द्रोण पत्नी गौतमी संपुर्ण भाग १, (१ ते ५)

कृपी मैत्रीणींसोबत खेळत खेळत थकुन बसली असतां ती भूतकाळात हरवली.ज्या समवयस्क मुलींबरोबर खेळत होती त्या सर्वांना आई,बाप,भाऊ बहिण, इतरही नातलग होते,पण कृपीला कोण होते एका भावाखेरीज? दोघेही अनाथच! शंतनूमहाराजांच्या कृपाशिर्वा ............

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

कृपी मैत्रीणींसोबत खेळत खेळत थकुन बसली असतां ती भूतकाळात हरवली.ज्या समवयस्क मुलींबरोबर खेळत होती त्या सर्वांना आई,बाप,भाऊ बहिण, इतरही नातलग होते,पण कृपीला कोण होते एका भावाखेरीज? दोघेही अनाथच! शंतनूमहाराजांच्या कृपाशिर्वा …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

              

!!! द्रोण पत्नी गौतमी!!!

!! प्रस्तावना!!

!! नमस्कार!!

       आतां मी जी व्यक्तीरेखा घेऊन येत आहे,त्याबद्दलची माहिती फारच त्रोटक मिळाली आहे,तरी शक्य तेवढी विसृत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

        जिचे जन्मापासुनच अनाथावस्थेत व उपेक्षित जीवन गेले ते तीच्या जीवना च्या अंतापर्यत! पती,मुलगा,भाऊ असुन ही आयुष्यभर एकटीलाच समाजाचा अपमान,उपहास,अवहेलना,उपासमार सहन करतच तिला जिवन व्यतित करावे लागले.वास्तविक तिचा जन्म एका महान ऋषी व अप्सरे पासुन झाला.पण जन्मतः च आई तिला टाकुन गेली आणि कांही दिवसांतच वडिल (ऋषी)  कुटीमधे तिच्यासह तिच्या जुळ्या भावाला अर्भका वस्थेत टाकुन निघुन गेलेत. शांंतनूराजाने या भावडांना राजाश्रय दिल्यामुळे त्यांचे आश्रित होऊन, समाजाच्या अवहेलना, उपहास सहन करत आयुष्य कंठु लागले.

     आपल्या लक्षात आवेच असेल, मी कोणाबद्दल बोलत आहे. नाही..द्रोणपत्नी व अश्वत्थामाची माता गौतमी बद्दल सांगा यचाप्रयत्न करीत आहे. 

        नेहमी प्रमाणे चुकभुल क्षमा करुन आपला आशिर्वाद, व क्रिया-प्रक्रिया द्याव्यात.

                   मिनाक्षी देशमुख.

!!!  गौतमी  !!!

                      भाग – १.

          कृपी मैत्रीणींसोबत खेळत खेळत थकुन बसली असतां ती भूतकाळात हरवली.ज्या समवयस्क मुलींबरोबर खेळत होती त्या सर्वांना आई,बाप,भाऊ बहिण, इतरही नातलग होते,पण कृपीला कोण होते एका भावाखेरीज? दोघेही अनाथच! शंतनूमहाराजांच्या कृपाशिर्वा दाने राजप्रसादाच्या आश्रयाला राहणारे! त्यांनी जेव्हा मनांत आणले तेव्हा त्यांना रस्त्यावर आणु शकत होते.

       अनाथ पोरकी पोरं म्हणुन तिच्या भावाचे नांव कृप आणि तिचे कृपी! न कळत्या वयात या नावाबद्दल तिला कांही वाटत नव्हते, तरी पण हे नांव तिला प्रथम पासुनच खटकत होते.एकदा उत्तमा नांवा च्या मैत्रिणीला या नांवाचा अर्थ विचार ल्यावर, उत्तमा म्हणाली,तुम्ही दोघेही भावंड अनाथ ना? शांतनूराजाला एका आश्रमांत आढळले व त्यांनी सेवकातर्फे तुम्हाला राजप्रसादात आणवले.महाराजां ची कृपा म्हणुन तुला कृपी व तुझ्या बंधु ला कृप या नांवाने ओळखु लागले.शंतनू महाराजांचे उपकार आयुष्यभर सतत टोचत रहावेत म्हणुन तर कृपी नांवाने संबोधत नसेल ना?

        अशा प्रकारचे प्रश्न भावाला विचारुन त्याला ती दुःखी करुं इच्छित नव्हती. एकदा तिने कृपाला विचारले, कृपा! माझ्यात आणि इतर माझ्या सख्यां मधे तुला कांही फरक नाही दिसत?त्यांची केसरचना त्यांच्या माता करतात व माझे एवढे विपुल केसांभार असुन मला मात्र आंबाडाही बांधतां येत नाही.आणि त्यादिवसापासुन मुद्दाम वेळ काढुन कृपा तिचा आंबाडा बांधुन देऊ लागला.कृप आणि कृपी हस्तिनापुरचे महाराज शंतनू चे आश्रितच! त्यांनी अन्न,वस्र देण्याची आज्ञा केली,पण आज्ञा पाळल्या जाते की, नाही याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नव्हता.त्यामुळे कित्येकवेळा उपवासच घडत असे.असेच दिवस सरत असतांना एके दिवशी राजसेवक त्यांच्या कुटीत येऊन महाराजांनी त्यांना बोलावल्याचे सांगीतल्यावर, दोघेही थोडे घाबरलेत. भयभित अंतःकरणाने दोघेही राजप्रसादा कडे निघालेत.

                 क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.

!!!  गौतमी  !!!

                  भाग – २.

        कृपीला नेहमीच प्रश्न पडायचा की, माझे माता-पिता कोण? कृपाला विचार ल्यावर तोही अनुत्तरीतच राही.अशाच विचारांच्या गर्तेत दोघेही राजसेवका समवेत थेट राजदरबारात शांतनूमहाराजां च्या समोर उभे झाले.महाराजांच्या  उजव्या बाजुच्या उच्च आसनावर एक अस्थिपंजर,मध्यमवयीन पण तेजस्वी, दाढी व जटा यांत बराचसा झाकलेला चेहरा होता.नकळतच कृपीची नजर त्यांच्यावर स्थिरावली.

       महाराज शंतनूने त्यांची ओळख करुन देत म्हणाले,हे वेदाध्यन आणि शस्रास्रविद्या पारंगत मोठे तपस्वी शरद् वान ऋषी असुन हे दुसरे तिसरे कोणी नसुन प्रत्यक्ष तुमचे जन्मदाते पिता होय. लगेच शरद् वान खाली उतरुन आवेगाने ओलावल्या नेत्राने कृपाला कवेत घेतले. प्रथमच भेटलेल्या पित्याच्या कुशीत जायला कृपी उत्सुक असायला हवी,पण तीचे पाय मात्र जागेवरुन उचलले नाही. त्यांनीच पुढे होऊन तिला कवेत घेतले,पण पिता भेटल्याचा आनंद मात्र तिला वाटले नाही.

       शंतनूमहाराजांच्या कृपेने हस्तिना पुरातच शरदवान ऋषींने यमुनेच्या काठी सुरम्य,शांत जागी आश्रम उभारल्या बरोबर वेदाध्ययन व शस्रास्रविद्या शिकण्यासाठी राजकुमारांची गर्दी होऊन इतर अश्रमासारखी या आश्रमाची सुरुवात झाली. दोघा भावंडाचा पोरके पणा,राजसेवकांचे दरडावणे संपुन त्यांच्या नवीन जीवनाला सुरुवात झाली. कृपा पुरुष असल्यामुळे व त्याला बाहेर च्या जगात वावरायचे असल्यामुळे शस्रास्र कौशल्य, वेदनिपुन पित्याच्या हाताखाली शिकु लागला.गदायुध्दातले कौशल्य,द्वंदयुध्दातले बारकावे,खड्ग युध्दातील प्राविण्यांत तरबेज होऊ लागला. आपला पुत्र तथा वारस सर्व विद्येत कलानिपुन होत असल्याचा शरदवान ऋषींना आनंद होत होता.कृपी चा दृष्टीकोण मात्र वेगळा होता.पित्या विषयी प्रेम वाटण्याऐवजी घृणाच वाटत होती, कारण जन्मरहस्य!

    ब्राम्हणकर्म आणि क्षात्रियकर्म दोन्ही मधे निष्णात शरदवान हे गौतमाचे पुत्र! शरदवानाने वेदाध्ययन,व ध्यानधारणेपेक्षा शस्रास्र विद्येत इतके नैपुण्य मिळवले होते की, इंद्राला आपल्या सत्तेला धोका असल्याची भिती वाटु लागल्यामुळे कपट कारस्थानी इंद्राने “जानपदी” नांवाच्या अप्सरेला पढवुन त्यांचे सत्व हरण करण्यास रवाना केले.

       एके संध्यासमयी शरदवान नदीवरुन परतत असतांना एका सुंदर रमणीला पाहुन, आपले सत्व,पराक्रम,शस्रास्रविद्ये तील नैपुण्य तपश्चर्या यावर केलेले परिश्रम या सार्‍यांचा विसर पडुन तिच्या असामान्य लावण्यावर लुब्ध होऊन, फुलात हरवलेल्या गंधासारखे तिच्या स्वाधीन झाले.

        इंद्राचे कपटकारस्थान फळास आले.जानपदीने दोन जुळ्यांना जन्म देऊन जशी अकस्मात आली होती तशीच निघुन गेली.ती गेल्यावर शरदवानचे डोळे खाडकण ऊघडले,पण फार उशीर झाला होता.हातुन घडलेल्या प्रमादाने पश्चाताप दग्ध शरदवानने स्वतःहातील माणुसपण हरवुन टाहो फोडत आक्रंदणार्‍या दोन नवजात अभ्रकांना पर्णकुटीत एकटे सोडुन निष्ठुरपणे निघुन गेले.पराक्रमी व सत्तेच्या मोहात गुरफटलेला इंद्र आणि विद्वान शरदवान यांनी केलेल्या अपराधा चे प्रायश्चित्त मात्र त्या दोन निष्पाप, अजान नवजात अर्भकांना भोगावे लागले

        कृपीला जेव्हा जन्मरहस्य कळले, तेव्हा ती विचार करुं लागली,वेदाभ्यास व वेदांगाचे ज्ञानप्राप्त मनुष्याचा स्वतःच्या वासना,विकारावर ताबा असुन त्याच्या प्रत्येक कृतित अलौकिक मर्यादा येऊन षडरिपुंपासुन अलिप्त बनतो,पण हे

 गृहस्थ केवळ एका लावण्यवतीला पाहुन घायाळ झाले व वर्षोवर्षीची साधना विषयांध बनुन कमनिय नाजुक स्रीच्या करपाशात गुरफटुन मिळवलेली सिध्दी गमावुन बसले.अश्या माणसाबद्दल आदर, जवळीक कशी वाटावी?

                   क्रमशः
  संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!! गौतमी !!!

                भाग – ३.

        कधी कधी महान व्यक्तीकडुन प्रमाद घडतोही, पण जाणीव झाल्यावर झालेली चुक सुधारण्याचा प्रयत्न केला तर क्षम्य तरी ठरुं शकतो,पण या माणसा ने अपराध केल्यावरही नंतरची त्याची क्रूर वागणुक? क्षणिक सुखाच्या मोहात अडकुन व्यभिचार करायचा नी निसर्ग नियमांनुसार कांही घडलं तर स्विकार न करतां पाठ फिरवुन, या नवजात अर्भकां चे काय होईल याचा विचारही न करतां निघुन जाण्यास कोणता पौरुषत्व,मानव धर्म समाजायचय? जिने नऊ महिने पोटात ओझं वाहिलेली स्री पोटच्या गोळ्यांचा त्याग करुन निघुन जाते, व याचं उत्तरदायित्व ज्याच्या शिरावर तोही या अर्भकांना वार्‍यावर सोडुन निघुन जातो हा केवढा दैवदुर्विलास?मानवजाती ला कलंक नव्हे कां?अशाच विचारांनी कृपी वडिलांच्या जवळ न जातां अधिक दूरावत गेली.

        एक दिवस कृपी भावाला विचारती झाली, कृपाss अलीकडे तूं पुर्वीसारखा मोकळा कां वागत नाहीस? तो म्हणाला, अग! आपल्या जीवनाची सुरुवातच मुळी अनाथ म्हणुन झाली, शांतनू महाराजांची कृपा लाभली नसती तर,आचार्याविना ओस पडलेल्या आश्रमात या अनाथ जीवांना कोल्ह्या कुत्र्यांनी खाऊन जन्मःतच  दोन कोवळे अंकुर निर्दयतेने कुस्करल्या गेले असते.पण दैव बलवत्तर म्हणुनच कृपेवरच का होईना,मिळालेलं मोजक अन्न दोघांनी मिळुन खात,एकमे कांचे अश्रु पुसत धीर देत दिवस काढले, हे विसरण्याइतका कृतघ्न नाही ग मी!केवळ तुझ्या भवितव्याचा विचार करुन  द्रव्य मिळविण्यासाठी,लौकिक प्रतिष्ठा मिळवुन भवितव्य सुरक्षित झाले की, तुझ्यासाठी योग्य ‘वर’ शोधुन त्याच्या स्वाधीन करण्यासाठीचे माझे प्रयत्न आहे  तरी सुध्दा यानंतर एकटेपणा येणार नाही याची खबरदारी घेईन.तुझा आंबाडा पण बांधुन देईन.कृपाचं इतकं मायाळु ममता मय वर्तन ऐकुन कृपीला स्वतःचीच लाज वाटु लागली. आणि पित्याची व कृपाची तुलना केली असतां दोघांतील तफावत लक्षात येई.

        एक अनोळखी कोवळा अंकुर तर, दुसरा प्रत्यक्ष आकाशाला गवसणी घाल णारा पर्वतराज,एकाला वेदांगाचा स्पर्शही न झालेला,तर दुसरा प्रगाढ वेदाभ्यासी, एकाला तर धड धनुष्यही पेलवत नाही, तर दुसरा मात्र धनुष्याला प्रत्यंचा आकर्ण ओढुन धनुर्विद्येच्या नैपुण्याचं प्रदर्शन मांडणारा श्रेष्ठ धनुर्धर,एक अननुभवी तर दुसरा अनुभव संपन्न! काय नव्हत तातां जवळ? अध्ययनासाठी शेकडो आश्रम कुमार,मोठा लौकिक,प्रतिष्ठा,राजदरबारी मानमान्यता,प्रत्यक्ष शांतनू महाराज त्यांचा सल्ला प्रमाण मानीत!त्यांना अधिकाधिक प्रतिष्ठा,लौकिकाची हाव वाढतच होती.आपला अपराध त्यांना फार उशीरा कळला.पण प्रमाद कळुनही  फक्त पुत्र-पुत्रीचा स्विकार करुन अपराधा चे पारिपात्य केल्याचे समाधान मिळवण्या व्यतिरिक्त फार कांही केल्याचे आढळले नाही.कृपाशी बोलतांना साधा भावनेचा स्पर्शही नसायचा, असायचं फक्त कोरडं, निरस, शुष्क वागणंबोलणं!

      लौकिकदृष्टीने जरी शरदवान पिता असले तरी, सर्वार्थाने सर्व नाते कृपाच निभवित होता.त्याच्या कुशीत शिरल्यावर मातेच्या पंखाची ऊब मिळाल्याचे समाधान मिळत असे.

      जसे रात्रीनंतर दिवस उजाडतो, तद्वतच अनाथपणा,लाचारी संपुन सगळ कसं अकल्पित आकस्मित परिवर्तन घडुन जीवनाबद्दलची ऊदासिनता, भविष्याची काळजी,स्वाभिमान,अस्मिता पार नाहीशी झाली.हे सर्व जरी तातांमुळे  प्राप्त झाले तरी त्यांच्या विषयीची अढी मात्र कृपीच्या मनांतुन जात नव्हती.त्यांनी केलेल्या बालमनावर,निष्पाप मनावर झालेल्या जखमा भरुन निघु शकत नव्हत्या.

                   क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!! गौतमी !!!

                   भाग – ४.

       एखादी माता जेवढं करणार नाही तेवढं कृपाने बहिणीसाठी केल.अलिकडे कृपीला तारुण्यसुलभ भावनांची जाणीव होऊं लागली.कृपाला आश्चर्यचकित करण्यासाठी त्यादिवशी तीने स्वतःचा आंबाडा बांधुन त्याच्या समोर उभी राहिल्यावर,विस्फारल्या नजरेने कृपाने विचारले,कुणी बांधुन दिला तुझा आंबाडा

तूंच बांधला! म्हणजे एवढी मोठी झालीस तरी पण इथे असेपर्यंत मीच बांधणार तुझा आंबाडा! अग! नुसतं कर्तव्यावर जगता नाही येत, कृपी थोडा भावनेचा ओलावाही लागतो जगण्याला….

       शरदवान स्वतःचा पुत्र कृपासोबत सुध्दा थोडं अंतर ठेवुनच वागत असे.इतर  आश्रमकुमारांशी जसे कठोर वागत,तसच त्याच्याशीही वागत असे. कृपा शस्रास्र निपुन व्हायलाच हवा हा त्यांचा अट्टाहास!कृपानेही विचार केला टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. मग त्यानेही परिश्रमांत कसुर केली नाही. तो मोठा झाल्याचा साक्षात्कार अगदी प्रथमच झाला.कारण त्याच्या समंजस बोलण्यांतुन जीवनाबद्दलचं नवं नवं तत्वज्ञान बाहेर पडु लागलं!

        बरेच दिवसांनंतर कृपीची मैत्रीण उत्तमा तिच्या वडीलांसोबत आश्रमात आल्यावर दोघीही आनंदाने कडकडुन भेटल्या.उत्तमाने तिच्या सुंदरतेचे गुणगाण केल्यावर ती लाजली.आपण  आपल्या अप्सरा असलेल्या मातेसारख्या  तर दिसत नाही ना? कृपी व कृपाचा स्विकार त्यांच्या वडिलांनी केल्यावर त्यांचा निराश्रीतपणा,अन्नाची ददात संपली,प्रपिष्ठाही वाढली,पण म्हणुन पित्याचे कर्तव्य संपले अस मुळीच नाही. खरं म्हणजे पित्याचे वात्सल्य,प्रेमाचा जिव्हाळा,सहाभूतीचे भुकेले होते,पण या गोष्टींचा विचारही त्यांच्या मनांत डोकाव ला नाही.तरी कृपाला मात्र त्यांचा ऊपयोग चांगला झाला.तो स्वतःच्या पायावर उभा राहुन धनूर्विद्येची चारी अंगे, गदायुध्द,तोमरयुध्द, द्वंदयुध्दमधे लौकिक प्राप्त झाला.कदाचित आपल्यानंतर आश्रम चालवायला,आश्रमकुमारांना कुशल अध्यापक मिळण्याच्या दृष्टीने अध्यापन कौशल्यातही वडिलांनी कृपीला चांगलेच प्रविण केले.

       शरदवानाच्या मृत्युचे दुःख झाल्याने तो शोक करुं लागला,पण कृपीच्या डोळ्यातुन टिपुसही पडला नाही हे पाहुन कृपाने विचारले,कृपी! तातांच्या जाण्याचे तुला दुःख नाही झाले? कां व्हाव? त्यांनी तुला घडवलय,उघड्या जगांत खंबीरपणे उभं राहण्यास शिकवलय,भविष्याची तरतूद करुन दिली.माझेसाठी काय केल

नुसतं अन्न वस्र निवारा दिल्याने कर्तव्य संपते का?जिव्हाळा,माया,ममता नको? कधी प्रेमाने जवळ घेऊन पाठीवर हात फिरवला? अरे कृपा! डोळ्यात अश्रु  येण्यासाठी ह्रदयाला चटका,कांही तरी खुपावे,रुतावे लागते.

          दुःखातुन कृपा सावरल्यावर भीष्माचार्यांनी आश्रमाचा भार त्याच्यावर सोपवुन कुरुकुलातील राजकुमारांचे भवितव्य त्याच्या हाती सोपवले.पितामहां नी कृपाची अचुक पारख केल्याने शोक, नैराश्य झटकुन कृपाचा उत्साह दुणावला. ऋषिकुमार कृप,कुरुकुलाचा कृपाचार्य झाला.वर्षामागुन वर्षे सरत होती.युधीष्ठीर अर्जुनादी पांडव,दुर्योधन,दुःशासनादी कौरव यांना आपलस करुन त्यांचं भविष्य घडविण्याच्या नादात स्वतःलाही विसरुन गेला. एके दिवशी अचानक भीष्माचार्य त्यांच्या कुटीत आले.दोघांचे ही कुशलक्षेम विचारल्यावर म्हणाले,कृपा  तू तुझे अस्तित्व विसरल्यामुळे तुला भाना वर आणण्यासाठी यावे लागले.अरे वेड्या कन्या हे परक्याचे धन!त्या अनुषंगाने कृपीचा विचार केलास कधी?

               क्रमशः
  संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!!  गौतमी  !!!

                  भाग – ५.

          भीष्माचार्यांनी बहिणीच्या भवित व्याची जाणीव कृपाला करुन दिल्यामुळे, कार्यबाहुल्याने व स्वतःच अनभिन्न असल्यामुळे त्याचे दुर्लक्ष झाले होते,पण आतां तातडीने विचार करण्याचा निर्णय त्याने घेतला.हे पाहुन कृपीचे तारुण्य सुलभ भावनेने सर्वांग रोमांचित झाले. गात्र नी गात्र पुलकीत होऊन कांहीतरी हवंंहवंस वाटु लागले.

        कृपी मनाच्या या अवस्थेत असतां नाच एके दिवशी तिची मैत्रीण उत्तमा तिच्याशी हितगुज करीत, आपला विवाह निश्चित झाल्याचे सांगीतले. आपलाही भाऊ तिच्यासाठी वरसंशोधनास गेला असल्याचे सांगीतले.एरवी कृपाचा विरह थोडाही सहन होत नसे,पण यावेळी मात्र तसं घडलं नाही,कारण आजचा प्रश्न थोडा वेगळा,नाजुक होता,आणि ती स्वतःच लाजली.

       उत्तमेचे शब्द तीला आठवले,कृपी! माता-पिता,भावंड,सारी माणसं आपली असली तरी,स्रीच्या जीवनांत असा एक क्षण येतो की,जीवनांत कांहीतरी उणीव असल्याची जाणीव होऊन, कुणीतरी आपलसं कराव,आपल्या मुखावलोकानं उल्हासित व्हावं,कुणाच्या तरी स्पर्शानं पुलकित व्हावं, आणखीन…कांही तरी आणखीन…असचं वाटत राहतं..एवढे मात्र खरय!अपुर्ण असल्याची जाणीव होऊन एक आगळी वेगळी हुरहुर मनाला लागुन राहते.कल्पनेच्या धाग्यांनी भावी संसाराचे सुरम्य,देखणं जाळं विणल्या जाते.मग त्या जाळ्याबाहेर कृपाही असेन ज्याने सर्वस्व देऊन जतन,पालन,लाड, कौतुक केले त्याला सुध्दा तिच्या जिवनां त शिरकाव असणार नाही.

         चार दिवसांनी कृपा ‘वर’ शोधुन परत आल्यावर,कृपीच्या होणार्‍या विरहा च्या कल्पनेनेच तो अस्वस्थ झाला.त्याच बरोबर आपली फार मोठी जबाबदारी पार पडेल याचेच त्याला समाधान वाटले. आतांपर्यत दोघेच एकमेकांना आधार होते.बहिणीच्या आधाराशिवाय कृपा राहुच कसा शकेल?त्याला शक्य असते तर,कृपीला कधीच दूर जाऊ दिले नसते. पण!पुर्वापार चालत आलेल्या रुढी, परंपरा मोडुन समाजांत वावरणे शक्य नव्हते.केवळ अनिवार्य बाब व लोको पवादाच्या भितीने,तुझ्या भवितव्याच्या दृष्टीने आपली साथ इथपर्यंतच आहे.

     कृपी! तुझा विवाह हा प्रसंगच असा आहे की,  सुख दुःख दोन्ही गोष्टीची अनुभुती एकदमच होत आहे.तुझ्या विरहाच्या कल्पनेनेच जीव व्याकुळ, विव्हल,कासाविस झालाय, तर दुसरी कडे, तू स्वतःच्या घरांत स्वतंत्रपणे स्वतः च्या साम्राज्यात पदार्पण करणार या विचारानेच मन तृप्त होत आहे.आपलं आहे ते सोडायचं आणि दुसर्‍याचं आपलं मानायचय, ही जी स्री जिवनातील संक्रमणावस्था,हीच मुळी तारेवरची कसरत असुन एक अनिवार्य बाब न टाळतां पत्करावी लागते.रत्नाला सोन्याचं कोंदण घातल्यावरच रत्नाची शोभा वाढते, तद्वतच तुझ्यासारख्या हिर्‍यासाठी  सुवर्ण कोंदण मी शोधले आहे.गंगातिरी राजाश्रय नसला तरी लोकाश्रय असलेला एक विद्याभ्यासी,शस्रास्रनिपुन असा आश्रम आहे…..

              क्रमशः
  संकलन – मिनाक्षी देशमुख.

द्रोण पत्नी गौतमी संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading