
आज कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस. सगळ वातावरण उदास खिन्न! सगळ्या चराचरावर,अवकाशावर एक खिन्न दुःखी विमनस्कतेची छाया पसरले ली,सार्या सृष्टीवर,सृष्टी चक्रातल्या पंच महाभूतवर सुध्दा एक अवकळा पसरली होती.आणि इंद्रायणीच्या घाटावर विमनस्क अवस्थेत बसलेल्या सोपानदेवां चा …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! संत सोपानदेव चरित्र !!!
भाग – २६.
सर्व मंडळी उज्जैन,प्रयाग,द्वारका हस्तिनापूर, सगळीकडे जाऊन सर्व समावेशक अशा भागवत धर्माची पताका रोवुन परत आली.आळंदीला आल्यावर रोजचा दैनंदिन कार्यक्रम सुरु झाला.पण सोपान आतां आत्मध्यानांतच जास्त रमत होते.एक दिवस सोपानांनी एकटाक बसुन हरिपाठाचे अभंग पूर्ण केले.ते इतके तल्लीन झाले होते की,कधी निवृत्तीदादा येऊन त्यांनी लिहिलेली पानं वाचली कळलेही नाही.सोपानाचं सुंदर मोत्यासारखं अक्षर,सुस्पष्ट,नीटनेटकं नितळ वाचतां वाचतां निवृत्तींना भरुन आलं.सोपानदेवाचं सुरेख हस्ताक्षर नेमकी शब्दरचना,सखोल अर्थ आणि अन्वयार्थ म्हणजे पारमार्थिक निर्गुण अनुभूतीचे स्वाभाविक उद्गार होता तो. निवृत्ती नाथांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळु लागले.त्यांना समोर पाहुन सोपान संकोचले.त्यांनी लिहिलेले पान निवृत्ती दादा समोर धरलं त्यांत लिहिलं होतं….
“निवृत्ती सोपान।परिसा भागवत।
पंढरी निवांत। विठ्ठल गाती।।
धन्य तोचि नामा। ज्ञानदेव पाही ।
सनकादिक बाही। उभे देखा ।।
पुंडलिक भक्त। देव मुनी सर्व।
शुध्द चरणी भाव। अर्पिताती ।।
सोपान डीगर । आनंदे नाचत ।
प्रेमे ओवाळित । हरिच्या दासा ।।”
सोपानाचं मन आणि अभंग किती पिरदर्शी आहेत,हे कौतुक त्यांच्या डोळ्यात उमटलं.सोपानाच्या पाठीवरुन हात फिरवला तो स्पर्श त्यांना आई सारखा जाणवला.
आतां माधुकरी किंवा घरांतील कामे कमी झाल्यामुळे सोपानांना वेळ आणि एकांत मिळु लागला.मग एकांतात त्यांच मनन,चिंतन,वेद,उपनिषदं,शांडिल्यभक्ती सुत्र,मनुस्मृती,नारदसुत्र,चण्डीशतक,
तैत्तिरीयारण्यक,याज्ञवल्कस्मृती,रामायण महाभारत इत्यादी ग्रंथांचा अभ्यास करुं लागले.न समजणार्या मुद्यांची चर्चा करुन निवृत्तीदादाकडुन समजावुन घेत व मग लिखाण सुरुं करत.विठ्ठलभक्तीचा, नामजपाचा महिमा,रामकृष्ण हरिचा जप जपामुळे मिळणारा मोक्ष याचं अत्यंत मार्मिक शब्दरचनेतुन विवेचन करत. त्याचं काहीही लिहुन झालं की,पहिला श्रोता मुक्ताई असे.मग ते लिखान निवृत्ती दादांना दाखविल्यावर त्यांचे कौतुकाचे बोल ऐकले,पाठ थोपटली की,सोपानांना बळ येत.आत्मविश्वासाला पाठबळ मिळायच.एक दिवस निवृत्तीनाथ,ज्ञानेशा मुक्ताईला सोपानांच्या स्वतंत्र विचारांची बैठक समजली.झालं असं की,ब्राम्हण समाजाचे कुलाचार आणि संस्काराबद्दल चर्चा सुरु होती.ब्रम्ह जाणतो तो ब्राम्हण. म्हणुनच ब्रम्ह जाणण्यासाठी तशी मनोधारणा,मानसिक बैठक तयार होण्या साठी व्रतबंधनासारखे,उपनयन संस्कार ब्रम्हचर्याचं पालन होणं गरजेचं आहे,पण सोपानांना तितकसं पटलेलं नाही हे त्यांच्या चेहर्यावरुन दिसलंं म्हणुन निवृत्तीदादांनी विचार व्यक्त करण्यास सांगीतल्यावर, सोपान म्हणाले,ब्रम्ह जाणतो तो ब्राम्हण हे जरी सत्य असले तरी,फक्त ब्राम्हणकुळात जन्माला आला म्हणुन तो ब्रम्ह जाणेलच असं नाही.कुणी अंत्यज ब्रम्ह जाणुन घेऊ इच्छित असेल किंवा जाणत असेल तर,त्याचेवर उपनयनासारखे संस्कार व्हायलाच हवे अशी सक्ती,बंधनं नसावी.
भक्तीच्या अधिष्ठानावर समतेची संकल्पना उभी राहिली तर समाज अधिक सशक्त,निरोगी होईल असे विचार सोपानांनी नेमक्या व चपलखपणे मांडले हा विचार सिध्द होण्यासाठी…
“कर्माचे पेटार।किती वहावे शिरी।
लटके गा मुरारी । न जाय आझे ।।
घे कर्मसी दोरी । तुजची वाहिन ।
नित्यता सेविन । चरण तुझे ।।
न होता परीपूर्ण । बाधतसे बाधा ।
एक तू मुकुंदि । आम्हा पुरे ।।
सोपान म्हणे । कर्म ब्रम्र एक ।।
वेदाचा विवेक । ब्रम्ह एक ।।
पृथ्वी सोवळी । आकाश सोवळे ।।
मन हे ओवळे अभक्तांचे ।।
ब्रम्ह हे सोवळे । न देखो वोवळे ।
असो खेळेमेळे । इथे जनी।।
ब्रम्हांड पंढरी ।सोवळी ही खरी ।
तरसी निर्धारी । एक्या नामे ।।
सोपान अखंड । सोवळा प्रचंड ।
न बोले वितुंड । हरी वीणा ।।”
अशी चपलख अभंगरचना सोपानाने करुन दाखविली.त्यांची तिव्र प्रतिभा व बुध्दीमत्तेची झेप पुर्ण झाल्याचे पाहुन दोघे भाऊ व मुक्ता सुध्दा आवाक झालेत. हा धाकटा भाऊच नाही तर,बुध्धीमान व्यक्तीत्व आहे याची जाणीव झाली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ७-५-२०२१.
!!! सोपानदेव !!!
भाग – २७.
सोपानांची प्रतिभा पोर्णिमेच्या चंद्रासारखी तेजस्वी आणि पूर्णरुप झाली होती.सतत स्वतःला विकसित,स्वतःच ज्ञान परिपूर्ण करण्याचा प्रयत्न,एकलव्या प्रमाणे स्वतःच स्वतः शिकुन ज्ञान संपादन करण्याची त्यांची धडपड पाहुन निवृत्तींना कौतुक वाटले.सोपानाचं अध्ययन चालु होतं.ज्ञानदादानं तर समाजच्या उध्दारासाठी वाहुन घेतलं. त्यांची ‘ज्ञानेश्वरी’ लिहुन झाल्यावर, निवृत्तीदादांच्या आदेशानुसार “अमृतानुभव” लिहिला.हा ही ग्रंथ त्यांच्या अलौकिक बुध्दी वैभवाची आणि दैवदुर्लभ प्रतिभेची साक्ष होती.सोपानांच ही ज्ञानेश्वरी वाचन सुरु असतांना त्यांच्या मनांत कांही शंका निर्माण झाल्यात आणि त्या शंकेला तोंड फोडलं चोखा मेळांनी.सोपान ज्ञानेश्वरी वाचुन अर्थ सांगत होते.चोखोबा,सावतामाळी,जना बाई, त्यांच्या भोवती बसले होते.ज्ञानेशा निृवत्तीदादा व नामदेव बाहेर गेले होते.
चोखोबा म्हणाले!देवा!ज्ञानेश्वरी तुम्ही वाचुन अर्थ सांगतां म्हणुन आम्हाला समजते.पण ज्ञानोबा माऊलीची भाषा वैभव एवढं मोठ आहे की,वाचतांना डोळे दिपून जातात नुसती वाचुन कोणालाच समजत नाही.त्यावेळी सोपान कांही बोलले नाही,पण निवृत्तीदादांशी चर्चा करुन कांहीतरी करावं असं मनी पक्क केलं
एक दिवस सोपानांनी धीर धरुन
निवृत्तीदादांना म्हणाले,दादा! ज्ञानदादांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यापुर्वी…
“माझी मराठीची ये बोलू कौतुके ।
परि अमृतातेही पैजा जिंके ।
ऐसी अक्षरे रसिके । मेळवीन ।। असं वचन श्रोतृवृदांना दिलं आणि ते राखलही ज्ञानदादाची मराठी भाषा अमृतालाही जिंकेल,अमृताची अविट माधुरी, चिरंजिवित्व,शुध्दत्व आहे पण दादा!त्याच बरोबर अमृताची अप्राप्यताही आहे दादा!ज्ञानेश्वरीची मराठी म्हणजे, ज्ञान दादाच्या प्रतिभेचा,अभिजात मराठी भाषेचा शुध्द बावणकशी,चोख अविष्कार आहे,पण दादा! या मराठी भाषेचं रुप प्राकृत आहे.नागरी बोलणार्यांना वा समजणार्यांना ही भाषा समजणं कठीण जातय.ज्ञानेश्वरी तील ज्ञान अगाध,विशुध्द,पण प्राकृतात असल्यामुळे सर्वसामान्य मानसाला,बहु जन समाजाला समजायला कांहीसं दुर्बोध आहे,आकलनापलिकडे आहे. म्हणुन सामान्य जनांना अधिक जवळचं सुलभ,सोयीचं वाटेल अश्या सोप्या भाषेत लिहिले तर सामान्य जनता आनंद उपभोगु शकतील.नपेक्षा सर्वसामान्य नागरी जनांच्या हातात ज्ञानेश्वरी देणं म्हणजे अनभिज्ञ असलेल्या अभिमन्युला चक्रव्युहाचा भेद करायला पाठवण्या सारखं आहे.दादा!सामान्य जनांना समजेल अशी सोपी सुलभ भगवद् गीता पर करतां आली तर नागर जनांत ती अधिक भावेल,सोपी सुलभ वाटेल ना?
सोपांनांनी आपले म्हणने इतके मुद्देसूद, उत्तम विश्लेषण,सुसंगतपणे सांगीतल्या वर निवृत्तीदादांना पटले व आनंदही झाला.ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी व अमृतानुभवचं इतकं लिखान झाल्यावर त्यांना परत लिहायला सांगणं योग्य नाही हे जाणुन निवृत्तीदादा सोपानांना म्हणाले तुला ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे शिवाय अर्थ व अन्वयर्थही जाणतोस,तर तूंच कां करत नाहीस?
दादा जमेल मला?सोपानांचा आर्त स्वर,विचारण्यांतील प्राणाणिकपणा, निवृत्तीदादांच्या मनाला स्पर्शुन गेला!नव्हे तूंच लिहावसं अशी माझी इच्छा आहे सोपानाss!तूं नामस्तोस्र,हरीपाठाचे अंभग रचलेस,आतां असं कांही तरी तुझ्या हातुन घडुं दे की,तुझं नांव चिरंजीव होईल.तूं श्रीमद् भगवद् गीतेवर तुझ्या सोप्या,सुलभ शब्दांत टीका लिहावीस अशी माझी इच्छा आहे.ठीक आहे दादा!ज्ञानदादा इतकी अलौकीक बुध्दीमत्ता,अभिजात प्रतिभा नाही माझे कडे,पण तुमच्या आशिर्वादाने मी जरुर प्रयत्न करीन.त्यासाठी आई बाबांची जीथे पर्णकुटी आहे त्या सिध्दबेटावर एकांतात जाऊन राहुं इच्छितो.तेवढ्यात आंत आलेले ज्ञानदादा म्हणाले,मलाही तिथे जाण्याचा मोह होतो.पण माझे अजुन कार्य अपुर्ण आहे.मुक्ता मात्र वेगळं म्हणाली,सोपानदादा तिथे तुला आई भेटेल,तीला सांग,मुक्ता आतां सर्वच बाबतीत तरबेज झाली.निवृत्तीदादा,ज्ञान दादांच्या पायांवर मस्तक ठेवले,मुक्ताईचा निरोप घेऊन सिध्दबेटावर जाण्यास निघाले.सन्यासानंतर परत गृहस्थाश्रम स्विकारल्यावर जिथे आईबाबांचा संसार फुलला,त्या आळंदीपासुन जवळच असलेल्या या रमणीय सिध्दबेटावर सोपान पोहोचले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ७-५-२०२१.
!!! सोपानदेव !!!
भाग -२८.
सोपान सिध्दबेटवरच्या पर्णकुटी जवळ आले.अंगणांतील तुळशीवृंदावन जणुं वाटच पाहत होतं.तुळशीवृंदावना च्या सभोवती सारवलेल्या जमीनिवर पुसट पुसट आईच्या टोकदार निमुळत्या पावलांचे ठसे दिसले.त्या ठशांवरची माती बाजुला केली.ओणवे होऊन मस्तक टेकवलं!क्षणभर,एकच क्षण आणि दुसर्याच क्षणी आईss आईss म्हणुन ढसा ढसा रडुं लागले.त्यांना त्या ठशांचा प्रसंग आठवला.त्या दिवशी आई गोमयानं(शेण) वृंदावनाच्या भोवतालची जागा सारवत होती.मुक्ता मधे मधे लुडबुड करीत होती.म्हणुन तिच्याकडे लटक्या रागाने बघत कमरेवर दोन्ही हात ठेवुन उभी राहिली.आणि तेच तिच्या पायांचे ठसे खोलवर उमटले होते. ठसे मिटवण्यासाठी पुन्हा गोमायने सारवणार तोच सोपानांनी थांबवले. आई थांब! राहु देत त्या मुद्रा तशाच!रुख्मिणीमाताची पावलं आहेत ती.तुझेही नांव रुख्मिणीच ना?आज त्याच पावलांवर सोपान आपल्या अश्रूंचा अभिषेक घालत होते. त्यांच्या अश्रूंनी ठसे ओलावत होते. डोळ्यांतुन वाहणार्या पाण्याने मधली सारी वर्षे वाहुन गेली.समाजाने घातलेलं ग्रामण्य,आईबाबांनी मुलांच्या हितार्थ घेतलेलं देहान्त प्रायश्चित,समाजाने केलेली अवहेलना,तिरस्कार,इवल्याशा मुक्तासह सगळ्यांना आलेलं पोरकेपण, पैठणपर्यंत उन्हातान्हात,काटेकुटे तुडवत उपाशीतापाशी केलेली पायपीट,ज्ञानदादा ने योगसामर्ध्याने दाखवलेली साक्ष आणि नंतरचे बदलेले दिवस!सारं सारं त्या ओघळणार्या अश्रूतुन वाहुन गेले.आई च्या पावलांच्या ठशांवरुन हळुवार प्रेमाने हात फिरवत,आईच्या प्रेमाचा स्पर्श शोधत राहिला.
सकाळी पक्षांच्या किलबिलाटानं सोपानाला जाग आली.ते तिथेच अंगणातील तुळशीवृंदावनाजवळ रडत रडत आईच्या पावलांच्या ठशावर डोके ठेवुन झोप लागुन गेली होती.क्षणभर आपण कुठे आहोत हेच उमजले नाही. आपण आळंदीत नसुन सिध्दबेटावर आलो याचे त्यांना भान आले.अहं! आतां अश्रू ढाळायचे नाही.कांही तरी लोकोत्तर कार्य करुन,आईच्या या चरणमुद्रेच्या साक्षीने आपली नाममुद्रा उमटावयाचीय, समाजावर आपल्या कार्याचा ठसा खोल वर उमटावयाचाय!ठरल तर!
सोपान नवीन उत्साह घेऊन तडफेनं उठले.सारा परिसर स्वच्छ केला. स्नान केले.आणि सोपानांच्या स्तोस्रांनी सारा असमंत,अणुरेणु भारीत झाला. शांतीपाठ झाला.ओंकार लावला. माध्यान्ह होईपर्यंत गीतेचे अठरा अध्याय म्हणुन झाले.भगवद् गीता त्यांची नुसती पाठच नव्हती तर,त्यांतील प्रत्येक प्रसंग, सर्व व्यक्तीरेखा नजरेसमोर साकार होत होत्या.भगवद् गीतेतल्या पहिल्या अध्यया तील पहिल्या श्लोकापासुन एकेक रचना, नवे शब्द,नवी रचना,नवा आकार,नवा अन्वय घेऊन नवीन रुपांत साकार होऊ लागले.मग मात्र सोपान थांबले नाही. एका पाठोपाठ एक भागवातातले श्र्लोक पुढे येत होते आणि त्या पाठोपाठ सुबोध सोप्या नागर मराठीतील शब्द,श्र्लोकांचा भावार्थ लेवुन सोपानांच्या लेखणीतुन उतरत होते.लेखणीतुन भराभर अक्षरं, शब्दरचना उलगडत होती.भगवद् गीतेचं एक वेगळं वैभव आणि त्या वैभवाला कोंदण ठरेल,असा अन्वयार्थ घेऊन ते अक्षर मिरवत होते. सोपान लिहित होते लिहित राहिले.
सोपानांनी पहिला अध्याय संपवला.डोळे मिटुन “कृष्णार्पणमस्तु”! म्हणत नमस्कार केला.तोपर्यंत अंधार पडला होता.प्रचंड भूकेची जाणीव झाल्याने मुक्ताईने दिलेल्या दशम्या खाल्ल्या.व निद्राधिन झाले.
रात्रीचा तिसरा प्रहर संपला नी सोपानांना जाग आली.सारं आवार स्वच्छ केलं.आईच्या चरणमुद्रांवर २-४ रानफुलं वाहिली.गोपाल कृष्णाचं स्मरण केलं,सर्व स्तोस्र म्हणुन झाली आणि दुसरा अध्याय लिहायला घेतला.
अविनाशी आत्म्याचं,चिरंजीव आत्म्याच चपलख वर्णन लिहुन झाल्या वर कांही क्षण सोपान अविचल बसुन राहिले.आत्म्याचं अविनाशत्व, चिरंजिवित्व सगळ्यांना कळलं तर, पुन्हा कोणी विठ्ठलपंत-रुख्मिणी बहिष्कृत होणार नाही.निरागस बालकं पोरकी, अनाथ होणार नाही.असं झालं तर समाज किती सुखी होईल?लिखान थांबवुन सोपान विचार करीत होते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! सोपानदेव !!!
भाग – २९. “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संग्ङोsस्त्वकर्मणि
फळाची अपेक्षा न करतां कर्म करीत राहणे हेच सामान्य माणसाचे जीवितकार्य आहे. तिसरा अध्याय कर्मयोगाचा! सोपानांना अतिशय आनंद झाला.कारण भगवंतांनी सांगीतलेली कर्मयोगाची सारी लक्षणे ज्ञानदादात आहेत.सोपानांनी लिहिले…” लोकांमाजी द्वीधा निष्ठता ।
यापूर्वी सांगितल्या भारता।सांख्यमति ज्ञान ज्ञाता।योगियासी कर्मयोग बोलिजे।।
आतां लिहितांना त्यांना मोठा उत्साह वाटत होता,मनाशी संवाद साधत होता.
सोपानांनी चौथा अध्याय लिहायला घेतला.ज्ञानकर्म सन्यासयोग! सोपान भगवंताच्या वचनाला शब्दबध्द करुं लागले नागर मराठीमध्ये.जेव्हा सर्व सामान्यांना भगवंतांनी दिलेलं हे अभि वचने समजतील,उमजतील तेव्हाच जगातील पवित्र शक्तीवर विश्वास बसेल. नवीन दृष्टी,नवे ज्ञान मिळेल.सोपानांनी नागर मराठीत लिहिले…
तरी ज्ञानासारखे पवित्र ।
आणि नाही गा सर्वत्र ।
त्या ज्ञानासि याग करिताही निरंतर ।
ज्ञाने करुं ब्रम्ह पाविजे ।।
मानवी कल्याणाची किती सखोल मिमांसा केली होती.खाणंपिणं आटोपुन, सोपान पांचवा अध्याय लिहायला बसले.
सामान्य मानवाच्या भूमिकेतुन अर्जुन आणि गुरुच्या भूमिकेत प्रत्यक्ष श्रीकृष्ण, ही युती मानवकल्याणासाठी किती उपयुक्त ठरली हे सोपानांच्या लक्षात आलं.कर्म आणि सन्यास या दोहोंची मनोहर सांगड घालुन सर्व सामान्यांना रुचेल,पचेल असं तत्वचिंतन सांगुन पांचवा अध्याय संपवला.
शिजवलेली खिचडी खात असतांना त्यांच्या लक्षात आलं की,ते इथे आल्या पासुन रोज गाईच्या हंबरण्याचा आवाज येतोय,आताही आला.आईने सांभाळले ली गंगा गाय तर नसेल ना?त्यांनी हंबरण्याच्या दिशेला तोंड करुन गंगाsss गंगाss अशी मोठ्याने आरोळी दिली आणि झाडंझुडपं तुडवत गाय पुढ्यांत येऊन उभी राहिली.तीने त्यांना हुंगले आणि ओळख पटली.हलकेच हंबरुन त्यांना प्रतिसाद देऊं लागली.सोपान तिच्या माथ्यावरुन,पाठीवरुन प्रेमाने हात फिरवत राहिले.उरलेली खिचडी तीला खाऊ घातली.गोठ्यात बसुन रवंथ करुं लागली.सोपान पुन्हा लिहायला बसले. सहाव्या अध्यायाला सुरुवात झाली.
अनाः श्रितः कर्मफले कार्य कर्म करोतियः
न सन्यासीच योगीच न निरग्निर्न चाक्रियः
सोपानांना वाटले हा श्र्लोक भगवंतांनी आपल्यासाठीच लिहिला आहे.
“जो कर्माच फळ नुपेक्षित कर्म करी ।
तया म्हणती सन्यासी अवधारी।
तोचि सान्हिक कर्म करी।कर्म त्यागी तो नव्हे।। सहावा अध्याय संपला आणि सोपानाचा उत्साह दुनावला.
सातव्या अध्यायाला सुरुवात केली. भंगवंत चराचरात व्यापुन राहिलेल्या अस्तित्वाबद्दल सांगीतले.ज्ञानदादानं सांगीतलेलं ईश्वर चराचरात भरुन राहिला हे तत्व भगवंतांनी अधिक व्यापक,विसृत करुन सांगीतलय ईश्वराचं सर्वव्यापकत्व बघुन सोपान स्तिमित झाले.दिवस मावळला.आज खिचडी जरा जास्तच लावली.अर्धी खिचडी गाईला खाऊं घातली नंतर आपण खाल्ली.डोक्यात आठव्या अध्यायाचं विचारमंथन करीतच झोपी गेली.
दुसर्या दिवशी भल्या पहाटे उठुन गंगा गाईचा गोठा स्वच्छ झाडुन काढला. तिच्या नितळ डोळ्यात प्रेम,वात्सल्य, कृतज्ञत्वाचं प्रतिक म्हणुनच काय सोपाना च्या हाताचा स्पर्श होताच तिच्या आचळा तुन दुधाच्या धारा ओघळुं लागल्या. ताज्या गोरसानं त्यांच्या चित्तवृत्ती प्रसन्न झाल्या.आठवा अध्याय लिहायला बसले. सोपानांना आतां अर्जुनाची भूमिका आवडायला लागली.एखाद्या हुशार पण आज्ञाधारक विद्यार्थ्यासारखा तो श्रीकृष्णाला प्रश्न विचारी व श्रीकृष्ण सर्व सामान्यांना मार्गदर्शक होईल असं त्याचे समाधान करीत.सोपान लिहितात…
अर्जुन म्हणे गा पुरुषोत्तमा ।
कैसा निवाड अध्यात्म आणि कर्मब्रम्ह्या ।
आधिभूत आधी दैवत आम्हा।निवडुनी सांगा ।।श्रीकृष्णाचे उत्तर म्हणजे अध्यात्म आणि कर्म यांची विलक्षण सांगड होती.सोपानांनी नागर मराठीत लिहिले…
“वेद यज्ञ तन आणि दान।
त्याचे जे बोलिले आहे पुण्य।
जया असे शुक्ल कृष्ण गतीचे ज्ञान ।
ते पुण्य पावन परमगती पावे ।।”
आणि आठवा अध्याय संपला,नववा अध्याय लिहायला घेतला.इथही भगवंतानं आपलं सर्वसमावेशक अस्तित्व अर्जुनाला दाखवलं.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख
दि. ७-५-२०२१.
!!! सोपानदेव !!!
भाग – ३०.
श्रीकृष्णाने जे अर्जुनाला सांगीतले तेच सोपानाने नागरी मराठीत लिहिलं .. मी जयाचा मातापिता।पितामह श्रेष्ठ कर्ता
मी पवित्र ओंकार असता ।
ऋग,यजु,साम,वेद मी । आणि भगवंताचे हे सर्वव्यापक अधिष्ठान बघुन सोपानाचे डोळे भरुन आले.भगवंतांनी भक्ताला दिलेला दिलासा म्हणजे सर्वसामान्य माणसाला सुनिश्चितपणे जगण्यासाठी दिलेलं पाठबळ होतंं.सोपान गहिवरुन लिहितात…
आणिक ठायी मन न घालिती ।
माझे चिंतने उपासना करीती ।
त्याचा योगक्षेम निश्चिती।मी चालविता होय ।।” यापेक्षा भगवद् भक्ताला आणखी काय पाहिजे? त्या सर्वसाक्षी दयाळु परमेश्वरानं दिलेलं अभिवचन भगवद् भक्ताला जगण्याचं साधन आहे. नऊ अध्याय होत आले आणि सोपानाला वाटलं,या अनुवादात आपली नाममुद्रा घालावी.हे सोपानाने लिहलं हे वाचणार्यास समजावं,ही भगवद् गीता सर्वसामान्यांना समजावी म्हणुन नागरी मराठी भाषेत अनुवाद केला हे कळेल. नवव्या अध्यायाच्या शेवटी लिहितात…
“ऐसे गृह्य जाण।अर्जुनाप्रती सांगे श्रीकृष्ण। सोपान म्हणे श्रोतिया लागुन। सादरे श्रवण करावे. ।।”
नववा अध्याय लिहुन झाला आणि सोपानांना निवृत्तीदादांची खुप आठवण येऊं लागली.लिहिलेले दाखवायला ते अतिउत्सुक होते.मुक्ताई व ज्ञानदादाची पण!निवृत्तीदादांचं मार्गदर्शन,ज्ञानदादाचं समजावणं,मुक्ताचं छेडणं ही राहुन राहुन आठवायला लागलं.त्या आठवणीतच ते निद्रेच्या अधिन झाले.
सोपान गाढ,शांत झोपलेल असतांना एक विलक्षण घटना घडली. सोपानांच्या समोर एक दिव्र स्री आली. तिची मुद्रा अत्यंत तेजस्वी होती.चेहर्या भोवती वलय,डोळ्यांत स्निग्ध भाव,चार बाहु,एका हातात वीणा,दुसर्या हातात लेखणी,तिसर्या हातात पांढर्या फुलांची माळ,आणि चौथा हात आशिर्वादासाठी उचललेला,चेहर्यावर प्रसन्न स्मित होतं. तिनं अत्यंत प्रेमानं हाक मारली.सोपानs ए सोपानsss उठ बाळ उठ! ए सोपानs तिच्या हाकेनं सोपान खडबडुन जागे होऊन उठुन बसले.हात जोडुन वंदन केलं.प्रणाम माते! ती स्री म्हणाली, “सोपान! तूं हाती घेतलेलं कार्य अतिशय अपूर्व आहे.परमार्थाच्या,अध्यात्माच्या मार्गावरुन जाणार्यांना तुझं हे लेखन म्हणजे सोपान ठरणार आहे.अध्यात्माची उंची गाठण्यासाठी चढायला सोपा सोपान! तुझं हे कार्य युगानुयुग लोकांच्या स्मरणांत राहिल.जोपर्यंत या पृथ्वीतला वर श्रीकृष्णाचं अस्तित्व अधिष्ठित असेल श्रीमद् भगवद् गीतेचं स्थान लोकांच्या मनात सुस्थापित असेल तोपर्यंत तुझं हे कार्य आबाधित राहील.तूं साक्षात शारदा, सरस्वतीचा पुत्र आहेस.माझा तुला आशिर्वाद आहे.कार्यसिध्दीभवः!”एवढं बोलुन ती स्री अंतर्धान पावली.सोपान भान हरपल्या स्थितीत तसेच बसुम होते. मनांत विचारांची आवर्तने थैमान घालत होती.लिहायला घेतल्यापासुन त्यांच्या मनाला रुखरुख वाटत होती की,आपलं हे लिखाण कितपत योग्य झालय?निवृत्तीदादा आल्याशिवाय,अभिप्राय समजणार नाही.कुणी दिशादर्शक, मार्ग दर्शक नसल्यामुळे सोपान मनातुन थोडे अस्वस्थ होते,पण आज प्रत्यक्ष शारदेनं, सरस्वती मातेनं स्वप्नात येऊन दिलेल्या दृष्टांताने ह्रदय भरुन आलं.प्रसन्नता मना वर पसरली.
भल्या पहाटे सोपानांना जाग आली.उठुन बसुन चेहर्यावर हात फिरवला व डोळे उघडले.आणि ते एकदम दचकलेच!बाजुला पांढर्या फुलांची माळ होती.म्हणजे रात्रीचं ते स्वप्न नव्हतं तर?प्रत्यक्ष सरस्वतीमाता इथं आपल्याला भेटायला आली होती.हे सत्य की,सत्याचा आभास?त्यांनी पांढर्या फुलांची माळ उचलली.छानशी मंद सुंगध होता,ताजी टवटवीत असलेली ती माळ स्वर्गीय भासत होती.म्हणजे नक्कीच शारदामातेच्या हातातील माळ आपल्याला कृपाप्रसाद म्हणुन दिली याची त्यांना खात्री पटली आणि हाती घेतलेले कार्य बहुजनांना उपयुक्त ठरेल हे लक्षात आल्यावर त्यांना अतिव समाधान वाटले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ८-५-२०२१.


