
राम,सीता,लक्ष्मण रावणाचा पराभव झाल्यावर,त्याच्या मृत्युनंतर लंके ची सारी व्यवस्था लावून अयोध्येत परत आले.संपूर्ण अयोध्यानगरी नववधूसारखी नटून त्यांच्या स्वागतास सज्ज झाली. नंतर रामाचा अभिषेक झाला.सर्व स्थिर स्थावर झाल्यावर सुमित्रेने स्वतः पुढाकार घेऊन लक्ष्मण-उर्मिलेचा………………………….
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! ऊर्मिला !!!
!! प्रस्तावना !!
!! प्रस्तावना !!
नमस्कार !!
आतांपर्यंत ४२ व्यक्तिचरित्र्ये वेगवेगळ्या विषयांवर लिहून आपल्यापुढे प्रस्तुत केले.आपण सर्वांनी कौतुक करुन माझे मनोबल वाढवले त्यामुळे मी लिहित गेले.
आतां आपल्या समोर “उर्मिला” घेऊन येत आहे. “ऊर्मिला… सीतेची धाकटी बहिण! रामायण म्हटले की, आपल्यासमोर साकार होतात…राम, लक्ष्मण,सीता,भरत,शत्रृघ्न,कौसल्या, सुमित्रा,रावण,मंदोदरी इतकेच नाही तर कैकयी आणि मंथरा ही पात्रे येतात. आणि त्यांच्याविषयी लिहिल्याही भरपूर गेले.पण उर्मिलाकडे जरा दुर्लक्षच झालं..
सीता जेव्हा वनांत जाण्यास निघते तेव्हा सीतेची धाकटी बहिण उर्मिला..आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून,महालातील खिन्न वातावरणात जगण्यासाठी सिध्द होते.
नियतीच्या एका फटकार्यानिशी सर्वांच्या चेहर्यावरील हसूं,मनातील आशा,आकांक्षा आणि आयुष्यातील आनंद पुसला गेला.या पार्श्वभूमीवर एकटी उर्मिला पाय रोवून उभी होती. विरहामुळे उद्भवलेल्या आपत्तीचा सामना करतांना तिने दाखवलेला खंबीरपणा खरेच कौतुकास्पद होते.लक्ष्मण तिचा पतीने जेव्हा रामासोबत वनात जाण्याचा निश्चय केला तेव्हा उर्मिला देखील लक्ष्मणाच्या पावलावर पाऊल टाकून वनवासात जाऊ शकली असती,पण कर्तव्याच्या जाणीवेने तसं न करतां, लक्ष्मणाची वाट बघत चौदा वर्षाचा प्रदीर्घ काळ एकटीने राजप्रसादात घालवण्याचा निर्णय घेतला.
वास्तविक उर्मिलेला विवाहात फारसं सारस्य नव्हतं.तिला ज्ञान संपादन करुन आपली प्रतिमा वेगळ्या स्वरुपात व्यक्त करायची होती.परंतु तेव्हाच्या सामाजिक स्थितीमुळे तिला विवाहबंधन स्विकारावं लागलं होतं.स्वयंवरप्रसंगी रामाने सहज लिलयेने शिवधनुष्याचे दोन तुकडे केल्या वर,लक्ष्मणाच्या तोंडून धनुष्याबाबत चुकीचे शब्द ऐकून परशुराम ऋषी संतप्त झाले.लक्ष्मणाला ठार करणार हे लक्षात आल्यावर त्यांच्या संतापापुढे कुणाची पुढे जाण्याची प्राज्ञा नव्हती,पण स्वतःचा जीव धोक्यात घालून,त्यांचेपुढे गेली. त्यांना विनवणी करुन लक्ष्मणाचे प्राण वाचवले होते.
उर्मिला ही जनक-सुनयनाची स्वतः ची मुलगी असूनही सीतेला उपरं वाटू नये व मातापिताविहिन असलेल्या दोन चुलत बहिणींना परकं वाटू नये म्हणून,त्यांच्याच वाट्याला प्रेम गेले आणि उर्मिलेला नेहमी दुय्यम स्थान मिळाले.परंतु एक दिवस तिच्या मातेने सत्य स्थिती समजावून सांगीतल्यावर,मग मात्र तिने तिन्हीही बहिणींना सांभाळून घेतले लग्नाआधीही आणि नंतरही!जेव्हा बाणासूर सीतेचे रुप घेऊन आल्याच्या लक्ष्मणाच्या लक्षात आल्यावर नकली सीतेचा वध केल्यावर तिला सत्य स्थिती माहीत नसल्यामुळे ती वाघीणीसारखी चवताळून जाऊन त्याच्याच कमरेच्या कट्यारीने त्याचेवर वार करायलाही कमी केले नाही.
राम वनांत व भरत नंदीग्राममधे गेल्यावर तिने समर्थपणे राजकारणात लक्ष घातले.आपापल्या कक्षातच सर्व जण जेवण घेत असलेल्या कुटुंबियांना एकत्रीत भोजनाचा पायंडा घालून दिला. मंथरेच्या अपराधाचे माप तिच्या पदरांत घालून तिला अंधारकोठडी दाखवली. चित्रकुट पर्वतावर भेटीस गेल्यावर, परखडपणे आपले विचार मांडून सर्वांची बोलती बंद केली.कैकयीने रामाला वनात कां पाठवले हे गुपित उघड झाल्यावर तिच्याबद्दलचे सर्वांचे अनुकुल मत करुन घेतले.एकांतात रडत कुढत न बसतां वेदाभ्यास व चित्रकलेत वेळ घालवू लागली.
नेहमी गुरु वसिष्ठ व इतर ऋषी मुनींबरोबर धर्म आणि तत्वज्ञान या विषयांवर चर्चा करीत असल्यामुळे तिची प्रतिभा प्रगल्भित झाली हे जनकांच्या कानावर गेल्यावर त्यांनी ‘ब्रम्हयज्ञ’ या गौरवशाली तत्वविज्ञान विषय परिषदे साठी,पुत्री या नात्याने नसून “पंडिता” म्हणून विशेष आमंत्रण दिले.
१४ वर्षानंतर सीतेला अग्निपरीक्षे ला सामोरे जावे लागले म्हणून लोकांनी तिचे देवळं बांधली,पण अश्या कित्येक अग्निपरीक्षा झेलणार्या उर्मिलेचे मात्र एकही देऊळ नाही की,धरणीमातेने तिला सामावूनही घेतले नाही…ती उर्मिला अजूनही उपेक्षित..प्रत्येक घरा घरात एक ‘सामान्य” स्री बनून दुःख अन्याय सहन करत उभी आहे त्याच माणसांचं कवच बनून..न थांबता..न थकता.. तिने घेतलेले अविरत व्रत ती अजूनही पुढच्या पिढीला वसा देऊन…
अशा या संयमी,धैर्यशील,प्रसंगी कठोर व सडेतोड आपले विचार मांडणा र्या उर्मिलेचे चरित्र आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे.नेहमी प्रमाणे आपल्या क्रीया प्रतिक्रीया अपेक्षित!
क्रमशः
मिनाक्षी देशमुख.
दि. १४-१-२०२२.
!!! उर्मिला !!!
भाग – १.
राम,सीता,लक्ष्मण रावणाचा पराभव झाल्यावर,त्याच्या मृत्युनंतर लंके ची सारी व्यवस्था लावून अयोध्येत परत आले.संपूर्ण अयोध्यानगरी नववधूसारखी नटून त्यांच्या स्वागतास सज्ज झाली. नंतर रामाचा अभिषेक झाला.सर्व स्थिर स्थावर झाल्यावर सुमित्रेने स्वतः पुढाकार घेऊन लक्ष्मण-उर्मिलेचा शयनकक्ष जणूं पहिल्या रात्री सारखा सजवला.आपल्या मंचकावर बसून उर्मिला लक्ष्मणाची वाट पाहत होती.कैक वर्षाच्या एकाकी जिवनानंतर आज त्यांचे मिलन घडणार होते.तिला आठवले लग्नानंतरच्या पहिल्या रात्री दोघांमधेही मिलनाचा किती आवेग,उत्सुकता उत्साह होती मिलनाची?आज मात्र ती स्तब्ध होती. वास्तविक तिला त्याच्याशी भरभरुन बोलायचे होते.इतके दिवसांचे सुखदुःख जाणून घ्यायचे होते.पण तिची जीभ रेटत नव्हती.आज इतक्या वर्षांनी लक्ष्मणाला इतके जवळून बघून त्याचं जीर्ण,कृश व काळवंडलेला चेहरा पाहून तिला संकोच वाटला.मधल्या १४ वर्षाच्या प्रदीर्घ काळा चा अडसर दूर होत नव्हता.
तिला कितीतरी सांगायचे होते, ऐकायचे,जाणून घ्यायचे होते,पण शब्दच मुके झाले.तिचे सुजलेले डोळे बघून लक्ष्मणाने हळुवारपणे तिचा हात हाती घेत विचारले,तूं रडत होतीस?त्या स्पर्शा सरशी तिच्या तनामनाला घुमारे फुटले. त्याचा स्पर्श अनुभवून कितीतरी काळ लोटला होता.त्याच्या हाताचा खरखरीत स्पर्श तिला जाणवला.त्याचे तळहात तिने अलगद हातात घेतले.कठोर परिश्रमामुळे हाताला घट्टे पडले होते. लाकुड तोडणे,पाणी आणणे,शिकारी साठी धनुष्यबाण चालवणं असे अविरत कष्ट केले होते या हातांनी.इंद्रजित आणि इतरांचा वध करतांना या हातांनी दया माया दाखवली नव्हती,त्याच हातांनी सीतेच्या अग्निपरीक्षेसाठी लाकडं गोळा केली होती.मारीच राक्षसाच्या मागावर गेलेला राम परत येईपर्यंत कुटीत सीतेच्या रक्षणार्थ थांबू देण्याची विनवनी याच हातांनी केली होती.सीतेने केलेली निर्भत्सना,वेदनेने विव्हळत याच हातांच्या मुठी आवळल्या होत्या.तरी विवेक धारण करुन तिच्या रक्षणार्थ कुटी भोवती रेखा याच हाताने ओढली होती. गेल्या १४ वर्षातील घटनांच जाळं उर्मिले ला या श्रमलेल्या हातावर दिसले.
त्याच्या स्पर्शाने ती भानावर आली.भरुन आलेले डोळे त्याला दिसू नये, मिलणाच्या या क्षणी कुठलीही दुःखद आठवण नको म्हणून किंचित मान वळवली.त्याने मिठीत घेतल्यावर ती हळुहळु सावरली.कितीतरी वेळ मिठीत तसेच विसावले होते.त्याने तिला अवधी दिला.सौख्य,शांती,समाधानाची अनुभुती दोघांनाही येत होती. त्याच्या छातीवरचे प्रत्येक व्रण अनोखी गाथा होती.त्या व्रणां मधेच खोल नवी ताजी जखम दिसल्या वर,त्यावर ओठ टेकवून वेदना टिपून घेण्याचा प्रयत्न करीत होती.त्याने आवेगाने तिला मिठीत घट्ट आवळले. कांही वेळातच त्याला गाढ झोप लागली. पण उर्मिला…? निद्रा तिच्यापासून कोसो दूर होती.
आणि तिच्या नजरेसमोरुन चलचित्रा प्रमाणे बालपणापासूनचे सारे प्रसंग सरकू लागले….
तिला आठवला बालपणाचा एक प्रसंग..सीता,उर्मिला,मांडवी व श्रुतकीर्ती नांव अवघड असल्यामुळे कीर्ती म्हटल्या जात होते.तर ह्या चार बहिणी लपंडाव खेळत होत्या.उर्मिला,मांडवी नऊ वर्षा च्या,श्रुतकीर्ती सात व सीता उर्मिलेपेक्षा एक वर्षाने मोठी होती.नेहमीप्रमाणे खेळा तील गंमत जाऊन,मोठी बहिण सीतेला शोधायचं कठीण काम समोर आलं.सीते चं हे असं नेहमीचच!ती अश्या कांही अवघड जागा शोधत असे की,तीला शोधण्यातच सारा खेळण्याचा वेळ वाया जात असे,सीतेचा शोध घेत उर्मिला व्हरांडे,विस्तीर्ण कौटुंबिक वाटीकेतील कोपरा नी कोपरा शोधला,पाय दुखायला लागले,पण शोधण्यात खंड नव्हता. अनेक आशंकांनी मन हैराण झाले.उर्मी तिला कांहीही झालं नसणार,तूं उगाच काळजी करतेस,मांडवीच्या स्वराने उर्मिला भानावर आली.
अखेर वरच्या कक्षात जिथे जाण्यास पित्याची मनाई होती,भले त्यांचा रोष पत्करण्याची तयारी होती. श्रुतीला माता पित्यांना सांगायला पाठवून मांडवीसह उर्मिला त्या निर्बंधीत कक्षात सीतेला शोधण्यास पोहोचल्या….
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १४-१-२०२२.
!!! उर्मिला !!!
भाग – २.
उर्मिला आणि मांडवी त्या पवित्र निर्बंधीत कक्षाजवळ पोहचून मोठ्या प्रयासाने दारं उघडली.संपूर्ण कक्षात सीता दिसली नाही.मांडवी म्हणाली,जीथे आपल्या दोघींना दार उघडण्यास प्रयास पडले,तिथे एकटी सीता दार कसं उघडू शकेल?चल!आपल्याला इथे कुणी बघण्याआधी निघून जाऊ या..नाही ती इथेच असायला हवी!उर्मिला आर्त स्वरात सीतेऽऽ हाक मारत म्हणाली,कुठे आहेस?समोर येना.. नको ना अंत पाहूस
कक्षाच्या टोकाला एका उंचवट्याव सिंहासन होते.आणि त्याच्या बाजूने एका ठेंगण्या चौरंगावर असलेल्या एका भव्य लोह संदुकीत डोकावणारी सीता दिसली. सीताऽऽ उर्मिला आनंदोशयाने तिला मिठी मारायला सरसावली,पण समोरचं दृष्य बघताच आवाक् होऊन जागीच थबकली.सीतेच्या नाजूक हातात मोठं शिवधनुष्य लिलया पकडून त्या संदुकीत कांहीतरी शोधत असतांना दिसली.
मी या पेटीत लपण्यासाठी उतरली असतां माझा चेंडु निसटून यांत पडला. त्या भव्य पेटीत एका कोपर्यात असले ला चेंडू दिसल्यावर चेंडु उचलून ते अवाढव्य धनुष्य तिने सहजतेने पेटीत ठेवलेले बघून दोघीही अतिशय आश्चर्य चकीत झाल्या.त्या बाहेर जाण्यासाठी वळल्यावर त्यांना तात,माता व काकाश्रीं ना बघीतल्यावर आतां आपली खैर नाही या भितीने त्या गर्भगळीत झाल्या.पण कांही क्षणापूर्वी जो आदर मांडवीच्या चेहर्यावर दिसला तोच त्या तिघांच्याही चेहर्यावर दिसला.तातांनी सीतेसमोर येऊन अत्यंत नम्रपणे मान झुकवली. त्यांचच अनुकरण माता व काकाश्रींनी केले.
सकाळचे आन्हिकं उरकवून उर्मिला चित्र काढण्यांत मग्न असतांनाच अति उत्साहाने मांडवीने येऊन सांगीतले विश्वामित्र ऋषींसह अयोध्येचे दोन युवक आलेले असून काकाश्रींनी त्यांची राहण्या ची व्यवस्था विशेष अतिथीगृहात केली आहे.चौघी बहिणींमधे कुठेही द्वेष, आकस नसे.मनातील सारे स्पष्टपणे ऐकमेकींशी बोलत असत.उर्मिला म्हणाली,त्यात काय विशेष?दरवर्षीच तातश्री मिथिलेत तत्वज्ञानाच्या चर्चा घडवून आणतात,आणि आतां तर सीतेचे स्वयंवर सप्ताहावर आले.सीतेचा विवाह समय जवळ आला होता.कोणतीही वधू उत्तेजीत होते पण सीता मात्र अपवाद होती.त्या चौघीही वेद,उपनिषद,संगीत, कला साहित्य,राजकारण यात पारंगत असल्या तरी राजप्रसादाबाहेर जात नव्हत्या.बंदिस्त राजकन्या!तातांसमवेत देशभरातील विविध चर्चासत्र आणि धार्मिक सत्रांना उपस्थित असत,पण तेवढ्याने उर्मिलेचे समाधान होत नसे. आजवर कानावर पडलेल्या विविध स्थळांना भेट देण्याची तिला तीव्र लालसा होती.सीतेनंंतर आपल्याही विवाहाचा विचार होईल.पण जीवनाचा सहचर शोधण्यापेक्षा अधिक ज्ञानप्राप्तीकडे तिचा कल होता.पण सामाजिक रीती नुसार तिला विवाह करावाच लागणार होता.
सीते तुला तुझ्या विवाहाचा आनंद नाही वाटत?नक्कीच आहे.पुढे काय आणि कसे घडणार हे माहित असल्यावर उत्तेजित कां व्हाव?जो व्यक्ती शिवधनुष्य भंग करेल त्याच्या गळ्यात माळ घालाय ची हे ठरलेल आहे ना?शिवधनुष्य भंग? वीस हात(साडे आठ फुट) लांबीचं ते धनुष्य उचलायला ३०० लोक व ज्या हातगाडीवर ठेवले ते ढकलायला तेवढेच लागतात.ते अवजड धनुष्य तूं लहानपणी सहजतया उचलस म्हणूनच एखादा अलौकिक पुरुषानेच ज्याला तुझ्याशी विवाह करण्याची इच्छा आहे त्याला त्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवावी लागेल.जे धनुष्य साधं सरकवलं जाईल की नाही ही शंका!म्हणजे सीतेशी विवाहबध्द होणारी व्यक्ती अलौकिकच असेल.सीता म्हणाली, उर्मिला तुझ्या प्रश्नाचे उत्तर तूंच दिलेस,म्हणूनच मी शांत आहे,शिवाय तातांश्रीवर माझा पूर्ण विश्वास आहे.
कोणतीही गोष्ट पटकन स्विकार करणे हा सीतेचा स्वभाव !उलट उर्मिला प्रत्येक गोष्ट चिकित्सेने बघत असे. तातश्री नेहमी म्हणत,सीता देवदूत आहे.
विदेही नगरीचा राजा शीरध्वज जनक आणि पत्नी सुनयना या निपुत्रीकांना यज्ञ विधी करण्यासाठी जमीन नांगरतांना सीता सांपडली होती.त्या दोघांनी तिचा प्रथम कन्या म्हणून स्विकार केला होता. तत्वज्ञानाचा गाढा अभ्यासक जनकाने तिचे नांव सीता ठेवले.धरणीमातेने दिलेला तो आशिर्वाद होता.सीता भूमी प्रमाणेच उमदी,खोलवर पाळंमुळं रुजले ली आणि जिवनदायिनी होती.त्यानंतर वर्षभराने उर्मिलेचा जन्म झाला.ती सीते पेक्षा पूर्णतः वेगळी होती तरी त्यांच्यात दृढ नातेसंबंध निर्माण झाले होते.त्यामुळे त्यांचे प्रेम टिकून होते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १४-१-२०२२.
!!! उर्मिला !!!
भाग – ३.
मांडवी आणि श्रुतीकीर्ती ह्या वाराणसी नरेश कुशध्वजाच्या कन्या! त्यांच्या मातेच्या निधनानंतर त्यांची जबाबदारी राजा शीरध्वज(जनक)नी आपल्याकडे घेतली.तेवढ्यात मांडवीच्या आवाजाने उर्मिलेची तंद्री भंग झाली. ती म्हणाली,विश्वामित्रांसोबत आलेले जेष्ठ राजपुत्र राम असून कनिष्ठ राजपुत्राचं नांव लक्ष्मण आहे.ऋषी विश्वामित्र? उर्मिलेची उत्सुकता ताणल्या गेली.ब्रम्हर्षी ब्रम्ह,अंतिम सत्य आणि सर्वोत्तम पवित्र ब्रम्हज्ञान मिळवून ऋषीमंडळांत विशेष स्थान मिळवलेले विश्वामित्र सहजासहजी कुठे जात नसत की भेटत नसत.ते पूर्वा श्रमीचे राजा कौशिक होते.एका प्रसंगी अयोध्येचे कुलगुरु वसिष्ठांशी संघर्ष झाला असतां वसिष्ठ स्वबळावर राजा कौशिकच्या सशस्र सेनेची दाणादाण उडवलेली पाहून अपमानित झालेल्या राजा कौशिकने त्याग करुन परम आध्यात्मिक शोधार्थ आपले जीवन सार्थकी लावले.वसिष्ठमुमींहून स्वतःला मोठ करण्याच्या ध्यासाने विश्वामित्र नाव धारण करुन कठोर तपश्चर्या केलि आणि ब्रम्हर्षीपदाला पोहोचले.
विश्वामित्र ब्रम्हर्षीपदाला पोहोचले तरी मूळ स्वभाव बदलू शकले नाही. आजही त्यांचा स्वभाव एखाद्या चक्रवर्ती राजाला शोभेल असाच आढ्यतेखोर आहे.कितीही बलाढ्य राजा असला तरी त्यांच्यासमोर त्याचा थरकाप होतो.अशा या ब्रम्हर्षीचं इथे येण्याचे प्रयोजन काय असेल तेही दोन राजपुत्रांसह?उर्मिलेला प्रश्न पडला.बोलकी मांडवी म्हणाली, दंडकारण्यात ते तप करीत असतांना असूर त्यांच्या तपात वारंवार विघ्न आणत.ताटीका व तिचे दोन पुत्र सुबाहू व मारीच..ते इतके सामर्थ्यशाली होते की, त्यांना कुणीच ठार करुं शकत नव्हते. विश्वामित्रांनी अयोध्या नरेश दशरथाकडे रामलक्ष्मणाची मागणी केली व या दोन तरुण राजपुत्रांनी ताटीका व सुबाहूला चुटकीसरशी संपवले.मारीच मात्र निसटला.
पण ते राजकुमार इथे कां आलेत? तीव्र स्वरांत उर्मिलेने विचारले?या तापट ऋषीच्या प्रभावाने तात अडचणीत आले का?की, मिथिला अयोध्येत कांही बेबनाव झाला की,राजपुत्रांच्या रुपात तातांना धमकी मिळते का? नेमकी समस्या काय? उर्मिलेला समजेना.तसं कांहीच नाही उर्मि,ते सहज मनोरंजना साठी व तातांची भेट घ्यावी या उद्देशाने आलेले आहेत.काकाश्री(जनक) यज्ञ करीत आहे त्याचे अगत्याचे निमंत्रण सर्व ऋषीमुनींना गेले असल्यामुळे विश्वामित्र आले व ते दोन तरुण, मिथिला नगरी.. कीर्ती म्हणाली,सीता स्वयंवरासाठी तर नसेल आले?हीच शंका उर्मिलेला आली. सीतेकडे पाहिले तर तिच्याही मनात हेच विचार घोळत असावेत.
गेल्या कांही दिवसांपासून सीता गप्प गप्पच होती.त्यादिवशी सुध्दा मंदिरात गेलेल्या सीतेची उर्मिला वाट बघत होती.कांही वेळाने कावर्या बावर्या अवस्थेत सीता प्रवेशल्यावर,कुठे गेली होतीस?कधीची वाट बघते आहे. मला मातेला मदत करायचीय,येणार्या ऋषींच्या स्वागतासाठी तातांबरोबर लेखन करायचे,तिच्या बोलण्याकडे सीते चे लक्ष नाहीसे पाहून तिचे हात हातात घेत उर्मिलाने विचारल्यावर सीता म्हणाली आज पुन्हा भेटले.कोण?
अयोध्याकुमार राम,सोबत लक्ष्मणही होते एका भेटीतच अशी अवस्था होऊ शकते इतकं आकर्षण वाटू शकते?एका सप्ताहाने विवाह आहे,तेव्हा त्रयस्थाला भेटणे योग्य आहे का?
दुसर्या दिवशी सीता,उर्मिला,मांडवी व श्रुती मंदिरात पोहोचल्यावर मनोभावे देवीसमोर नतमस्तक झाल्या. परतल्या तर अयोध्येचे दोन्ही राजकुमार समोर उभे!दुर्लक्ष करुन जावे तर शिष्टाचाराला अनुसरुन नसल्यामुळे त्यांना अभिवादन करीत उर्मिला म्हणाली ह्या माझ्या चुलत बहिणी मांडवी व श्रुतकीर्ती,मी उर्मिला आणि ही माझी मोठी बहीण सीता!देखणा राम उंच, सुदृढ असून मार्दवता,सहजता होती. लक्ष्मणही देखणा होता पण त्याच्यात आढ्यता दिसत होती.त्याने उर्मिलाकडे दृष्टीक्षेप टाकल्यावर तिला अवघडल्या सारखे झाले.उर्मिलेने सीतेचा हात धरुन जवळ जवळ ओढतच चौघी बहिणी प्रासादाकडे निघाल्या.कक्षात पोहोचल्या वर उर्मिला म्हणाली,सीते एवढी अस्वस्थ नको होऊस.रामावर तुझा जीव जडला तर तोच तुझा पती होईल.सीते, रामाला मिथिलेत आणण्यामागे विश्वामित्राचे तसेच प्रयोजन असणार!तोच शिवधनुष्य भंग करेल.तोच तुझा राजकुमार बरं का? खरचं तो होईल माझा?
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १४-१-२०२१.
!!! उर्मिला !!!
भाग – ४.
सीता लवकरच दुसर्या वेगळ्या जगात जाणार,म्हणजे उर्मिलेचा विरह! उर्मिला धाकटी असली तरी,सतत सीते ला सांभाळून घेत होती.तिच्यालेखी सीते चं अस्तित्व कायम होतं.उर्मिला सीतेची जीवनरेखा,आत्मसखी होती.
जनक आणि सुनयना सीता सांपड ल्यावर तिला अतिशय लाडात वाढवल, घडवल!कधीच सीतेला रागावले नव्हते. उलट उर्मिलेला नेहमीच बोलणी खावी लागत,पण हसतमुखाने उर्मिला सारं निभावून नेई.जनकाची कन्या म्हणून सीता जानकी!खरं तर हा सन्मान उर्मिले ला मिळायला हवा होता,तरी उर्मिलेला कधी खंत वाटली नाही.आपली लहान बहिण उर्मिलेवर होत असलेला अन्याय पाहून सीतेला वाईट वाटायचे.वयाने लहान असूनही सीतेची प्रत्येक जबाबदारी उर्मिलेने खंबीरपणे निभावली होती.एखादी वाघीण आपल्या पिलाचं रक्षण करते तसंच!मार्गदर्शक,मदतनीस, मनःप्रिया,सांत्वनकर्ती प्रत्येक भूमिका उर्मिलेने अगदी चपखलतेने निभावली होती.मातापित्याचे प्रेम असले तरी,सीते च्या मनात उर्मिलेविषयी सुमधुर स्मृतींना वेगळेच स्थान होते.अशा सुह्रदयी उर्मिले पासून आपण दूर होऊ हा विचारच सीतेला सहन होत नव्हता.विवाहआनंदाहून वियोगाचा विचार अधिक दुःख देत होता.
जेष्ठराजपुत्र रामाच्या प्रेमात सीता जशी आकंठ बुडली,तस आपलं लक्ष्मणा बाबतीत तर होत नाही ना?स्वतःच उर्मिला दचकली.स्वयंवरासाठी राजसभा सजवण्यात आली.कक्षाच्या मध्यभागी शिवधनुष्य ठेवण्यात आले.परशुरामांनी हे शिवधनुष्य जनकराजाच्या घराण्याकडे कित्येक पिढ्यांपूर्वी सोपवलं होतं.उर्मिले च्या वाडवडिलांनी अभेद्य पेटीत मोठ्या आदराने बंद करुन जतन केलं होतं.त्या कक्षात सर्वांना प्रवेश निषिध्द होता. लहानपणी मात्र आधी सीता व नंतर तिच्या शोधार्थ उर्मिलेने प्रवेश केला होता. १० वर्षाच्या नाजूक सीतेने हे अवजड धनुष्य कसं पेललं असेल हा ऊलगडा उर्मिलेला कधीच झाला नाही.इतक्या वर्षानंतरही त्या स्मृतीने उर्मिला थरारली. नंतर मातापित्यांनी सीतेला नतमस्तक होऊन केलेले आदरयुक्त अभिवादन!सीता कोणी विशेष व्यक्ती आहे कां?कां तिच्याठायी विशेष शक्ती होती?हा प्रश्न उर्मिलेला सातत्याने भेडसावित होता. उर्मिलेच्या मातापित्यांनी सीतेला विशेष दक्षतेने वागवल्यामुळे,ती पोटची पोर नसल्यामुळे तिच्यावर अधिक माया करत असेल असा समज उर्मिलेने करुन घेतला होता.त्यांच प्रेम वात्सल्याहून जास्त भक्तीस्वरुप होत,कदाचित म्हणूनच उर्मिलेला तिच्याबद्दल द्वेष,आकस, असूया कधी वाटली नाही.
राजा शीरध्वज(जनक) लोकप्रिय व बलाढ्य राजा होता.प्रजा त्याच्या प्रेम पूर्वक वागण्याने संतुष्ट होती.राजा-राणी ने आपल्या कन्यांमधे राजाधिकाराची भावना रुजवण्यापेक्षा माणुसकीची ज्योत सतत तेवत ठेवली होती.जनक केवळ राजाच नव्हता तर कीर्तीवंत याज्ञवल्क्य ऋषींचे ते आवडते शिष्य देखील होते.याच मुनींनी शुल्क युजुर्वेदाचं लेखन केलंं होतं.अष्टवक्र ऋषीकडून जनकांनी शिक्षण घेतले होते.आत्मा आणि स्वचं खरं रुपाविषयीचं ज्ञान त्यांना इथेच मिळाले होते.स्वतः जनक राजर्षी होते.वेद आणि शास्रांमधे त्यांना उत्तम गती होती.अध्यात्माचं सखोल ज्ञान होतं. माणुसकी आणि उदारतेची अचूक सांगड त्यांनी घातली होती.आतांही एकीकडे यज्ञ सुरु असतांना दुसरीकडे सीता स्वयंंवर आयोजित केले होते.सर्व थोर आणि शूरवीर राजे,महाराजे स्वयंवरा साठी सजलेल्या कक्षेत उपस्थित होते. या कक्षात मुलींना यायला मनाई होती. पण आज स्वयंवरच्या निमित्याने चौघीही बहिणी उपस्थित होत्या.सीताप्राप्तीच्या आशेने देशातीलच नव्हे तर देशाबाहेरील राष्र्टातूनही अनेक शूरवीर राजे उपस्थित होते त्यात लंकानरेश रावणही होता. त्याच्या उपस्थितीमुळे सभेत क्षोम निर्माण झाला होता.तो जनकराजाजवळ बसून कांहीतरी गंभीर चर्चा करीत होता.
स्वयंवरासाठी आलेल्या सर्व राजां ची इत्थंभूत माहिती चौकस मांडवीकडून सर्व बहिणींना मिळाली होती.वेदांवर प्रभुत्व असलेला रावण संगीत विशारद, वीणावादनांत तरबेज,याशिवाय ज्योतिष्य,वास्तुशास्र,राज्यशास्र,आयुर्वेद या विषयांचे ज्ञान पण दांडगे होते.स्वतः च्या प्रसिध्देची जाणिव त्याच्या वागण्या बोलण्यातून सहज लक्षात येत होते.त्यांनं शिवधनुष्याला प्रत्यंचा चढविण्याचं आव्हान स्विकारले होते.सीतेने घेतलेला दीर्घश्वास बघून उर्मिलेने धीर दिला.त्याच वेळी सीतेची दृष्टी रामाकडे व उर्मिलेची लक्ष्मणाकडे गेली….
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १५-१-२०२२.
–


