संत चोखामेळा संपूर्ण चरित्र + अभंग भाग ९, (४१ ते ४४)

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

संत चोखामेळा संपूर्ण चरित्र ! !

! ! !  संत चोखामेळा ! !

भाग – ४१.

 चोखोबा आणि ५-६ वृध्द चौथर्‍याचे बांधकाम करीत होते. चोखोबा हाताने काम करीत होते पण मन मात्र विठ्ठलाकडे धाव घेत होते. अवघे विठ्ठल मय झाले होते. एवढ्यात अचानक कोणाला कांही कळायच्या आंत आदल्या दिवशी बांधलेल्या तटबंदीच्या बुरुजाची भिंत धडाडधूम आवाज करीत कोसळली काम करणारे मजूर दगडांच्या राशीखाली गाडल्या गेले. दगडाच्या माराने उताणे पडलेल्या चोखोबाला एखाद्या लहान बालकासारखा सावळा विठ्ठल, त्यांचा पंढरीनाथ एवढ्या उंचीवरुन झेप घेत आहे असे दिसतांच, त्याला लागेल असे वाटल्याने जिवाच्या आतंकाने ओरडत थांबss विठूराया थांबss मी तुला अलगद झेलतो. . . ये माझ्या मिठीत ये. . ! !

 दगडांच्या वर्षावाखाली रक्ताळले ले जखमी चोखोबा उठण्याची धडपड करत, झेपावणार्‍या विठ्ठलाला झेलण्या साठी पुनः पुनः उठत, दगड अंगावर पडला की, पुन्हा जखमी होऊन खाली पडत. पायावर मोठा दगड पडल्याने जायबंदी झालेले चोखोबा म्हणाले, थांब विठुराया थांब असे ओरडत उठण्याची धडपड करीतच होते. एकामागुन एक दगडं छाती, पोटावर पडत होते. शुध्द हरपायला लागली, तरीही प्राण कंठाशी आणुन पुटपुटत उंचावरुन झेपावणार्‍या विठ्ठलाला क्षीण आवाजांत थांब, विठू राया थांब असे अस्पष्ट पुटपुटत असतांना डोळ्यापुढे अंधार पसरला. चोखोबा अंधाराच्या खोल गर्तेत बुडत होते आणि चमत्कार झाला. शुध्द हरपण्यापुर्वी एक आर्त हाक मारली पांडुरंगा धाsss व ही जाणीवेतील शेवटचीच हाक असावी.  खोल खोल विहिरीत पडतो आहोत असे वाटत असतांनाच, इतकावेळ विठोबाला झेलण्याचा प्रयत्न करणार्‍या चोखोबाला तळाशी विठोबानेच आपल्याला झेलले अगदी फुलासारखे! शेवटची नजर विठू रायावर टाकली. देवाने आपल्याला झेललय पाहुन एक अस्पष्टसे स्मित ओठावर ओघळले आणि विठुरायात मिळुन गेले. जीवात जीव मिसळला.  मिटल्या डोळ्यांत समाधान, तृप्ती, अस्पुट से स्मितहास्य, विठ्ठलाशी तादात्म्य पावले.

 लौकिकार्थाने चोखोबांची इच्छा अपुरी राहिली होती. पण शेवटच्या क्षणी त्यांचा विठ्ठल जवळ होता नव्हे, त्यांना बोलवायलाच आला होता.

“शुध्द भाव, शुध्दमती । ऐसे पुराणे वदती ।  ।

जयासाठी जप तप । तो हा विश्वाचाचिबाप

नामे पातकी तारिलें । जडजीव उध्दरिले ।

विश्वास दृढ धरा मनी । चोखो मिठी घाली चरणी  ।  । ” असं प्रांजलपणे आणी उत्कट भावनेने सांगणारे चोखोबा आज खरोखरच विठ्ठलचरणी लीन झाले होते.

विठ्ठल विठ्ठल असे श्वासोच्छासाच्या लयीत म्हणणारे, नामदेवांना प्रश्न वाचारुन भंडवणारे, अट्टाहासाने दीपमाळ बांधणारे अस्पृश्य जातीत जन्माला येऊनही उत्कट भगवद् भक्ती करणारे, अस्पृश्य म्हणुन जगतांना इतकी भावोत्कट अभंगरचना करणारे, लौकिक जीवनांत दुर्दशा असुनही अत्मभान राखुन जाणीवपूर्वक आत्मगान करणारे नाम हेच परब्रम्ह ठासुन सांगणारे, इतकी पराकोटीची विठ्ठलभक्ती करणारे, श्वासाश्वासातुन नाम जपत रक्ताच्या थेंबाथेंबापर्यंत नेऊन पोहोचवणारे, विठ्ठलाचा हा लाडका सखा भक्त, संतपरिवारांत मानाचे स्थान लाभलेले हे संत चोखोबा वैशाख वद्य पंचमीला विठ्ठलाच्या चरणी समर्पित झाले.

 अरेss भिंत पडली, कोसळली.  धावा ss धावाss !  पळाss पळाss असा एकच हलकल्लोळ, हाहाःकार मंगळवेढ्याच्या गांवकुसाजवळ माजला.  कुणाला कांहीच कळेना, उमजेना. जो तो जीव वाचवत सैरावैरा धावत होता. पळत होता. धडाधड भिंती कोसळत, मोठमोठे दगड वरुन खाली पडत होते. सगळीकडे मातीच्या धुराळ्याने दिसेनासं झालं.  कोणाचं काय झालं?कशाचाच मेळ लागत नव्हता. भीतीने मारलेल्या किंकाळ्या, मदतीसाठीचा टाहो फोडणार्‍या आर्त हाका, वेदनांनी भरलेले तीव्र स्वरातील कण्हणे, विव्हळणे, छाती पिटून केलेला आक्रोश, मृत्युच्या भीषण तांडवाने सारा परिसर शोकाकुल होऊन गेला. मातीची धूळ, थर कमी झाल्यावर, सगळ्यांनी भिंतीजवळ धाव घेतली.  जवळ जवळ दोन पुरुष उंचीची भींत कोसळुन बांधकाम करणारे ६०-७० मजूर ढीगार्‍याखाली सांपडुन मृत्युमुखी पडले होते. घटना कळतांच मदत कार्या साठी सरदाराचचे सैनिक धावुन आले. या दगडमातीच्या ढिगार्‍यात एक श्रेष्ठ भगवद् भक्त श्रेष्ठसंत, चिरविश्रांती घेतोय याची त्या सैनिकांना काय कल्पना?

 तिकडे दूर परमुलखात असलेल्या नामदेवांनाही आज सतत अपशकुन होत होते. शतकोटी अभंग रचण्याचा संंकल्प आपल्या हयातीत पूर्ण करण्यासाठी तीर्थाटन करुन वारकरी संप्रदाय व भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करण्या ची सर्वत्र संचार करणारे नामदेव आतां शरीराने थकले होते. मनांत मात्र प्रचंड उत्साह होता. सरस्वती ज्यांच्यावर नेहमी प्रसन्न होती ते नामदेव आज धर्मसभेत बोलतांना अडथळत होते.

 क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

 दि.  २२-४-२०२१.

! ! !  संत चोखामेळा ! !

भाग – ४२.

 धर्मसभेतील प्रवचन आटोपुन आज असं कां होतेय याचा तपास लावण्याच्या निश्चयाने नामदेव मुक्कामा च्या ठीकाणी परतले, पण सोबतची मंडळी जेवण्यासाठी खोळंबली म्हणुन त्यांच्या सोबत जेवायला बसले. त्यांच्या सोबत चर्चा सुरु असल्यामुळे थोडावेळ विसर पडला. पण निवांत झाल्यावर अभंगाची जुळवणी करुन कागदावर लिहिले जाणारे शब्द वेगळेच होते. त्यांनी ठरविलेला अभंग लिहायला घेतला पण कागदावर मात्र शब्द उमटले. . . .

“चोखा माझा जीव चोखा माझा भाव ।

 कुळधर्म देव चोखा माझा ।

काय त्याची भक्ती, काय त्याची शक्ती ।

मी हि आलो व्यक्ती तयासाठी ।  ।

आपण हे काय लिहिलय हे कळल्यावर नामदेव चमकले, अस्वस्थ झाले. इतके दिवसांनंतर अचानक आजच चोखोबांची आठवण कां यावी?चोखोबा मंगळवेढ्या ला जाऊन ५-६ मास होऊन तिथे रमलेले व असल्याची खबर मिळाली होती.  वैशाख संपल्यावर जेष्ठ पोर्णिमेला नामदेव पंढरपूरला परतणार होते. आज चोखोबासंदर्भातला अभंग उमटल्यावर नामदेव अस्वस्थ होऊन हूरहूर लागली होती. त्यामुळे त्यांनी समाधी लावली आणि त्याचं मन चरकलं. कांहीतरी अघटीत घडले होते. संकटात होते, आर्त स्वरांत विठूरायाला हाक मारत होते. तिथे नामदेवांची आत्यंतिक गरज आहे हे लक्षात येताच, कागदावर उमटलेला चोखोबा संदर्भातील अभंगरचना म्हणजे कांहीतरी घडलेल्या घटनाचा संबंध त्यांच्याशी होता हे निश्चित. मग मात्र त्यांनी अजिबात वेळ न दवडता, एका घोडेस्वाराला विनंती करुन तडक पंढरपूर गाठले.

 नामदेव कधी येतात याकडे विठ्ठलाचे चित्त लागले होते. नुकताच राम जन्म आटोपला होता. दोन वर्षासाठी चोखोबा मंगळवेढ्याला आणि नामदेव तीर्थाटनाला! फक्त जनाई होती त्याच्या मागे लकडा लावायला असं सर्व सुरळीत चालु असतांना एक दिवस सकाळी त्याच्या पायाखालची वीट थरारली. स्वतः परमेश्वर असुनही नियती, विधिलिखिता पुढे त्याचे आज पर्यंत कांहीच चालले नाही. जर चालले असते तर, रामजन्मात वनवास भोगला नसतां किंवा कृष्णाव तारामधे बंदीवासातला जन्म टाळतां आला असतां. नियतीचा लेख वाचायला आणि समजुन घ्यायला जमले नसल्या मुळे आदीमायेलाच शरण गेल्यावरच हा गुंता सुटु शकेल असे वाटुन तो रुख्मिणी महाली गेला तर ती हुंदके देत रडत असलेली दिसली.

 गहिवरल्या स्वरात रुख्मिणी म्हणाली, नाथ!  ईश्वर म्हणुन आपली जगावर सत्ता असली तरी, तुम्ही कोणाच ही विधिलिखीत बदलुं शकत नाही.  स्वामी!  तुमचा लाडका भक्त, अतिशय प्रिय असणार्‍या चोखोबाचा दुर्देवी अंत झाला. समाजातल्या वर्णाश्रमाने जिवंत पणी त्याला तुमच्यापासुन लांब ठेवलाच, पण मृत्युनेही डाव साधला. गांवकुसीची भिंत अंगावर कोसळुन त्याला मरण आले. जिंवंतपणी तर उपेक्षा होतीच, मृत्युनेही उपेक्षाच केली. परतु मृत्युनंतरची त्याची उपेक्षा थांबवायचीय! आयुष्यभर अपमान, अन्याय, तिरस्कार सोसणार्‍या, तुमची निःस्सीम भक्ती करणार्‍या चोखाला निदान मृत्युनंतर तरी सन्मान, त्याला साजेशी जागा मिळाली पाहिजे.  जोपर्यंत तुमचं अस्तित्व जगांत आहे तो पर्यंत चोखोबाचीही स्मृती, नांव चिरंतर राहिलं पाहिजे.

 मृत्युनंतर आपल्या लाडका भक्त चोखोबाला उचित सन्मान, न्याय मिळवुन द्यायचाच हे त्या पांडुरंगाने निश्चित केले.  फक्त प्रतिक्षा होती नामदेवांची.

 नामदेव पंढरपूरच्या वेशीजवळ उतरल्यावर आपल्या थकलेले शरीर व मरगलेल्या मनाकडे दुर्लक्ष करुन, फाटलेले काळीज घेऊन ते घरी न जातां सरळ विठ्ठलमंदिरांत पोहोचले तेव्हा शेजारती सुरु होती. सर्व सामसुम झाल्या वर त्यांनी गर्भागार गाठले. बेभानपणे त्यांनी विठोबाच्या पायाला मिठी मारली.  दोघांच्याही डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या. आवेश ओसरल्यावर, पांडुरंग म्हणाला! नामया! आपल्या चोखोबाच्या कुडीतुन त्याचा आत्मा मुक्त झाला.

 कायss? कसे? ते तर मंगळवेढ्या ला गेले होते. मग असे कुणाला न सांगता कळवतां, कुणालाही न भेटतां जाऊच कसे शकले?आणि तूं प्रत्यक्ष हजर असतांना?अरे पंढरीया!  तूं भक्तवत्सल, पाठीराखा, सर्वसाक्षी आहेस ना?मग तुझ्या परोक्ष कसं घडलं?नामदेव विलाप करत होते. त्यांच्याजवळ आपलं कुणीही नसतांना आकस्मिक गेले हीच भावना नामदेवांना कुरतडत होती. विठ्ठलालाही तेवढेच दुःख झाले होते. नामया! चोखाने अस्पृश्य म्हणुन जीवंतपणी यातना भोगल्याच आणि मृत्युही यातनामयच आला. नामया मी सर्वसाक्षी परमेश्वर आहे खरा, पण माझ्या या सर्वसाक्षीपणावर नियतीने प्रत्येकवेळी मात केली. चोखोबा चा आत्मा कधीच माझ्यात समर्पित झाला. ज्या सन्मानापासुन, हक्कापासुन, न्यायापासुन जन्मभर चोखोबा आणि त्यांची भक्ती वंचित राहिली ते सर्व आतां चोखोबाला मिळवुन द्यायचय! !

 क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

 दि.  २२-४-२०२१.

! ! !  संत चोखामेळा ! ! !

भाग – ४३.

 नामदेवा! चोखोबांचा मृत्यु जरी मंगळवेढ्यात झाला असला तरी, त्यांची खरी जागा पंढरपुरातच आहे. तेव्हा तूं तिथे जाऊन त्याचे पार्थिव शरीर जरी नाही मिळाले तरी, अस्थि गोळा करुन घेऊन ये. तुझ्या सांगण्यावरुन त्याने “पंढरपूर हीच आपली कर्मभूमी” मानली.  ती त्यांची धर्मभूमी व्हावी. माझ्या दर्शनार्थ चोखोबा तासनतास महाद्वारी तिष्ठत रहायचे. त्याच महाद्वाराच्या पायरीशी त्यांच्या अस्थिला स्थान मिळावं. जीथं त्यांच्या चरणमुद्रा उमटल्या तीथं चिरंतर नाममुद्रा राहाव्या. आणि मृत्योपतरांत कां होईना माझ्याजवळ स्थान मिळावे. पण देवा!  तिथे ६०-७० मजुर गाडले गेलेले असतांना, नेमक्या चोखोबांच्या अस्थी कशा ओळखायच्या?नामया! चोखोबाची भक्ती पराकोटीची होती. त्यांच्या श्वास उश्वासात, पंचेद्रियांत, रक्तात, विचार, उच्चार, देहाच्या अनुरेणुतुन विठ्ठल आणि फक्त विठ्ठल हे नाम त्यांच्या अस्थीमधे असणारच नव्हे आहेच. तीथे अस्थींचा कितीही मोठा ढिग असला तरी, नेमक्या अस्थी ओळखणे कठीण नाही. ढीगातील प्रत्येक अस्थी उचलून कानाला लाव. ज्या अस्थीमधुन विठ्ठल विठ्ठल नाद ऐकु येईल नेमक्या तेवढ्याच अस्थी इथे घेऊन ये.  जा. . . नामया. . जा त्या अस्थी तुझ्या प्रतिक्षेत आणि मी अस्थीच्या. . .

 भावभिजल्या अवस्थेत विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवुन तातडीने जवळच राहणारा पुजारी श्रीधर पंतांना सारा वृतांत सांगुन व कर्ममेळाला तातडीने बोलवुन घेण्यास सांगीतले. वार्ता वार्‍यासारखी पंढरपूरांत पसरली.  कर्ममेळा, श्रीधरपंत व इतर दोघा चोघांना घेऊन नामदेवांनी मंगळवेढ्याची वाट धरली. दिवसाच्या दुसर्‍या प्रहरी कुठेही न थांबतां सारे मंगळवेढ्यात पोहोचले.  तिथली परिस्थिती अतिशय भिषण होती. नुसता हाहाःकार माजला होता.  आक्रोश, किंकाळ्यांनी आकाश छेदत होते. मृत्युमुखी पडलेल्या त्या जीवांना अत्यंत यातनामय मृत्यु आला होता. शरीरे छिन्नभिन्न होऊन रक्तामासाचा नुसता चिखल झाला होता. दगडांच्या आघाताने बहुतेकांच्या शरीरावरचे मांस अलग होऊन अस्थी उघड्या पडल्या होत्या. ही दुर्देवी घटना घडुन चार दिवस उलटले होते. सरदारांच्या सैनिकांनी मातीच्या ढीगार्‍यातुन शोधुन शोधुन मिळालेल्या अस्थी दूर मोकळ्या जागेत विखरुन ठेवल्या होत्या.

‌ नामदेवांनी आपल्या सोबत आणलेल्या लोकांना चोखोबांच्या अस्थी कश्या ओळखायच्या हे सांगीतले होते.  वडीलांच्या आकस्मिक मृत्युने धक्का बसलेला कर्ममेळा कांहीसा सावरल्यावर शून्य मनाने तो व नामदेवादी लोकं अश्रू भरल्या नयनाने चोखोबाच्या अस्थी शोधु लागले. बर्‍याच अस्थी शोधुन झाल्या, पण नामदेव निराश व्हायला लागले, तोच एक अस्थी कानाला लावल्याबरोबर चमकले. चोखोबा आपल्या शेजारी बसुन विठ्ठल

‌ विठ्ठल विठ्ठल म्हणत

असल्याचा भास झाला. खात्री पटावी म्हणुन श्रीधरपंताजवळ ती अस्थी दिली तर त्यांनाही व नंतर कर्ममेळालाही नाद ऐकु आला. आपल्या वडीलांचा आवाज त्याने ओळखला. आणि मग मात्र विठ्ठल विठ्ठल या मंत्राने भारलेल्या अस्थी भराभर सांपडायला लागल्या. अंथरलेल्या उपरण्यावर विठ्ठल नामाच्या अस्थींचा ढीग जमा झाला. गाठोडे बांधुन सर्वजण पंढरपूरच्या वाटेला लागले. काम संपल्या वर मात्र उसणे आणलेले नामदेवांचे अवसान गळले.  वैशाखाच्या उन्हात भूक तहानेने जीव कासावीस झाला. शरीराने अहसहकार पुकारला. शेवटी एका झाडाखाली विश्रांतीसाठी थोडावेळ थांबले. थोडे बरे वाटल्यावर नामदेवांनी अस्थीची महायात्रा गावाबाहेरच्या अस्पृश्य वस्तीतुन मिरवत मंदिराच्या महाद्वारा पर्यंत नेण्याची व्यवस्था करण्याचा आदेश श्रीधरपंतांना दिला. विटेवर उभा असलेला पांडुरंग प्रतिक्षा करीत होता चोखोबांच्या अस्थी घेऊन येणार्‍या नामदेवांची! !

 कांही काळ विश्रांती व घासभर भाकरतुकडा खाल्ल्यावर नामदेवांना तरतरी आली. चोखोबांच्या अस्थी घेऊन कधी पंढरपूरांत पोहचतो, पांडुरंग किती आतुरतेने वाट बघत असेल, अस्थी डोळा भर पाहण्यास किती उत्सुक असेल ही कल्पना असल्यामुळे झटक्यात उठुन चोखोबांच्या आठवणींचे अनंत वर्तुळे, पहिल्या भेटीत गोंधळलेले चोखोबा ते अगदी परवा परवापर्यंत तृप्त कृतार्थ, अनंत रुपे, प्रामाणिकता, प्रांजलता उत्कट भक्ती अशा अनेक आठवणींचे गाठोडे घेऊन पंढरपूरी पोहोचले.

 पुढे गेलेल्या मंडळींनी महायात्रेची चोख व्यवस्था केली होती.  चोखोबांच्या

दुःखद मृत्युची बातमी पंढरपूरातील घरां घरांत पोहचली असल्यामुळे, अस्थीचे दर्शन घेण्यास लोकांनी एकच गर्दी केली अस्थी घेऊन नामदेव दृष्टीक्षेपात आलेले दिसतांच विठ्ठलाचा गजर सुरु झाला.  कर्ममेळाने आणलेल्या कलशात अस्थी ओतुन उपरण्याने कलशाचे तोंड बांधले.

 क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

 दि.  २२-४-२०२१.

! ! !  संत चोखामेळा ! ! !

अंतिम भाग – ४४.

 मंडळींनी आणलेल्या पालखीत अस्थीकलश ठेवण्यांत आला आणि टाळ मृदुंगाच्या तालावर अवघ्या जनसमुदाया ने एकच गजर केला. . . “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल । विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ।  । ” संत चोखामेळा की जय गजरा च्या ध्वनीने विठ्ठलाच्या पायाखालची वीट थरारली. चंद्रभागा उसळून सार्‍या वाळवंटभर पाणीच पाणी झालं. आकाश छेदत गेलेल्या गजराने वीज तळपली.  ढगांचा गडगडाट झाला. आणि लक्षावधी थेंबांमधुन काळे मेघ अश्रू ढाळू लागले.  कोसळणार्‍या जलधारा, सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट या सर्वाचा चोखोबांच्या अस्थीमहायात्रेला जमलेल्या समुदायावर कांहीच परिणाम झाला नाही बघतां बघतां गावाबाहेरच्या अस्पृश्य वस्तीतून निघालेली महायात्रा गावातल्या मधल्या चौकात आली. पालखी चौकाच्या मध्यभागी ठेवली. एरवी आपली सावली कोणावर पडुन अपला विटाळ होईल या भितीने रस्त्याच्या कडेने चालणार्‍या, चोखोबांच्या अस्थींच्या पालखीच्या सावलीवर तरी डोके ठेवायला मिळावे म्हणुन जो तो धडपडत होता. पण हे सारं चोखोबांच्या मृत्युनंतर! या विरोधाभासाचे नामदेवांना मोठे नवल वाटले.  

 चौकात ठेवलेल्या पालखीचे दर्शन अवघ्या पंढरपूरातील अस्पृश्य वस्ती, ब्राम्हणआळी, वैश्य, मराठा, सर्वच थरांतील लोकं नमस्कारासाठी धडपडत होते. आयुष्यभर या सगळ्यांना चोखोबा जोहार घालीत होते, आज त्याच लोकांना चोखोबांचे चोखपण, निर्मळपण समजले होते. सगळे पाहुन चोखांचा मेहुणा, शिष्य बंकाने त्यांच्या निर्मळपणाची साक्ष देतांना म्हटलेला अभंग नामदेवांना आठवला. . . . .

“चोखा चोखा निर्मळ । तया अंगी नाहीमळ

चोखा सुखाचा सागर । चोखा भक्तीचा आगर ।  ।

चोखा प्रेमाची माऊली । चोखा कृपेची साऊली ।

चोखा मनाचे मोहन । बंका घाली लोटांगण

 पालखीमधे ठेवलेल्या चोखोबांच्या अस्थीकलशाची कर्ममेळाने यथासांग पुजा केली. आणि एकवार सारं पंढरपूर गजराने दुमदुमुन गेले. बघतां बघतां पालखी महाद्वाराजवळ आल्यावर नामदेवांनी पालखी तिथंच ठेवायला सांगीतली. पण आज सर्वांच्याच आग्रहाने पालखी सभागृहात नेण्याचे ठरले, पण काय आश्चर्य!  पालखी तसूभरही हलेना.  सर्वांना नवल वाटले. महाद्वाराबाहेर जीथे विठ्ठलाच्या दर्शनाची आस बाळगुन चोखोबा उभे राहत असत, नेमकी तिथेच पालखी ठेवल्या गेली होती. चोखोबा कधीही त्या महाद्वारांतुन आंत गेले नव्हते आज त्यांच्या अस्थीनेही जायला नाकारले. मृत्युनंतरही त्यांचे आत्मभान सुटले नव्हते. पालखी हलेना म्हणुन श्रीधरपंतानी पुढे काय करायचे विचारल्यावर, नामदेव म्हणाले, पांडुरंगा च्या दर्शनार्थ इथेच तासन् तास ते तिष्ठत उभे राहत. जिथे त्यांच्या पाऊलखुणा उमटल्या त्याच ठीकाणी, त्याच जागी त्यांना चिरविश्रांती हवी आहे, हाच या घटनेचा अर्थ होतो. श्रीधरपंत!  महाद्वारा च्या पायरीशी, इथच याच ठीकाणी चोखोबांची समाधी बांधु या! नामदेवांनी विठूनामाचा गजर सुरु केला. शेकडों आवाज त्यांत मिसळले. विठ्ठलाच्या कानावरही गजर गेला. अस्थीकलश आत आणण्याची वाट बघत होता. पण नाही आला. आणि विठुराया समजला, समाजा ने घालुन दिलेले नीतीनियम आयुष्यभर काटेकोरपणे सांभाळणार्‍या चोखोबांनी मृत्युनंतरही नियम तोडले नाही. त्याच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. महाद्वाराच्या पायरीजवळ चोखोबांच्या समाधीच्या तयारीत शेकडों हात गुंतले होते. अचानक नामदेवांचे लक्ष वरच्या पायरीकडे गेले, तिथे विठ्ठलरुख्मिणी उभे असलेले दिसले नामदेवांनी धाव घेऊन विठ्ठलाच्या चरणा ला मिठी मारुन स्फुंदुन स्फुंदुन रडु लागले. मंदिराच्या वरच्या पायरीवर डोके ठेवुन नामदेव कां रडत आहे?कुणालाच कळेना. सगळीजणं स्तब्ध झालीत, पण तरीही त्या निरव शांततेत कापर्‍या बारीक आवाजांत “विठ्ठल विठ्ठल ” नाद ऐकु येत होता. नक्कीच चोखोबा! नामदेवांनी देवाकडे बघीतले, त्याच्याही नजरेत तेच भाव दिसले. नामदेवांनी विठ्ठलाचे चरण सोडुन, खाली पालखीकडे धाव घेतली. विठ्ठलाचा नामजप पालखीत ठेवलेल्या अस्थीकलशातुन येत होता.  त्यांनी कलशावर डोके ठेवले. अविरत आसु वाहत होते. नामघोषाला सुरुवात केली. आणि नामघोषाने सारे आकाश भरुन गेले. तिन्हीसांज व्हायच्या आंत समाधी बांधुन झाली.

 नामदेवांनी व कर्ममेळाने अस्थी कलश बांधलेल्या समाधीच्या अंतःस्थळा वर ठेवुन विठ्ठलनाम कोरलेला दगड ठेवुन अंतःस्थळ झाकुन घेतले. जनाबाईने समाधीवर तेवती पणती ठेवली. विठ्ठला चा व चोखोबाचा गजर करत लोकं आपापल्या घरी गेले आणि नामदेव गर्भागारात!

 देवा!  एक प्रश्न मनांत सलत आहे, त्याचा खुलासा हवाय! विठूराया! चोखोबां ची तुझ्यावरील निस्मीम, सखोल भक्ती मी जाणतो. तरीही त्यांच्या अस्थीतुन तुझ्या नामजपाचा नाद कसा उमटत होता?तो एक पापभीरु मनुष्य, योग, हटयोग, कुंडलिनी जागृती, परकायाप्रवेश या बाबतीत कोणतही ज्ञान नसतांना तुझ्या नामाचा उद्घोष त्यांच्या अस्थीतुन व्हावा हे कसे?नेमका काय अर्थ?पांडुरंग प्रसन्न हसत म्हणाले, नामया! तुझ्यात आणि त्यांच्यात खुप फरक आहे. तुझी योग्यता, सखोलभक्ती त्यांच्यापेक्षा मोठी असली तरी, तुझ्या भक्तीचं स्वरुप सर्वव्यापी, ज्ञानी, बहुश्रुत व्यासंगी आहे. भक्तीबरोबर ज्ञानाने परीपुर्ण अशी अभंगरचना करुन वारकरी संप्रदायाची धूरा समर्थपणे खांद्यावर पेलुन, तीर्थाटनातुन दूरवर पसरवण्याचा प्रयत्न केलास, म्हणुनच तूं सर्वव्यापी असुन तुझ्या व्यक्तीमत्वाला अनेक कंगोरे, संतपणाचे अनेक पैलू आहेत. तूं संतश्रेष्ठ आहेस. याउलट चोखोबाचे आहे. त्यांचा प्रत्येक श्वास, विचार, ध्यान, धारणा मी आहे. माझ्या शिवाय त्यांच्याकडे दुसरं कांहीच नव्हतं.  त्यांच जगनही मीच व जगण्याचं कारण ही मी च होतो. माझ्या नामजपाचा ध्यास त्यांच्या अंतरात्म्यापर्यंत भिनला होता.  माझं नाव त्यांचा प्राण, अस्तित्व होतं.  म्हणुनच त्यांच्या सार्‍या अवयवांतु माझं नांव झिरपत झिरपत अस्थीमधे भिनल्या गेलं. त्यांच श्रेष्ठत्व होतं माझ्या घेतलेल्या ध्यासात, स्वतःला माझ्यात केलेल्या समर्पनात. म्हणुनच अस्तित्वहीन अवस्थेतही त्यांच्या अस्थी माझं नांव जपत होत्या.

 जो पर्यंत माझं नाव उच्चारलं जातय, जोपर्यंत वारकरी संप्रदाय आहे.  पंढरपूर भक्तिचं अधिष्ठान आहे तो पर्यंत चोखोबाचं नांव उच्चारलं जाणार, समर्पित अस्तित्व भक्तांना प्रेरणादायी ठरणार आहे.

 कांही क्षणांनंतर दोघांची नजर समोर गेल्यावर, समाधीजवळ चोखोबा उभे होते. दोघांची नजर आपल्याकडे वळलेली पाहुन, खाली झुकुन दोघांनाही जोहार घातला. नामदेवांच्या मनांत चोखोबांचे शब्द रुंजी घालत होते. . . .

“जोहार मायबाप जोहार । मी विठोबा रायाचा महार ।

हिशोब देतो तारोतार । दयाळू मायाळू बाप करा । येईल मुजरा निजसत्वे मी मायबाप

विठूपाटलाचा मी महार ।

चोखामेळ्याचा हा जोहार ।

जोहार मायबाप जोहार ।

तुमच्या महाराचा मी महार  ।  । “

 चोखोबा अंतर्धान पावले आणि दोघांचेही डोळे अश्रूंनी भरुन आले.

 अशा या श्रेष्ठ भक्ताला कोटी कोटी प्रणाम! !  

 ! !  समाप्त ! !

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा सर्व भाग पहा

सर्व संत चरित्र पहा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading