
*सीता* आणि *मंदोदरीची* भुमिका सत्य असल्याने त्यांचा विजय झाला, पण त्यांच्या हौतात्म्यानेच! सीतेला *अग्निदिव्य* करावे लागले तर मंदोदरीला *वैधव्य* पत्करावे लागले. एका दृष्टीने ऐहिक सुखाचे समर्पणच करावे लागले, आहुती द्यावी लागली. या पार्श्वभुमीवर मी जी व्यक्तीरेखा रेखाटण्याचा प्रयत्न केला त्यात मुख्य अडचण साधनसामग्रीची! कारण मुळात हे पात्र गौण आहे.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
पतिव्रता मंदोदरी
प्रस्तावना
नमस्कार !!!
आतापर्यंत पंचकन्यापैकी *द्रौपदी* व *सीता* या दोन कन्या लिहुन पाठविल्यात आणि आपण वाचकांकडून भरभरुन आणि उदंड प्रतिसाद मिळाला.
एका वाचकताईने सुचित केल्याप्रमाणे
आता *तिसरी कन्या* लिहुन पाठवित आहे.
वास्तविक पंचकन्या हा विषय पौराणिक आहे. पौराणिक विषय म्हटले की, आजकाल नाक मुरडले जाते. आपल्या अवती भवती एवढ्या ज्वलंत सामाजिक समस्या असतांना आजच्या एकविसाव्या शतकामध्ये पटत नाही व रुचतही नाही. त्यांत असलेली काव्यात्मकता, तात्विकता, नाट्यपुर्णता अनुभवलेली नसते. अशा लोकांना पुराणकथेचेही कांही महत्व असु शकते हे कधीच पटणार नाही का? त्या कथांमधे अनेक मानवी भावनांचे झरे झुळझूळतांना दिसतील! काही पात्रे विचारांची, भावनांची प्रतिके असु शकतात.
*सीता* आणि *मंदोदरीची* भुमिका सत्य असल्याने त्यांचा विजय झाला, पण त्यांच्या हौतात्म्यानेच! सीतेला *अग्निदिव्य* करावे लागले तर मंदोदरीला *वैधव्य* पत्करावे लागले. एका दृष्टीने ऐहिक सुखाचे समर्पणच करावे लागले, आहुती द्यावी लागली.
या पार्श्वभुमीवर मी जी व्यक्तीरेखा रेखाटण्याचा प्रयत्न केला त्यात मुख्य अडचण साधनसामग्रीची! कारण मुळात हे पात्र गौण आहे. असे असले तरी परंपरेने गौरविलेले व्यक्तिमत्व विवेकी सतीचं आहे. ज्याअर्थी आपल्या पुर्वजांनी आणि परंपरेने प्रातः स्मरणीय पंचकन्यामधे स्थान देऊन गौरवले आहे त्याअर्थी संस्कृतिसंवर्धनाच्या दृष्टीने, जीवनमुल्यांचे रक्षण करण्याच्या दृष्टीने निश्चितच तीचे कार्य महत्वाचे, मोलाचे असणारच!
सुसंस्कृत, प्रणयमुग्ध, शौर्य, पराक्रमावर प्रेम करणारी, अत्याचाराने सुखस्वप्नांना तडा गेलेली, अत्याचारांना वैतागुन समजावुन सांगुन परावृत्त करण्याचा प्रयत्न करणारी, विरोध करणारी, विरोधही लटका पडतो हे पाहुन दुःखी, निराश होणारी, अत्याचाराच्या विरोधात ठामपणे उभी राहणारी, युध्दाला चेतावणी देऊन *”शूर विराचं मरण स्विकारा”* हे सांगणारी, प्रजेच्या हितासाठी, नैतिक मुल्यांवर पुनरुत्थान व्हावे यासाठी वैधव्य पत्करणारी, अन् त्याचबरोबरच अंतर्मनात पुत्रवियोगिनी, पतीविरहाच्या कल्पनेने दुःखी असणारी! अशा विविध रुपांत मला दिसलेली भावलेली *”मंदोदरी”* चित्रित
करण्याचा प्रयत्न केलेला आहे.ओ
त्रिभुवनविजेता पती, इंद्रजीतसारखा अतुल पराक्रमी पुत्र, त्रैलोकीचे अफाट वैभव तीच्या पायाशी लोळण घेत असतांनाही या सर्व वैभवात एकटीच राहिली, एकाकी, दीपकळीसारखी!!
*मिनाक्षी देशमुख.*
मंदोदरी
भाग -१
छोटी *मंदोदरी* बाहेर खेळत असतां ‘बाहेर कोणी आगंतुक आलंय’ हे सांगायला आईकडे आली. हेमा बाहेर येऊन आश्चर्याने त्या व्यक्तीस विचारले, “आपण! हो! स्वर्गलोकाहुन महाराज इंद्रांनी आपल्याला कांही देवकार्यासाठी तातडीने बोलावले आहे.” निरोप सांगुन दुत निघून गेला. छोटी मंदोदरी आईजवळ येऊन प्रश्नांचा भडीमार करुं लागली. मायलेकीचा संवाद मयदैत्य कौतुकाने ऐकत होता. थोड्या वेळाने हेमा त्या दोघांचा निरोप घेऊन स्वर्ग लोकी निघुन गेली.
मय आणि देवेंद्र दोघे मित्र होते. इंद्राकडून मयचा भाऊ नमूची मारल्या गेला. त्यामुळे शोकसंततप्त होऊन मयने घोर तपश्चर्या केली. देवांच्या अनेक विद्या मिळवल्या. मयच्या उग्र तपस्येने इंद्राचे सिंहासनच धोक्यात आल्याने हेमा नांवाच्या अप्सरेला मयाच्या सेवेसाठी पाठविले. सेवा करतां करतांच मय आणि हेमाचे प्रेम जुळले. त्यांचा विवाह झाला. थोड्याच दिवसांनी त्यांना सुस्वरुप कन्या झाली. मंदोदरी नांव ठेवले. सर्व कांही सुरळीत, आनंदात सुरु असतांनाच आज देवेंद्राचे बोलावणे आले.
हेमाने देवेंद्राच्या महाली जाऊन प्रणाम करुन बोलावण्याचे कारण विचारले. देवेंद्र म्हणाले, “हेमा…! स्वर्गलोकीच्या अप्सरांनी पृथ्वीवर फार काळ रमणं आणि एकाच व्यक्तीत गुंतुन पडणे योग्य नव्हे. तुला सोपवलेले कार्य पुर्ण झाल्यामुळे तूं आता परत ये”.
” पण माझी मंदोदरी…?” ती म्हणाली.
” ते शक्य नाही. मायापाश तोडुन परत ये ही आज्ञा आहे.”
हेमा जड पावलांनी आणि जड मनाने म्लान वदनाने घरी परत आली. मय तिच्याजवळ जाऊन खिन्नतेचे कारण विचारल्यावर स्पष्ट शब्दात सांगीतले, “इंद्राच्या आज्ञेनुसार देवलोकी जाणे भाग आहे.” मंदोदरीला आईच्या रडण्याचे कारण कळेना…! दीर्घ निःश्वास टाकुन हेमा म्हणाली, “कांही वेळा असं वाटते आपले जिवन आपल्या हाती नसतेच. माणसाच्या उदंड कर्तुत्वाला नियतीच्या इच्छेचा किनारी हा असतोच. आपल्या जीवनाची सुत्र हाती असुन आपण बनतो केवळ कळसुत्री बाहुल्या…..”
दोन तीन दिवस मंदोदरीचे खुप कोड कौतुक करुन एक दिवस ती झोपलेली असतांनाच मयाचा निरोप घेऊन जड अंतःकरणाने हेमा स्वर्गलोकी निघुन गेली.
आईचा विरह मंदोदरीला जाणवु लागला. प्रासादात जीथे तिथे आईची उणीव भासु लागली. एके दिवशी मात्र ताण असह्य झाल्याने ती वडिलांना म्हणाली, “आपण दूर कुठे तरी जाऊं.” त्यावर तिचे तात म्हणाले, “देव, दैत्य, गंधर्व सार्यांना हेवा वाटेल अशी वास्तु उभारतो.” मय हा दानवांचा शिल्पी होता. पुर्वी त्याने अनेक वर्षे तपश्चर्या करुन ब्रम्हदेवाला प्रसन्न करुन त्यांच्या कृपेनेच उशन महर्षींनी ग्रथित केलेले सर्व शिल्पशास्र आणि हवा तो पदार्थ उत्पन्न करण्याचे सामर्थ्य त्याला प्राप्त झाले होते.
हेमाच्या विरहाचे दुःख दूर होण्यासाठी मंदोदरी आनंदात राहण्याच्या दृष्टीने कांही अंतरावरच सौवर्ण अरण्यात मयासुराने आपली सारी कल्पकता उपयोगात आणुन एक आगळा वेगळा संगमरवरी प्रासाद जवळ जवळ वर्षभर खपुन असंख्य हातांनी तयार झाला. प्रासादाबाहेर एक प्रशस्त उद्यान, त्यांत अनेक डेरेदार वृक्ष, कारंजी विपुल सुवर्ण कमळांनी युक्त केले.
क्रमशः
मिनाक्षी देशमुख.
मंदोदरी
भाग – २
मयासुराने एका शुभ मुहुर्तावर होम हवन करुन देवतांची स्थापना करुन मंत्रघोषातच मंदोदरीसह त्याने प्रवेश केला. मयासुराच्या भव्य प्रासादाचे अवलोकन करुन अनेक धनाढ्यांनीही जवळच आपले प्रासाद बांधले. सौवर्ण वनाचे सुवर्ण नगरीत रुपांतर झाले. मंदोदरी नवीन प्रासादाच्या नाविण्यात दुःख विसरली. अनेक मैत्रिणी, दासदासी अन् वैभवांच्या राशीत लोळत असतांनाही आईची आठवण आली की तीला एकाकी वाटत असे.
मयासुराने तिच्या अध्ययनाचीही व्यवस्था केली. आठ दहा वर्षाचा काळ कसा गेला ते कळलेही नाही. तारुण्याने आपले मोहजाल तिच्यावर कधी पसरवयला सुरुवात झाली हे तिलाही समजले नाही.
एकदा मंदोदरी मैत्रीणींबरोबर वनविहाराला नगराबाहेरील वनात आली. थोड्याच अंतरावर सुरम्य सरोवर होते. वनवेडु मंदोदरी देहभान हरपुन हिरवीगार वनश्री तीला मोहवीत होती. तीचे मनाच्या कळीचे फुलांत रुपांतर झाले होते. विवाहाचे सुखद विचार मनांत येऊन या नटलेल्या वनश्रीत दोघांनीच विहार करण्याची कल्पना आल्याने तिला लाजल्यासारखे झाले. स्वप्नात हरवलेल्या मंदोदरीला तीची मैत्रिण म्हणाली, “सख्या फार दुरवर गेल्या असतील.” त्यांना गाठण्यासाठी दोघांनी चलायला सूरुवात केली. तेवढ्यात वृंदाचे लक्ष एक सोनेरी विमान त्यांच्याच दिशेने त्यांच्या कांही अंतरावर उतरले.
ते विमान सुवर्णस्तंभांनी परिवेष्टीत होते. दारे वैदुर्य,रत्ने, हिरे, प्रत्येक दारावर मौतीक माळा, आंतली आसनेही सुवर्ण व रत्नजडीत होती. अंतर्भागात अप्रतिम रेखीव चित्रें, त्यामुळे त्याची मोहकता वाढली होती. मंदोदरी आणि वृंदा भारावुन पाहत असतांनाच विमानाच्या रत्नजडीत जिन्यावरुन एक शक्तीशाली पुरुष खाली उतरला. नीलवर्ण समुद्राप्रमाणे दैदिप्यमान कांती असणार्या त्या पुरुषाच्या मस्तकावर झळाळणारा हिरेजडीत मूकुट. अंगाखांद्यावर रुळणारे अनेक सोन्यामोत्याचे अन् हिर्यामाणकांचे अलंकार त्याचे सौंदर्य वाढवित होते. भरदार पिळदार शरीरयष्टी, लांब हात, मोठे डोळे, झुबकेदार मिश्या ! त्याच्या प्रत्येक पदन्यासाबरोबर भूमी थरथरत होती.
त्या निर्जन वनांत दोघींच्या दिशेनेच येत असलेल्या त्या पुरुषाला पाहुन त्या मनांतुन घाबरल्यात. परंतु एखाद्या किमयागाराने मंत्रमूग्ध होऊन जागीच खिळवुन टाकावे तशी त्यांची स्थिती झाली. तो जवळ येऊन स्निगध स्वरात म्हणाला, “घाबरु नका. या वनात एकटीदुकटीने येण्याचे कारण? आपला काय परिचय?”
“आधी आमचा परिचय सांगतो. पितामह ब्रम्हदेवांचे मानसपुत्र, मुनिराज पुलस्य यांचा नातु, ब्रम्हर्षी विश्वावा यांचा पुत्र! दशग्रीव आमचं नांव! पितामहांना तपाने प्रसन्न करुन अमरत्वाचा वर प्राप्त केलेला आहे. सुवर्ण नगरी लंकेचा लंकाधीश अाहोत आम्ही.”
वृंदा म्हणाली, “लंकाधीश! ही मंदोदरी! दैत्यांचा अधिपती मय व अप्सरा कुळातील हेमा यांची ही कन्या.”
क्रमशः
मिनाक्षी देशमुख
मंदोदरी
भाग -३
सुवर्णाच्या झगझगाटाने तेजाळणारी लंका आज प्रजाजनांच्या आनंदानी आणखीनच उजळुन गेली होती. *आज लंकाधीश दशग्रावाचा विवाह !*
“मातेच्या अप्सरा कुळातील सौंदर्य, मृदु बोलतांना शालीनता, रुपगुणांचा हा अपुर्व संगम असलेली मंदोदरी, आम्हाला आपली निरंतर साथ मिळेल कां?”
ती सलज्जपणे म्हणाली, “पित्याची अनुज्ञा व आपली संमती असेल तरच…!”
आणि तीने प्रेमळ कटाक्ष दशग्रिवाकडे टाकला. त्या कटाक्षातच तिचे सारे अंतःकरण प्रतिबिंबित झाले होते. तिच्याकडे लोभस नजरेने पाहतच तो पुष्पक विमानात बसुन निघुन गेला.
पुलस्त्यमुनी, विश्रावा, कैकसी सारेच लंकेत आले होते. विश्र्वाने कुबेरालाही मतभेद, मानापमान विसरुन लहान भावाच्या अपराधाची करुन लग्नाला यायला सांगीतले. मयासुराने आपल्या लाडक्या कन्येचा विवाह मोठ्या थाटामाटात करुन देतांना मायावी शक्तिंच्या सहाय्याने लंकानगरी जणुं स्वप्ननगरी बनवली होती. मयाने जावयाला त्याने तपाने मिळविलेली एक महान शक्ती भेट दिली.
स्वप्न सत्यात उतरले. शक्तीसागराला शक्तीसरिता मिळाली. दशग्रिवाशी विवाह करुन आनंदाच्या हिंदोळ्यावर तरंगतच मंदोदरीने लंकेत प्रदार्पन केले. तिने वरले होते ते त्याच्या विद्वत्तेला, मुर्तिमंत पराक्रमाला! तो वेदशास्र पारंगत होता. तपःसामर्थ्याने ब्रम्हदेवाकडुन मोठमोठे वर मिळविले होते. वैभव, विद्वत्ता आणि पराक्रम या त्रिवेणी संगमालाच जणुं मंदोदरीने माळ घातली होती.आपल्या संसाराची सुखस्वप्ने फुलवितच ती लंकेत प्रवेशली होती.
आणि….आणि तिच्या स्वप्नांना राजप्रसादाच्या प्रथम पदार्पणातच तडा गेला. ती वैभवशाली प्रशस्त देवघरांतील रत्नजडीत कोंदणात असलेल्या शिवलिंगाला मनोभावे प्रार्थना केली. तिने डोळ्याच्या कोपर्यातुन दशग्रिवाकडे पाहिले. तिथे भक्ती नव्हती. मुखावर पसरला होता अहंकार! कुबेराने त्याला नमस्कार करायला सांगीतल्यावर, गडगडी हास्य करत, “हे….! हे देव… यांना नमस्कार करायचा? उलट या सर्व देवांना जिंकुन लंकेचीच नव्हे तर माझ्या सिंहासनाची चाकरी करायला लावणार आहे.” त्याचे उद्गार ऐकुन पुलस्त्याने रागाने बघीतल्यावर उगाच रंगाचा बेरंग नको म्हणुन दशग्रिवाने नाईलाजाने हात जोडले. त्यातली कृत्रिमता, भक्तीहिनता मात्र सर्वांनाच जाणवली.
हे सारे पाहुन मंदोदरीचा दारुण अपेक्षाभंग झाला. क्षणांत दिसलेले हे सत्य रुप जीवनात किती उग्र रुप धारण करणार याची तीला कल्पनाच करवेना. तिने ज्या विद्वत्तेला वरले होते तो प्रवाह वेगळ्याच दिशेने वाहणार असे दिसुन आले. पहिल्या पदार्पणातच ती नाराज झाली, मन कोमेजुन गेले. भावी विकट आयुष्याची स्वप्ने भेडसावू लागली. भविष्यातील कठीण क्षण डोळ्यासमोर दिसु लागले. नेत्रकलांतील अश्रू गालावर ओघळलेच.
दशग्रिवाला वाटले आपण केलेल्या प्रतिज्ञेने तीच्या डोळ्यांत आनंदाश्रु आलेत. सर्वांच्या समक्ष तीचे चुंबन घेण्यासाठी तो खाली झुकला, हा त्याचा आततायीपणा पाहुन तिला अतिशय चीड, संताप येऊन चेहरा रागाने लाल झाला. तीला मेल्याहुन मेल्यासारखे झाले.
क्रमशः
मिनाक्षी देशमुख
मंदोदरी
भाग-४
पुलस्त्यांची जळजळीत नजर दशग्रावाच्या नजरेला भिडल्यामुळे तो थोडा वरमला. तोच शब्द कानावर आले, “दशग्रिवा! अजुन बरेच धार्मिक विधि व्हायचेत. चल लवकर…!”
त्याच्या पाठोपाठ मंदोदरी खाली मान घालुन जाऊ लागली. तिचे ह्रदयाकाश काळवंडले. कुठेतरी चंद्राला ग्रहण लागले होते. सायंकाळची वेळ होती मंदोदरी महालातील मंचकावर बसुन प्रासादासमोरील विशाल बागेतील फुलझाडं, कारंजातील पाण्याचे तुषार पाहुन तीचे मन पुलकीत करत होते.
५-६ दिवसांपुर्वी घडलेल्या देवघरातील कटु प्रसंगाचा, स्मृतीचा विसर पडला होता. आणि प्रणयकल्पनेने बहरुन गेली. अनेक धुंद विचार तिच्या मनात उमटु लागले, सुखस्वप्नांत हरवल्या गेली.
तोच तिच्या खांद्याला स्पर्श झाल्याने चमकुन बघीतले तर दशग्रिव मागे उभा दिसला. तो आपल्या मिलनासाठी इतका अधिर झाल्याचे पाहुन क्षणभर ती आनंदाने मोहरुन गेली, गोड शिरशिरी तिच्या अंगप्रत्यांगाला व्यापुन गेली, पण क्षणभरच…! देवघरांतला प्रसंग आठवल्याने भयभीत झाली. त्याची अधिरता, उतावळेपणा कांही अशुभ तर करणार नाही ना…? त्यात आज अमावस्या, कातरवेळ, करकरीत तिन्ही सांजा..! तिने बराच प्रतिकार केला. समजावुन सांगीतले, पण प्रणयोन्मादाने बेभान झालेल्या, त्याच्या अविवेकी आग्रहापुढे तिचा सात्विक विवेक दुबळा ठरला. विरोध लटका पडला. त्याने तिच्या कोमल भावना पायदळी तुडवल्या. असहाय्य, हतबलतेने तीला त्याच्या स्वाधीन व्हावे लागले.
दशग्रिव तर तृप्त मनाने निघुन गेला, पण ती मात्र काळोखाबरोबर विचारांच्या खोल गर्तेत बुडुन गेली. पहिल्या मीलनाची तिने किती मृदुमृदल स्वप्नं रंगवली होती, ती सर्व छिन्नभिन्न झालीत. एखाद्या गजराजानं फुललेली बाग उध्वस्त करावी तशी…! या राक्षसवेळेची स्मृति जन्मभर सल ठेवणारा कोणीतरी जन्माला येईल? काय घडेल? या कल्पनेने ती शहारली. मनांत येणारे अशुभ विचार दूर करण्याचा जेवढा ती प्रयत्न करी, तेवढ्याच जोमाने आक्राळविक्राळ रुप धारण करुन मनाभोवती पिंगा घालीत होते. नेहमी चांदण्यांनी लुकलुकणारी, स्निग्ध प्रकाशाने मोहमयी वाटणारी रात्र तिला भावशुन्य, थंड नि काळीकुट्ट वाटु लागली. दुखावलेल्या शरीरापेक्षा मनाच्या गहिर्या वेदनांनी ती काळवंडुन गेली.
राजमाता कैकसीच्या बोलावल्यानुसार त्यांच्या महालात मंदोदरीने प्रवेश करुन नमस्कार केला. कैकसी तिच्या मूलुल चेहर्याकडे पाहुन कारण विचारल्यावर प्रथम मंदोदरीने सांगण्याची टाळाटाळ केली. पण कैकसीच्या प्रेमळ आग्रहाने कालचा कातरवेळ, अमावस्या अश्यावेळी घडलेला प्रसंग सांगुन नेत्रातून अश्रू ओघळलेच!
मंदोदरीच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगाने कैकसीच्या डोळ्यासमोर तीचा भूतकाळ उभा राहिला. अशीच राक्षसवेळ…! नकळत पतीचे शब्द कानात घुमू लागले. कसल्या अशुभ वेळी पुत्रप्राप्तीची इच्छा धरुन आलीस…? याचा परिणाम म्हणजे स्वभावाने आणि रुपानेही अत्यंत भयंकर व क्रुर कर्म करणारा राक्षस जन्माला येईल. केकसी विचारांत गढलेली पाहुन हळुच मंदोदरीने सासूला विचारले, “आपण मला कशासाठी बोलावले होते?”
कैकसी म्हणाली “लग्नानिमित्य आम्ही लंकेत आलो होतो, आतां आश्रमांत जाण्यापुर्वी दशग्रिवाची माता या नात्याने कांही गोष्टींची कल्पना देण्यासाठी तुला बोलावले.”
क्रमशः
मिनाक्षी देशमुख
मंदोदरी
भाग – ५
मंदोदरीला दशग्रावाबद्दल सांगण्यापुर्वी कैकसी भूतकाळात गेली. कैकसीचा पिता सुमाली तीला म्हणाला, “आपल्या राक्षस कुलाचं कल्याण केवळ तुझ्या हाती आहे. विष्णुने मालीला मारल्यावर आम्हाला सुवर्ण नगरी लंका सोडुन पाताळांत जावं लागलं…..! किती दिवस पाताळातल्या अंधारात किती दिवस काढायचे..?
दिवाभीतीसाखं जीवन किती दिवस जगायच..?
मृत्युलोकावर कधीच जायचच नाही का…?
मालीच्या वधानंतर सर्व राक्षस सुमालीच्या अधिपत्याखाली पाताळात राहत होते. हे निरस संपुन परत पृथ्विचे राज्य कसे मिळेल याचा अहोरात्र तो विचार करीत होता.
एक दिवस अदृष्य होऊन लंकेभोवती फिरत असतांना गतवैभवाचे दिवस आठवुन तो बेचैन झाला. तेवढ्यात धनाध्यक्ष कुबेर सुवर्णाच्या हिरेजडीत विमानात बसुन खभोकरी वनात ब्रम्हर्षी विश्ववांच्या आश्रमाजवळ उतरतांना पाहिले. कुबेराने पित्याचे पदवंदन व आशिर्वाद घेऊन त्या वैभवशाली विमानातुन परत लंकेकडे गेला.
सुमाली त्या तेजपुंज ञृषीला पाहुन कैकसीसाठी योग्य ‘वर’ असल्याची जाणीव होऊन तो पाताळलोकी परतला. कैकसीव म्हणाला, “ब्रम्हर्षी विश्राव्य महात्मा मूनींमधे उत्तम आहे. ते ब्रम्हदेवाच्या कुळात उत्पन्न झालेले असुन श्रेष्ठ मुनी पुलस्त्य यांचा पुत्र आहे. तपाने ब्रम्हर्षीपद प्राप्त झालेले आहे. रवितुल्य तेजाने युक्त, देवांचा धनाध्यक्ष सध्या लंकाधिपती कुबेर नांवाचा पुत्र आहे. तुझा विवाह विश्राव्याशी झाल्यास कुबेरासारखे तेजस्वी पुत्र निर्माण होऊन त्यांच्याद्वारे आपला उध्दार होईल आणि परत वैभवाचे दिवस येतील.
भोकरी वनातल्या आश्रमात यज्ञकुंडे पेटली होती. विश्राव्या मुनी आपल्या पर्णकुटीसमोर बसुन धीरगंभीर आवाजांत मंत्रघोष करीत यज्ञकुंडात आहुती टाकत होते.यज्ञ संपल्यावर आश्रमात जाण्यासाठी यज्ञीय साहित्याची आवराअवर करणार येवढ्यात समोर यौवनाने मुसमुसलेली नी तेजाने झळाळणारी कन्या त्यांच्यापुढे किंचित मान झुकवुन ऊभी होती. तिच्या मोहकतेने मोहुन विश्राव्यांनी “कोण आहेस तू,,?” म्हणुन विचारले.
कैकसीने मान वर करुन हात जोडुन म्हणाली, “रतपप्रभावाने आपल्याला कोणती गोष्ट अज्ञात आहे? आपल्याकडे पित्याच्या इच्छेने आली असुन सुमालीची पुत्री कैकसी माझे नांव आहे.”
तिचा विनयसंपन्न, अमृतवाणी बोल ऐकुन विश्राव्यमुनी ध्यानस्थ झालेत. थोड्या वेळाने नेत्र उघडुन म्हणाले, “तुझ्या येण्याचा उद्देश कळला. तुला माझेपासुन पुत्रप्राप्तीची इच्छा आहे पण….”
“कसल्या अशुभ वेळु येऊन माझे समोर उभी राहिलीस कैकसी? ही राक्षसवेळ, क्रुरवेळ! अशावेळी झालेले पुत्र स्वभावाने आणि रुपानेही अत्यंत भयंकर व क्रुरकर्म करणारे राक्षस होतात.”
कैकसी मनाने कोसळली. विनवणी करीत म्हणाली, “नाथ! आपण ब्रम्हवेत्ते! आपल्यापासुन होणारी मूलं अशी झालेली चालतील कां? कृपा करा.. अापल्या वंशाला अनुरुप, वंशाची किर्ती वाढवणारी मुलं माझ्या पदरांत घाला.”
कैकसीने डोळ्यांत पाणी आणुन वारंवार विनवणी केल्यावर तेही द्रवले आणि स्नग्ध स्वरांत म्हणाले, “तुझा शेवटचा पुत्र माझ्या वंशाला अनुरुप नी माझी किर्ती वाढवणारा धर्मात्मा असेल. ती थोडी शांत होऊन विश्राव्याच्या व्यक्तीमत्वात विरुन गेली.
क्रमशः
मिनाक्षी देशमुख


