ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.719

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-७ वे, संतमहिमा अभंग ७१९

पूर्वजन्मीं सुकृतें थोर केलीं । ती मज आणि फळासी आलीं ॥१॥ परमानंदु आजि मानसीं । भेटी जाली या संतांसी ॥२॥ मायबाप बंधु सखे सोयरे । यांतें भेटावया मन न धरे ॥३॥ एक एका तीर्थाहुनि आगळें । तयामाजी परब्रह्म सांवळें ॥४॥ निर्धनासी धनलाभु जाला । जैसा अचेतनी प्राणु प्रगटला ॥५॥ वत्स विघडलियां धेनु भेटली । जैसी कुरंगिणी पाडसा मीनली ॥६॥ हें पियूषापरतें गोड वाटत । पंढरीरायाचे भक्त भेटत ॥७॥ बापरखुमादेविवर विठ्ठलें । संत भेटता भवदुःख फिटलें ॥८॥

अर्थ:-
मी मागील अनंत जन्मामध्ये थोर पुण्यकर्मे केली होती. ती आज मला फलद्रूप झाली? कशाहून म्हणाल तर संताची भेट होऊन त्यांच्या कृपाप्रसादाने माझ्या अंतकरणांत परमानंदाचा लाभ झाला. त्यामुळे व्यवहारांत आई, बाप, इष्ट मित्रयांच्या भेटी व्हाव्यात असे माझ्या मनांतसुद्धा येत नाही कारण त्यांच्या भेटीमुळे होणारा आनंद क्षणिक असतो. संताचा अधिकार काय सांगावा? तो गंगा, यमुनादि तीर्थाहूनही मोठा आहे. कारण संतांच्या समुदायांत भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्ष असतो. त्या परमात्म्याचा आनंद किती विलक्षण आहे म्हणून सांगावे. एका दरिद्रयाला एकाएकी धन मिळावे, किंवा मेलेल्याच्या ठिकाणी पुन्हा प्राण प्रगट व्हावा, या गोष्टी न घडणाऱ्या तरं खऱ्याच पण जर घडून आल्यातर त्यास काय आनंद वाटेल. ज्याप्रमाणे आपल्या आईची ताटातूट झालेल्या वासराला आई भेटावी किंवा हरणीस चुकलल आपले पोर भेटावे म्हणजे त्यांना जसा आनंद होतो. त्या प्रमाणे मला आनंद प्राप्त झाला आहे. या पारमार्थिक आनंदाचे माधुर्य अमृतापेक्षाही जास्त आहे. माझे पिता रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचे भक्त जे संत त्यांची आज मला भेट झाली. त्या भेटीनेच माझे संसारदुःख निवृत्त झाले. म्हणूनच म्हणतो की. आजपर्यंत अनेक जन्मांत जी मोठमोठी पुण्य कमें केली ती आज मला फलद्रूप झाली. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading