ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.973

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

अभंग ९७३

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके कुट अभंग ९७३

वडाच्या पानी एक उभविले देउळ आधी कळसु मग पाया हो । देव पुजों गेलों तंव देऊळ उडालें पान नाहीं तेथें वडु रे ॥१॥ चेत जाणा तुम्हीं चेत जाणा । टिपरी वडाच्या साईं हो ॥२॥ पाषाणाचा देवो पाषाणाचा भक्तु पोहती मृगजळ डोहीं हो । वांझेचा पुत्र एकु पोहों लागला तो तारी देव भक्ता हो ॥३॥ भवाब्धिसागर नुतरवे ते पडिले रोहिणी डोहीं हो । न संपडे आत्मा बुडाले संदेही ते गुंतले मायाजळी हो ॥४॥ विरूळा जाणे पोहते खुणे केला मायेसी उपावो हो । बापरखुमादेविवरू विठ्ठलु विसावा तेणें नेलें पैलथडी वो ॥५॥

अर्थ:-
समष्टी दृष्टिने ब्रह्मावर जगत अध्यस्त आहे आणि व्यष्टि दृष्टिने आत्म्यावर देह अध्यस्त आहे. या अभंगात व्यष्टिदृष्टीने विचार केला तर आत्मा हाच कोणी एक वड असून त्यावर अध्यस्त असलेला देह हेच कोणी एक त्या वडाचे पान असून त्या पानाच्या ठिकाणी म्हणजे देहांमध्ये अंतःकरणरूपी देऊळ उभविले असून ‘आधि कळसु’ म्हणजे गर्भावस्थेत तो परमात्मा मी आहे अशी प्रतीति हाच कोणी कळस असून त्या देवळाचा पाया गर्भातून बाहेर आल्यानंतर कोऽहं ‘तेणे कोऽहं विकल्प मांडे’ अशी प्रतिती येते. हा त्या अंतःकरणरूपी देवळाचा पाया आहे. कारण जोपर्यंत जीवांच्या ठिकाणी कोऽहं असा अभिमान आहे तोपर्यंत अंतःकरणाचा बाध होऊ शकत नाही. पूर्वपुण्याईने आत्म्याची अभिन्नत्वाने पूजा केली असता देऊळ जे सधर्मक अंतःकरण त्याचा आश्रय जो देह हेच कोणी एक पान ते उडाले म्हणजे नाहीसे झाले.इतकेच काय पण आत्मरूपी वडाचे ठिकाणी आत्मपणाची वाच्यताही राहिली नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जागे व्हा, जागे व्हा. म्हणजे आत्मसाक्षात्कार करून घ्या. तो आत्मानात्म टिपरी वाजवून, विचार करून आत्मस्वरूप पहा. तात्त्विक सिद्धांताचा विचार केला तर ही वरील कृति वांझेचा जो पुत्र तो मृगजळाच्या डोहात पोहण्याप्रमाणे आहे. कारण तात्त्विक सिद्धांतात प्रपंच झालाच नाही. म्हणून पाषाणाचा देव व पाषाणवत् देहाभिमानी भक्ताचा भज्यभजकभाव मृगजळाच्या डोहाप्रमाणे नाही. देव भक्ताला संसार समुद्रातून तारू लागला. हेही तसेच समजावे. जे भवसागरांतून तरून जात नाही. ते जन्ममरणरूपी मृगजळाचे डोहांत पडले. कारण त्यांना आत्मज्ञान झाले नाही. संशयातच ते बुडाले व मायाजाळांत गुंतले आहेत. पोहण्याच्या म्हणजे विचाराच्या खुणा सद्गुरूकृपा संपन्न असलेला विरळा जाणतो. व एखाद्यालाच मायेतून तरून जाण्याचा उपाय माहित असतो. मला मात्र माझे पिता व रखुमादेवीवर बाप जे श्रीविठ्ठल त्यानी मायानदीतून पैल तीराला काढून ब्रह्मानुभवाचा विसावा दिला. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading