
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
संत चोखामेळा संपूर्ण चरित्र ! !
! ! ! संत चोखामेळा ! ! !
भाग – ११.
सुदामाने पुढे होऊन नामदेवांचे स्वागत केले. लग्नघटिका भरली. मंगलाष्टकं झाली. अंतरपाट दूर झाला. सोयरा-चोखोबांनी एकमेकांच्या गळांत माळा घातल्या. एकमेकांच्या साथीने उभ्या आयुष्याची संगत करुं पाहणारे दोन जीव एका अनोख्या बंधनांत बांधल्या गेले. लगीन लागले आणि जेवणाची एकच गडबड उडाली. जेवणा चा बेत छान होता. भेटायला येणार्या प्रत्येकाच्या पायावर डोके ठेवुन वधु वर नमस्कार करत होते. नामदेव बोहोल्या जवळ आल्यावर दोघांनी त्यांच्या पाया वर डोके ठेवले. नामदेवांनी दोघांना खांदे धरुन उभे केले. नामदेवांनी चोखोबाला मिठीत घेत म्हणाले, चोखोबा! पत्नीचा योग्य सन्मान ठेवुन सुखाने केलेला संसार म्हणजे एक प्रकारची देवभक्तीच आहे. ही भक्ती करतां करतां पांडुरंगाचे नामस्मरण पण करा. अंतस्फुर्तीने सोयरा पुन्हा नामदेवांच्या पायाशी वाकली. प्रसन्नतेने नामदेवांनी सुखी संसाराचा आशिर्वाद दिला.
चोखोबा सोयराचा विवाह सोवळा मोठ्या उत्सुकतेने व आनंदाने पांडुरंग बघत होता. नामदेव-चोखाची ह्रदयस्पर्शी भेट तो डोळे भरुन बघत होता, चोखोबा सारखा सालस, प्रांजल भक्ताला नामदेवा च्या हाती सोपवुन देव निश्चिंत झाले.
वाजत गाजत वरात चोखोबाच्या दारात आली. उंबरठ्यावरचे माप ओलांडुन लक्ष्मीच्या पावलाने सोयरा चोखोबाच्या घरांत, संसारात, जीवनांत प्रवेशली. दोघांचा संसार सुरु झाला. सोयरा कामाला वाघीन होती. सासर्या च्या मागे लागुन दोन शेळ्या आणवल्या. परसदारी फुलझाडं, भाजीपाला लावला. संसार बहरु लागला. निर्मळा विवाहयोग्य झाली होती. ऐके दिवशी निर्मळा व सोयरा जात्यावर दळण दळीत असतांना सोयराने जनाबाईचा अभंग आपल्या सुस्वरात म्हटल्यावर त्याचे विश्लेषण निर्मळा विचारत होती. दोघींचा संवाद आंत सुरु असतांना चोखा नामदेव घरी आलेत. दोघींचा संवाद ऐकत तिथेच स्तब्ध उभे राहिले. निर्मळाचे प्रश्न संपत नव्हते. शेवटी सोयरा म्हणाली, पुरे आता. .
नामदेवांसारख्या थोर विभूतीला दाराशी ताटकळत उभे रहावे लागल्याने एरवी शांत, समंजस चोखाला राग यायला लागला. याउलट नामदेवांना दोघींचेही विशेषतः जनाबाईच्या अभंगाचे साध्या सोप्या भाषेत सोयराने समजावुन सांगण्याच्या विलक्षण हातोटीचे कौतुक वाटले. चोखोबांसारख्या विठ्ठलानजीक जाऊ पाहणार्या भक्ताला अशी बुध्दीमान बायको मिळाल्याचे समाधान वाटले. दोघे घरांत प्रवेशले. त्यांच्यासाठी फराळाचे घेऊन आलेल्या दोघींनी नामदेवांना वाकुन नमस्कार करुन आंत जाऊ लागल्या तोच नामदेवांनी थांबवले. सोयराच्या समजाऊन सांगण्याच्या पध्दतीचे व निर्मळाच्या चौकसपणाचे कौतुक करीत म्हणाले, चोखोबा! तुम्ही खरोखरच नशीबवान आहांत. तुमची पत्नी या घरची लक्ष्मी तर आहेच पण सरस्वतीचे गुणही तिच्या अंगी आहेत. लक्ष्मी आणि सरस्वतीचे गुण एकत्रीत असणारे फार कमी व्यक्ती असतात. तुमचा संसार आदर्श ठरणार आहे. धन्य ती विठुमाऊली आणि धन्य तिचं भक्तावरील प्रेम! असे म्हणुन म्हणाले
“चोखोबा न लगे सायास जावे वनांतर ।
सुखे येतो घरा नारायणा । । “त्याचबरोबर इथे कुलजाती, वर्ण सारेच अप्रमाण आहे.
“अंतरी निर्मळ, वाचेचा रसाळ
त्याचा गळा, माळ असो नसो । ।
नामदेवाचे बोलणे सर्वच जणं तल्लिनतेने ऐकत होते. नामादेवांसारख्या महान व्यक्तीने कौतुक केल्यामुळे सोयरा संकोचुन गेली. पंढरपूरला परत जातांना नामदेव म्हणाले, पुन्हा मी नक्की येईल असे आश्वासन देऊन ते निघुन गेले. कां कुणास ठावुक, भविष्य सागणार्या त्या साधुत आणि नामदेवांत चोखांना विलक्षण साम्य वाटले.
चोखोबाचा विवाहसोहळा बघत असतांना चोखा संसारात गुरफटुन आपला विसर तर पडणार नाही ना?अशी बारीकशी भीती त्या विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाला वाटली होती, पण आजचा सारा प्रसंग, आधी दोघींचा नंतर नामदेवांचा संवाद ऐकुन आपली भीती निरर्थक असल्याची खात्री पटली. चोखा च्या उत्कट भक्तांतुनच भव्य काम होणार होते, आणि या भव्य कार्यात सोयराचा सहभाग असणार होता.
सावित्री घरी आल्यावर घडलेली सर्व हकिकत ऐकुन तिचा उर अभिमाना ने भरुन आला. आतां सर्वांना निर्मळाच्या लग्नाचे वेध लागले होते. अशातच आषाढी एकादशी आली. नामदेवादी संत मंडळींबरोबर राहण्यासाठी ८-१५ दिवस पंढरपूरला जाणार हे चोखोबांनी आधीच सांगीतले होते. आतुरतेने त्या दिवसाची चोखोबा वाट बघत होते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १५-४-२०२१.
! ! ! संत चोखामेळा ! ! !
भाग – १२.
चोखोबांना नामदेवांचा प्रत्यक्ष सहवास लाभला होता, पण ज्ञानेश्वरादी भावंडे, सावता माळी, नरहरी सोनार, गोरा कुंभार, जनाबाई, सेना न्हावी, परिसा भागवत, विसोबा खेचर हे सगळे विठ्ठला चे निस्सीम भक्त असुन वारकरी संप्रदाया तील मानाची स्थानं मिळवलेले संत होते. या सर्वांचा सहवास, त्यांना बघायला मिळणार, ओळखी होणार म्हणुन चोखा उत्तेजित झाले होते. त्यातही ज्ञानेश्वरादी भावंडांना भेटण्याची उत्सुकता जरा जास्तच होती. ज्ञानदेव नामदेवांचे परात्पर गुरु तर होतेच, पण त्यांच्या भावंडांचा तेजस्वीपणा, ज्ञानाची सखोलता बद्दल नामदेवांकडुन ऐकल्यामुळेच चोखोबा पंढरपूरला जाण्यास उताविळ झाले होते.
सोयरा चोखोबांच्या प्रवासाच्या तयारीला लागली. आषाढी एकादशीला अजुन १५ दिवस अवकाश होता, पण निरातिशय भक्ती असणारे अनेक जणं आतांपासुनच पंढरपूरास जायला लागले ते सर्व गोरोबाकाकांच्या घरी उतरले. चोखोबा पण त्यांच्याचकडे पोहोचले. तिथे नामदेवांशिवाय कुणीच ओळखीचे नव्हते. तेवढ्यात गोरोबाकाका आलेत. ते वयस्क दिसल्यामुळे त्यांच्या पायावर डोके ठेवल्याबरोबर त्यांनी खांद्याला धरुन उभे करुन कोण म्हणुन विचारल्या वर, मी मंगळवेढ्याचा चोखोबा! म्हणजे तुम्हीच कां चोखामेळा?भेटुन खुप आनंद झाला. उच्चवर्णीयांकडुन लाथाडला जाणारि, हाडत हुडत केल्या जाणारा, गावकीची गलिच्छ कामे करण्यासाठीच जन्माला आलेला हा चोखोबा, नामदेवांनी इतरांजवळ उल्लेख करण्याइतका महत्वाचा, आपलासा वाटावा, या विचारा ने चोखोबांच्या मनांत एक आगळी उर्मी जागवली, अंतर्मनात आत्मविश्वास जागृत झाला. या नव्या जाणीवेने चोखोबा अंतर्बाह्य थरारले.
सगळी संतमंडळी जमल्यावर, प्रत्येकाशी चोखोबांची ओळख करुन दिल्यावर, हेच कां चोखामेळा?असं म्हणुन त्यांची विशेष दखल घेत होते, ते पाहुन डोळ्यांतुन अश्रू वाहूं लागले. ते पाहुन गोरोबाकाकांनी चोखोबाला मिठी मारली. चोखोबांच्या डोळ्यांतुन वाहणार्या अश्रूंनी जणूं आपली व्यथा त्या संतासमोर मांडली. काय नव्हते त्यात उच्चवर्णीयांकडून झालेली छीः थूः, इतर समाजाकडून केला गेलेला अपमान, तिरस्कार, अवहेलना, कर्मकांडात गुंतलेल्या समाजाने केवळ जातीपायी त्यांच्यावर केलेले अन्याय, गावांची उचलावी लागणारी घाण आणि अस्पृश्य अस्पृश्य म्हणुन सतत केलेली हेटाळणी, इतक्या वर्षांचा मनात साचलेल्या या सगळ्या भावनांचा कोंडमारा चोखोबां च्या अश्रूतुन वाहत होता. मनांत साठलेला सगळा मळ वाहुन स्वच्छ, पवित्र, मलिनता जाऊन चोखोबा निर्मळ होत होते.
त्यांनी भरुन आलेले मन आवरले. अठरापगड जातीची माणसं तिथं जमली होती, पण सगळे एकमेकांचे सगेसोयरे असल्यासारखे वागत होते. आपणही त्यांच्यातील एक आहोत या भावनेने चोखोबा भारावुन गेले. एवढ्यात एका प्रौढ स्रीसह नामदेव आले. चोखोबां ना पाहुन नामदेव म्हणाले, या संतांच्या मंदियाळीत हे १५ दिवस तुमच्या चिरंतर स्मरणांत राहतील. येत्या २-४ दिवसांत ज्ञानेश्वर माऊलीचेही दर्शन होईल. नामदेव म्हणाले, ह्या जनाबाई! माझी माता, भगिनी कन्या सर्व कांही. पांडुरंगावर यांचा फार मोठा अधिकार आहे. नामदेवांच्या स्तुतीने कांहीशी संकोचुन जनाबाई म्हणाली, चोखोबा! मी या नामदेवाची दासी जनी! या नामदेवांच्या घरची कामे करणे आणि विठ्ठलाची भक्ती एवढेच माझे काम. तीचे प्रेमळ बोलणे ऐकुन त्यांच्या डोळ्यांत आलेले पाणी पाहुन, नामदेव म्हणाले, असे घडोघडी डोळ्यांतुन पाणी काढायचे नाही. या मोठ्या परिवाराकडुन तुम्हाला इतके प्रेम मिळेल की, समाजाने केलेली सारी अवहेलना पुसली जाईल. तुम्ही भगवद् भक्त, वारकरी, भागवत संप्रदायी झालां आहांत. इथे कसलाही भेदभाव, स्पृश्य अस्पृश्य, कसलेही कर्मकांड, शिवाशिवी, विटाळ चांडाळ कांही नाही. मानवतेच्या आणि केवळ मानवतेच्या पायावर अधिष्ठीत असलेलं भगवद् भक्तीचं हे लोकराज्य तुमचं, माझं आपलं सर्वांच आहे. मनांतील सर्व शल्य पुसुन खुल्या दिलाने, मोकळ्या मनानं या परिवारांत सामिल व्हा असे म्हणुन त्यांनी दृढ अलिंगन दिले.
अपमाने त्रस्त, जातीभेदापायी विटाळलेल्या, अवहेलना, अन्यायाने पिचलेला आणि अस्पृश्यपणामुळे नाडलेले चोखोबा, नामदेवांच्या मिठीत बर्फाप्रमाणे वितळुन गेले. आणि उरले फक्त चोख, निर्मळ, पवित्र, स्वच्छ मनाच्या कोर्या पाटीवर वारकरी लिहिलेलं बिरुदावली मोठ्या अभीमानानं मिरवणारे चोखोबा! नामदेवांच्या परीस स्पर्शानं चोखोबांचं सोनं झालं आणि त्यांच्या अवघ्या दुःखाचं, वेदनेचं, व्यथेचं भक्तीरसांत भिजलेलं गाणं होऊन गेलं. ३-४ दिवसांतच या संताच्या मंदियाळीत एकरुप झाले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १५-४-२०२१
! ! ! संत चोखामेळा ! ! !
भाग – १३.
इथे सगळ्या संतांची एकच चुल, सर्वांनी मिळून स्वयंपाक करायचा, सर्वा साठी एकच जेवण असायचे. फावल्या वेळेत विठ्ठलाची भजनं नामस्मरण करीत तल्लीन व्हायचे. प्रत्येक जणं अभंगरचना, तीही अगदी रसाळ, प्रांजल व पारदर्शी, भाषा अगदी सोपी सहज कळेल अशी करत असे. चोखोबा हे सारं निरिक्षण करीत होते. संतमंडळींच्या संगतीत त्यांची भाषा स्वच्छ, शुध्द झाली. एक दिवस सर्व बसले असतां, नामदेवांनी नाममहात्म्य सांगायला सुरुवात केली नी मग गोरोबा, नरहरी सोनार, सेना न्हावी आणि जनाबाईने गोड आवाजांत अभंग म्हटले. हे सर्व ऐकतांना चोखोबा तल्लीन झाले, भान हरपले. नामदेव त्यांना भावसमाधी तुन जागे करत म्हणाले, तुम्हीही सांगा कांही तरी! जनाबाईनेही आग्रह केल्यावर उत्तेजित चोखोबांच्या मनांत खळबळ निर्माण झाली. अनेक कल्पना, भावना, शब्द आतुन उसळी मारुन बाहेर येण्यास धडपडतय असं व्हायला लागलं
मनाची तयारी करुन चोखोबा नामदेवांजवळ येऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवल. त्यांना उठवत नामदेव म्हणाले, चोखोबा! मनातल्या भावना कोंडुन ठेवु नका, शब्दात बांधुन त्यांना बाहेर येऊ द्या. चोखोबांना धाडस आलं. क्षणभर डोळे मिटले. विठुरायाच्या सावळ्या मूर्तीला मिटल्या डोळ्यासमोर आणुन मनोमन नमस्कार केला. मनांत उमटलेला भावनांचा कल्लोळ शब्द रचनेत बांधत तोंडातुन शब्द उमटले. . . . .
“नामापरता मंत्र । नाही त्रिभुवनी ।
पाप ताप नयनी । पडे चित्ता ।
सुलभ सोपे हे । विठोबाचे नाम ।
सकळ साधनांचे मूळ बीज । चोखा म्हणे मज । कांहीच ना कळे! विठ्ठलाचे बळे नाम घेतो । । चोखोबांच्या तोंडुन निघालेला अभंग सगळीजणं स्तब्ध होऊन लक्ष पुर्वक ऐकत होते. नामदेवांना प्रश्न पडला पंढरपूरला पहिल्यांदि भेटलेला, प्रश्नांच्या वादळांत आणि विचारांच्या गोंधळांत सांपडलेला हाच कां तो चोखोबा?इतक्या सगळ्यासमोर आत्मविश्वासाने विठ्ठल नामाचा महिमा ओवीबध्द करुन तेवढ्याच आत्मनिर्भयतेने सांगणारा चोखा म्हणजे विठ्ठलभक्तीच्या सामर्थ्या चा एक प्रांजल आणि सक्षम रुप होतं. चोखोबाचे अभंग संपले. दुसर्याच क्षणी, वाss चोखोबा! पहिल्याच प्रयत्नात एवढी प्रगल्भता? असे उद्गार काढत मंडळींनी टाळ्या वाजवल्या. अश्या कौतुकाची, जिव्हाळ्याची, शाबासकीची त्यांना संवय नव्हती. पोळलेल्या मनावर व शरीरांच्या जखमावर चंदनाचा शिडकाव व्हावा अशी गत त्यांची झाली.
आपण नुसते क्षुद्र चोखा नाही तर आपणही कुणीतरी आहोत. आपला जन्म कांहीतरी करण्यासाठी आहे. कांहीतरी ठळक अस्तित्व आपल्याला आहे आणि नसेल तर ते मिळवायला हवय, अशा विलक्षण विचारांनी, भावनांनी चोखोबाला वेढुन टाकले होते.
आतां चोखा क्षुद्र राहिला नव्हता. संतांच्या मांदियाळीत प्रवेश झाला होता. विठ्ठलभक्तीच्या लोकराज्याच्या भूमीवर चोखोबाच्या आयुष्याला नाट्यमय वळणातुन निर्माण होणार्या महानाट्या ची ही नांदी होती. सर्वांची जेवण झाल्या वर गप्पा मारत बसली असतां, अचानक सच्चिदानंद भटांनी वार्ता आणली, आपल्या गुरुस्थानी असलेले, सगळ्यांचे लाडके ज्ञानेश्वर माऊली आपल्या भावंडा सहित तीन दिवसांच्या मुक्कामी उद्या पंढरपूरास येत असुन आषाढी एकादशी ला चंद्रभागेत स्नान व विठ्ठलदर्शन करुन पुढे जाणार आहे. चोखोबांनी आपल्या मनाच्या गाभार्यात विठ्ठलाशेजारी त्यांना जागा दिली होती. आपल्या ज्ञानाने सर्वांना नामोहरण करणार्या तेजाने सहस्र सूर्यासारखं ज्यांचं अस्तित्व आहे त्या माऊलीला ते भेटणार होते.
ही चारही भावंडे म्हणजे चार वेदच! संताच्या सहवासात त्यांना आत्मभान आलं आणि श्रेष्ठ भक्तांच्या बिरुदावली जवळ चोखोबा हळुहळु मार्गस्थ झाले.
पांडुरंगांनी नामदेवांच्या मदतीने हे सारं घडवुन आणले होते.
आज सार्या पंढरपुरांत सणाचे, उत्सवाचे वातावरण, प्रत्येक दारांंत रांगोळी रेखाटली होती. घरांघरातुन ज्ञानेश्वरांच्या ओव्या ऐकायला येत होत्या. पंढरपूरचं सारं वातावरणच ज्ञानेश्वरमय झाले होते. चोखोबाच्या शरीराचा कण न् कण ज्ञानेश्वरांच्या भेटीसाठी आसुसला होता. आणि ज्ञानोबामाऊली आले! दरवाज्या तुन येत असलेले साक्षात ज्ञानसूर्य! नामदेवांच्या एका हातात ज्ञानोबा व दुसर्या हातात निवृत्ती, पाठोपाठ सोपान देव व परकरी पोरं आदिमाया मुक्ताई दिसले मात्र, चोखोबांच्या सार्या शरीराला, जाणीवांना संवेदनांना जणूं डोळे फुटले. समोरच्याच्या ह्रदयाचा ठाव घेणारे, सगळ्यांना सामावुन घेणारे, तरीही दिलासा देणारे लोभसवाणं व्यक्तीमत्व. . . चोखोबा नखशिखांत न्याहाळत होते. जो तो पाया पडायला धडपडत होता, पण ते कोणालाही चरणावर मस्तक ठेऊ देत नव्हते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १६-४-२०२१.
! ! ! संत चोखामेळा ! !
भाग – १४.
चोखोबा संकोचुन एकटेच एका बाजुला उभे असलेले नामदेवांना दिसले. त्यांनी चोखोबांना हाताशी धरुन ज्ञानदेवां जवळ आणुन त्यांची माहिती सांगीतली. चोखोबांना त्यांच्याजवळ जाण्याचे धाडस होत नव्हते व लांब राहणेही जमत नव्हते. जीव गुदमरल्याने हुंदके देऊन लहान मुलासारखे रडुं लागलेले पाहुन सार्यांनाच वाईट वाटले. नामदेवांनी त्यांचा हात धरुन ज्ञानेश्वरांजवळ आणल्याबरोबर चोखोबा ज्ञानोबांच्या पायाशी कोसळले. ज्ञानेश्वरांना त्यांची अवस्था बघवेना, चोखोबाला खांद्याला धरुन उठवले व अत्यंत आपुलकीने मिठीत घेतले. अंगात दाह होतांना शीतल चंदनाचा शिडकावा व्हावा तसं त्यांना वाटले. ज्ञानेश्वर कितीतरी वेळ मूकपणे अगदी आवेग संपेपर्यंत त्यांच्या पाठीवर हात फिरवत राहिले. कांही वेळाने चोखा शांत, श्रांत, क्लांत झाले. ज्ञानेश्वर म्हणाले, स्वतःला कमी लेखुन वारकर्यांची प्रतिष्ठा कमी करु नका चोखोबा! भागवतधर्म सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे कारण तो भक्ती आणि मानवता या दोन पायावर अधिष्ठित आहे आणि या दोन अधिष्ठांना कोणत्याही जाती धर्मातच काय पण जगात कोठेही आव्हान नाही. तेव्हा स्वतः ला कमी लेखायला लावणारी जाती धर्माची, स्पृश्य-अस्पृश्यची ही जळमटं कोळीष्टकं मनातुन काढुन टाका. पसायदा नांत आम्ही हेच सांगीतलं आहे.
“वर्षत सकल मंडळी
ईश्वर निष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतू भूता । । “
चोखोबा! निदान संतसमागमी असतांना, आपण बहिष्कृत, अस्पृश्य आहोत हे विसरुन जा. आपण क्षणांत सारा समाज बदलू शकत नाही पण आपल्यापुरतं तरी ईश्वरभक्तीत जातपात धर्म आणु नये. समाज म्हणजे तरी काय? समंजस माणसांचा जमाव! समविचारांची अनेक समंजस माणसं एकत्रीत आली की, जातीभेद, स्पृश्य-अस्पृश्यतेपासुन खूप दूर असलेला इश्वरभक्तीचा समाज बनेल आणि आपल्याला असाच भागवत धर्म मानणारा समाज बनवायचा आहे. ज्ञानेश्वरांचा शब्द न् शब्द तिथला प्रत्येक जणं कानांत साठवित, ह्रदयाच्या कुपीत जपून ठेवत होता. चोखोबा त्या वातावरणांत रंगुन गेले त्यांच्यातील एक झाले.
आषाढी एकादशीला सर्व संतासह महाद्वारातुन विठ्ठलाचे दर्शन घेतले. संध्या काळी रसाळ वाणीत अनेक कथा उदाहरणे देऊन नामदेवांचे किर्तन झाले. किर्तन संपले आणि धो धो पावसाला सुरुवात झाली. पण महाद्वारी बसलेल्या चोखोबांना भान नव्हते, जणूं समाधीच लागली होती. नरहरी सोनारांनी त्यांचा हात धरुन जवळपास ओढतच आंत आणले. दुसर्या दिवशी या जिव्हाळ्या च्या गोतावळ्यांतुन, वातावरणातुन घरी परतायचे म्हणुन चोखांना वाईट वाटत होते. त्याचबरोबर इथली सारी हकिकत आईला, सोयराला सांगायला उत्सुकही होते. नामदेव जवळ येऊन म्हणाले, ज्ञानदेवादी भावंडे पहाटेच पुढच्या प्रवासाला निघुन गेले. त्यांनी संदेश दिला की, सगळ्यांनी आपापल्या कुवतीप्रमाणे भागवतधर्म वाढवायचा आहे, तुमच्या साठी विशेष सांगीतले आहे, “जन्म जरी परमेश्वराधिन असला तरी कर्म माणसा च्या हाती आहेत. मिळालेला जन्म सत्कारणी लागला. बोलणे संपले आणि विठुरायाचा गजर सुरु झाला.
चोखोबांना निरोप देतांना नामदेव म्हणाले, मनांतील भावना कोंडुन न ठेवता अभंग रचना करुन बाहेर येऊ देत. पंढरपूर हीच तुमची कर्मभूमी आहे एवढं लक्षांत असु द्यात. चोखोबांनी त्यांना नमस्कार करुन पाठ फिरवुन झपाझप चालु लागले. मंगळवेढ्याच्या वाटेवर चालतांना आईला व सोयराला काय काय सांगायचे ते मनसुबे मनात बांधत होते, निरोप घेतेवेळी नामदेवांनी उच्चारलेले शब्द राहुन राहुन कानात घुमत होते. चोखोबा! पंढरपूर हीच तुमची कर्मभूमी! माझी कर्मभूमी?म्हणजे नक्की काय? त्यांना नेमकं काय सांगायचे, सुचवायचे होते?
म्हणजे आतां मी काय करायच? मनाच्या कोर्या पाटीवर “वारकरी”अक्षरं लिहुन भागवत धर्माचा नुकताच पुरस्कार केलेल्या चोखोबाच्या मनात नामदेवांच्या शेवटच्या वाक्यानं पुन्हा प्रश्नाचं वादळ उभं राहिलं. माझी कर्मभूमी पढरपूर तर मंगळवेढ्याला नीट बसलेली घडी परत विस्कटावी कां?घरचे तयार होतील का? नामदेवांनी त्यांच्या डोक्यात बारीकशी अळी सोडल्याने त्या अळीचा अजगर होऊन त्यांची विचारशक्तीच गिळंंकृत करुं पाहत होता. पायाखालची वाट सरावाची असल्यामुळे विचाराच्या तंद्रीत अचुक मंगळवेढ्यात घरी येऊन पोहचले.
निवांत झाल्यावर, सुदामा, सावित्री, निर्मळा, सोयरा पंढरपूरचे अनुभव ऐकायला उत्सुकतेने चोखोबाभोवती बसले आणि त्यांनी बांध फुटल्यागत धबधब्यासारखे, उत्सफुर्त सुचलेली अभंग रचना. . सगळं सगळं सांगत होते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १६-४-२०२१.
! ! ! संत चोखामेळा ! ! !
भाग – १५.
पंढरपूरचे सारे सारे अनुभव, घटना सांगुन झाल्यावर, निघतेवेळी नामदेवांनी म्हटलेले “पंढरपूर हीच तुझी कर्मभूमी” याचे उत्तर त्यांना सांपडत नसल्यामुळे त्यांची केविलवाणी स्थिती पाहुन, सुदामा म्हणाले, त्यात काय अवघड?अरे! पुढच्या आयुष्यातील तुझं कामकाज तू पंढरपूर ला राहुन करायचय! ज्यामुळे चोखा चिंतेत पडले होते त्याचे उत्तर सुदामाने दिले. एकाबाजुने सुतासारखा सुखाने सरळ चालणारा संसार आणि दुसर्या बाजुने विठ्ठलभक्तीने व्यापलेले जग! कशाची निवड, स्विकार करावा?या ओढाताणीत इतके बुडुन गेले की, शेजारी झोपलेली सोयरा कांही अपेक्षेने त्यांच्या कडे पाहते आहे, याचेही त्यांना भान नव्हते.
चोखोबा पंढरपूरला येऊन संत मंडळींच्या स्नेहरज्जूत गुरफटुन त्यांच्या तीलच एक झालेला पाहुन विठ्ठल समाधान पावला. श्रेष्ठ भक्तांच्या रांगेत चढुन बसण्यासाठी सोपानची पहिली पायरी चोखोबा चढले होते. डोक्यांत उठलेल्या प्रश्नांचा गुंता आणि विचारांचा गोंधळ घेऊनच चोखोबा आपल्या दैनंदिन कामाला लागले. पण मन थार्या वर नसल्यामुळे नेहमी बिनचुक कामे करणार्या त्यांचे हातुन सर्वच कामात चुका होऊ लागल्या. ते अस्वस्थ ते अस्वस्थच राहिले. हा गुंता सोडवण्या साठी एकच व्यक्ती योग्य होती, ती म्हणजे नामदेव! सध्या तेही शक्य नव्हते. ते ज्ञानेश्वर माऊलीसोबत तीर्थयात्रेला गेले होते. त्यांचे कशातच मन लागत नव्हते. त्यांची घायाळ, विकल अवस्था कोणाला च बघवेना, पण इलाजही नव्हता.
चोखोबा अशाच विषण्ण मनःस्थितीत बसले असतां, एकदम त्यांना नामदेवांचे वाक्य आठवले. ते म्हणाले होते, चोखोबा! मनांत शंका किंवा प्रश्न उद्भवला तर, त्या प्रश्नांची उत्तरे बर्याच अंशी आपल्या मनांतच दडलेले असते. ते फक्त शोधायची असतात. अर्थात कांही प्रश्न असे असतात की, त्यांची उत्तरे आपल्याला सांपडत नाही ती उत्तरे एक तर जेष्ठाकडुन आणि तेही शक्य नसले तर प्रत्यक्ष पांडुरंगाकडुन मिळवायची असतात. कारण तो वीटेवर उभा असलेला विठ्ठल आहे ना तो सर्वसाक्षी, सर्वज्ञ आहे. तो सारं जाणुन असतो. नामदेवांचे हे बोलणे आठवले आणि चोखोबांना एकदम हुरुप आला. चेहरा उजळला. पण पांडुरंगासमोर पोहचायच कसं? इतके दिवस नीट जेवण न केलेले चोखोबा त्या दिवशि मन लावुन जेवले. सावित्री सोयराच्या चेहर्यावर समाधान पसरले. मनांतील विचारांचा गोधळ पांडुरंगावर सोपवुन त्यांना शांत झोप लागली.
दुसर्या दिवशी उठले, तेच मुळी उत्साहाने, मनात निश्चय पक्का झाल्याने आजची सारी कामेही बिनचुक झाली. स्वअस्तित्वाची जाणीव झालेले, विचारां ची दिशा हरवलेले घायाळ चोखोबा लुप्त होऊन, एका नव्या आत्म विश्वासाने वावरणारे, मनाशी केलेला निश्चय, ध्येय पूर्ण करणे, पांडुरंगाकडुन उत्तरं मिळण्या साठी त्याला भेटुन त्याचे दर्शन घ्यायला सिध्द झाले. कामे आटोपुन संध्याकाळी घरी येऊन स्वच्छ आंघोळ केली. व कुणाला कांहीही न सांगता बाहेर पडलेले चोखोबा थेट विठ्ठलमंदिराजवळ आले. पायरीजवळ उभे राहुन विठ्ठलमूर्तीला मनोमन नमस्कार केला. आणि झपाटल्या सारखे कुणाचीही पर्वा न करतां झपाझप पायर्या चढुन विलक्षण तळमळीने, वेडे झालेले अस्पृश्य, भोवती वावरणार्या वर्ण भेदी समाजाची पर्वा न करतां भारल्या, पछाडल्या सारखे विठ्ठलाच्या मूर्तीसमोर जाऊन उभे राहिलेत. एकच क्षण! त्यांनी निमिषात सावळ्या विठ्ठलाला नखशिखां त नाहाळत असतांना पुजार्याचे लक्ष चोखोबाकडे जातांच आरडा ओरडा करुन एकच गल्ला केला. मंदिरभर दंगा उसळला. दुसर्याच क्षणी चोखोबावर शेकडो हात पडले.
लोकांनी मारले तुडवले, लाथाडले, फरफटत आणतांनाही लाथाबुक्यांनी तुडवत, मारत, शिव्यांची लाखोली वाहत, नाकातोंडात, डोळ्यात माती घालत, वरुन ढकलुन दिले. चोखोबांचे सारे अंग रक्ताळले, ठेचाळले, काळेनिळे पडले होते.
आतां तर लोकांनी लाठ्या काठ्यांनी मारायला सुरुवात केली होती. जखमी, रक्तबंबाळ चोखोबा गुरासारखे ओरडत होते पण लोकांना दया नाही आली. त्याच्या किंचाळण्याची, वाहणार्या रक्ताची ना त्यांच्या जीविताची पर्वा होती, त्यांना चिंता होती फक्त मंदिराच्या पावित्र्याची, पांडुरंगाच्या शुचिर्भूततेची, परमेश्वर एकच आहे तो सर्वात वसलेला आहे असे टाहो फोडुन सांगणार्या ज्ञानोबांचे अभंग ज्यांच्या ओठावर घोळत होते, ते प्रत्येक हात चोखोबावर पडत होते, घाव घालत होते आणि भक्तांचा सखा, कणवाळु विठोबा कमरेवर हात ठेवुन हा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहत होता.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.


