ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 18

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

  ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग १८

मदनमूर्ति विश्वीं अळंकारली । ते डोळ्यां असुमाय जाली । पाहतां मनाची वृत्ति नपुरे तेथीची सोय । तेथें भरोनी वोसंडली गे माये ॥१ ॥अभिनव रूप कैसें मना अगोचर अरूप रूपाशी आलें । तें हें कल्पद्रुमातळीं ठाण मांडूनि देहुडें । तेणें आनंदघनें निवविलें गे मायें ॥धृ॥ चिदानंदाची मांदुस किंचिद्घन चिदाकाश । तेजःपुंज प्रकाश चरणीं शोभा ॥निडारलें दृष्टी पाहतां रूपाचा एकवळा । कैसा साकार सोहळा भोगीतसे गे माये ॥२॥ सकळ तीर्थें आर्तली । तीं ऋषिवृंध्दें घेऊनि बैसली । पावन झालीं चरणांगुष्टीं ॥वांकी तोडरु गजरीं । गर्जुतसे नानापरी ॥तो श्रुतिनादु अंबरीं । सांठवला गे माये ॥३॥ उपनिषदांचा गाभा । परि हा देहुडा पाउलीं उभा । जानुजघनींच्या प्रभा । नभ धवळलें । सुरंग सोनसळा । वरि वेढिला पिंवळा । त्यावरी गाढियला मेखळा । रत्नखचित गे माये ॥४॥ हा जगडंबरु जगदाभासु । कीं ठसावला आभासु । नाभिकमळीं प्रकाशु । चतुरानना ॥पाहतां तेथींची हांव । मना न पुरें तेथींची धांव । म्हणउनि सगुण ध्यान । करितुसे गे माये ॥५॥ ब्रह्मांडाचिया कोडी । रोमरंध्रीं उतरडी । मदन सांडूनियां प्रौढी । उदरा आला ॥सुघटित वक्षस्थळ । निरोपम केवळ । वरी पदयुगुळ । द्विजोत्तम गे माये ॥६॥ चहूं पुरूषार्थांचें साधन । तेंचि आयुधें मंडन । बाहीं बाहुवटे मंडण । मंडण जाले ॥वीर कंकण मनगटीं । कांडोकांडीं मुद्रा दाटी । कैसा अलोहित नखें बोटीं । वेणु वाहे वो माये ॥७॥ ब्रह्मरसें घनु आतला । कीं सुधारसु मुराला । तोचि नादु सुस्वर आला । पावया छंदें । अधरींचें अमृत । पिकलेंसे ब्रह्मरसु । तेणें जाला सौरसु । गोपिजनां गे माये ॥८॥ नयनींचे तारे दो पक्षीं प्रेम पुरे । द्वैताद्वैत एकसरे । ठकलें ठेलें ॥कुंडलाचिये दीप्ती । लोपला गभस्ती । सुखस्वरूपाची शांती । येणें सुखे गे माये ॥९॥ आतांं पाहतां पाहतया दृष्टी नपुरे । ध्यातां तरी मनचि नुरे । आंत बाहेरी पुरे । व्यापूनि ठेलें । मावळलिया दृष्टि पाहतां देखणें ठसावलें । निर्गुण गुणासी आलें सदोदित गे माये ॥१०॥ आतांं हा केवीं पाहावा पाहतयेचि दृष्टि । मन मनेंचि दिधली मिठी । तेथील ते गोडी रूपा आली म्हणे निवृत्ति । ज्ञानदेवा पाहें चित्तीं । आतांं जागृतीच्या अंतीं । सुखशांती रया ॥११॥

अर्थ:-

भगवान श्रीकृष्ण मदनमूर्ति विश्वरूपाने कशी अलंकृत झाली आहे, हे डोळ्यंने पाहता पुरवत नाही ! तेथील शोभा मनाने कितीही वेळ पाहू गेले असता तृप्ति होत नाही; त्या मूर्तीत असलेले सौंदर्य भरून ओसंडते की काय असे वाटते. ॥१॥ काय चमत्कार सांगावा, वास्तविक परमात्मस्वरूप अगोचर म्हणजे मनाला विषय न होणारे, ते कसे सुंदर रूपाला प्राप्त होऊन या कल्पद्रुमाखाली दिडक्या पायांनी उभे आहे; त्या आनंदघन सुंदर परमात्म्याने चित्ताला शांत करून ठेवले आहे. ॥धृ॥ ही श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ति म्हणजे चैतन्यरूप आनंदाची पेटीच किंवा चैतन्यरूप आकाश आहे असे वाटते; चरणाच्या ठिकाणी तेजःपुंज शोभा कशी पूर्ण आहे ते सर्व गुणांनी एकरूप झालेले सुंदर सगुणमूर्तीचे रूप पाहात असता, सुखाचा सोहळाच भोगतो आहे, असे वाटते, ॥२॥ जगातील सर्व तीर्थे ज्यांचा ऋषी आश्रय घेऊन बसले आहेत, ती तीर्थें भगवत् चरणांगुष्टाच्या स्पर्शाने पावन झाली आहेत, हातात वाक्याचा जोड आहे व पायात ( तोरड्या नावाचे भूषण ) जोड असून त्याचा नाना त-हेने ध्वनी होत आहे.तो नाना त-हेने होणारा शब्द आकाशात साठवून गेला आहे. ॥३॥ हा श्रीकृष्ण परमात्मा अत्यंत गुह्य म्हणून उपनिषदांने प्रतिपादन केलेला निराकार असता, आमचे समोर हा आज वाकुड्या पाउलाने उभा आहे पहा ! त्याच्या पोट-याच्या व मांड्याच्या प्रभेने सर्व आकाश प्रकाशित होऊन गेले आहे.उत्तम सुवर्ण रंगाचा पीतांबर वेढलेला आहे, आणि त्यावर रत्नखचित अंगवस्र कंबरेला बांधले आहे. ॥४॥ वास्तविक त्याचे स्वरूप जगाएवढे असता ते लहानशा सगुण मूर्तीत कसे साठवले आहे ! त्याच्या नाभिकमळापासून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव त्या नाभिकमळाची शोभा पाहात असता त्याचे मन तृप्त होत नाही; म्हणूनच हा सगुण ध्यान करतो की काय कोणास ठाऊक ? ॥५॥ ज्याच्या रोमरंध्रात ब्रह्मांडाच्या कोटीच्या कोटी उत्पन्न होतात, व ज्याला पाहून मदन आपला अभिमान परित्याग करितो, आणि त्याच्या स्वरूपात प्रवेश करितो, ज्याचे वक्षस्थळ अत्यंत निरूपम असून ज्याच्यावर ब्राह्मणाच्या पायाचे चिन्ह आहे. ॥६॥ त्याच्या चारी हातातील आयुधे म्हणजे चारी पुरूषार्थाची साधनेच आहेत, सगळ्या जगाचे रक्षण करणारे बळ त्याच्या बाहूत असून वीरांच्या हातात असलेले काकण मनगटात आहे, आणि जागोजागी म्हणजे त्याच्या बोटात आंगठ्या आहेत; आणि रक्तवर्णाची नखें ज्याच्या बोटाला आहेत, त्याने हातात वेणू धारण केली आहे.. ॥७॥ या परमात्मा श्रीकृष्णाची मूर्ति, म्हणजे ज्याच्यात ब्रह्मरस आहे असा मेघ अवतरला की काय, किंवा अमृत मुरून त्याचा हा सगुण आकार बनला की काय असे वाटते.त्या वेणूचा सुस्वर उमटत आहे.यावरून असे वाटते की, भगवंतांच्या अधरात असलेला ब्रह्मरस पिऊनच सर्व गोपीजनाला अतिशय आल्हाद होतो. ॥८॥ त्याच्या दोन्ही डोळ्यातील तेजाचे तारे दोन्ही पक्षात म्हणजे द्वैताद्वैतात एकदम व्याप्त होऊन ठाकले आहेत म्हणजे राहिले आहेत; कानातील कुंडलाच्या प्रकाशाने सूर्यप्रकाश लोपून गेला; सुंदर स्वरूपाची शांती या सगुण सुखानेच प्राप्त होते. ॥९॥ या सगुण स्वरूपाला पाहत असता पाहणाऱ्याची दृष्टि तृप्त होत नाही.ध्यान करू गेले असता, मन शिल्लक राहत नाही.असे अंतरबाह्य त्याचे स्वरूप व्यापून राहिले आहे. ॥१०॥ पहाणेपणाची दृष्टी मावळली असता, पाहाणाराचे पाहणे या मूर्तीत एकरूप होऊन जाते; मूळचा निर्गुण परमात्मा सा सगुण होऊन राहिला आहे ! आता याला पहावा तरी कसा ? पाहणारा दृष्टीने पाहू गेला असता, मनाचे मनातच मिठी बसली तर या स्वरूपाच्या दर्शनाची गोडी प्रकट होते.श्रीनिवृत्तिनाथ म्हणतात, हे ज्ञानदेवा, या श्रीकृष्ण परमात्म्याला चित्तात पाहा, म्हणजे त्या दर्शनाच्या जागृतीने शेवटी सुखशांती होईल. ॥११॥ ॥जय जय ज्ञानेश्वर माऊली ॥

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading