
१७२९ सालच्या दिवाळी सणाला शाहुमहाराज फराळासाठी भिकाजी रास्ते सावकारांकडे आले असतां,त्यांना घार्या डोळ्याची ५-६ वर्षाची चुणचुणीत मुलीला पाहुन,छत्रपती शाहु महाराजांनी स्वतः पुढाकार घेऊन,नानासाहेब पेशवेसाठी मागणी घातली……………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! गोपिकाबाई !!!
भाग – ५.
हा एवढा भिषण संहार ऐकुन नाना साहेबांच्या जीवाची नुसती तगमग झाली माझी माणसं दोन महिने भुकेने तडफडत होते आणि मी? त्यावेळी बोहोल्यावर चढत होतो मुंडावळ्या बांधुन….माझा लाडका पुत्र विश्वासराव पडला त्यावेळी मी काय करीत होतो तर नव्या बायकोचा विचार!एका मागोमाग एक उमास आतडी पिळवटुन टाकत होते.माझी माणसं भीक मागत उघडी बोडकी.. बायका पळवल्या जात होत्या,आणि मी? नव्या बायकोशी…नव्या बायकोशी..सारं शरीर लटपट कापू लागलं.भाऊsss म्हणुन नानांनी मोठ्याने हंबरडा फोडला. सूड घेईन…मी सूड घेईन.सार्या सार्यांचा सूड घेईन…सूड घेईन…
अब्दालीवर जाऊन कोसळण्याचा निश्चय दिवसेंदिवस दृढ होत होता.पुत्र गेल्याचं दुःख गोपिकाबाईनाही झाले होते पण त्यांनी स्वतःला सावरले.
पार्वतीबाई आल्या.नाना पुरंदरे, विठ्ठल शिवदेव विंचुरकर,नारो शंकर व शेवटी मल्हारराव होळकर आले.सर्वांनी नानासाहेबांना आवरायचा खुप प्रयत्न केला.अब्दालीचा सूड घेण्याचा हा वखत नाही,एवढं वाक्य मल्हाररावांच्या तोंडुन निघाले मात्र,नानासाहेब वयोवृध्द मल्हारराबांवर डोळे फिरवत,दात ओठ खात एकदम कडाडले.माझ्या भाऊला गिलच्यांत एकटं टाकुन पळुन आलात आणि ढसा ढसा रडत मल्हाररावांच्या गळ्यात पडत म्हणाले,मज वेड्याचे बोल मनास न लावणे.नानासाहेबांना थोपटत मल्हारबा म्हणाले आवरा स्वतःला!कसं आवरु? माझा तहानलेला,भूकेला कुठे भटकत असशील रे भाऊ?अरे विश्वास?दौलतीचा सूर्य गेला म्हणुन कां तूं तोंड लपवुन बसलास?कुरुक्षेत्रावर लाख बांगडी फुटली.माझी करणी,सजा मात्र तुला भोगावी लागली.कधी तूं तोंडातुन ब्र काढला नाहीस,आणि मी तुझा संशय घेतला,नी तूं सारं विष पचवलस!अब्दालीचा सूड घेण्यास संगे नाहीच कुणी आलं तर मी एकटाच जाईन.नाना हमसुन हमसुन रडत होते.जवळ जायची कोणाचीच हिम्मत होत नव्हती.गोपिका बाईशी तर बोलनेच टाकले होते.त्याही आपली अब्रु राखुन होत्या.
मल्हाररावांना दिल्लीकडे कुच करण्याची आज्ञा दिली.त्या रात्री गोपिका नानांच्या मंचकाजवळ जाऊन म्हणाल्या! किती दिवस अश्रू ढाळणार?जे घडले ते परत तर नाही ना येणार?नानासाहेब ताडकण म्हणाले,तुझ्या..तुझ्यामुळे.. त्यांच्या तोंडुन शब्द फुटेना.तुलाच जन्माची खाय..खाय..तुझ्यामुळेच माझा विश्वास गेला,भाऊ नाहीसा झाला. पानिपत घडल ते केवळ तुझ्यामुळे.. गोपिकाबाईचा स्फोट झाला.कशासाठी? काय बोलण्यासाठी आल्या?सारे सारे विसरल्या,आवाजावर नियंत्रण ठेवीत म्हणाल्या,हे जे घडल ते माझ्यामुळे नाही
तर तुमच्या भाऊच्या हेकेखोरपणामुळे..
गोविंदपंत बुंदेले कामी आले,रसद तुटली तेव्हापासुन फौज उपाशी, १-१॥ महिना लोटला तरी भाऊ तळ देऊन स्वस्थ…
बळवंतरावांची फूस…ना चढाई,ना माघार,जुन्या जाणत्यांनी दिलेला मशविरा ऐकला नाही.
नानासाहेब एकदम उसळुन म्हणाले जुन्या मातब्बरांचे काय सांगतेस?त्यांना सुलुख घडवुन आणुन भाऊस दक्षिणेस रवाना केले की,उत्तर हिंदुस्थान यांच्या साठी निष्कंटक!पण त्यांच्या हेक्याने तरी काय मिळवले?सारी बरबादी…वरकड सरदारासारखे फळी तोडुन घुसले,सोबत विश्वासरावांनाही…
विश्वासरावांचे नांव निघाले नी नानांच्या छातीत कळ उठली.त्या पुढे बोलतच राहील्या..एवढे झाल्यावरही तुकोजीने माघार घेण्यास सांगीतल्यावर, पुण्यास तोंड कसे दावु म्हणुन स्वतःला झोकुन दिले.आपले तोंड वाचवले मात्र सार्यांच्या तोंडास काळे लागले.गोपिका बाईने आज बोलण्याचा ताळतंत्रच सोडला होता…तुम्ही तरी काय केले? तुम्हीही मात्रागमनी…मस्तानीवर नजर वाकडी करण्यास कमी केले नाही. सुखाने जगु दिले नाही,निदान सुखाने मरो तरी द्यावे.त्यादिवसांपासुन गोपिकांचे डोळ्यातील पाणी आटले ते कायमचेच..
दुसरे दिवशी मल्हारबा,नाना पुरंदरे, विठ्ठल शिवदेव,नारो शंकर सार्यांना बोलावुन म्हणाले,भाऊशिवाय दौलत करणे नाही.सुभेदार आमची पुण्यास जाण्याची व्यवस्था करा.सारा काफिला पुण्याकडे रवाना झाला.पुण्याची हवा लागली अन् श्रीमंतांना तरतरी आली.
दुसर्या दिवशी कसबाच्या गणपतीचे दर्शन घेतले.पण ही तरतरी जास्त दिवस टिकली नाही.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २६-४-२०२१.
!!! गोपिकाबाई !!
भाग – ६.
नानासाहेबांची आधीच तोळामासा असलेली तब्बेत,या सर्व मनस्ताने आणखीनच बिघडली.त्यांना भ्रम झाला. कांहीही बडबडु लागले.भ्रम म्हणावा तर ते सार्यांना ओळखत.मधेच जर मर्जी खपा झाली की,समोरच्याला उभे राहणे मुश्कील.पण पुरुषोत्तम दाजीस मात्र सर्व माफ.शुक्रवारी पर्वतीस गेले.तिथेच ढाळ होऊन घाबरे झाले.तोंडात फक्त भाऊंचे नांव.. २-४ दिवस ढाळ सुरु असल्याने ते अगदी क्षीण झाले,पण जिभेची ताकद मात्र कायम!लोकांना शिवीगाळ,मधेच भाऊ भाऊ म्हणुन उर फुटेस्तो हाका देणे
गोपिकाबाई समोर आल्या की,त्यांच्या कडे दुर्लक्ष करणे.अखेर शोभा नको म्हणुन त्यांनी समोर येणेच सोडुन दिले. कारभार विपरीत होऊं लागला.
पुत्र माधवराव,बंधु रघुनाथराव, कारभारी सखाराम भगवंत व निलकंठ महादेव पुरंदरे यांना बोलावुन राज्य राखा असे सांगुन नानासाहेब पर्वतीस निघुन गेले.१७६१ साल जेष्ठ वद्य षष्ठीला नाना अत्यवस्थ झाले.माधवराव मांडी देण्यास पुढे झाले तर मानेने नाही म्हणुन रघुनाथ रावास खुण केल्यामुळे त्यांनी मांडी दिली. गोपिकाबाई व नाटकशाळा पलिकडच्या दालनात होत्या.मंगळवारी रात्री त्यांचे देहावसन झाले.
दुसरे दिवशी संपूर्ण राजमंडळ,अष्ट प्रधान,सरकारकुन,मुत्सद्दी,सरदार, वरकड लोकं आणि सारे गणगोत जमा झाले,त्यात नवी नवरी राधाबाईच्या आईही होत्या.सार्या गंगाभागीरथीच्या घोळक्यापुढे,आईला बिलगलेल्या नऊ वर्षाच्या राधाबाईस ओढुन नाव्ह्यापुढे बसवले.ब्राम्हणांनी गंगोदकाच्या मंत्रोचा रात नाव्ह्याने काम सुरु केले.गंगाविधी पार पडल्यावर मोर्चा गोपिकाबाईकडे वळला.दोघींच्या केसांचा ढीग नानासाहेबांच्या पायाशी ठेवला.श्रीराम जय राम जयजयरामच्या गजरात महा यात्रा सुरु झाली.नडगेमोडिस लकडी पुलाचे दक्षिणेस माधवरावांनी अग्नी दिला.नंतर सर्व क्रीयाकर्मे झालीत.१०व्या दिवशी पिंडास कावळा शिवेना. सर्वांनी आपापल्या परीने आश्वासने दिली पण कावळा शिवेना.मध्यान्ह उलटुन गेले सर्व उपाशी,शेवटी दर्भाचा कावळा करण्याचे ठरविले,पण हट्टी माधवराव पिंडास कावळा शिवल्याशिवाय मुखात पाणीही घ्यायला तयार नव्हते.सर्वजणं त्यांंना समजावुन थकले.तिसरा प्रहर उलटला.सूर्य अस्तास गेल्यावर क्रीयाकर्म कसे करावे,सर्व जण या चिंतेत!आणि माधवरावांची भेदक नजर पिंडावर!अखेर गोपिकाबाईने माधवरावास बोलावुन घेतले.ते परत आले,हाती अर्ध्य घेऊन म्हणाले,राजमान्य राजश्री कै.छत्र पती शाहु महाराजांच्या छत्रीच्या ठीकाणी सतीवृदांवन बांधुन रोजच्या नैवद्याची, सांजवातीची तहहयात सोय करेन व पुढचे वंशजसुध्दा करतील असे म्हणुन उदक सोडले.निमिषार्धात कावळे पिडी वर तुटुन पडले.
गोपिकाबाईस दौलतीचा कारभार स्वतः चालवण्याची भारी हौस! नाना साहेब असतांना जमले नव्हते.फक्त सल्लामशवरा घ्यायचे तेवढच!नाना गेले आतां अडवायला कुणी नाही.आतां आपण मनसोक्त कारभार चालवुन दाखवू.आपल्या हाती कारभार असतां तर पानिपत घडलेच नसते,असे त्यांना राहुन राहून वाटायचे.गोपिकाबाईंना सार्या हिंदुस्थानितील राजसत्तांची खडा न् खडा माहीती होती,इतकी की कोणत्या सरदाराच्या फडावर कोण कामाचा कारकुन आहे,फडणीस कोण?कारभारी कसा?जामदार उजवा की, पोतनीस डोई जड?सरदारांची पकड कैसी?प्रत्येकाच्या पायी काय जळते?कोणाची वयं काय? कोणास कशाची हाव?कसली व्यसने? कोणास किती दाबात ठेवावे?कोणाकडे किती हत्ती,घोडे,उंट,पायदळ,तोफा,जंबुरे जेजाला,हस्तनाला,सुतरनाला,गारभांडी? फौजेतील मात्तबर आसामी कोण?चौथाईच्या इनामप्रमाण किती खोल?कोणाच्या दौलतीचा महसूल किती? चौथाईच्या हक्काची भांडणे कोणात? कोणत्या दौलतीचा कोण दत्तकपुत्र? कोणत्या घराण्यांतुन दत्तक आला?जनक घराण्याची वर्मे कोणती?कोण दासीपुत्र?त्याच्या आईची चालचलन कशी?कोणती माहिती नव्हती?अशा माहितगारबाईस राज्यकारभार चालवावा वाटण्यास वावगे नव्हते.त्यात त्या स्वतः अतिशय महत्वाकांक्षी.मुलाच्या सहाय्याने स्वहाती राज्य कारभार करणेची आकांक्षा बाळगली तर कुठे चुकले?
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २६-४-२०२१.
!!! गोपिकाबाई !!!
भाग – ७.
गोपिकाबाईंच्या तालिमीत तयार झालेल्या मातृभक्त माधवरावांना पेशवाई ची वस्रे मिळाली.ती मिळणारच होती. दूरदर्शी नानासाहेबांनी व्यवस्थाच तशी चोख,चिरेबंद करुन ठेवली होती.प्रत्यक्ष छत्रपती शाहुमहाराजानीच स्वहस्ते लिहुन दिलेले,”वंश होईल तो तुमचे प्रधानपद चालवील,करील अंतर तर शपथ असे” या व्यवस्थेचा एक चिरा स्वतः गोपिकाबाईंनी रचलेला.सातारा मुक्कामी ८६ वर्षीय ताराबाईंना नाना साहेबांची निधन वार्ता कळल्यावर काय म्हणावे?माझा सूड म्या उगवला,आतां सुखाने मरण्यास मोकळी..असे जरी असले तरी,निमुटपणे पेशवाईची वस्रे माधवरावांस दिले.सहजासहजी थोडेच दिले?गोपिकाबाई मध्ये नसत्या तर?
माधवरावांना सर्वतोपरी पारंगत करण्यात गोपिकांनी बर्याच खस्ता खाल्ल्या.हे विसरेल माधवराव?अवघे १६ वर्षाचे माधवराव वाडवडीलांच्या कृपेने मसनदीवर बसले.गोपिकाबाई आई होत्या त्यांच्या.जडणघडणीत त्यांचा फार मोठा वाटा होता.आईच्या हस्तक्षेपास माधवराव थोडेच आक्षेप घेतील,असे वाटणे कांही गैर नव्हते.
परंतु हे रसायण कांही वेगळेच होते ही गोष्ट गोपिकाबाईंना फार उशीरा कळली.माधवरावांच्या हाती कारभार येऊन दोन वर्षे उलटुन गेली या दोन वर्षात पानिपतच्या दणका बसलेल्या मराठी दौलतीस गिळण्यास कोणी काय कमी प्रयत्न केले.निजाम,हैदर हे परके कमी झाले की काय,म्हणुन सख्खे चुलते रघुनाथराव बंड करुन उठले.तरी या सर्वांना माधवराव पुरुन उरले.पावलो पावली गोपिकाबाईंनी दिलेला सल्ला, मशविरा दिला आणि माधवरावांनीही तो ऐकुन घेतला,मानला,पण एककल्ली माधवरावांनी जे ऐकायचं तेवढच ऐकलं बाकी स्वतःच्या मनानेच करतात ही गोष्ट गोपिकांना कळली तेव्हा फार उशीर झाला होता.
मोहिमेसाठी माधवराव पुण्याबाहेर आहे ही संधी साधुन,निजाम पुण्यावर चालुन आला.लूटालूट व जाळपोळीचा कहर झाला.पुण्यातील वाडे लुटण्यास, आपले वाडे वाचवण्यासाठी,कांही मातब्बर पुढे होऊन निजामाला गुपचुप माहिती पुरवली,त्यात गोपीकांचे बंधु रास्तेही होते.पुणे लुटुन निजाम निघुन गेला आणि मोहिम फत्ते करुन माधवराव परतले.निजामाने लूट करण्यांत आपली च माणसं सामिल असल्याचे कळल्यावर माधवरावांचा संताप पराकोटीला पोहचला.गोपिकांनाही खुप वाईट वाटले.
माधवरावांनी सर्व फितुरांसोबत रास्तेना ही दंड ठोठावला,आणि गोपिकाबाई खडबडुन जाग्या झाल्या.
रास्त्यांची बेअब्रु?यावेळी माधवरावास त्यांच्या सल्ल्याची गरज नाही कां वाटली?त्यांना अतिशय संताप आला,अपमानित वाटले,पण आपलाच पुत्र!अजुन लहान व तरुण ऊसळतं रक्त आहे.नात्याची मर्यादा जरी तो विसरला असला तरी,समजावून सांगायचे आपले काम.कधी तो शब्दाबाहेर गेला?असा विचार करुन त्यांनी माधवरावांना तातडीने बोलावणे पाठवले.क्षणाचाही विलंब न लावतां हातातील कामे टाकुन, नेहमीसारखे आईसमोर हजर झाले. थोड्या अधिकार वाणीने,थोडे कानउघड णीच्या अविर्भावात,तर कांही जखमी स्वरांत म्हणाल्या,माधवा! आपली मांडी आपणच उघडी करुन दाखऊ नये.रास्ते तुमचे मामा आहेत.त्यांच्यावरचा दंड मागे घ्या.कदापी नाही.आई! मामा म्हणुनच त्यांची जबाबदारी मोठी होती हे ते विसरलेत.मामा आहेत ते घरी.घरी दहा वेळा त्यांचे पाय धरुन नाक घासु,परंतु एकदा मसनदीवर बसलो की,आम्ही केवळ त्या गजाननाचे!मग तिथे नाती गोती कांही नाही.सर्वासाठी नियम सारखाच!
गोपिकाबाई मुलाकडे बघतच राहिल्या.हा माझा मुलगा?असा केव्हा झाला?त्यांना सदाशिवभाऊ व चिमाजी आप्पांची आठवण झाली.तेही असेच बोलत असत.म्हणजे शेवटी रक्त रक्ता कडेच गेले.बीज घरगंगेच्या प्रवाहात वाहत वाहत रक्तात मिसळले आणि दत्त म्हणुन समोर उभे राहिले.कोणाच्या रुपात? तर आपल्याच मुलाच्या?
आणि गोपिकाबाईंना शंका आली. शिंदे होळकरांसारखा डोईजड सरदारांवर धाक बसवण्यासाठी रास्त्यांचा बळीचा बकरा केला गेला.हा राजकारणी डाव माधवरावाने टाकला.परंतु हा दंड वास्तविक रास्तेमामांना नव्हताच,तो इशारा गोपिकाबाईंना होता.दौलतीच्या राजकारणांत त्यांची लुडबुड,सल्ला मशवरा नकोय.हे नानासाहेबांचे रक्त बोलतेय आणि आम्ही कोण? हेच ना?
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २६-४-२०२१.
!!! गोपकाबाई !!!
भाग – ८.
गोपिकाबाईंना ताराबाई व्हायचे नव्हते.दरबारी देशस्थ-कोकणस्थ तेढ!
काका-पुतण्याचा बेबनाव!गोपिकाबाईंना भरुन आले,घशात आवंढा दाटुन आला. त्यांना समजुन चुकले,या जन्मी आपल्या दैवी राज्यकारभार नाही.क्षणभर अगदी क्षणभरच त्या हताश झाल्या.हट्टी मन उफाळून आले.जीथे शब्दाला मान नाही तीथे पाणी सुध्दा वर्ज्य!ठरले.त्याच दिवशी त्या नाशकास चालत्या झाल्या पुन्हा पुण्यास परत कधीही न येण्यासाठी माधवरावांनी त्यांना जाण्यापासुन परावृतत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण दोघेही आपल्या हेक्यावर ठाम रास्तेमामा केवळ निमित्य!त्या एवढ्या तणतणत गेल्यावरही माधवरावांचा पत्र व्यवहार मात्र अखंड सुरुच होता,याचा अर्थ मात्र कांही लोकांना कळला नाही.
राजकारभारात बायकांची लुडबुड माधवरावास पसंत नाही ही गोष्ट जग जाहीर!पत्नी रमाबाईंना तर आवडही नव्हती व तेवढा त्यांचा आवाकाही नव्हता.दौलतीचे हीत लक्षात घेता,मिरजे चे ठाणे,वास्तविक रमाबाईच्या वडीलां कडे होते ते काढुन दिले.पण रमाबाईना विचारले नाही की, एका शब्दाने सांगीतले नाही,तरीसुध्दा रमाने कांहीही प्रतिक्रीया व्यक्त केली नाही.राक्षसभूवना च्या प्रचंड विजयाचे साद्यंत हकिकतीचे पत्र गंगापूरी पाठवुन गोपिकाबाईचा कल जाणण्याचा प्रयत्न केला.त्यांना माहित होते,गोपिकाबाईंच्या गाठी तीन पिढ्यांचा अनुभव,शिवाय सर्वीकडची माहिती त्यांना असल्यामुळे,हे सारे जाणुन दौलती च्या फायद्यासाठी हा पत्रव्यवहार की खरी गोम वेगळीच! कितपत ताणावे,कुठे ढीले सोडावे हे माधवराव चांगले जाणुन होते.मातोश्रीस खलिते लिहुन दूरुनच खावंद खावंद करावे,मात्र पुण्यातील राज कारणांत आपल्याच मनाने वागावे.
गोपिकाबाईंचे काय?पुण्याहुन सारे सोडुन गंगापूरी आल्यावरही त्या सल्ला कां देत राहिल्या?माधवरावांचा कावा त्यांच्यासारख्या धोरणी बाईच्या लक्षात आला नसेल का?कां पुत्रस्नेहाने? की,तेवढीच आपली पकड,दरारा राजकारणावर राहावा म्हणुन?माधवराव रघुनाथरावांचे विकोपाला गेलेले वाद? कोण गादीचा वारस?कोण सिंहासनाचा अधिकारी?या मिसरुड न फुटलेल्या कालच्या पोरास मी?मी मुजरा करु? अटकेपार भगवा फडकावला,त्याचे काय पेशवांची मनसद म्हणजे अखेरीस काय? छत्रपतींची चाकरीच ना?त्या चाकरीवर थोरल्याचाच अधिकार असावा ना?की, मरणासन्न छत्रपतींकडुन जबरदस्ती बाईलबुध्दी वापरुन पदरी पाडुन घेतले म्हणुन त्याचा हक्क? मग मी ही बाजीरावांचा पुत्र,मला पेशवाई कां नको?
दुर्योधनाच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष दिले नाही आणि महाभारत घडले,दादांचेही असेच कांहीसे नाही कां झाले?दादांनी दौलतीत वाटा मागीतल्यावर,माधवराव उत्तरले,राज्य कुणाचे?आम्ही वाटणार कोण?आपसांत भांडुन दौलत बुडवली असा कलंक लागण्यापेक्षा तुम्हीच सर्व सांभाळा…आम्हास बारगीर म्हणुन तुमच्या पायाशी जागा द्या..
माधवरावांच्या या बोलण्यात दादांना त्यांचा कावेबाजपणा दिसला.वंश परंपरेने सत्ताधिशाच्या वडीलपुत्राकडेच सत्ता जाते,लोक दादांच्यापाठी कधीच उभी राहणार नाही हे चाणाक्ष माधवरावां नी ओळखुन,मानभावीपणे पेशवाईवर अर्ध्य सोडण्याची तयारी दाखवली. दौलतीचा मोह नाही म्हणतो तर,अर्धी दौलत कां देत नाही?वाटा मागीतला तर, ही दौलत छत्रपतींची!एरवी कोण छत्रपती?देव्हार्यातील देव,त्यास नैवद्य दाखवणे!खाणे मात्र आपण ही सारी शिकवण त्याच्या मातोश्रींची..माजघरांती ल डावपेच!अशा उलट सुलट विचारांनी मग माधवरावांस जेवढा त्रास देता येईल तेवढा दादासाहेबांनी दिला.
आयुष्यभर माधवास हा घरगुंता सुटला नाही.अखेर दादांना नजरकैदेत ठेवावे लागले.प्रत्यक्ष सख्ख्या काकास नजरकैद?आपल्यात आणि मोगलांत फरक तो काय?त्यानंतर मात्र माधवास कधीच शांत झोप,किंवा स्वस्थता लाभली नाही.
आणि बंदीवासात असलेल्या रघुनाथरावांनी हर प्रकारचे अनुष्ठान सुरु केले.होम हवन,उग्र सूर्योपसना,यंत्रोपस ना,प्रत्यक्ष काकाने आपल्या विनाशसाठी मरण्यासाठी अनुष्ठाने करावी?याचे त्यांना अत्यंत वैषम्य वाटले,आणि हे विष कणा कणाने अंगात मुरत गेले.माधवरावांना रात्र रात्र झोप येत नव्हती,नुसते तळमळत टक्क जागे असायचे.पानिपत चे अपयश धुवुन काढले,जग जिंकले,पण घर जिंकता नाही आले माधवरावांना…
त्यावेळी गंगापूरी गोपिकाबाई,पुजा अर्चा,पुराणश्रवण,पोथीवाचन,भजन किर्तन!जपजाप्य,एकादश्या,संकष्ट्या यांत मग्न होत्या.स्वजनविनाशापायी अर्जुन तळमळला तर,श्रीकृष्ण त्याचेमागे गीतेच्या रुपात उभा राहीला. “नैवं पापं अवाप्स्यासि” असे कृष्णाने ठासुन सांगतले,पण घरगुंत्यात तिळातिळाने रुतलेले माधवराव?त्यांचे पाठी आपण उभे राहावे असे गोपिकाबाईंना वाटले नसेल का?
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २७-४-२०२१.
–


