👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५२६
मुक्ति पावावया करिजे हरिभक्ति । तरीच विरक्ती प्रगटेल ॥१॥ विरक्तीविषयीं होतांचि विचार । नित्य हे नैश्वर ओळखती ॥२॥ तेव्हां आत्मज्ञान अनुभव होय । अविद्यत्व जाय जीवरुप ॥३॥ शांति क्षमा दया तिष्ठती सहज । न दिसे दृश्य काज जगामाजीं ॥४॥ गुरुकृपा द्वारें लहिजे पैं सिद्धी । बोलिला त्रिशुद्धि ज्ञानेश्वर ॥५॥
अर्थ:-
मुक्ति प्राप्त करुन घेण्याची इच्छा असेल तर परमेश्वराची भक्ति करा. त्यापासून वैराग्य उत्पन्न होईल. एकदा विषयाबद्दल वैराग्य उत्पन्न झाले म्हणजे परमात्माच एक सत्य आहे. व इतर वस्तु अनित्य आहे असा जीवांचा निश्चय होईल. व असा निश्चय झाला म्हणजे जीवरुपाने असलेली अविद्या जाऊन शुद्ध आत्मस्वरुपाचा अनुभव येतो. ज्यांना आत्मज्ञान झाले अशा पुरुषांच्या ठिकाणी शांती, दया, क्षमा वगैरे गुण सहजच दिसतील. व त्यांना जगांत कर्तव्य कांही राहातच नाही. हे आत्मज्ञान गुरुकृपेने प्राप्त होणारे आहे असे निश्चित समजा. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
