गोपिकाबाई चरित्र भाग ३, (९ ते १२)

"तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।" असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


           १७२९ सालच्या दिवाळी सणाला शाहुमहाराज फराळासाठी भिकाजी रास्ते सावकारांकडे आले असतां,त्यांना घार्‍या डोळ्याची ५-६ वर्षाची चुणचुणीत मुलीला पाहुन,छत्रपती शाहु महाराजांनी स्वतः पुढाकार घेऊन,नानासाहेब पेशवेसाठी मागणी घातली……………

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! गोपिकाबाई !!!

!!!  गोपिकाबाई  !!!

भाग – ९.

        लौकिकास भिऊन किंवा कर्तव्य म्हणुन,दौलतीला लागलेली कीड असलेल्या काकांना आपणच पोसले, त्यामुळे अवघी दौलत पोखरली,सरदार शेफारले.किती समजावले,पण भाऊंचाच दुसरा नमूना!पुतण्या धारातीर्थी पडला म्हणुन भाऊने रणकंदी घालुन घेतले. परिणाम सारा घात झाला…आणि इथे काकांना कैद केले म्हणुन जीवाची सतत घालमेल,दुखणे पदरी पडले.परिणाम? राज्यच वार्‍यावर सुटायची वेळ आली.हे सारं उघड्या डोळ्यांनी बघत गोपिकाबाई  गंगापूरी स्वस्थ झाल्या,कारण त्यांनी सांगीतलेले कुणी एकायला तर हवे ना? सत्तेपेक्षाही मोठ्या संधीची गंगा अंगा वरुन गेली व आपण कोरड्याच राहीलो या अनुतापाने त्यांना कधी ग्रासले असेल का?निदान माधवरावांच्या मृत्युनंतर तरी

        परंपरेने चालत आलेली दौलत माधवांनी आपली न मानतां,श्रीगजानना ची मानली.मनःस्ताप,दगदग,भाऊबंदकी, विषाने त्यांना इतके पोखरले की,हट्टेकट्टे पिळदार शरीर पाहतां पाहतां क्षयरोगाने ग्रासले.माधवरावांना मरण हाक ऐकु आल्यावर,सारा पसारा,सारा खेळ आवरुन थेऊरास श्रीगजाननाचे चरणी रुजु झाले.माधवराव आजारी असल्याचे अत्यवस्थ असल्याचे अनेकदा कळवुन आर्जवे करुनही त्या आल्या नाही.आईचं ह्रुदय इतके कठोर असुं शकते? इतका

हेकेखोरपणा?स्वतःचा मुलगा अगदी शेवटच्या घटका मोजत असुनही त्या माउलीचे ह्रदय द्रवले नाही.

     माधवरावांकडुन जेव्हा चालवेना, तेव्हा वाड्यातुन साक्षात चिंतामणी समोर सभामंडपात त्यांनी आपली शय्या हलवली.माधवराव मरणासन्न असल्याची संधी साधुन दादासाहेब नजरकैदेतुन निसटले,पण अशाही स्थितीत माधवांची अजुनही कारभारावर विलक्षण पकड आहे हीच गोष्ट नेमके भोळेसांब दादा विसरले.फितुरीच्या कागदपत्रांसह त्यांना माधवांसमोर हजर केल्यावर,त्यांना एका एकी सोडुन देत म्हणाले,”जायचे तिथे जा आणि दादासाहेब अगदी भांबावुन गेले.स्वातंत्र्य?स्वतःचीच मुख्त्यारकी?केवढी मोठी शिक्षा?लोखंडासारखे दादा शणामेणाचे झाले.माधवाss माधवाss करुं लागले.कां सोडले असेल त्यांना?असे शेणामेणाचे करण्यासाठी?की, नारायणरावास हा जळता निखारा बंद मुठीत ठेवण्याची कुवत नाही हे जाणुन? की,त्यांच्या करणी,अनुष्ठानाचा धसक्या मुळे?गोपिकाबाईंना वाटले,दुखण्याने गांजलेल्या माधवरावांची वज्रमुठ ढिली पडली,त्यांनी गंगापुरहुन नाना फडणीसां च्या देखरेखेखाली मृत्युंजय कोटीजप करण्याचे फरमाण सोडले.

        ऐके दिवशी वेदनेने जीव घाबरा झाल्यावर,मातोश्रींना आणण्यासाठी पाठवलेला सांडणीस्वार,गोपिकाबाईंची तब्बेत ठीक नसल्याचा निरोप घेऊन हात हलवत परत आला.त्यानंतर मात्र माधवांनी भेटीचा आग्रह धरला नाही.सारं आभाळ कोसळलं तरी,त्या ढिगार्‍यावर ताठ उभ्या राहणार्‍या मातोश्री त्याच्या नजरेसमोर आल्या,आणि एक निःश्वास टाकला.एकएक बंध मोकळे करण्या साठीच तर श्रीगजाननाचे चरणी ते रुजु झाले होते.

         परंतु शरीर?ते कुठे त्यांना बंधन मुक्त करीत होते?चिडचिड वाढली,पथ्य पाणी वर्ज्य केले,शिविगाळ वाढली.आतां आपल्याजवळ जास्त अवधी नाही हे जाणुन,शरीर पेटलेल्या आगडोंबाला न जुमानता नऊ कलमी तपशीलवार मुद्देसूद लेख तयार करण्यास घेतला. इथली इतंभूत वार्ता गंगापूरी पोहचत होती.नऊ कलमीची वार्ता वाचुन त्या अस्वस्थ झाल्या.मरण शय्येवरच्या छत्रपती शाहु महाराजांची आठवण झाली.त्यांच्या अंतसमयी नानासाहेबांनी आपल्या घराण्यासाठी पेशवेपदाची सनद शिताफीने महाराजांकडुन गुपचुप लिहुन घेतली ते या कानीचे त्या कानी गेले नाही.आणि माधवराव?एक एक कलम तासुन तपासुन,सारा कारभार उघडा प्रच्छन्न!ही झुंज गोपिकाबाईंना बरंच कांही सांगुन गेली.भाऊकाकांची क्रीया माघमासी उत्तमप्रकारे करावी ही कलम गोपिकांच्या कानी गेल्यावर त्यांना काय वाटले असेल?यावेळी माधवरावास सल्ला मसलतची गरज वाटली नाही कां

आपल्या या अकाली मृत्युशय्येवर पडलेल्या चिरंजीवाने पानिपतच्या विनाशानंतर कर्तेपणाची सुत्रे हाती आल्यावर त्यांनी कोणकोणती वादळे उरी कोंडले हे आज गोपिकाबाईंना जाणवले असेल का?आपले काका पानिपतवर पडले,त्यांच्या मृत्युची खातरजमा झाल्यावरही त्यांचे श्राध्द, तर्पन,पिंडदान नाही.आणि आपण? इतके वर्षे श्राध्द,तिथी पंधरवाडे होऊन गेले पण आपण काय केले?

              क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
            दि.  २७-४-२०२१.

!!!  गोपिकाबाई  !!!

भाग  –  १०.

          माधवराव एवढे कर्मकठोर,सगळी कडे वचक दरारा,धूर्त..मग श्राध्द करण्यास कां कचरत होते?कोणती गोष्ट आड येत होती?भाऊ जिवंत असलेला पार्वतीबाईचा अनाठायी विश्वास? की, कांही राजकारण होते त्यामागे?कां भाऊ साहेब परत आलेले नको होते माधवांना? प्रत्यक्ष भाऊ जरी समोर ऊभे ठाकले असते तरी ते तोतया ठरणार हे रघुनाथ रावांचे जहरी फुत्कार?भाऊंचे श्राध्द केल्यास या मंडळींच्या हाती आयतेच कोलीत मिळणार,लोकांमध्ये गैरसमज, काकुंची विटंबना केल्याचा ठपका!त्यातुन सौभाग्यालंकार घालुन मिरवणार्‍या काकुंनी दादांची बाजु घेऊन बखेडा उभा केला तर?त्यापेक्षा भिजत घोंगडे तसेच लांबणीवर टाकावे असा राजकारणी डाव तर नसेल ना त्यामागे?

         परंतु गोपिकाबाईंना एकही कारण पटण्यासारखे नव्हते.त्यांच्याच सारखा त्यांचा मुलगा! परिणामाची पर्वा न करणारा,हट्टी!त्या रागाने गंगापूरी निघुन गेल्यावर ते द्रवले नाही की, लोकोपदवा ची पर्वा त्यांनी केली नाही,म्हणजेच श्राध्द न करण्यामागे तसेच आर्त कारण असावे,जे गोपिकांना आजवर उमगले नाही.माधवानी लोकांच्या कुजबुजीला भीक न घालतां,ब्राम्हणांनी हस्ते परहस्ते वाळीत टाकण्याच्या दिलेल्या धमकीला न जुमानता सारा भार आपल्या खांद्यावर घेतला.अन्यथा पार्वतीकाकुनी उरी बाळगलेले स्वप्न उध्वस्त झाले असते. पती जिवंत आहे या विश्वासाने पार्वतींनी सौभाग्यालंकार उतरवले नव्हते,ते जिवंत असतांना सोवळी होऊ?की सती जाऊन त्यांना अपशकुन करु?की त्यांच्या श्राध्दाचे लाडु खाऊ?भाऊंचे श्राध्द म्हणजे पार्वतीकाकुंना अत्र ना परत्र करुन सोडणे,म्हणुनच काकु गेल्यानंतर दोघांचेही श्राध्द एकदमच करुं या विचारानेच आपल्या मुलाने भाऊंचे श्राध्द केले नसेल हे गोपिकाबाईंना उमगले.

        परतु काळाच्या जाळीत टपुन बसलेल्या मरणाने मधेच माधवरावांवर झेप घेतली.पार्वतीबाईच्या आधीच जायची वेळ आली.पण आतां स्वजन मोहाचे ढग पांगले.लख्ख सूर्यप्रकाशात शांत मनाने विचारपुर्वक निरवानिरवी त्यांनी आरंभली.काकास तर्पनाशिवाय, पिंडदानाशिवाय तसेच ठेवायचे?साधा दाहसंस्कारही त्यांच्या वाट्याला येऊ नये. त्याच्या शवाची विटंबना शत्रुने केली की, कोल्ह्या कुत्र्याने खाल्ले?म्हणुनच त्यांनी भाऊंचे श्राध्द करण्याची आज्ञा दिली.

         माधवरावांचा वाढता ज्वर,सर्वांगा मधे आग आग,पथ्यपाणी सोडुन खाण्या ची सुटलेली हाव,या सर्वामुळे अंथरुणात रेच होऊ लागले.याही परिस्थितीत त्यांनी एकएक शब्द निवडुन कलम तयार केले.

भाऊसाहेबांची क्रीया माघमासी जरुर करावी.काकुबाई सती जावोत वा राहोत.

        मातोश्रींची काशीस जाण्याची त्यांच्या इच्छेप्रमाणे व्यवस्था करावी.तिर्थ रुपांच्या इच्छेनुसार काशी प्रयाग हस्तगत करावे.दौलतीचे कर्ज निवारावे.दादांना पांच लक्षाची जागीर लावुन द्यावी.नऊ कलमी लेख दस्तखुद्द पुरा करुन सर्वा समक्ष कारभार्‍यांच्या स्वाक्षर्‍या घेऊन, लेख रामशास्रींच्या स्वाधीन केला.इतकी कलमे केली पण,फिरंग्याचे पावले ओळखुन त्याच्या बंदोबस्तासाठी एखादे कलम केले नाही हे केवढे दुर्देव?

        वेदनांच्या कल्लोळात दिवस उगवत होता.दादासाहेबांना आधीच मोकळे करुन,छोटे बंधु नारायणरावांना त्यांच्या हाती सोपवले.त्यांनीच पुढे आणलेल्या नाना फडणीसांना बाजुस सारुन,सखाराम बापुस कारभारी नेमुन, नारायणरावांची जबाबदारी त्यांचेवर टाकली.सखारामबापु व राघोबादादांचे गुळपीठ असल्यामुळे गोपिकांना ही व्यवस्था मुळीच आवडली नाही.परंतु माधवरावांनी सारे विचारपुर्वकच केले असेल यावर त्यांचा विश्वास होता. सखाराम बापुंच्या मनांत सद् सद् विवेक जागृत होऊन आपल्या खाजगीतुन एक कोटीचा एवज देऊन सावकारांच्या सोड चिठ्या आणवुन दौलतीवरचे कर्ज फेडल्यामुळे ,माधवरावांना अंतिम समयी समाधान वाटले.

      तळहात,तळपायांची आग आग, सर्वांग सुजलेले.खोकुन खोकुन पोटातील आतडी पिळवटुन आगडोंब,अशा माधवरावांनी अवघ्या २५ वर्षाच्या रमा बाईकडे पाहत अत्यंत विचारपुर्वक, संसाराची नश्वरता वर्णन करुन शेवटी सती जाण्याची आज्ञा केली.कारण साधी भोळी,माहेरचं पाठबळ नसलेल्या रमा बाईचा टिकाव आजुबाजुंच्या रथी महारथींपुढे लागला नसता हे माधवराव पुर्ण उमगुन होते.आपल्यानंतर तिची विटंबना,अवहेलना,फरफट होऊ नये, मातोश्रीपासुन सारेच स्वार्थाने बरबरटले ले हे सर्व फक्त रमाबाईनेच समजुन त्यांना साथ केली म्हणुनच तिचे नंतर होणारे हाल दिसत असल्यामुळेच आपल्यासवे येण्याची आज्ञा किंवा इच्छा व्यक्त केली.

               क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
          दि.  २७-४-२०२१.

!!!   गोपिकाबाई  !!!

भाग  – ११.

        माधवरावांचा निर्वाण दिवस जवळ येऊ लागला.ज्वरशांतीसाठी श्रीगणपती स सतत जलधार,१०८ गोदान,ब्राम्हण भोजन,प्रायश्चितविधी हे सारं कर्मकांड केले.वेदना सहन होईनाशा झाल्या की, खंजीर मागुं लागले,न दिल्यास जीवाचा संताप संताप व्हायचा.इतरांनी करवली तेवढी हालचाल व्हायची.हरिपंत फडके व नारायणराव स्वहस्ते अन्न भरवतील तेवढेच पोटात जाई.रमाबाई दूरुन सारे मुकाट बघत,कारण सर्वांसमोर त्यांना कांहीच करतां येत नव्हते.रात्र रात्र त्यांच्या किंकाळ्या,आतडी पिळवटुन गुरासारखे ओरडणे,दीर्घ कण्हने हे सतत कानी पडत,शिवाय कडक उपास,व्रत वैकल्यांनी कृश झालेल्या असहाय्य, अगतिक रमाबाई सारे पाहत होत्या,सहन करीत होत्या.आणि एके दिवशी थेऊरला सतीची वस्रे सांडणीस्वार घेऊन गेल्याची बातमी पुण्यात आगीसारखी पसरली. बाजारपेठा बंद होऊन थेऊरास लोकांची रीघ लागली.तशाही स्थितीत माधवरावां च्या कानी वार्ता गेलीच.सांडणीस्वारास मुसक्या बांधुन समोर उभे केल्यावर त्याला खडसावुन विचारले, हे कारस्थान कोणाचे? पण त्याने तोंडातुन ब्र काढला नाही.तलवार आणायची आज्ञा करुन हात कलम करण्यास सांगीतले.हे कळल्याबरोबर कोणतीही भीड न ठेवतां रमाबाई तिरासारख्या धावत येऊन त्याची   सुटका केली.आग होणार्‍या शरीरावर शितल जलाचा शिडकाव झाल्यासारखे माधवरावांना वाटले.मोहजलाचा शेवटचा तंतू पांगला.संदेह निमाला.प्रस्थानाचा मार्ग मोकळा झाला.कितीतरी दिवसांनी माधवरास दोन घटिका शांत झोप लागली.

         नेहमीप्रमाणे थेऊरहुन सांडणी स्वाराने वार्ता सांगीतल्यावर,रमाबाईने सतीची वस्रे मागवली?ऐकुन गोपिका बाई थक्क झाल्या.त्या विचारच करुं शकत नव्हत्या की,रमाबाई सती जाऊ शकते.एवढी हिंमत आली कुठुन हिच्यात त्या रात्रभर अस्वस्थ!रमा तयार झालीच कशी?तेही सहजपणे?खुशीने?कशी? प्रश्नांच्या चकव्यात गोपिकाबाई रात्रभर फिरत होत्या.

         आमच्या महायात्रेचा समय जवळ आला,प्रस्थानाची तयारी करा.माधवराव म्हणाले. सन १७७२ कार्तिक वद्य अष्टमी गजानन गजानन अस्पष्ट आवाज खोल खोल गेला.प्रातःकाळी नेत्राद्वारे प्राण गेला.वारे,आई!इतका हटवादीपणा?क्षणाक्षणाची बातमी गोपिकाबाईस कळत होती.स्वतःच्या मुलाच्या शेवटच्या क्षणीसुध्दा ही आपला पीळ सोडुन मुलास अखेरचे पहावेसेही वाटले नाही. आई एवढी कठोर,ह्रदयशुन्य असु शकते पटत नव्हते पण वस्तुस्थिती समोर होती.

           रमाबाईने सतीवस्रे परिधान केल्यावर त्यांना परावृत्त करण्याचा सार्‍यांनी प्रयत्न केला,पण त्या आपल्या निश्चयावर ठाम राहिल्यात.महायात्रा निघाली.यात्रा स्थळी पोहचल्यावर, रचलेल्या चंदनी चित्तेवर माधवरावांचे डोके मांडीवर घेऊन शांत चित्ताने बसल्या.तेवढ्यात दादासाहेब सतीला नमस्कारासाठी पुढे आल्यावर,त्यांच्या हातात नारायणरावांचा हात देत म्हणाल्या यांचे तुम्हीच सर्वस्व आहांत, यांचे जतन करा.कल्याण होईल.एकवार सर्वीकडे शेवटचे पाहुन नमस्कार केला व स्वहस्ते चित्तेस अग्नी दिला.आणि धडाडलेल्या चित्तेत दिसेनासे झाल्या.

        गोपिकाबाईंना अचंबा वाटला की, पेशवे कुळात सतीची चाल नसतांनाही ही पोर सती कशी गेली? की, तीला तीचं पुढील आयुष्याची कल्पना आली असेल व नंतर रोज रोज सती जाण्याचे दुःख भोगण्यापेक्षा मानसन्मानाने व लौकिकाने योग्यवेळीच जाणे पसंद केले असावे.त्यानंतर गोपिकांना निद्रानाशाचा विकार जडला तो कायमचाच,पण कोणालाही सांगीतले नाही की,वैद्याचे औषधोपचारही केला नाही.संपले एक पर्व!!

                 क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
           दि.  २७-४-२०२१.

!!!  गोपिकाबाई  !!!

भाग – १२.

         गोपिकाबाई गंगापुरला आल्यावर त्यांचा दिनक्रम ठरल्याप्रमाणे..सकाळचे आन्हीक,पुजा आटोपली की,कारभारी हजर होत,कांही खलिते लिहुन रवाना करणें,आलेल्या खलित्यांचे वाचन,सारा व्यवहार,पैशाअडक्याचा हिशोब हे सगळं व्हायच!नाही म्हटले तरी,गंगापूरी त्यांचे वर पोटपाणी अवलंबुन असलेली पाच पन्नास मंडळी होती.त्यांचा व्यवहार पाहणे तर भाग होतेच.वास्तविक हा सारा व्यवहार पाहण्यासाठी रास्तेबंधु पैकी गंगाधरपंत गोपिकाबाईंसोबत येऊन तिथेच स्थायीक झाले,पण ते केवळ नामधारी,शोभेपुरते व पेशव्यांना दाखवण्यापुरतेच!तुम्ही जरी मज वार्‍या वर सोडले तरी मला माहेरचा पूर्ण पांठीबा आहे हे दाखवण्यापुरते.बिचारे गंगाधरपंताना गंगापुरच्या वाड्यात काडी इतकीही सत्ता नव्हती.बहिणीच्या कारभारात जराही ढवळाढवळ खपत नसल्यामुळे आयुष्याची बरीचशी वर्षे त्यांनी कुचंबनेत काढली.आपल्यामुळे हीच्या वाट्याला वनवास आला या ओझ्याखाली समस्त रास्ते मंडळी तहहयात दबलेली होती.

      गंगापूरी वाड्यात रोज सकाळ संध्याकाळ ५०-६० पाणं पडायची!कोण्या मंदिराचा जीर्णोधार,कधी एखाद्या नदीस घाट बांधणे,राहत्या वाड्याचे फुटकळ बांधकाम,दुरुस्ती याशिवाय लघु रुद्र,महारुद्र,नवचंडी, अशा कामावर त्यांच्या वर्षासनातुन जो पैसा खर्च होई त्यावर गोपिकाबाईचे बारीक लक्ष असे. पुण्याचा कारभार नाही मिळाला तरी गंगापूरचा कारभार पाहत होत्या.दुधाची तहान ताकावर भागवत होत्या.या सार्‍या गोष्टीसाठीही त्यांची वेळ ठरलेली होती. कुणाला भेटायचे असेल तर याच वेळी, नंतर नाही.अगदी पुण्यावरुन जरी कोणी आलच तर त्याला दुसर्‍या दिवसाची वाट बघावी लागत.त्यांचा साराच कारभार अगदी साचेबंद,आखीव,रेखीव!

       दुपारचा वेळ स्वतः महाभारत वाचण्यासाठी राखुन ठेवला होता.त्या वेळी एकट्या असतांना कुणीही आलेले त्यांना खपत नसे.एकदा पुरानिकबुवांनी न राहवुन भीत भीत म्हणाले,घरांत महा भारत वाचल्याने घरांत बखेडे होतात, एवढे म्हटले मात्र,त्या इतक्या संतापल्या की,परत त्यांच्या पोथीवाचनात टोकायची हिंमत कोणी केली नाही.तेवढ्यात रामचंद्रपंत येऊन म्हणाले,भेटीची वर्दी द्यायची होती.आवाज चढवुन म्हणाल्या, भेटीची वेळ कधीच संपली आहे,आतां उदईक!ते म्हणाले,मी परोपरीने त्यांना सांगुन पाहिले पण ते म्हणाले,भेट झाल्या शिवाय अन्न ग्रहण करणार नाही.कोण तालेवार आहे?रघुनाथराव पेशवे!अजिजीने पुनः विचारले आणु कां त्यांना इथे?ठिक आहे,त्यांना दिवानखाण्यात वाट बघण्यास सांगा.अंधार्‍या माजघरांत बसलेल्या गोपिकाबाई एकट्या विचार करुं लागल्या,एक तप होऊन गेले त्यांच्या भेटीला.भूतकाळात हरवल्या.चलचित्रा प्रमाणे घडलेला प्रसंग मनःचक्षुसमोर साकार झाला.

          काकाss काकाss मला वाचवा..

बेभान धावणारे किडमिडित नारायणराव त्यांच्या पाठलागावर असलेले धिप्पाड गारदी,समोर येईल त्यास कापुन काढत येणारे गारदी..दिल्लीदरवाजातुन आलेल्या बुधासिंग क्षणांत तलवारीच्या घावाने खाली कोसळला.दिंडी दरवाजा लावाण्यास गेलेले आबाजीपंतांचा कोथळा बाहेर आला.खाजगीकडचा कारकुन इच्छारामपंत गाईस कोणी मारणार नाही या विचाराने,गायीमागे लपले,तर गाईसकट त्यांचा चिखल झाला.दोन कुळंबिणी जिन्यावरुन पळतांना त्यांचीही खांडोळी झाली. नारायणरावांचा शागिर्द त्यांना गदागदा उठवत गारदी आले…गारदी आले.., पलंगावरुन ताडकण उठुन आतल्या जिन्याने पार्वतीबाईकडे गेले असतां, भोळसर पार्वतीबाईनी काकाकडे जायला सांगीतले,आयतेच शिकार्‍याच्या ताब्यात सावज… शेजारच्या वाड्यात नाना फडणीसाकडे जावे तर..मुलखाचा भितरा…त्यांची सोवळी मातोश्री पानिपत वर हरवली तर तिचा शोध न घेता स्वतःचा जीव वाचवुन पळुन आला तो काय रक्षण करणार होता?

          गोपिकाबाईंनी समोरच्या पोथीतील पान उचलले…कोणता अध्याय?कोणते पान? काकाच्या कमरेला मिठी मारुन जीवाची भीक मागत,काका! सारं राज्य घ्या..मला कैदेत टाका…दुखवल्या सापाला सोडतं कोण?सुमेरसिंग धावुन आला तेव्हा दादांनी लोटुन दिलं.तुळ्या पवारानं मेलेलं ढोर ओढावं तसं नारायणरावांचे पाय धरुन ओढलं,तलवारी सपकन वर गेल्या. माधवराचा हुजर्‍या चापाजी टिकेकर त्यांना वाचवायला गेला तर त्याची खांडोळी झाली.शेवटच्या आरोळीने शनिवारवाडा थरारुन उठला.काकाss

        घशातुन फुटणारी किंकाळी गोपीकाबाईनी जीवाच्या कराराने गिळली

माजघराच्या खिडकीतुन पिसाट वारा आत घुसला,सारी महाभारताच्या पोथीची पानं घरभर विखुरली….

               क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
            दि.  २८-४-२०२१.

गोपिकाबाई चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading