गोपिकाबाई चरित्र भाग १, (१ ते ४)

"तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।" असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


           १७२९ सालच्या दिवाळी सणाला शाहुमहाराज फराळासाठी भिकाजी रास्ते सावकारांकडे आले असतां,त्यांना घार्‍या डोळ्याची ५-६ वर्षाची चुणचुणीत मुलीला पाहुन,छत्रपती शाहु महाराजांनी स्वतः पुढाकार घेऊन,नानासाहेब पेशवेसाठी मागणी घातली……………

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! गोपिकाबाई !!!

!!!  गोपिकाबाई  !!!

भाग – १.

      नमस्कार!!

               आतांपर्यंत रामायण,महाभार तातील कांही व्यक्तीरेखा,संतचरित्रे, ऐतिहासिक, इतरही व्यक्तीरेखा आपल्या समोर प्रस्तुत केल्यात.आपणही भरभरुन कौतुक करुन मला प्रोत्साहित करत गेल्यामुळे एकप्रकारची स्फुर्ती,उर्जा मिळत गेली व मी लिहित गेले.

          आज मी अशी व्यक्तीरेखा घेऊन येत आहे,जीच्यामुळे पेशवाईत प्रचंड उलथापालथ झाली.अतिशय महत्वा कांक्षी,धूर्त,मुत्सद्दी,राजकारणी, एककल्ली,छप्पन राजेरजवाडे विकत घेण्याची ताकद बाळगुन असणार्‍या रास्ते सावकारांची कन्या, गोपिकाबाई!

यांच्याविषयी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.नेहमी प्रमाणे आपल्याकडुन क्रीया प्रतिक्रीया अपेक्षित!!

           १७२९ सालच्या दिवाळी सणाला शाहुमहाराज फराळासाठी भिकाजी रास्ते सावकारांकडे आले असतां,त्यांना घार्‍या डोळ्याची ५-६ वर्षाची चुणचुणीत मुलीला पाहुन,छत्रपती शाहु महाराजांनी स्वतः पुढाकार घेऊन,नानासाहेब पेशवेसाठी मागणी घातली.हिरवी दूड घातलेली परकरी गोपिका जडशीळ पैठणी नेसुन, रास्त्याचा पीळ सोबत घेऊन,नानासाहेबां च्या घराचा उंबरठा ओलांडुन पेशव्यांच्या जीवनांत प्रवेश केला.गोपिकाबाई वरुन जेवढ्या सुंदर होत्या,तेवढ्याच आंतुन घातकी. कांही दिवसांनी छत्रपती शाहु महाराजांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांचेपर्यंत जाण्यास सर्वाना मज्जाव असला तरी,नानासाहेब आपल्या शांत, आर्जवी स्वभावाने,सरदार,कारभार्‍यां बरोबर संधान साधत,बोलतांना महाराजां विषयीची कळकळ,आस्था,शब्दाशब्दा गणिक गळा भरुन महाराजांसाठी अश्रूपात ह्या सर्व बातम्या, मरणासन्न शाहुमहाराजांपर्यंत पोहचत होत्या.आणि महाराजांचा नानासाहेबांवरचा विश्वास आणखीनच दृढ होत होता.

       सत्तेसाठी हपापलेली शाहुमहाराजां ची पट्टराणी सकवारबाई व तरण्या पेशवे नानासाहेबांची सावधता… सत्तेच्या म्यानांत दोन तलवारी कशा बरं राहु शकतील? ही सारी परिस्थिती पाहुन सकवारबाईने तडकाफडकी शाहु महाराजांना राणीवशात हलवले.व भोवती सारे अथीरथी,नागपूरकर रघुजी भोसले,प्रतिनिधींचा मुतालिक यमाजी शिवदेव,दाभाडे,गायकवाड,मुरारराव घोरपडे या सार्‍यांचा कोट उभा केला.या कडव्या मराठ्यांच्या दरबारांत नाना साहेबांचा निभाव लागणार तरी कसा? पण मग अति कौशल्याने डाव टाकल्या गेला.कुणी टाकला डाव?नानासाहेबांनी? की,कित्येक वर्षे शाहुमहाराजांच्या कैदेत खितपत पडलेल्या ताराबाईनी?हे कोडं सकवारबाईंना कधी उलगडलच नाही

         शाहुमहाराजानंतर गादीचा वारस म्हणुन,पानगावी अज्ञातवासात वाढलेल्या महाराणी ताराबाईच्या नातवाचा एकाएकी शोध लागला.तो लटका आहे,तोतया आहे हे सकवारबाई परोपरीने दातांच्या कण्या करुन सांगीतल,पण महाराज ऐकेना.काळच फिरला.मग मात्र त्या इरेला पेटुन,यमाजी पंतास हाताशी धरुन फौज जमवायला सुरुवात केली.महाराजांच्या गळ्यातला ताईत असलेल्या गोविंद चिटणीसास अनेक प्रलोभने दाखवुन आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला,पण तो ऐकत नाहीसे पाहुन त्याचा काटा काढण्याच्या प्रयत्नात, फितुरीत तुळाजी खिजमतगार मारल्या गेला.यामुळे सकवारबाई हतबद्द झाल्या.आपलं कोण व परकं कोण कळेनासं झाल.त्या संतापाने पेटुन उठल्या व थेट कोल्हापुरच्या संभाजी राजास फौज घेऊन येण्याचं आवतन दिलं.आतांमात्र बुध्दीबळाची प्यादी पुढे मागे सरकवणारे नानासाहेब सावध झाले त्यांनी फितुरीचा फायदा घेऊन ही बातमी अखेर मरणासन्न शाहुमहाराजांपर्यत पोहचवलीच!

        भोळसर,हलक्या मनाचे,पैलतीरी डोळे लागलेल्या शाहु महाराजांनी अखेर स्वहस्ते,प्रचंड फौजेनिशी सातार्‍यास तळ ठोकुन बसलेल्या नानासाहेबांना अख्त्यारी लिहुन दिली की,राज्यकारभार चालवण्यासाठी त्वरीत दत्तकविधानाची व्यवस्था करणे,पण कोल्हापुरचा सोडुन..

ही बातमी ऐकली मात्र,सकवारबाई वाघीणीसारख्या चवताळुन उठल्या. व  स्वतःसाठी आणि धाकट्या सगुणाबाई दोघींसाठी महाराजांकडुन सरंजामाची व्यवस्था करुन घेतली.या सर्व भानगडी मुळे महाराजांची तब्बेत आणखीनच ढासळली.अशातच धाकट्या सगुणाबाई आजारी पडल्या.अनेक उपचार,अनुष्ठाने केलीत पण कशाचाही उपयोग झाला नाही त्या अनंतात विलीन झाल्या.नाना साहेब बहुत चिंतीत झाले.

       या कालावधीत गोपिकाबाईंना मोरेश्वर,विश्वासराव,यशवंत व माधवराव अशी चार अपत्ये झालीत.गोपिकाबाईंचे ताराबाईशी संधान असल्याची चर्चा होती पण उघड कोणी बोलत नव्हते.अखेर ताराबाईचा नातू राज्यावर बसविण्यात नानासाहेबांना व गोपिकाबाईंना यश आले.

                क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
           दि.  २४-४-२०२१.

!!!  गोपिकाबाई  !!!

भाग  –  २.

          छत्रपती शाहु महाराजांची तब्बेत अत्यंत खालावली.क्षणाचा भरवसा उरला नव्हता.अशातच सकवारबाईच्या सती जाण्याबद्दलची हूल,कुजबुज सार्‍या राणी महालात,वनवासवाडी माहुली, सातारच्या गल्लीबोळात सुरु झाली. त्यांच्या सती जाण्यामुळे सासर माहेर दोन्हीकडचा उध्दार होईल.आधी हीच लोकं कोसत होती,सत्तेची हावरी,धनावर ची नागीण,गादीपायी नवर्‍यास काबुत ठेवणारी…आणि आतां सती?सकवार बाई नखशिखांत दचकल्या.चहुबाजुने लोकांचा सातार्‍यात बांध फुटलेला, सगळीकडे एकच चर्चा!ह्या जर सती गेल्या तर महाराजांच्या माघारी राज्यास वाली कोण? किती समजावले तरी त्यांचा एकच घोषा,धाकली सगुणा तर भरल्याकपाळी आधीच गेल्यात.मग एवढे थोर छत्रपती,राजा! त्यांची चित्ता कां सतीशिवाय सुनी जळणार?त्यांच्या माघारी या देहाची मात्तबरी ती काय?सतीचा हक्क आमचा.आम्ही सती जाणारच!ही सर्वी भाषा सकवारबाईंवर लोकांनी लादली.त्यांना मुळात सतीच जायचे नव्हते.पण वरील विधानं किंवा विचार माझे नाहीत हे कसं सांगु?लोकं तोंडात शेण घालतील ना?

          अखेर त्यांनी विचार केला,तारा बाईच्या ओंजळीने पाणी पिऊन दिवस कंठण्यापेक्षा,तसाही संसार आटोपलाच, पोटी संतान नाही.मागे राहण्यांत काय अर्थ?असे मनांत विचार आले असले तरी राणीमहालात मरणासन्न असलेल्या शाहु महाराजांभोवतीची पकड जराही ढीली झाली नाही.महाराजांच्या आज्ञेवरुन नानासाहेब पेशवे सातार्‍यात फौजेनिशी केव्हाच डेरेदाखल झालेले.त्यांत शिंदे, होळकरांसारखे मातब्बर सरदार!त्यामुळे पूर्ण दबदबा. आणि छत्रपती शाहु?त्यांना मृत्युंजय मात्रेचे वेढे चाटवणे सुरु झाले. चढउतार चालुच होता.१७४९ मार्गशीर्ष, वद्य तृतीया,भृगवार,महाराजांची तब्बेत एकाएकी बिघडली.सारी बंधने झुगारुन अंतःपूर माणसांनी भरुन गेले.बाहेर अफाट समुदाय! दर्भासनावर अंथरलेल्या पांढर्‍या घोंगडीवर नानासाहेब पुढे येऊन महाराजांना ठेवले.ओठांत अस्पष्ट राम नामाचा जप,तोही हलका होत गेला. घाबरलेल्या वैद्याने डोळ्यात अंजन घातल्याबरोबर,महाराजांनी क्षणभर डोळे उघडले,बोलायचा प्रयत्न केला,थरठरता हात वर करुन दोन बोटे दाखवले,पण अर्थ कुणालाच समजला नाही.दुसर्‍याच क्षणी त्यांचे पंचप्राण अनंतात विलीन झाले.महालात एकच आकांत उठला.

         नानासाहेबांच्या दुःखाला तर पारा वारच राहिला नाही.तेवढ्यांत सकवार बाई तीरासारखी धावत येऊन महाराजां च्या पायावर डोकं आपटु लागल्या. दुःखावेगाने स्वतःच्या तोडांत मारुन घेत, जमीनीवर हात आपटु लागल्या.बांगड्या फुटुन तुकडे इतस्ततः पसरले.भयभीत नजरेने नानांनी क्षणभर गर्दीत बघीतले. गोपिकाबाई दिसल्याचा भास झाला. मग मात्र नानासाहेब उठुन गेले.कुठे गेले?कुठे? कुठे?

          महाराजांची चुलती,ताराबाई गेली कित्येक वर्षे तुरुंगात खितपत पडलेली, त्यांची पालखी झपाट्याने गड चढतांना शोकोकुल जनसागराला दिसली.सोडलं कुणी कैदेतुन?छत्रपती रामराजाची पत्नी छत्रपती शिवाजी महाराजांची सूनबाई! पालखीतुन उतरुन तिरासारख्या धावत महाराजांचे अचेतन मस्तक मांडीवर घेऊन,शोकग्रस्त स्वरात म्हणाल्या,हे कैसे विपरित?थोराअधी धाकल्याने जाणे, आम्हास अग्नी कोण देणार?त्यांनी एवढा आकांत मांडला की,त्यांना पार्थीवावरुन ओढुनच काढावे लागले.डोळे पुसत तिथुन निघाल्या असतां,चिटणिसांनी पुढे येऊन,कैसे करावे असे विचारले असतां, त्या म्हणाल्या,सकवारबाई राहल्यास राज्याचा डोहाणा करतील,म्हणुन त्यांनी सहगमन करणेच ठीक राहील.

         सकवारबाई महाराजांच्या पायाशी घट्ट बसलेल्या.मग अति तडफेने हाल चाली सुरु झाल्यात.शहराची नाकेबंदी झाली.वाड्याभोवती चौकीपहारे बसले. प्रतिनिधी दादोबा आणि यमाजीपंतास नजरबंद करण्यांत आलेवर, चिटणिसां च्या वाड्यात बैठक भरवली.झाडुन सारे मातब्बर हजर!नानासाहेब तर दुःखात इतके चूर होते की,ते बैठकीत असुन नसल्यासारखेच.अखेर सकवारबाईंना निरोप धाडुन विचारण्यांत आले, राज्य कारभार चालवणार कि सहगमन?त्या कांहीच न बोलतां अंतःपुराकडे निघुन गेल्या.नानासाहेब ताडकन उठुन तीरा सारखे वाड्यातुन बाहेर पडले.सगळीकडे स्मशान शांतता.एवढ्यात सवकारबाईंचे बंधु कान्होजी शिर्के आल्यावर त्यांनी बहिणीचे पाया पडायला पुढे वाकल्या बरोबर त्या मागे हटल्या.दादा तुम्ही सुध्दा

         तेवढ्यात त्यांचे तिर्थरुप कुंवरजी शिर्के आंत येऊन त्यांच्या समोर उभे राहिले.मुठीतील चांदीचा कुंकवाचा करंडा उघडुन त्यांच्यासमोर धरला. तिसर्‍या प्रहरी महायात्रा निघाली.एक एक पाऊल टाकत सकवारबाई पुढे चालत होत्या.एका बाजुने बंधु कान्होजी व दुसर्‍या बाजुने पिता कुंवरजी शिर्के! सकबारबाईंना अजुनही आशा वाटत होती,कुणीतरी गर्दी भेदुन येईल,पण…

सतीचा जयघोष चालु होता.जमावावर सुरती नाण्यांचा वर्षाव, व हळदकुंकु उधळले जात होते.समोरच्या सजलेल्या रथात शाहुमहाराजांचे कलेवर होते.उंच चंदनी चित्तेवर महाराज पहुडलेले.बंधु व पित्याने त्यांचे बखोटे धरुन त्यांना शिळेवर चढविले.वडील पायाशी वाकल्यावर त्यांना उठवत म्हणाल्या, या पुढे तुमच्या घरांत मुलगी जन्मास येणार नाही हाच या सतीचा आशिर्वाद!तरी शेवटच्या क्षणी सुध्दा त्यांची नजर भिरभिरत होतीच.अखेर इतकावेळ दडी मारुन बसलले नानासाहेब दिसल्यावर अचानक त्यांनी पाऊल मागे घेतले.हे काय अक्रित?सतीचं पुढे पडलेलं पाऊल मागे?

              क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
            दि.  २५-४-२०२१.

!!!  गोपिकाबाई  !!!

भाग – ३.

         नानासाहेबांना सकवारबाईंनी खुण केली,तरी ते हलेनात हे पाहुन, बायांच्या गर्दीतुन कोण काय म्हणेल याची पर्वा न करतां गोपिकाबाई पुढे आल्यात व नानासाहेबांना आधार देत असल्याचे दाखवत दोघेही सकवारबाईं समोर येऊन ऊभे राहिले.सकवारबाईंनी महाराजांच्या कानातील शेवटची राहिलेली कुड्यांची जोडी त्यांच्या हाता वर ठेवत,आसुड ओढावा तशा म्हणाल्या

तुमच्या पुर्वजांना आम्ही आश्रय देऊन इथवर आणले,आणि तुम्ही? खाल्ल्या घरचे वासे मोजले.मी तर आतां सती जाणारच!पण या सतीचे बोल ऐकुन ठेवा हे शहाण्णव कुळाचं राज्य तुम्हास पचणार नाही.अवघं राज्य बुडेल.पुन्हा तुमच्याहाती पळीपंचपात्र येईल.तुम्ही हाय हाय करत मराल,निर्वंश होईल. आणि ही बया बोडखी होऊन सर्व पहायला जिवंत राहील.आणि सकवार बाईंनी चित्तेला अग्नी लावला.सतीच्या जयजयकारांत व ताशे,कर्णे वाद्यांच्या गजरांत सकवारबाईना धडाडलेल्या आगीने गिळून घेतले.नानासाहेबांचा चेहरा काळा ठिक्कर पडला.

        एवढे मुत्सद्दी राजकारणी,त्यांच्या गोड बोलण्याला भलेभले लढवय्ये,राजे महाराजे,निजाम,भोसले,इंग्रज सारे घाबरायचे.वास्तविक त्यांंच्या कारकीर्दीत झालेला मराठी साम्राजाचा विस्तार कोणीच नाकारु शकले नाही.पण गोपिकाबाईसमोर मात्र ते वचकुन कां असायचे हे कधी कुणाला कळलेच नाही.

विचार करायलाही वेळ नव्हता.नाना साहेब सावरले.झपाट्याने सातार्‍यावर कब्जा केला.शाहु महाराजांची दशक्रीया विधी,तेरवी सारं पुढाकार घेऊन पार पाडलं.नानासाहेबांनी त्यासाठी अमाप धन वेचल,केवळ मानसपुत्र म्हणुन.. आणि पेशवे पंतप्रधानांचा दौलतीवर धाक जमला.गोपिकाबाई? आपलं काम चोख केल्याच्या समाधानात तृप्त होत्या.

      भाग्याची सतत चढती कमान!शाहु महाराज जाऊन ८-९ महीने होतात तोच नानासाहेबांना मोरेश्वर नावांचा पुत्र झाला असेच पाठोपाठ चार पुत्ररत्न प्राप्त झाले. सगळीकडे आनदी आनंद,पण दृष्ट लागल्यासारखी,सहा महीन्याच्या मोरेश्वराला देवाज्ञा झाली.चार महिने उलटत नाही तोच,त्यांचा तिसरा पुत्र,एक वर्षाचा यशवंत तोही देवाघरी निघुन गेला अशात वर्ष उलटले.दौलतीची घडी बसवुन स्थीरस्थावर झाले.सर्व सुरळीत सुरु असुनही त्यांना रात्रीची झोप येत नाही हे बघुन एक दिवस गोपिकाबाई त्यांना म्हणाल्या,एवढी काळजी कशा पायी?सूर्यचंद्रासारखे विश्वासराव व माधवराव असल्यावर? संसार म्हटला की सुख दुःख येणारच!शापाचं भय कशाला

असल्या छप्पन सकवारबाई कोळुन पिईन.राहिल्या ताराबाई त्यांचं काय करायचं ते बघुन घेईन.

        महाराणी ताराबाईचा नातू राजाराम यांना पानगांवरुन वाजतगाजत सातार्‍या ला नानासाहेबांनी आणुन गादीवर बसवले.ताराबाईस इतके वर्ष कैदेत राहल्याचे सार्थक झाले.थोर्‍यामोठ्यांनी अहमिकेने आपल्या मुली राजारामास देऊन सोयरीकी केल्या.सकवारबाईनंतर सरतेशेवटी कां होईना सत्ता मिळाल्याने त्या हुरळुन गेल्या.पण नशीबापुढे कोणाचे चालत नाही.रामराजा संपूर्ण नानासाहेबांच्या अंकीत.ते राजा असुनही सारी सत्ता नानांच्या अधिन.ताराबाईने राजारामास समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला.पण राजाराम थंडच!मग ताराबाईने राजारामास नजरकैद करुन कारभार आपल्या हाती घेतला.राजाराम वरची बंधने उग्र झाल्याने त्यांनी नानास मदतीची हाक मारली.आणि संतापाने  आंधळ्या झालेल्या ताराबाईने रामराजा तोतया,लटका आहे असे सर्वांना सांगीतल्याने सारेजणं हादरुन गेले. नागपूरचे सरदार बर्‍हाणजी मोहित्यांनी आपली कन्या लेकावळ्यास दिली म्हणुन आत्महत्या करायला निघाल्यावर त्यांना कसेबसे आवरले.आणि सार्‍यांनी ताराबाईंना जाब विचारला.त्या म्हणाल्या ज्यावेळी राजारामांना पानगावहुन वाजत गाजत आणले तेव्हा आम्ही सांगीतले होते पण ही वेळ हे बोलण्याची नाही म्हणुन गप्प बसवले होते.या सर्वाचा परीणाम असा झाला की,ताराबाईची किंमत कवडीमोल झाली.

        आणि नानासाहेब? मूग गिळुन चूप बसलेले,ते धनी आम्ही चाकर!गोपिका बाई?ताराबाईची ही स्थिती होईल हे त्या आधीच जाणुन होत्या.अशातच नारायण रावांचा जन्म झाला.सारं असह्य झाल्याने नानांनी आपंली व्यथा रघूजीसमोर मांडली.त्यांच्या सल्ल्याने सातार्‍याच्या कुजट वातावरणातुन बाहेर पडल्या शिवाय राज्याचा निभाव लागणार नाही. अहमदशहा,अब्दाली,निजाम,इंग्रज यांच्या कारवायांना आवर घालण्याच्या उद्देशाने सातार्‍याचा कारभार पुण्यास हलवला.सत्ता शनिवारवाड्यात आली. नंतर नानासाहेबांनी त्रिखंड हिंदुस्थान गाजवला.

                क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
             दि.  २५-४-२०२१.

!!!  गोपिकाबाई  !!!

भाग  –  ४.

           बंगालप्रांत रघुजीसाठी ठेवुन बाकी सारा विशाल प्रदेश मराठी सत्ते खाली आला.ज्यांनी उठाव केला त्यांचा एरवी मेणाहुन मऊ असलेल्या नाना साहेबांनी वज्राहुन कठोर होऊन पारिपत्य केले.दामाजी गायकवाडांनी उचल खाल्ली तर त्याला पेशवे काय आहे हे दाखवुन दिले.शरण आल्यावर सोडुन दिले.दुसरा घरभेदी तुळाजी आंग्रे

मराठ्यांचा आरमार प्रमुख,तो नाना साहेबांस मानेनासा झाला तेव्हा इंग्रजांचे सहाय्य घेऊन पडाव केला व त्याच्या बायकामुलांसह काळकोठडीत टाकले. त्या युध्दात आंग्र्यांच्या ताब्यातील संपुर्ण आरमाराचा विनाश झाला.

        या तपभराच्या काळात गोपिका बाईंनी पांच पुत्रास जन्म दिला.त्यातील तीन वाचली.विश्वासराव,माधवराव, व नारायणराव!त्यांना योग्य वळण लावणे त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे,वाढवणे यावर लक्ष केंद्रीत केले.पण रघुनाथराव व सदाशिवराव या दिरांचे मैदान गाजवणे गोपिकाबाईच्या डोळ्यात खुपु लागले.

         आणि नानासाहेब?निवैर झालेले राज्य आणखी निवैर होण्यासाठी अहमद शहा,अब्दालीच्या पारिपत्यासाठी रात्रं दिवस खलबतं सुरु झाली.मोहिमेवर कोण जाणार हा प्रश्न ऐरणीवर आला.रघु नाथराव सरकारातुन भरपुर द्रव्य मिळेल तर जाऊ म्हणुन अडुन बसले.अखेरीस सदाशिवराव भाऊ व त्यांचेवर वचक राहावा किंवा पाठीराखा म्हणुन पुत्र विश्वासरावास पाठविण्याचा विचार नाना साहेबांच्या गळी उतरवण्यास गोपिका बाईंनी यश मिळवले.मोहिम कुरुक्षेत्री जाणार म्हणुन गोपिकाबाईच्या मध्यस्थिने खुपसा गोतावळा मोहिमेसंगे जाण्यास सिध्द झाला.गोपिकाबाईना नकार कोण देणार?नानासाहेब मनातुन नाराज झालेत.त्यांनी गोपिकाबाईचा महल वर्ज्य करुन आपला वेळ नाटक शाळा,नाचीचा जलसा,फडाचा तमाशा यात उत्तररात्रीपर्यत घालवु लागले.नाना साहेब मदमस्त गुणवंतीच्या उष्ण बाहु पाशात,केशरच्या गच्च मिठीत पडुन राहुं लागले.गोपिकाबाईचा तोरा उतरवण्या साठी त्यांच्या नाकावर टिच्चुन दुसरे लग्न करण्यासाठी मुली बघु लागले.

           तिकडे सदाशिवभाऊस मोहिमे वर जाऊन ७-८ महिने होऊन गेले.मधुन मधुन खलिते येत होते,पण गेल्या १-१॥ महिन्यापासुन तेही बंद झाल्याने नाना चिंतित झाले.शेवटी रिवाजानुसार सारा लवाजमा व माधवराव,नारायणराव, गोपिकाबाईस सोबत घेऊन उत्तरेच्या मोहिमेस स्वतः प्रस्थान केले.वाटेत पैठण मुक्कामी नारायण वाखरे देशस्थ सावकाराची नऊ वर्षाची कन्या त्रिम्बक  मामाच्या मध्यस्थीने नानासाहेबांनी तिच्याशी लग्न केले.नवी नवरी सोबत घेऊन लवाजमा पुढे निघाला.तरीही गोपिकाबाई शांतच…दोघांतील संवाद कधीच संपलेला.सारा लवाजमा भेलसा येथे पोहोचल्यावर,भाऊसाहेबांना कळविले,आम्ही ४० हजार फोजेनिशी जामनगरकडे येतोय तोवर अब्दालीस कोंडुन राखावे.खलिता रवाना करुन नानासाहेब थोडे निश्चिंत झाले,तोच पानिपतवरुन सावकारी डाकेने आलेले पत्र सावकारी कासिदने नानासाहेबांना दिले.पत्रात लिहिले होते,दोन मोती गारद, १०-२० मुख्य सरदार,रुपयाच्या खुर्देला तर गणतीच नाही.नानासाहेब मटकण खालीच बसले.त्यांच्या हातातील गळुन पडलेला कागद गोपिकाबाईने वाचल्या वर सहज आवाजात म्हणाल्या कांहीतरी समजुतीचा घोटाळा झालेला दिसतोय!

         संपूर्ण छावणी दोन रात्री जागीच होती.आणि मग दर पळाला उघड्या बोडक्या माणसांच्या लाटा उसळु लागल्या.एकटे नानासाहेब त्या लाटा कश्या थोपवणार?पानिपतवरुन हजारो माणस उघडे,नागडे,भणंग,कंगाल,भीक मागत अन्नान्न करीत जिथे जागा मिळेल तिथे धडकु लागले.अत्यंत भिषण परिस्थितीत लोकं जीव वाचवत जिवाच्या आतंकाने पळु लागले.कित्येक कुलीन स्रीयांना पळवुन नेण्यात आले. कुतुबशहाच्या पुत्राने सोनपतानजीक ४६ हजार फौजेची कत्तल केली.तसेच सैमद खान कत्तलबाजच्या पुत्राने बहादागडा जवळ ५६ हजार मनुष्यांची कत्तल केली. सर्वत्र रक्तलांच्छित मुंडक्यांच्या राशी पडल्या.नाना फडवणीसांच्या आईचा पत्ता नाही.स्वतः नाना फडणवीस जीव वाचवुन चौखुर उधळले.सदाशिवरावांची पत्नी पार्वतीबाईस होळकरांच्या ५०० स्वाराबरोबर बंदोबस्तात विसाजी कृष्ण जोगदंड नेत असतांना हल्ला झाल्याने पार्वतीबाईंना तिथेच टाकुन जीव घेऊन पळुन गेला.भांबावलेल्या पार्वतीबाईस खिजमतगार जानू भिंताड्याने हिम्मत धरुन बाईच्याच शालजोडीने त्यांना कमरेला बांधुन घोडा पुढे फेकला.

       विश्वासराव पडल्याचे पाहुन भाऊ साहेबांनी कोणालाच न जुमानता,न ऐकता,नानासाहेबांना तोंड कसे दाखवावे म्हणुन,दुराणी व नजीबखान रोहिल्याच्या ४० हजार फोजेचा असलेल्या वेढ्यात स्वतःला झोकुन दिले.भयंकर लढाई झाली.भाऊसाहेब व जानकोजी शिंदे पुनः दृष्टीस पडलेच नाही.

                क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
            दि.  २५-४-२०२१.

गोपिकाबाई चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading