द्रोण पत्नी गौतमी संपुर्ण भाग २, (६ ते १०)

कृपी मैत्रीणींसोबत खेळत खेळत थकुन बसली असतां ती भूतकाळात हरवली.ज्या समवयस्क मुलींबरोबर खेळत होती त्या सर्वांना आई,बाप,भाऊ बहिण, इतरही नातलग होते,पण कृपीला कोण होते एका भावाखेरीज? दोघेही अनाथच! शंतनूमहाराजांच्या कृपाशिर्वा ............

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

कृपी मैत्रीणींसोबत खेळत खेळत थकुन बसली असतां ती भूतकाळात हरवली.ज्या समवयस्क मुलींबरोबर खेळत होती त्या सर्वांना आई,बाप,भाऊ बहिण, इतरही नातलग होते,पण कृपीला कोण होते एका भावाखेरीज? दोघेही अनाथच! शंतनूमहाराजांच्या कृपाशिर्वा …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

              

!!! द्रोण पत्नी गौतमी!!!

!!!   गौतमी   !!!

                   भाग – ६.

       वास्तविक अहिच्छात्रांच राज्य द्रोणाचं!परंतु निरिच्छ वृत्ती,अध्यापणाचं वेड आणि सत्तेबद्दलची अनासक्ती,यामुळे भारद्वाजकुळाच्या या द्रोणांनी राज्यत्याग करुन पौरहित्य आणि अध्यापणाचं प्रचंड वेड स्वतःला लावुन घेतले.लहान वयातच द्रोणांनी अग्नीवेषांकडुन एक जबरदस्त आग्नेयास्र प्राप्त करुन घेतलं.आज द्रोण निर्धन आहेत, आश्रमाशिवाय त्यांच्या जवळ दुसरं कांहीच नाही.अमृतवृत्तीने राहतात.कृपी! अमृतवृत्ती साधना एवढी खडतर व परिश्रमाची  आहे की,असामा न्य तपस्वांना सुध्दा साध्य होत नाही. असामान्य व्यक्तीत्व असलेले द्रोण गृहस्थाश्रम स्विकारायलाच तयार नव्हते, पण त्यांच्या व्यक्तीमत्वाने भारावून मीच त्यांना प्रवृत्त केले.

        कृपी माझी निवड आवडेल ना?ती म्हणाली, कृपा! तू आणि मी वेगळे का आहोत?तू जो निर्णय घेशील तो माझ्या हिताचाच असेल याची पुर्ण खात्री आहे.हे ऐकुन कृपा समाधान पावला. व म्हणाला, कृपी! मातेचे कर्तव्यही मलाच पार पाडा यचे आहे.तुझ्यात आणि द्रोणात एक साम्य आहे.द्रोण आणि तुझी माता अप्सराच.धृता अप्सरापासुन द्रोणांचा जन्म झाल्यावर तिलाही जावं लागलं. पितृसुखाबाबतही त्यांचही असच झालं. फक्त फरक एवढाच की, आपल्या पित्याने जन्मतःच त्यागले,पण द्रोणांच्या पित्याने मात्र मातेचे प्रेम देऊन द्रोणाला वाढवले.पण लवकरच त्यांचे निधन झाल्यामुळे अग्निवेष ऋषींनी त्यांचा सांभाळ केला.त्यांच्यापासुन आग्नेयास्र प्राप्त करुन घेतले.

       कृपी! द्रोणांना राजाश्रय नसतांनाही अग्निवेष ऋषीनंतर  द्रोण आश्रमाचे उत्तराधिकारी बनले.पित्याच्या मृत्युनंतर अनाथावस्थेत असलेला आश्रम, लोका श्रय मिळवुन सावरला,उभा केला.आज अनेक कुमार वेदाध्ययन नी शस्रास्रविद्या शिकत आहे.कृपी!द्रोण सारखा तेजस्वी, निराभिमानी,सत्चचरित्र,स्विकारलेली अमृतवृत्तीत पुढे असलेले उज्वल भविष्य असणारा पती लाभणं हे परमभाग्यच म्हणायचय…..

        कृपीने विचारले,अमृतवृत्ती म्हणजे काय? कुणाकडे कांही न मागतां,कुणी स्वतःहुन दिलं तरच घ्यायच!नाहीच काही  मिळालं तर कंदमुळं,फळं किंवा लोकांनी टाकलेलले पदार्थ, उदाहरणार्थ टाकुन दिलेला अन्नधान्याचा कोंडा किंवा रस्त्या वर पडलेलं धान्य गोळा करुन,त्यापासुन पदार्थ बनवुन पोटाची भूक शांत करायची आणि नाहीच कांही मिळालं तर,नुसतं पाण्यावर भागवायचं!

       स्वतःवर व इंद्रियावर  नियंत्रण असल्याशिवाय शक्य नाही.कृपी!या भूमंडलावर अनेक तपस्वी,असंख्य आश्रम आहेत परंतु अमृतवृत्ती स्विकारले ला एकमेव द्रोणच!आणि म्हणुनच एक निरिच्छ,सत्चचरित्र आदर्श पुरुष म्हणुन द्रोणांचा नामोल्लेख करतात.

       कृपा पुढे म्हणाला,कृपी!द्रोण आज जरी निर्धन असले तरी त्यांचा भविष्य काळ उज्वल आहे.कृपी! आपण दारिद्र्याचे चटके,उपासमार,गरीबीमुळे वाट्याला आलेला उपहास,चेष्टा,अवहेल ना,निराधार जीवन व्यतित केले.त्यामुळे द्रोणांच्या निर्धनतेचा फारसा त्रास तुला होणार नाही.पराक्रमी पुरुषाची प्रेरणाच मुळी स्री असते.तिच्या सहवासानेच पुरुषांच्या पुरुषार्थाला धार चढते. पराक्रमी रावणाचं पारिपत्य करण्याचं बळ न कळत रामचंद्रांना सीतेमुळे मिळालं.कृपी! तु पण एका पराक्रमी पुरुषाची पत्नी होणार आहेस.त्यांच भविष्य घडविण्याचं काम तुला करायचय कृप तिला जीवनातले सारे बारकावे सांगत होता,आणि ती प्रत्येक शब्द प्राणमोलानं मनांत जतन करुन ठेवत होती.

                  क्रमशः
  संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!!!   गौतमी   !!!!

                     भाग – ७.

       कृप पुढे म्हणाला, अग! द्रव्य म्हणजेच लक्ष्मी,ती चंचल असते.ती केव्हाही सोडुन जाऊ शकते,पण कर्तुत्व, पराक्रम अक्षय असतो, आणि द्रोणाकडे लक्ष्मी जरी नसली तरी अक्षय असं कर्तुत्व आहे. बोलतांना कृपाचा स्वर जड झाला.बहिणीच्या विरहाच्या कल्पनेने व्याकुळ होऊन नेत्रांत अश्रु जमा झाले. कृपीचीही अवस्था वेगळी नव्हती.

         योग्यवेळी कृपीचा व द्रोणांचा विवाह संपन्न होऊन “गौतमी” नांव धारण करुन द्रोणांच्या पर्णकुटीच्या उंबरठ्याचे माप ओलांडले.हस्तिनापुरच्या कृपाच्या आश्रमासारखाच,पण राजाश्रय नसलेला साधा,निटनिटका,वैभवाचा अभाव विद्यार्थी कमी असलेला प्रसन्न वातावरणां तील आश्रम!आकर्षक पध्दतीने लहान लहान साध्या पर्णकुट्या,घनदाट झाडी, भरपुर फुलांनी बहरलेली कांहीशी वेगळी आणि नविन असणारी ही जागा कृपीला खुपच आवडली.

        कृपाचा आश्रम राजाश्रयावर चालत असल्यामुळे त्यावर सत्तेचा अंकुश होता,त्यामुळे सत्ताधारी केव्हाही अध्यापनाच्या मधुन बोलावल्या जात असे. तसं इथे नव्या आश्रमांत नव्हतं.इथे सत्ता द्रोणांची होती,कोणी विचरणारे नव्हते,त्यामुळे इथलं स्वातंत्र्य व कृपी म्हणुन कुणी हाक मारणारे नसल्यामुळे या आश्रमाचे आकर्षण जास्त वाढले.कृपी नांव तिला तीक्ष्ण भाल्यासारखे नेहमीच बोचत असे.कृप मात्र दुर्देवीच! हयातभर “कृपाचार्य” नांव घेऊनच कुरुकुलाची जखम उरी बाळगुनच जगावे लागणार!नवीन जागेत आल्यावर एकटी असली की,बंधु कृपाच्या काळजीने तिचे अंतःकरण पोखरत राही.

       विवाहानंतर दोघांची जेव्हा प्रथम भेट झाली,तेव्हा द्रोण म्हणाले,गौतमी! कृपाचार्यांना माझ्याबद्दलची सगळी माहिती दिलेली होती.वास्तविक गृहस्थाश्रम स्विकारण्याची माझी इच्छाच नव्हती,परंतु अंत्यसमयी पित्याला दिलेलं वचन पुर्ण करण्यासाठी गृहस्थाश्रम स्विकारला.गृहस्थाश्रम स्विकारतांना तुझ्या भावापासुन कोणतीच गोष्ट लपवुन ठेवली नाही.मी स्विकारलेल्या अमृतवृत्ती मुळे तुला नक्कीच त्रास होईल.

       कृपाचार्यांनी केलेल्या उपदेशानुसार द्रोणांच्याबरोबर जीवन व्यतित करण्याचा तिने ठाम निश्चय केला.नम्रपणे तिने अमृतवृत्तीसाठी जे गोळा करावं लागते त्याचा अधिकार मागीतला.द्रोण मंदपणे हसत म्हणाले,पत्नी अर्धांगिनी असते, त्यामुळे प्रत्येक गोष्टीत तिचा अर्धा हिस्सा असतो,पण माझे अध्यापणाचे काम वाढल्यामुळे,यापुढे अमृतवृत्तीची सर्व कामे मात्र तुलाच करावे लागेल.जे तू देशील ते खायच व कर्तव्य करीत राहायचय!

         अमृतवृत्तीची पुर्ण जबाबदारी गौतमीने स्विकारल्यावर,दिवसभर जंगल पालथे घालावे,जी मिळतील ती कंदमुळे, फळं शोधावे,नाहीच कांही मिळाले तर धनिकाच्या वस्तीवर जाऊन त्यांनी फेकुन दिलेला कोंडा,भुसा गोळा करुन आणल्यावर त्याचे पदार्थ बनवुन पतीची(द्रोणांची) वाट पाहावी, असे गौतमीचे दिवस जाऊ लागले.ज्या दिवशी कांहीच मिळाले नाही की आपण जबाब दारी नीट पाडतां आली नाही याची खंत वाटत निराश होऊन मान खाली घालुन पर्णकुटीत बसुन राहायची.अध्ययन संपवुन द्रोण क्षुधा शमविण्याच्या इच्छेने आले की,मान वर करुन पाहण्याचेही धाडस तीला होत नसे.आज कांही मिळाले नाही याची कल्पना तिच्या चेहर्‍याकडे पाहिल्याबरोबर यायची.मग ते प्रसन्न हसत तिच्याजवळ बसत मृदु स्वरांत म्हणायचे,गौतमी!एवढ्यातच थकलीस? माझ्याबद्दल मला कांहीच नाही वाटत,माझ्या अंगवळणी पडले,पण  तुझ्याबद्दल खंत वाटतेय!द्रोणासारखा निर्धन माणुस जोडीदार निवडला तर मग निराशा,औदासिन्य न दाखवतां सुखी समाधानी राहावे.

                 क्रमशः
  संकलन -मिनाक्षी देशमुख.

!!!  गौतमी  !!!

                   भाग – ८.

        द्रोणांनी तिला समजावल्यावर ती म्हणाली,कृपाने मला सर्व सांगीतल्यावर ही मी स्वच्छेने आपल्याशी गाठ बांधली. यानंतर आपल्याला माझ्या ओठावरचे हसू मावळलेले कधीच दिसणार नाही असे वचन देते.दोघांनीही जल प्राशन करुन क्षुधा भागवली.गौतमी! आज उद्या लोकं तुझी कुचेष्टा,अवहेलना,अपमान करतील. हे जग सरळमार्गी माणसांना सुखाने जगु देत नाही.टोचण्या मारण्याने आपण विव्हल बनुन जगने नकोसे होऊन मृत्यु जवळ करावासा वाटतो,त्यावर गौतमी म्हणाली माझेबाबतीत असे नाही घडणार,कारण जन्मतःच मातृ-पितृ छायेला पारखी झालेली,कुरुकुलाच्या कृपेवर जगले तरले पण व्दारपालापासुन राजसेवकापर्यंत,सारथ्यापासुन सामंता पर्यंत  सगळ्यांनीच,झिडकारत,उपहास,अवहेल ना सहन करतच आले,त्यामुळे वृथा निर्भत्सनेचे मनावर घेणार नाही.

        पण बोलल्याप्रमाणे सहन करणें तेवढें सोपं नाही याचा प्रत्यंतर लवकरच तिला आला.त्यादिवशी कंदमुळं,फळं न मिळाल्याने गौतमी धनिकांच्या वस्तीकडे गेली असतां एका धनिक स्रीने आवाज देऊन प्रेमळपणे विचारपुस केल्यावर म्हणाली,विद्येच्या बळावर पोट भरतां येत नाही.आज तुम्ही दोघे उपास सहन करुं शकतां,पण उद्या तुला मातृत्व लाभल्या वर या अमृतवृत्तीमुळे त्याला हवं ते देऊ शकशील? निर्भिडपणे उत्तर देऊन गौतमी तडक कुटीत आली,पण त्या बाई च्या प्रश्नाने पाठलाग सोडला नाही. विवाहानंतर  मातृत्व तर अनिवार्यच!मग या अमृतवृत्तीने त्याचे पालन पोषण कसे केल्या जाईल?त्याला झेपेल का?अशा अनेक प्रश्नांनी बेसावध क्षणी हल्ला केल्याने गौतमी विव्हल होऊन डोळ्यांत अश्रु उभे राहिले.नेमके त्याचवेळी द्रोणां नी कुटीत प्रवेश केला.त्यांना वाटले आज कांही न मिळाल्यामुळे तिची अशी अवस्था झाली असावी.ते समजावत म्हणाले, अग! कांही नाही मिळाले तरी गंगाजलाला तर तोटा नाही ना? काय सांगणार? तिचे मन आतल्या आंत आक्रंदत होते.

      त्यादिवसांपासुन गौतमीच्या रात्री वैरीण बनल्यात.रात्रभर झोप लागत नसे पण आपल्या अस्वस्थतेची जाणीव पती ला होऊ नये म्हणुन निपचित पडुन निद्रा धीन झाल्याची बतावणी करत स्वस्थ पडुन राहत असे.भविष्याचे अंदाज बांधत रात्र संपत असे.आणि ज्याची भिती होती तीच गोष्ट पुढ्यात आली, तिला दिवस गेल्याची जाणीव झाली. कोरड्या उलट्यांनी हैराण झाली,आधीच अन्नाची ददात,त्यात कोरड्या उलट्या, सहाजिकच तिचे मुसमुसलेले तारुण्य ओसरु लागले,गौतमी अगदी रुग्नाईता सारखी दिसुं लागली.गौतमी! काय ही तुझी दशा?अग! ज्या दिवशी तुझे पाउल या आश्रमांत पडले त्यावेळी इथले वाता वरण एका आगळ्या वेगळ्या अनुभुतीने  भारुन मोहरल्या,बहरल्या सारखे झाले होते, आणि आज? सर्व चैतन्यच कोमेजुन,असह्यपणे माना टाकलेले भासत आहे.मी पितृआज्ञा मानुन विवाह बंधनांत अडकायला नको होते गौतमी! ज्याला स्वतःचा चरितार्थ चालवता येत नाही,जो दोन वेळेच्या अन्नाची तरतुद करुं शकत नाही,त्याने गृहस्थाश्रम स्विका रुच नये,ही गोष्ट समजत नव्हती असे नाही,पण!पितृश्रा श्रेष्ठ मानुन कळत न कळत एका नुकत्याच उमललेल्या सुमना च्या माथ्यावर अकाली कोमेजनं मारलं याचेच वैशम्य वाटते तुझी अवस्था पाहुन!

              क्रमशः
  संकलन-मिनाक्षी देशमुख

!!!  गौतमी  !!!

                    भाग – ९.

        द्रोण बोलतच होते,ते म्हणाले,अध्य यन माझं कर्तव्य असल्यामुळे लौकिक दृष्ट्या प्रतिष्ठा पावेलही,पण या प्रतिष्ठेवर पोट नाही भरता येत गौतमी!पोटाला अन्न लागते हीच फार मोठी समस्या अमृतवृत्ती स्विकारल्यामुळे  उभी आहे. तू स्वप्नातही तक्रार करणार नाहीस,ओठावरचे हसु मावळणार नाही,पण तुझे अकाली यौवन ओसरत असलेले,गालावरचे गुलाबीपणा पुर्णतः लयास जात असलेले पाहुन स्वतः चा धिक्कालर वाटतो आहे.गौतमी स्वतः ला व द्रोणाला फसवते आहेस.तुझ्या ओठावर जरी हसू दिसत असले तरी अंतरी कोणतीतरी व्यथा,सल सलतो, टोचतो आहे,जे तूं कर्तव्याच्या जाणीवेने दाखवत नाही

      कृपाने तिला केलेला उपदेश व त्याला दिलेले वचन विसरुं शकत नव्हती. ती म्हणाली,शरीर ऊभं राहण्यासाठी,बळ  येण्यासाठी गरज आहे अन्नाची,त्यावर एकच उपाय आहे,तो म्हणजे अमृतवृत्ती चा त्याग!ज्याच्या जवळ बहुमोल आग्नेयास्र आहे,त्या द्रोणांना अन्नाची ददात असावी यासारखी लांच्छनास्पद गोष्ट कोणती असु शकेल? लौकिक दृष्ट्या द्रोणांच कर्तुत्व कितीही मोठं असलं तरी,निर्धनतेमुळे समाजांत होणारा उपहास,निर्भत्सना,जे कर्तुत्व दोन वेळचं जेवण देण्यास असमर्थ आहे तशाचा काय उपयोग? एवढ्यात गौतमीला भोवळ आली.व कोरड्या उलट्या होत असलेल्या पाहुन ते घाबरुन विचारते झाले काय झालं ग? तिला शय्येवर झोपवुन तिच्या जवळ बसले.पण थोड्या वेळात त्यांना कर्तव्याची जाणीव झाल्या ने तिला आराम करायला सांगुन आश्रमा कडे निघुन गेलेत,

        गौतमी केविलवाण्या नजरेने द्रोण गेल्या दिशेने असहाय्यपणे पाहु लागली. आणि एकटेपणाची जाणीव तिव्रतेने झाली.आपलं कुणीच नाही,जन्मतःच अनाथ, व आतां हक्काचं माणुस असुन ही अनाथच !आंतल्या आंत आक्रंदत राहिली.तिची आंतरिक इच्छा होती की, तिच्या अशा विकलावस्थेत त्यांनी जवळ बसावं,मायेनं हात फिरवावा,विचारपुस करावी, पण…. आणि कृपाची तिव्रतेने आठवण झाली.साधा सर्दी खोकला झाला तरी त्याच्या जिवाची नुसती घालमेल व्हायची,वेगवेगळे चाटण, वनस्पती औषधांचा मारा करायचा काम धाम विसरुन! त्याला कामाची आठवण दिली तर म्हणायचा, वेडे! तुझ्यापुढे सर्व व्यर्थ! हा राजाश्रय जरी दुरावला तरी शस्रास्र नैपुण्य,वेदाभ्यास असल्यामुळे कोठेही स्वतःचा आश्रम उभा करुन दोन वेळच्या अन्नाची अडचण नाही येणार.

       कुठे बंधु कृपा? आणि कुठे हे? अशा अवस्थेत एकटीला सोडुन निघुन गेलेत. दोघांतल्या तफावतीने ऊर भरुन, नेत्रांतील अश्रूंना मुक्तपणे वाट करुन दिली.कितीतरी वेळ एकटीच रडत राहिली.शेवटी तिला कर्तव्याची जाणीव झाली.हळवं मन घेऊन जन्माला आलेली  स्री होती ना? काल उपास घडला,आज कांही तरी व्यवस्था करणें भाग होते. भोवळ,उलट्या होत असतांंनाही ती राना कडे निघाली.

      कोणतीही विवाहित स्री ज्या अत्युच्च क्षणांची वाट बघते,मातृत्व प्राप्त होणारा स्री जिवनांतील परमोच्च क्षण! पण गौतमी मात्र अपवाद होती.तीला आंनद होण्याऐवजी या क्षणाचा तिरस्कारच वाटला. मातृत्व येऊ नये म्हणुन ती देवाला विनवीत होती,तिने जे सोसले, भोगले,अनाथ म्हणुन जन्मास आल्यावर निराधाराला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले हे सर्व आपल्या अपत्याच्या वाट्याला येऊ नये म्हणुन तिला मातृत्व नको होते. पण……

                क्रमशः
  संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!!  गौतमी !!!

                 भाग – १०.

           गौतमी देवाला रात्रंदिवस आर्त पणे विनवित असे,देवा! निर्धनतेमुळे माझी जी क्रुर चेष्टा झाली,समाजाने निर्धनतेने जी अवहेलना, उपहास केला ते सर्व अपत्याच्या माथी येऊ नये,त्याची होणारी क्रूर चेष्टा मला जगुं देणार नाही, म्हणुनच अपत्य नकोय! निपुत्रिक म्हणवुन घेणे नशीबी आले तरी चालेल पण,अवघड करणारं मातृत्व नकोय!म्हणुन ती परमेश्वराला,विनवित,याचना करीत!पण त्याला दया आलीच नाही.जे नको तेच निसर्गनियमानुसार घडलेच. गौतमी माता होणार याची द्रोणांना जाणीव होताच आनंदातिशयाने तिला बहुपाशात करबध्द करुन प्रेमळपणे हाक दिली.गौतमी!अखेर पिंत्याच्या आज्ञेनुसार गृहस्थाश्रम स्विकारुन भारद्वाज कुळाला वारस मिळेल व दिलेलं वचन पुर्ण होणार,म्हणुन तूं पुत्रच दे.

     गौतमी मनांत म्हणाली,जगातल्या सर्व स्रीया मातृत्वासाठी आसुसलेल्या असतात पण आपल्याला मात्र घृणा वाटते.पण कर्तव्य व पतीसुख मिळावे हेच कर्तव्य असल्यामुळे पतीला दुखदायी शब्द ओठाबाहेर आले तर मर्यादाचे उल्लंघन नाही कां होणार?

          द्रोण पुढे म्हणाले, होणार्‍या भारद्वाज कुलदीपकाला सक्षम, वेदाभ्यासी व शस्रास्रविद्या निपुन व आग्नेयास्र त्याच्या स्वाधीन करुन लौकिकास पात्र बनवायचय!द्रोणांचे होणार्‍या अपत्याविषयीचे भविष्य, स्वप्न पुर्ण करतीलही,पण त्याची अन्नाची भूक कशी भागवणार? अमृतवृत्तीमुळे जगाच्या उपहासापासुन त्याला कसे वाचवतील?पराक्रम,पुरुषार्थ,प्रतीष्ठा मिळ वण्यासाठी शरीर उभे राहण्यासाठी पोटाला अन्नाची गरज असते हे त्यांना कळत नाही हा केवढा दुर्विलास? गौतमी ला बंधु कृपाची आठवण झाली.सार्‍या  नात्यात समावुन कृपीचे पालन केले,पण शेवटी तोही एक पुरुषच!द्रोणांमधला लौकिक,प्रतिष्ठा,पुरुषार्थ,पराक्रम,आग्नेयास्र डोळ्यांत भरलं आणि जाणुन बुजुन त्यांच्या निर्धनतेकडे दुर्लक्ष करुन ज्या कृपीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलस,त्या कृपीला द्रोणांची पत्नी बनवुन दारिद्र्याच्या गर्तेत लोटुन दिलेस!

       कृपा!विवाहानंतर या कृपीने,खुप सोसलं,सहन केलय,पण या व्यथा तुझ्या पर्यत कधीही येऊ दिल्या नाहीत,माझ्या प्रकृत्तीत झालेला बदल पाहुन तुला यातना होतील,दुःख होईल म्हणुन तुला तोंडही दाखवले नाहीआणि तू ही आला नाहीस,पण आज मात्र मनाचा बांध फुटला.तुझ्या गळ्यात पडुन खुप आक्रंदाव,व्यथा सांगावी असं तिव्रतेने वाटले,पण तो ही पुरुषच ना? कर्तव्याच्या मागे लागलेला,त्याला स्रीची व्यथा कशी कळावी? जिथं पतीला वाटेकरी बनवु शकली नाही तिथं तू……एवढ्यात पोटांत जोराची कळ आल्याने किंचित ओरडण्या चा आवाज द्रोणांच्या कानी गेला असावा, ते तडक तिच्या जवळ आलेत.

         कृपीला जाणीव झाली की,जगा च्या दृष्टीने परमोच्च तृप्तीचा क्षण आला आहे. या वेदना सहन केल्यानंतरच अपत्याच्या मुखावलोकनाचे सुख प्राप्त होणार!प्रसुती म्हणजे स्रीचा पुनर्जन्मच! पण तिला पुनर्जन्म नकोय,फक्त पतीला संतुष्ट करणारा पुत्र हवाय!वेदना असह्य झाल्यात.कृश शरीरांत कुठुन बळ आलं कुणास ठाऊक?दाताखाली गच्च ओठ दाबुन नेत्रद्वयींतुन अश्रुधारा वाहत होत्या,पण गडद काळोखातअश्रू दिसणे शक्य नव्हते.कळ्या वाढत होत्या,रात्र सरत आली.प्रकाशात अश्रू लपवणे शक्य नसल्याची तिला जाणीव झाली आणि त्याचवेळी पोटातुन जिवघेणी  असह्य कळ मस्तकापर्यंत जाऊन भिडल्याने खुप जोरांत ओरडली.नंतरचे कांहीच समजले,उमजले नाही.

              क्रमशः
  संकलन – मिनाक्षी देशमुख.

द्रोण पत्नी गौतमी संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading