ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 891

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ८९१

अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु । मी म्हणे गोपाळु आला गे माये । चांचरती चांचरती बाहेरी निघालें । ठकचि मी ठेलें काय करूं ॥१॥ मज करा का उपचारू अधिक ताप भारू । सखिये सारंगधरू भेटवा कां ॥धु ॥ तो सांवळा सुंदरू कासे पितांबरू । लावण्य मनोहरू देखियेला । भरलिया दृष्टी जंव डोळां न्याहाळी । तंव कोठे वनमाळी गेला गे माये ॥२॥ बोधुनी ठेलें मन तंव जालें आन । सोकोनी घेतले प्राण माझे गे माये । बापरखुमादेविवरू विठ्ठल सुखाचा । तेणें कायामनेंवाचा वेधियेलें ॥३॥

अर्थ:-

भगवत्प्राप्तीविषयी उच्छुक झालेली विरहिणी म्हणते. मी आपल्या मंदिरांत बसले असता सुगंध शीतळ वायूची सहज झुळुक आली. माझ्या मनाला असे वाटले की हा वारा नाही.तर गोकुळांतला गोपाळच आहे. म्हणून त्याला पाहाण्याच्या इच्छेने चाचपडत चांचपडत म्हणजे हळू हळू बाहेर आले. पण मी ठकल्यासारखीच झाले. काय करू.मला तुम्ही शांत होण्याकरिता उपचार करता पण त्यापासून मला अधिकच ताप होतो. मला तो शारंगधर आणून भेटवा. काय त्याचे वर्णन सांगू तो सांवळ्या वर्णाचा, सुंदर रूपाचा, कंबरेला पितांबर नेसलेला लावण्याचा जणू काय सागरच असलेला त्याला पाहिल्या बरोबर मनाचे हरण करणारा अशा श्रीकृष्ण परमात्म्याला डोळे भरून निरखून पाहते. तोच तो कुणीकडे गेला कुणाला ठाऊक. त्याने मला दर्शन देऊन माझे मन आपल्या स्वरूपाच्याठिकाणी बांधून ठेवल्यामुळे माझ्या शरीरांतील प्राण शोषून गेले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनी माझे शरीर वाणी मनही वेधून टांकले. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading