ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.800

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१० वे, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ८००

चंद्रा पूर्णिमे पूर्ण शोभा । कळा तुटलिया कैची तेथें प्रभा ॥१॥ तैसा कां गा निकुरवृत्ति करिसी । सर्वां ठायीं विभांडिसी गा देवा ॥२॥ कापुरे दृतीसी रूसणे केलें । तरी सांगपा कवणाचे काय गेलें ॥३॥ तरंगु निमालिया जळसागरू । सागरासी नाहीं दुसरा उपचारू ॥४॥ शिरा शरीरा एक वंकी जैसी । आतां तुझ्या पायीं आम्हां पाइकी तैसी गा देवा ॥५॥ रखुमादेविवरा विठ्ठला राणे राया । मी न बोलें तरी बोलें काजा तुझीया गा देवा ॥६॥

अर्थ:-

चंद्राला पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण शोभा असते. पण सर्व कळा तुटल्या म्हणजे अमावस्येच्या दिवशी तिथे प्रकाश कोठला. त्याप्रमाणे सर्व अनात्मपदार्थाला तुमच्या सत्तेने शोभा असतां सर्व अनात्मपदार्थ नाशिवंत म्हणून त्यांचा त्याग करविण्या इतकी निष्ठूरवृत्ति का करता? सर्व अनात्मपदार्थ तुमच्याहून भिन्न केले तर त्यांचा नाशच होऊन जाईल. ज्याप्रमाणे कापूराने आपल्या सुगंधाचा त्याग केला तर त्याचा कापूरपणाच नष्ट होऊन जाईल. कारण सुंगंधाहून कापूरपणा भिन्न नाही. म्हणून त्याग करणे संभवनीयही नाही. त्याप्रमाणे तुम्ही त्या अनात्मपदार्थाचा त्याग केला तर सगळे अनात्म पदार्थ परमात्मस्वरूपच होतील. यांत कोणाचे काही बिघडणार आहे काय? तरंग आपला आश्रय जो समुद्र त्यांत जर लीन झाला तर समुद्राशिवाय दुसरी गोष्ट बोलताच येणार नाही. शिरा म्हणजे अवयव आणि शरीर ही जरी एकच आहेत त्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सेवकत्व करणे म्हणजे ऐक्य पावणे होय. रखुमादेवीचे पती राजांचे राजे श्रीविठ्ठला मला बोलून कांही कर्तव्य नाही. तरीपण तुमच्या भक्तिसुखाचा महिमा वाढावा म्हणून बोललो असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading