गोपिकाबाई चरित्र भाग ४, (१३ ते १६)

"तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।" असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


           १७२९ सालच्या दिवाळी सणाला शाहुमहाराज फराळासाठी भिकाजी रास्ते सावकारांकडे आले असतां,त्यांना घार्‍या डोळ्याची ५-६ वर्षाची चुणचुणीत मुलीला पाहुन,छत्रपती शाहु महाराजांनी स्वतः पुढाकार घेऊन,नानासाहेब पेशवेसाठी मागणी घातली……………

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! गोपिकाबाई !!!

!!!  गोपकाबाई  !!!

भाग – १३.

         महाभारताच्या पोथीतील विखुरलेल्या पोथीच्या पानांत त्यांना अभिमन्युवधाचं चित्र दिसलं…द्रोण,कर्ण, अश्वत्थामा,दुर्योधन,दुःशासन,जयद्रथ सारे अभिमन्युवर घाव टाकणारे…द्रोणां चा वधानंतर त्यांच मुंडक कापुन हातात धरलेला दृष्टद्युम्न…अघोरी सुचलेल्या विचाराने झोपेत असलेल्या द्रौपदीचे पांच पुत्र व दृष्टद्युम्नचा वध..अश्वत्थामाच्या डोक्यातुन काढलेला मणी…भळभळत्या जखमेत तेल मागत भटकणारा चिरंजीव अश्वत्थामा…एकएक चित्र खोलीत इथं तिथं विखुरलेले…

        शनिवारवाडा दादासाहेबांच्या जय जयकाराने दुमदुमत होता.दुष्मन मारला. खुशी मनवावी.शनिवारवाड्याचे दरवाजे बंद…आणि गारद्यांनी वाडा लुटायला सुरुवात केली.जे हाती लागेल ते लुटले. गोपिकाबाई पोथीचं एकएक पान गोळा करीत होत्या.

        शनिवारवाड्याच्या सोप्यातल्या बैठकीत तक्क्याला टेकुन रघुनाथराव बसलेले,दुष्मन मारला,खुशी करावी.. नागव्या तलवारी घेऊन भोवती गारदी उभे,वाड्याचे दरवाजे बंद!बाहेर सेनापती हरिपंत फडके,सखाराम बापु,कारभारी जमा झाले.सारं पुणं शनिवारवाड्याकडे धावत सुटले.फौजा,तोफा सिध्द झाल्या. वाड्यावर तोफा डागल्या तर आंत चार  खाश्या स्रीया…शिड्या लावाव्यात तर गारदी गोळीबारास टपलेले..एवढ्यात दादासाहेबांचा जासुद चिठ्ठी घेऊन बाहेर आला.गुंता उकलला.बाहेर काही खटपट न करतां आंत या…

         गोपिकाबाई तिरिमिरित उठल्या. एक धरावं तर दुसरं निसटत होतं.एका एकी वारा थांबला,त्याचबरोबर माज घरांत शांतता पसरली.घरभर विखुरलेली पोथीची पाणं!कमरेतुन जोर गेल्या सारख्या गोपिकाबाई खालीच बसल्या.

          कितीतरी वेळेपासुन रघुनाथराव दिवाणखान्यात गोपिकाबाईंची वाट बघत बसलेले,पण येण्याचे चिन्ह कांही दिसेना. आणि अचानक त्यांच्या छातीत धडधड सुरु झाली,असं का होतेय?आजपर्यंत कुणाचीही भिती वाटली नाही,इतक्या मोहिमा केल्या,अटकेपार झेंडे लावले. लढाईच्या धुमश्चक्रीतही मरणाची भिती वाटली नव्हती.माधवराव? एवढा कर्दन काळ संतापी पेशवा..पण त्यांच्या संतापा ला पुरुन उरलेत,नारायणरावांच्या वधा साठी भरदरबारांत देहान्त प्रायश्चित देऊन घोर अपमान केला तरी डगमगले नाही.पण या गोपिकाबाईचा एवढा कसला धाक?आनंदी तर नेहमी म्हणायच्या,एवढा त्यांचा कशाला धाक बाळगायचा?करुन करुन काय करतील?

           काय करणार हे अनेक वेळा दाखवुन दिले.तसं बघीतलं तर,आलवण नेसलेली,विकोशी म्हातारी,गंगाभागीरथी

नारायणरावांचा खुन झाल्याचं कळल्या वर,थेट पंचवटीत वैराग्याच्या आश्रमात जाऊन,एक करवंटी पैदा करुन दुसर्‍या दिवशी पालखी नाही,सोबत कोणी नाही, नाशिकच्या गल्ली बोळात दारोदारी जाऊन नरोटी पुढे करुन “जोगवा वाढ गो मायss अशी आरोळी देत होत्या.रघुनाथ रावांना बसल्या जागी घाम फुटला.अजुन कसं बोलावणं आलं नाही?

        लोकांच्या ह्रदयात चर्र झालं.फुंकर घालुन घालुन विस्तव फुलवला.लोकांमधे चेतना जागृत झाली.रोज निरनिराळ्या पेठेत,नव्या दारी..नारोटी पुढं धरत “जोगवा वाढ गोss मायेss “दुसरा शब्द नाही,रडणं,भेकणं नाही की, नारायणांचं नांव नाही.जोगवा वाढ गोss मायेss, लोकं शरमत,संतापत होते.स्वतःस षंढ म्हणत होते.गोपिकाबाई हाती नरोटी घेऊन नाशिकक्षेत्री जोगवा मागुन पोट भरतात,ही बातमी आगीसारखी सार्‍या पुण्यांत पसरली.आणि त्यानंतरच “बारभाई” कारस्थान अस्तित्वात आले. कुत्र्यासारखे सारे मागे लागले.सार्‍या जिंदगीची फरफट झाली.काय करुं शकत नाही गोपिकाबाई?

      त्यांना नेहमी शंका असायची, गोपिकाबाईच्या अंगी कांही दैवी शक्ती असावी कां?माधवरावांंनी अपमान, बेअब्रु करुन चांवडसला रवानगी केली. तिथे वाडा,परकोट बांधुन राहुं लागले. तिथे पुत्रप्राप्ती झाली,त्याप्रित्यर्थ चांवडस चे नांव बदलुन आनंदवल्ली ठेवले.परंतु ही खुशी रघुनाथरावांना जास्त दिवस उपभोगतां आली नाही.त्यांच्या हातुन तान्ह बाळ दगडावर पडुन गतप्राण झाला

गोपिकाबाई नेहमी म्हणायच्या माझं कोणी वाईट केलं तर त्याला त्याच्या कर्मा चे फळ भोगावेच लागेल.अजुन निरोप कसा नाही?

      नारायणरावांच्या शरीराचे तुकडे गोळा करुन दहनास नेतांना आणखी तमाशा नको म्हणुन गंगाबाईस सती जाण्यापासुन रोखले.तेवढ्यातच नेमके गंगाबाईस दिवस कसे गेले?आणि मग सारे फासेच पालटले.सवाई माधवरावांचा जन्म झाला नी सार्‍यांना आणखीनच चेव आला. त्यांचा उजवा हात सखाराम बापुही बारभाई कटात सामील झाले.त्यांनी एक एकाला शोधुन हाल हाल करुन मारले.

तेवढ्यात दाराशी हालचाल दिसली…

                  क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
            दि. २८-४-२०२१.

!!!  गोपिकाबाई  !!

भाग  – १४.

          राघोबादादांना नंतर भास होऊ लागले.रात्रीची झोप हराम झाली.शास्री पंडीत,स्मशान बैरागी,शाक्तपंथी,अघोर पंथी सार्‍यांना उपचार विचारुन झाले… सार्‍यांचे एकच उत्तर…नारायणरावांचा अतृप्त आत्मा…मग जो जे सांगेल,ते सर्व उपाय करुन झाले.तावीज,गडेदोरे…पण भास होणे कांही थांबेना!आधी शनिवार वाड्यातच अमावश्या पोर्णिमेला भास व्हायचेत.अखेर बारभाईपुढे हात टेकले. शिंद्यांच्या हाती पडल्यावर रवानगी कोपर गांवी झाली.बारभाईचा ससेमिरा सुटला पण भास कांही सुटला नाही.

        अशातच एका बैराग्याने त्यांना सांगीतले,एक म्हातारी,लाल पेहराव, हातात माळ सुमिरन करत आहे.त्यांच्या लक्षात आले,आणि गोपिकाबाईच्या भेटी चा ध्यास लागला.त्यांची विकल स्थिती पाहुन आनंदीबाईने हरिपंत फडक्यांना बोलावुन,गोपिकाबाईंशी भेट घडवण्याची गळ घातली.राघोबादादांची स्थिती पाहुन हरिपंतांनाही वाईट वाटले व थेट गंगापूरी जाऊन गोपिकाबाईसमोर दाखल झाले. सारी रामकहाणी ऐकुन,गोपिका एकदम उसळुन म्हणाल्या,दादासाहेबांना भेटीचा ध्यास?अनुताप?सारी नाटकं आहेत. माझ्या मनांतील दुःख अजुन निवळले नाही,आम्हाला त्यांची भेट घेणे नाही.

            निराश होऊन हरिपंत जायला वळले तोच गोपिकांना काय वाटले माहीत नाही,त्या म्हणाल्या,हरिपंत!तुमचा शब्द मोडवत नाही.ते एकटेच प्रायश्चित्त घेऊन येत असतील तरच….

कोपरगांवी गोपिकाबाईंचा निरोप पोहोचवल्यावर,दादांना एकदम तरतरी आली.हरिपंतांचे आभार मानत म्हणाले, हरिपंत! एकदा…फक्त एकदाच त्यांची भेट घडवा.मग त्याचे चरण सोडणारच नाही.त्यादिवसां पासुन कोपरगांव ते गंगापूर अशा हरिपंतांच्या वार्‍या सुरु झाल्या.प्रायश्चिताचा मुद्दा समोर आल्या वर,नाशिक,पंचवटी,कोपरगांव,कचरेश्वर येथील ब्राम्हण व मातब्बर काय प्रायश्चित द्यावे यावर खल सुरु झाला.शेवटी वाटणा वाळवंटी पंचक्रोशीतील सार्‍या ब्राम्हणवृंदासमोर प्रायश्चित घेतले.मंत्रो घोष संपल्यावर,जे दादा कधीही कोणासमोर वाकले नाही उलट सर्व त्यांच्यासमोर वाकले त्याच दादासाहेबांनी सार्‍यांना दंडवत घातला.नदीत स्नान केले.कितीतरी दिवसांनी त्यांच्या सार्‍या चित्तवृत्ती उल्हासित झाल्या.अगदी हलके हलके वाटु लागले.दुसर्‍या दिवशी हरिपंत गंगापूरी जाऊन गोपिकाबाईंना प्रायश्चिता ची सांगोपांग हकिकत सांगीतल्यावर त्या म्हणाल्या,फक्त एकटे आणि एकटेच दादासाहेब आले तरच भेट होईल.हा गोपिकांचा निरोप ऐकल्यावर आनंदीबाई फणकारल्याच!पण रघुनाथ ऐकण्याच्या पलिकडे गेलेले.नदीच्या वाळवंटात उघड्यावर सार्‍या जमावासमोर सारे केस काढुन क्षौर केले,शेंडीसुध्दा ठेवली नाही. बारा गांवच्या ब्राम्हणापुढे गुडघे टेकुन नाक घासले,कान पकडले.इतकं सारं केल्यावर गंगापुरी जायचे नाही?बस झाल!इतके दिवस हिचे ऐकल्यामुळेच आमच्यावर ही पाळी आली.सतत गांजीत आली,पुत्र?तोही तसाच निघाला.

        त्यारात्री त्यांना परत ताप आला व भासही झालेत.तशातच आंघोळ केली. आणि कोणासही न सांगता सवरता. तडक गंगापूरची वाट धरली.ज्वराने डोळे लाल झालेले,कितीतरी वेळ ते दिवाण खान्यात वाट पाहत होते.आज कांही झाले तरी भेट झाल्याशिवाय येथुन हलायचे नाही.तोच गोपिकाबाई येतांना बघुन रघुनाथराव ताडकण उठुन उभे राहिले.

         एकेकाळचे धिप्पाड,कर्दनकाळ रघुनाथराव पेशवे वाळुन कोळ झालेले, अंगावर सुरकत्या,कांही दात पडलेले, गोपिकाबाई मात्र तशाच्या तशाच…दादा एकदम त्यांच्या पायावर कोसळले.हातां चा चटका पायाला बसला.दूर सारण्याचा प्रयत्न केला पण क्षमेविना पाय सोडणे नाही.त्या जीवाच्या निकराने दूर लोटत होत्या,पण…त्या किंचित हसुन म्हणाल्या क्षमा? कशाची क्षमा?आतां आठवला धर्म?माधवास अनुष्ठने करुन करुन मारले.नारायणराव काका वाचवाss  म्हणुन टाहो फोडत गळ्यात पडला,पण.. गाईस कापले ब्राम्हणांस कापले,सेवक इतकेच काय स्रीया सुध्दा सोडल्या नाही, तेव्हा कुठे गेला तुमचा धर्म?नारायणाची तर मुंज तुमच्या मांडीवर लागली,त्यामुळे तो तुमचा मुलगाच! आणि तुम्ही?गोहत्या ब्रम्हहत्या,पुत्रहत्या,स्रीहत्या…तेव्हा कुठे गेला तुमचा धर्म?एवढे करुनही समाधान झाले नाही तर,गंगाबाईच्या गर्भावरही वाकडी नजर..तेव्हा कुठे गेला धर्म?

       या अपराधास इहलोकी वा परलोकी क्षमा नाही.अश्वत्थामासारखे क्षमेचे तेल मागत अनंतकाळ पर्यंत भटकत रहा. आम्हास तुमचा पळभरही दुःसह सहवास नको.परत तोंड दाखवायच धाडस करुं नका.गोपिकाबाई दिवाणखान्यातुन कधी निघुन गेल्या व ते कधी पालखीत बसले हे दादांना कळलेच नाही.केव्हातरी पालखी कचेश्वरी परत आली.

             क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
         दि.  २८-४-२०२१.

!!!  गोपिकाबाई  !!!

भाग – १५.

        रघुनाथरावांना धरुन आणुनच मंचकावर निजवावे लागले.आनंदीबाईने  खोदुन खोदुन विचारले,पण शब्द उमटला नाही.वाचा जवळ जवळ बंद.रात्र रात्र टक्क जागे असायचे.भोवती सार्‍या नाटकशाळा,लेकावळे जमा व्हायचे,पण त्यांना कशाचेच भान नव्हते.पुत्र रावबाजी घुटमळायचा पण… आनंदींना दिवस गेल्याचे लज्जेमुळे इतके दिवस सांगीतले नव्हते,तेही सांगीतले पण… बसल्याजागी थोडी फार झोप घ्यायचे, खाणे तर जवळपास बंदच!एवढा धिप्पाड देह,वाळुन हाडांचा नुसता सापळा राहिला.आढ्याकडे टक्क बघत राहायचे.आनंदीबाई दीर्घद्वेषी गोपिका बाईंच्या नांवाने खडे फोडीत असत.

        मार्गशीर्ष वद्य तृतीया,सन १७८३ गुरुवारी रात्री,गोपिकाबाईची क्षमा न मिळताच दादासाहेबांचा बसल्या जागीच तोंडातुन प्राण गेला.आनंदीबाईंनी त्यांचे तोंड मिटवण्याचा प्रयत्न केला,पण व्यर्थ!

एवढा भव्य वाडा,भक्कम परकोट,दादा साहेबांनी हौसेने सजवलेली दालने,मोठी ग्रंथसंपदा,गालिचे,लाकडी सामान,पुढे सर्व वाडा उध्वस्त झाला.जमीनीचा लिलाव झाल्यावर ज्यांनी विकत घेतला त्यांचेही भले झाले नाही.

            १७८८ साल,फाल्गुन मासात नाना फडणीस १४ वर्षाच्या सवाई माधव रावास घेऊन गंगापूरीकडे निघाले.खाश्यां च्या पालख्यांमागे वीस पालख्या,तीन हजार घोडे,२५ हत्ती,७५ उंट,१०० बैल गाड्या,एक तोफ असा सारा लवाजमा गंगापूरी वाड्यासमोर पोहोचल्याबरोबर सलामीची तोफ वाजली.श्रीमंत सवाई माधवराव पेशवे उतरल्यावर त्यांच्या पायावर गंगाजलाच्या घागरी पायावर ओतल्या गेल्या.सुवासिनींनी औक्षण केले आणि श्रीमंताना घेऊन कारभारी दिवाण खान्याकडे वळले.त्यांची योग्य सरबराई झाल्यावर,गोपिकाबाईंचा निरोप आला की,उदईक देवपुजेनंतर भेट होईल.

        श्रीमंत सवाई माधवराव मोठ्या उत्सुकतेने,ऊत्कंठेने एवढा दूरचा प्रवास करुन आल्यावर त्यांच्या सार्‍या अपेक्षां वर गोपिकांबाईंनी पाणी फेरले.त्यांना वाटले,आपण आल्याबरोबर जवळ घेईल मायेने पाठीवरुन,तोंडावरुन हात फिरवेल

आपल्याला सोबत घेऊन थाळ्याला बसतील पण…

          जेवणाची वर्दी आल्यावर त्यांना भूकेची तिव्र जाणीव झाली.चार सालां मागे आजीसाहेबांच्या स्वयंपाकाची चव चाखली होती,ती अजुनही तोंडात घोळतेय!सकाळी काकडआरतीच्या सुरांनी जाग आल्यावर,सवाई माधवराव नाना फडणवीस आणि हरिपंत फडके तयार  होऊन दिवाणखान्यांत दाखल झाले.सारवलेल्या जमीनीवर शुभ्र बैठक.

आणि भिंतीवर सर्वत्र महाभारताच्या युध्दप्रसंगाच्या भव्य तस्बीरी,प्रतिज्ञा मोडुन हाती शस्र उगारलेला श्रीकृष्ण, चक्रव्युहात एकटा लढणारा अभिमन्यु, घटोत्कचाचा पराक्रम,द्रोणवध,कर्णवध, अर्जुनाला गीता सांगणारा श्रीकृष्ण सारा दिवाणखाना  महाभारतमय वाटत होता. सवाई माधवराव या सार्‍या तस्बीरी बघत होते,जे समजले नाही ते हरिपंत समजावुन सांगत होते.एवढा वेळ झाला तरी आतुन भेटण्याचा निरोप नाहीच. नानांच्या कपाळावर सुक्ष्म आठी चढली. श्रीमंतांनी पाठवलेल्या निरोपाला उत्तर आले,अजुन पुजापाठ संपायला अवधी आहे.थोडी वाट पहावी.तकलीफ सहन करावी.बराच वेळ गेल्यावर माधवरांवाची सुरु असलेली चुळबुळ पाहुन नाना म्हणाले,असले चाळे इथे चालणार नाही. चारचौघांत बसल्यावर आपल्या मानाने रहावे.तसाही आमचा मान आहेच ना? आम्ही पेशवे ना?तेवढ्यात आंत बोलवणे आले.नाना काळजी करुं नका.आम्हाला सारं माहित आहे.शिवाय त्या आमच्या आजीसाहेबच ना?

         श्रीमंत सवाई माधवराव,हरिपंत व नाना फडणवीस सारी जणं ओसरी, मधला चौक ओलांडुन अंधार्‍या माज घरांत प्रवेशले.प्रशस्त पाटावर लाल आलवणीतील गोपिकाबाई बसल्या होत्या.समोर चौरंगावर रेशमी वस्रात बांधलेली पोथी,त्यावर जपमाळ! या श्रीमंत! किती वर्षांनी दर्शन… सवाई माधवरावांनी पुढे होऊन वाकुन नमस्कार केला.औक्षवंत व्हा!आजीसाहेब ही पोथी कसली?पोथी नाही ही.महाभारत आख्याण आहे.मग त्यात द्रोणवध,कर्ण वध,अभिमन्युवध सारचं असेल ना? श्रीमंत आज सकाळी कसरत झाली कां?

मधेच बोलणार्‍या नानास थांबवत त्या म्हणाल्या,श्रीमंतांना सांगु द्या.श्रीमंत काय आहे तुमच्या हातात?उत्साहाने म्हणाले, गीता..तुमच्यासाठी तस्बीरीसहित मुद्दाम लिहुन घेतली.नाना आम्ही समाधानी  आहोत.तुम्ही श्रीमंतांची व शिक्षणाची व्यवस्थित बडदास्त राखली.आळस तेवढा सोडायला हवा.श्रीमंत नाना तुम्हास वडीलांठायी,नाना आहेत म्हणुन तुम्ही आहांत आणि तुम्ही आहांत म्हणुन दौलत आहे हे कधीच विसरुं नका.

                क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
            दि.  २८-४-२०२१.

!!!  गोपिकाबाई  !!!

भाग  – १६.

          भाबडेपणे माधवराव म्हणाले, आजीसाहेब! आमचं कांही चुकले का.? नाही,आमचेच चुकले.तेवढ्यात नास्ता आला,सर्व विसरुन नास्त्यावर ते तुटुन पडले.एकाएका पदार्थाची स्तुती करत म्हणाले,आजीसाहेब!आपल्या हातची चवच न्यारी.आजीसाहेब! आपण घ्याना नास्ता आमच्यासवें,कालही आमच्यासवे थाळा घेतला नव्हता.माधवा!आमचे गोड खाणे केव्हाच सुटले.जाऊ द्या.

         नाना! लाल सोटच्या लढाईचे काय  झाले?पाटीलबाबांचा हाडवैरी मुहम्मद बेग हमदानी मारल्या गेला.महादजींनी वेळीच माघार घेतल्यामुळे लालसोटला दुसरे पानिपत घडण्याचे टळले.पुनः पानिपत न व्हावे म्हणुन अलि बहादूर आणि तुकोजी होळकरांस पाटीलबाबांच्या पाठी ऊभे केले.माधवराव ऐकत होते,पण पायांची बोटे एका लयीत हलत होती.गोपिकाबाई नी चर्चा थांबवुन एकदम उठुन झपाट्याने आंत निघुन गेल्या.त्या गेल्या नी इतका वेळ गुदमरलेला माधवरावांचा श्वास मोकळा झाला.एकाएकी लावणीची ललकारी त्यांच्या तोंडुन बाहेर पडली. नानांनी तिव्र नापंसती दाखवत म्हणाले, श्रीमंत उठा!मुलाखत संपली.

       गंगापूरला येऊन चार दिवस उलटले तरी,गोपिकाबाईंनी नातास पुन्हा दर्शन दिले नाही की,मुलाखतीस बोलावले नाही.नाना मोठे पेचात,जाण्याची आज्ञा नसल्यामुळे निघताही येत नव्हते.पुण्यात दौलतीची सारी कामे खोळंबलेली.फडा ची कामे तुंबलेली.बर स्वतःहुन निघायची परवाणगी विचारायची पध्दत शनिवार वाड्यात व इथेही नाही.दोन्हीकडे ही पध्दत गोपिकाबाईंनीच घालुन दिलेली. अतिथी आपल्या पायाने येणार व जाणार यजमानाच्या मनाने हा दंडक!रोज निरोपाच्या मुलाखतीची वाट पाहणे, नुसती तगमग….तगमग,तोंड दाबुन बुक्क्याचा मार!या बाईची अर्धी हाडं स्मशानात पोहोचली,आलवण नेसली, पण दुसर्‍यास टांचेखाली दाबुन ठेवण्या ची हौस भागली नाही.नानांच्या जीवाचा नुसता संताप संताप,त्यात माधवराव सतत त्यांच्या मागे मागे त्यालाही नाना कंटाळले होते.

       आणि पांचव्या दिवशी नाना फडणवीस व हरीपंत फडकेसह तिसर्‍या प्रहरी येतो एवढा निरोप ठेवुन पहाटेच कुणालाही न सांगतां त्रिम्बकेश्वरी निघुन गेले.दुसर्‍या दिवशी माधवास जरा उशीरा जाग आली.नाना त्रिम्बकेश्वरी गेल्याचे कळल्यावर त्यांना एकदम अस्वस्थ वाटु लागले.आन्हीकं आटोपुन इकडे तिकडे बावरल्यासारखे भटकत दिवाणखान्यात येऊन तस्बीरी न्याहाळत असतांनाच गोपिकाबाई हातात प्रसादाचे चांदीचे तबक घेऊन उभ्या असलेल्या दिसल्या.

पुढे होऊन तबकातील जपमाळ माधव रावांच्या गळ्यात घातली.ही तुमच्या आजोबांची जपमाळ आजपासुन तुमची, तुमचे रक्षण करेल.आज संकष्टी..प्रसाद घ्या.

          आजीसाहेब!नाना आम्हास टाकुन न सांगता त्रिम्बकेश्वरी कसे काय गेलेत?श्रीमंत! नानांच्या संगती तुम्ही नाही तर तुमच्या संगे नाना..समजले? आमची जागा अंधार्‍या माजघरांत, देव घरांत!पुन्हा संधी मिळेल न मिळेल… म्हणजे? अजुन डोक्यात प्रकाश पडला नाही?तो लबाड कोल्हा तुमचे राज्य तोंंडी धरुन चालला आणि तुम्ही त्याची पाठ सोडत नाही.मग परवाच्या बैठकीत त्यांची तोंड फाटेस्तोवर स्तुती केली ते? आम्हास संशय,आज ते न सांगता त्रिम्बकेश्वरी पळाले.आम्ही तुम्हास एकांती काय सांगणार,हे त्यांना पक्के ठाऊक,त्यामुळे….

    तुम्ही पेशवे!दौलतीचे स्वामी.सिंह असुन कोल्ह्यास भिणे कशापायी?काय सांगावे? गुरुची विद्या गुरुलाच परत करणे चालु आहे.म्हणजे?आम्ही आतां पर्यंत खुप पाहिले,जुने डोळे! पेशवांनी छत्रपतींंना नामधारी केले.आतां कालचे कारभारी,पेशव्यांना नामधारी करुन दौलत बळकवणार? ह्यांना कारभारी केले कुणी?वेळेनुसार पवित्र घ्यावा लागला.तुमचे तिर्थरुप तुमच्याच सारखे भोळे होते.तो सखाराम बापु बोकील सारा कारभार बळकावुन बसला.अरे! तुम्हास कांहीच कसं कळत नाही?बापू देशस्थ,दादासाहेबांची तळी उचलणारे, त्यांनीच तर तुमच्या पित्यास गिळले. बापूं च्या नांवे बोटे मोडुन झाली,आतां दादांची पाळी.

           माधवा!आमचे काय उरले आतां पैलतीरी डोळे लागले,पण तुमच्यासाठी जीव तुटतो.आपणां दोघांस एकमेकां शिवाय दुसरे कोण आहे?म्हणुन कां तिसर्‍याचा दुस्वास? अरे,या कोल्ह्यानेच तर सखारामबापूचा घात केला.दादांची एवढी मोठी ग्रथसंपदा तीही गिळली नी आतां सारी दौलत गिळणार

                क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
            दि.  २९-४-२०२१.

गोपिकाबाई चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading