
आज कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस. सगळ वातावरण उदास खिन्न! सगळ्या चराचरावर,अवकाशावर एक खिन्न दुःखी विमनस्कतेची छाया पसरले ली,सार्या सृष्टीवर,सृष्टी चक्रातल्या पंच महाभूतवर सुध्दा एक अवकळा पसरली होती.आणि इंद्रायणीच्या घाटावर विमनस्क अवस्थेत बसलेल्या सोपानदेवां चा …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! संत सोपानदेव चरित्र !!!
भाग – ११.
चारही भावंडंनी एकमेकांच्या हाता वर हात ठेवल्यावर,ज्ञानेश्वर म्हणाले,आई बाबा!आम्ही चौघेही या गंगेच्या साक्षीने तुम्हाला वचन देतो की,धर्मशास्राचा न्याय्य अर्थ लावुन सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याची तुमची संकल्पना पूर्ण करु ज्या धर्मसभेने तुम्हाला देहान्त प्रायश्चित दिले,त्याच धर्मसभेत तुमचा ससन्मानानं उल्लेख होईल असं लौकिक कार्य करुन दाखवु.ज्या शुध्दीपत्रासाठी तुम्ही दोघांनी आत्मसमर्पन केलं तेच शुध्दीपत्र ही धर्म सभा स्वतः आम्हाला बहाल करतील. आम्ही एकोप्यान,एकदिलानं राहु आणि मुक्ताईचा काळजीपुर्वक सांभाळ करु. आमचं कार्य कर्तुत्वानं आपल्या कीर्तीचा ध्वजा शतकानुशतके फडकत राहिल असा आशिर्वाद सदैव असु देत.ज्ञानेशां च्या प्रत्येक वाक्याला सोपानांचा हुंदका आणि निवृत्तींच्या स्पर्शातुन संमती दर्शवत होती.आईबाबा शुभास्ते पंथानः।”
आईबाबांच्या पिंडाला काकस्पर्श झाला होता.या चौघांनी आईबाबांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी सगळी पंचमहाभूतं अवघ्या सामर्थ्यानिशी त्यांच्या पाठीशी उभी राहणार होती.जणूं ज्ञानेशाचे शब्द अजुनही अवकाशात प्रति ध्वनित होत होते.तसेच तिथे जमलेल्या लोकांच्या मनांतही!त्या शब्दांचं सामर्थ्य अस होतं की,या कुटुंबाची छीः थू करणार्यांच्या मनाचा थरकाप झाला.ही चार भावंडं म्हणजे चार दिव्य शक्ती आहे याची झलक या प्रसंगातुन लोकांना बघायला मिळाली,
निवृत्तीनाथ गुडघाभर पाण्यात उभे राहुन,ओंजळीत पाणी घेऊन अर्ध्य दिलं. आतां इथे कुणी ब्राम्हण न आल्यामुळे, पितरांना हविर्भाग कसा मिळेल?यावर सोपान म्हणाले.ब्राम्हण जेवणार ते आई बाबांचं प्रतिकात्मक रुप म्हणुनच ना?तर प्रत्यक्ष आईबाबाच येतील हविर्भाग घ्यायला.कावेरीआक्का!तुम्ही वाढुन ठेवा असं म्हणुन सोपान पाण्यात जाऊन उभे राहिले आणि हाका मारुं लागले,आई बाबाss या लवकर जेवायला.मघाशी तुम्ही शब्द दिला होता.या लवकरsss हा हविर्भाग घेऊन मगच मोक्षप्रद जाss! आईss बाबाss आतां त्यांच्या स्वरांत आर्तता येऊ लागली.बर्याच हाका मारुन झाल्यावर मात्र सोपान हुंदके द्यायला लागले.सगळीकडे स्तब्धता पसरली.काय नव्हते त्या स्तब्धतेत?व्याकुळता,खिन्नता दुःख,वेदना,विरह,व्यथा सारं कांही होतं. दुसर्याच क्षणाला इंद्रायणीचं पाणी खळवळलं.अंतर्मनांंत दडलेलं,जलगर्भात लपलेलं कांहीतरी बाहेर येऊन आपलं अस्तित्व दाखवु पाहतय असं वाटायला लागलं.लाटांचं उसळणं,खळबळ वाढली. जमलेल्या लोकांमधे धास्ती निर्माण झाली.हे पाणी प्रलंयकारी रुप घेते की काय अशी भिती वाटुं लागली.पण सोपान शांत होते.त्यांच्या डोळ्यांतुन पाणी वाहत होतं पण समाधानाचं!निवृत्ती-ज्ञानदेवांनी बघीतलं,सोपानाच्या पाठोपाठ तरल अवस्थेत चार पावलं जोडीने सोपानाच्या मागुन चालत वेदी पर्यंत आले.वेदीजवळ चार पाटं मांडले होते.दोन रिकामे व दोन पाटांवर दर्भ ठेवला होता.चारही पात्रावळीवर सारा श्राध्दपाक वाढलेला होता.दोन रिकाम्या पाटांजवळ सोपान हात जोडुन उभे राहिले.त्यांच्या बाजुस निवृत्ती,ज्ञानदेव, मुक्ताई पण हात जोडुन उभे होते.
हवेसारखी तरल एक हलकी चाहुल चौघांच्या समोरुन गेली.त्या दोन्ही पाटांवर क्षणभर पावलांचे ठसे उमटले, पण क्षणभरच!सोपानांना हुंदका फुटला. हमसुन हमसुन रडु लागले,ते पाहुन तिघेही रडुं लागले.स्वतःला आवरुन जरबेनं निवृत्ती म्हणाले,पुसा डोळे!आपण आईबाबांना शब्द दिलाय!त्यांच्या मोक्षप्राप्तीची वेळ झालीय!एकवार नमस्कार करा.सगळेच सावरले.डोळ्यांत अश्रू होते पण,चेहर्यावर समाधान!श्राध्द दशक्रीया विधी पार पडला.सगळे घरी आले.सोपान,मुक्ताईला खुप कांही विचारायचे आहे हे लक्षात आल्यावर, निवृत्ती म्हणाले,मुक्ते विचार काय विचारायच ते!दादा! पिंड उचलण्यासाठी कावळाच कां लागतो?इतर पक्षी कां नाही?ते म्हणाले,कावळ्याला एक अतिद्रिंय शक्ती लाभली आहे.मरणार्या माणसाची जर कांही इच्छा अपुर्ण राहिली,तर अतृप्त आत्मा पिंडीभोवती वावरत असतो.इच्छापुर्तीचं वचन मिळालं की,आत्मा बाजुला होतो.मग कावळा पिंडीला स्पर्श करतो,म्हणजेच तो जिवात्मा वासमामय देहापासुन मुक्त होतो.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ३-५-२०२१.
!!! सोपानदेव !!!
भाग – १२.
काळ कुणासाठी थांबत नसतो. आईबाबांच्या अपमृत्युच्या दुःखाची तिव्रता कमी झाली.चारही भावंडं आई बाबांच्या मृत्युमुळे झालेल्या वियोगाचं, पोरकेपणाचं दुःख बाजुला सारुन,पुनः उभं राहण्याची धडपड करुं लागले. निवृत्ती-ज्ञानदेव पहाटे घाटावर जाऊन अधिक गतीने ज्ञानसाधना करुं लागले. नंतर माधुकरी मागायला जात असे.इकडे मुक्ताई सडासमार्जन,रांगोळी,घाटावरुन पाणी भरणे,आणि सोपान ज्ञानसाधना करीत असे,विठ्ठलपंतांनी सोपानांना भगवद् गीता,संस्कृत,श्लोक,व्याकरण यांची ओळख करुन दिलेली होतीच.वेद उपनिषदांची ओळख निवृत्तींनी दिली. वेदांच्या अभ्यासाला सुरुवात झाली. नंतर सोपानही माधुकरीला जाई त्या वेळेत ते वेदाभ्यासाचं चिंतन,श्लोकांचं, ऋचांचं,रामायण,महाभारत,व्यासपुराणांचं पठण,मनन,अध्ययन,विश्लेषन असा मनांतल्या मनांत अभ्यास चालत असे.
“न हि ज्ञानेने सदृशं पवित्रमाहि विद्यते।
तत्स्वयं योगसंसिध्दः कालेनात्माने विंदती
या गीतेच्या वचनावर त्यांचा अतिशय विश्वास होता.तसेच महाभारता तील एकलव्य व्यक्तीरेखा विशेष आवडी ची होती.वास्तविक निवृत्तीनाथ गुरुस्थानी!पण सोपानांच शिक्षण मात्र एकलव्यासारखच एकनिष्ठेने चाललं होतं लहानपणी बडबडा,शंकेखोर,सतत प्रश्न विचारणारे सोपान आतां शांत संमजस, कांहीस अबोल,उद्भवलेल्या प्रश्नांची उत्तरे शक्यतोवर स्वतःच शोधत,व नाहीच कळलं तर निवृत्ती,ज्ञानदेवांना विचारुन स्वाध्यायी सोपान तयार होत होते. माधुकरी मागतांना कधी वाईट प्रसंग आलाच तर,शांत,संयमी स्वभावाने निभवुन नेत असत.
एके दिवशी मात्र सोपानांच्या या शांत स्वभावाची परीक्षा लागली.विठ्ठल पंत व रुख्मिणीबाईंनी प्रायश्चित घेऊन बरेच दिवस उलटल्यामुळे ब्रम्हवृंदांची वागणुक कांहीशी,सौम्य,मवाळ झाली असली तरी राग गेलेला नव्हता.पुरुष वर्गाचाही कडवा विरोध कमी झाल्यामुळे घरातील बायका या मुलांना व्यवस्थित माधुकरी वाढत होत्या.
अशाच एका प्रसंगी सोपानांचा संयमीपणा,समंजसपणा जसा उठुन दिसला, तसंच त्यांची ज्ञानसंपन्नताही उजळुन निघाली.झाले असे..श्रीधरपंत व पत्नी द्वारकामाईला मुलबाळ नसल्यामुळे या निरागस सोपानाची माधुकरीसाठी वाट बघायच्यात.त्यादिवशी सोपान माधुकरीसाठी आले असतां,घाईघाईने भात घातल्यावर लक्षांत आले की,भात आंबलेला,नासलेला आहे.सोपानांनाही जाणवले,पण चुप राहिले.द्वारकामाईच्या चेहर्यावरचे अपराधी भाव दिसल्यावर, सोपान म्हणाले,माई!वाईट वाटुन घेऊ नका.अन्न हे पूर्णब्रम्ह असुन इश्वरसमान आहे. पत्रं पुष्पं फलं,तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।तदहं भक्त्युपह्रम् श्रमि प्रयतात्मनः।। माई! प्रेमाने अर्पन केलेली कोणतीही वस्तू जर प्रत्यक्ष इश्वराला चालु शकते तर मनुष्याला कां नाही? या खराब झालेल्या भातापेक्षा तुमची माया, निष्काम प्रेम लाखमोलाचं आहे.वंदन करुन सोपान निघुन गेले.सोप्यात बसलेले श्रीधरपंत मात्र थक्क झाले.आठ वर्षाचा सोपान भगवद् गीतेतील उदाहरण देऊन माईंना समजवतांना बघुन!सोपान माधुकरी घेऊन घरी आल्यावर झाला प्रकार निवृत्ती-ज्ञानेशां ना सांगीतल्यावर,ज्ञानदेवांनी सोपानाला विचारले,हा आंबलेला भात खाण्याबद्दल तुझे काय मत आहे?दादा!माईंनाही खुप वाईट वाटले.त्यांनी मुद्दाम केलेले नाही, त्यामुळे आपण हा भात खावा.मुक्ताने हरकत घेतल्यावर,सोपान म्हणाले,मुक्ते! आपल्याला दगड पचवण्याची ताकद असली पाहिजे.शिवाय गरजवंताला चोखंदळ असू नये,त्याला निवडीचं स्वातंंत्र्य नसते.वाद संपत नाहीसे पाहुन निवृत्तीनाथांनी सुवर्णमध्य काढला.या भाताचा एक एक घास खाऊ,त्यामुळे माईच्या न्यायालाही न्याय दिल्यासारखे होईल व पोटही बिघडणार नाही.नंतर त्यांची हसत खेळत जेवणं झाली.
मुक्तेss ए मुक्तेss अशा कावेरी आक्काचा आवाज आला विशेष म्हणजे सोबत द्वारकामाईंना बघुन आश्चर्याने सोपान म्हणाले,माईss तुम्ही?ती निरागस,देखणी भावंड बघुन धर्मसभेनं यांना कसं पोरकं करुं शकले?भगवद् गीतेतली धर्माची ग्लानी ती हीच असेल का?
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ३-५-२०२१.
!!! सोपानदेव !!!
भाग – १३.
कावेरीआक्का व द्वारकामाईच्या हातास धरुन मुक्ताईने त्यांना घरात आणले.माई म्हणाल्या सोपाना! सकाळी चुकुन आंबलेला भात घातल्या गेला. बाळानो!क्षमा करा.आतां मी ताजा भात करुन आणला.तो तुम्ही खाल्ला तर माझ्या मनाची बोच कमी होईल आणि भाताची तपेली समोर केली.सर्वांचीच स्थिती अवघडल्यासारखी झाली.सोपान तर गांगरुन गेले.कारण दुपारी एकवेळ जेवण झाले की,रात्री फक्त कोरडा फराळ खात असे.पांचच घरी भिक्षा मागुन जेवढं मिळेल तेवढ्यावरच भागवायचं असं या भावंडांनी ठरवलं असल्यामुळे,आणलेला भात कसा खायचा?हा भात खाल्ला तर सहाव्या घरची भिक्षा खाल्ल्यासारखं होईल.माईं ना अतिशय वाटल्याने त्यांना आलेला हुंदका आवरतां आला नाही.कावेरी आक्कांंना राहवलं नाही.गहिवरल्या आवाजात म्हणाल्या,ज्ञानेशा!माणसा पेक्षा तत्व मोठी असतात कां रे?मातृत्वा
पेक्षा संकल्प आणि नियम मोठे असतात कां रे?ही तत्वे जेव्हा माणसांपेक्षा मोठी होतात तेव्हा…
नाही आक्का! जगात मातृत्वाला कोणतंच आव्हान,कोणतेच यमनियम लागु नाहीत,कारण माणसांपेक्षा तत्व मोठी झाली,मातृत्वापेक्षा नियम मोठे झाले की,काय घडते,त्याचा परिणाम आम्ही भोगतो आहोत.मुक्ते!मांड पर्णावली!माई स्वहस्ते आपल्याला वाढणार आहे.निवृत्ती निग्रहाने म्हणाले. चौघेही भावंडे उनउन भातावर तुप टाकुन खात असलेले पाहुन आक्का व माईंना परमानंद झाला.
या प्रसंगाने सोपान आतांपर्यंत अजान,लहान आहे असं निवृत्ती ज्ञानदेव समजत होते ती दृष्टीच बदलली.कांहीस अबोल असलेले सोपानाची ज्ञानधारणा, समजावुन सांगण्याची हातोटी,संयम, समंजसपणा,प्रगल्भता,हुशारी,बुध्दी वैभवता पाहुन थक्क झाले.त्यांची आत्मिक उंची,आध्यात्मिक खोली, मनस्वी रुंदीचा प्रत्यय आला.झोपडीच्या बाजुस असलेल्या उंबराच्या झाडखाली आज तिघही भावंड एकमेकांच्या कुशीत विसावले होते.मुक्ताला जाग आल्यावर तिला काय दिसले? साक्षात ब्रम्हा विष्णु महेश च्या रुपात तिन्ही भाऊ दिसले.ती एकदम उठुन निवृत्तींच्या मांडीवर कोसळुन रडुं लागली.म्हणाली,तुम्ही कोणीच न दिसल्यामुळे मला वाटले,तुम्ही पण आईबाबांसारखे मला सोडुन गेलांत की,काय?सोपान तीचे अश्रू पुसत समजावत म्हणाले,तुला सांगीतल्या शिवाय आम्ही कुणीही कुठेच जाणार नाही.ज्ञानदेव म्हणाले,आईबाबा आपल्या ला न सांगता गेलेत,कारण त्यांना प्रायश्चित घ्यायचे होते.पण मुक्ते!आपण जेव्हा देवाकडे जाऊं तेव्हा,ताठ मानेनं, अभिमानानं मिरवत जाऊ.आपण जाऊं तेव्हा अभिजनच नव्हे तर अवघी चराचर सृष्टी अश्रू गाळेल.
दुपारची जेवणं झाल्यावर,तिघेही भाऊ अंगणातल्या शेवग्याच्या झाडा खाली बसले.निवृत्तींनी सोपानाला जवळ घेत म्हणाले,सोपाना!तूं गुरुपोदेश घेण्या इतका जाणता झालास,तेव्हा तुझ्या योग्यतेचा कोणी गुरु असल्यास सांग!झटकण सोपान उठुन निवृत्तींचे पाय धरत म्हणाले,दादा! मला असं दूर नको रे लोटुस!ज्ञानदादाला जसा गुरुगंडा बाधला तसाच मलाही बांध!आतांपर्यंत पिता होऊन सांभाळलेस,आतां गुरु होऊन मार्गदर्शन कर!सोपाना तुझ्यासारखा शिष्य मिळाला तर मला आनंदच वाटेल पण मी नाथपंथी!हा पंथ इतर पंथापेक्षा थोडा अवघड आहे.तत्वांचं काटेकोरपणे पालन करावं लागतं.
सोपान म्हणाले,दादा!तूं जेव्हा दीक्षा घेतली त्यावेळी तू पण लहानच होता की, तुझ्यासारखा निष्ठावान एकलव्यासारखा शिष्य लाभणे माझे अहोभाग्यच!उद्या सकाळी ब्रम्हमुहुर्तावर शिष्य करुन घेतो. असे म्हणुन सोपानाच्या मस्तकावर निवृत्तींनी हात ठेवला.आतांपर्यत चुप असलेली मुक्ता म्हणाली,निवृत्तीदादा! ही दोघं तुझे डोळे आहेत तर मी कोण? तूं आमच्या तिघांचे नाक आहेस.
उद्या रात्री निवृत्तीदादा आपल्याला शिष्य करुन घेणार या आनंदात निजलेल्या सोपानांना मध्यरात्री जाग आली.देवासमोरच्या शांत तेवत असलेल्या अंधुक प्रकाशांत झोपडीतील गुढ वातावरण निर्माण झालं होतं.
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. ३-५-२०२१.
!!! सोपानदेव !!!
भाग – १४.
मध्यरात्री झोपडी बाहेर येऊन सोपानाने आंघोळ केली.ओलेत्याने पद्मासन घालुन तुळशी वृंदावनाजवळ बसले.श्रीकृष्णाचे स्मरण करुन ओंकार साधनेला सुरुवात केली.ध्वनीलहरींच्या स्पंदनातुन निघालेल्या आवर्तनामुळे अवघ्या सृष्टीला जाग आली.तसेच निवृत्तीही जागे झाले.अवघ्या सृष्टीला वेढणारी ही स्पंदने कुठुन येताहेत?निवृत्ती लक्षपुर्वक ऐकु लागल्यावर, ओंकाराचा ध्वनी गगनवेधी,त्याची दीर्घता क्षितिजापर्यंत होती.षड्जापासुन,तो ओंकार १२ ही स्वरांनंतर मध्य सप्तकात ल्या षड्जापर्यंत पोहचत होता.परत मध्य सप्तकातल्या बारा स्वरांना घेऊन तार सप्तकापर्यंत निनादत होता.पुन्हा तो ओंकार मंद्र षड्जापर्यंत येत होता.
अशाप्रकारे मंद्रषड्ज ते तारषड्ज आणि तारषड्ज ते पुन्हा मंद्रषड्ज अशा आवर्तनात फिरत ७२ ओंकाराची स्वर साधना होत होती.तो ओंकार स्वरसाधने चा शुध्द स्वर सोपानांचा आहे हे निवृत्ती ज्ञानदेवांच्या लक्षात आले.दोघेही अंतर्बाह्य थरारले.नऊ-दहा वर्षाच्या सोपानांची इतकी शुध्द ओंकार साधना? इतकी त्यांची स्पंदनं तीव्र होती की,सर्व पृथ्वी,सृष्टी कंपायमान व्हावी,विश्वास ठेवणे कठीण जात होते.दोघेही झोपडी बाहेर आले सोबत मुक्ताही होती.तुळशी वृंदावनाजवळ पद्मासनात सोपान बसलेले होते,पण समोर सोपान नसुन कुणीतरी वेगळ्याच रुपात अत्यंत तेजस्वी,प्रभावशाली,ऋषितुल्य असं! निवृत्तींच्या तात्काळ लक्षात आले,हे तर “जगत्पिता ब्रम्हदेव”!ब्रम्हदेव इथे आहेत मग सोपान?निवृत्ती-ज्ञानदेव आश्चर्यांने एकमेकांना बघीतले.मुक्ताने घाबरुन निवृत्तींचा हात धरला.तिघांनीही एकदम विश्वकत्यांला हात जोडुन नतमस्तक, डोळे मिटुन तिघंही क्षणभर अविचल स्तब्ध उभे राहिले.ब्रम्हदेवांच्या दर्शनाने त्यांच भान हरपलं होतं.तोच सोपानाचा आवाज कानावर आला,अरे!तुम्ही काय करताय?मला कशाला वंदन करताय? निवृत्तीदादा!वडीलांच्या ठायी असलेले मोठा भाऊ गुरु म्हणुन लाभले.मातृदेवो भव!पितृदेवो भव,आचार्य देवो भव ही तिन्ही श्रध्दास्थानं मला एकाच ठीकाणी गवसली.दादा! मी कृतार्थ झालो.सोपाना चे बोलणे ऐकुन तिघेही भानावर आले. अरे!हा तर आपला सोपान!मग ब्रम्हदेव कुठे गेले?की,सोपान हाच ब्रम्हदेव आहे? नक्कीच आहे.
त्रिपुरारी पोर्णिमेला जन्मलेला सोपान साक्षात ब्रम्हदेवाचं रुपच आणि आतां तर ब्रम्हदेवांनी साक्षात आपलं रुप दाखवुन प्रचितीच दिली.आणी अभावित पणे भाऊ,पुत्र,शिष्य या भावना व सोपानांत दिसलेल्या ब्रम्हरुपाने शतगुणित झाल्या.ज्ञानदेवासारखा शिष्य मिळाला म्हणुन धन्यता वाटत होती.पण सोपानासारखा शिष्य लाभल्याने आपण कृतार्थ होणार या भावनेने अगदी नकळत त्यांनी सोपानांभोवती घट्ट मिठी मारली.
सोपानाचं ब्रम्हरुप बघीतल्यानंतर तिघांच्याही मनांत एक आदराची भावना निर्माण झाल्याने त्यांच्या वागण्या बोलण्यात झालेला फरक सोपानांना सहन होईना.बदललेल्या वागण्याचा उलगडा होईना.त्यांची आंतल्या आंत घुसमट होऊं लागली.त्यादिवशी गंडा बांधायचा राहुन गेला होता.त्यांची कोंडी होऊ लागली.आणि अचानक कोंडी फुटली.
एरवी हसत खेळत होणारी दुपारचे जेवणं आज शांतपणे चालु होते. एवढ्यात बाहेरुन भोजलिंगाचा आवाज आला.चौघेही धावत बाहेर आलीत. अंगणात भोजलिंगकाका उभे होते. कितीतरी दिवसांनी काका भेटत होते. गावानं विठ्ठलपंत-रुख्मिणिला बहिष्कृत केल्यावर,सिध्देश्वर बेटावर राहायला गेले तिथं हे भोजलिंगकाका होते.त्यांनी यत्किंचितही कुणाची पर्वा,भिती न बाळगतां या कुटुंबाचे सहोदर बनले होते. सर्वतोपरी ते मदत करीत असत.विठ्ठल पंताच्या कुटुंबाशी स्नेह ठेवल्यावरुन कुणी छेडलेच तर,म्हणायचे,मी हाडाचा सुतार आहे.काळजाच्या करवतीने लाकडं कापणे माझं काम!मग त्या करवतीखाली कधी सागवान,बाभुळ येते पण ही तर चंदनाची झाडं!कितीतरी विषारी नागांनी विळखा घालुन बसलेले. या चंदनाच्या झाडांनी सुगंध द्यायचा धर्म सोडला नाही.यांच रक्षण करायचं माझं काम!जोवर माझी करवत चालु असेल तोवर या झाडांना कुणीही धक्का लावु शकणार नाही.त्यांचे असे बोलणे ऐकले की,समोरचा निरुत्तर होऊन निघून जात आणि काका पुन्हा या पोरांमधे रमत असे
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ३-५-२०२१.
!!! सोपानदेव !!!
भाग – १५.
कधी कधी विठ्ठलपंतांच्या घरी चुल पेटली नाही की,काका कोरडा शिधा आणुन द्यायचे व मुलांना घरी घेऊन जायचे.तेव्हा काका-काकुंना मुलंबाळं नसल्यामुळे सारी माया,वात्सल्य या पोरां वर उधळली जायची.ज्यावेळी विठ्ठलपंत रुख्मिणीने देह गंगार्पण केले ते दुःख सहन न होऊन भोजलिंगकाकाही देवाच्या शोधार्थ तिर्थयात्रेला निघुन गेले होते.आईबाबांसारखा हा दुसराही आधार गेला.यातुनही ही चार निरागस बालकं सावरली व आज अचानक भोजलिंग काका समोर उभे राहिले.चौघही भावंडं अभावितपणे त्यांना बिलगली,आणि चौघांचेही हुंदक्यांची आवर्तनावर आवर्तनं झाली.प्रथम सावरले ते काकाच त्यांनी सगळ्यांच्या चेहर्यावर,पाठीवर हात फिरवुन निवृत्तींचा हात हाती घेत म्हणाले,निवृत्ती लेकरा!मला माफ कर!काय करुं? तुमचे आईबाबा गेल नी मला सगळं जग जणूं खायला उठलं.मग भानच राहिलं नाही.सर्वांचा राग राग आला.तुमचे वडील एवढे विद्वान,पण धर्मसभेविरुध्द तोंड उघडले नाही याचा, हे सगळं चुकीचं घडतय हे ठावुक असुन, कांही करुं शकत नाही म्हणुन स्वतःचा.. आणि त्या तिरिमिरीतच बाहेर पडलो. भटकत भटकत प्रयागला गेलो.राग ओसरल्यावर तुमची आठवण आली नी खाडकण भानावर आलो.तडक निघुन इथे पोहचलो.बाळांनो जेव्हा तुम्हाला माझी गरज होती,तेव्हा नव्हतो.माफ करा माफ करा..
काय बोलावे कुणालाच समजत नव्हते.यातुन सावध झाले ते सोपानच! म्हणाले,काका! वाईट वाटुन नका घेऊ. आईबाबा गेले तेव्हा तुम्ही हवे होते हे खरय!पण एकप्रकारे बरच झालं.आम्ही आपापलं जगायला शिकलो.तुमचा आधार असतां तर आतांही तुमच्याच आधारावर अवलंबुन राहिलो असतो. नियतीला ते मान्य नव्हते.म्हणुनच तुम्हाला आमच्यापासुन दूर जायची बुध्दी झाली आणि आम्हाला स्वधाराची!
चला मुलांनो!मी दशम्या,चटणी व करडुची भाजी आणली.दोन दोन घास खाऊन घेऊ.मघाशी अर्धवट जेवनावरुन उठल्यामुळे आणखीनच भूक लागली होती.कितीतरी दिवसांनी त्यांना असा मायेचा घास मिळाला होता..निर्मळ, पारदर्शी,मधूर अविरत वाहणार्या वात्सल्याने पुन्हा काकांनी सर्वांना कवेत घेऊन पाठीवरुन हात फिरवला.आजारी काकुंसाठी जाणे भाग असल्यामुळे जड पावलांनी निघुन गेले.सोपानांंना वाटले आज पुन्हा एकदा पोरके झालो.
या सर्व भानगडीत गुरुगंडा बांधायचं पुन्हा लांबणीवर पडलं याची बोच,रुखरुख सोपानाच्या मनाला लागुन राहिली.ज्ञानेशांच्या लक्षात त्यांची ही तगमग आल्यावर,तसे निवृत्तींना सांगीतले.निवृत्ती म्हणाले,ज्ञानोबा मी जाणतो.ही एक प्रकारे त्याची परीक्षा आहे.मला गुरु करण्याची,गुरुगंडा बांधण्याची सोपानला किती आस्थाआहे हे तपासायचं आहे.ज्ञानदेव कांही बोलले नाही,बोलण्यांत कांही अर्थही नव्हता. सोपानाची तगमग,घुसमट आणि दादाची परीक्षा घेणं ही कोंडी कधी व कशी सुटेल
आणि अचानक एके दिवशी ही कोंडी फुटली.
त्यादिवशी नेहमीप्रमाणे घाटावर जाण्यासाठी निवृत्ती,ज्ञानेशा भल्या पहाटे घाटावर जाण्यासाठी निघाले असतां, सोपानाचे अंथरुण रिकामे दिसले,दादा! सोपान? निवृत्तींनी हातानेच थांबवले व दोघेही बाहेर पडले.दोघेही घाटाजवळ आले आणि त्या स्तब्ध वातावरणांत, निरव शांततेला छेदत,भेदत आवाज ऐकु येऊं लागला.त्या धीरगंभीर आवाजात एक कोवळी माधुरी होती,विलक्षण स्पंदनं होती.आसमंत उजळुन टाकणार्या विद्युल्लते सारखा गगनभेदी नाद होता.दोघेही त्या आवाजाच्या रोखाने जाऊ लागले.त्यांचा लाडका धाकटा भाऊ,काळजाचा तुकडा सोपान गुडघाभर पाण्यांत पद्मासन घालुन बसला होता.डोळ्यातुन घळघळा अश्रू वाहत होते.निवृत्तीदादा गुरुगंडा कां बांधत नाही,त्याचा शिष्य होण्याची माझी योग्यता नाही का?माझी घुसमट दिसत नाही का?असे प्रश्न मुखातुन बाहेर पडत होते. पुढे होऊन निवृत्तींनी सोपानांचे डोळे पुसले.त्या स्पर्शाने डोळे उघडल्या वर समोर निवृत्तीदादांना बघुन त्यांचा बांध फुटला.लहान मुलासारखे बिलगुन त्यांच्या कुशीत शिरुन हमसु हमसु रडु लागले.
क्रममः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. ४-५-२०२१.


