राम,सीता,लक्ष्मण रावणाचा पराभव झाल्यावर,त्याच्या मृत्युनंतर लंके ची सारी व्यवस्था लावून अयोध्येत परत आले.संपूर्ण अयोध्यानगरी नववधूसारखी नटून त्यांच्या स्वागतास सज्ज झाली. नंतर रामाचा अभिषेक झाला.सर्व स्थिर स्थावर झाल्यावर सुमित्रेने स्वतः पुढाकार घेऊन लक्ष्मण-उर्मिलेचा………………………….
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! ऊर्मिला !!!
!!! उर्मिला !!!
भाग -१३
आपली बहिण शांताचा लक्ष्मणाने
परिचय करुन दिल्यावर उर्मिलाने तिला अभिविदन केले.शांताने प्रेमाने तिची विचारपूस केली व इतर भावजयांकडे मोर्चा वळवला.ती जाताच लक्ष्मण म्हणाले,काल उपवनात माझ्या सोबत शांताला बघून तुला असूया कां वाटली? मिला हा अविवेक आहे.ही भावना असुरक्षिततेच्या भावनेतून उदय होते, तुला माझी खात्री आहे ना?यापुढे कधीच तुला अससुरक्षित वाटणार नाही.मी सदैव तुझाच आहे.तिला भरुन आले.विवाह दिनी तिला वचन देत होते.
अशा प्रकारे मिथिलेच्या चार राज कन्यांचा विवाह अयोध्येच्या चार राजपुत्रां शी संपन्न झाला.नगरीत सगळीकडे उत्साहाला नुसतं उधाण आलं होतं.राजा दशरथ अयोध्येला परततांना आपल्या चार पुत्रांसह चार लेकींना सोबत नेणार या विचारांत असतांनाच,राजा जनक, राणी सुनयना,वसिष्ठ,विश्वामित्र,शतानंद आणि ऋष्यशृंग गंभीर चेहर्याने समोर आले.राजन! कसा कोण जाणे,उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा विवाह मुहुर्त चुकला. मुळात काढतांनाच चुक झाली.आतां नियती तर बदलतां येत नाही,पण कांही तोडगा निघते कां म्हणून त्यांनी राजगुरु वसिष्ठांकडे बघितले.मानेने नकार देत म्हणाले, राम-सीतेचा विवाह ज्या नक्षत्रा वर अवलंबून होता ते नक्षत्र देवांना स्विकारार्ह नसावं असं वाटते.
असं कां? गोंधळलेले,क्रोधाने दशरथ म्हणाले,माझ्या पुत्राचं आणि सुनेचं वैवाहिक जीवन सुखी होऊ नये असं कुणाला,विशेष म्हणजे देवांना कां वाटावं?या निरागस दोन तरुण जीवांनी कुणाचं काय बिघडवलं?
राम-सीताचा विवाह उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर संपन्न झाला असतां तर त्यांचे जीवन निर्विघ्न पार पडले असते.म्हणूनच नारदांच्या सुचनेनुसार अप्सराच्या वेषात चंद्रदेवाने इथे येऊन नर्तन करुन आपलं लक्ष वेधून घेतलं. तेवढ्या वेळात वातावरणांत बदल झाला ग्रहांनी आपली जागा बदलून मुहूर्त चुकवला.आखलेली योजना सफल झाल्यामुळे देव आनंद साजरा करीत आहेत.पण कां?संतापून दशरथांनी विचारले.कारण ही दैवगती आहे.त्यांची नियती निश्चित आहे. ऋष्यशृंग ऋषी शांतपणे समजावत म्हणाले,राम सीता सुखी संपन्न वैवाहिक जीवन जगले असते तर पुढे घडणार्या घटना ठरलेल्या क्रमाने घडल्या नसत्या.येणार्या काळात नियतीने ठरवलेल्या घटना घडणारच आहे,टाळतां येणे शक्य नाही.आपण आतां सध्याचा क्षणांचा आनंद घेऊयात!
चारही ऋषींची व मातापिता, श्वशूरांची गभीर मुद्रा बघून उर्मिलाच्या लक्षात आलं की,कांही तरी घटना घडली आहे.ती धास्तावली.चारही बहिणींच्या नशिबात नेमकं काय आहे?कोणत्यातरी भयानक परिस्थितीकडे त्या ढकलल्या जात होत्या कां?तेवढ्यात तिला आपल्या पतीचा आश्वासक,सुरक्षित दिलेल्या वचनाची याद येऊन आत्मविश्वास जागृत झाला.येणार्या संकटाचा सामना धीराने करायचा निश्चय केला.
निरोप घ्यायला मातेकडे आली. तिचा चिंतित चेहरा बघून म्हणाली, काळजी नको करुस.येणार्या दिवसांचा सामना आम्ही धीटाईने करुं.होय बेटा, मला खात्री आहे,तूं कोणतीही परिस्थिती निभावून नेशील.नवीन जीवनात तुझी पावलोपावली परीक्षा पाहिल्या जाईल. पण तूं जशी आहेस तशीच रहा.मन,बुध्दी साबुत ठेव.महत्वाचं म्हणजे,सीता आणि तुझ्या चुलत बहिणींना सांभाळ.एकमेकीं वर असलेलं प्रेम,विश्वास कधीही भंग होऊ देऊ नकोस.ऊर्मिला तूं सर्वांत खंबीर आहेस.यापूर्वीही तूं अनेकदा बहिणींच्या मातेची भूमिका निभावलीस. अशा कर्तृत्ववान कन्येची मी आई आहे याचा अभिमान आहे.बाळा आतां मागे वळून पाहू नकोस.फक्त समोर पाहायचय जा..बेटा..जा…उर्मिलाचा गळा दाटून आला.मोठ्या कष्टाने स्वतःला सावरत मातेपासून दूर झाली.तिच्यासाठी बहिणी खोळंबल्या होत्या.इथून पुढे त्या तिच्या आयुष्यभराच्या सोबती होत्या.भविष्यात त्यांच्यापुढे काय वाढलं होतं?उर्मिलाने स्वतःला निग्रहपूर्वक आवरले.ती नाउमेद होणार नव्हती.
भविष्यात येणार्या संकटांना चार ही बंधू सज्ज होते.स्वतःवर त्यांचा दृढ विश्वास होता.एरवी सतत घुसमसणारे लक्ष्मणही विचलित नव्हते झाले.तिच्या कडे पाहत किंचित मान डोलावून दिलासा देण्याचा प्रयत्न केला.मार्ग सोपा नव्हता.पण एकमेकांच्या साथीने ते पार करणार होते.
अयोध्येच्या भव्य राजप्रासादा जवळ रथ आला.त्या वास्तुची भव्यता पाहून उर्मिला थक्क झाली.तीन दिवसां चा प्रवास,मातापित्यांचा विरह आणि या नवीन घरांत उपरेपणाची भावना,या भव्य दिव्यतेपुढे आपण कःपदार्थ आहोत या विचाराने ती अस्वस्थ झाली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १७-१-२०२२.
!!! उर्मिला !!!
भाग -१४.
प्रासादाच्या भव्यतेला साजेसंच त्यांच स्वागतही भव्यच झालं.मात्र उर्मिलाला त्यात औपचारिकताच जास्त वाटली.अल्पावधीतच तिन्ही राण्या आल्या.प्रत्येक राणी किती वेगळी होती. कैकयी पट्टराणी असल्यानं ती सर्वप्रथम आली.राजा दशरथ तिच्या आहारी गेल्या ची वदंता उर्मिलाच्या कानावर आली होती.ती सौंदर्याची अत्युत्तम नमूना होती. पण उजव्या हाताची करंगळी वाकडी असल्यामुळे तिच्या नाजूक रेखीव हाता च्या सौंदर्यात बाधा आली होती.शंभरा सुरावर राजा दशरथ चालून गेले,त्यावेळी कैकयी त्यांच्या रथाचं सारथ्य करीत होते युध्दात शंभरासुराचा बाण दशरथांचे चिलखतला छेद करत त्यांच्या छातीत घुसला.जखमेतून भळभळा रक्त वाहूं लागलं.दशरथांचे प्राण धोक्यात असलेले बघून धीर न सोडतां,कैकयीने रथचक्र दुरुस्त केलं.एकीकडे रथ युध्दभूमीपासून दूर नेत करंगळीने रथचक्र तोलून धरत सुरक्षित अंतरावर येताच राजावर उपचार करुन त्यांना पुन्हा युध्दभूमीवर आणले. त्या वाकड्या करंगळीचे वैश्यम्य वाटण्या ऐवजी ती अभिमानाने मिरवित असे.
परंपरेनुसार राम,सीतेला औक्षण करतांना कैकयीने सीतेला कटाक्षाने टाळले.सीतेच्या मुखावरचे हसू लोपले. इतर बहिणीही आवाक् झाल्यात.रानीने सीतेला नाकारले होते.आता उर्मिलाची पाळी होती.तिला मात्र औक्षण करतांना कौतुक करत म्हणाली,तूं सर्वगुणसंपन्न, जनक राजाची कन्या जानकी आणि मिथिला नगरीची राजकन्या मैथिली शोभतेस.माते,मी दोन्हीही नाही.या नावा ने सीता ओळखल्या जाते.नंतर कैकयीने मांडवी,श्रुतीलाही तशाच निर्वाकार चेहर्याने औक्षण केले.उर्मिलेचा संताप उफाळला.फक्त आपल्या एकटीशीच कां एवढ्या प्रेमाने वागावं?बहिणींमधे फूट पाडण्याची तर खेळी तर राणी खेळली नलेल ना?की,स्वतःचं वर्चस्व सिध्द करण्यासाठी अशी वागली असेल?
हा सोहळा सुरु असतांना कैकयी च्या विक्षिप्त वागण्याबद्दल कुणीच कसं बोललं नाही?दशरथ राजा तर प्रेमाने बघत होते.राण्यांमधे कैकयी विशेष प्रिय आहे हे त्यांंच्या वागण्यावरुन उघड दिसत होते.धाकट्या राणीच्या वागण्याने दुखावल्या गेलेली मनं सावरायचा प्रयत्न कौशल्याने केले.
अतिशय प्रेमाने तिने चारही सुनांचे स्वागत केले.सुमित्रेने सुध्दा चारही राज कन्यांना मिठीत घेतले.सुमित्रेच्या स्पर्शा तून उर्मिलेला आदर,माया आणि आपुलकी जाणवली.अयोध्या नगरीने चारही नववधूंचे जोरदार स्वागत केलं, पण उर्मिलेला उत्साह नाही वाटला. कैकयीच्या पक्षपाती वागण्याने दुखावले ल्या सीतेला पटकन भेटायचे होते.पण संधी मिळत नव्हती.लक्ष्मण जसं तिचं संरक्षण करणार होते,तसच रामही करणार होते.राम दुखावल्या गेले हे लक्ष्मणच्या लक्षात आले पण राम शांत होते.संध्याकाळ उशीरापर्यंत वेगवेगळ्या विधी सुरु होत्या.त्यानंतर दासीने चौघींना त्यांच्या त्यांच्या शयनकक्षात पोहचवले. उर्मिला कक्षात पोहोचल्यावर तिचे डोळे लक्ष्मणाचा वेध घेत होते.दिवसभरांतील घटना जरी जास्त सुखद नसल्या तरी, निदान ही पहिली रात्र तरी अप्रतिम ठरावी अशी तिची इच्छा होती.आणि आलाच तो क्षण.दोघेही एकमेकांच्या मिठीत समावले.प्रणयाचा आवेग..जणूं काळच थांबला.शांत,क्लांत झाल्यावर, एका कुशीवर वळून तिने पतीला विचारले,धाकट्या राणीचं सीतेशी काय वाकडं आहे?तीच्या दृष्टीने तुम्ही चौघी बहिणी आमच्या योग्य वधू नसाव्यात. तिचे प्रयत्न सुरु होते आपल्या मना सारख्या सुनांची निवड करायची.विशेष म्हणजे रामाकरीतां तिच्या कल्पना फार वेगळ्या होत्या.त्याला सर्वोत्तम मिळावं हा तिचा प्रयत्न!म्हणजे सीता सर्वोत्तम नाही?तसे नाही.तूं जशी मिथिलेची राजकन्या आहे तशी सीता नाही.अनाथ म्हणून सीतेवर तीचा रोष.. लक्ष्मण म्हणाले,तिचे सुनांना निवडण्याचे काम पूर्ण व्हायच्या आधीच तातांनी,तिला सहभागी न करतां अंतिम निर्णय घेऊन चारही पुत्रांचे लग्न ठरवले.नेमक्या याच गोष्टीने ती दुखवल्या जाऊन संताप आला असेल.तशी ती पारदर्शक आहे, आणि समोरच्यानेही असावं हा तिचा आग्रह म्हणून तिचा विरस झाला असेल. आतां आपली पहिली रात्र या विवादातच घालवायची कां? असे म्हणून तिला जवळ ओढले..,,
दुसर्या दिवशीही कैकयीचा राग शांत झाला नाही.सीतेला रामाची पत्नी स्विकारायला तयार नव्हती.तिचा सातत्याने अपमान करुं लागली.तात्काळ दुसरी वधू शोधून रामाचा पुनर्विवाह करण्याचा हट्ट धरला आणि दशरथ राजाने मान्य केला…
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १७-१-२०२२.
!!! उर्मिला !!
भाग -१५.
दशरथ राजानेही रामाच्या पुनर्विवा हास सम्मती दिल्याचे कळल्यावर उर्मिला तडक सीतेच्या कक्षाकडे धाव घेतली. कक्षात सीता एकटीच निश्चल होती.राम विचारविनिमयासाठी दशरथांच्या कक्षेत गेले होते.आपल्या बहिणीचा उतरलेला चेहरा बघून उर्मिलाचा संताप अनावर झाला.तुझ्याशी असं वागण्याचं धाडस तरी कसं झालं?सीते तू गप्प बसायचं नाही.कालचे टोमणे,आणि आतां रामांचा पुनर्विवाह?सीते मी हे सहन करणार नाही..मीही नाही करणार!सीता ठामपणे म्हणाली.मी रामावर प्रेम केलय,ते मला सोडून दुसरीचे होऊच शकत नाही.आणि कुटुंब परंपरेला अनुसरुन बळी पडले तर माझ्या बाबतीत तसे घडणार नाही आणि मी तसं कधीच घडू देणार नाही.तिच्या शब्दात धार होती.त्यांची वाटेल ती आज्ञा ऐकायला आपण कणाहीन नाही.स्वतः चा अभिमान जपत धैर्याने वागण्याची दीक्षा आपल्याला मिळाली आहे.
तेवढ्यात राम लक्ष्मणांनी प्रवेश केल्यावर त्यांच्या सारं लक्षात आलं.रामां च्या मंद स्मिताने सार्या शंका निमाल्या. त्यांना एकांत मिळावा म्हणून जात असलेल्या उर्मिलाला थांबवत राम म्हणाले,मी सीतेच्या कोणत्याही गोष्टी साठी आतांच नाही तर भविष्यात देखील तिचा त्याग करणार नाही.एकापेक्षा अधिक पत्नी असणे पाप आहे हे कैकयी मातेनं आमच्या मनावर रुजवलय!सवत म्हणजे काय हे या तिन्हीही मातांनी सोसल.त्यांच्या मूक वेदनांचे आम्ही मूलं साक्षीदार आहोत.राजप्रतिष्ठेचा अवमान होऊ नये म्हणून त्या सोसत राहिल्या.प्रेम आदर,निष्ठा कशी राखावी हे माता कैकयीने आम्हाला शिकवले.उर्मिलेला पटलं नाही,असं असेल तर मग पुनर्विवाहचा मुद्दा उपस्थित झालाच कसा? सीताचा इतका तिरस्कार,दुस्वास, तुच्छता कां?
कारण साधं आहे.माझ्या मंगळ दोष व विवाह मुहुर्त चुकल्यामुळे माझेवर कांही विपरित संकट येऊन त्यात माझा शेवट होईल या शंकेने ती ग्रासली व सीतावर संताप काढून मनातील भावनां ना वाट मोकळी करुन दिली.सीतामुळेच सर्व समस्या निर्माण झाल्यात असा तिचा ग्रह झाला.तिच्या विषयी आकस नको धरुस.खरंतर या सर्वांसाठी मी जबाबदार आहे,मी केवळ सीताचीच नव्हे तर तुझी आणि इतर बहिणींची माफी मागतो…
नाही.. प्रिय पुत्रा!माझ्या वतीने तूं क्षमा मागायची आवश्यकता नाही. दरवाजातून आवाज आला.दारात देखणी पश्चातापदग्ध कैकयी उभी होती. तिच्या मुखावरचे पश्चातापाचे भाव बघून ऊर्मिलेला अतिशय आश्चर्य वाटले.कैकयी म्हणाली,अहंकार,संतापाच्या आहारी जाऊन अनेक चुकीचे गैरसमज करुन घेतले.रामाने जरी माझी बाजू स्पष्ट केली तरी तुम्हाला दुखवल्याबद्दल क्षमा करा, अस म्हणून सीतेसमोर येऊन दोन्ही हात जोडले.सीता प्रथम तर भांबावली,गोंधळ ली, पण लगेच सावरुन म्हणाली,आपलं मूल सुरक्षित,आनंदी,सर्व दुःखापासून दूर असावं असं कोणत्या मातेला वाटणार नाही?क्षमा मागण्याचा प्रश्नच नाही.मना तून सर्व काढून टाका.
चकित होऊन उर्मिला बघत राहिली.कैकयीबद्दलचा आदर निर्माण झाला.कैकयीबद्दल गैरसमज केल्याबद्दल उर्मिला माफी मागणार हे अचूक ओळखून राम म्हणाले,नाही उर्मिला, माझ्या मातेच्या उद्देशाबद्दल प्रश्न विचारण्याचा पूर्ण हक्क आहे.तूं बहिणी चे संरक्षण करत होतीस आणि त्यासाठी तूं किती(ॲग्रेसिव्ह) कमाल मर्यादा गाठू शकतेस याची चुणुक तूं,लक्ष्मणाची कट्यार त्याचा वध करण्यासाठी उपसली होती हे मी नाही विसरलो.जिथे त्याला सोडले नाही तिथे मी कोण?रामाच्या डोळ्यातील मिस्किल भाव पाहून उर्मिला लज्जित झालेली बघून राणी पटकण म्हणाली,असंऽऽ! ही रक्तपिपासू तलवार बहाद्दर योध्दाही आहे तर?तणाव जाऊन तेथील वातावरण हास्याने भरुन गेले. उर्मिला कडे पाहत मार्दवाने कैकयी म्हणाली,आपल्या दोघींत बरचस साम्य आहे.राजकुमारी तुझ्या घरांत तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे.
कैकयीचं बोलणं स्तुती समजायची की,पश्चाताप?या प्रश्नाचं उत्तर तिला १४ वर्षांनी मिळणार होतं.
विवाहाला दोन मास उलटले.एक दिवस चौघी बहिणी प्रासादासमोरील उद्यानात बसून गप्पा गोष्टी करीत, आपापल्या पतींच्या स्वभावाचे वर्णन करीत होत्या.मांडवी म्हणाली,रामांच्या मागे जसे लक्ष्मण सावली सारखे असतात,तसंच भरतामागे शत्रृघ्न असतो हे ऐकून कठोरपणे सीता म्हणाली,तूं सारखी राम आणि भरता तुणतुणं कां वाजवतेस? उर्मिला म्हणाली,मंथरा जे बाळकडू पाजते तेच ती उगाळते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १८-१-२०२२.
!!! उर्मिला !!!
भाग -१६.
मांडवी म्हणाली,मला सारं समजते. मी लहान नाही आता.संतापून सीता म्हणाली,मंथरा तुला जे रोज विषाची मात्रा देते,ते तुला आज जरी गोड वाटत असले तरी ते सत्य नाही.आपल्या बहिणींचा आवेश बघून उर्मिलेला धक्का बसला.नेहमीच्या भगिनीप्रेमाचा अंशही नव्हता.त्याऐवजी जाणवत होते गुढ वैर!
इतक्या साध्या गप्पांनी घेतलेले गंभीर वळणाने उर्मिला बेचैन झाली.
मांडवी म्हणाली,राम आणि भरतात नक्कीच स्पर्धा आहे.वेळच आली तर, लक्ष्मण रामांची निवड करतील,शत्रृघ्न मात्र भरतामागूनच जातील.उर्मिलेने चक्रावून विचारले,पण ते भाऊ वेगळे कां होतील?मांडवी तूं कोणत्या स्पर्धेबद्दल बोलतेस?मुद्दाम चीड येण्यासारख मांडवी वर्तन करीत होती.मुख्य म्हणजे ती अप्रत्यक्षपणे कांहीतरी सुचवत होती.हे असच राहिलं तर चार बहिणींमधे वितुष्ट यायला वेळ लागणार नाही.मांडवी घुमसत म्हणाली,पुढील सप्ताहात चार भावांमधे होणार्या धनुर्विद्या स्पर्धेबद्दल बोलत नाही मी!राम आणि भरतामधे जे जन्मजात वैर आहे त्याबद्दल कोणी उघड बोलत नाही,मान्य करत नाही,त्याबद्दल बोलत आहे.अरेऽ मुळात राम व भरताचं वैर असण्याचं कारणच काय?उत्सुकतेने सीताने विचारले? जेष्ठ राणी कौसल्याचा पुत्र राम आणि लाडकी राणी कैकयीचा पुत्र भरत हे दोघेही सिंहासनाला पात्र आहेत.मांडवी म्हणाली.
कौसल्याच्या पोटी शांताचा जन्म झाल्यावर कितीतरी वर्षे राजा दशरथ अपत्यहीन होते.एकदा शिकारीला गेले असतां तिथे त्यांच्या दृष्टीस देखणी आकर्षक कैकयी पडली.पाहतांक्षणी तिच्या प्रेमात पडले.तिच्या पोटी जन्माला येणारा पुत्र अयोध्येचा राजा व्हावा या अटीवर तिच्याशी दशरथांनी विवाह केला तिलाही अपत्य न झाल्याने वसिष्ठांच्या सल्ल्यानुसार ऋष्यशृंग ऋषींच्या मार्गदर्श ना खाली अश्वभेध व पुत्रकामेष्टी यज्ञ केला.यज्ञातून पायस घेऊन अग्निदेव आले.तिनही राण्यांना पायसचा प्रसाद दिला.नंतर दशरथांना चार पुत्रांची प्राप्ती झाली.ही कथा मांडवीने सांगीतल्यावर सीता ठामपणे म्हणाली,हे भाऊ कधीही एकमेकांशी युध्द करणार नाही
मांडवी म्हणाली,दशरथ-कैकयी विवाहाच्या वेळीच्या अटीनुसार भरतच राजा होईल.आणि उर्मिला..तसेही मंथरे च्या म्हणण्यानुसार तुझी सासु सुमित्रा मगध राजकन्या नसून ती कोणाचा वारसा चालवते हे संदिग्ध आहे.दिलेला शब्द पाळणे रघुवंशाचे ब्रिद असल्यामुळे भरतच राजसिंंहासनावर बसेल.म्हणजे तूं राणी होशील, हो ना?याच मुद्यावरुन मंथराने तुला तिच्या बाजूने वळवून घेतले ना?मंथराने मांडवीला चांगलेच कह्यात घेतले होते,ती कांहीच ऐकायच्या मनःस्थितीत नव्हती.
श्रुती संतापून आवेशाने कांही बोलणार तोच,उर्मिला म्हणाली,कृपा करा थांबवा हे सारंऽऽ आपण चक्क भांडतो आहोत.या आधीही आपली भांडणं झालीत पण त्यात अशी गलिच्छ सूड भावना कधीच नव्हती.कोण राजा होणार कोण राणी? यामुळे काय फरक पडणार आहे?चुलत बहिणी,युवराज्ञी,राणी या आयामांनी आपल्या नात्यात आजवर कधी स्पर्श झाला का?मग आजच अस कां?अगऽऽ मंथरा आपल्यात असलेल्या एकीमधे फुट पाडत आहे.उर्मिला सौम्य शब्दात समजावत होती.अग!मंथरा जाणीवपूर्वक अविश्वास व दुष्टबुध्दी आपल्यात निर्माण करत आहे.मला हीच भीती होती म्हणूनच तुला खोदून खोदून विचारत तुला बोलके करीत होते,प्रश्न विचारीत होते.मंथरेचं विष किती जहाल परिणामकारक आहे हे तुमच्या लक्षात एव्हाना आलंच असेल.
मांडवीला पश्चाताप झाला.अगदी काकुळतेने ती सीतेची क्षमायाचना करुं लागली.सीता म्हणाली,तूं मंथरेसारख्या शुल्लक दासीवर विश्वास ठेवलास याचेच जास्त वाईट वाटते.मांडवीऽ मी तातांना सांपडलेली मुलगी म्हणून तूं मला नेहमी परकं समजलीस,कां ग?म्हणजे? सीताऽ तुझ्या सुध्दा मनात मंथरेने विष पेरुन दोघींनाही एकमेकींविरुध्द भडकवले तर
मांडवी या चौंघीमधे सर्वाधिक महत्वा कांक्षी,तीक्ष्ण बुध्दी,राजकीय धूर्त होती. तरी सुध्दा ती भौतिक प्रतिष्ठेच्या इतकी आहारी जाईल असे उर्मिलेला स्वप्नातही वाटले नव्हते.मांडवी पश्चातापदग्ध झाल्यावर सीता म्हणाली,मी सुध्दा तुझ्या सारखीच फसले गऽऽ!बराच वेळ कुणीच बोलल्या नाही.मंथरच्या दुष्ट बुध्दीमुळे त्या हादरल्या होत्या.पण त्यांचे अंतर्मन या निमित्याने उघड झाले होते.
आतां मंथरेच्या मायाजाळ्यात कोण अडकणार?हा विचार उर्मिलेच्या मनात आला.तिला फार वेळ वाट बघावी लागली नाही.चारच दिवसांनी शस्रविद्या स्पर्धा होती.ही सुवर्णसंधी होती मंथरेसाठी…..
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १८-१-२०२२.
–
