ऊर्मिला चरित्र संपूर्ण भाग ५, (१७ ते २०)

राम,सीता,लक्ष्मण रावणाचा पराभव झाल्यावर,त्याच्या मृत्युनंतर लंके ची सारी व्यवस्था लावून अयोध्येत परत आले.संपूर्ण अयोध्यानगरी नववधूसारखी नटून त्यांच्या स्वागतास सज्ज झाली. नंतर रामाचा अभिषेक झाला.सर्व स्थिर स्थावर झाल्यावर सुमित्रेने स्वतः पुढाकार घेऊन लक्ष्मण-उर्मिलेचा...............................

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


       राम,सीता,लक्ष्मण रावणाचा पराभव झाल्यावर,त्याच्या मृत्युनंतर लंके ची सारी व्यवस्था लावून अयोध्येत परत आले.संपूर्ण अयोध्यानगरी नववधूसारखी नटून त्यांच्या स्वागतास सज्ज झाली. नंतर रामाचा अभिषेक झाला.सर्व स्थिर स्थावर झाल्यावर सुमित्रेने स्वतः पुढाकार घेऊन लक्ष्मण-उर्मिलेचा………………………….

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! ऊर्मिला !!!

!!!  उर्मिला  !!!

                   भाग -१७.

        स्पर्धेचा दिवस उजाडला.दशरथां च्या बाजूने बसलेल्या तीनही राण्या चारही राजपुत्रांकडे अभिमानाने बघत होत्या.रामच विजयी होईल याबद्दल कोणालाच शंका नव्हती.राजाच्या मुखा वर आनंद मावत नव्हता.चौघी बहिणी  एकत्रित बसल्या होत्या,पण थोड्या वेळाने मांडवी सासर्‍याजवळ जाऊन बसली.त्या भयंकर दिवसांपासून मांडवी आपल्या बहिणींशी चकार शब्दही बोलली नव्हती.त्यांच्यातील अबोबा वाढतच होता,त्यामुळेच उर्मिला चिंतित होती.

         स्पर्धेत उतरायची भरताची बिलकुल इच्छा नव्हती,पण रामाच्या आग्रहाने तयार झाला.चौघांनीही वरवर भाग घेतला.स्पर्धा सुरु झाली व संपलीही भरताने सर्व कौशल्यात अग्रक्रम प्राप्त केले असूनही,रामास विजेता म्हणून घोषित केल्याचे बघून सर्व उपस्थित आश्चर्यचकित झालेत.मग वसिष्ठ म्हणाले

या प्रत्यक्ष स्पर्धेव्यतिरिक्त राजपुत्रांची वेगळ्या प्रकारे परीक्षा घेतली होती. वसिष्ठांच्या एका शिष्याने त्यांच्याच सांगण्यावरुन वेषांतर करुन,ऐन स्पर्धा सुरु असतांना याचकाच्या रुपात मदत मागीतली होती,रामाने स्पर्धा सोडून त्याच्या मदतीस धावले.रामाच्या या कृतीने ते दुसर्‍या स्पर्धेत विजेता ठरले आणि सिंहासनाचा वारस…उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. मंथरेचा चेहरा मात्र नैराश्यग्रस्त झाला

           रात्री एकांतात लक्ष्मणाला उर्मिला म्हणाली,कसे खेळलात तुम्ही? नेमके कोणाला मुर्ख बनवत होता? हसून लक्ष्मण म्हणाले,आमच्या पालकांना! हे शक्ती प्रदर्शन करण्यास आमचा,विशेषतः भरताचा ठाम विरोध होता,परंतु मंथरेच्या सांगण्यावरुन कैकयी मातेन पिताश्रींना तयार केले.आमच्या चौघांपैकी सर्वोत्तम कोण हे अयोध्यावासियांना समजावं अशी तिची इच्छा होती.मंथरेने आयोजन उत्तम केले होते पण तिचा डाव फसला.

           दुसर्‍या दिवशी कुबडी मंथरा आपल्या निजी कक्षात बसलेली पाहून उर्मिला चकित झाली.हे बघ मी काय आणले तुझ्यासाठी?सीताने बनवलेला गरम गरम पदार्थ तुला खायला आणला. घे खाऊन उन उन.आणि सीतेबद्दल विपरित सांगून उर्मिलेच्या मनात विष पेरणी करुं लागली.तिचे सारे मुद्दे पटण्या सारखे होते व पटलेही,पण क्षणभरच! एकदम तिला मांडवीच्या वागण्याची याद आली आणि स्वतःला सावरले.मंथरेचा कावेबाजपणा उर्मिलेच्या लक्षात आला. आणि संताप जागा झाला.पण सौम्य शब्दात मंथरेला तोडून टाकत म्हणाली, मंथरा,पुरे आतां,धन्यवाद,निघ आता…

अपमानाने मंथरा किंचाळली,मी राणीची मुख्य दासी व दूधमाता आहे.माझ्याशी तूं आदराने वागायला हवय!आणि त्याच आवेशात सीतेची व तिची तुलना करत पुनः विष पेरले.मंथरेने तिच्या दुखर्‍या नसेलाच स्पर्श केला आणि लहानपणा पासूनचे अनेक प्रसंग तिच्या नजरेसमोर तरळले.पण शेवटी विवेकाने मात केली. उर्मिला अतिशय थंड स्वरात म्हणाली,तूं कोण आहेस हे सांगीतले.आतां मी कोण याची तुला आठवण करुन देते.मी राज कन्या असून,ज्यांची सर्वांना सर्वाधिक भिती वाटते त्या लक्ष्मणाची पत्नी आहे. यापुढे माझ्या अनुमतीशिवाय इथे पाऊल टाकण्याचं धाडस करुं नकोस.तेव्हा ताबडतोब निघायचे…

         क्रोधीत मंथरा पाय आपटत निघून बाहेर पडली.तेवढ्यात लक्ष्मणाचा संतप्त स्वर कानी पडला.तूं इथे काय करतेस? मंथरा,तुला याआधीही सांगीतले होते, आज पुन्हा सांगतो,माझ्या कक्षाच्या किंवा पत्नीच्या आसपासही फिरकायचे नाही.प्रवेशत लक्ष्मणांनी कठोर स्वरांत विचारले,ही आगलावी कपटी स्री कशाला आली होती उर्मीला?ती आली होती तिच्या जाळ्यात ओढायला,पण मी तिच्या कावेबाजाला बळी पडत नाही हे पाहतांच,तिनं नखं बाहेर काढले.म्हणून मी तिला घालवून दिले.उर्मिला ती फार पाताळयंत्री आहे,तिच्यापासून सावध व दूर रहा.

           पण ती इतके दिवस इथे टिकली कशी?कारण ती माता कैकयीच्या आई ठीकाणी आहे.सात भावांची एकटीच बहिण कैकयी मातेशिवाय वाढली.तिच्या संगोपनासाठी दूधमाता म्हणून मंथरेची नेमणूक करण्यात आली होती.मंथरेने अत्यंत समर्पित भावनेने तिचे पालन केले कैकयीचे पिता राजा अश्वपतींनी कैकयी च्या आईला,राज्यातून केकय नगरीतून हद्दपार केलं होतं.अश्वपतींना पक्षाची भाषा समजते हे गुपित ते कुणाला सांगू शकत नव्हते.सांगीतल्यास त्यांचा तात्काळ मृत्यु झाला असता.एकदा राजा राणी उपवनात बसले असतां,प्रणयातूर हंसजोडीचे गमतीदार बोलणे एकून राजा एकटेच हसत असल्याचे बघून राणीने कारण विचारले.त्यांनी तिला नाना परीने की,कारण सांगीतले तर त्यांचा तात्काळ मृत्यु होईल,तरी ती हेका सोडेना,तेव्हा दुखावलेल्या अश्वपतींना तिच्या स्वार्थी पणाचा भयंकर राग आला नी त्यांनी तिला प्रासाद व नगरीतून हद्दपार केले. लहानग्या कैकयीला आपली माता परत कधीच दिसली नाही.तिच्या संगोपना साठी नियुक्त केलेली मंथरा विवाहानंतर तिच्याबरोबर अयोध्येस आली आणि इथे राहू लागली.

                  क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि. १८-१-२०२२.

!!!  उर्मिला  !!!

                     भाग -१८.

         ऊर्मिलेने लक्ष्मणाला सांगीतले, अत्यंत अल्पावधीत सीता व मांडवीच्या मनात विष पेरण्यात मंथरेने यश मिळवले  मिळवणारच!कारण तुम्ही बहिणी नवीन आहांत.इथले कोणीच तिच्यावर विश्वास ठेवत नाही,उलट सारे तिचा तिरस्कारच करतात.माता कैकयीमुळे सगळे तिला सहन करतात.

        राजप्रासादाभोवती पसरलेल्या विसृत उपवनात उर्मिला निसर्गचित्र रंगवीत होती,सोबत विचारचक्रही सुरु होते.राजा दशरथ वयोवृध्द झाले होते. त्यांना चिंता होती,युवराज्याभिषेकाची. या राजप्रासादात सर्वात दुःखी होती माता कौसल्या.कौसल्याचे जग जरी रामा भोवती फिरत असलं तरी, पारदर्शक, स्पष्टवक्ती कैकयी चारही पुत्रांवर सारखी माया करीत होती.भरतापेक्षाही अधिक ममत्व रामावर होत.शिघ्रकोपी लक्ष्मणा शी मात्र ती जपून वागत असे.पण त्यांचा रामाप्रती असलेल्या एकनिष्ठतेचा आदर

वाटे.रामावर जास्त प्रेम,राजा दशरथाचं जीवापाड प्रेम असल्यामुळे तर करत नसेल ना?अशी शंका उर्मिलेला आली.       

          अलिकडे मांडवी अंतर राखून वागत असल्यामुळे चौघींमधे पूर्वीसारखी सहजता नव्हती.शक्य तेवढ्या लवकर ही कटूता दूर होण्याच्या दृष्टीन उर्मिलाचे प्रयत्न सुरु होते,पण मांडवी दाद देत नव्हती.अभेद्य भिंतीप्रमाणे तिच्या जगात या तिघींना प्रवेश नव्हता.वास्तविक मांडवी व उर्मिला एकमेकींच्या खुप जवळ होत्या.तरी पण त्यांच्या नात्यातील सहज संबंध कां दुरावेत?विचारांच्या व रंगकामात गर्क उर्मिलेला केकय देशातून आलेला दूत दिसला नाही.मनाच्या अस्वस्थतेमुळे मनासारखे चित्र जमले नाही.कितीतरी वेळ तशीच सुन्नपणे बसली होती.तेवढ्यात लक्ष्मणाने येऊन कशाचा एवढा विचार करते म्हणून विचारले.म्हणजे तुलाही माहित झाले तर

काय?माता कैकयीचे पिता अश्वपतींची प्रकृती गंभीर आहे,ते विवाहाला उपस्थित राहू शकले नव्हते,म्हणून भरत  शत्रृघ्नसह नववधूंना भेटण्याची इच्छा व याचवेळी दुर्देवाने केकय देशावर शत्रूने आक्रमण केल्यामुळे भरताचे मामा युध्दजीतने भाचांकडून मदतीची मागणी केली.ते चौघेही रवाना होत आहेत.पण मला न भेटतां मांडवी व श्रुती कशा जातील? तेवढा अवधी नव्हता.सर्व अचानकच ठरलं.एव्हाना ते रवानाही झाले असतील..ऐकले मात्र नी धावतच त्यांना भेटायला निघाली,मधेच भेटलेल्या सुमंत्रांना विचारल्यावर,नुकतेच सर्वाधिक चपळ अश्वावर आरुढ होऊन रवाना झाले.त्यांच्या मागोमाग दोन्ही राजकुमारी रथातून रवाना झाल्यात.नमस्कार करुन सुमंत्र निघून गेले.

          उर्मिला विषन्न झाली.जाण्याआधी चुलत बहिणींशी बोलणे आवश्यक होते. परत कधी संधी मिळेल माहित नव्हते.

         ती तशीच पाय ओढत कक्षात आल्यावर लक्ष्मणांनी विचारले,मिला काय झाले?आणि इतक्या दिवसांचा बांधून असलेला उद्रेक एकदम प्रगटला. त्यांच्या छातीवर डोके ठेवून,छाती भिजवू लागली.नको काळजी करुस,त्या लवकर परत येतील.तसं नाही…आणि कांही दिवसांपूर्वी चौघींमधे झालेली बोलाचाली वाद,मतभेद,दुरावल्या गेलली मने,आणि  मांडवी कशी टाळते हे सर्व कथन केल्या वर लक्ष्मण म्हणाले,हे सर्व आधी कां नाही सांगीतले?बरं!बघतो मी!पण ताबडतोब संवाद साधून चुकीचे गैर समज दूर करायला हवेत.

        उर्मिलाने विचारले,तुम्हा भावांमधे कधी मतभेद होतात का? होतात ना.. पण,क्षणिक असतात.परस्पर सामंज्यस्य समजुतदारपणा,आकलन,विवेक आणि परानुभुतीवर आधारीत तर्कसंगतीमुळे आमच्या भावातील संबंध दृढ आहेत. आम्ही बंधू कधीही एकमेकांविरुध्द जाणार नाही…आणि नियती हसत होती

पुढे घडणार्‍या घटनांसाठी…

        मांडवी आणि श्रुतकीर्तीला केकय नगरीला जाऊन केवळ सप्ताहच ऊलटला तरी त्यांची उणीव उर्मिलेला तीव्रतेने जाणवत होती.सीता अधिकांश वेळ पाकगृहात..उर्मिला एकटी पडली. तिला अभ्यास आणि चित्रकले शिवाय दुसरे काम नव्हते.ती अशी विचारांत मग्न असतांना लक्ष्मण येऊन म्हणाले,तातांनी  नुकतीच राजसभेत रामाचा युवराजपदा  चा उद्या अभिषेक होईलची घोषणा केली

कां? एवढ्या घाईने कां? आश्चर्याने तिने विचारले.तातांची तशी इच्छा आहे.पण भरत शत्रृघ्न इथे नाहीत,शिवाय अशा महत्वाच्या प्रसंगी राजा अश्वपती,माझे पिता जनक,शांताताई यांना निमंत्रण नको द्यायला?की,भरताच्या अनुपस्थिती चा लाभ घेण्याचा त्यांचा मानस आहे?

                क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
                दि. १८-१-२०२२.

!!!  उर्मिला  !!!

                   भाग -१९.

          मिला,कांहीही बोलू नकोस.जास्त वेळ नाही.सगळं अघटीत घडत आहे.या समारंभासाठी तूं सीतेला तयार कर हे सांगायला आलोय!राम सीता आज दिवसभर उपास करतील.उद्याच्या मुख्य विधीपूर्वी आज त्यांना अनेक उपविधी कराव्या लागतील.ठीक आहे.तुला काय वाटते मला आनंद नाही झाला?पण ज्या घाईने हे घडत आहे त्यामुळे नवल वाटत आहे व शाशंकही!

           मिला,तातांना अलिकडे जी दुःस्वप्ने पडत आहे त्यामुळे ते त्रस्त आहे आणि प्रकृतीही ढासळली आहे.त्यांना वाटते कोणत्याही क्षणी आपल्याला मृत्यु येईल.त्याआधी त्यांना रामाचा अभिषेक बघायची इच्छा आहे.हा कुठला व्यूह नाही तर एका वयस्कर त्रस्त पित्याची भीती आहे ही!

     माता कैकयीला हे माहीत आहे?अजून नाही.नुकतंच रामाने मला व माता कौसल्येला सांगीतले नेमके त्यावेळी तिथे माझी आई व सीता उपस्थित होती.घाई नाही का होत?कधी नव्हे ते आज मी तातांच्या निर्णयाशी सहमत आहे.कां? भरतावर तुमचा विश्वास नाही? आहे ना! पण तो त्या मातेचा पुत्र आहे,जीच्या मनात मंथरेनं वर्षानुवर्षे विष कालवत राहीली.तुझ्या लक्षात आले असेल,ती कधीच भरत म्हणून हाक न मारतां युवराज म्हणते.तो तरुण आहे.त्याच्या मनावर मातामह किंवा मातेचा प्रभाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माता कैकयीचा हट्टी स्वभावाची तुला कल्पना नाही.तो तिच्या हट्टाला बळी पडू शकतो.पण त्यांना रामच राजा व्हायला हवा ना?खरय! पण मनातून वाटत कां हा ही प्रश्नच आहे.

        खरं म्हणजे,माझ्या भावनांची सरमिसळ झाली.राम राजा होणार याचा आनंद आहे,पण नक्कीच कांहीतरी गोंधळ होईलसे वाटते.अल्पावधीतच विधी सुरु होईल,तेव्हा त्वरा करुन शक्य तेवढ्या लवकर सीतेला तयार कर,असे म्हणून लक्ष्मण निघून गेले.धास्तावल्या मनाने उर्मिला सीतेच्या कक्षाकडे निघाली कैकयीचा पुत्र राजगादीवर बसेल असं वचन अश्वपतींना दिले होते.त्या अनुषंगा ने राजांनी कैकयी मातेशी बोलायला हवे होते,वधू निवडतांनाही त्यांनी डावलले होते.

        सीतेच्या कक्षात प्रवेश केल्यावर, सीता स्वस्थ बसलेली होती.उद्या रामाचा अभिषेक!पण तीच्या ठायी आनंद किंवा उत्साह दिसत नव्हता.राम आतांच कौसल्यामातेला भेटायला गेले.त्यांनी ही वार्ता आधी कैकयीमातेला सांगायला हवी होती.श्रुती,मांडवीची उणीव भासत आहे,त्या येईपर्यत थांबायला हवे होते.  आतां वेळ नको दवडू,चल लवकर तयार हो! मी मांडवीच्या हक्कावर घाला तर घालत नाही ना?मला फार अपराध्या सारखे वाटत आहे.उर्मिला म्हणाली,अग! ते तिचे शब्द नव्हतेच.मंथरेनी तिच्या मनात भरवलेले विचार होते.कुठे आहे मंथरा? बहुतेक ती कैकयीमातेकडे असावी.

           अजून पुरेसे उजाडलेही नव्हते तरी,लोकांची प्रासादाकडे रिघ लागली होती.संपूर्ण अयोध्या नगरी नववधूसार खी सजली होती.अभिषेकाची जय्यत तयारी झाली होती.कुठही ऊणं नव्हतं. ढोल,ताशे,तुतार्‍या,सनई,चौघड्याचा निनाद सुरु होता.सर्वीकडे हर्ष उत्साहाचे वातावरण होते.विविधरंगी फुलांनी राज प्रासाद सजला होता.पण अद्याप राजा दशरथ कक्षेबाहेर आले नव्हते.मुनी वसिष्ठ शिष्यांसह येऊन पोहोचले होते. मंत्रीगण,वरिष्ठ अधिकारी,सन्माननीय

नागरिक राजसभेत उपस्थित होते. कौशल्याच्या चेहर्‍यावरील आनंद, अभिमान लपत नव्हता.सुमित्रा नेहमी सारखी गंभीर!पण तिसरी राणी अजून कां आली नव्हती.उर्मिलेच्या मनांत शंके चे पाल चुकचुकली.मंथराही कुठे दिसत नव्हती.

          राम-सीता राज्याभिषेकासाठी सज्ज होते.मुख्यमंत्री सुमंताला बोलावून वसिष्ठ म्हणाले,राज्यभिषेकाची सर्व तयारी झाली आहे.राजांना बोलवून आणा.थोड्याच वेळात उतरलेल्या चेहर्‍याने एकटेच आलेले सुमंताला पाहून सर्वांना आश्चर्य वाटले.रामाला बोलावले असल्याने ते राजाच्या कक्षेत गेले आहेत. लक्ष्मणही राजाच्या कक्षाकडे गेले.नेमकं काय घडलं याबद्दल तर्कवितर्क सुरु होते. सीतेने उर्मिलेचा हात धरला.भीतीमुळे पोटात खड्डा पडला.कौसल्या,सुमित्रा चिंतित झाल्या.राज्याभिषेकाला उशीर कां होत आहे म्हणून राजप्रासादाबाहेर प्रजाजन अस्वस्थ झाले.अर्ध्या घटकेनंतर अंगावर कोणतेही राजचिन्ह नसलेले राम शांत चेहर्‍याने राजसभेत आले.लक्ष्मण संतापाने घुसमसत होता.नक्कीच कांही तरी अनिष्ट घडलंय! उर्मिलेच्या मनात काहूर उठले….

                 क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
             दि. १८-१-२०२२.

!!!  उर्मिला  !!!

                   भाग -२०.

     वस्रालंकाराविरहित साध्या पोषाखात रामाने येऊन सांगीतले,हे सिंहासन भरता साठी असून,मला १४ वर्षे दंडकारण्यात वनवास घेण्याची आज्ञा पिताजींनी दिली आहे.माते हे तुझ्या कानावर घालण्या साठी इथे आलोय,दुःखावेगाने कौसल्या कोसळणार तोच रामलक्ष्मणाने तिला सावरले.ठरलेल्या कार्यक्रमात बदल झाल्यामुळे उपस्थितांना जाण्याची नम्र सुचना लक्ष्मणाने दिली.कळवळून कौसल्या म्हणाली,रामाऽ तूं मला सोडून कसा जाऊ शकतोस?अरेऽ आतांपर्यतच अंधकार आयुष्य तुझ्याच आशेवर जगत आले.एक दिवस राम राजा होईल,आपण राजमाता होऊं या आशेवर सारं सहन करत आले.तुझ्याशिवाय मी कशी राहू शकेन?माते!पित्याची आज्ञा पाळणे माझे कर्तव्य,धर्म आहे.लक्ष्मणाचा उद्रेक झाला १४ वर्षाचा वनवास?असा कोणता गुन्हा घडला ज्याची येवढी कठोर शिक्षा ठोठाव ण्यात आली?शंभासुराच्या युध्दात कैकयीने त्यांचे प्राण वाचवले होते म्हणून तिला दिलेल्या दोन “वरांची” पूर्ती आज करावी लागली.

        प्रसंगाने अचानक घेतलेल्या कलाटणीने उर्मिला थिजली.मेंदु काम करेनासा झाला.लक्ष्मण कांहीकेल्या शांत होत नव्हते.ते रामाला म्हणाले,पित्याने पत्नीला दिलेले वचन पाळण्याचे बंधन तुझ्यावर नाही.अयोध्येचा आवडता युवराज,प्रजेचा शूर,दयाळू,न्याय राजपुत्र म्हणून आवडता आहेस.राजाविरुध्द उठाव करुं शकतोस.सेना,प्रजा तुझ्या पाठीशी उभे राहतील.तू फक्त हो म्हण, बाकीचे मी सांभाळतो.पण तू असं करणार नाहीस.अन्याय सहन करुन १४ वर्षे वनवास पत्करशील.कारण कुळाच्या परंपरेनुसार पुत्रधर्म, आज्ञाधारकपणा! आणि हे कैकयी मातेला व भरताला ठावूक होते.वाऽऽ काय सुंदर प्लॅन आखला…जिंकले ते…,

         लक्ष्मणाचा आवेश थोडा कमी झाल्यावर,राम म्हणाले,सत्ता,सिंहासना चा लोभ मला कधीच नव्हता.पित्याची आज्ञा ही एक संधी आहे माझ्यासाठी! मग तुझी माता,पत्नी,भावांचं काय?थरथरत्या आवाजांत कौसल्या म्हणाली. एक माता आपल्या पुत्राला घट्ट मिठीत धरुन रडणारं,भावनांना आव्हान देणारं ते  दृष्य फार विदारक होतं.माते,तातांना दुसरा पर्यायच नव्हताअसहाय्य,शोकात बुडलेले तात कोसळले आहे,त्यांचं सांत्वन करणं माते या क्षणी तुझ्याच हाती आहे.माते तूं कैकयीमातेचा तिरस्कार करुं नकोस.तिला नियतीने करण्यास भाग पाडले.लक्ष्मण उसळून वाटेल तसे बोलूं लागल्यावर त्यांना शांतवत सुमित्रा म्हणाली,नियती बदलणार नाही,तेव्हा तूं आपल्या जेष्ठ  बंधूच्या मागे खंबीरपणे उभा रहा.शांत होत लक्ष्मण रामाला क्षमा मागत म्हणाले मी तुझी सावली ना?तूं म्हटल्याप्रमाणे आपले देह दोन,प्राण एक आहे ना?मग मी तुझ्याबरोबर येणारच,नाही म्हणू नको

        हे ऐकताच उर्मिला स्तब्ध झाली.हे आपल्याला १४ वर्षे सोडून जाणार!आपण अनुमती देवो अथवा नाही,तरी जाणारच!राम म्हणाले,इथे राजप्रासादास तुझी जास्त गरज आहे,माता,सीता,उर्मि कडे लक्ष द्यायला.दंड मला एकट्याला मिळाला आहे.उसळून सीता म्हणाली, जिथे पती,तिथे पतीच्या प्रत्येक सुख दुःखात अर्धांगीनी या नात्याने मी असावे हा पत्नी म्हणून माझा धर्म आहे.तुमचा विरह मृत्युहुन कठीण आहे.तुम्ही जिथे जाणार तिथे मी असेन,नाही म्हणून माझा अपमान करुं नका.

         उर्मिला हादरली.सीता आणि अरण्य?उलट तिच्यामुळे दोघा भावांची जबाबदारी वाढेल.उर्मिला मधे बोलणार होती,पण आवरले.सीता,लक्ष्मणाने त्यांचे मानस स्पष्ट केले होते.ज्या दोन व्यक्तींवर उर्मिलाचे जीवापाड प्रेम होतं,त्यांनी तिला क्षणभरही गृहीत न धरतां आपला निर्णय ऐकवला होता.अनेक भावनांचा कल्लोळ तिच्या मनी दाटला.आपली इथे कोणाला ही आवश्यकता नाही,वियोगाच्या कल्पना तिला भयंकर वाटल्या.कोणाच्या ही लक्षात येणार नाही अश्या हलक्या पावलांनी तिथून निघून गेली.आपल्या प्रिय बहिणीने,पतीने नाकारल्याचे तिला भयंकर दुःख झाले.अवहेलना,प्रतारणा, विश्वासघात झाल्याची भावना मनी दाटली.ज्या पुरुषावर तिने अत्यांतिक प्रेम केले,त्याचा १४ वर्षे विरह कसा सहन कराव्?याचा अर्थ,त्यांच पुरेसे प्रेम नाही, त्यांना तिची गरज नाही तर?ह्रदय पिळवटलं,मन आक्रंदू लागलं.

          तेवढ्यात मिऽलाऽ असा पिळवट लेला लक्ष्मणाचा स्वर कानी पडला. तिच्या डोळ्यातील वेदनाचा डोह बघून ते चपापले.शक्य असल्यास मला क्षमा कर मिला माझं तुझ्यावर खरच खूप प्रेम आहे माझा तिरस्कार नको ग करुस!कसाबसा आवंढा गिळत लक्ष्मण म्हणाले,माझं मन अस्तित्व,आत्म्याला तूं व्यापलं आहेस.तूं माझ्यात सामावली आहेस.पुढची १४ वर्षे,तू अंतरंगात सामावलेली,तुझीच सोबत असेल.

                   क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
               दि.  १९-१-२०२२.

ऊर्मिला चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading