
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
संत चोखामेळा संपूर्ण चरित्र ! !
! ! ! संत चोखामेळा ! ! !
भाग – १६.
माणसांतील क्रौर्य बघुन सूर्यालाही लाज वाटली असावी. त्यानेही डोळे झाकुन अस्ताला निघुन गेला. मार खाऊन चोखोबा बेशुध्द झाले. मारुन बोलुन थकल्यावर जखमांनी भरलेल्या, मातीत लोळागोळा झालेल्या चोखाला फरफटत नेऊन त्यांच्या वस्तीत टाकुन अंगावर थुंकुन निघुन गेले. ४-५ माणसं गलका करत कांहीतरी वसतीसमोर टाकले हे वस्तीतल्या राणूने, ते लोकं निघुन गेल्या वर काय टाकले म्हणुन बघीतल्यावर त्याला जखमी चोखा दिसल्यावर त्यांनी बोंब ठोकली. सावित्री, सोयरा, सुदामा जेवण्यासाठी चोखाची वाट पाहत बसले असतांनाच लोकांनी येऊन चोखोबा जखमी अवस्थेत बेशुध्द पडलेले असल्या चे सांगीतल्याबरोबर तिघांच्याही तोंडचे पाणी पळाले.
अरे देवा! कुठाय माझं पोर?म्हणुन सर्वजण रडत भेकत धावत सुटले. चोखा ची दयनीय अवस्था पाहुन तिघांच्याही जीवाचा ठाव सुटला. वस्तीवरच्या लोकां च्या सहाय्याने चोखाला खोपटात आणले त्यांचे सारे अंग ठेचकाळलेले, रक्ताळलेले, डोक्यात खोक पडलेली त्यातुन रक्त वाहते आहे, सर्वांगावर काळे निळ वण पडलेल्या अवस्थेत, अर्धवट शुध्दीत चोखा कण्हत, जीवघेण्या वेदना सहन न होऊन किंचाळत होते. ताबडतोब उपचाराची निकड लक्षात येऊन सावित्री तील घायाळ आई नाहीशी होऊन कर्तव्य दक्ष माता जागी झाली. सावित्रीच्या उपचाराने व सोयराच्या प्रेमळ स्पर्शाने चोखाच्या ठुसठुसणार्या वेदना कांही अंशी कमी झाल्या, पोटात गेलेल्या कढत दुधाने त्यांना झोप लागली. मधुन मधुन कण्हणार्या, कोणाच्याही अधेमधे नसणार्या चोखाची ही हालत कां व कशी झाली या चिंतेत रात्रभर कोणालाच झोप आली नाही,
सकाळी चोखोबा तापाने फणफणलेले, बेहोशी अवस्थेत जोराने ओरडत, नका. . नका. . मारुं, मी नाही कुठे शिवलो, देव नाही बाटवला. . नका. . मारु. . नका. . मारु. . शरीरांत वेदनेचा नुसता आग डोंब उठला होता. सुदामाने बाळं भटाकडुन औषध व लेप आणला व बाहेर पडवीत डोक्याला हात लावुन बसलेला पाहुन चिंतेने सावित्रीने विचारले असतां, विठ्ठलभक्तीच्या वेडापायी भावने च्या भरात पोराकडुन घडलेल्या पापाची शिक्षा म्हणुन त्याला मारले. एवढ्याशा चुकीला इतकी जबर शिक्षा?सावित्री पेटुन उठली. व गांवपंचायतीत गार्हाणे नेण्याचा निर्धार केला. वस्तीतला पंच धाकुला सोबत घेऊन सावित्री चावडीत रावजी पाटील व चार पंच बसले होते तिथे आली. तिचा तिथं येण्यातला आवेश डोळ्यांतुन उडणार्या संतापाच्या ठीणग्या रावजी पाटलाच्या नजरेतुन सुटल्या नाही कालच्या प्रकाराचा जाब मागायला येण्याची हिम्मत करेल असे त्याला वाटले नाही. त्याचा राग अनावर होऊन जरबेने येण्याचे कारण विचारल्यावर सावित्री म्हणाली, आम्ही वारकरी, विठ्ठलाची माळ घातलेलो, भावनेच्या भरात माझ्या लेका कडुन चुकलं म्हणुन का अर्धमेलं होई स्तोवर मारावं कां? सावित्रीss चोखा थेट मंदिरात शिरतो म्हजे काय?संतापाने सावित्री म्हणाली, आमची सावलीही पडलेली तुम्हा लोकांना चालत नाही ना? मग माझ्या पोराला लाथाबुक्क्यांनी मारतांना, देवळाच्या पायरीवरुन फरफटत ओढत आणतांना तुमची ही सारी मोठी माणसं चोखोबाला मारहाण करतांना शिवली त्यावेळी त्यांना विटाळ, शिवाशिव झाली नाही कां? देवाला जर विटाळ होत नाही तर तुम्हा माणसांना कसा होतो? हे गौडबंगाल काय आहे हे कळलं नाही म्हणुन विचारायला आले.
चोखोबाला मारतांना झालेली शिवा शिव कशी चालते हा सावित्रीचा बिनतोड प्रश्न ऐकुन पंच आवाक झालेत, काय उत्तर द्यावे सुचेना! तेवढ्यात तिथे सावित्री च्या मागेच निघालेला सुदामा, पंचायतपुढे निर्भयपणे उभे राहुन बोलणार्या सावित्री ला पाहुन पुढील होणार्या परिणामाच्या विचारानेच तो गर्भगळीत झाला. पटकण पुढे होऊन तिच्या दंडाला धरुन ओढतच घरी आणले आणि पंचांची संभ्रमावस्थेतु न सुटका झाली.
मंगळवेढ्यात नांदते घर, सुरळीत चाललेला संसार, नीट बसलेली घडी सोडुन पंढरपूरला राहाण्यास जावे की नाही या दोलायमान मनःस्थितीत असलेल्या चोखाला कांहीतरी जबरदस्त झटका बसल्याशिवाय, मन विटल्या शिवाय, पंढरपूर हीच कर्मभूमी आहे हे खरे करण्यासाठी कांहीतरी मोठे
निमित्य घडणे आवश्यक होते आणि ते काम कर कटेवर ठेवुन वीटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाने केले, नव्हे घडवुन आणले. आतां संतांच्या मांदियाळीत आलेले चोखा पंढरपूरात जाऊन एक अलौकीक कार्य त्यांचे हातुन घडणार होते. सुरुवात झाली होती.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १६-४-२०२१.
! ! ! संत चोखामेळा ! ! !
भाग – १७.
मारहानीत झालेल्या जखमांतून बरे व्हायला चोखोबाला बरेच दिवस लागले. सावित्रीचे उपचार, सोयराची रात्रंदिवस सेवा, सुदामाने दिलेला धीर, निर्मळचे प्रेम या सार्यामुळे १॥-२ महिन्यात चोखा बरे झाले. शरीराच्या जखमा बर्या झाल्यात पण मनाच्या?त्या कश्या बर्या होतील?
आपल्या हातुन घडले ते चुक की बरोबर याचे समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने कैक वेळा रात्र रात्र झोप यायची नाही आणि एके रात्री मनाच्या उन्मनी अवस्थेत शब्द उमटले. . . .
“याती हीन मज म्हणती देवा ।
न कळे करु तुमची सेवा ।
आम्हा निचांचे ते काम ।
वाचे गावे सदा नाम । उच्छिटाची आस ।
संत दासाचा मी दास । चोखा म्हणे नारायणा । पदरी घेतले मज दीना । । “
बेभानपणे चोखोबा हा अभंग, स्वरांत उमटलेली आर्तता, दुःखाची तिव्र जाणीव वेदनांची अभिव्यक्ती इतकी विलक्षण होती की, अंगावर पडलेल्या माराच्या प्रत्येक वळाचा, जखमेचा, व्रणाचा हिशोब जणूं ते पांडुरंगाला देत होते, आणि अभि व्यक्तीचे आत्मगान सांगणारे एक नवीन कौशल्य आत्मसात झाल्याच्या नादात मग चोखोबाने स्वतःला झोकुन दिले. विटाळ चांडाळ, अस्पृश्यता हे भेद मानणार्या रुढीमुळे, शरीरावर, मनावर झालेले आघात शब्दरुपात प्रगट होऊन स्वरांच्या माध्यमातुन मुखोद्गत करुं लागले. मग मात्र त्यांनी मागे वळुन पाहिले नाही.
अशातच एक दिवस विलक्षण घटना घडली. चोखोबांना झालेल्या मारहाणीची व जबरदस्त जखमींची माहिती त्यांचा मेहुणा, सोयराचा भाऊ बंकाला कळल्यावर तो भेटायला आला. तोही वारकरी, स्वभावाने शांत, दोघांचेही स्वभाव जुळल्यामुळे एकमेकांना आपली सुख दुःखे सांगायचे, त्यामुळे सहाजिकच तो आल्याचा आनंद चोखोबाला झाला. बंका व चोखा जेवायला बसले असतां निर्मळा वाढत असलेली आपली बहिण मोठी झाल्याची जाणीव चोखोबांना झाली. अचानक त्यांच्या मनांत आले, बंका या आपल्या बहिणीसाठी योग्य वर आहे. त्यादृष्टीने विषय काढल्यावर सर्वांना बंका पसंद पडल्यावर भावकीच्या रिवाजानुसार सर्व ठरल्यावर लग्नाच्या तयारीत आणि आनंदात चोखा शरीरा च्या व मनाच्या जखमांचा विसर पडला. नंतरचे दिवस चांगलेच धावपळीत गेले.
निर्मळाचे लग्न उत्तमरितीने पार पडले. बंकाचे वडील यमाजी आणि सुदामा आधी मित्र होतेच आता सोयरा चोखाच्या व आतां निर्मळा बंकाच्या लग्नामुळे आणखी जवळ येऊन दोन्ही घरं एक झाली. लग्नाची गडबड शांत झाल्यावर चोखोबांच्या मनांत एक वेगळाच विचार फेर धरु लागला.
आषाढी एकादशीवेळी चोखा पंढरपूरला गेले तेव्हा संतांच्या संगतीत त्यांच मन चांगलच रमल होतं. शिवाय पंढरपूर हीच तुझी कर्मभूमी” असे म्हणुन पंढरपूरला येण्याचे अगत्याचे आमंत्रणही दिले होते. तशातच देव व देऊळही बाटवले म्हणुन केलेल्या मारहाणीने त्यांच्या मनावर जन्मभराचा ओरखडा उमटला होता. निर्मळाचे लग्न झाल्यामुळे त्यांच्यावरची जबाबदारीही संपली होती. म्हणुन कायमचे पंढरपूरला वास्तव्य करायचे त्यांच्या मनाने घेतले. खरंतर याच प्रश्नाने ते गेले कित्येक दिवस त्रस्त होते व त्याच उन्मानी अवस्थेत मंदिरात शिरले, आणि देव बाटवला म्हणुन गांवकर्यांनी त्यांना अर्धमेला केले.
या घटनेने एक मात्र झाले, मनाला सतावणार्या प्रश्नाचे उत्तर आपोआपच मिळाले. ज्या गांवाने आतांपर्यत विश्वास दाखवला, ज्या गावकर्यांनी त्यांच्या कामावरच्या निष्ठेचे कौतुक केले, ज्या ब्राम्हणआळीने त्यांचे निटनेटके काम पाहुन गोडाधोडाचा घास काढुन ठेवत असत, त्यांनीच लाथा बुक्क्यांनी तुडवले. चोखोबांचे निष्पाप मन पुरते हादरले. जखमी झाले. लग्नाची धामधुम संपल्या वर मात्र मनाच्या जखमेवरची खपली निघाली कारण परत गावकीच्या कामावर गेल्यावर लोकांच्या बोचर्या तिरस्कृत नजरा पाहुन घायाळ मनाने घरी परतले तेच मुळी पंढरपूरला जाण्याच्या इराद्यानेच! सावित्रीने इतकी नीट बसलेली घडी सोडुन न जाण्याबद्दल मन वळवण्याचे बरेच प्रयत्न केले, पण चोखोबा आपल्या निर्णयावर ठाम असल्यामुळे नाईजाने शेवटी सर्वजण जाण्यास तयार झाले आणि बांधाबांधी करायला सुरुवात केली.
चोखोबांच्या पंढरपूरला कायमचे येण्याच्या पक्क्या निर्णयाने पांडुरंगाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आतां चोखोबा भक्तांच्या परिवारात सामील होईल. अस्पृश्यतेचे, विटाळ चांडाळाचे क्लेश कमी होऊन, संत परिवारात निश्चिंत मनाने वावरुन निरामयपणे भक्ती करुं शकणार होते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १६-४-२०२१.
! ! ! संत चोखोबा ! ! !
भाग – १८.
आतां चोखोबांच्या प्रतिभेला, सृजनशीलतेला, शब्दवैभवाला फुलोरा येणार होता. संतरत्नांच्या हारामधे हे नवीन रत्न बुध्दीवैभवाने लखलखणार होते. आणि हा निर्णय घेण्याचे धाडस करण्यास विठ्ठल सखा नामदेव कारणीभूत होते आणि त्यामुळेच ही गोष्ट नामदेवाला कधी सांगतो असं विठ्ठलाला झाले होते. नामदेव तर तिर्थयात्रा करत फिरत होते. त्यांना नुसती बातमीच सांगायची नव्हती तर पंढरपूरला आल्या वर चोखोबाच्या राहण्याची व चरितार्था ची व्यवस्था करायची होती. त्यानंतरच चोखोबा निर्वेधपणे विठ्ठलभक्ती करुं शकणार होते. म्हणुनच नामदेवांच्या येण्याकडे विठ्ठलाचे लक्ष लागुन राहिले ,
चोखोबांनी आपले कुटुंब व सामानासह पंढरपूरच्या वेशीबाहेर बसवुन, नामदेव यात्रेहुन आलेले नसल्या मुळे सरळ गोरोबाकाकाकडे गेले. त्यांनी दिलेल्या गाढ अलिंगनाने क्षणभर मंगळ वेढ्यात घडलेली घटना सांगायचा मोह झाला, पण प्रथम नामदेवांनी सांगावी असे ठरल्यामुळे त्यांना जुजबी उत्तरे देऊन, नामदेवांची चौकशी केल्यावर ते उद्या येणार असल्याचे कळल्यावर, गोरोबांच्या पायावर डोके ठेवुन निरोप घेतला व जिथे कुंटुंबमंडळी होती तिथे आले. तोवर सावित्री-सोयराने दगडाची चूल मांडुन बनवलेला झुणका भाताचे जेवण सगळ्यांनी केले. उद्या नामदेव येणार तोवर या झाडाखालीच रात्र काढण्याचे ठरल्यावर, सावित्री सोयराच्या मनांत आले, आपण घरदार सोडुन आलो ही चुक तर केली नाही ना?नामदेव उद्या आले नाही तर?आल्यावरही त्यांनी लक्ष दिले नाही तर?सगळे प्रश्नच प्रश्न! उबदार निवारा असलेलं घर सोडुन इथे उघड्या वर रात्र काढायची म्हणजे सोयरा, सुदामा सावित्री तिघेही मनांतुन अस्वस्थ होते. पण, चोखोबा मात्र निश्चिंत होते. त्यांना स्वतःच्या निर्णयावर! नशीबावर भरोसा होता. त्याहीपेक्षा पांडुरंग व नामदेवार कुठलीही चिंता, आशंका मनांत न बाळगता दृढ विश्वास होता. रात्र सरली.
दुसर्या दिवशी सावित्री सोयराने भाकरी कालवण बनवले. सर्वांनी दोन दोन घास खाण्याच्या उद्देशाने चोखोबा ला आवाज दिला पण ते आपल्याच तंद्रित, नामदेवांची आतुरतेने वाट बघत होते, त्यामुळे त्यांना हाका ऐकु आल्या नाहीत. मात्र गोरोबाच्या पहिल्याच हाकेने ते भानावर आले. समोर साक्षात नामदेव, गोरोबा, सावतामाळी, जनाबाई उभे दिसले. सार्या कुडीचे पंचप्राण नजरेत एकवटुन चोखोबा नामदेवांकडे बघतच राहिले. त्यांनी नामदेवांच्या पायावर लोळण घेतले. कितीतरी वेळ चोखोबा प्रेमालिंगात होते. मग सगळ्यांनीच उरी भेट घेतल्यानंतर, झाडाच्या गार सावलीत धुळीतच सार्यांनी बैठक मारली. विस्फर ल्या नेत्रांनी सुदामा, सावित्री, सोयरा हे दृष्य बघत होते. शिवाशिवी, अस्पृश्यतेचे कसलेच सावट त्या आपुलकीच्या संबंधात नव्हते.
चोखोबा! पांडुरंगाने तुमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी आमच्यावर टाकली आहे. चोखोबा! मंगळवेढ्यात जे घडलं ते अत्यंत निंदनिय वाईट होतं, पण ती समाजाची मानसिक ता होती. ती आपण एकदम बदलु शकत नाही. आपण वारकरी तत्वे पाळतो म्हणुन इतरांनीही ती पाळावी अशी जबरदस्ती कोणावरही करुं शकत नाही गावकीची परंपरा, भावकीचा रिती रिवाज, समाजाच्या चालीरीती पाळणे आपल्यावर बंधनकारक असल्यामुळे, गावाच्या दक्षिणेला अस्पृश्य लोकांची वस्ती आहे तिथे तुम्हाला खोपटं बांधण्या साठी मी जागा व उदनिर्वाहाची सोय उपलब्ध करुन देतो. तुम्ही आतां आमच्यात आलांत. कसलीही काळजी करुं नका, पण याबरोबरच अभंगरचना करायला विसरुं नका.
नामदेवांचा प्रत्येक शब्द चोखोबा कानांत प्राण आणुन ऐकत होते. त्यांच्या शब्दाशब्दातुन नवा साक्षात्कार, जीवना ची नवी दृष्टी मिळत होती. फक्त नामदेवच नाही तर, इतर संतांनीही त्यांच्याशी दाखवलेली जवळीक, प्रेम आणि अत्यंत मधुर व आपुलकीच्या शब्दात समाजाचे रीतीरिवाज पाळण्याबद्दल केलेले मार्ग दर्शन, नीट बस्तान बसवुन देण्याचे आश्वासन, संपूर्न कुटुंबाच्या उदरनिर्वाहा ची व कल्याणाची घेतलेली जबाबदारी हे बघुन सुदामा, सावित्री, सोयरा अचंभित होऊन, चोखाविषयीचा अभिमान मनांत मावत नव्हता. डोळ्यावाटे अश्रूरुपाने ओसंडुन वाहायला लागला. सगळ्यांच्या मदतीने सामान गोळा होऊ लागले. पंढरपूरांत कायमचे रहायला येण्याबद्दल सुदामा-सावित्रीच्या मनांत असलेले किल्मिष पार धुतल्या गेले. सर्वानीमिळुन चोखांचे सर्व सामान अस्पृश्य वस्तीत आणले. तिथे वयोवृध्द व पुढारी असलेल्या गणाला चोखोबाची सारी माहिती देऊन त्यांना लागेल ती मदत देण्यास सांगीतले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १७-४-२०२१.
! ! ! संत चोखामेळा ! ! !
भाग – १९.
नामदेवांविषयी गांवात अतिशय आदर होता. त्यांनीच चोखोबांची ओळख करुन दिल्यामुळे गणाच्याही मनांत चोखाबद्दल आदर आणि आपुलकी निर्माण झाली. गणा स्वतः वारकरी असुन त्यानेही माळ घातलेली होती. नामदेव त्यालाही उराउरी भेटले. गणाच्या शेजारी चोखोबाचे खोपटे बांधायचे ठरवुन सर्व मंडळींनी निरोप घेतला.
गणासारखा अनुभवी बुजुर्ग आणि वारकरी शेजारी लाभल्याचा आनंद चौघांनाही झाला. गणाने वस्तीवरच्या ४-५ तरुणांच्या सहाय्याने संध्याकाळ पर्यंत चोखोबाचे खोपटे उभारल्या गेले. तिसर्या दिवशी सकाळीच काम घेऊनच गोरोबा त्यांच्याकडे आले. मंदिराजवळ एका धर्मशाळेच्या बांधकामावर रात्रीचा पहारेकरी म्हणुन चोखोबाची नेमणुक केली. महिन्याला दोन होन, सहा माणसांना पुरेल एवढा शिधा असे वेतन ठरले. दुसरे दिवशीपासुन कामावर हजर व्हायचे होते.
रात्री सर्वजण जेवायला बसले असतां सावित्रीचे मन पुत्रकर्तृत्वाने इतके भारावले की, तिला अन्नाचा घास उतरेना, ते पाहुन काळजीने चोखोबाने विचारले! माय! कां ग जेवत नाही?जीवाला बरं नाही कां?मुलाने जिव्हाळ्याने विचारपुस केल्यामुळे तिच्या डोळ्यांतुन अश्रू वाहु लागले. लेकरा! तुझ्यासारखा लेक माझ्या पोटी आला, सारं भरुन पावली. आयुष्य धन्य झालं. पंढरपूरला येतांना नाना शंका
मनी होत्या, पण इथे आल्यावर सगळं ऐकलं, बघीतलं, अनुभवलं, मोठमोठ्या मंडळींचे दर्शन झालं, विठ्ठल मंदिराचं दर्शन झालं. लेकरा! भरलं माझं पोट! आतां एकच इच्छा आहे, नातू बघायची! तेवढी पूर्ण झाली की, आम्ही मरायला मोकळे. . . त्यावर सुदामाने तिची मस्करी केली. हसत खेळत जेवणं झाली.
रात्री झोपतांना मिस्किलपणे चोखोबा सोयराला म्हणाले, आई काय म्हणाली, त्याबद्दल माझा तर विचार पक्का आहे, तुझा विचार सांग. सोयरा लाजेने चूर होऊन त्यांच्या कुशीत शिरली
दुसर्या दिवशी पासुन रात्रीची भाकर बांधुन कामावर हजर होणे, सकाळी भावकीची व इतर कामकाज करणे आणी संध्याकाळी संतमंडळीत जाऊन बसणे, चांगले विचार ऐकणे, विठ्ठलाची भक्ती, भजन गाणे, किर्तन ऐकणे, आणि प्रतिभेची कृपा झालीच तर अभंग रचना करणे असा चोखोबांचा दिनक्रम सुरु झाला. अनंतभट नांवाचा एक ब्राम्हण या संतमंडळीत नेहमी येऊन बसायचा. चोखोबांनी केलेली अभंगरचना लिहिण्याची कामगिरी नामदेवांच्या सांगण्यावरुन स्वेच्छेने व आनंदाने त्याने आपल्या शिरावर घेतली. चोखोबांच्या मुखातुन स्रवणार्या प्रतिभेला, अभंगरचने ला लिखित स्वरुप प्राप्त झाले. त्यांच्या प्रतिभेला आणखी बहर आला. नामदेव पंढरपूरात असले की, रोज त्यांचे किर्तन व्हायचे, त्या किर्तनाला चोखासहित सारे कुटुंब हजर असायचे. नामदेवांच्या सतत सहवासात असल्यामुळे चोखांच्या शब्द रचनेवर, अभंगरचनेवर इतका जास्त परिणाम होऊ लागला की, तेही नामदेवां प्रमाणेच अभंगरचना करुं लागले.
एक दिवस नामदेव पंढरपूर या वैकुंठनगरीबद्दल अभंग गाऊ लागले. . .
“अवघी ही पंढरी । सुखाची ओवरी ।
अवघ्या घरोघरी । ब्रम्हानंद । । “असं गात त्यांनी वैकुंठनगरी पंढरपूरचे विलक्षण देखणे वर्णन आपल्या शब्दांतुन उभे केले नंतर जनाबाईंनी अभंग गायला सुरुवात केली. . . .
“तूं माझे माहेर । काय पाहसी अंतर ।
सर्व सुखाचा आगर । उभा असे विटेवर ।
ओवाळुनी पाया । जीवे भावे पंढरीराया । ।
जनीची आंतरिक, उत्कट शब्दरचनेत सगळे गुंगुन गेले. यानंतर जबलपूरजवळ बांदूगड येथे राहणारे सेना न्हावींचे पंढरपूर व विठ्ठलाच्या दर्शनाने भान हरपून भावनोत्कट आवाजांत त्यांनी अभंग गायला सुरुवात केली.
“विटेवरी उभा । जैसा लावण्याचा गाभा । ।
पायी ठेवुनही माथा । अवघी वारली चिंता ।
समाधान चित्ता । डोळा श्रीमुख पाहता । ।
बहुजनी केला लाग । सेना देखे पांडुरंग । “
सेना न्हाव्यांचा भावपूर्ण अभंग ऐकुन सगळ्यांच्याच डोळ्यांत पाणी आलं. चोखोबा तर अगदी भारावुन गेले. तोच नामदेव म्हणाले, चोखोबा! तुम्ही नुकतेच या वैकुंठनगरीत प्रवेशले. ही वैकुंठनगरी कशी वाटली हे तुमच्या मनांतील भावनांना शब्दरुप देऊन ऐकु द्या.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १७-४-२०२१.
! ! ! संत चोखामेळा ! ! !
भाग – २०.
चोखोबा थोडे गांगरले. इतक्या महान विभूतींसमोर वैकुंठनगरीचे आपण वर्णन करायचे? संकोच्याने त्यांनी सर्वां वर नजर टाकली तर सगळ्यांच्याच डोळ्यात अपेक्षा, आर्जव आणि विश्वास दिसला. चोखोबांनी नमस्कार करुन खड्या आवाजांत गायला सुरुवात केली.
“टाळी वाजवावी गुढी उभारावी ।
वाट हे चालावी पंढरीची ।
खटनट यावे शुध्द होऊन जावे ।
दवंडी पिटी भावे चोखामेळा । ।
विठ्ठल विठ्ठल गजरी ।
अवघी दुमदुमली पंढरी ।
होतो नामाचा गजर ।
दिंड्या पताकाचा भार । ।
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान ।
अपार वैष्णव ते जाण ।
हरी किर्तनाची दाटी ।
तेथे चोखा घाली मिठी ।
पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी ।
प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे । । “
किंचित कापरा, पण भरीव आवाज, स्वरांतुन शब्द उत्स्फुर्तपणे अभिव्यक्त होणे, अंतरीची तळमळ, पंढरपूरला रहायला मिळालेली सार्थकता, त्यातच दवंडी पिटवण्याच्या आपल्या परंपरागत व्यवसायाचा खुबीने केलेला उल्लेख, कोणत्या गोष्टींमुळे ती पावन झाली याचे वर्म, या सगळ्यांचा अंतर्भाव करुन चोखोबांनी रचलेला हा अभंग एखाद्या जाणकाराच्या तोडीचा होता. यातील शब्द वैभव, चपलख, शब्दरचना, प्रतित होणारा नेमका भाव या सगळ्याचा परिणाम म्हणजे नामदेवादी संतमंडळीत चोखोबा एकदमच मोठे झाले.
चोखोबांचे दैनंदिन कामकाज नेमके नेटके चालु असतांनाच त्यांच्या घरांत एक आनंदाची बातमी कळली, सोयराला दिवस गेल्याची! वंशाचा दिवा सोयराच्या पोटांत वाढत होता. पंढरपूर व परिसरा मधे चोखोबाचे नांव आदराने घेतले जाऊ लागले. अस्पृश्य जातीत असुनही उत्कट विठ्ठलभक्तीनं एक वेगळाच स्तर प्राप्त झाला. चोखोबाचे रोजचे बोलणे ऐकुन सुदामालाही विठ्ठलभक्तीची गोडी लागली वारी तर त्यांच्या घरांत होतीच. मानसिक समाधान आणि निश्चिंतताचे दान विठ्ठला ने आपल्या पदरांत घातल या समर्पित भावनेने सुदामा विठ्ठलभक्तीत रंगुन गेले.
एके दिवशी संध्याकाळी चोखोबा स्वरचित विठ्ठलभजन गात अंगणांत बसलेले सुदामा समर्पित भावनेने विठ्ठल चरणी विलीन झाले. विठ्ठलभजन गात असतांनाच त्यांचे प्राण शरीराच्या कुडीतुन कधी निघुन गेला, कुणालाच कळलं नाही. अगदी शेजारी टाळ वाजवत बसलेल्या सावित्रीलासुध्दा. . . .
सुदामाच्या अश्या अचानक जाण्याने तिघांवर जणुं आभाळच कोसळले. वास्तविक सुदामा थकला होता म्हातारा झाला होता. कसलेही कामकाज होत नव्हते. पण त्याचं शांत अस्तित्व घरादाराला धीर देणारे होते. त्यावर काळ हेच औषध होते. दैनंदिन कामकाजात स्वतःला गुंतवुन हे डोंगराएवढे दुःख पचवलं होतं. सोयरा, चोखोबा आणि सावित्रीने पण! तिचं तर सौभाग्य हरपलं होतं. आयुष्याचा जोडीदार अर्ध्या वाटेवर च हात सोडुन निघुन गेला होता. अति उत्साहाने नातवाची वाट बघत, लाडक्या सुनेचे कोडकौतुक करणारी, चोखोबाचा मोठेपणा अत्यंत स्वाभिमानाने मिरवणारी सावित्री या धक्क्याने पार कोलमडुन गेली होती. नातवाचं तोंड बघुन मरणाची इच्छा धरणारी सावित्री आतांच मरणाची भाषा बोलुं लागली. सुदामा गेल्यानंतर कांही दिवसांतच तापाचे निमित्य होऊन नातवाचं तोंड न बघतांच सुदामापाठोपाठ ती पंचतत्वात विलीन झाली. हा धक्का पचवणं मात्र चोखोबा सोयराला अतिशय अवघड गेलं. चोखोबांचा जीव वडीलांपेक्षा आईवर जास्त होता. एकदम कोसळलेल्या या दोन धक्क्यांनी चोखोबा स्वैरभैर झाले.
चोखोबांची भूक तहान हरपली. घरांत चैन पडेना. कामात लक्ष लागेना. स्वैरभैर घायाळ झालेले चोखोबा सावरल्या गेले ते नामदेवांमुळेच, संतपरि वारामुळेच! अत्यंत प्रेमाणे नामदेवांनी त्यांना मिठीत घेतले मात्र, आणि आतां पर्यंत घरांतील कर्ता, खंबीर पुरुष अशा भूमिकेतुन सगळ्यांना धीर देणारे चोखा नामदेवांंच्या मिठीत लहान मुलासारखे स्फुंदुन स्फुंदुन, हुंदक्यावर हुंदके देऊन रडुं लागले. त्यांना पोटभर रडु दिले. दिलासा देत मूकपणे त्यांच्या पाठीवर हात फिरवत राहिले. नामदेवांच्या प्रेमळ स्पर्शाने दुःखाचा वेग ओसरला, भार हलका झाला. आई वडील जरी सोडुन गेले तरी नामदेव व इतर संत परिवार आपल्याला आई वडीलांइतकेच आधार वड आहेत या विश्वासाने चोखोबा सावरले आणि पोटुशी असलेल्या बायको कडे आपणच लक्ष दिले पाहिजे या जबाबदारीची जाणीव झाली आणि परत ते दैनंदिन कामकाजाला लागले,
चोखोबाला पंढरपूरात आणुन स्थिर स्थावर केल्यावरही पांडुरंगाचे काम अजुन संपलेले नव्हते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.


