नवरात्र अभंग, देवीचे अभंग, आरती संग्रह वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.
देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६
माहूरगड रेणुका महारम्य
नवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.
नवरात्र धर्मशास्त्रीय माहिती
कुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी

नवरात्र अभंग
रंगा येईवो ये रंगा येईवो ये । विठाई-:

रंगा येईवो ये रंगा येईवो ये । विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई ॥१॥
वैकुंठनिवासिनी वो जगत्रयजननी वो । तुझा वेधु माझे मनीं वो ॥२॥
कटीं कर विराजित मुगुटरत्नजडित । पीतांबरु कसिला तैसा येई का धावत ॥३॥
विश्वरुप विश्वंभरे कमळनयनें कमळाकरें वो । तुझे ध्यान लागो बापरखुमादेविवरे वो ॥४॥

अनादि अंबिका भगवती

अनादि अंबिका भगवती । बोध परडी घेउनी हाती । पोत ज्ञानाचा पाजळती । उदो उदो भक्त नाचती ॥१॥ गोंधळा येई वो जगदंबे मूळ पीठ तू अंबे ॥धृ.॥ व्यास वसिष्ठ शुक गोंधळी । नाचताती सोहंमेळीं । द्वैतभाव विसरूनी बळी । खेळती अंबे तुझे गोंधळी ॥२॥ मुगुटमणी पुंडलीक । तेहतीस कोटी देव नायक । गोंधळ घालतील कौतुक । एका जनार्दनी नाचे देख ॥३॥

अनादि निर्गुण प्रगटली भवानी

अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासुरमर्दना लागुनी । भक्‍ता लागोनि पावसि निर्वाणी ॥१॥ आईचा जोगवा जोगवा मागेन । द्वैत सारूनी माळ मी घालीन । हाती बोधाचा झेंडा मी घेईन । भेदरहित वारीसी जाईन ॥२॥ नवविध भक्‍तिच्या करीन नवरात्रा । करून पोटी मागेन ज्ञानपुत्रा । धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा । दंभ सासरा सांडीन कुपात्रा ॥३॥ पूर्ण बोधाची घेईन परडी । आशा तृष्णेच्या पाडीन दरडी । मनोविकार करीन कुर्वंडी । अद्‌भुतरसाची भरीन दुरडी ॥४॥ आता साजणी झाले मी नि:संग । विकल्प नवर्‍याचा सोडियेला संग । काम क्रोध हे झोडियेले मांग । केला मोकळा मारग सुरंग ॥५॥ ऎसा जोगवा मागुनि ठेविला । जाऊनि महाद्वारी नवस फेडिला । एकपणे जनार्दन देखिला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६॥

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.
देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६
माहूरगड रेणुका महारम्य
नवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.
नवरात्र धर्मशास्त्रीय माहिती
कुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी

माझे कुळीची कुळस्वामिनी

माझे कुळीची कुळस्वामिनी । विठाई जगत्रय जननी । येई वो पंढरपूरवासिनि । ठेवीले दोन्ही कर जघनी । उभी सखी सजनी ॥१॥ येई पुंडलिक वरदायिनी । विश्वजननी रंगा येई वो ॥धृ॥
मध्ये सिंहासन घातले । प्रमाण चौक हे साधिले । ज्ञान कळस वर ठेविले । पूर्ण भरियले । धूप दाविले । सुवासे करूनि ॥२॥ सभामंडप शोभला । भक्ती चांदवा दिधला । उदो उदो शब्द गाजला । रंग माजला । वेद बोलिला । मूळची ध्वनि ॥३॥ शुक सनकादिक गोंधळी । जीव शीव घेऊनी संबळी । गाती हरीची नामावळी मातले बळी । प्रेमकल्लोळी । सुखाचे सदनी ॥४॥ ऎसा गोंधळ घातिला । भला परमार्थ लुटिला । एका जनार्दनी भला । ऎक्य साधिला । ठाव आपुला । लाभ त्रिभुवनी ॥५॥

चौक भरियेला आसनीं पाचारिली कुळस्वामिनी

चौक भरियेला आसनीं पाचारिली कुळस्वामिनी । वैकुंठवासिनि ये धांवोनी झडकरी ॥१॥ रंगा येई वो विठाई सांवळिये डोळसे । तुझें श्रीमुख साजिरें ते मी केधवां देखेन ॥ध्रु॥ रजतमधुपारती । पंचप्राणांची आरती । अवघी सारोनी आइती । ये धांवती झडकरी ॥२॥ मन मारोनिया मेंढा । आशा मनसा तृष्णा सुटी । भक्तिभाव नैवेद्य ताटीं । भरोनि केला हाकारा ॥३॥ डांका अनुहात गजरे । येउनि अंगासी संचरे । आपुला घेउनी पुरस्कारे । आरोग्य करीं तुकयासी ॥४॥

कनवाळू कृपाळू भक्तांलागीं मोही

कनवाळू कृपाळू भक्तांलागीं मोही । गजेद्राचा धांवा तुवां केला विठाई ॥१॥ पांडुरंगे ये वो पांडुरंगे । जीवाचे जिवलगे ये वो पांडुरंगे ॥ध्रु॥ भक्तांच्या कैवारें कष्टलीस विठ्ठले । आंबॠषीकारणें जन्म दहा घेतले ॥२॥ प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार केला । विदारूनि दैत्य प्रेमपान्हा पाजिला ॥३॥ उपमन्याकारणें कैसी धांवसी लवलाहीं । पाजी प्रेमपान्हा क्षीरसागराठायीं ॥४॥ कौरवीं पांचाळी सभेमाजी आणिली । वस्त्रहरणीं वस्त्रें कैसी झाली माउली ॥५॥ दुर्वास पातला धर्मा छळावया वनीं । धांवसी लवलाहीं शाखादेठ घेऊनि ॥६॥ कृपाळू माउली भुक्तिमुक्तिभांडार । करीं माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले ॥ ७ ॥

तूं विटेवरी सखये बाई हो करी कृपा । माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा । तूं सावळे सुंदरी हो करी कृपा । लावण्य मनोहरी हो करी कृपा । निजभक्ता करुणा करी हो करी कृपा ॥१॥ पंढरपुरीं राहिली । डोळा पाहिली । संते देखिली । वरुनी विठाई वरुनी विठाई । सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा । उजळकुळ दीपा । बोध करी सोपा । येउनी लवलाही येउनी लवलाही ॥धृ.॥ तुझा देव्हारा मांडिला हो करी कृपा । चौक आसनीं कळस ठेविला हो करी कृपा । प्रेम चांदवा वर दिधला हो करी कृपा । ज्ञान गादी दिली बैसावया हो करी क्रृपा । काम क्रोध मदमत्सर दंभ अहंकार । त्याचे बळ फार । सर्व सुख देई सर्व सुख देई ॥२॥ शुक सनकादिक गोंधळी हो करी कृपा । नाचताती प्रेम कल्लोळी हो करी कृपा । उदो उदो शब्द आरोळी हो करी कृपा । पुढे पुंडलिक दिवटा हो करी कृपा । त्याने मार्ग दाविला निटा हो करी कृपा । आई दाविली मूळपीठा हो करी कृपा । बापरखुमादेवीवरु । सुख सागरु । त्याला नमस्कारु । सर्व सुख देई सर्व सुख देई ॥३॥

निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव

निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव । शकुन सांगावयास आले यमाई माझे नाव । तये नगरी वस्ती केली तरी आले एकभावे । ऐसा माझा शकुन दादा चित देउन ऐकावे ॥१॥ कैकाय कैकाय बाबा दुरील माझा देश । शकुन सांगावयास मी आले कलीयुगास । ब्रंम्ह विष्णु महेश पुसती शकुन आंम्हास । ऐसे नीदान आंम्ही सांगीतले त्यांस ॥२॥ धरीत्री आकाश मज देखता उत्पती । चंद्र सुर्य दादा मज देखता होती । ब्रंम्ह विष्णु महेश मज देखता उपजती । जेथे आहे शिव तेथे आदिशक्ती ॥३॥ दाही आवतार मज देखता झाले । अकराही रुद्र दादा होऊनिया गेले । अठ्ठ्यांऐंशी सहस्त्र ऋषी मज देखता जन्मले । ब्रम्हादीक तेहतीस कोटी देव मी खेळविले ॥४॥ अठ्ठाविस युगे झाली चक्रवर्ती । कौरव पांडव गेले दादा नेणो कीती । छप्पंन्न कोटी यादव गेले दादा कोण पंथी । तुम्ही आंम्ही जाऊ दादा मागे कोणी न राहती ॥५॥ पृथ्वीमधे दादा एक विपरीत होईल । बहीण भावा दोघाजनांचा विवाह लागेल । पाच वरुषाची बाळा भ्रतार मागेल । सहा वरुषाची नारी गर्भिण होईल ॥६॥ आणीक एक दादा माझा ऐकावा बोल । पृथ्वी वरुता वारा थोर झुंजाट सुटेल । थोर थोर दादा पर्वत उडोंनी जातील । आठराही जाती दादा एके ठीकाणी जेवतील ॥ ७ ॥ कलीयुगाची दादा ऐकावी थोरी । पुत्र तो होईल पीत्याचा वैरी । भ्रतार सोडोनीं घरोघरी फीरतील नारी । ऐसा माझा शकुन दादा ऐका निर्धारी ॥ ८ ॥ आणीक एक दादा माझे आईका उत्तर । आकार जाईल अवघा होईल निराकार । जातील चंद्र सुर्य मग पडेल अंधकार । धरीत्री आकाश जाईल मग कैंचा दिनकर ॥ ९ ॥ आणीक एक शकुन माझा ऐकावा संती । तुम्ही मुळ पीठी राहाणें नाव माझे आदिशक्ती । अंबेचा व्यवहार त्राहे त्राहे आदिमुर्ती । एका जनार्धनी प्रसंन्न झाली आदिशक्ती ॥ १० ॥

सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मांडिला वो

सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मांडिला वो । ज्ञान वैराग्याचा वरती फुलवरा बांधिला वो । चंद्र सूर्य दोन्ही यांचा पोत पाजळिला वो । घालुनी सिंहासन वरुते घट स्थापियेला वो ॥१॥ उदो बोला उदो उदो सद्‌गुरु माउलीचा वो ॥धृ.॥ प्रवृत्ती निवृत्तीचें घालुनि शुद्धासन वो । ध्येय ध्याता ध्यान प्रक्षाळिलें चरण वो । कायावाचामनें एकविध अर्चन केले वो । द्वैत अद्वैत भावे दिले आचमन वो ॥२॥ भक्ति वैराग्य ज्ञान याहीं पुजियली अंबा वो । सद्रूप चिद्रूप पाहुनी प्रसन्न जगदंबा वो । एका जनार्दनी शरण मूळकदंबा वो । त्राहे त्राहे अंबे तुझा दास आहे उभा वो ॥३॥

स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप घातिला वो

स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप घातिला वो । चारी वेदांचा फुलवरा बांधिला वो । शास्त्रें पुराणें अनुवादती तुझा गोंधळ मांडिला वो ॥१॥ उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा वो ॥धृ.॥ जीवशिव संबळ घेऊनी आनंदे नाचती वो । अठ्ठ्याऐंशी सहस्त्र ऋषी दिवटे तिष्ठती वो । तेहतीस कोटी देव चामुंडा उदो उदो म्हणती वो ॥२॥ आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो । पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी वो । एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवुनी कटीं वो ॥३॥

सुदिन सुवेळ तुझा मांडिला गोंधळ वो

सुदिन सुवेळ तुझा मांडिला गोंधळ वो । पंच प्राण दिवटे दोन्हीं नेञांचे हिल्लाळ वो ॥१॥ पंढरपूरनिवासे तुझें रंगीं नाचत असे वो । नवस पुरवी माझा मनींची जाणोनिया इच्छा वो ॥२॥ मांडिला देव्हारा तुझा त्रिभुवनामाझारी वो । चौक साधियेला नाभिकळस ठेविला वरी वो ॥३॥ बैसली देवतापुढे वैष्णवांचे गाणे वो । उद्गारें गर्जती कंठीं तुळसीची भूषणें वो ॥४॥ स्वानंदाचें ताटी धूप दीप पंचारती वो । ओवाळिली माता विठाबाई पंचभूतीं वो ॥५॥ तुझे तुज पावलें माझा नवस पुरवीं आता वो । तुका म्हणें राखें आपुलिया शरणागता वो ॥६॥

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.
देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६
माहूरगड रेणुका महारम्य
नवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.
नवरात्र धर्मशास्त्रीय माहिती
कुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी

सुंदर मुख साजिरें कुंडलें मनोहर गोमटीं वो

सुंदर मुख साजिरें कुंडलें मनोहर गोमटीं वो । नागर नाग खोपा । केशर कस्तुरी मळवटीं वो । विशाळ व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठीं वो । कास पीतांबराची चंदन सुगंध साजे उटी वो ॥१॥ अतिबरवंटा बाळा आली सुलक्षणीं गोंधळा वो । राजस तेजोराशी मिरवी शिरोमणी वेल्हाळा वो । कोटि रविशशिप्रभा तेजे लोपल्या सकळा वो । न कळे ब्रम्हादिकां अनुपम्य इची लीळा वो ॥ध्रु॥ सावळी सकुमार गोरी भुजा शोभती चारी वो । सखोल वक्षस्थळ सुढाळ पदक झळके वरी वो । कटीं क्षुद्र घंटिका शब्द करिताती माधुरी वो । गर्जती चरणीं वाकी अभिनव संगीत नृत्य करी वो ॥२॥ अष्टांगें मंडित काय वर्णावी रूपठेवणी वो । शोधिव सुंदर रसाची ओतिली सुगंध लावण्यखाणी वो । सर्वकळासंपन्न मंजुळ बोले हास्यवदनीं वो । बहु रूपें नटली आदिशक्ति नारायणी वो ॥३॥ घटस्थापना केली पंढरपुरमहानगरीं वो । अस्मानी मंडप दिला तिन्ही ताळांवरी वो । आरंभिला गोंधळ इनें चंद्रभागेतिरीं वो । आली भक्तिकाजा कृष्णाबाई योगेश्वरी वो ॥४॥ तेहतिस कोटि देव चामुंडा अष्ट कोटि भैरव वो । आरत्या कुरवंड्या करिती पुष्पांचा वरुषाव वो । नारद तुंबर गायन ब्रम्हानंद करिती गंधर्व वो । वंदी चरणरज तेथे तुकयाचा बांधव वो ॥५॥

पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा

पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा । सांपडला तो साधा आजि मुहूर्त बरा । गर्जा जयजयकार हरि ह्र्दयी धरा । आळस नका करू लहाना सांगतो थोरा ॥१॥ या हो या हो बाइयानों निघाले हरि । सिलंगणा वेगीं घेउनि आरत्या करीं । ओवाळू श्रीमुख वंदू पाऊले शिरीं । आम्हा दैव आले येथे घरिच्या घरीं ॥२॥ अक्षय मुहूर्त औटामध्ये साधते । मग येरी गर्जे जैसें तैसे होत जाते । म्हणोनि मागे पुढे कोणी न पहावे येथे । सांडा परते काम जाऊ हरि सांगाते ॥३॥ बहुतां बहुतां रीतीं चित्तिं धरा हे मनीं । नका करू आइकाल ज्या कानी । मग हे सुख तुम्ही कधीं न देखाल स्वप्नी । उरेल हाय हाय मागे होईल कहाणी ॥४॥ ऐसियास वंचतां त्याच्या अभाग्या पार । नाही नाही नाही सत्य जाणा निर्धार । मग हे वेळ घटिका न ये अजरामर । कळले असो द्या मग पडतील विचार ॥५॥ जयासाठी ब्रम्हादिक झाले ते पिसे । उच्छिष्टाकारणें देव जळीं झाले मासे । अर्धांगीं विश्वमाता लक्ष्मी वसे । तो हा तुकयाबंधु म्हणे आलें अनायासें ॥६॥

फुगडीफ़ूगे बाई फुगडीफू

फुगडीफ़ूगे बाई फुगडीफू । निजब्रह्म तूं गे बाई परब्रह्म तूं गे ॥१॥ मन चित्त धू । विषयावरी थू ॥२॥ एक नाम मांडी । दुजा भाव सांडी ॥३॥ हरि आला रंगीं । सज्जनाचे संगीं ॥४॥ सकळ पाहे हरी । तोचि चित्ती धरी ॥५॥ नमन लल्लाटीं । संसारेंसि साटी ॥६॥ वाम दक्षिण चहुंभुजीं आलिंगन ॥७॥ ज्ञानदेवा गोडी । केली संसारा फुगडी ॥ ८ ॥

****॥ विठ्ठल-विठ्ठल ॥*****

देवीची आरती

अश्विन शुद्ध पक्षी, अंबा बैसली सिंहासनी हो ।
प्रतिपदेपासून, घटस्थापना ती करूनी हो ।
मूलमंत्रजप करूनी, भोवते रक्षक ठेवोनी हो ।
ब्रम्हा विष्णु रूद्र, आईचे पूजन करती हो ॥१॥ उदो बोला.॥धृ॥


द्वितीयेचे दिवशी, मिळती चौसष्ट योगिनी हो ।
सकळांमध्ये श्रेष्ठ, परशुरामाची जननी हो ।
कस्तुरी मळवट, भांगी शेंदूर भरूनी हो ।
उदो कारे गर्जती, सकळ चामुंडा मिळुनी हो ॥२॥ उदो बोला… ॥धृ॥


तृतीयेचे दिवशी, अंबे श्रृंगार मांडिला हो ।
मळवट पातळ चोळी, कंठी हार मुक्ताफळा हो ।
कंठीचे पदके कासे, पितांबर पिवळा हो ।
अष्टभुजा मिरविती, अंबे सुंदर दिसे लीला हो ॥३॥ उदो बोला ॥धृ॥


चतुर्थीचे दिवशी, विश्वव्यापक जननी हो, ।
उपासका पाहसी, अंबे प्रसन्न अंतकरणी हो ।
पूर्णकृपे तारिसी, जगन्माते मनमोहिनी हो ।
भक्तांच्या माऊली, सुर ते येती लोटांगणी हो ॥४॥ उदो बोला… ॥धृ॥


पंचमीचे दिवशी, व्रत ते उपांगललिता हो ।
अर्घ्य पाद्य पूजने, तुजला भवानी स्तविती हो ।
रात्रीचे समयी, करिती जागरण, हरिकथा हो ।
आनंदे प्रेम ते, आले सद्भावे क्रीडता हो ॥५॥ उदो बोला उदो… ॥धृ॥


षष्ठीचे दिवशी, भक्ता आनंद वर्तला हो ।
घेऊनी दिवट्या हस्ती, हर्षे गोंधळ घातला हो ।
कवडी एक अर्पिता, देसी हार मुक्ताफळा हो ।
जोगवा मागता प्रसन्न झाली भक्तकुळा हो ॥६॥ उदो बोला उदो..॥धृ॥


सप्तमीचे दिवशी, सप्तश्रृंग गडावरी हो ।
तेथे तू नांदसी, भोवती पुष्पे नानापरी हो ।
जाई जुई शेवंती, पूजा रेखीयली बरवी हो ।
भक्त संकटी पडता, झेलूनी घेसी वरचे वरी हो ॥७॥ उदो बोला उदो……. ॥धृ॥


अष्टमीचे दिवशी, अष्टभुजा नारायणी हो ।
सह्य्राद्री पर्वती, पाहिली उभी जगत् जननी हो ।
मन माझे मोहीले, शरण आलो तुजलागुनी हो ।
स्तनपान देऊनी, सुखी केले अंतःकरणी हो ॥८॥ उदो बोला उदो..


नवमीचे दिवशी, नव दिवसांचे पारणे हो ।
सप्तशती जप, होमहवने सद्भक्ती करुनी हो ।
षड्रस अन्ने नैवेद्यासी, अर्पियली भोजनी हो ।
आचार्य ब्राह्मणा, तृप्त केले कृपेकरुनी हो ॥९॥ उदो बोला उदो. ॥धृ॥


दशमीचे दिवशी, अंबा निघे सिमोल्लंघनी हो ।
सिंहारूढ करी दारुण, शस्त्रे अंबे त्वा घेऊनी हो ।
शुंभ निशुंभादिक राक्षसा, किती मारिसी रणी हो ।
विप्रा रामदासा, आश्रय दिधला तव चरणी हो ॥१०॥ उदो बोला उदो….. ॥धृ॥

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.
देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६
माहूरगड रेणुका महारम्य
नवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.
नवरात्र धर्मशास्त्रीय माहिती
कुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *