
राजकुमार पद्मवत आणि राणा रतनसिंहांमधे सुरु झालेली आकर्षक लढत सर्व उपस्थित श्वास रोखून बघू लागले.तलवारी एकमेकांवर आदळू लागल्या.प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या योजल्या जाऊ लागल्या.एकमेकांवर शब्द आणि शस्राचे आघात होऊ लागले.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
5
!!! महाराणी पद्मिनी !!!
भाग – ५.
राजकुमार पद्मवत आणि राणा रतनसिंहांमधे सुरु झालेली आकर्षक लढत सर्व उपस्थित श्वास रोखून बघू लागले.तलवारी एकमेकांवर आदळू लागल्या.प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या योजल्या जाऊ लागल्या.एकमेकांवर शब्द आणि शस्राचे आघात होऊ लागले. आणि काय,कसे झाले हे कुणालाच कळले नाही.समोरचे दृष्य थक्क करणारे होते.राणा रतनसिहाच्या छातीवर तलवार टेकवून पद्मसिंह उभा होता.आणि एका बेसावध क्षणी विलक्षण चापल्याने रतन सिंहाने छातीवर टेकलेली पद्मसिंहची तलवार बाजूला करुन उंच उडी घेऊन त्याने पद्मसिंहवर वार केला.पद्मसिंहने वार तर चुकवला पण त्या वाराने मस्तका वरचा केसरी फेटा खाली पडला. आणि..
एकत्र बांधलेले रेशमी केस सळसळत मानेवर,पाठीवर ओघळले. राणाच नव्हे तर सारे प्रेक्षकगृह थक्क झाले.राजकुमारी आपण? राणासिंह चकित होऊन म्हणाले.युध्दाच्या श्रमाने चेहरा लाल झालेला,तेजस्वी नेत्र खाली झुकलेले,अभिमान,संकोच,समाधान यांच्या मिश्रणाने प्रसन्न हसू ओठांवर विलसत होते.
राजकुमारी,आपल्या पराक्रमाने आम्ही तुमच्यावर मोहित झालोय,नव्हे तुमच्या प्रेमात पडलो.तुमचे रुप विलक्षण तर आहेच,पण तुमचे तलवार कौशल्य त्याहून विलक्षण आहे.तुमच्याकडून पराभव पत्करायला आम्हाला नक्कीच आवडले असते.राजकुमारीच्या डोळ्यात थेट बघत म्हणाले.राजकुमारीऽ! या रतन सिंहाच्या प्रेमाचा स्वकार कराल? आणि एकाएकी पद्मिनीला त्या डोळ्यांची ओळख पटली.
देवी पद्मावतीच्या मंदिरात विरक्त संन्यसाच्या रुपात,याच डोळ्यांनी तिला मोहिनी घातली होती.गेले कित्येक दिवस हेच डोळे तिचा पाठलाग करीत होते.देवी पद्मावतीने तिच्या स्वप्नातला राजकुमार तिच्या सर्व अटी पूर्ण करुन तीच्या समोर उभा होता.तिच्या मुखावर लज्जा व संकोच्याचे रंग पसरले.वाकून हातातील तलवार राणाजींच्या चरणांवर ठेवली. राजकुमारी पद्मिनी व राणा रतनसिंहाच्या जयजयकाराने सारी स्वयंवर नगरी दुमदुमुन गेली.
महाराज गंधर्वसेन म्हणाले, रतन सिंह,तुम्हाला आणखी एका प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे.विचारा महाराज!आपली ज्ञानसंपन्नता,बाहूबल,पराक्रम सिध्द केला,पण संकटसमयी अहंभाव,वैयक्ती क सुख आणि प्रजेची सुरक्षतेचा विचार करतां,ज्ञान आणि पराक्रम या दोन्हीचा मेळ राजाने कसा घालवावा?रतनसिंहां नी क्षणाचाही विलंब न लावतां म्हणाले, महाराज! देश म्हणजे देह आणि प्रजा म्हणजे देशाचे ह्रदय!जसे मन देहावर राज्य करते,तसेच राजाचे देशावर अधिपत्य असते.ज्ञान,बुध्दी हे देशरुपी देहाचे दोन नेत्र,तर पराक्रम व राजनीती हे दोन बाहू.राजाने भावनेपेक्षा बुध्दीचा आणि ज्ञानाच्या नेत्रांनी डोळसपणे संकटाचे अवलोकन करावे.स्वार्थ आणि अहंकारापेक्षा प्रजेचे सुख आणि सुरक्षेचा विचार करावा.संकटसमयी राजाने प्रजे च्या सुखाला प्राधान्य द्यावे.प्रजेच्या सुखा पुढे प्राणप्रिय पत्नीचा त्याग श्रीरामाने केला.महाराज,शरीराचे कार्य उत्तम चालवण्यासाठी मनाला संयमाचा लगाम हवा,तेच स्थान देशाच्या राजकारणात बुध्दीमती महाराणीचे आहे.रतनसिंहांनी नजीक उभ्या असलेल्या पद्मिनीकडे कटाक्ष टाकत म्हणाले.
राणा रतनसिंह थांबले.आणि अविरत टाळ्यांच्या कडकटाने सारा सभा मंडप दुमदुमुन गेला.स्वतः महाराज गंधर्व सेन व्यासपीठावरुन उतरुन रतनसिंहा जवळ जात म्हणाले,हे महावीरा,माझी रुपमती,गुणवान,बुध्दीमान कन्या पद्मिनी आपण स्वयंवरात जिंकली.ती तुम्हाला अर्पण करतो.रिवाजानुसार विवाह सोहळा उद्या संपन्न होईल.जयघोषाचा न थांबणारा नाद सार्या सभागृहात निनादत राहिला.
आणि नगारे,सनई,चौघडे वाजू लागले.दोघांवरही फुलांची उधळण झाली.विवाहाच्या पूर्व संधेला मधूर गीते गायली जाऊ लागली.विवाहवार्ता सार्या भारतवर्षात पसरली.सिंहलद्वीपची अप्रतिम सौंदर्यवती राजकुमारी पद्मिनी चा विवाहसोहळा सुरु झाला.
सारे सिंहलद्वीप नववधूसारखे सजल होते,सोहळा कितीतरी दिवस चालु होता.नगरातील सार्या चुली बंद होत्या.वधूवेषात पद्मिनीचे रुप एखाद्या अग्नीरेखेसारखे लखलखत होते.
राणाजी!माझी लाडकी लेक, काळजाचा तुकडा तुम्हाला दिला आहे. सातसमुद्रापार तुमच्यासमवेत निघाली आहे.तिची आमची भेट परत कधी होईल सांगतां येत नाही.तिला जपा.राणाजी, तिला एवढे प्रेम द्या की,माहेरची आठवण येऊं नये.चंपावतीला पुढे बोलवेना. डोळ्यात आलेले पाणी,कन्येच्या वियोगा च्या कल्पनेने विकल झालेले मुख,जोडले ले हात,त्याहून हळवे शब्द! राणीमां चिंता करुं नका.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २४-१-२०२२.
6
!!! महाराणी पद्मिनी !!!
भाग – ६.
राणीमां!पद्मिनी आतां चितोडगड ची महाराणी आहेत.चितोडच्या राणा राजवंशाच्या मानबिंदू आहेत त्या!त्याच सन्मानाने त्यांचे चितोडला स्वागत होईल
महाराज या राणाचा शब्द आहे,या सिंहल द्वीपच्या राजकुमारीला आम्ही प्राणपणा ने जपू!महाराज एक मागणंं आहे. आमच्या महाराणीची बालसखी मनजीत आमचा बालसखा रुपसंगासाठी द्यावी. चितोडला पोहोचल्याबरोबर या दोघांचा विवाह भगवान एकलिंगजीच्या साक्षीने लावून देऊ.महाराज आनंदाने तयार झाले.शाही मेणे चितोडगडकडे रवाना झाले.
रस्त्यात मधल्या छोट्या मुक्कामा त दोघे एके ठीकाणी बसले असतां,राणा म्हणाले,राणीसाहेब,कांही काळापूर्वी तुम्हाला मिळवण्यासाठी हा एवढा प्रदीर्घ प्रवास आम्ही जमेल तसा एकट्याने केला.कधी घोड्यावरुन,कधी पालखीतून कधी संन्याशाची वस्रे लेवून,कधी उपाशी केवळ जलपान करुन केला.यालाच प्रेम म्हणत असेल,नाही?
पद्मिनी तुम्हाला कांही सांगायचे आहे आपल्या नवीन जीवनाची सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यापासून कांहीही लपवा यचे नाही.पद्मिनी आम्ही विवाहित आहो अगदी लहानपणी आमच्या पिताश्रींनी त्यांच्या जिवलग मित्राची कन्या नागमती शी आमचा विवाह लावून दिला.परंतु तुमचे रंगचित्र अचानक बघण्यात आले आणि आम्ही आमचे उरलोच नाही.सारं विसरुन चितोडगडवरुन सिंहलद्वीपपर्यत धावत केवळ तुमच्या दर्शनासाठी आलो.
तुमच्या दर्शनास्तव आम्ही स्वामींचे शिष्यत्व पत्करले.तुमच्या राजप्रासादा भोवती सदैव फिरत राहिलो.
पद्मीनी मृदु हसत म्हणाली, राणाजी,मी एक राजकुमारी आहे. स्वयं वरात आलेल्या सर्वांची संपूर्ण माहिती माझ्याजवळ होती.त्यात तुम्हीही होतात. आम्ही विवाहित आहोत हे माहित असून ही,तुम्ही आमच्याशी विवाहास राजी झालात? राणाजी,हे स्वयंवर म्हणजे पराक्रमाची परीक्षा होती.आणि पराक्रमा ला वय नसते.खरं सांगू,आपल्याला जेव्हा स्वामीजींच्या शिष्यरुपात बघितलं तेव्हाच…आणि स्वयंवरातील विजयाने त्यावर शिक्कामोर्तब केले.पण पद्मीनी, महाराणी नागमती स्वभावाने तापट आहे त्या सहजी तुम्हाला स्विकारणार नाही. चिंता करुं नका.त्यांना जेष्ठ बहिणीच्या ठायी समजू.आमच्यात कधीही मनमुटाव होणार नाही याची दक्षता घेऊं.पण नागमतीला जिंकणे येवढे सोपे नाही. शिवाय या स्वयंवरासाठी आम्ही अत्यंत गुप्तपणे,त्यांना कल्पना न देता आलोय. त्यामुळे तुमचे अनपेक्षित येणे त्यांच्या पचनी पडणार नाही.आपल्या दोघांतील, आणि नागमतीच्या नात्यातील काटे कोणाला बोचू नये एवढीच माफक अपेक्षा!
प्रवास पुन्हा सुरु झाला.आलं चितोडगड!मेणा अलगद खाली ठेवला. पद्मिनी खाली उतरल्या.सावलीसारखी मनजीत महाराणींच्या पाठी उभी होती. पद्मिनींनी मनोमन भूमातेला नमस्कार करुन म्हणाली,माते,मला आशिर्वाद दे! माहेर सासर या दोन्ही कुळांचे नांव रोशन होईल असेच माझे वर्तन असू दे!
समोर भगवान एकलिंगाचे फार जुने मंदिर,या स्थानाला प्रत्यक्ष महादेवाचे पाय लागले असे म्हणतात.पद्मिनीने मंदिराच्या कळसाला श्रध्देने हात जोडले.
राणाजी आल्याचे कळल्याबरोबर सारे महाद्वाराकडे धावले.राणी पद्मिनीच्या रुपाने सारे आवाक झाले.मस्तकावरुन ओढलेलेला चुनरीचा पदर असलेली एक वृध्दा,हातात गडद लाल रंगाच्या बांगड्या घेऊन,मंद पावले टाकत अचानक पद्मिनीजवळ आली.क्षणभर दोघींची नजरानजर झाली.पद्मिनीला सिंहलद्वीप मधील देवी पद्मावतीच्या डोळ्यांची आठवण झाली.तिच आणि तशीच प्रशांत नजर,प्रसन्न भाव!पद्मिनीने वाकून त्या वृध्देचे चरणस्पर्श करुन म्हणाली, देवीमां तुझा आशिर्वाद सदैव असू देत!
मुली ह्या बांगड्या नेहमी हातात असू दे.तुझं सौभाग्य अखंड राहिल. मोठ्या आदराने पद्मिनींनी त्या बांगड्या हातात घेतल्या.वृध्देच्या मुखावर गूढ हास्य पसरले.आणि गर्दीत एकाएकी दिसेनाशी झाली.आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुला देवी पद्मावतीचा आशिर्वाद मिळेल हे स्वामीजींचे शब्द पद्मिनींना आठवले.
देवी नागमती आल्या,कुणी तरी म्हटले.आणि क्षणांत गर्दी दुभंगली.शुभ्र गोरा रंग,कृश अंगकाठी,वस्रालंकारांनी सजलेल्या नागमतीने पद्मिनीकडे पाहले. तिच्या असामान्य रुपाने त्या प्रभावित झाल्या.,पण क्षणभरच!कपाळावर आठी पडली.दासीच्या हातून तबक घेऊन वधू वरांना औक्षण करुन म्हणाल्या,या.. धाकट्या राणीसाहेब या…चितोडच्या परिवारात तुमचं स्वागत आहे.पद्मिनींनी त्यांना प्रणाम केला.डोळ्यात मत्सराचा विखार दिसला.पद्मिनीपुढे एक कठोर आव्हान होते,जे त्यांनी मनोमन स्विकारले.
क्रमशः
संकलन व ज्ञ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २४-१-२०२२.
7
!!! महाराणी पद्मिनी !!!
भाग – ७.
देखणा चितोडगड बघतांना रचनाकाराने निसर्गातील संपदेचा पुरेपूर वापर केलेला दिसून येत होता.पायथ्या पासून मुख्य प्रवेशद्वारापर्यंत भव्य अत्यंत मजबूत त्यावर लोखंडी खिळे बसवलेले, तोफेच्या गोळ्यांनाही दाद न देणारे, लोखडी कड्या अत्यंत मजबूत दरवाजे होते.सुर्यास्त होताच,भल्या मोठ्या लोखंडी अडण्या लावून बंद केल्या जात होते.कडेकोट बंदोबस्त होता.आणि प्राण पणाला लावणारे सुरक्षादल तैनात होते. पद्मिनी मोठ्या उत्सुकतेने सारे निरखित होती.
राणीसाहेब,फार प्राचिनकाळी मौर्य राजवंशातील मध्यमा नगरीचे राजा चित्रागंद या डोंगरगडाच्या प्रेमात पडले. त्यांनीच या विशाल पर्वतावर हा किल्ला बांधला.त्या चित्रकुटाचेच नांव पुढे चितोडगड झाले.महाराज चित्रगंदाच्या या गडावर विद्वान ब्राम्हण,कलाकार,कष्ट करी जनता रहायला आल्यावर लोकांना रहायला गड कमी पडू लागल्यामुळे गडा खाली वस्ती करुन राहू लागले.आणि सर्वदूरवर चितोडगड नगरी वसली.पुढे बाप्पा रावळांनी मौर्य राजयघराण्यांतील राजा मानसिंगाचा पराभव करुन गड हस्तगत केला.तेव्हापासून आजपर्यंत सुमारे ७०० वर्षे हा चितोडगड रावळ राजवंशाचा सन्मान ठरला आहे.पुढे प्रत्येक राजाने आपल्या आवडी व सोयी प्रमाणे गडावर विविध महाल,मोठाले स्तंभ,मंदिरे,बाजारपेठा,क्रीडा संकुले आणि नागरीकांसाठी घरे व प्रशस्त इमारतीही बांधल्या.आजवर या गडाच्या लौकिकात आणि सौंदर्यात नित्यनूतन भरच पडत गेली.विशाल अशा सात मजली मनोर्याकडे संकेत करत राणाजी म्हणाले,हा कीर्तीस्तंभ!भगवान आदि नाथजींची अत्यंत देखणी शिल्पे चारही दिशांनी या मनोर्यावर रोखली आहे. गेल्या शतकांत दिगंबर जैन संप्रदायातील एका भक्तराजाने हा स्तंभ इथे करवला. राजवंशाने हा सन्मान मोठ्या अभिमाना ने जपला आहे.
गडाच्या मुख्य दाराशी स्वतः राज माता सरस्वतीदेवी उभ्या होत्या.पद्मिनींने त्यांना वाकून नमस्कार केला.मस्तकावर अक्षता उधळत राजमाता म्हणाल्या,जसं तुझं रुप,तसचं वर्तन मनाला सुखद, प्रसन्न वाटणारे….
गडाच्या प्रवेशदारापासून राज महालापर्यत फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या.दुतर्फा प्रजा आपल्या आवडत्या राणावर व जिंकून आणलेल्या रुपसंपन्न नववधूवर फुलांचा वर्षाव करीत होते.शहनाईचे मधूर स्वर कानाला सुखवित होते.आपलेपणाची एक वेगळी भावना व आतां हेच आपले घर,हीच आपली कर्मभूमी राणी पद्मिनींच्या मनात जागत होती.अक्षदांनी भरलेले सुवर्णपात्र पद्मिनींनी ओलांडून महालात प्रवेश केला राजवंशाच्या लक्ष्मीची कुंकुमचिन्हे चितोडगडच्या राजप्रसादात उमटत होती.
पद्मिनी पहाटेच उठल्या.उमलल्या फुलासारखा चितोडगड सुंदर,ताजा दिसत होता.त्या मनजीतला म्हणाल्या, आपल्या सिंहलद्विपापेक्षाही चितोडगड अधिक सुंदर आहे.चल मनजीत,नव्या आयुष्याची व पहिल्या सुरुवात,राजमाते च्या आशिर्वादाने सुरु करुं या!असे म्हणून त्यांनी राजमातेच्या कक्षात प्रवेश केला.त्यांच्या कक्षात भगवान एकलिंगजीचे स्वतंत्र मंदिर होते.नित्य पुजापाठ झाल्याशिवाय त्या पाण्याचा थेंबही घेत नसत.पद्मिनींना बघताच राज माता म्हणाल्या!ये मुली…कसलाही संकोच करुं नकोस.प्रथम भेटीतच राणी पद्मावती सुखावल्या.
पद्मिनीसाठी सारेच नवे होते.हा गड,महाल,सेवक सेविका,दासदासी, माणसे,नियम,पध्दती तरीही आपलेसे वाटणारे…पद्मिनी सारे समजावून घेत होत्या.नागमतींना नटण्यामुरडण्याची अतिशय आवड.देशोदेशींच्या दुर्मिळ वस्तुंनी त्यांचा कक्ष सजलेला होता.त्यांनी पद्मिनींना घागरा,चुनरी,अलंकार भेट देत म्हणाल्या,आता तुम्ही आलांत,राणाजींची आम्हाला काळजी नाही.
मनजीत पद्मिनींना म्हणाली,मला राणी नागमतीचे रुप उग्र वाटले.त्यांच्या डोळ्यात असूया,सवतीमत्सराची गडद झाक दिसली.राजकुमारी,त्यांचेपासून सावध असा.नागमतीच्या सोनसळी सौंदर्यात क्रूर नागिनीचे कडवट जहर लपलेले,मन काजळलेले स्पष्ट जाणवले. होईल कांही दिवसांनी ठीक.कुणाही स्री ला आपल्या पतीत वाटेकरी झालेलं पचवायला थोडा अवधी लागतो.पण चितोडच्या या राणीवशात मोकळेपणा नाही.त्यांच्या दासी गुप्तपणे फिरत असतात.त्यांची मर्जी संपादन करण्या साठी खोटेनाटे सांगावे लागतात.मनजीत मला हे सारे कळते,पण रुचत नाही.ही कटूता संपवण्याचा मी प्रयत्न करेन.नंतर नागमतीसह पद्मिनी समिध्देश्वराच्या दर्शनाला निघाल्या.मंदिरातील महादेवा ची पिंड बघत त्या नागमतीला म्हणाल्या, देवी,हे मंदिर फारच सुंदर आहे.प्रत्यक्ष परमेश्वर पाठीशी असल्याचा भास होतो. होय! हे फार पुरातन मंदिर आहे.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २४-१-२०२२.
8
!!! महाराणी पद्मिनी !!!
भाग – ८.
पद्मिनी म्हणाल्या,चितोडगडची सून होण्याचे भाग्य मला लाभले हे माझे सुदैवच!खरे भाग्य आमचे होते.पण सारे जग पालथे घालून राणाजी तुला इथे घेऊन आले.आता सारेच वाटून घ्यावे लागेल.राणाजींचे प्रेम देखील…देवी ह्या लग्नाच्या गाठी इश्वराने आधीच निश्चित केलेल्या असतात.त्याची कांही योजना असेल.असेलही,पण एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत.पण देवी,एका घरांत दोन बहिणी राहु शकतात.आणि आपण ते प्रेम निर्माण करु.मला खात्री आहे,तुमच्या मनात माझं स्थान निर्माण करुं शकेन.तसं होईस्तोवर तूं राणाजीं पासून दूर रहायला हवस!अंगावर वीज कोसळल्याचा भास पद्मिनींना झाला.पण क्षणभरच!दुसर्याच क्षणी म्हणाल्या!देवी हे आव्हान स्विकारलं आणि तुमची अटही.पद्मिनींनी समिध्देश्वराच्या पिंडीवर चे बेल उचलून नागमतीला वचन दिले. न कळत तिचे नेत्र झुकले.
राणाजी चितोडगडला आल्या पासून,पद्मिनींना द्यायला त्यांना वेळच मिळाला नाही.बराच काळ दूर असल्या मुळे खोळंबलेली बरीच कामे प्रलंबित होती.दिल्ली सल्तनीत झालेल्या भूकंपा चे हादरे सार्या राजपुतान्यात उमटले होते. राजकीय घडामोडींचा परामर्श घेणे अद्याप बाकी होते.त्यातच राणी नागमती ने केलेला अंतर्गत कलह अपेक्षित असला तरी तनावपूर्णच होता.सात समुद्र ओलांडून आणलेल्या जलकन्येला सगळी सुखे द्यायची होती..!
राणाजींनी पद्मिनीच्या कक्षात प्रवेश केला नी जागीच थबकले.तेथील पवित्र वातावरण व देवघरांतीलत कृष्ण मूर्तीसमोर शुभ्रवस्र धारण केलेली पद्मिनी एखाद्या देवीसारखी भासत होती.त्यांना अडथळा येऊ नये म्हणून राणाजी वाट बघत बसून राहिले.किती तरी वेळ गेला. राणाजी आल्याचे त्यांना कळलेही नाही. प्रसाद देत त्या म्हणाल्या,कांही दिवसां पूर्वी समिध्देश्वराच्या दर्शनाला गेले असतां,तिथे एका स्वामींचे दर्शन घडले. चितोडगडाच्या कल्याणासाठी व राज्या वर येणार्या संकट निवारानार्थ आणि महाराजांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांनी मला हे व्रत करण्याची आज्ञा दिली.खरं म्हणजे तुमच्या भेटीच्या ओढीने आलो होतो. परंतु…. रागवलात? छे! तुमच्या या वर्तनाने माझी प्रिती अधिक वाढली.तुम च्या या उपासनेला माझी साथ आहे. पद्मिनीनिवासात राणाजींनी निवास केला नाही ही वार्ता वार्याच्या वेगाने देवी नागमती पर्यत गेली.त्यांना समाधान वाटले,पण क्षणभरच!तिला याहून अधिक हवे होते.
एकाचवेळी शेकडो लोक बसू शकतील अशा सभागृहात दरबार भरला. चितोडचे सारे श्रेष्ठ सरदार आसनस्थ झाले.उजव्या बाजूला स्रीयांसाठी अत्यंत तलम पडद्याने सजवलेला सज्जा होता. सारे मोठ्या उत्सुकतेने राणाजींची व नव्या राणींच्या प्रतिक्षेत होते.थोड्याच वेळात धीरगंभीर पावले टाकत,राणी पद्मिनी व नागमतीसह राणाजींनी प्रवेश केला.सर्वांनी उठून आदराने उत्थान दिले. सिंहासनाला प्रणाम करुन राणाजी आसनस्थ झाले.महामंत्री सुजानसिंगने चितोडगडच्य्या नव्या महाराणीचे स्वागत केले.राणा रतनसिंह आणि पद्मिनींनी दोन्ही हात जोडून सर्व उपस्थितांना नमस्कार केला.राणी पद्मिनींचे लक्ष्मी सारखे दैवी रुप व अपूर्व सौंदर्य पाहून सारा दरबार भारावून गेला.
महाराणा,पद्मिनी व राजमाता सरस्वतीदेवींच्या जयघोषाने सारा दरबार दुमदुमुन गेला.नागमतीच्या कपाळावर तीव्र आठी उमटली.महांमत्र्याच्या संकेता ने दरबार शांत झाला.नंतर त्यांनी महा राणांना राज्यकारभाराचा आढावा प्रस्तुत केला.मित्रहो!मी कांही काळ राज्यापासून दूर होतो,तरी आपण माझी उणीव भासू दिली नाही.असेच सहकार्य नेहमीसाठी आपल्याकडून अपेक्षित आहे.राज्य फक्त
माझे एकट्याचे नसून आपणां सर्वाचे आहे. नंतर
राणा रतनसिंहांनी सर्व प्रधान मंडळाचा सत्कार केला.नजराणे व भेटी देऊन त्यांचे कौतुक केले.राणी पद्मिनी हे सारं उत्सुकतेने पाहत व राणाजींबद्दल असणार्या आदराने त्या सुखावत होत्या. मात्र महामंत्री सुजानसिंगची बेचैन नजर पाहून कारण विचारल्यावर,म्हणाले, महाराज!दिल्लीची सत्ता काबिज करुन हिंदुस्थानात पाय रोवण्याचे मुघलांचे प्रयत्न सुरु आहे.असे असले तरी, जलालुद्दीनने कितीतरी काळ राजपुतां बरोबर मैत्रीचे धोरण स्विकारले होते,पण दिल्लीचे सुलतान जलालुद्दीन खिलजी पैंगबरवासी झाले.अरेरेऽ! बादशहा जलालुद्दीन फार थोर आणि सच्चा माणूस होता.स्वच्छ पाण्यासारखे निर्मळ मन होते त्याचे..
महाराज!कदाचित त्याच निर्मळमना मुळे त्यांचा घात झाला.त्यांचा पुतण्या व जावई असलेल्या अल्लाउद्दीन खिलजीने त्यांना धोक्याने ठार मारले.त्याने स्वतः बादशहाचे शिर कलम केले आणि स्वतः दिल्लीचा सुलतान झाल्याची द्वाही फिरवली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २५-१-२०२२.
9
!!! महाराणी पद्मिनी !!!
भाग – ९.
ही वार्ता ऐकून राणाजी सुन्न झाले. ज्याला सख्या नात्याची चाड नाही,वया ची,कर्तृत्वाची जाण नाही तो दिल्लीचा सत्ताधीश म्हणून मिरवणार ही कल्पनाच भयंकर आहे.अल्लाउद्दीन अत्यंत महत्वा कांक्षी,सत्तापिपासू आहे.तो स्वतःला “सिकंदर ए सानी” म्हणवून घेतो. अलेक्झांडरप्रमाणे सारा हिंदुस्थान जिंकण्याचे त्याचे स्वप्न आहे.गुजरात, मेवाड,माळव्याकडे त्याची वक्रदृष्टी आहे. आपल्या परंपरा जपणारा आणि स्वकष्टा ने समृध्द झालेला हा मेवाड त्याच्या मनात भरला आहे.चितोडकडे पाहणार्या चे डोळे जागेवर राहणार नाही,एक आठ वर्षाचा कोवळा मुलगा तलवार उपसून, संताप व डोळ्यांत अंगार पेटलेला,त्याचे शब्द आणि रुपाने सारा दरबार भारावून गेला.बादल!शांत हो,दरबारात असे वर्तन योग्य नव्हे.सेनापती म्हणाले.मामाजी माझ्या चितोडकडे वाकड्या नजरेने पाहणार्याची मी गय करणार नाही.बाळा तुझ्याप्रमाणेच इथल्या प्रत्येकाला वाटते. पण ती वेळ अजून आलेली नाही.पण बेसावध राहूनही चालणार नाही.सुल्ताना चे बळ फार मोठे आहे.
सेनापती अर्जुनसिंहांना राणाजी म्हणाले,सुलतानच्या भोवताल आपले हेर पसरवा.तिथली खडान् खडा माहिती त्वरेने आपल्याला मिळण्याची व्यवस्था करा.हे सुलतानी संकट कधीही आपल्या वर कोसळू शकते.संकट येण्याआधीच आपली झुंज घेण्याची तयारी असायला हवी.महाराणी पद्मिनीच्या स्वागताने सुरु झालेला दरबार वेगळ्याच चिंतेच्या आवर्तनात विसर्जित झाला.
पद्मिनी राजमाता सरस्वतीदेवीच्या महालात बोलत असतांना तिथे बादल आला.हा बादल महासेनापती गोरासिंग च्या बहिणीचा मुलगा,मोठा लाघवी, सर्वांचा आवडता.मांजी खरच ईश्वराची लिला किती अगाध आहे?कुणाचे ऋणानु बंध कसे जडलेले असतात हे तोच जाणतो.अन्यथा सिंहलद्वीप मधून सात समुद्र ओलांडून चितोडगडला यावे आणि आपल्यासारखी मातेच्या रुपाने राणीमां भेटावी,कुमार बादल सारखा धाकटा भाऊ मिळावा हे कसे?खरोखर सारेच अगम्य आहे.जे उत्तम,ते ही देवानेच घडवले आणि जी संकटे येतात ती ही त्यानेच निर्माण केलेली.म्हणजे? कांही नाही.सावरुन घेत राजमाता म्हणाल्या जा तू..मी आज कालिकेच्या मंदिरात जाणार आहे.आपल्याला न सांगण्या सारखं काय असावं?कुठल्याश्या अज्ञात संकटाचे भय तिच्या मनांत दाटून आले. याबाबतीत राणांजीशी बोलू असे ठरवून राजमातेच्या महालातून बाहेर पडल्या.
आजवर जे जे माझे एकटीचे होते ते सारे पद्मिनीबरोबर वाटून घ्यावे?अगदी माझ्या पतीचे प्रेमही?कां?कशासाठी? महाराज माझे काय चुकले?कुठे उणी पडले मी?तुमच्या अस्तित्वात तनामनाने मिसळून गेले असतांना,पद्मिनीला तुमच्या मनात स्थान मिळाले,कां? देवी नागमती राणाजींना विचारत होत्या. मनात कुठलाही गैरसमज नसावा राणी साहेब!तुमच्यावरचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही.पूर्वीसारखेच तुमचे स्थान माझ्या ह्रदयात आबाधित आहे.पद्मिनी आल्याने तुमच्या सन्मानात किंचितही उणेपणा येणार नाही.त्यांचे मन अतिशय मृदुल,निर्मल आणि स्वभाव सरळ आहे. असेलही कदाचित!पण तिचे येणे मला माझा पराभव वाटतो.
नागमती,हा दुजा भाव नका येऊ देऊ.तुमच्या मनांत निर्माण होत असलेले सवतीमत्सराचे विचार वेळीच आवरा आणि पद्मिनींना लहान बहिणीप्रमाणे सांभाळून घ्या.सारे कांही नीट होईल. नाही कदापी शक्य नाही.मी सारे सहन करेन,पण..पण माझ्या पतीच्या प्रेमात दुसरा वाटेकरी नाही.मी तिला कधीच क्षमा करुं शकणार नाही.राणीसाहेब! पद्मिनींचा काय दोष?त्यांच्या असामान्य रुपाची आणि बुध्दीची वर्णने ऐकून, आकर्षण निर्माण झाल्याने,स्वपराक्रम सिध्द करुन जिंकावे ही आमची इच्छा होती.त्यांच्या देशातून आम्ही त्यांना जिंकून आणले.पद्मिनींचे चितोडला येणे हा चितोडचा सन्मान आहे.आमच्या पराक्रमाचा अभिमान आहे.सार्या हिंदुस्थानातील असंख्य राजांचा पराभव करून आम्ही या राजकन्येशी विवाह केला आहे.देवी नागमती, याही तुमच्या सारख्याच आमच्याबरोबर सात फेरे घेऊन,मोठ्या विश्वासाने घर,मातापित्यां ना व राज्य सोडून आल्या आहेत.त्यांचा एकटेपणा तुम्ही वाटून घ्यायला पाहिजे तर दुःस्वास करतां,नागमती म्हणाल्या हे मला जमणार नाही.माझे सारे विश्व तुमच्या
भोवती फिरते,त्यात पद्मिनीला स्थान नाही….
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख
दि. २५-१-२०२२.


