
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
संत चोखामेळा संपूर्ण चरित्र ! !
! ! ! प्रस्तावना ! ! !
नमस्कार ! !
आपल्या समोर घेऊन येत आहे, “संत चोखामेळा” यांच्या चरीत्र्याचा अभ्यास करतांना, संत चोखामेळांच्या जीवनात घडलेल्या अनेक नाट्यमय प्रसंगांचा आणि संत श्रेष्ठत्वाच्या पदा पर्यंत पोहचलेल्या त्यांच्या विलक्षण प्रतिभेचा एक वेगळाच साक्षात्कार मला आला. त्यांच्या जीवनात घडलेल्या अतर्कीक घटनानी जणूं मला झपाटले. संत चोखामेळा सारख्या श्रेष्ठ संतांची आयुष्यभर झालेली ऊपेक्षा माझ्या संवेदनशील मनाला फार लागुन गेल्यात, आणि भगवद् गीतेतला एक श्लोक आठवला. . .
“अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथविक्वधम् ।
विविधाश्च पृथकचेष्टा दैवं चैवात्र पश्चमम् ।। “
चोखोबांच्या संतपदाला, भक्ती प्रमाण्यते ला आणि निखालस प्रांजलपणाला कुठही धक्का लागणार नाही याची काळजी घेतली. त्यामुळे त्यांच्या उपेक्षित पण विलक्षण जीवनप्रवाहाला न्याय मिळवुन देण्याचा अल्पसा प्रयत्न केला.
त्यांच्या संपूर्ण जीवनाबद्दल सांगायचे तर, चोखामेळा, त्यांचा पूर्ण परिवार म्हणजे त्यांचे आई वडील सुदामा-सावित्री, पत्नी सोयरा, बहिण निर्मळा, मेहुणा बंका आणि पुत्र कर्ममेळा, याचबरोबर त्यावेळची समाजव्यवस्था, तसेच चोखोबांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्ती, त्यांचा समकालीन संत परिवार, त्या त्या प्रसंगी त्यांच्याबद्दल आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
चोखोबांचे आई वडील सावित्री- सुदामा यांच्या नांवाबद्दल कांही अभ्यासकांमधे मतभेद आहेत. त्यांच्यामते चोखोबाच्या आईचे नांव मीरा व वडीलां चे निवृत्ती! परंतु बहुमत ग्राह्य धरुन त्यांच्या आईवडीलांचे नांव सावित्री सुदामाच कायम ठेवले.
संत चोखामेळा यांच्या विलक्षण आयुष्यापेक्षाही त्यांचा मृत्यु, आणि मृत्यु नंतरही त्यांच्या अस्थीतून येणारी भक्ती जास्त विलक्षण आहे.
चोखोबांचे चरित्र लिहितांना अनेक गोष्टींचे भान ठेवले, तरीही कांही तृटी, कांही उणीवा, कांही चुका झाल्या असतीलही तरी एका उपेक्षित संताबद्दल न्याय्य लिहिले ही माझी प्रांजल भावना समजुन आपण माफ करावे.
नेहमीप्रमाणेच आपल्या क्रीया प्रतिक्रीया अपेक्षीत!
मिनाक्षी देशमुख.
संत चोखामेळा
भाग – १.
मेहुणपुरात राहणारा सुदाम येसकर हा अनुसुचित जातीतील एक सत्शील, निर्व्यसनी तरुणासोबत सावित्रीचे लग्न झाले. सावित्रीला या गुणी नवर्याबद्दल अतिशय अभिमान होता. त्यांचा संसार सुखाने सुरु होता, पण लग्नाला ४-५ वर्षे होऊनही सावित्रीची कुस उजवली नव्हती. त्यांची जात बारा बलुतेदारातील मानाची होती, तरीसुध्दा बलुतेदाराचे हक्क कमी मिळत आणि कामं मात्र भरपूर असे. त्यावेळी मुलखात यवन घुस खोरी करुन लुटालुट करीत. त्यासाठी गांवात गस्त घालणे, निरोप पोहचवणे, कांही सरकारी कागदाची ने आण करणे अशी कामं करावी लागत, त्यातच उच्च वर्णीयांकडुन नेहमीच अपमानही सहन करावा लागत. गावाची स्वच्छता करतांना आपली सावली त्यांच्यावर पडणार नाही याची दक्षता घ्यावी लागे. त्यांच्या विहिरी, पाणवठे, वेगळे असत. तिथही शिवाशिवी होतीच. तिरस्काराच्या थुंक्या झेलने हे रोजचेच होते. परंतु त्यातही रघुनाथ भट, श्रीपती पाटील यांच्या सारखी कांही लोकं समाजाचा गाडा चातुवर्णाच्या चाकांवर चालविणारे होते.
सुदामाचे काम आटोपले की, ते विठ्ठल मंदिराच्या दाराशी जाऊन बसायचे सुदामा येसकर हा पापभीरु, देवभोळे होते. त्यांच्या घराण्यांत पंढरपूरच्या वारीची चाल होती. ते वारकरी असुन विठुरायावर अनन्यभक्ती होती. त्यामुळेच पोटी संतान नसल्याची खंत न मानता, त्याच्यावर दृढ विश्वास असल्याने, पती पत्नी आपले आयुष्य सुखासमाधानाने जगत होते. ते पत्नीची समजुत घालुन विठ्ठलावर विश्वास ठेवण्यास सांगत असे.
असेच दिवस चालले असतांना, कोरेगांवच्या बुधाजी पारळांकडुन सांगावा आला. हा पाटील फार धार्मिक असुन त्याची विठ्ठलभक्ती पंचक्रोशीत प्रसिध्द होती. पंढरपूरची एकही वारी ते चुकवित नसत. घरांत आलेली कोणतीही वस्तु अथवा शेतातल पिक विठोबाला दाखवल्याशिवाय वापरत किंवा खात नसे. यावर्षी त्यांच्या शेतातील झाडांना खुप आंबे आले. नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे निवडक आंबे पंढरपूरच्या विठोबा ला देण्यासाठी व जास्त आंबे असल्या मुळे पती पत्नीमिळुन नेण्यास सांगीतले. मे महिन्यातील कडक उन्हाळाचे दिवस, अंग भाजणारे ऊन, खाली पायाची सोलटी सोलणारा फुफाटा अशा कडक उन्हात सुदामा व सावित्री अनवायी पायाने पंढरपूरकडे निघाले.
भयंकर उन्हात तहानेने घसा कोरडा पडला. पण कुठेही पाणी, एवढच काय वाटेत नदी ओढा लागला तरी पाणी पिण्यास मनाई होती. मग कुणातरी वाट सरुला हाकारुन, त्याची मिनतवार्या, अजिजी करुन त्याने दिलेल्या पाण्यावर तहान भागत असे. एखादे
गाव लागले की, भाकर तुकडा खायचं, दिलेलं पाणी प्यायचं आणि परत चालु लागायच! तापलेल्या फुफाटातनं चालुन सावित्रीच्या पायाला फोडे आले. मग झाडाची पाने पावलांना बांधुन चलायच, पण चलायचच होत.
मजल दर मजल करत, उन्हाची, फुफाट्याची, सोसाट्याच्या वार्याची तमा न बाळगतां सुदाम सावित्री पंढरपूरजवळ आले असतां, सावित्रीला ऊन्हाचा त्रास सहन न झाल्याने एका झाडाखाली, डोक्यावरची पाटी उतरवुन बाजुला ठेवुन विश्रांतीसाठी शांतपणे डोळे मिटुन बसले असतां, त्यांच्या कानावर अचानक आवाज आला. माई! मी दोन दिवसांचा उपाशी आहे, मला कांहीतरी खायला दे! या गरीब ब्राम्हणाचे आशिर्वाद लाभेल.
आवाजासरशी दोघांनी डोळे उघडुन समोर बघीतले तर, डोक्याचा घेरा, त्यातील शेंडी, सोगा खांद्यावर, फाटकं धोतर, अंगात फाटकी बंडी, दिनवाना चेहरा, शरीर अत्यंत क्रुश, भव्य कपाळावर लावलेले उभे गंध, तेजस्वी स्नेहार्द डोळे त्याच्या बुध्दीमत्तेची व प्रेमळपणाची साक्ष देत होते. माई! दोन दिवसांपासुन उपाशी आहे. खायला कांही तरी दे ग! पती पत्नी विचारात पडले, आपण हीन जातीचे, हा ब्राम्हण?आपल्या हातचं कसं खाणार?आंब्याशिवाय आपल्याजवळ दुसरं कांही नाही, आंबेही दुसर्याचे, ते विठुरायापर्यंत पोहचवायचे, मग? शेवटी सुदामा म्हणाला, महाराज! आपण ब्राम्हण आम्ही हीन जातीचे, शिवाय आमच्या जवळ द्यायलाही कांहीच नाही. त्यांच्या बाजुला असलेल्या टोपल्यांकडे पाहुन म्हणाला, यात फळं दिसतात, यातील एखादे तरी फळ दे ना!
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
! ! ! संत चोखामेळा ! ! !
भाग – २.
त्या ब्राम्हणाच्या स्वरांतील अजिजी खरी होती, पण त्याचे तेजपुंज डोळे?त्याच्या विनवणीत लाचारी नव्हती तर एक लोभस, लाडिक आर्जव होते. सावित्री ला त्याचे ते लोभस, लाडिक भाव आणि त्याच्या डोळ्यांतील तेज आपल्या ह्रदयांत साठवीत जपुन ठेवावेसे वाटले.
अनवधाने म्हणाली, घ्या महाराज घ्या एक आंबा, सुदामा अगss अगss करतोय, तोवर एक आबा त्या ब्राम्हणाच्या झोळीत टाकला व त्याच्यापुढे नमस्कारा ला वाकली असतां, त्याने प्रसन्नपणे आशिर्वाद दिला. . . पुत्रवती भव्! तुझ्या घराण्याचं नाव मोठ करणारा मुलगा होईल, असा आशिर्वाद देऊन निघुन गेला सावित्री आनंदाने अस्मान ठेंगणे झाले.
दोघांनी आपापल्या टोपल्या उचलुन वाट चालु लागले, तेवढ्यात हाक आली माईss थांब! मागे वळुन पाहिले, तर तोच ब्राम्हण अर्धवट चोखलेला आंबा घेऊन दिसला. त्याच्या लोभस चेहर्याकडे बघीतल्यावर, पाटलाच्या पडवीतल्या भिंतीवर लावलेला फोटो, गवळणीच्या खोड्या काढणार्या खट्याळ श्रीकृष्णा सारखा दिसला, म्हणाला! माई, घे तुझा आंबा, नको मला, आंबट आहे असं म्हणत तो आंबा सावित्रीच्या ओटीत टाकुन झपा झप चालत वळणावरुन दिसेनासा झाला नंतर पंढरपूरला पोहचल्यावर बुधाजी पाटलाने विठुरायासाठी आंबे दिल्याचे तेथील बडव्यांना सांगीतलं. त्याने आंबे मोजल्यावर एक आंबा कमी का? असे विचारल्यावर, सावित्रीने वाटेत घडलेली हकिकत सांगीतली, पण विश्वास न बसल्याने, शिवीगाळ करुन हाकलुन दिले. दोघांनी मंदिराच्या कळसाला नमस्कार करुन गांवाबाहेरील एका झाडा खाली विसावले. दोन घरुन भाकर पाणी आणुन खाऊन धरणीचे अंथरुण व आकाशाचे पांगरुण करुन तिथेच झोपले. सावित्री झोपेत असतांना आपल्या सर्वांगात तेजाचा एक प्रज्वलित कण मनांत, ह्रदयात खोल खोल कप्प्यात उतरत असल्याचा विलक्षण भास झाला. गाढ झोपेतली सावित्री धडपडुन उठुन बसली. सगळीकडे शांतता स्तब्धता, त्या निरव शांततेत तिला तो नाद स्पष्ट ऐकु आला. विठ्ठलाss विठ्ठलाss जय हरी विठ्ठला । विठ्ठलाss विठ्ठलाss जय हरी विठ्ठलाss ! झुंजमुंज व्हायला आली. गाढ झोपलेल्या निरागस नवर्याकडे पाहुन आपण त्यांना एक बाळ देऊ शकत नाही याचे तिला वैषम्य वाटले. अचानक त्या ब्राम्हणाचा आशिर्वाद व रात्री स्वप्नात पाहिलेले तेजाचे आरपार जाणे, नीरव शांततेत घुमणारा विठ्ठलाचा गजर! तिने भक्तीभावाने डोळे मिटुन मंदिराच्या कळसाला नमस्कार करुन सुदामाला उठवले.
दोघेही घरी परतले. त्यांचा रोजचा दिनक्रम सुरु झाला. आणि सावित्रीला दिवस गेल्याचे लक्षात आल्यावर दोघांना ही अतिशय आनंद झाला. यथावकाश सावित्रीने एका गोंडस बाळास जन्म दिला. त्या ब्राम्हणाने चोखलेला आंबा प्रसाद म्हणुन खाल्ल्याचेच हे फळ आहे. याची सावित्रीला खात्री वाटली. बाळाचे नांव चोखामेळा ठेवण्याचे ठरविले.
कर कटेवर ठेवून विटेवर उभा असलेला तो काळा विठ्ठल सारं अपूर्वाईनं बघत होता. त्याच्या भक्तमेळ्यात आणखी एक मोलाची भर पडणार होती. चोखामेळा! मलिन असुनही जो चोख आहे, अपवित्र असुनही जो पवित्र आहे तो चोखामेळा! विठ्ठलालाही आनंद झाला तो वाट बघत होता एका भक्त शिरोमणीची. . . .
चोखा जसजसा मोठा होऊ लागला तसं त्याला आवरतां आवरतां सावित्री दमुन जात होती. सुदामाही गावकीची कामे भराभर आटोपुन पोराच्या ओढीने, त्याचे लाड करायला, खेळायला लवकर घरी येत असे. विठोबा च्या रंगाचं हे काळं सावळं पोर बुध्दीने तल्लख व स्वभावाने शांत होता. मुलांमधे मिसळायला, शिव्या भांडणे करायला त्याला आवडत नसे. सुदामाने त्याला खेळायला एक लाकडी बाहुला दिला होता. चोखा त्या बाहुल्याला रोज आंघोळ घालणे, उभे गंध लावणे, तो बाहुला विठोबासारखा दिसायचा, सावळ्या विठोबाचे त्याला भारीच वेड! त्यांच्या घरात वारी होतीच. त्याचे वडील सुदामा वारीतील गमती जमती सांगायचे. विठोबा च्या नामगजराने, जयघोषाने आसमंत कसा दुमदुमुन जातो याचे रसाळ वर्णन करायचे. मग चोखा त्या विठ्ठलमूर्तीकडे तासन् तास पाहत किंवा त्याच्याशी बोलत बसायचा. बाहुल्याची जशी रोज आंघोळ घालायचा तसच रोज स्वतःच्या आंघोळीसाठीही हट्ट धरुन बसायचा
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १२-४-२०२१
! ! ! संत चोखामेळा ! ! !
भाग – ३.
कांही दिवसांनी सावित्रीने एका गोड मुलीस जन्म दिला. चोखोबाचा पायगुण म्हणुन तो आणखीणच लाडाचा झाला. घरी दारीद्र्य, गरीबी असली तरी, तो आई वडीलांच्या छत्र छायेत व कोड कौतुकात चोखाचे बालपण समृध्द आणि सुनिश्चितेत जात होते. चोखाची बहिण निर्मळा हळूहळु मोठी होत आईच्या कामात व चोखा बापाच्या कामात मदत करुं लागले. गावकीच्या कामकाजात सुदामा मदतीला चोखोला मदतीला नेऊ लागला. विशेषतः रस्ते झाडायला. चोखा झाडण्याचे कामसुध्दा मन लावुन स्वच्छ तेही सकाळी लवकर करीत असे, ब्राम्हण आळी झाडायला त्याला मनापासुन आवडे. कारण सकाळी सकाळी ब्राम्हण आळीतल्या घरांतुन अभंग, देवाची गाणी, मंत्र ऐकायला त्याला फार आवडयचं.
चोखाचं रस्ता स्वच्छ करण्याचं काम पाहुन, कुळकर्ण्याची माई, कृष्णाजीपंतां ची शारदावहिनी, आबाजी कुळकर्ण्यांची सुभद्राताई यांना चोखोबाचे भारी कौतुक वाटे. त्या त्याला कांही खायला दिले की, तो आधाशासारखा एकटा न खाता आपल्या धाकट्या बहिणीसाठी राखुन ठेवतो हे त्यांना फारच कौतुकास्पद वाटायचे. मग त्या ब्राम्हणस्रीया बहिणी साठी वेगळं देऊ लागल्या. पुढे पुढे तर सणावाराचे गोडधोड त्याच्यासाठी राखुन ठेवु लागल्या. आपल्या मेहनतीनं, प्रामाणि कपणानं व अभिजात लाघवीपणान चोखाने ब्राम्हणस्रीयांच्या मनांत एक आपुलकीची जागा निर्माण केली तेही बालवयातच! आपल्या मुलाचे दुरुन कां होईना कौतुकाचे बोल कानावर पडले की सावित्रीचा उर अभिमानाने भरुन यायचा. आणि मग त्या ब्राम्हणाचे शब्द आठवे, तुमच्या घराण्याचे नांव मोठे करणारा मुलगा होईल. आपल्या अंगभूत स्वभाव वैशिष्ट्यांनी तेजाळत चोखोबा मोठा होत होता.
अशातच एक दिवस मंगळवेढ्या च्या सरदाराचा सुदामाला सांगावा आला. मेहुणपूरच्या सरपंचाने सुदामाच्या प्रामाणिकपणा, कामावरची निष्ठा तत्परता कळवली होती. तसेच त्याला जंगल पांदीतले, ओहोळ ओढ्यातील रस्ते वाटा माहित होत्या. म्हणुनच मंगळवेढ्या च्या सरदाराने निरोप्या म्हणुन एक वर्षा साठी नेमणुक केली. पगार, कपडालत्ता, धान्य शिवाय राहायला खोपटं मिळणार! याहीपेक्षा आनंदाची गोष्ट म्हणजे मंगळ वेढ्यापासुन पंढरपूर जवळ असल्याने दरवर्षी वारी करतां येणार होती. दोघांनी सामानसुमान बांधुन झोपडीला शेवटचा नमस्कार केला व बैलगाडी निघाली. दुसर्या मोठ्या गावाला जायला मिळत असल्याचा आनंद दोन्ही मुलांना झाला.
मजल दर मजल करीत कुटुंब मंगळवेढ्याला पोहोचल्यावर, सरदाराने नेमणुक केलेल्या कामावर दुसर्या दिवशीपासुन सुदामा रुजु झाला. चोखा एकटाच रस्ता झाडण्याच्या कामावर जाऊ लागला. त्याचा सरळ, नम्र स्वभाव नीटनेटके काम करण्याची पध्दत यामुळे इथेही आपुलकी, जिव्हाळा निर्माण झाला यवनांच्या स्वार्या थंडावल्या व वर्षही संपल्यामुळे सुदाम सरदाराच्या कामातुन मोकळा झाल्यामुळे, आतां सुदामा व चोखामेळा गावकीच्या कामात लागले. सगळीजण मंगळवेढ्यात रमल्याने त्यांच्या आयुष्याला स्थैर्य प्राप्त झाले. एक प्रकारची निश्चिंतता लाभली.
मंगळवेढ्यात एक विठ्ठलमंदिर होते. मंदिराची आंतली स्वच्छता म्हादा गुरव तर मंदिराच्या अंगण, परिसराची स्वच्छता चोखाने आपल्या अंगावर घेतली होती. त्याचं मन लावुन काम करणं वेळेवर पोहचणं, नीटनेटके काम करणें, मंदिराचा आवार आरशासारखा लख्ख ठेवणं गुरवाला फार आवडायचं. तो चोखाशी बोलायचा. त्याला विठोबाचा अंगारा, तीर्थ द्यायचा. चोखोबाची विठ्ठलावर असलेली श्रध्दा पाहुन गुरवला खुप कौतुक वाटायचे. गुरवाकडुन भजनं ऐकतां एकतां चोखोबाचा शीण जायचा.
१२-१३ वर्षाचा चोखा सकाळी आंघोळ करुन फाटके असले तरी, स्वच्छ कपडे घालुन, कपाळाववर गंध रेखुन, विठोबाच्या प्रतिमेला नमस्कार करुन रस्ते झाडण्याच्या कामावर रुजु व्हायचा. सगळ्या आळी, पेठ्या, गल्ल्या झाडुन झाले की, बरोबरीचे मित्र चावडीजवळच्या वडाच्या झाडाखाली गंजिफा खेळायला जायचे आणि हा थेट विठ्ठल मंदिर गाठुन संध्याकाळपर्यंत मन लावुन आवार झाडणे, उगवलेलं तण, कांटे, कांचा, बोचणारे खडे गोळा करायचा ते अगदी दिवस मावळेपर्यंत. मधे फक्त थोडा वेळ जेवायला जायचा. संध्याकाळचे जेवणं आटोपली की, गप्पा, भजनं, विठ्ठलाचे नामस्मरण करत चोखा झोपी जात. असा चोखोबाचा दिनक्रम ठरलेला होता.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १२-४-२०२१.
! ! ! संत चोखामेळा ! ! !
भाग – ४.
आणि तो प्रसंग घडला. त्या प्रसंगाने चोखाचा विठ्ठलावरचा विश्वास आणखीनच दृढ झाला. म्हादा गुरव मंदिरा ची सारी व्यवस्था बघत असे. मंदिराच्या आंतली स्वच्छता, विठोबाची आंघोळ, पुजा, अभिषेक, दानपेटीत जमा झालेली रक्कम मंदिराच्या खजिन्यात जमा करणे ही कामे गेली कित्येक वर्षे नीटपणे तो करीत होता. यावर देखरेखीचे काम सहा विश्वस्तांपैकी, केसोपंत कुळकर्णी करीत.
त्यादिवशी अक्रितच घडले. मंगळ वेढ्याच्या सरदाराच्या मुलीचा वाढदिवस असल्यामुळे ते सहकुटुंब दर्शनाला आले. मुलीच्या हस्ते एक चांदीची मोहोर दान पेटीत टाकली. त्यावेळी स्वतः केसोपंत कुळकर्णी हजर होते. संध्याकाळी दान पेटीत जमा झालेली दानदक्षिणा मंदिरा च्या खजिन्यात जमा करतेवेळी चांदीची मोहोर आढळली नाही. सहाजिकच आळ गुरवर आला. त्याला दोन दिवसाची मुदत देण्यात आली. म्हादा गुरव प्रामाणिक, निष्ठेने काम करणारा, त्यालाही धक्का बसला. कांही सुचेना, अन्न जाईना, झोप उडाली. डोळ्याचे पाणी खळेना. त्याची ही घायाळ अवस्था चोखोबाच्या लक्षात आल्यावर, कारण माहित झाल्यावर चोखा म्हणाला, विठोबा सर्वज्ञानी, भक्ता चा पाठीराखा आहे, त्याला साकडं घालुन सारा भार त्याचेवर सोपव. तो नक्की किटाळ दूर करेल. चोखाचे बोलणे ऐकुन, दुसरे दिवशी सकाळी मंदिराचे दैनंदिन काम करत हर श्वासागणिक विठ्ठलाचे नामस्मरण सुरु होते. केसोपंतानी दिलेली मुदत दुसर्या दिवशी संपणार होती.
सकाळ उजाडली, पंचमंडळी जमा झाली. म्हादाचा फैसला होता. चौकोणी आकाराच्या दानपेटीत वरच्या खाचेतुन पैसे टाकले की, पेटीचे कुलुप उघडल्या शिवाय काढणे अशक्य, शिवाय कुलुपाची किल्ली केसोपंताकडे, तेसुध्दा चार विश्वस्तासमोरच उघडत असे. एवढा सारा बंदोबस्त असतांना त्यातील चांदीची मोहोर काढणे केवळ अशक्य याची पंच मंडळींना कल्पना होती, पण दिवसभर पेटी गुरवच्या ताब्यात असल्याने नैतिक जबाबदारी त्याच्यावर येते याच मुद्यावर गुरवाला शिक्षा करावी की नाही याबद्दल आपसात चर्चा सुरु असतांनाच एक विश्वस्त दामूशेट केसोपंतांना म्हणाले, परत ती दानपेटी आमच्या समोर खोलुन पाहु या. मगच शिक्षेचे ठरवु. केसोपंतांनी पेटी उघडुन आतली नाणी ओतली पण त्यात चांदीची मोहोर नव्हती. २-३ वेळा पेटी हलवली, उलटीपालटी केली अन् खणखण आवाज करीत चांदीची मोहोर खाली पडली.
म्हादाला तर हर्षवायु व्हायचा बाकी राहिला. देवा! विठुराया या भक्ताची लाज राखलीस. देवाss विठ्ठलाss तूंच वाचवल तूच वाचवलस! म्हादा आनंदाने नाचत होता. म्हादाचे निर्दोषत्व सिध्द झाल्यावर विश्वस्त व पंचमंडळी निघुन गेली. म्हादा वर आळ घेतला म्हणुन केसोपंतानाही वाईट वाटले. म्हादाने विठोबाला साष्टांग नमस्कार घालुन वळल्यावर मंदिराच्या आवारात येणारा चोखा दिसल्याबरोबर भावनेच्या भरात शिवाशिवीचा विचारही न करतां त्याने धावत जाऊन मिठी मारली. चोखाss चोखाss तुझा विश्वास खरा ठरला. माझ्यावरचा आळ गेला. हे सगळं तुझ्यामुळे घडलं. तूच मार्ग दाखवलास.
चोखा दिड्ःमुढ झाला. गुरव निर्दौष सुटला म्हणुन आनंद व्यक्त करावा की, त्याने मिठी मारली म्हणुन भीती? शेवटी वंशपरंपरेनं भावनेवर मात केली. अहो म्हादाकाका तुम्ही मला चक्क शिवलात की हो. . . असु दे रे. हे समद तुझ्यामुळे झालं. माझ्यावरचं किटाळ गेलं, त्याने परत चोखोबाच्या पाठीवरुन हात फिरवला व घराची वाट धरली.
चोखोबाने आवारातुनच कळसाला नमस्कार केला. विठ्ठलावरचा त्याचा विश्वास शतपटीने वाढला. नामस्मरणाने देवाला मिळवतां येते याची खात्री पटली. चोखामेळाचा आपल्यावरचा विश्वास बघुन कर कटेवर ठेवुन उभा असलेला विठ्ठल सुखावला, प्रसन्न झाला. चोखोबा त्याच्या खूप जवळ गेला अगदी ह्रदया पर्यंत. विठ्ठलालाही तेच हवं होत. चोखोबा जसा जाणतां झाला तशी त्याची श्रध्दा आणखीणच वाढली, नुसती वाढलीच नाही तर डोळस झाली. आपल्या निर्व्यसनी मुलाचा सावित्रीला मोठा अभिमान वाटे. आपलं हे पोर चारचौघां पेक्षा वेगळा आहे हे तिच्यातल्या आईने कधीच जाणलं होत.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १२-४-२०२१.
! ! ! संत चोखामेळा ! !
भाग – ५.
रोज कामं आटोपुन संध्याकाळी घरी येणारा चोखोबा गेल्या दोन दिवसा पासुन लवकर घरी येऊन परसदारी माती मळुन कांही तरी करीत बसे. सावित्री सहसा मेललं ढोर उचलायला किंवा सोलण्याच्या कामगिरीवर त्याला पाठवित नसे. पण आज नाईलाजाने वडीलांच्या मदतीला कोणीच नसल्यामुळे धाक दपट्या दाखवुन, मातीचे काम अर्धवट टाकायला सांगुन श्रीपती पाटलाकडे पाठवले होते. शित्या मांग ढोरं सोलुन झाल्यावर चामडं घेऊन जाणार होता. हा पोरगा गेल्या दोन दिवसापासुन मातीचे काय करतो म्हणुन सावित्री बघायला गेली, तर तिला काय दिसले?चोखाने अर्धवट बनवलेली विठ्ठलाची मूर्ती! कौतुकाने मूर्तीकडे बघतच राहीली.
रात्रीचे जेवणं आटोपल्यावर चोखा परसदारी जाऊन अर्धवट मूर्तीचे राहिलेले काम पूर्ण करुन सुंदरशी विठ्ठलाची मूर्ती तयार केली. चोखा आतां मोठा झाला तरी त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही त्यांच्या भोवतालची कांही लोकं वारकरी होते. ते नित्यनेमाने पंढरपुरची वारी करायचे, तिथुन परतले की, तिथल्या नव नवीन वार्ता सांगायचे. त्या सगळ्याचा सार एकच असायचा की, कांही पुण्य मिळवायचे असेल , कांही चांगले ऐकायचे असेल तर पंढरपूरला गेले की, जीवनाचे सोने होते. कल्याण होते. अश्या गोष्टी ऐकल्या की, चोखाला पंढरपुरची अतिशय ओढ लागे. मनाने एकच ध्यास घेतला, पंढरपूरला जायचच. . . त्यांनी जाण्याचे निश्चित केल्यावर सावित्रीला काळजी वाटु लागली. पण सुदामाने तिची समजुत काढल्यावर व तिच्या अनेक सुचनांचे पालन करण्याचे आश्वासन घेउन तीने चोखाला पंढरपूरला जायची अनुमती दिली. निघाले चोखा पंढरपूरला. आपल्या आयुष्याला प्रकाशाकडे नेणारे पंढरपूर. . . तिथे त्यांचा विठ्ठल होता. विद्वानांचे बोल, संतांची संगत, विठ्ठलाची भक्ती होती. पंढरपूरच्या रस्त्यावर कांही लोक जात होती तर कांही परतत होती. चोखांना एका गोष्टीचे नवल वाटे, पंढरपूरहुन परतलेल्या लोकांच्या पायावर जाणारे लोकं डोकं ठेवुन नमस्कार करीत होते. एकमेकांना उरभेट देत होते. कुणीच कुणाचा विटाळ मानत नव्हते. ना जात ना धर्म, ही गोष्ट चोखासाठी नवीन होती. गावात हाडत हुडत शिविगाळ ऐकुन घेण्याची संवय असलेल्या चोखोंनी इतरांचे बघुन, पंढरपूरहुन येणार्या एका वारकर्याच्या पायावर डोके तर ठेवले पण त्यांना प्रचंड भिती वाटत होती, पण त्या वारकर्याने चोखोबांना उठवुन छातीशी कवटाळले तेव्हा, नखशिखांत शहारत चोखा म्हणाले, अहोss अहोss महाराज हे काय करताहात?मी हीन जातीचा. . . अरे बाबा या पंढरीत कुणी हीन नाही ना कुणी ब्राम्हण, मराठा, वैश्य! या भागवत झेंड्याखाली आपण सगळे सारखेच. आपली सगळ्यांची एकच जात वारकरी! एकच धर्म, विठ्ठलाची भक्ती आणि आपल्या सगळ्यांचे एकच दैवत तो विठोबा! तेव्हा कोणताही संकोच, कोणत्याही जाती धर्माचा विधिनिषेध न मानतां त्या वारकर्याने त्यांना परत मिठीत घेतले. चोखांच्या ह्रदयाचे स्पंदनं वाढली, सर्वांगाला कंप सुटला, कंठ दाटुन आला, डोळ्यातुन अनिर्बंध अश्रू वाहू लागले. त्या वृध्द वारकर्याच्या मिठीत, कुशीत शिरुन चोखा एखाद्या लहान मुलासारखा ढसाढसा रडु लागले. गदगदुन रडणार्या चोखांच्या मस्तकावर त्या वारकर्याच्या अश्रूंनी जणुं मनातील किल्मिषे, सगळ्या शंका, तक्रारी धुवुन निघाल्यात. उरलेली थोडीफार मलीनता वाहणार्या अश्रूंनी पवित्र झाली. वारकर्याच्या मिठीत असल्याचे भान आल्याबरोबर चटका बसल्यासारखा एकाएकी दूर झाल्याने, वारकर्याने कारण विचारल्यावर, चोखा फाडफाड गालात मारुन घेत म्हणाले, माझ्याकडुन फार मोठे पाप घडले, मी शिवलो तुम्हाला. माझ्यामुळे तुमच्या भावकीतले लोक छळ करतील, बहिष्कार टाकतील. वारकर्याने त्यांचे हात धरत म्हणाला, अरे या विठ्ठलाच्या राज्यात जातीचा प्रश्नच येत नाही. इथे सगळे सारखेच! या भागवत धर्माच्या झेंड्याखाली एक नवीन राज्य उदयास येतय! भक्तीचं राज्य आणि आपण वारकरी. सगळे वारकरी त्या राज्याचे सरदार आहोत. इथे लहान मोठे, जात, धर्म, शिवाशिव, विटाळ कांहीही नाही. ज्ञानेश्वर माऊलीनं मानव जातीवर केलेले फार मोठे उपकार आहे. अरे! तू ही वारकरीचच ना?मग आपण सगळेच भागवतधर्मी. तेव्हा पाप वगैरे मनांतुन काढुन निःशंक मनाने पंढरपूरला जा. तो सावळा आहेच तिथे. चोखांनी सविस्तर माहिती विचारल्यावर, वारकरी म्हणाला, तिथे नामदेव आहेत ते जास्त सविस्तर माहिती देतील. मला जेवढी माहिती आहे तेवढी सांगतो.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १३-४-२०२१.


