द्रोण पत्नी गौतमी संपुर्ण भाग ३, (११ ते १५)

कृपी मैत्रीणींसोबत खेळत खेळत थकुन बसली असतां ती भूतकाळात हरवली.ज्या समवयस्क मुलींबरोबर खेळत होती त्या सर्वांना आई,बाप,भाऊ बहिण, इतरही नातलग होते,पण कृपीला कोण होते एका भावाखेरीज? दोघेही अनाथच! शंतनूमहाराजांच्या कृपाशिर्वा ............

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

कृपी मैत्रीणींसोबत खेळत खेळत थकुन बसली असतां ती भूतकाळात हरवली.ज्या समवयस्क मुलींबरोबर खेळत होती त्या सर्वांना आई,बाप,भाऊ बहिण, इतरही नातलग होते,पण कृपीला कोण होते एका भावाखेरीज? दोघेही अनाथच! शंतनूमहाराजांच्या कृपाशिर्वा …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

              

!!! द्रोण पत्नी गौतमी!!!

!!!  गौतमी  !!!

                    भाग – ११.

        गौतमी शुध्दीवर आली तेव्हा द्रोण  अध्यापणाला न जातां शेजारी बसलेले व कुशीत नवजात अर्भक!त्यांच्या ऊबदार स्पर्शाने ती मोहरली,सुख संवेदनेची लहर सर्वागातुन गेली.मोरपीस फिरवल्याचा भास झाला.पण ही सुखद संवेदना क्षणिकच ठरली.तिचे सर्वांग ताठरले,मुद्रा कठोर बनली.देवाला एवढे विनवुनही पुनर्जन्म देऊन क्रूर चेष्टा केली होती.जे नको तेच तिला दिले होते.गौतमी!द्रोणां ची हाक कानी पडली.ते म्हणाले,आपला पुत्र जन्मतःच क्षणी घोड्यासारखा खिंकळला नि मग रडला,त्यावरुनच तो असामान्य असल्याची खात्री पटली. पित्याची अंतिम इच्छा पूर्णझाली. भारद्वाज कुळाला कुलदीपक मिळाला. हा कुलाची किर्ति दिंगतरास नक्की नेईल. आज भोजनाच्या प्रबंधाची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने ते कुटीबाहेर पडले.

        आणि प्रथमच गौतमीने कुशीतल्या नवजात अर्भकाकडे पाहिले मात्र, नी तिचे सर्व वात्सल्य उफाळुन आले.न कळत त्याला जवळ ओढले,थोपवुन धरलेल्या अश्रूंना मोकळी वाट करुन दिली.तिच्या स्पर्शाने त्यालाही तिच्या व्यथा कळल्या की काय, तोही ओक्सी बोक्सी रडुं लागला.त्याला छातीशी कव टाळत म्हणाली,अरे वेड्या!जिथं एकवेळ जेवण्याची भ्रांत!अशा घरी कोणते आकर्षण वाटले यायला?रिती आहे रे! दुबळी,असहाय्य,असमर्थ,अगतिक आहे रे!तुझ्या या मातेजवळ अश्रुशिवाय द्यायला कांहीच नाही रे!गौतमी रडत,  आक्रोश करीत त्या अजान निष्पाप जिवाशी बोलतच होती! अरे! कांही लोकं दुर्देवच घेऊन जन्माला येतात की काय?मातापित्यांनी जन्मतःच अव्हेरुन अनाथ केले.शांतनू महाराजांच्या कृपेने कोरभर अन्न मिळाले,पण सोबत अवहेलना, उपहास, तिरस्कार वाट्याला आले.कालां तराने पित्याने उत्तरदायित्व स्विकारुन अन्न वस्र निवारा शिवाय प्रेम,ममता मात्र त्यांना देता आली नाही.नाही म्हणायला बंधु कृपाने सर्व नाते निभावुन पालण पोषण केले,पण शेवटी तोही पुरुषच!एका पराक्रमी पण निर्धन व्यक्तिशी जिवनगाठ बांधुन स्वतःकर्तव्यमुक्त होऊन मला या दारिद्र्याच्या वणव्यात होरपळायला सोडुन दिले.

       अरे वेड्या! या वनव्यात माझं यौवन अकालीच होरपळलय!भावभावना,आशा आकांशा,इच्छांची राखरांगोळी झाली रेss! शरीराचं तेज,उमेद,जगण्याचा उत्साह पार मावळुन गेला नी उरलय फक्त कलेवर!या शरीरांतील हाडं नी कातडींची हालचाल होते म्हणुनच जिवंत समजायचय!समाजाच्या दुष्टचक्रात सांपडुन दिवसांतुन असंख्यवेळा रोजच मरत असतांना त्यांत भर घातली आहेस.   दारिद्र्य,उपास,उपहास,अवहेलना, निर्भत्सना शिवाय तुला द्यायला कांहीच नसल्यामुळेच तूं नको होतास रे!एकटी असती तर या सार्‍यातुन मरण पत्करुन मुक्त झाले असते पण आता..तुझ्यामुळे तेही दुर्लभ झालेय! भावनावश होऊन आजपर्यत दबुन असलेला आक्रोश बाहेर पडत होता.

      याउलट द्रोणांचा ऊत्साह मात्र वाढत होता.बाळ जन्मताच अश्वासारखा ओरड ल्यामुळे अश्वत्थामा नांव ठेवण्याचे निश्चीत केल्याचे त्यांनी गौतमीला सांगीतले.गौतमी मात्र स्वतःच्या आणि पुत्राच्या भविष्याच्या चिंतेने ग्रस्त होती. सबंध रात्र रडत असल्याने व रात्रीच्या जागराने डोळे चुरचुरत होते, पतीच्या विश्रांतीत अडथळा नको म्हणुन हुंदका बाहेर पडणार नाही याची दक्षता बाळगत होती.

           क्रमशः
   संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!!  गौतमी  !!!

                  भाग – १२.

        द्रोण आणि गौतमीची उपजिविका कंदमुळं,फळं,नाहीच कांहीच मिळाले तर नुसत्या गंगाजलावर क्षुधा शांत होत होती पण लहानग्या अश्वत्थामाचे तसे नव्हते. त्याला दुधाची आवश्यकता होती.त्याच्या पोटात डोम उसळला की, कळवळुन टाहो फोडुन रडायचा,आक्रंदायचा.मग गौतमीने त्याला छातीशी कवटाळले की, अमृतकुंभ रिते असल्यामुळे तो उपाशीच राहत.परिस्थीतीने तिचे सौष्ठव,तेज तर केव्हाच हिरवले होते.नुसते हाडं व कातडीशिवाय शरीरावर कांहीच नव्हते. शिवाय सततच्या उपासमारीने अमृतघटा त दुध येणारच कसे?दुर्देवी गौतमी असाहय्य,अगतिक झाली.तिच्या मातृत्वा ची थट्टाच नव्हती का?भुकेने व्याकुळ अश्वत्थामा मोठ्या आशेने इवलाश्या ओठात स्तनाग्रे चोखत,व कांहीच मिळाले  नाही की,जोराने लुसले की,असह्य वेदना थेट तिच्या मस्तकात जाऊन भिडे.किती  दुर्विलास हा मातृत्वाचा? भुक लागलेला अश्वत्थामाला तिच्या घटांतुन कांहीच न मिळाल्याने रडुन आक्रोश करत शिणल्या वर क्रांत होऊन रात्री निपचित पडला की,गौतमीतलं मातृत्व विव्हल व्हायच, त्याला कुशीत घेऊन अश्रूंना वाट मोकळी  करत, मनात म्हणायची,अरे! परिस्थीतीने या कुशीची गेलेली उब,रिते अमृतघट, तु  असाच लुसत राहिलास तर,या शरीरात असले नसलेलं रक्तच तुझ्या ओठी लागेल,पण दुध नाही सांपडायच!तुझे जिवन जर तगत असेल तर हे जिवन संपले तरी हरकत नाही.ही तुझी अभागी दुर्भागी, माता मर्यादांनी जखडलेली कांही च करुं शकत नाही रे बाळा!अशाच विचारांच्या आवर्तनात रात्रीच्या रात्री सरत होत्या.

       पत्नि व पुत्राची उपासमारीने होणारी तडफड द्रोणांना सहन न होऊन, महेंद्र पर्वतावर परमुराम दानधर्म करीत असल्याचे ऐकुन त्यांच्यातील पती व पिता जागा झाला.अमृतवृत्तीला धक्का न लागता,अन्नाची समस्या सोडवण्यासाठी महेंद्रपर्वतावर जाण्याचा निर्णय  द्रोणांनी घेतला.अध्ययन बंद होत असल्यामुळे गौतमीला साथ म्हणुन २-३ कुमार अट्टा हासाने आश्रमांत राहिलेत.बाकी आश्रम रिता झाला.गौतमीला काळजी घ्यायला सांगुन द्रोण महेद्र पर्वताकडे निघुन गेलेत. काळजी? कशाची? फक्त काळजी घे म्हटल्याने समस्या सुटतात?अन्न मिळत? गरजा भागवतां येतात?

       अशाच विचारांच्या भोवर्‍यात सांपडली असतांना,अश्वत्थामाच्या नामकरणाला आलेल्या कृपाची तिला आठवण झाली.प्रथम तर त्याने तिला ओळखलेच नाही.तिची अवस्था पाहुन त्याला धक्काच बसला.त्याला काय माहित की, सततच्या उपासमारीने अशी दशा झाली.त्यामुळे त्याने तिला उपदेशा चे डोज पाजायला सुरुवात केली. कृपी! भारद्वाज गौतम कुलांची श्रेष्ठता तुझ्या पाठीशी आहे,तूं उणी न पडतां,संकटाचा सामना करत, मन खचु देऊ नकोस,हे जीवन उनपावसाचा खेळ आहे.कृपी! द्रोणाचार्य एक शिल्पकार असुन अनेकां चे जीवनचरित्र्य,तसेच अश्वत्थामाला घडविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळे तुझे सहकार्य व खंबीर साथीशिवाय अशक्य आहे,म्हणुन तरी ताठ उभी राहण्यासाठी प्रकृतिची काळजी घेणे अति आवश्यक आहे.तो समजावत होता,आणि ती मनांतल्या मनांत हसत होती.तोही पुरषच ना?लौकिकाला,प्रतिष्ठेला हपापलेला! जिच्या कडुन सहकार्याची अपेक्षा करतां,पण तिचा काय विचार करता?काय देता तिला? ती केवळ भोगाचं साधन,पुरुषांनी घालुन दिलेल्या मर्यादाचे बंधना शिवाय अधिक मोलाचं नाही का? त्याला सत्य सांगुन स्वकुलाच्या प्रतीष्ठेला,अब्रुला चुड नव्हती लावु शकत.तोंंड दाबुन बुक्क्याचा मार सहन करणे भाग होते.

              क्रमशः
  संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!!  गौतमी  !!!

                  भाग – १३.

          अश्वत्थामाच्या मस्तकावरील जन्मजात तेजस्वी मणीची अपुर्व लाभलेली देणगी पाहुन कृपा खुपच आनंदीत झाला. तो गौतमीला म्हणालाही याच्यामुळे भारद्वाजकुलाला प्रतिष्ठा लाभेल.ती मनात म्हणाली! अरे कृपा! तू तर फार पुढचं भविष्य वर्तवतोस,त्याला बळ येण्यासाठी आज त्याला पोटभर अन्न नको द्यायला? गौतमीची सत्यस्थिती न कळताच कृपा हस्तिनापुरला निघुन गेले.पर्णकुटीसमोर आपल्या सोनपावलां नी दूडुदुडु धावणार्‍या मृगाशी खेळणा र्‍या अश्वत्थामाकडे पाहत असतां हे सर्व तिच्या मनःचक्षुसमोर चलचित्राप्रमाणे साकार झाले.द्रोणांना जाऊन प्रदीर्घ कालावधी लोटला होता.आश्रमाची झालेली दुर्दशा पाहुन तिला वाईट वाटत होते.

        घरचा मुख्य कर्ता पुरुष परिवाराची, मुलांबाळांची व्यवस्था, काळजी न करतां महिने नी महिने निष्काळजीपणे घरापासुन दूर राहु शकतो,क्षणांत सर्वस्वा चा त्याग करुं शकतो, पण मर्यादेने बांधलेली हिंदु स्री मात्र उबरठाही ओलांडु शकत नाही.कुटुंबाची जबाबदारी मात्र तिने पार पाडावी, जर कां तिने उंबरठा ओलांडलाच तर तिचं पावित्र्य धोक्यात येते,चरित्र कलंकित होते.द्रोणांनी जणुं सर्वसंगपरित्याग केल्यासारखे निघुन गेलेत,त्यांचा कांहीही ठावठीकाणा नव्हता.हिंदु पतिव्रता स्री म्हणुन पतीची चिंता,पुत्र म्हणुन पुत्र अश्वत्थामाची काळजी,शिवाय त्यांच्या अनुपस्थीत अमृतवृत्ती जपणे,हे सर्व करतांना गौतमी ची तारेवरची कसरत होत होती.पतीने कसेही वागले तरी त्याला स्वर्ग! आणि स्रीने जराही चाकोरीबाहेर गेली की, तिला मात्र नरकच! तिच्या सुदैवाने निष्पाप निरागस आश्रमकुमारांची साथ लाभल्या ने तिचे जगणे थोडंतरी सुसह्य झाले होते.

        महेंद्रर्वतावर आचार्य परशुरामाकडे जसे द्रोण अचानक गेले तसे अचानकच आश्रमात क्षीण प्रकृती,पण डोळ्यांत व चेहर्‍यावर तेज घेऊन परतले.स्रीसुलभ भावनेने एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतर परतल्यावर पतीमिलनासाठी आतुर होऊन त्यांच्या मिठीत समावेसे वाटले यांत कांही गैर,पाप नव्हते,पण तिच्या बाबतीत हे कांहीच घडले नाही.गौतमीने त्यांच्या प्रकृतीबद्दल चौकशी केल्यावर, द्रोण म्हणाले,पराक्रमी पुरुषाची हयातभर साथ करण्यासाठी स्रीनेही आपली प्रकृती सांभाळायला हवय ना?पण तुझ्याकडे पाहुन तसे दिसत नाही.ती मनात म्हणाली नाही तरी पुरुष हा कठोर मनाचाच!कर्तव्याच्या अधिन होऊन नाजुक भावना मारणे त्यांना जमते.पण स्री हळवे मन घेऊनच,पती व संतती यांच्यातच सुख शोधणारी सतत नाजुक भावनांना कुरवळणारी,तिच्यावर पतीविरहाचा परि णाम झाल्याशिवाय कसा बरं राहिल?

द्रोणांनी अश्वत्थामाची चौकशी केल्यावर निदान निदान पुत्राची आठवण तरी झाली महेंद्रपर्वताकडे जातांना या माणसाने पत्नी पुत्राची कांहीही व्यवस्था न करतां, दोघेही काय खात असेल?कसे राहत असु? कुणाची सोबत? याबाबतीत अस्पष्टसा विचारही यांच्या मनाला शिवलेलाही नव्हता.आणि म्हणुनच प्रदीर्घ कालावधीनंतर परतल्यावर पुत्रा  ची आठवण काढल्याने तिला बरे वाटले.

गौतमी उत्तरली!एखाद्या आश्रमकुमारा बरोबर गंगातीरी नेले असावे. २-३ आश्रमकुमार हट्टाने राहिल्यानेच तगले. नाहीतर माझे व अश्वत्थामाचे काय झाले असते याची कल्यनाही करवत नाही. द्रोणांचा किती बेजबाबदारपणा? जर सर्वच आश्रमकुमार निघुन गेले असते तर या भयान,विरान आश्रमांत छोट्या मुलाला घेऊन आपली पत्नी कशी राहिल एखादे संकट आले तर,कसा सामना करेल हा साधा विचार या पराक्रमी पुरुषा ने केला नाही.काय म्हणावे  या दुर्देवाला?

                क्रमशः
  संकलन-मिनाक्षी देशमुख.

!!!  गौतमी  !!!

                   भाग – १४.

          एवढात इवले इवले पावले टाकीत आलेल्या अश्वत्थामा द्रोणांनी आपल्या कुशीत घेतले.त्यांना अश्रु दिसु नये म्हणुन दुःख लपविण्याचा प्रयत्न करीत गौतमी कुटीबाहेर निघुन गेली.तेवढेच तर तिच्या हाती होते.द्रोण परत आल्याचे  कळल्यावर पुनः आश्रमात गर्दी झाली.त्यांनी परत नव्याने डाव मांडला.नित्याप्रमाणेच कंदमुळं गोळा करण्याचे काम तिच्याकडे आले. तिला आठवले,जेव्हा द्रोण द्रव्य आणायला परशुरामाकडे गेलेत,तेव्हा गौतमीने खुप मनोराज्य रचले होते.सगळं दुःख दारिद्र्य दूर होऊन सुखाचे दिवस येतील, गोधन विकत घेऊन अश्वत्थामाला भरपुर दुध मिळेल,पण! ते परतल्यावर महेद्र पर्वतावर काय घडले?द्रव्य मिळाले की नाही?एवढा प्रदीर्घ काळ कुठे घालवला? हे सर्व विचारण्याचा अधिकार धर्माने दिला असुनही ती कांहीच विचारुं शकली नाही.या आणि अशाच विचारांच्या आवर्त नात असतांनाच……

       द्रोणांनी कुटीत प्रवेश केला,व गौतमीच्या मनांत गोळा झालेले असंख्य प्रश्न पालापाचोळ्या सारखे ऊडुन गेलेत. उरली फक्त पत्नी! भोजन व्यवस्था न करुं शकणारी अगतिक असाहाय्य!आणि ओक्सीबोक्सी रडुं लागली.रात्री ती स्वतःच्या विचारांत हरवली असतांना द्रोणांनी तिला आवाज दिला.गौतमी अलि कडे तू माझ्यापासुन कांहीशी दूर गेल्या सारखे वाटतेस! विवाह करुन आश्रमांत प्रवेशली तेव्हा कशी अवखळ झर्‍या सारखी,स्वच्छंद फुलपाखरांसारखी भिर भिरत, हसणं,बोलणं, सारं कसं मुक्त मोकळं असायचं,त्यामुळे अध्यापणाला सुध्दा जायचा विसर पडायला व्हायच!पण! अलीकडे सारा आश्रमच अबोल, एखादं कलेवर ज्यांत जिवंतपणा नाही असं काही तरी विचित्रस भासत आहे. कांही तरीच आपल! पुत्रप्राप्तीनंतर स्री जिवनाला गांभीर्य प्राप्त होणं नैसर्गीकच नाही का?मातृत्व लाभेपर्यंत स्री ही पुर्णर्थाने पतीची असते.पण मातृत्व लाभल्यावर पतीचा अधिकार मर्यादित होतो.परशुरामांकडुन परत आल्यापासुन  अध्यायनासाठी कुमारांची संख्या वाढल्याने व कामाचा व्याप वाढल्यामुळे आपण सतत व्यस्त राहतां त्यामुळे असे वाटत असेल.ते म्हणाले,खरय!ब्रम्हास्रा सारखं अमुल्य अस्र प्राप्त झाल्यामुळे व मंत्रानुष्ठानाचं रहस्य समजल्यामुळे शिष्यां चा ओढा आश्रमाकडे वाढला आहे.

       आज द्रोण बोलत होते,आणि गौतमी फक्त ऐकत होती.क्षणभराने द्रोण ऊद्गारले, गौतमी! सुदैव की, दुर्देव हेच समजत नाही.केवळ द्रव्यप्राप्तीसाठी तुम्हा दोघांची कांहीही व्यवस्था न लावतां एकटं टाकुन या भरोश्यावर की,लवकर परत येऊन तुमचे दुःख दारिद्र्य नाहीसे होईल,पण पोहोचायला विलंब झाल्या मुळे,त्यांच्या जवळचं सर्व धन दान देऊन ते रिक्त झाले होते.याचे त्यांना खुपच वाईट वाटले,द्रोणासारख्या आग्नेयास्र संपन्न आमृतवृत्ती स्वीकृत अशा थोर याचकाला रिक्त हस्ते पाठवणार नाही. त्यांनी सर्व शस्रास्र विद्या,अमुल्य ब्रम्हास्र, मंत्रानुष्ठानाचे रहस्य द्यायला तयार असल्यामुळे ही सुवर्ण संधी न सोडतां त्यांचे शिष्यत्व पत्करले.

     मनांत म्हणाली, पती व पित्याची जबाबदारी टाळली. स्वार्थासाठी कोणता ही निर्णय घेण्यास पुरुषाला धर्माचे स्वातंत्र! आणि आम्ही स्रिया…सत्वहीन.. पराधीन,अपत्याच्या हितासाठी सुध्दा स्वतंत्रपणे निर्णय घेणे पाप,अधर्मच. रुढी परंपरा,मानमर्यादांनी बांधलेल्या स्रीने चाकोरीबाहेर कांही केले म्हणजे पती धर्माला कलंकच! ह्या मर्यादा,ही बंधने,हे नीतिनियम,या रुढी परंपरेच्या साखळ दंडांनी जखडुन राहायचय!अशा विचारां नी गौतमी गुरफटुन गेली.

           क्रमशः
 संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!!   गौतमी  !!!!

                     भाग – १५.

          कातरवेळ झाली तरी अजुनपर्यंत अश्वत्थामा कां आला नाही म्हणुन गौतमी आश्रमाजवळच्या धनिक वस्तीकडे निघाली.धनिकांच्या मुलांसोबत क्षीण देह मस्तकावरचा तेजस्वी मणी,शरीराइतकेच अंगावरचे जीर्ण वस्र असलेला व या सर्वात उठुन दिसत असलेला दुबळा  अश्वत्थामा सूरपारंब्या खेळत असलेला पाहुन ती झाडाच्या आडोश्याला उभी राहुन त्यांचा खेळ पाहत होती.डाव अश्वत्थामावर असल्यामुळे शक्य तेवढ्या वेगाने तो एखाद्या मुलाला पकडण्याचा प्रयत्न करीत होता,पण तो पकडु न शकल्यामुळे मुलं त्याची टेहाळणी करीत होते.दमुन तो खाली बसल्यावर सर्व मुले त्याच्याभोवती गोळा होऊन म्हणाले, सहाजिकच आहे,अरे! याला आपल्या सारखं चांगले चुंगलं थोडच खायला मिळते?कंदमुळं आणि ती नाहीच मिळाली तर आपल्या वस्तीवरुन कोंडा जमा करुन नेते,असलं निकृष्ट खाऊन कां अंगात शक्ती येते?

एकाने त्याला विचारले, तूं कधी दुध प्यासलास?कसं असतं दुध? हवय का? चालेल निदान चव तरी चाखता येईल. थांब इथेच.आम्ही आणतो तुझ्यासाठी दुध!असे म्हणुन दोन मुलं वस्तीकडे गेले. गौतमीला वाटले,निदान अश्वत्थामाला एकदा कां होईना दुधाची चव मिळेल, तिला आनंद झाला.दोन्ही मुलं परत आली.एकाच्या हाती पात्र व दुसर्‍याच्या मुठीत कांहीसा पांढरा पदार्थ,बहुतेक पीठ असावे.मुलं काय करणार याचा अंदाज आल्याने तिच्या काळजांत तुटल्यासारखे झाले.ती पुढे जाण्यापुर्वीच पात्रातल्या पाण्यात पीठ मिसळुन अश्वत्थामाला प्यायला दिले व त्यानेही मिटक्या मारत प्यायला.कसं लागलं रे? आवडलं कां?ऊद्याही पिणार ना? तुम्ही दिल तर….,पुढच ऐकायला गौतमी थांब लीच नाही.एका मातेसमोर केलेली ही क्रूर चेष्टा कोणत्या मातेला पाहवल्या जाईल?द्रोण मागे उभे असल्याचेही तिला भान नव्हते.अश्रुभरल्या नेत्राने तशीच वेड्यासारखी धावत येऊन अस्थीपंजर देह शय्येवर झोकुन दिला.धरबंध सुटला, दैवाने वर्मी घाव घातला होता.त्या मुलां च्या रुपाने जणुं नियतीच तिच्यासमोर फेर धरुन टाळ्या पिटत क्रूर चेष्टा करीत तिच्या मातृत्वाला दंश करीत होती. असाह्यपणे पाण्याबाहेर काढलेल्या माशा सारखी तडफड,तिला जन्माला घालणा र्‍या आणि निष्ठुरतेने मातृत्व पदरी बांधणार्‍या परमेश्वराला मनोमन कोसत म्हणत होती,’सगळ जग तुला दयासिंधु, गरीबांचा कैवारी मानतात,आणि आज पर्यंत तरी विश्वास होता,पण खात्री झाली की,तुझ्याइतका दुष्ट तूच!म्हणुनच अमृतवृत्ती स्विकारलेल्या माणसाशी जिवनगाठ बांधुन दारिद्र्याच्या खाईत ढकलले.त्यांत पदरी पुत्र देऊन मातृत्वा लाच डिवचण्याचं निष्ठूर क्रूर कर्म केलेस. आज या अभागी मातेच्या नजरेसमोरच तिच्या मुलाची, त्या मुलांच्पा रुपाने क्रूर चेष्टा करविलीस.परमेश्वराला दोष देत, नयनद्वयीतुन अश्रू ढाळीत,माशासारखी तडफडत शय्या भिजवित एकटीच मनातील भडास काढत,बडबडत होती.

       एवढ्यात द्रोण तिच्याजवळ येऊन तिच्या पाठीवरुन हवुवार हात फिरवत होते.आज अगदी पहिल्यांदाच त्यांच्या समोर बांध सुटुन अगदी बेभान होऊन हमसाहमशी रडु लागली.गौतमी!घाव वर्मी बसण्यासारखाच होता.मी एवढा पुरुष पण,ते दृष्य पाहुन माझही मन विव्हल झालं.तूं तर हळवी स्री…प्रत्यक्ष त्याची माता…तुझ्यासमोर तरी एवढी निर्घुन चेष्टा त्या कुमारांनी करायला नको होती.तूच असा धीर,धरबंध सोडलास तर या अश्वत्थामाने कुणाकडे बघावे?तिने उठुन चटकण त्याला छातीशी घट्ट धरुन हंबरडा फोडला.तोही भेदरुन रडु लागला द्रोण म्हणाले, या सर्वाला मी जबाबदार आहे.माझा दुराग्रहच सगळ्या दुःखाच्या मुळाशी कारण आहे.शिक्षा मात्र तुम्हाला  भोगावी लागत आहे.अपराधी आहे मी! अविश्वसनीय असे कांही तरी वेगळं एकत होती.विश्वास बसत नव्हता तिचा.  

            क्रमशः
 संकलन – मिनाक्षी देशमुख.

द्रोण पत्नी गौतमी संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading