
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
संत चोखामेळा संपूर्ण चरित्र ! !
! ! ! संत चोखामेळा ! !
भाग – ३६.
चोखोबा कांगावा करत सोयरावर ओरडत म्हणाले, अग देव चोखाच्या घरी आला ही गोष्ट बडव्यांना कळेल आणि परत बक्षीस म्हणुन आसुडांचे फटके बसतील. त्यांच्या प्रत्येक शब्दातील मनो व्यथा प्रगट होत होती. ही गोष्ट षटकर्णी होणारच होती, कारण विष्णू गुरव तिथून जात असतांना ऐकले. बोलण्यातील तिव्रता पाहुन गुरवला राग आला आणि पुढे होऊन चोखोबाच्या मुस्काटात मारली अरे! देवावर कशाला हात उगारलास? चोखोबाला वेड लागले असावे असे वाटुन तो निघुन गेला. चोखोबाने बघीतले तर देवही नाही. देव पोटभर जेवला नाही याचे त्याला अतोनात दुःख झाले. कित्येक दिवस त्यांनी सोयराशी अबोला धरला.
विष्णुगुरवने ही गोष्ट बंडा गुरवला सांगीतली. संध्याकाळी सायंआरती करण्यास विष्णु गुरव मंदिरात गेल्यावर, पंचारती करण्यासाठी हात पुढे केला तर, हाताची बोटे चिकटली असुन उजवा हात कडक झालेला. घाबरुन देवाची विनवणी करत देवाच्या पायावर डोक टेकवण्या साठी खाली वाकला तर, देवाच्या पिताबरावर चांगला मोठा दह्याचा डाग पडलेला दिसला. आपण तर देवाची स्वच्छ आंघोळ घालुन स्वच्छ पितांबर घातले होते, मग हा दह्याचा डाग?तेवढ्या त बंड्या गुरव आला. हा संचित होऊन बसलेला व हात लाकडासारखा झालेला दाखवला, पण त्याची मस्करी करुन त्याला विचारापासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला आठवले, जेव्हा आपण चोखोबाला मारायला गेलो, तर त्याच्या म्हणण्यानुसार देवाला लागले, म्हणजे खरच मी देवाला. . . . विष्णु हबकला. देवाच्या पायाशी बसुन हुंदके देत म्हणाला देवा! तुझा खरा भक्त चोखोबा! मला माफ कर. मी त्याची माफी मागतो पण माझा हात पुर्ववत कर देवा! आणि काय आश्चर्य हात पुर्ववत झाला.
विष्णू गुरवाच्या बाबतीतील प्रसंग षटकर्णी झालाच. समाजाने बहीष्कृत केलेला चोखोबा एकांतवासात कित्येक वर्षे केवळ विठ्ठलभक्तीच्या आधाराने राहत असल्यामुळे, पाहण्याचा दृष्टीकोन बदलला होता. थंडी वारा, ऊन पाऊस कशाचीही पर्वा न करतां एकटाच अविरत दीपमाळ बांधण्याचे काम संपत आले होते. येत्या कार्तिक एकादशीला दीपमाळ दिव्यांच्या रोषनाईने टाकायचा चोखोबाचा मानस होता. चोखोबांचे कर्तृत्व लोकांना दिसणार होते. खरं म्हणजे चोखोबा आतां थकले होते, मोठा झालेल्या कर्ममेळाची मदत होत होती. कार्तिक एकादशीला दीपमाळ लखलखलीच पाहिजे या एकाच ओढीने रात्रंदिवस राबत होते.
कार्तिक शुध्द दशमीला रात्रभर राबुन दीपमाळेच्या सर्व हातावर तेलवाती टाकुन पणत्या ठेवुन झाल्या. रात्रीच्या तिसर्या प्रहरी शुचिर्भूत होऊन त्यांनी बनवलेल्या विठोबाच्या मूर्तीची मनोभावे पुजा व आभार मानुन विठ्ठलनामाचा जय घोष करीत सगळ्या पणत्या पेटवल्या. क्षणार्धात सारा आसमंत प्रकाशाने उजळुन निघाला. चंद्रभागेच्या पाण्यावर उठणार्या तरंगामध्ये पणत्यांची लक्षा वधी प्रतिबिंबे हिंदकळुन परावर्तित झाली दोन्ही काठ लख्ख उजळून निघाले. कार्तिक एकादशीनिमित्य अवघं पंढरपूर स्नानासाठी चंद्रभागेच्या काठावर जमलं होत. पुजारी विठ्ठलमंदिराची सजावट करीत होते.
आज विठ्ठलाच्या महापुजेसाठी यादवांचा सरदार येणार होता. यवनीराज्य असलं तरी या सरदाचे पंढरपूरला संरक्षण होते. असा सर्व गोंधळ चालु असतांना एकाएकी आकाश उजळुन निघाले. खरंतर सूर्य उगवायला बराच अवकाश होता. आश्चर्याने लोकांनी चंद्रभागेकडे बघीतले तर, चंद्रभागेच पाणी तर लखलखत होतच पण पलिकड च्या तीरावर अंगभर पणत्यांचं प्रकाश मंडल लेवुन लखलखणार्या दोन दीप माळा उभ्या दिसल्या. पुजा बांधण्याआधी च सावळीमूर्तीच्या चेहर्यावर विलक्षण हास्य विलसत होते. काय नव्हते त्या हास्यात?समाधान, विजयाचा कैफ, लाडक्या भक्ताबद्दलचा ओसंडुन वाहणारा अभिमान, संकल्प सिध्दीस गेल्याबद्दलचा आनंद आणि चिकाटीने पुर्ण केल्याबद्दलचे कौतुक. .
उजळलेली दीपमाळ बघुन सगळ्यां ना प्रश्न पडला की, अचानक ह्या दीपमाळा आल्या कुठुन?कुणी?केव्हा बांधल्या?मंदिर या तीरावर असतांना पलीकडच्या तीरावर कां बांधल्या?आणि सर्वांचीच खात्री पटली हे काम चोखोबाचेच! चोखोबांचे गुणगाण गायल्या जाऊं लागले. आणि चोखोबा? ते तृप्ती अनुभवत होते. वर्षानुवर्षे उरी जपलेले स्वप्न, ध्येय, संकल्पना सिध्दीस गेली होती. चोखोबा कांहीतरी लोकोत्तर कार्य करा हा नामदेवांचा विश्वास सार्थ ठरवला होता. चोखोबा धन्य, कृतार्थ झाले होते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २१-४-२०२१.
! ! ! संत चोखामेळा ! ! !
भाग – ३७.
दीपमाळेवरील तेवणार्या ज्योती कडे चोखोबा एकटक बघत असतांना डोळे भरुन आले, दीपमाळेच्या प्रत्येक पणतीत त्यांना सोयराचा चेहरा दिसत होता. सोयरा?संसाराचा खस्ता खाणारी, सर्वस्वाने साथ देणारी, दीपमाळेवरील पणत्यांसाठी तेलाची साठवणुक करणारी दीपमाळ बांधुन पुर्ण होण्याआधीच तीने जगाचा व चोखाचा कायमचा निरोप घेतला. त्यारात्री झोपतांना म्हणाली होती, धनी! महाएकादशी दोन महिन्यावर आली त्याआधी सगळ्या पणत्या तयार व्हायला हव्यात. कार्तिकएकादशीला जेव्हा ह्या दीपमाळ उजळतील, तेव्हा पंढरपूरांतील लोकांचे डोळे दिपून जातील. सोयरा बोलत होती, पणत्यांचे तेज त्याच दिवशी तिच्या डोळ्यात लखलखत होते. दीप माळेचे स्वप्न बघणारी सोयरा त्या रात्री निजली ती कायमचीच! रात्रीच कधीतरी तिचे प्राण विठ्ठलाच्या पायाशी विलीन झाले होते. चोखोबांच्या दुःखाला पारावार राहिला नाही.
६५-७० वर्षाच्या संसारात चोखोबाला तिची संजीवनी साथ होती. तिच्या अचेतन चेहर्याकडे बघतांना चोखोबाला तिची अनेक रुप आठवत होती. परकरी सोयरा, लग्नानंतर अल्लड पणे वावरणारी, सावित्रीच्या हाताखाली शिकणारी, निर्मळला बहिण मानणारी, चोखांवर आलेल्या लहान मोठ्या वाईट प्रसंगात समर्थपणे साथ देणारी, एका शब्दाखातर नीट मांडलेला संसार मोडुन त्यांच्याबरोबर पंढरपूरला येणारी, त्यांना शिक्षा झाल्यावर धाय मोकलुन रडणारी, देवाचा धावा करणारी! हद्दपारीची शिक्षा झाल्यावर चंद्रभागेच्या तीरावर त्यांच्या सोबत येऊन राहणारी, त्याही परिस्थितीत चार घरची कामे करणारी, जीला प्रत्यक्ष नामदेवांनी सरस्वती म्हटलं तो अभंग रचना करणारी सोयरा! एक ना दोन, चोखोबांना तिच्या मिटल्या डोळ्यांंकडे पाहुन अनेक रुपं आठवत होते.
संसारातल्या कोणत्याच कर्तव्याला चुकली नव्हती. नात्यातीलच मुलगी बघुन कर्ममेळाचे लग्न लावुन, त्यांच्या गावातील जुन्या घरांत त्यांचा संसारही थाटुन दिला होता. अशा प्रकारे स्वतः व चोखोबाला प्रापंचिक कर्तव्या पासुन मुक्त करुन पतीभक्ती आणि चोखोबाच्या विठ्ठलभक्तीचा मार्ग तीने सोपा केला. शेवटपर्यंत साथ देण्याचे कबुल करुनही एकटीच महाप्रवासाला निघुन गेली होती. आता चोखोबा एकटा, अगदी एकटा होता.
पण चोखोबाला थांबुन चालणार नव्हतं. कार्तिकी एकादशीला दीपमाळ लखलखलीच पाहिजे ही इच्छा मनी घेऊनच तीने प्राण सोडला होता. त्यांना संकल्प तर पूर्ण करायचा होताच, पण आतां त्या संकल्पाला सोयराच्या अंतिम इच्छेचे स्वरुप प्राप्त झाले होते. आज कार्तिक एकादशीला लखलखणार्या दीपमाळा बघून तिच्या वचनातुन मुक्त झाले. डोळे पुन्हा पुन्हा भरुन येत होते. सोयराच्या वियोगाचे दुःख तर होतेच पण त्याचबरोबर वचनतुर्तीचा आनंद त्या अश्रूतुन वाहत होता. ते दीपमाळा बघत सोयराच्या आठवणीत दंग होते.
सोयरा गेली, योजलेला संकल्प सिध्दीस गेला. आतां त्यांनी स्वतःला त्या खोपटात एकट्याला विठ्ठलभक्तीत झोकुन दिले होते. नामस्मरणाबरोबरच अभंगरचना करणे हेच जीवितमर्म बनवले होते. सावलीसारखा सोबत राहणारा अनंतभट अनेक विषयांना स्पर्श केलेली अभंगरचनेचा शब्द नी शब्द कागदावर उतरवत असे.
दैनंदिन कामात कितीही गुंतववुन घेतले तरी सोयराची उणीव जागोजागी जाणवत होती. दीपमाळ बांधुन झाल्या वर आपले जीवितकार्य संपत आल्याची भावना निर्माण झाल्याने विठ्ठलाने आपल्या चरणाशी जागा द्यावी असे वाटत असतांनाच, नामदेवांची आतुरतेने वाट बघत होते. आणि प्रतिक्षेला फळ आले. एकदाचे चोखोबाला भेटायला नामदेव आले. त्यांना समोर बघताच अश्रूंचा बांध फुटला. ते नसतांना सोसलेले आघात, अचानक निघून गेलेली सोयरा, दीपमाळेचा पूर्ण झालेला संकल्प सारे सारे भरभरुन त्यांनी नामदेवांना सांगीतले. नामदेव निःशब्द त्यांच्या पाठी वरुन हात फिरवत होते
नामदेव तीर्थयात्रेला गेल्यावर इकडे बरेच कांही घडले होते. संतमंडळीं पैकी बरेचजण अनंतात विलिन झाले होते. एकापाठोपाठ एक चोखोबांचे मानसिक आधार तुटत गेले. मराठी सारस्वताची हानी झाली ती वेगळीच! गोरोबाकाकांचा आणि सोयराचा मृत्यु चोखोबांनी मनाला फारच लावुन घेतला होता. देवा! तुम्ही विठ्ठलाचे निस्सीम भक्त ना?आतां मी थकलोय. सगळे सगे सोयरे सोडुन गेले. योजलेले संंकल्प पूर्ण झालेत. मनांत कोणताही किंतू किल्मिष उरले नाही. माऊलीसारखी संजीवन समाधी घेण्याचे धैर्य, पात्रता नाही. पुरे आतां आयुष्य! माझ्यासाठी विठ्ठलाला विनंती करा. म्हणावं या चोखोबाला चरणाशी जागा द्या.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २१-४-२०२१. .
! ! ! संत चोखामेळा ! !
भाग – ३८.
चोखोबा कळवळुन नामदेवांना विनवित होते. देवा! मी अडाणी, अजान या शिष्याची आस, हट्ट म्हणा हवं तर, पण पूर्ण कराच. तुम्हीच हाताला धरुन या जीवनमार्गावर आणले. आतां शेवटच्या मुक्कामापर्यंत तुम्हीच पोहचवा. त्यांची अवस्था पाहुन नामदेवांचे मन भरुन आले. अस्वस्थ मनाने नामदेव घरी परतले
मन मोकळे केल्याने चोखोबांना हलके हलके वाटले. विठ्ठलनामस्मरणांत ते इतके तल्लीन झाले की, मध्यरात्र झाली तेव्हा भानावर आले. बाहेर येऊन दीपमाळेवरील पणत्या पेटवल्या. हा त्यांचा रोजचाच परिपाठ झाला होता. लोकं स्वतःहुन तेल आणु लागले. रोजच चंद्रभागेचा काठ उजळायला लागला. चोखोबाच्या दीपमाळेचे कौतुक सर्वीकडे होऊ लागले.
आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता झाली या विचारांकडे चोखोबांचा कल झुकु लागला. विठ्ठलाचे स्मरण, पुजा, अभंगरचना, भल्या पहाटे दीपमाळ लावणे हेच जीवनाचे उद्दीष्ट राहिले होते. मात्र त्यांच्या एकांतवासात नामदेवांच्या सांगण्यावरुन व चोखोबांचा भोळा भाबडा, प्रांजल स्वभाव, उत्कट विठ्ठल भक्ती, अभंगरचनेतील त्यांचे सातत्य, शब्दांचे सौंदर्य आणि सामर्थ्य हे सर्व पाहुन अनंत भट सुरुवातीपासुन सावली सारखे त्यांच्या सोबत असे. त्याला संकोची लाजरेबुजरे, भावगर्भ अभंग रचना करणार्या चोखोबांचे नेहमीच कौतुक वाटत असे. म्हणुनच त्यांनी एक कौतुक करायचे ठरवले.
विठ्ठलमंदिरासमोर राहत असलेल्या घराच्या पडवीत नामदेव परिवारासह बसले होते. रजाई, गोणाई, मुलबाळं आणि जनाई सुध्दा. एवढ्यात अनंतभट भेटीला आलेले पाहुन त्यांना आश्चर्य वाटले. कांही अंतरावर संकोचुन चोखोबा उभे असलेले पाहुन त्यांना जवळ बोलावले व मिठीत घेतले. अलभ्य लाभ! काय विशेष
अनंतभटांनी काखेत धरलेली चोपडी नामदेवांसमोर धरुन म्हणाले, देवा! ही चोपडी म्हणजे विठ्ठलकृपेचा सगुन अविष्कार, भक्तीचा महिमा किती अगाध आहे याचा हा पुरावा. . नामदेवांच्या कांहीच लक्षात येईना. काय आहे हे?देवा! ही चोपडी म्हणजे चोखोबांनी रचलेले अभंग आहेत. त्यांच्या तोंडुन उमटलेला प्रत्येक शब्द यात उतरवुन घेतला आहे. माझ्या अल्पमतीने थोडीफार दुरुस्तीही केली आहे. चोखोबांच्या उत्स्फुर्त प्रतिभेचा अविष्कार ती चोपडी नामदेवां च्या हाती दिली. नामदेवांच्या चेहर्यावर एक वेगळीच अनुभुती, कांहीतरी अद्भुत बघत असल्याचे भाव उमटले. अतिशय आदराने चोपडीतील एक एक पान उलगडुन बघतांना त्यांच्या चेहर्यावरुन आपल्या शिष्याबद्दलचा अभिमान ओसंडुन वाहुं लागला. वाss अनंतभट वा अतिशय अप्रतिम कामगिरी केलीत. वारकरी संप्रदाय व इतिहास नेहमीच तुमचा ऋणी राहिल. चोखोबांच्या उच्चाराला, विचाराला, वाणीला, भावनेला व भक्तिला अस्तित्व दिलेत. तुमचे हे कार्य युगानुयुगे स्मरणांत राहील आणि चोखोबासुध्दा चिरंतर स्मरणांत राहिल. मनुष्यप्राणी नश्वर, अशाश्वत आहे, पण किर्ती मात्र कायम असते. नामदेवांकडुन अशी शाबासकीची पावती मिळाल्यावर अनंतभटांना केलेल्या कामाचे सार्थक, चीज झालेसे वाटले. एवढ्यात आंतुन जेवण तयार असल्याचा निरोप आला. अतिशय संकोचाने चोखोबा नामदेवांच्या पंगतीला बसले.
चोखोबांच्या निरवानिरवीच्या भाषेने विठोबा अस्वस्थ झाला. चोखोबां च्या मृत्युची कल्पनाच त्याला सहन होत नव्हती. चोखोबा चिरंतर लोकांच्या स्मरणात रहावा, नांव किर्ती, अस्तित्व अजरामर व्हावे, यासाठी काय योजना करावी याचा विठोबा विचार करु लागला
नामदेवांकडे मिष्टांन्नाचे जेवण झाले त्यांनी केलेल्या कौतुकाने आपले जीवन सार्थकी लागले ही भावना घेऊन चोखोबा घरी परतले. डोळे पैलतीरी लागलेल्या या भागवद्भक्ताला आणखी काय हवे होते?आजपर्यंत आपल्याला अस्पृश्य जातीत जन्माला घातले म्हणुन तक्रार करणार्या चोखोबांची उतारवयात धारणा बदलली. आपण या जातीत जन्मल्यामुळे आपल्या उत्कट भक्तीला, अभंगरचनेला, नामस्मरणाला लोक विलक्षणतेची अलौकिक परमार्थाची, अपुर्व भक्तीची व कालातीत अभंगभक्ती ची जी डूब मिळाली ती कदाचित ती उच्च वर्ण जातीत जन्मलो असतो तर लाभली नसती. म्हणुनच या अस्पृश्य जातीत जन्माल घातल्याबद्दल त्याचे उपकारच आहे. यामुळेच हा चोखामहार युगायुगात शाश्वत अमर झाले.
येसकर म्हणजे वेसकर. गावा बाहेरील वेस, वेशीवरचे बुरुज, तटबंदी, तटबंदीतील, चोरदरवाजे, वेशीचे पक्के बांधकाम व त्यातील टेहाळणीचे भोके हे सगळे बांधकाम करण्यांत येसकर जमातीचा हातखंडा होता. बांधलेली दीप माळ ही त्याची साक्ष होती.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २१-४-२०२१.
! ! ! संत चखामेळा ! ! !
भाग – ३९.
चोखोबांचे सर्व संकल्प सिध्दीस गेले होते. आता फक्त “त्याच्या” बोलावण्याची वाट बघत होते. अशातच मंगळवेढ्याच्या गांवकुसाबाहेर वेशीची भींत, व बुरुज बांधण्यासाठी सर्व येसकरां नी जमावे, त्यातुन २-४ वर्षांची मुले, आजारी किंवा म्हातारी या कोणालाही सवलत नव्हती. या सर्वांनी सरदाराला भेटण्याचा हुकुम निघाला. चोखोबाला सुध्दा जाणे भाग होते.
खरं तर लटपटत्या पायाने व थरथरत्या हाताने चोखोबा काय करुं शकणार होता, पण राज्यकर्त्यापुढे असले प्रश्न विचारायचे नसतात. चोखोबांनी जाण्याची तयारी केली. दोन वर्षे बांधकाम चालणार, त्यामुळे दोन वर्षासाठी लागणारे सामान बांधुन बाकीचे कर्ममेळा ला न्यायला सांगीतले. त्यांनी जाण्याची सिध्दता केली खरी, पण कां कोण जाणे त्यांना विचित्रशी भीती, शंकांचे वादळ, विचारांचे काहूर माजले होते. वेदनेने ओथंबलेला अस्वस्थपणा सार्या शरीर भर पसरला होता. हद्दपारीच्या वेळीही असे वाटले नव्हते. जाणे तर भाग होते.
जाण्यापुर्वी नामदेवांच्या भेटीस गेले असतां त्याच्या चेहर्यावरील व्याकुळता पाहुन, नामदेवांनी विचारले, तुम्ही असे घायाळ कां?ही बहुधा आपली शेवटची भेट असावी. शेवट पंढरपूरांत व्हावा अशी फार इच्छा होती, पण. . .
देवा! या शिष्याची एक विनंती आहे, नव्हे हट्ट आहे. या दोन वर्षात जर मंगळवेढ्यात माझा मृत्यु झाला तर, जसे मंगळवेढ्यात उकीरड्यात पडलेल्या या चोख्याला उचलुन पंढरपुरी आणुन आयुष्याची दिशा बदलवली, तसेच यावेळीही माझ्या आयुष्याचे कांही बरे वाईट झाले तर, मातीत पडलेल्या या चोख्याला पंढरपुरी घेऊन यावे. नामदेवां नी गहिवरुन नुसत्या स्पर्शाने आश्वासन दिले. शांत होऊन चोखोबा घरी परतले. दुसर्या दिवशी तुकडीबरोबर अनंत आठवणींची शिदोरी घेऊन मंगळवेढ्यास रवाना झाले
मंगळवेढ्याच्या प्रवासाची दगदग चोखोबांना सोसली नाही. ते आजारी पडले. पण आजाराचे कौतुक करायलाही त्यांना वेळ मिळाला नाही. यावनी आक्रमणाला तोंड देण्यासाठी गांवाबाहेरी ल वेशी संरक्षीत करण्यासाठी तटबंदी बांधण्यासाठी १०० मजुर आणण्यात आले होते. त्यातले बरेचसे पंढरपुर परिसरातले असल्यामुळे ते चोखोबांना ओळखत होते. चोखोबांचे कार्य आणि नांव गाजलेले असल्यामुळे सर्वजण त्यांना मान देत असत. त्यांच्या वयाचा व कार्याचा मोठेपणामुळे खड्डे खणने, घमेले उचलणे सारखी कष्टाची कामे त्यांना कुणी करुं देत नसत. तरीही विठ्ठलाचे नामस्मरण करत दिवसभर कामं करीत राही. संध्याकाळी कामं आटोपल्यावर मात्र, पंढरपूरच्या आठवणी, विठ्ठलमंदिर, नामदेव, खोपटे, दीपमाळ, विशेषतः पांडुरंगाचा वियोग सारे आठवत, जाणवत असे. आणि मग पांडुरंगाच्या वियोगाने दुःखी झालेल्या वेदना अभंगरचनेतुन बोलक्या व्हायच्या. ते भजन गायला लागले की, मजुर अगदी तल्लीन होत असे. असेच चार महिने उलटले, त्या मजुरांमधे गोविंद नावाचा मजुर होता. त्याला २-३ वर्षाचा मुलगा होता. तो सतत चोखोबांच्या मागेपुढे करायचा. त्या बाळात त्यांना गोपालकृष्ण दिसायचा.
ज्या बुरुजाचे काम सुरु होते, त्यात एक गुप्त दरवाजा ठेवायचं अत्यंत जोखमीचं व गुप्ततेचे काम होतं. त्यासाठी चोखोबा व त्यांच्याचसारखी इतर वयस्क अनुभवी मंडळींना सरदाराने बोलावुन हुकुम सोडला, तुम्ही चारजणां मिळुन येत्या चोवीस तासात अविरत हे काम पुर्ण करायचे. चौघेही वयस्कर असल्या मुळे पुर्तता होणे अवघड होते, पण हुकमापुढे इलाज नव्हता. पण चोखोबांचा विठ्ठलावर भरवसा होता. दुसर्या दिवशी चौघेही बुरुजातल्या गुप्त दाराच्या कामास लागले. रात्र झाली तरी काम आटपत नव्हते. चौघांनाही विश्रांतीची अत्यंत आवश्यकता होती, काम थांबवुन भाकरतुकडा खाल्ला. अजुन बरेच काम बाकी असलेल्या कामाबद्दल चर्चा करीत होते. उरलेले काम येणार्या रात्रीत पूर्ण करायचे होते. काम पुर्ण झाले तर मोठे बक्षीस, अर्धवट राहिले तर देहदंडाची शिक्षा! प्रसंग मोठा बाका होता. शरीर व मन अतिशय थकल्यामुळे त्यांना कांही कळायच्या आंतच गाढ निद्रा लागली. जागेपणाची जाणीव हरपण्यापुर्वी चोखोबाने विठ्ठलाला साकडे घातले. आतां तारणारा, मारणारा तूंच आहे विठुराया! आणि त्यांचे भान हरपले. मध्य रात्र उलटुन गेली. मजुरवस्तीतील गोविंद लघुशंकेसाठी उठला असतां, बुरुजाच्या भिंतीच्या बांधकामाच्या ठीकाणावरुन आवाज ऐकु आल्याने, कुतुहलापोटी पुढे जाऊन बघीतले तर, चांदण्याच्या प्रकाशात चोखोबा एककटेच बुरुजाच्या भिंतीचे बांधकाम करीत असलेले दिसले. त्यांना २-३ हाका मारल्या पण ते इतके कामात मग्न होते की, त्यांना हाका ऐकुच आल्या नाहीत. मग गोविंदाने नाद सोडला व झोपायला गेले. दुसरा दिवस उडाडला तोच मुळी एक विलक्षण प्रश्न घेऊनच!
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २१-४-२०२१.
! ! ! संत चोखामेळा ! ! !
भाग – ४०.
थकुनभागुन रात्री झोपलेल्या चौघांनाही जाग आली ती सकाळी सूर्य उगवल्यानंतरच! त्यांच्या सर्व जाणीवा जागृत झाल्या आणि खडबडुन उठले. अंगाचा थरकाप झाला. मृत्युदंड डोळ्या समोर नाचु लागला. कोण कुणाचे सांत्वन करणार?चोखोबा मृत्युला घाबरत नव्हते.
पण आपल्या बेसावधपणामुळे, त्याच्या लाडक्या भक्तामुळे विठ्ठलाला लाच्छंन लागणार, किटाळ येणार हे मृत्युदंडापेक्षा जास्तच दुःखद होते. संचित मुद्रेने चौघेही शिक्षा सांगायला येणार्या सैनिकांची वाट बघत होते. आणि तो आलाच. पण सैनिक नव्हे तर खुद्द सरदार नंग्या तलवारी घेतलेल्या दोन सैनिकांसह. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकुन वस्तीवरील इतर मजूरही जमा झाले. डोळे मिटुन चौघेही जणं मृत्युदंडाच्या हुकुमाची वाट बघत होते. पण हे काय?सरदार सजा फर्मावण्याऐवजी दुसरेच कांहीतरी बोलत होता. चोखोबांनी डोळे उघडले. बोलणे कानावर पडले. शाब्बास रे माझ्या वाघांनो! दिलेल्या मुदतीच्या आंतच भूयाराचे काम पूर्ण केले. तुमची बक्षीसी योग्यवेळी तुम्हाला मिळेल असे सांगुन सरदार निघुन गेला.
चोखोबांचा तर कानावर विश्वासच बसत नव्हता. बाकी तिघांचीही अवस्था वेगळी नव्हती. भूयाराचे बांधकाम पूर्ण झाले?कधी?कसे?आणि कुणी केले? आपण चौघे तर झोपलो होतो, मग बांध काम कुणी केले?एवढ्यात गोविंदा येऊन म्हणाला, चोखोबा! कमाल आहे तुमची. मध्यरात्री एवढ्या उंचावर चढुन चांदण्या च्या प्रकाशात एकट्याने काम पूर्ण केले. चोखोबांना अतिशय आश्चर्य वाटले, कोण मी?मध्यरात्री ते देखील उंच पायाड्यावर उभा राहुन बांधकाम करीत होतो?कुणी सांगीतले तुम्हाला?मी स्वतः ह्या डोळ्यां नी बघीतलय! हाका सुध्दा मारल्यात, पण तुमचे लक्षच नव्हते. गोविंदा परत परत तेच सांगत होता. तिघांना तर विशेष वाटले नाही, पण चोखोबा समजुन चुकला, अंदाज आला, आपण निजलो असतांना भक्तवत्सल पांडुरंगाने आपल्या ला होणारी देहदंडाची शिक्षा व प्रत्यक्ष पांडुरंगावर येणारे लांच्छन या दोन्ही पासुन वाचवले. तो जनाबाईबरोबर दळण कांडन व इतरही कामे करायचा, गोरा कुंभाराबरोबर माती मळायचा, निर्मळाचे रुप घेऊन सोयराची प्रसुती केली. बैलां च्या पायात फरफटणार्या शिक्षेपासुन वाचवले, पण हे सारं पंढरपूरांत, पण इतक्या दूर मंगळवेढ्यात येऊन विठ्ठलाने मदत केली हे लक्षात आल्यावर, आपण कुठे आहो?भोवताली कोण आहे याचे भान विसरुन जमीनीवर डोके टेकवुन हुंदके द्यायला लागले. कां आणि कशा साठी रडत आहे?कशी समजुत काढावी कुणालाच समजेना.
चोखोबा आपल्यापासुन, पंढरपूर पासुन दूर गेला ही गोष्ट त्या वीटेवर उभ्या असलेल्या विठोबाला सलत होते. पण त्यांचे पंढरपूरला जाणे विधिलिखितच होते. तिथेही आपल्या भक्ताला मिळत असलेली लोकप्रियता, त्याचे भागवद्भक्ती त, अभंगरचनेत रमणे, तिथल्या मजुरांना भगवद् भक्तीचे महत्व, भजन किर्तनातुन पटवुन देणे हे सगळे बघून विठ्ठलाला आपल्याला या भक्ताचा अतिशय अभिमान वाटत होता. पण जेव्हा त्याच्या वर संकट आलं, मृत्युदंडाची शिक्षा होणार याहीपेक्षा अपराधी म्हणुन मृत्यु येणार यामुळेच पांडुरंग धावन बुरुजाचे काम पूर्ण केले.
बुरुजातील गुप्त मार्गाचे आणि भिंतीचे काम चोखोबाने पूर्ण केले की, खरेच विठ्ठलाने येऊन पूर्ण केले याबद्दल चर्चा चालत, पण या प्रसंगामुळे चोखोबां चा आदर मात्र वाढला. हे जरी खरे असले तरी त्यांची कासावीसी वाढली. आपल्या मुळे देवाला त्रास पडला या विचारानेच जेवण जाई ना की, कशात लक्ष लागेना. जीवाची तडफड होत होती, आणि मग उरातील वेदना अभंगरुपाने बाहेर पडत.
मजुरांच्या श्रमांतुन गावकुसीची तट बंदीची भिंत आकारल्या जात होती. कालची अख्खी रात्र गत आयुष्यातील सार्या आठवणींत जागुन काढली. दिवस उजाडला, तशाच भारावल्या अवस्थेतच सकाळची कामे उरकली, पण आज त्यांना उदास उदास, मनांत एक अनामिक हूरहूर, विचित्रशी घालमेल होत होती. असं का होतय?मन असं सैरभैर कां झालय? कांहीतरी अघटीत घडणार याचा तर हा संकेत नसेल ना?अशा मनःस्थितीच चोखोबा कामाला लागले. प्रत्येक दगडा वर श्वासा-उच्छावासागणिक विठ्ठलाचे नांव कोरुनच ते चौथर्यावर बसवत असे. नेहमीचाच हा त्यांचा हा शिरस्ता होता.
अगदी दीपमाळेच्या बांधकामापासुन! आणि त्या प्रत्येक दगडांत त्यांना विठू रायाची मूर्ती, नेहमीसारखीच स्निग्धभाव, प्रसन्न मुद्रेची दिसत होती, पण आज त्याचे हात कटेवर नसुन, डोक्याच्यावर उंचावुन जणुं चोखोबाला बोलावत होता. मिठीत घ्यायला उत्सुक दिसत होता. चोखोबा मृत्युला घाबरत नव्हते पण त्यांना मृत्यु हवा होता, त्याच्या, नामदेवा च्या सानिध्यात, पंढरपूरांत! ही इच्छा पांडुरंग नक्की पुरवेल याची चोखांना खात्री होती.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.


