ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 831

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
  प्रकरण :-११ वे, बुद्धीरूपी सखीशी संवाद अभंग ८३१

चित्तींचें चैतन्य रुपीचे अनुकार । रुप असे साचार नयनामाजीं । तेजाचें तेज दीपी कळिका सामावे । दीपक माल्हावे तेज तेजी ॥१॥ काय सांगो सखिये तेज पैं अढळ । इंद्रियें बरळ देखतांची ॥२॥ घनदाट रुपीं एकरूप तत्त्व । दीपीं दीपसमत्व आप दिसे । निराकार वस्तु आकार पैं अपार । विश्वीं चराचर बिंबलीसे ॥३॥ प्राणप्रिया गेली पुसे आत्मनाथा । कैसेनी उलथा गुरुखुणें ॥४॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलीं उपरती । रुपीं रुप दीप्ती एक जाली ॥५॥

अर्थ:-

चित्तामध्ये असणारे चैतन्यच नानारुपांनी आकारास आलेले आहे. हेच रुप खरोखर सावयव होऊन डोळ्यांत साठविले आहे. तेजाचे तेज दीपज्योतीच असते. दिवा मालविल्यावर ते मूळच्या तेजतत्त्वात विलीन होते. सखे, काय सांगू ग? हे मूळचे तेज म्हणजे परमात्मस्वरुपाचे ज्ञान अत्यंत अढळ आहे. इंद्रियाचे ज्ञान मिथ्या पदार्थ दाखविते. हे विचाराने पटते. ते घनदाटपणे सर्वत्र एकरुपाने आहे. दिव्यांत तेज समत्वाने असते. ही तेजरुप वस्तु निराकार असून तीच आकारास आलेली आहे. व तीच चराचर विश्वांत प्रतिबिंबीत झाली आहे. प्राणप्रिया म्हणज बुद्धि आत्मनाथाविषयी म्हणजे आत्मस्वरुपां विषयी विचारावयाला गेली असता श्रीगुरुंनी च तिला अंतर्मुख केले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते स्वयंप्रकाशमान असून त्यांच्याठिकाणी बुद्धि एकरुप झाली. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading