👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा
विश्वाद्य अनाद्य विश्वरूपे वंद्य अभंग क्र.६१
विश्वाद्य अनाद्य विश्वरूपे वंद्य । आणि हा अभेद भेद नाही ॥
ते रूप साजिरे नंदाचे गोजिरे । यशोदे निर्धारे प्रेमसुख ॥
हारपती दिशा सृष्टीचा कडवसा । आपरूप कैसा वोळलासे ॥
निवृत्तिसाधन वसुदेवखूण । गोपिकांचा धन हरि माझा ॥
अर्थ: हा परमात्मा विश्वाचा आरंभ आहे. विश्वरुपाचे दर्शन घडवणारा वंद्य आहे. त्याला आदि मध्य अंत देश काल हे भेदाभेद नाहीत. ज्या रुपावर नंदाचे प्रेम जडले ते कृष्ण रुपावर यशोदा ही प्रेमासक्त आहे. जेथे दिशाज्ञान व जगत ज्ञान हारपते तोच जीवनदाता पाण्याच्या व प्रकाशाच्या कवडस्याच्या रुपाने प्रतित होतो. निवृत्तिनाथ म्हणतात तोच परमात्मा वसुदेवाची ठेव व गोपीचे धन बनुन नंदाकडे आहे.
निराकृती धीर नैराश्य विचार अभंग क्र.६२
निराकृती धीर नैराश्य विचार । परिपूर्ण साचार वोळलासे ॥
ते रूप रूपस सुंदर सुरस । तो पूर्ण प्रकाश गोकुळीं रया ॥
नानारूप हरपे दृश्य द्रष्टा लोपे । तो प्रत्यक्ष स्वरूपे नंदाघरीं ॥
निवृत्ति सादर निराकार अंकुर । साकार श्रीधर गोपवेष ॥
अर्थ: तो परमात्मा निराकार आशारहित तरी सर्व गुणानी परिपूर्ण होऊन अवतरला आहे. त्या सुंदर सुकुमार व सुरस रुपातुन प्रत्यक्ष प्रका़श होऊन गोकुळात आला आहे. जाच्या स्वरुपात अनेक रुप हरपतात दृष्यादृष्यत्व विलीन होते तो नंदा घरी कृष्णरुपात अवतरला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात गोपाळ वेशात अंकुरलेला तो कोंभच कृष्णरुपातील साकार परमात्मा आहे.
निगम आगम वेदादिकसम अभंग क्र.६३
निगम आगम वेदादिकसम । श्रुतीचा उपक्रम हारपला ॥
ते रूप साजिरे नंदाचे गोजिरे । यशोदा श्रीधरे प्रेमभेटी ॥
जेथे हे वाग् वाट शून्य तो निघोट । प्रत्यक्ष वैकुंठ ते गोपवेष ॥
निवृत्ति तडाग निवांत सम्यक । सर्व रूपे एक आत्माराम ॥
अर्थ: जेथे वेद, शास्त्रे, श्रुतींचा ओघ आटला ते त्याचे व्यापक स्वरुप पाहु शकले नाहीत. त्याच्या आरंभाचे वर्णन करतांना त्यांचा निर्धार हरपला. ते कृष्ण रुप नंद व यशोदेस प्रेम भट देण्यासाठी आले आहे. ज्याचे वर्णन करायला सर्व प्रकारच्या वाणी थिट्या पडतात तो परमात्मा वैकुंठ सोडुन गोपवेश धारण करुन गोकुळात आहे. निवृत्तिनाथ म्हणतात तो आत्माराम एकत्वाने सर्वान मध्ये आहे त्याच्याशी मी एकरुप झालो आहे.
आदि मध्ये वावो अवसान अभावो अभंग क्र.६४
आदि मध्ये वावो अवसान अभावो । पाहाताती निर्वाहो हरपला ॥
ते रूप माजिटे गोपवेश खेळे । नंदाचे सोहळे पुरविले ॥
धन्य ते यशोदा खेळवी मुकुंदा । आळवीत सदा नित्य ज्यासी ॥
निवृत्ति सधर ब्रह्मरुप सार । वृत्तीचा विचार हरपला ॥
अर्थ: आदि मध्य अंत रहित असलेला हा परमात्मा पाहावयास गेले तर त्या स्वरुपात सापडत नाही. तेच रुप सगुण रुपात गोपवेशात नंदा घरी अनेक प्रकारचे खेळ खेळत आहे. ती यशोदा धन्य आहे जी त्या मुकुंदा़स विनवण्या करुन खेळवत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात तो परमात्मा सर्व साराचे सार असुन तिथे वृतींची निवृत्ती होते. त्या तदाकार बनतात.
जेथे रूप रेखा ना आपण आसका अभंग क्र.६५
जेथे रूप रेखा ना आपण आसका । सर्व रूपे देखा हरि माझा ॥
ते रूप गोजिरे नंदाघरीं असे । जनीवनी दिसे गोपिकांसी ॥
नादभेद कळा जेथे भेद नुठी । ब्रह्मरूपे तुष्टि अवघी होय ॥
निवृत्ति जन जन वन देख । आत्मरुपभाव ब्रह्म जाला ॥
अर्थ: ज्या रंग नाही, रुप नाही, असा जो माझा हरि आहे.तोच सर्वत्र सर्व रुपानी नटला आहे. तोच परमात्मा नंदा घरी सगुण रुपात आल्यावर त्या गौवळणी येवढ्या मुग्ध झाल्या की जना वनात त्याला त्याच रुपात म्हणजे कृष्ण रुपात पाहु लागल्या. ज्याच्या मध्ये ध्वनीचे नाद किंवा भेद नाहीत तो अभेद असुन त्यांने ह्या कृष्णब्रह्मरुपात सृष्टीची तृषा तृप्त केली आहे. निवृत्तिनाथ म्हणतात त्याच्या त्या रुपाने माझा आत्मभाव त्याच्याशी एकरुप झाला म्हणुन मी जनी विजनी त्यालाच पाहात आहे.
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६
