👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ३७
सुनीळ गगना पालटु तैसा दिसे अंगी नटु । कृष्णी बाणलासे नीळवर्णु गे माये ॥१॥ यमुनेच्या पाबळी तनु घेऊनि सांवळी । पांवा वनमाळी वातु असे ॥२॥ पांवयाचेनि नांदे कृष्णचेनि वेधे अमृतघनु वोळला । आकाश वोळूनि वर्षाव झाला ब्रह्मरस पूर आला रे ॥३॥ कान्हा अति सुंदर वदनारविंद । आळी सेविती अनिवार रे आयो ॥४॥ चांदनादि टिळकु लल्लाटी जया साजे मोर विसांवेटि रे आयो । सुरतरू कुसुमे कबरी भारू रे कुंडले झळकति कपोळी रे आयो ॥५॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलुरे । त्रिभुवन जगमोहन रे आयो ॥६॥
अर्थ:-
जसा आकाशाचा निळा रंग बदलत असतो तसाच कृष्णाचा ही बदलत असतो. तोच कृष्ण पावा वाजवत यमुनेच्या तटावर उभा आहे. त्या पाव्याच्या सुरु मुळे तो अमृतघन अनावर होऊन आकाशातुन वर्षाव करत आहे त्यामुळे ब्रह्मरसाचा पुर आला आहे. त्या सुंदर मुखकमळावर भक्त लुब्ध असुन ते भ्रमर बनुन त्याचा स्वाद चाखत आहेत. त्यांने सुगंधी चंदन टिळा रेखला असुन केसा मध्ये मयुरपुच्छ खोवले आहे. सुंदर सुरतरुंची फुले घातली असुन त्याच्या कानातील कुंडल झळाऴत आहेत. रखुमाईचा पती व माझा पिता असलेला तो विठ्ठल त्यांने जगावर मोहनास्त्र चालवले आहे. असे माऊली सांगतात.

[…] महाराज सार्थ गाथा अभंग ३६,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ३७,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग […]