
कैकयी चरीत्र रेखाटण्यापूर्वी तिचे पिता अश्वपतींविषयी माहिती सांगणे आवश्यक आहे केकयाराज्य फार मोठे नसले तरी अगदीच लहानही नव्हते.केकयप्रदेश सप्तनद्यांनी वेढलेला,व पर्जण्यही उत्तम असल्यामुळे तेथील जमीनी सुपिक होत्या.त्यामुळे विपुल अन्नधान्य पिकत…………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! कैकयी एक रहस्य !!!
!! प्रस्तावना !!
नमस्कार !!
आतांपर्यंत ४८ व्यक्तिचरित्रे वेगवेगळ्या
विषयांवर लिहिलीत.त्यात कांही रामायण महाभारतातील पात्रे, तर कांही ऐतिहासिक, कांही संतचरित्रे आणि इतरही व्यक्तिरेखा प्रस्तुत केल्यात. आपण सर्वांनी माझे भरभरुन व कांहींनी प्रत्यक्ष फोन करुन कौतुक करुन प्रोत्साहित केले.त्यामुळे माझा उत्साह द्विगुणित होत गेला.मनोबल वाढत गेले आणि मी लिहित गेले.
आतां आपल्यासमोर घेऊन येत आहे रामायणातील आगळे वेगळे असलेलं आणि खलनायीका ठरवल्या गेलेले व्यक्तिरेखा कैकयी!
नेहमीप्रमाणे आपल्या क्रीया प्रतिक्रीया अपेक्षित!
वास्तविक खलनायीका ठरवल्या गेलेल्या कैकयीवर लेखन करणे अवघडच! वाचकांचा दृष्टीकोण लक्षात घेऊन लिहावे लागते.त्यांच्या पसंतीस उतरायला हवय! या सर्वांचा विचार करुन हे जड शिवधनुष्य पेलण्याचा मी अल्पसा प्रयत्न केला आहे. आपण सर्वांनी सांभाळून घ्यावे.
रामायण महाकाव्य हे मुळातच विविध कथा उपकथांनी युक्त असल्यामुळे पौराणिक कथेची बैठक ढळू न देता वाचकांना त्या काळात घेऊन जावे लागते. रामायणात असलेल्या अनेक उपकथांपैकी श्रावणबाळा च्या हत्येची कथा महत्वाची आहे. दशरथ राजाचे हातून नकळत झालेल्या श्रावणाच्या हत्येमुळे त्याचे दुःखी,अंध व वृध्द मातापिता दशरथराजाला शापवाणी उच्चारत म्हणतात, हे राजा! पुत्रवियोगाच्या यातना सहन करत आम्ही जसा प्राण त्यागत आहोत, तशाच पुत्र वियोगाच्या यातना होऊन तुझे प्राण जातील.
आणि ही शापवाणी अखेर खरी झाली.
सर्वांच्या उपेक्षेचा विषय असलेली कैकयी ही आपल्या अद्वितिय व्यक्तिमत्वामुळे नव्याने केवळ माहितच झाली नाही तर, एक स्री काय करू शकते हे लक्षात येते. संपूर्ण रामायण घडले ते तिच्याचमुळे. दशरथ राजांच्या तिन्ही राण्यांमधे तिचे वेगळेपण अनेक गुणांनी दिसून येते.तिच्याच बरोबर भरतही आठवल्याशिवाय राहत नाही. भरत आपल्या निःस्पृह मनोनिग्रहाने मातेच्या महत्वा कांक्षेला छेद दिल्याने घराणेशाही लोकांच्या डोळ्यात निश्चित अंजन घालणारे आहे.
कैकयी दुर्देवी अशी की, ती केवळ दोन महिन्याची असतांनाच तिची माता शुभलक्षणा तिला टाकून गेली. कारण कैकयीचे पिताश्री अश्वपतींनी, तिची माता त्यांच्या जीवावरच उठल्यामुळे त्यांनी तिचा त्याग केला. त्यामुळे बाल कैकयीच्या संगोपनासाठी मंथरा नावाची दासी व दुधआई म्हणून राजमहालात आणल्या गेली. कैकयी कलेकलेने वाढत होती. थोडी मोठी झाल्यावर अश्वरोहण,वेद,शास्रे,पुराणे यात ती प्रविण झाली.लक्षवेधी नेमबाजीत तिच्या तोडीचा कोणी नव्हता.व्यवहारदक्ष होती
ती लहान असतांना तिच्या सख्यांसोबत उपवनात खेळायला गेली असता, तिथे एक ऋषी तप करीत होते. ते ध्यानस्थ असतांना कैकयीने जवळच एका जळलेल्या झाडाच्या कोळश्याची भुकटी करुन त्यांच्या तोंडाला फासली.त्यांचे ध्यान संपल्यावर त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तिला शाप दिला.तुझ्या कृत्या मुळे तू सर्वांच्या निंदेस पात्र होशील.तुझ्या पतीचे प्राण जाण्यास तू कारक होशील. ही कथा सत्य किंवा पुराणकथा असेलही कदाचित, पण…
जिचे स्वपुत्रापेक्षाही रामावर जास्त प्रेम होते, ती खरोखरच खलनायिका किंवा दुष्ट होती का? खचितच नाही! उलट तिच्या महान त्यागामुळे रावणासारख्या बलाढ्य राक्षसाच्या तावडीतून भारतवर्ष मुक्त झाला.आणि स्वतः मात्र सर्वांच्या उपेक्षेची पात्र ठरुन नेहमी साठी जननिंदा ऐकत पुत्राच्या मनातून उतरुन त्याची निर्भत्सना सहन करत राहिली.
देवसुर लढाईत शंबरासुराच्या हातुन तिने दशरथराजाचे प्राण वाचवले होते म्हणून ती नाही नाही म्हणत असतांनाही त्यांनी तिला दोन वर मागायला सांगीतले होते.त्यावेळी गरज नसल्यामुळे राखून ठेवले होते.कालांतरा ने ती विसरुनही गेली होती. रामराज्यभिषेका वेळी मंथराने तिचे वडील अश्वपतींना राजाने वचन दिले होते की, कैकयीला होणार्या मुलाचाच राज्यभिषेक होईल.या वचनाची व राजाने दिलेल्या वरांची कैकयीला आठवण करुन दिली.त्या मानीनीने पित्याच्या वचनाचा आधार न घेतां राजांनी दिलेल्या वरांचा उपयोग केला.एका वराने भरताला राज्य व दुसर्या वराने रामाला १४ वर्षे दंडकारण्यात वनवास मागीतले.पुत्रवियोगाने आपल्या प्राणप्रिय पतीचे प्राण जात आहे, आपण त्यांच्या मृत्युस कारणीभूत ठरत आहो हे उघड्या डोळ्याने बघत असूनही ती आपल्या निर्णयावर कायम राहतांना तिला स्वतःशी किती झगडावे लागले असेल,मनाला किती यातना झाल्या असतील याची कल्पनाच केलेली बरी! देशहितासाठी, राष्र्टहितासाठी आपले सर्वस्व पणाला लावले हे कुणीच लक्षात न घेता तिला दुष्ट म्हणूनच सर्वांनी धुत्कारले.
या सर्वांवरुन ती शापित होती की, जगाचा उध्दारकर्ती होती हा प्रश्न पडतो. युध्द निपून,व्यवहारकुशल, पतिपरायण,अनेक विद्येत पारंगत असलेली विदूषी एका शुद्र दासी मंथरेच्या सांगण्याला बळी पडली हे पटत नाही विधिलिखित आधीच ठरले होते.रामाचा जन्म, अवतारच मुळी रावणसंहारासाठी झाला होता. निमित्य मात्र कैकयीला व्हावे लागले.तिच्या या महान त्यागाला कोटी कोटी प्रणाम!
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. २५.३-२०२२.
!!! कैकयी !!!
भाग – १.
कैकयी चरीत्र रेखाटण्यापूर्वी तिचे पिता अश्वपतींविषयी माहिती सांगणे आवश्यक आहे केकयाराज्य फार मोठे नसले तरी अगदीच लहानही नव्हते.केकयप्रदेश सप्तनद्यांनी वेढलेला,व पर्जण्यही उत्तम असल्यामुळे तेथील जमीनी सुपिक होत्या.त्यामुळे विपुल अन्नधान्य पिकत होते.शेजारीच यवनांचा प्रदेश असल्यामुळे सर्व प्रकारचा व्यापारउद्दीमही व्यवस्थित चालत होता.ही हरिके नावाची राजधानी केकय नावानेच परिचित होती. अश्वपतींचे पिताजी अश्व शौकीन असल्यामुळे सहाजिकच अश्वपतींनाही घोड्यांचे वेड होते. त्यांच्या अश्वशाळेत विविध प्रकारचे अतिशय सुंदर जातीवंत,उमदे, वेगवानगतीचे तरतरीत घोडे होते.ते अश्वपरीक्षेत तरबेज तर होतेच पण जखमी किंवा आजारी घोड्यावर योग्य औषधींची माहितीही होती. त्यांचे हे अश्वप्रेम बघून, अश्वनिर्मिती करणार्या वसूने प्रसन्न होऊन त्यांना वर दिला. यापुढे तुला “अश्वांचा देव” म्हणून तुला ओळखेल.जखमी व आजारी अश्वांना गुण त्यामुळे देशी विदेशीचे राजे रजवाडे अश्वांच्या उपचारासाठी व अश्व परीक्षणासाठी तुझ्याकडे येतील.
तुझी ही भूतदया पाहून ईश्वरसेवाच ठरेल.तुला अश्वांच्या भाषेबरोबरच पशुपक्षाची ही भाषा कळेल पण हे गुपित तुला उघड करतां येणार नाही.ज्या दिवशी कोणाला सांगशील तत्क्षणी तुला मृत्यु येईल.तुझ्या कठीण प्रसंगी माझे स्मरण स्मरण केल्यास तुझ्या सहायार्थ धावून येईल. आणि वसू अंतर्धान झाले. हा कसला वर? वर होता की शाप? पण पालन करणे भाग होते.
गांधारदेश अश्वांसाठी जसा प्रसिध्द आहे तसाच स्रीसौंदर्यासाठीही प्रसिध्द आहे.उत्तम अश्व खरेदीसाठी अश्वपती गांधार देशी तक्षशिला येथे गेले. गांधार नरेशांनी त्यांचे यथोचित स्वागत करुन त्यांची सर्व जबाबदारी पुत्री युवराज्ञी शुभलक्ष्मीकडे सोपवली. तिला पाहताच अश्वपती तिच्या प्रेमात पडले.त्यांनी तिचा हात मागीतल्यावर गांधारनरेशांनी आनंदाने मागणी मान्य केली. कांही दिवसांत त्यांचा विवाह तक्षशिलेत संपन्न झाला.
शुभलक्षणाला स्वतःच्या सौंदर्याचा फार गर्व! शिवाय अश्वपतींचे पिताश्रींचे अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे राज्याचा भार त्यांचेवर आल्याने ते राजकारणात गुंतले.आणि अंतःपुरात शुभलक्षणाचे एकाधिकार स्थापन झाल्यामुळे ती मुळचीच हट्टी आणखीनच हट्टी व दुराग्रही बनली.
लग्नानंतर १५ वर्षात त्यांना सात पुत्र व एक कन्या झाली.ही कन्या आईसारखीच सुंदर होती. सात पुत्रामधे एकटीच कन्या असल्यामुळे जास्त लाडकी होती.असा सुखी संसार सुरु असतांनाच ती घटना घडली.आणि सार्या आयुष्याची उलथापालथ झाली.
कैकयी जेमतेम दोन महिन्याची असेल,एके दिवशी शुभलक्षणेने उपवनात जाण्याचा हट्ट पतीजवळ केला.त्यांनी परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न करुनही राणीने हट्टी राणीने हेका सोडला नाही.अखेर छोट्या कैकयीला घेऊन उपवनात गेले.विहार करुन एका आम्रवृक्षाखाली बसले असतां, आम्रवृक्षा वर बसलेल्या हसंहसनीचे आपसातील बोलणे ऐकून राजाला हसू आले. राणीला वाटले ते आपल्यालाच हसले म्हणून हसण्याचे कारण विचारले, त्यांना वसूने दिलेल्या वराची आठवण झाली.आणि कारण सांगण्याचे टाळले.पण राणी हट्टालाच पेटली तेव्हा राजा म्हणाले, हट्ट करुं नकोस.ज्याक्षणी तुला सांगेल तत्क्षणी तू विधवा होशील.तिला ते असत्य वाटले. आणि इरेलाच पेटली.ती त्यांच्या जीवावर ऊठलेली पाहून राजाला भयंकर राग आला आणि तिरिमिरितच तिला गांधारदेशी तिच्या पित्याकडे पोहचती केली ते कायमचीच त्यानंतर गांधारदेशाचे कायमचे संबंध तोडून टाकले.पुढे तिचे काय झाले हे कळले नाही.
दोन महिन्याच्या बालिका कैकयीचा प्रश्न ऐरणीवर आला.शोध घेतल्यावर, नुकतीच बाळंत होऊन तिचे बाळ दगावलेली मंथरा दासी आणि दुधआई म्हणून कैकयीच्या संगोपनासाठी राजवाड्यात आणली. कैकयी बरोबरच मंथरा सातही राजपुत्रांची काळजी घेत असल्यामुळे राजा निश्चिंत झाला.
कैकयी एकटीच कन्या असल्यामुळे ती राज्याची व भावांची लाडकी होती. थोडी मोठी झाल्यावर भावंडाबरोबर गुरुकुलात जाऊ लागली.तिथे तिने वेद,शास्रे,धनुर्विद्या, तलवार या सर्व विद्येत तरबेज झाली.त्याच बरोबर अश्वदौडीची कलाही अवगत केली. तिचे विद्या ग्रहण करण्याचा आवाका पाहून सारे थक्क झाले.ती पित्याबरोबर शिकारीलाही जाऊ लागली. लक्षवेधी नेम धरण्यात एखाद्या निष्णात धनुर्धराप्रमाणे प्रविण झाली.युध्दकला व सारथ्य कलेत तिचा हात कोणी धरु शकत नव्हतं. एकदा राजाबरोबर ती शिकारीला गेली असता.घोडा जायबंदी झाला व समोर वाघ आल्यामुळे त्यांच्या हातातील धनुष्य अचानक खाली पडले.हाती शस्र नसल्यामुळे आपली घटका भरली असे वाटून त्यांनी डोळे मिटले.
डोळे उघडले पाहतात तो काय? कैकयीच्या लक्षवेधी बाणाने वाघ मरुन पडलेला…
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. २६-३-२०२२.
!!! कैकयी !!!
भाग – २.
एकदा कैकयी सख्यांबरोबर उपवनात वनविहाराला गेली असतां तिथे नदीकाठी ध्यानस्थ बसलेल्या ऋषींच्या तोंडाला तिने काळा रंग लावला.त्यांना कळल्यावर कोपिष्ट होऊन शाप दिला, जसे आज तूं माझ्या तोंडाला काळे फासले तसे भविष्यात तुझ्या कृत्याने तुझे तोंड काळे होईल.सर्वांच्या निंदेस व उपहासास पात्र होशील. कैकयी दुःखी होऊन महालात परतली.आणि तिचा सर्व अवखळपणाच लुप्त झाला.
कैकयी आतां सोळा वर्षाची सुंदर तरुणी झाली. तिच्या विवाहासाठी वरसंशोधना चा विचार सुरु असतांनाच, केकयादेशाच्या समृध्दीबद्दलच्या वार्ता जगभर पसरल्या होत्या.
त्या ऐकून राक्षसराज लंकाधिपती रावण केकयदेशावर चालून येत असल्याची बातमी गुप्तहेराने आणली.अश्वपती चिंतीत झाले. महाबलाढ्य,मायावी युध्दात प्रविण विपुल शस्रे व अगणित राक्षससैन्य असलेल्या रावणाशी टीकाव लागू शकणार नाही.राक्षसाला हरवणारे दोनच वीर आहेत.एक इंद्रजीतपुत्र वाली व दुसरा सहस्रार्जुन! वालीने रावणाचा पराभव केला होता त्यामुळे रावणाने वालीशी मैत्रीपूर्ण संबंध जोडले होते. आणि दुसरा सहस्रार्जुन! तो क्रूर असल्यामुळे त्याला मदतीला बोलावणे म्हणजे,स्वतःच्या पायावर कुर्हाड मारुन घेण्या सारखे होते.अखेर अयोध्या सम्राट दशरथराजा रावणाशी मुकाबला करुं शकेल असे वाटून
मदतीसाठी दूत पाठवून त्यांना पाचारण केले.
केकयदेशावर आक्रमण करण्यास पुष्पक विमानाने रावण येत असतां वाटेततील सरोवरात सुदर ललना विहार करीत असलेल्या दिसल्यावर त्याने आपले विमान खाली उतरवले.ते सरोवर सहस्रार्जुनाचे होते.रावणाने केलेली कुरापत त्याला चांगलीच भोवली. सहस्रार्जुनाने त्याचा पराभव केल्याने त्याला लंकेला परत फिरावे लागले आणि केकयदेशा वरचे संकट टळले.दशरथराजाच्या मदतीची आवश्यकता नाही म्हणून अश्वपतींनी दुसरा दूत पाठवला.
केकयदेशात अश्वांची स्पर्धा आयोजित करण्याची प्रथा पूर्वापार चालत असे.या स्पर्धेत देशोदेशीचे राजे,युवराज स्पर्धक म्हणून आणि अश्वखरेदीची मोठी बाजारपेठ असल्यामुळे अश्व विक्रीसाठी भारत खंडातीलल वाणिज्यक अश्व घेऊन येत असत. यावर्षी चक्रवर्ती सम्राट दशरथराजा अश्वस्पर्धेत भाग घेण्यासाठी आणि उमदे घोडे खरेदीसाठी अश्वपरीक्षातज्ञ व उत्तम सारथी सुमंतसह केकयदेशात आले.अश्वपतींनी त्यांचे यथोचित स्वागत करुन त्यांच्या रहाण्याची उत्तम व्यवस्था केली.दुसरे दिवशी अश्वपतींना राजा म्हणाले,आम्ही आपले अश्व पाहू इच्छितो. त्यांना अश्वशाळा दाखवायला युवराज युधाजितसह अश्वपती अश्वशाळा दाखवायला घेऊन गेले असतां घोडदौड करुन कैकयी घोडा घेऊन अश्वशाळेत दाखल झाली.राजा दशरथां ची व तिची दृष्टादृष्ट झाल्याबरोबर दशरथराजा पहिल्या नजरेतच तिच्या प्रेमात पडले. अश्व परीक्षा संपली.निवांत झाल्यावर कैकयीशी विवाहाची मागणी अश्वपतींकडे केली.
अश्वपती व युधाजित समोर मोठा पेच पडला.दशरथराजा वयाने बरेच मोठे शिवाय आधीच्या दोन राण्या असतांना आपली सुकुमार कन्या कशी द्यावी? ते चक्रवर्ती सम्राट व बलाढ्य सेनायुक्त असल्यामुळे नकारही देऊ शकत नव्हते. त्यांनी तिचे हरण केले तर आपण त्यांचेशी मुकाबला करुं शकणार नाही हा विचार करुन, युवराज्ञी कैकयीला विचारुन उद्यापर्यंत कळवतो म्हणून वेळ मारुन नेली.
रात्री उशीरापर्यंत मंथरा,युधाजित व अश्वपतींनी विचार विमर्श करुन ठरवले की, कैकयीला होणार्या पुत्राचाच राज्यभिषेक व्हावा असे वचन दशरथराजांना मागावे.ते ही अट कधीच मान्य करणार नाही. आणि केलीच तर एक वय सोडले तर सूर्यवंशासारख्या महान कुल व बलाढ्य सम्राटाची महाराणी होईल हे आपल्याला भविष्यात हितकारकच ठरेल.
दशरथराज्याने वचन दिल्यावर कैकयीच्या विवाहाची तयारी सुरु झाली. ही आनंदवार्ता केकयनगरीत वार्यासारखी पसरली.अयोध्येतून कुणी येणार नव्हते. महामंत्री सुमंत,सोबत असलेली शिबंदी एवढेच राजाकडचे होते.राजांना जायची घाई असल्या मुळे अश्वस्पर्धा व खरेदीसाठी आलेल्या देशोदेशीच्या राजांना आमंत्रित केले. चैत्रशुध्द द्वितियेला अश्वपतींनी आपल्या कन्येचे सालंकृत कन्यादान केले.अश्वस्पर्धेत दशरथ राजा प्रथम आले म्हणून पुरस्कार आणि विवाहाचे आंदन म्हणून सहस्र उमदे अश्व आणि चक्रवर्ती सम्राटास साजेशे धनद्रव्ये,गज, गोधन,वृषभ आंदन दिले.कैकयीला अयोध्येत एकटेपणा जाणवू नये म्हणून धूर्त दासी मंथरेला वधूची पाठराखण म्हणून पाठवले.
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. २७-३-२०२२.
!!! कैकयी !!!
भाग – ३.
सात पुत्रांनंतर झालेली कन्या व माता विहिन सर्व गुण संपन्न कैकयी अश्वपतींची अतिशय लाडकी होती.एकुलती एक लाडकी कन्या आपल्यापासून दूर जात असल्याचे विरह दुःख पिता व जेष्ठ बंधू युधाजितला झाले. जड आणि भरल्या अंतःकरणाने तिची सासरी रवानगी केली.
६-७ दिवसांच्या प्रवासानंतर नवदांपत्य अयोध्या नगरीत प्रवेशले.महाद्वाराच्या प्रवेश दरवाज्यात सुवासिनी,महाराणी कौशल्या व सुमित्रादेवींनी दोघांनाही औक्षण करुन स्वागत केले. केकयदेशाच्या तुलनेत अयोध्या कितीतरी पटीने भव्य होती.कैकयी तरुण, सौंदर्यवती व सर्वगुणसंपन्न असल्यामुळे दशरथ राजांचा ओढा सहाजिकच तिच्याकडे होता. त्यांचा कामाव्यतिरिक्त वेळ जास्त तिच्याच सानिध्यात जात असे.त्यामुळे तिचा दरारा वाढला पण मंथरा सर्वांशी फटकून वागत असल्यामुळे कैकयीची प्रतिमा मलिन होत आहे हे कळूनही तिच्या विरुध्द कांही करु शकत नव्हती.
अयोध्येत कैकयीला येऊन २-२॥ वर्षे झाली होती.राजदरबार सुरु असतांना एके दिवशी दशरथराजासाठी इंद्रदूत संदेश घेऊन आला. इंद्रदूत म्हणाला, दंडकारण्यातील मायावी राक्षस शंबासुराने देवेद्रांशी युध्द पुकारल्याने इंद्रासन डळमळीत झाले.त्यासाठी देवेंद्राने आपली मदत मागीतली आहे.
शंबरासुर दैत्य दंडकारण्यातील वैजयंती नगरीचा रहिवासी असून तो अतिशय उदंड झाला होता.दंडकारण्यातील लोक,ऋषीमुनीं वर अत्याचार करीत असे.यज्ञयाग,होमहवन करणार्या ऋषींना त्रास देऊन त्यांच्या कार्यात विघ्न आणत असे.त्यांच्या बायकामुलींना पळवून त्यांच्यावर अत्याचार करीत असे.देव सुध्दा या मायावी राक्षसाचा पराभव करुं शकत नव्हते.आतांतर त्याने प्रत्यक्ष देवांचा राजा इंद्रा बरोबरच युध्द पुकारले होते.या संग्रामात त्याने इंद्रावरही मात केली होती.इंद्राच्या वज्र देखील त्याचेवर चालत नव्हते म्हणूनच त्यांनी राजा दशरथांना मदत मागीतली होती.
क्षत्रिय धर्मानुसार संकटात सांपडलेल्या कुणासलाही विन्मुख न पाठवणे हे त्यांचे ब्रिद होते.आतां तर प्रत्यक्ष देवेंद्रानींच बोलावले होते.चतुरंगसेना, सेनापतीसह दशरथ राजा शंबरासुरावर चढाई करण्यास निघाले असतां कैकयीने बरोबर येण्याचा हट्ट धरला. दशरथराजाने तिला परावृत्त करण्याचा बराच प्रयत्न केला पण ती आपल्या निर्णयावर ठाम होती.ती म्हणाली,मी धनुर्विद्येत तरबेज असून अश्वरथाचे उत्तम सारथ्यही जाणते.मायावी राक्षसाबरोबर युध्द करायचे तर त्यांचे डावपेच ओळखून पवित्रा घेणे आवश्यक असते. त्या मुळे माझा उपयोगच होईल.त्यावेळी तिला त्या ऋषीचे शब्द आठवले. “तुझ्या शौर्यामुळे तू आपत्कालीन पतीचे प्राण वाचवशील व त्यांच्या आदरास पात्र ठरशील ” त्यामुळेही तिने युध्दावर येण्याचा हट्ट धरला.
अमात्यांनी तर मी माझ्या मातेच्या गुणांवर गेली आणि पित्याच्या अति लाडाने वाया गेली असे म्हणे पर्यत त्यांची मजल गेली.
महामंत्री सुमंत उत्तम सारथी असल्या मुळे त्यांच्याबद्दल शंका घेण्याचे कारणच नव्हते.युध्दात सारथ्य तेच करणार होते.इथे तिच्या अश्वज्ञानाबद्दल सारे अनभिन्न होते. माहित होते फक्त दशरथराजा आणि मंथराला! शेवटी सारथी बनलेल्या सुमंताजवळ रथनीडच्या सौद्यात बसावे व त्यांनी मार्गदर्शन करावे या अटीकरच तिला युध्दावर नेण्यात आले हेच तिच्यासाठी खूप होते.आपत्कालीन स्थितीत सुमंतांना बाजूला सारुन अश्वरथनीडा वर नियंत्रण मिळवू शकणार होती.
दक्षिणेतील दंडकारण्यातील वैजयंतीनगरीवर दशरथ महाराज चालून गेले.
शंबरासुरावर प्रतिहल्ला करणारे दशरथराजा हे पहिलेच राजा असावेत. दशरथराजाचे व शंबरासुराचे तुंबळ युध्द सुरु झाले.शंबरासुर हा कसलेला सेनानी व मायावी युध्दात प्रविण होता. तो आपले मायावी अस्रशस्र वापरुन अयोध्यैच्या चतुरंग सैन्याला हैराण करीत होता दशरथमहाराजांनी आपली सारी धवुर्विद्या पणास लावली होती पण त्याचेवर कांहीच परिणाम होत नव्हता.राजांच्या मारापुढे थोडी माघार घेत असे व पुन्हा दुप्पट जोमाने आक्रमक होत असे. त्याच्यावर कसे नियंत्रण मिळवावे या विचारात क्षणकाल गुंतले असे पाहून त्याच क्षणाचा फायदा शंबरासुराने घेतला.
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. २७-३-२०२२.
!!! कैकयी !!!
भाग –४.
क्षणभर दशरथराजा गाफील झाल्याचा फायदा घेऊन शंबरासुराने त्यांच्यावर तीव्र हल्ला करुन त्यांना मूर्च्छित केले.सुंमत्रही जबर जखमी झाले.प्रसंगसावध कैकयीने सुमंत्रांना बाजूला करुन रथावर ताबा मिळवला.अश्वाचे वेग हाती घेऊन अश्वकौसल्य पणाला लावून रथ युध्दभूमी बाहेर काढला.ज्ञान असलेली औषधउपाययोजना व जखमेवर मलमपट्टी केली.थोड्याचवेळात महाराज शुध्दीवर आले. सुमंत्रांना बाजुला सारुन सारथ्याची सुत्रे तिने हाती घेतले व कौसल्याने सारथ्य करत रथ युध्दभूमीवर परत आणला.शंबरासुरास वाटले महाराज पराभूत होऊन परत गेले,परंतु त्यांना परत युध्दभूमीवर आलेले बघून तो थोडा चपापलाच! दोघांमधे पुन्हा तुंबळ युध्द सुरु झाले.त्याच्या सैन्यात बरेच गज होते.त्यांच्या गळ्यात पितळी घंटा बांधलेल्या होत्या. शंबरासुरानेही आपल्या गळ्यात कास्याची घंटा बांधली होती.त्या घंटेचा आवाज इतर घंटेपेक्षा वेगळा आहे हे कैकयीच्या लक्षात आल्याने तिने आपले सारथ्य कौशल्य पणाला लावले.
शंबरासुराने मायावी तंत्राचा उपयोग करुन मधेच अदृष्य होत असे.तेव्हा कैकयीने सारथ्याच्या रुपात दशरथराजाला सुचविले, तुम्हाला अवगत असलेल्या दिव्यास्र व रववेधी धनुर्विद्येचा वापर व अलोकन करुन त्याच्या गळ्यातील घंटेच्या आवाजावर दिव्यास्राने वेध घ्यावा. तिच्या सुचनेनुसार राजाने दोन्ही विद्येचा वापर करुन त्याला व त्याच्या सैन्याला जेरीस आणले.आतां तो अदृष्य होऊनही महाराजां समोर त्याची मात्रा चालत नव्हती.त्याला प्रत्याघात करण्याची संधीच मिळत नव्हती. अखेर त्याचा पराभव होऊन धारातीर्थी पडला. अयोध्याच्या सेनेने मोठा जल्लोष केला.राजा कैकयीवर बेहद खूश झाले.
शंबरासुराचा वध झाला तोच मुळी कैकयीच्या प्रसंगावधान,धाडस,सारथ्यकौशल्य आणि प्रसंगोचित युध्दसल्ल्यामुळेच राजाचे प्राण वाचले.त्यांना तिच्याबद्दल मोठा अभिमान वाटला. युध्दछावणीच्या कक्षात आल्यावर त्यांनी तिला प्रेमालिंगन देत म्हणाले,हे शुभदर्शने
तू केवळ सुंदरच नाही तर शूर आणि धाडसीही आहेस.आजचा विजय केवळ तुझ्यामुळे प्राप्त झाला.आम्ही तुझ्यावर बेहद संतुष्ट झालोय. तुला उपहार म्हणून दोन ‘वर’ देत आहोत.या दोन वरांद्वारे तुझी कोणतीही इच्छा पूर्ण करु. तेव्हा निःसंकोच हवं ते माग!
कैकयी म्हणाली, स्वामी! उपहार देऊन संतुष्ट व्हावे यासाठी कां मी आपल्याबरोबर रणभूमीवर आले? मी माझे क्षात्राणी धर्माचे पालन करुन कर्तव्य पार पाडले, आपल्याकडून कांही मिळवण्यासाठी नाही. स्वामी, आपण आम्हा तिघींचे सर्वस्व आहांत.आपल्या सुरक्षित शिवाय आणखी काय हव? अयोध्येत मला काय कमी आहे? सर्वी सुखे पायाशी लोळण घेत आहेत. आमचे सौभाग्य आबाधित राहावे हाच मोठा उपहार आहे.
पण दशरथ राजा कांहीही ऐकायला तयार नव्हते तेव्हा म्हणाली,आपला एवढा आग्रहच आहे तर, योग्यवेळी हे वर मागून घेईन
तथास्तू! राणी, तू केव्हाही कांहीही माग, प्राण जाईल पण वचन मोडणार नाही हे या रघुकुला चे ब्रिद आहे.तुझे हे वर माझ्याजवळ तुझी ठेव म्हणून सुरक्षित राहिल. त्यावेळी हे वर दिल्याने भविष्यात भीषण परिणाम होतील याची पुसटशी कल्पना देखील तिला नव्हती. हे फक्त नियतीच जाणत होती.
कैकयी ईश्वराजवळ एकच प्रार्थना करीत असे, देवा! मला कधी वर मागण्याची गरज पडलीच तशी वेळ आली तर या वरांनी जगध्दोराचेच कार्य घडो.कालांतराने ती विसरुनही गेली.
शंबरासुराच्या वधामुळे प्रसन्न झालेल्या देवेंद्राने दशरथराजा समवेत कैकयीला स्वर्गात नेण्यासाठी विमान पाठवले. असं म्हणतात की, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही पण या दोघांना जिवंतपणीच स्वर्गसुख अनुभवास मिळणार !
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. २८-२-२०२२.


