ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 832

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-११ वे, बुद्धीरूपी सखीशी संवाद अभंग ८३२

प्राणासवें सखी आत्मा हा बिंबला । सवेगुणी निमाला याच्या वृत्ति । ध्यान गेलें ठायां मन गेलें सुखा । नयनीं नयनसुखा अवलोकीं ॥१॥ तेंचि सखी रुप वोळखे स्वरुप । विश्वीं विश्वरुप एका तेजें ॥२॥ द्वैत पैं न दिसे अद्वैत सुरवाडु । एक दीपें उजेडु सर्वां घटीं ॥३॥ विराल्या कामना अमूर्त परिपाठीं । चैतन्याची दृष्टि उघडली रया ॥४॥ सखी म्हणे सुख प्राणासी भुललें । आत्मपणे मुकलें काय करूं ॥५॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलें रुप । दाऊनी स्वरुप एक केलें ॥६॥

अर्थ:-

प्राणासहवर्तमान सखी म्हणजे बुद्धि त्यांत प्रतिबिंबित झालेल्या आभासासह वर्तमान आत्मस्वरुपांच्या ठिकाणी गेली त्या वृत्तिद्वारा तिला लागलेले ध्यान, मन डोळा यांनी त्या परमात्मसुखाला पाहिले. विश्वरुपाने जे एक तेज नटले आहे. तेच तुझे खरे स्वरुप आहे. असे तूं ओळख. त्याठिकाणी द्वैतभाव न दिसता अद्वैताच्या सुखाचाच सर्व जीवामध्ये दीपासारखा प्रकाश होतो. त्यावेळी सर्व कामना अमूर्त असतांना द्वैत दिसेनासे होऊन आत्मस्वरुप चैतन्याची दृष्टि उघडली आहे. असा तुला अनुभव येईल.दुसरी सखी म्हणते तूं सांगितलेल्या परमसुखास आत्मपणाने भुलून मी प्राणास मुकले. याला मी आतां काय करुं. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनी आपले रुप दाखवून आपल्यांशी माझ्या स्वरुपांचे ऐक्य करुन घेतले. असे माऊली सांगतात.

Leave a Reply