठ्या निग्रहाने डोळे पुसले आणि दृढनिश्चयाने घराकडे निघाले.नामदेवांच्या मनांत आले,ही पोरं मोठी झाली की, पोरकी झाली?
त्यानंतर मात्र सोपान-मुक्तानं डोळ्यातून पाणी काढलं नाही,पण हसूही उमटले नाही.सोपान आधीच कांहीसे अबोल,शांत,संयमी,आतां तर ते आणखी अबोल झाले.सोपान-मुक्ताई एकमेकांशी खोटे खोटे मुखवटे घातुन जपतांना बघून एवढे खंबीर निवृत्तींना मात्र गलबलुन यायचं!ज्ञानदादाला समाधी घेऊन आठ दिवस झाले पण दुःख तसुभरही कमी झाले नाही.
नामदेवादी संतमंडळी रोज येत,विषय ज्ञानदादाचाच असायचा.त्यांची ज्ञानेश्वरी, अमृतानुभव,चांगदेव पासष्टी यावर रोज चर्चा होत असे.ज्ञानदादा किती व्यापक ठसा उमटवुन गेले याची पदोपदी नव्हे क्षणोक्षणी जाणीव व्हायची.सर्व निघुन गेले की, सारं रिकामं रिकामं वाटायच, घर खायला उठायच!
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ९-५-२०२१.


