महाराणी पद्मिनी चरित्र भाग ८, (३० ते ३३)

गोरासिंगांनी केलेल्या आरोपाने बेभान होऊन सुजितसिंग तलवार उपसून गोरासिंगच्या अंगावर धावून गेले.माझ्या बद्दल असे विचार करतांना तुम्ही दहा वेळा विचार करायला हवा होता.मी या राज्याचा अमात्य व चितोडचा महामंत्री आहे.चितोडच्या हिताची तुमच्याइतकीच मलाही चिंता आहे.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

गोरासिंगांनी केलेल्या आरोपाने बेभान होऊन सुजितसिंग तलवार उपसून गोरासिंगच्या अंगावर धावून गेले.माझ्या बद्दल असे विचार करतांना तुम्ही दहा वेळा विचार करायला हवा होता.मी या राज्याचा अमात्य व चितोडचा महामंत्री आहे.चितोडच्या हिताची तुमच्याइतकीच मलाही चिंता आहे.

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

              

!!! महाराणी पद्मिनी !!!

                       भाग – ३०.

          महाराज! सारे श्रेय महाराणी पद्मिनींचेच!विश्वासघातक्याला तसेच उत्तर देण्याची कल्पना केवळ महाराणीं चीच!आम्ही फक्त अंमलबजावणी केली इतकच.त्याचवेळी राजमाता बादलसह प्रवेशल्या.आल्या आल्या बादलने विचारले,काका, मेला कां तो दुष्ट सुलतान?गोराकाकांना चूप बसलेले बघून बादल म्हणाला, माझ्या भाभीमांचा अपमान करणारा तो सुलतान माझ्याच हातून मरेल.नक्की मीच मारणार त्याला.

         राजमाता म्हणाल्या या पोरांत मला अभिमन्युचे रुप दिसते.

       सार्‍या प्रकाराने पिसाळलेला अल्लाउद्दीनने युध्दाचे आदेश दिले.युध्द सुरु झाले.पुन्हा एकदा एक अलौकिक रुपगुणसंपन्न स्री सर्वनाशाचे कारक ठरली होती.

       एका स्रीला तिच्या पती,पुत्र,कुटुंबा पासून हिरावून घेण्यासाठी एक कामुक रावण लढाईसाठी उभा होता.चितोड सारखा दुर्गम गड जिंकण्यासाठी मलिक काफूरने जबरदस्त योजना बनवून मुंगी ला ही शिरकाव होणार नाही इतका दाट वेढा सर्व बाजूने बसवला.चितोडला मदत येणार्‍या सर्व वाटा रोखून धरल्या. एकाकी पडलेल्या चितोडला हे फार मोठे आव्हान होते.राणाजींवर प्रेम करणारा प्रत्येक जण शस्रे घेऊन चितोडच्या सन्मानाच्या संरक्षणेसाठी ठामपणे उभा होता. या देशातील प्रत्येक स्री या देशाची मानबिंदू आहे ही जाणीव त्या स्रीलंपट माणसाला व्हायलाच हवी.प्रत्येक घरातील पिता,पुत्र शस्रे घेऊन बाहेर पडले. स्रीसेनाही मागे नाही राहिली.राणां चा व महाराणींच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी प्रत्येक घरातील दुर्गा मोठ्या त्वेषाने बाहेर पडली. आणि…

         चितोडच्या बुरुजांवर अल्लाउद्दीन च्या लांब पल्ल्याच्या तोफांचा अखंड मारा सुरु झाला.मद्य पाजून उन्मत्त  झालेले विशाल हत्ती चितोडच्या मजबूत दरवाजांना धडका देऊ लागले.रणवाद्यां चा आवाज घुमू लागला.खिलजीचे आक्रमक सैनिक पावला पावलांनी पुढे सरकत होते.सर्व दिशांनी शत्रू सैन्य गडा वर चढण्याचा प्रयत्न करणार्‍यांना राणां चे सैनिक त्यांना नेमके टिपत होते.आणि

            गडाचे दरवाजे उघडून भगवान एकलिंगजीचा जयघोष करीत चितोडची सेना बाहेर पडली.विशिष्ट चक्राकार गतीने तलवारी फिरवत चितोडचे वीर निर्भयपणे शत्रूगोटात शिरले.पहिली फळी तोडली. चितोड सैनिकांचा त्वेष व जोश शत्रूंमधे भय उत्पन्न होत होते.तुंबळ युध्द जुंपले होते.प्रत्येक गटाचे सेनानाक आपल्या सैनिकांना उत्तेजित करीत होते. रक्ताचे पाट वाहू लागले.रक्तमासांचा चिखल झाला.बिना डोक्याची धडे जागो जागी पडूं लागले.अर्धवट जखमी हत्ती, घोडे अस्ताव्यस्त पळत असल्यामुळे बरेचसे सैनिक तुडवल्या जाऊ लागले. न थांबता अविरत युध्द सुरु होते.कधी कधी शत्रूला पाठ दाखवून परत आलेल्या सैनिकांना राणाजी,महाराणी श्रीकृष्णाचा व रामाचे उदाहरण देऊन त्यांचे मनोबल वाढवत होते.अंतिम विजय सत्याचा आहे आपली ही लढाई सत्यासाठीच आहे.

          आपल्या राणा आणि महाराणी च्या शब्दांनी सैन्यात उत्साह निर्माण होऊन आपल्या राज्य रक्षणार्थ प्राणार्पण करण्याच्या नव्या उमेदीने युध्दासाठी सज्ज होई.नित्य येणार्‍या वार्तांनी पद्मिनी चिंतेत होत्या.महाराणांचा आवाजही त्यांना ऐकू गेला नाही म्हणून राणाजींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला तर,त्या केवढ्यांदा तरी दचकल्या.आ..आपण कधी आलात? तुम्ही हरवल्या होत्या तेव्हाच.तुम्हाला शोधायला आलो. राणाजी! केवळ माझ्यामुळे घडत असलेल्या या संहारात नित्य बळी पडत आहे हे सहन होत नाही.माझ्यामुळे सुरु झालेले हे युध्द थांबवायचे आहे.हा देह, हे जगणे नकोसे झाले आहे.राणाजींनी आपल्या कवेत घेतले.त्यांना शांतपणे म्हणाले, राणी आतां माघार नाही.चितोड च्या मानबिंदूला स्पर्श करणार्‍या नीचाच्या मृत्युनेच हे युध्द संपेल.

          तुंबळ युध्द सुरु होते.आणि अचानक राणाजींचे लक्ष एका सजलेल्या विशाल हत्तीकडे गेले,ज्यावर सशस्र खिलजी दिसला मात्र,राणाजींचा सारा संताप उफाळून आला.गोड बोलून यानेच  विश्वासघाताची सुरी उरात खुपसली. यानेच गलिच्छ नजर महाराणीवर ठेवण्याचा घोर अपराध केला होता. चितोडच्या सुखाला दृष्ट लावण्याचा गुन्हा यानेच केला होता.लाखोंच्या प्राणहानीला  कारण ठरणारे युध्द यानेच सुरु केले. वाटेत आडवे येणारे शत्रू कापित,स्वतः भोवतीचे सुरक्षाकडे तोडून राणाजी अत्यंत वेगाने स्वतःच्या जखमांची पर्वा न करतां खिलजीकडे झेपावले.त्यावेळचे राणाजींचे उग्र रुप तांडव करणार शिवा सारखे दिसत होते.

                  क्रमशः
 संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.
                 दि.  २८-१-२०२२.

!!! महाराणी पद्मिनी !!!

                       भाग – ३१.

        राणा रतनसिंगांना अल्लाउद्दीन दिसल्याबरोबर क्षणार्धात भाला फेकला, पण अचानक राघव चेतन सैनिंकाच्या गर्दीतून येऊन तो भाला मधेच अडवून म्हणाला,रतनसिंग! सुलतानवर प्रहार करण्यापूर्वी माझ्या प्रेतावरुन जावे लागेल.राघवला पाहून राणाजींच्या तळ पायाची आग मस्तकात गेली.स्वतःच्या स्वार्थासाठी देशद्रोह केलास.तुला जीवित सोडले हीच चुक केली.गोराकाकांनी जाणले.राणांचा जीप धोक्यात आहे. आपल्या विशेष सैनिकांसह गोराकाका त्वरेने त्यांच्या मदतीला धावले.नजरेनेच गोराकाकांना थांबवले आणि एकाच प्रहारात राघव चेतनचा घोडा जायबंदी केल्यामुळे तोल जाऊन खाली कोसळला उठ!उभा रहा!अजून आम्ही निःशस्रावर वार करत नाही.उचल ती तलवार.दोघांचे द्वंदयुध्द सुरु झाले.आजुबाजुचे सैनिक युध्द थांबवून या दोघांचे युध्द पाहूं लागले तलवारींचा खणखणाट होत होता.दोघेही तुल्यबळ होती.राणाजींच्या प्रहाराने त्याची ढाल तुटली.तलवाल निसटून खणखणत दूर जाऊन पडली.

      महाराज,या देशद्रोह्याची गय नका करुं.याने चितोडच्या सार्‍या वाटा शत्रू साठी खुल्या केल्या.आणि राणांजींच्या एकाच वारात राघव चेतन निष्र्पाण होऊन खाली कोसळला.बादशहा अल्लाउद्दीन चकित होऊन युध्द पाहत होता.राघव चेतनचा अंत बघून भानावर आला.राणाजींचे उग्ररुप बघून धास्ताव ला.त्याने माहुताला हत्ती वळविण्याचा इशारा केला.परंतु संतापलेल्या राणाजींनी त्यालाही उसंत दिली नाही. राणाजींनी  त्याच्या हत्तीची सोंड कापल्यामुळे तो सैरावैरा धावत सुटला आणि हत्तीबरोबर तो दिसेनासा झाला. त्याची वेळ आली नव्हती.

          युध्द अखेर युध्दच असते.रणदेवते ला फक्त रक्ताची आहूती हवी असते. अल्लाउद्दीनच्या प्रचंड सेनेपुढे चितोडचे सैन्यबल कमी पडू लागले.चितोडच्या घराघरातू मृत्युची पावले उमटूं लागली. वीरांच्या मृत्युवार्तेने राणाजींची निद्रा नाहीशी झाली.

           महासेनापती गोरासिंगानी बातमी आणली,महाराज घात झाला.चितोडचा  पहिला दरवाजा शत्रूच्या हाती गेला. सेनापती अर्जुनसिंग त्यांच्या एक हजार सैनिकांसह मृत्युमुखी पडले.सकाळ पासून त्यांनी शत्रूच्या १५ तोफा निकाम्या केल्यात आणि अखेर.. गोराकाकांना पुढे बोलणे अशक्य झाले.राणांचे डोळे भरुन आले.सेनापतींच्या अनेक आठवणी मनांत दाटून आल्या.बालपणापासूनची मैत्री मृत्युने गिळून टाकली.

        यापुढचा प्रत्येकक्षणी मृत्यु पावला पावलाने पुढे येतो आहे.आज प्रथमच राणांजींच्या स्वरांत निराशा होती. जे थंम्बोरला घडले त्याचीच पुनरावृत्ती इथे होणार खिलजीच्या सैन्यबळापुढे चितोड च्या निष्ठा आणि शौर्य अपूरे ठरणार! ईश्वर सत्याच्या बाजूने असतो असे म्हणतात.मग आम्ही त्याला दिसत नाही कां?काका पुढचे भविष्य आमच्या नजरे समोर स्पष्ट दिसत आहे.आपल्याला एकाकी पाडण्यात खिलजी यशस्वी झाला.आपल्यातलाच कोणीतरी फितूर झाला असावा.अन्यथा आपली गुप्त योजना त्याला कशी कळली?नेमके पराक्रमी मोहरेच कसे गारद होत आहेत? गोराकाका हे युध्द सुरु झाल्यापासून प्रत्येक क्षणी अस्वस्थ आहे.माझ्या सैनिक,सरदार,वीरांच्या मृत्युने बेचैन झालोय.तोफा निकामी होत आहे.क्षणा क्षणाला सैन्यबळ कमी होत आहे.आज तो पहिल्या द्वारापाशी पोचला.पुढे येत येत तो महाद्वाराशी येईल.काका,मी काय करु? हरलो काका! काका हरलो मी! चितोडचे रक्षण नाही करु शकत.क्षमा करा…क्षमा करा..डोळ्यात येणारे अश्रू दडपण्यासाठी राणाजींनी डोळे मिटून घेतले.चितोडच्या सूर्याला ग्रहण लागले.

‌          भाभीमां आशिर्वाद द्या.अवघा १५ वर्षाचा बादल युध्दावर निघाला.अजुन त्याचे कोवळेपण,निरागसताही संपली नव्हती.पण त्याला लढाईवर जाणे भाग पडले.चितोडची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली होती.घराघरातले कर्ते पुरुष लढाईत कामी आले होते. स्रीया बनवण्याबरोबरच तोफाही चालवत होत्या. सारे चितोड युध्दात गुंतले होते. केवळ बालके व वृध्द सोडून..सूर्यास्ता नंतर घरे रिती होत होती पुन्हा कधीही न भरण्यासाठी..महाराणींच्या डोळ्यात पाणी तरळले.पूर्ण सैनिकी वेशातील बादलकडे पाहत होत्या.माझ्या भाभीमां चा अपमान करणार्‍या नराधमाला ठार करण्यासाठी निघालो.त्याला मारल्या शिवाय परत येणार नाही.सुरक्षित परत ये तुझी भाभीमां तुझी वाट पाहते…ये.. विजयी होऊन ये…त्याला औक्षण झाल्या वर त्याच्या आवडत्या शुभ्र घोड्यावर स्वार झाला.देवीमां बादलचे रक्षण कर. निष्पाप बालकाला सांभाळ!

                    क्रमशः
 संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.
                  दि. २९-१-२०२२.

!!! महाराणी पद्मिनी !!!

                      भाग – ३२.

          युध्दविश्रांतीनंतर गडावर परतले ल्या गोराकाकांना,महाराणी पद्मिनीने विचारले,काका,बादल कुठेय?गोराकाकां च्या चेहर्‍यावरील रेषा गडद झाल्या.सर्वां च्या पाठीमागे पांढराशुभ्र घोड्याच्या पाठीवर बादलचा निष्र्पाण देह पाहून महाराणी दुःखातिरेकाने वेड्यापिस्या झाल्या.बादलची सुरुवातीपासूनची सारी रुपे त्यांच्या नजरेसमोर उभी राहिली. बादलऽऽऽ!अश्रू आवरणे कुणालाच शक्य नव्हते.महाराणी,आज बादलने न भूतो न भवती असा पराक्रम गाजवला. श्रीकृष्णाच्या सुदर्शनासारखी त्याची तलवार फिरत होती.हजारो शत्रूसैन्य त्याने एकट्याने ठार केलेत.खिलजी भोवतीचे सुरक्षाकडे तोडून थेट खिलजी समोर गेला.त्याच्या वारांनी खिलजी रक्त बंबाळ झाला.मलिक काफूरने थक्क होऊन युध्द थांबवले.अभिमन्युने जसे कौरवसेनेशी मुकाबला केला,अगदी तसा पराक्रम बादलने केला.लालभडक पळसाच्या फुलांनी नटलेल्या वृक्षासारखा तो दिसत होता.पूर्ण अंग जखमांनी भरुन गेलेले,तिळ ठेवण्याएवढीही जागा शिल्लक नव्हती.तरी वेदनेचा साधा हुंकार त्याच्या मुखावाटे निघत नव्हता. त्याच्या भितीने दिल्लीपती बादशहा रक्षकांच्या मागे लपत होता.महाराणीऽ  एकाचवेळी मलिक काफूरने दहा सरदारां सह बादलवर हमला केला.नेमके त्याच वेळी मी दुसरीकडे गुंतलो होतो.त्यांना आटोपून बादलजवळ येईपर्यत सारे संपले होते.

        महाराणी! बादलने तुम्हाला अखेर चा प्रणाम सांगीतला

          महाराज! सारे संपले..संपले महाराज…अश्रूभरल्या नेत्रांनी राणाजींनी बादलचा देह अलगद उचलून फुलांच्या मृदु शय्येवर ठेवला.बाळाऽऽ मोठ्यांनाही लाजवणारा पराक्रम तूं केलास.केवळ चितोडच नव्हे तर सारे जग तुला कधीही विसरणार नाही.पाहतां पाहतां बादलचा देह अग्निरुप झाला.बाळाऽ माझे सौभाग्य तूं राखलेस,मी सदैव तुझी ऋणी आहे..मृत्युनंतरही…

          महाराणी त्यांच्या कक्षातील देवी पद्मावतीच्या मूर्तीसमोर हात जोडून प्रार्थना करत म्हणाल्या,मातेऽ,देवी पद्मावती ही कसली परीक्षा पाहतेस?केवळ माझ्यामुळेच चितोडचा सर्व नाश होत आहे..मी काय करु माते?

        तूं कुणी सामान्य स्री नाहीस,म्हणून तुझे प्रश्न,संकटेही वेगळी व  मोठी आहे. त्या वृध्देला आपल्या कक्षात अचानक बघून पद्मिनींना आश्चर्य वाटले.प्रसन्न हसून वृध्दा म्हणाली,जीथे तूऽ तिथे मीऽ  मायेने पद्मिनींच्या मस्तकावरुन हात फिरवला.मुलीऽ जन्म,मृत्यु दैवाधीन आहे भविष्यात काय घडणार हे नीयती आधीच ठरवते.त्याप्रमाणेच सार ती घडवून आणते.पद्मिनीऽ,स्रीसामार्थ्याचं तूं मूर्त रुप आहेस.सीतेने स्रीसंयमाचे व सहमशक्तीचे दर्शन जगाला घडविले. द्रौपदीने स्रीच्या मनोबलाचं सहांरक रुप दाखवले आणि आतां स्रीच्या मनाच्या अपार सामर्थ्याचे दर्शन तुझ्या रुपाने जगाला होणार आहे.स्रीत्वाच्या रक्षणा साठी स्री काय करुं शकते,जगण्या मरण्याच्या कोणत्या बिंदूला स्पर्श करुं शकते हे तुझ्यामुळे जगाला कळणार आहे.

        मुलीऽ, प्रत्येक युगात असेच घडले आहे.ज्या ज्या स्रीत्वाचा अपमान झाला त्या प्रत्येकवेळी संपूर्ण विनाश झाला आहे.पद्मिनी स्रीच्या स्रीत्वाचा गौरव आबाधित राखण्याचे कार्य तुला करायचे आहे. स्री म्हणजे भोगाचे साधन नसून ती लखलखती वीज आहे याची जाणीव तूं जगाला करुन देणार आहेस.पद्मिनी तूं अग्निरेखा आहेस.स्रीत्वाच्या रक्षणासाठी स्री काय करु शकते हे तूं जगाला दाखवून देणार आहेस.तुझ्यातील हा प्रदीप्त अग्नीच तूं तुझ्यामागे ठेवून जाणार आहेस.

           परंतु माते,चितोडमधला प्रत्येक पुरुष माझ्यामुळे या संग्रामात कामी आला आहे व येत आहे.मातेऽ दुर्जनांना सुख,आनंद आणि सज्जनांना कठोर मृत्यु कां? कसला न्याय?हे कसले प्राक्तन कसले विधिलिखित?पद्मिनी ईश्वराने जे सुनिश्चित केले ते पूर्ण विचार करुनच! स्वार्थ,सत्ता,आणि संपत्तीच्या मोहामुळे माणसांची मने निब्बर झालीत,वृत्ती बोथट झाल्याने प्रेमाचे नाते कधीच नाहीसे झालेत.उरला केवळ व्यवहार. केवळ स्वतःभोवती गुंफलेलं हे जग एका विचित्र तृष्णेने,विचित्र,अतृप्तीने व्यापले आहे.मुली हे सारे तूं बदलणार आहेस.ती शक्ती तुझ्यात आहे.पाहतां पाहतां त्या वृध्देचे रुप बदलले.देवी पद्मावतीचे सुमेर रुप धारण करुन पद्मिनीला आशिर्वाद दिला.पद्मिनीने त्या स्रीरुपाला मनापासून नमस्कार केला.मी तुझी प्रतिक्षा करतेय पद्मिनी! पद्मिनींनी डोळे उघडले तेव्हा समोर कुणीच नव्हते.भारावल्यासारखी स्वस्थ बसून राहिली.देवीचे शब्द मनाच्या गाभार्‍यात घुमत होते.एक अपूर्व समाधान त्यांना वाटले.

                क्रमशः
 संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.
                  दि. २९-१-२०२२.

!!! महाराणी पद्मिनी !!!

                    भाग – ३३.

          महाराणी भावसमाधीतून जाग्या झाल्यात.मनजीतला म्हणाल्या,सर्वांना माझ्या कक्षात येण्याचा निरोप दे.निश्चया चे एक वेगळेच तेज त्यांच्या मुखावर होते एखाद्या अग्निरेखेसारखे…लखलखित आणि संहारक…. सर्वजणी आल्यावर, त्यानी बोलायला सुरुवात केली.मला देवी पद्मावतीने दर्शन दिले.तिच्या आज्ञेने पराजयानंतर चितोड काबिज करणार्‍या त्या कामुक सुलतानाला माझे नखही दिसायला नको म्हणून मी अग्निप्रवेश करण्याचे निश्चित केले.स्रीच्या स्रित्वाचे रक्षण करण्याचा हा शेवटचा मार्ग मी स्विकारणार आहे.क्षणभर सार्‍याच आवाक झाल्यात.प्रथम भानावर आली ती मनजीत!ती म्हणाली, महाराणी, मी तुमच्याबरोबर येणार जिथे जाल तिथे…

पद्मिनी जे भविष्य तुम्हाला दिसते ते मी ही जाणते,मी तुमच्या सोबत आहे राज माता म्हणाल्या.पाहतां पाहतां स्रीत्वाच्या संरक्षणासाठी चितोडगडच्या सार्‍याच स्रीया पद्मिनींच्या पाठीशी उभ्या राहिल्या

महाराणी!पराजयानंतर  भाळी येणारा अपमान,अत्याचार सोसण्यापेक्षा अग्नि फुलांची सोबत नक्कीच सुखकारक असेन.ठीक मी राणाजींची अनुमती प्राप्त करते.

       उद्या सूर्योदयाबरोबर पद्मिनीमहाला च्या प्रशस्त मैदानावर चितोडगडच्या सर्व स्रीया,कन्या आत्मसर्पण करुन जोहार करतील.फद्मावतीदेवी की जयऽऽ… पद्मिनींबरोबर जोहार करण्याचे भाग्य लाभलेल्या सार्‍या तेजस्वीनींचे मुख अतिव समाधानाने उजळली.

        रात्री एकांतात राणाजी म्हणाले, आम्हाला विशेष कांही बोलायचे आहे. आम्हालाही आपल्याला कांही सांगायचे आहे.आधी आपण बोला.. राणीसाहेब! चितोडगडाची सैन्यबळाची स्थिती तुमच्यापासून लपून नाही.आज फक्त १००० हजार व जखमी ५०० एवढेच सैन्य जिवित आहेत.आज शत्रूने दुसराही दरवाजा तोडला.शत्रूने वाटा रोखल्यामुळे कुठुनही मदतीची आशा नाही की,हलका आशेचा किरण नाही.पराभव निश्चित आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. आम्हाला क्षमा करा..राणीसाहेब हरलो आम्ही..महाराणी हरलो…एकेकाळी भारताच्या सर्व पराक्रमी राजे महाराजांना हरवून तुम्हाला प्राप्त करणारा रतनसिंह आतां पराक्रमहीन झाला.खिलजीच्या प्रचंड सेनेसमोर हतबल झाला…हरलो आम्ही…कराल आम्हाला क्षमा..?मृत्युपूर्वी तुमच्याकडून क्षमा हवी आहे.. म्हणजे?होय पद्मिनी!आम्ही हरलो असलो तरी,आमचा शब्द विसरलो नाही. चितोडगड काबिज करण्यापूर्वी आणि महाराणी पद्मिनीपर्यत पोहचण्याआधी त्याला आमच्या शवावरुन जावे लागेल. राणाजी क्षणभर थांबून म्हणाले,उद्या सूर्योदयाबरोबरच जिवित असलेले सारे वीर केसरिया करणार आहे.एकही वीर जिवित नसणार…अखेरच्या रक्ताच्या थेंबापर्यत लढत राहू…लढत राहू…आणि लढतच राहू…

       महाराणी पद्मिनींनी प्रेमाणे त्यांचे हात हातात घेऊन म्हणाल्या, महाराज! आपल्या दोघांचे विचार किती समान आहे.कदाचित मनाची एकरुपता हेच कारण असेल.आणि पद्मिनींनीही आपला बेत त्यांना कथन केला.महाराज! नीयतीने ठरवलेल्या कार्यात आपण बदल करुं शकत नाही.महाराज!सुलतान ला विजय मिळाला तरी त्याला काय दिसेल तर एक उजाड देश..माणसं नसलेला.. आणि जिच्याप्राप्तीसाठी त्याने एवढा अट्टाहास केला,संहार मांडला त्याला माझ्या नखाचेही दर्शन होणार नाही.

     पद्मीनीऽऽ…राणाजींचे नेत्र सजल झाले..

       महाराज!आपण मला हसतमुखाने निरोप द्या..आपल्या आयुष्यातील ही रात्र अखेरची आहे.राणाजींनी आवेगाने त्यांना आपल्या बहुपाशात घेतले.पद्मिनी  आयुष्याचा शेवट असा होईल याची स्वप्नातही कल्पना केली नव्हती.महाराज मला खरचं खंत,खेद नाही.या सर्व भावनांच्या मी पलिकडे गेले आहे.तुमच्या मागे जगण्याचे मला कारणही नाही. ही चितोडची राणी पद्मिनी तिच्या अग्नि दिव्यामुळे जगाच्या इतिहासात अमर होणार आहे.

       पद्मिनी खरच किती जगावेगळी जोडी आहे आपली?उद्या आपण नसलो तरी आपल्या प्रेमाचा सुगंध दहा दिशांनी  व्यापलेला असेन.अखेरच्या रात्री राणाजीं ना शांत झोप लागलेली बघून त्या अलगद उठल्या.जलमहालाच्या सज्जा वर एखाद्या शिल्पाप्रमाणे त्या शांत आणि अंधाराचा एक भाग होऊन अटळपणे स्तब्ध उभ्या होत्या.तेवढ्यात मनजीत शाॅल घेऊन आली.मनजीत..उद्या या जगाचा कायमचा निरोप घेण्याच्या कल्पनेनचं मला विलक्षण शांत वाटत आहे.होऊ घातलेला अपमान,अवहेलना, चिंता,भीती,निराशा,संताप,दुःख या सार्‍यापासून मुक्त झालेय..अगदी कोर्‍या पाटीसारखी…

                  क्रमशः
 संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.
               दि. ३०-१-२०२२.

             

 

महाराणी पद्मिनी चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading