
*सीता* आणि *मंदोदरीची* भुमिका सत्य असल्याने त्यांचा विजय झाला, पण त्यांच्या हौतात्म्यानेच! सीतेला *अग्निदिव्य* करावे लागले तर मंदोदरीला *वैधव्य* पत्करावे लागले. एका दृष्टीने ऐहिक सुखाचे समर्पणच करावे लागले, आहुती द्यावी लागली. या पार्श्वभुमीवर मी जी व्यक्तीरेखा रेखाटण्याचा प्रयत्न केला त्यात मुख्य अडचण साधनसामग्रीची! कारण मुळात हे पात्र गौण आहे.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
पतिव्रता मंदोदरी
मंदोदरी
भाग – ६
महालात वाढलेल्या कैकसीला आश्रमीय जीवनाशी जुळवून घेतांना थोडा त्रास झाला. पण लवकरच अंगवळणी पडले. वेगळेच तेज तिच्या मुखावर विलसु लागले. लताकुंजात वेगवेगळ्या फुलांनी वेली डवरल्या होत्या. अश्याच एका संध्याकाळी ती उद्यानांत जाऊन खुप सारे फुलं तोडुन वास घेतला व सारी फुले निर्दयपणू कुस्करुन टाकली. असा प्रकार पुनः पुनः करुं लागली. पायाजवळ कुस्करलेल्या फुलांच्या ढीगावर थयथय नाचत भयानक भेसुर हसत होती.
आवाज ऐकुन विश्राव्यमुनींनी बाहेर येऊन हा भयानक प्रकार पाहिला. तिच्यावर ते संतापाने ओरडले तेव्हा ती शब्दाघाताने एकदम भानावर येऊन असं परत घडणार नाही म्हणुन क्षमा मागीतली. ती घाबर्या घाबर्या पर्णकुटीत येऊन झाल्या प्रकाराबद्दल ती विचार करु लागली. भोवतालच्या काळोखातुन तिच्या कानावर शब्द आले, ‘तुझ्या बाळाच्या इच्छा’….. क्षणार्धात पतीचे शब्द तीच्या मनांत उमटले…. ‘स्वभावाने आणि रुपानेही अत्यंत भयंकर, क्रुर कर्म करणारै राक्षस तुझ्या पोटी येतील’. कशातच लक्ष लागेना. अस्वस्थपणे ती विश्राव्याच्या कुशीत शिरुन झोपली. पण झोप येत नव्हती. भयानक अंधारांत भयान विचार तिचे मन अस्वस्थ करीत होते.
कांही महिन्यांनी पावसाळ्यात निसर्ग क्रुर बनलेल्या वेळी कैकसीने एका भयंकर पुत्राला जन्म दिला. त्याला जन्मतःच दात होते. भितीदायक वातावरणांत जन्माला आलेला उग्र दिसणारा मुलगा पाहुन भेदरुन कैकसीच्या नेत्रांना धारा लागल्या. पुत्रप्राप्तीचा आनंद कुठल्या कुठे लोप पावला. बाराव्या दिवशी “दशग्रिव” म्हणुन नामकरण झाले. त्यानंतर तीला आणखी कुंभकर्ण नांवाचा मुलगा झाला. पुढे विकृतमुखयुक्त झालेल्या मुलीचे नांव शूर्पणखा ठेवले. तिच्या पाठीवर बिभिषण झाला. त्या चार मुलांच्या बाललिलेत केकसी रमु लागली.
दशग्रिव आणि कुंभकर्ण जसजसे मोठे होऊ लागले तसे ते उपद्रवी होऊ लागले. त्रृषिकुमारांच्या नाकातोंडात पाणी जाईस्तोवर बुडवणे, हरीण, शावकांना विनाकारण बडवणे, त्रृषीमुनींच्या होमकुंडात पाणी ओतणे, त्यांच्या जटा धरुन आपटणे, त्यांना मारुन त्यांचे मांस भक्षण करणे, ऊरलेल्या मासांचे तुकडे यज्ञकुंडात टाकणे, याकामी शूर्पनखा सुध्दा त्यांना मदत करीत असे.
विश्रावा, केकसुच्या कानावर अशा तक्रारी आल्यावर तीन्ही मुलांना समजावुन सांगण्याचा खुप प्रयत्न केला पण कांहीही फरक पडला नाही. आपण दिलेल्या शापामुळेच ही मुलं अशी क्रुरकर्मी व्हायचीच हे माहित असल्यामुळे तो उदासीन झाला, पण कैकसी मात्र दुःखी, कष्टी राहून मनात झुरत राहिली. अश्या मुलांना जन्माला घातल्यापेक्षा वांझ राहिले असते तरी चालले असते असे विचार तिच्या मनात यायचे.
आशेचा किरण होता बिभिषण…! तो सुर्योदयापासुनच वेदपठण, वडिलांच्या पुजा अर्चनाच्या कामात मदत करणे, यामुळे सहाजिकच तो दोघांचाही लाडका बनला.
अशाच एका सकाळी कुबेराचे विमान आलेले पाहुन मुलांना हर्ष झाला. त्यांच्यासाठी कुबेर नेहमीच उंची वस्रे, अलंकार आणत असे. त्याने माता पित्यांचे पदवंदन करुन एकमेकांचे क्षेमकुशल विचारुन तो सर्वांचा निरोप घेऊन परत निघाला. कैकसी कितीतरी वेळ त्या विमानाकडे पाहत होती. मनांत काही एक विचार योजुन समोरच्या लताकुंडात गेली.तिथुनच दशग्राव व कुंभकर्णाला हाक मारली.
क्रमशः
मिनाक्षी देशमुख.
मंदोदरी
भाग – ७
कैकसीने बोलावल्यानुसार दशग्रिव, कुंभकर्णाबरोबर बिभिषणही तिच्यासमोर येऊन उभे राहिलेत. ती त्यांना म्हणाली,”असे निक्रीय जीवन किती दिवस जगायचय? कुबेर लक्षाधिश आहे, राजा आहे, त्याच्या आश्रयनेच चालणार की, कांही कर्तबगारीही दाखवाल? बल प्राप्त करुन अतुल पराक्रमी व्हा! मोठ्या भ्रात्यासारखे ऐश्वर्यसंपनान होऊन राज्य मिळवा. त्यासाठी अध्ययन, तपसाधना करुन परमेश्वराला प्रसन्न करुन ‘वर’ मिळवा!”
कैकसीचे शब्द दशग्रिवाच्या मनाला भिडले, तो म्हणाला “तुझ्या पायाशी प्रतिज्ञा करतो की, बलाने मोठ्या भावापेक्षा जास्त पराक्रमी होईन. दशग्रिव, कुंभकर्ण आणि बिभिषण तिघांनीही तपश्चर्या करण्याचा निर्णय वडिलांना सांगुन त्यांची अनुमती घेऊन दुसर्याच दिवशी प्रातःकाली तप करण्यासाठी गौकर्णाश्रमांत निघुन गेलेत.”
आई-वडीलांचा निरोप घेऊन तिन्ही भाऊ दंडकारण्यातील गोकर्णाश्रमात त्यांनी अध्ययन केले.तपाला सुरुवात केली. कधी निराहार राहुन, कधी पंचाग्नीसाधना करुन तर कधी एका पायावर उभे राहुन, कधी थंडीत जलाशयात उभे राहुन तपाची तिव्रता, आत्मीक बल वाढत होते. या सर्वांची फलश्रृती म्हणुन दशग्रिवासमोर साक्षात ब्रम्हदेव येऊन म्हणाले, “वरं ब्रुहि! दशग्रिवा तुझ्या तपश्चर्येने प्रसन्न झालो, हवा तो वर माग!”
दशग्रिव म्हणाला, “भगवान मनुष्याला मृत्युसारखा अन्य शत्रु नसतो तेव्हा हे! देवाधिदेवा! मला अमरत्व प्रदान करावे.”
त्यावर ब्रम्हदेव म्हणाले, “दशग्रिवा….! तू ज्याप्रकारची अमरता मागतो आहेस तशी अमरता कोणालाच, मला सुध्दा मिळु शकत नाही. पण तुला वर देतो की, देव, यक्ष, सुपर्ण, नाग, दैत्य, दानव, राक्षस आणि देवता यांच्या हातुन तुझा वध होणार नाही.” त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन ब्रम्हदेवाने आणखी एक ‘वर’ दिला. “ज्या रुपाची इच्छा करशील ते रुप धारण करु शकशील.” आणि ते अंतर्धान पावले.
दशग्रिव आनंदाने वेडा, बेभान होऊन नाचु लागला. तेवढ्यात कुंभकर्ण व बिभिषण आलेत. त्यांना आपल्या पोलादी बाहुत कवटाळुन वर मिळाल्याचे सांगीतल्यावर, त्यांचीही तपश्चर्या पुर्ण झाल्यामुळे त्यांनाही प्रसन्न होऊन पितामहानी वर दिल्याचे सांगीतले. परंतु कुंभकर्णाचा निराश चेहरा पाहुन दशग्रिवाने कारण विचारल्यावर कुंभकर्णाने सांगीतले, “वर माग” हे शब्द कानावर पडताच मती संभ्रमित झाली व त्या धांदलीत “इंद्रासन” ऐवजी “निद्रासन” द्या असं म्हटल्याबरोबर तथास्तु! म्हणुन अंतःर्धान पावले.
म्हणूनच वर मिळाला काय नि नाही, सारखेच! आता जन्मभर झोप! आणि मृत्युनंतरही दीर्घ झोप! अंधार…. सारा आंधारच! त्याला मिळालेल्या ‘वरा’ नुसार आहारासाठी वर्षातुन दोन दिवस, दर सहा महिण्याने एक दिवस जागा होईल. त्यावर दशग्रिव म्हणाला, निराश होण्याचे कारण नाही, या दोन दिवसातसुध्दा तू शत्रुचा फन्ना ऊडवु शकशील.
बिभिषणला विचारल्यावर त्याने सांगीतले, पराकाष्ठेच्या विपत्तीत जरी सांपडलो तरी माझी मती धर्माकडेच असावी. भगवान! उपदेशावाचुन ब्रम्हास्राची स्फुर्ती व्हावी. सनातन धर्माला, मानवताधर्माला अनुसरुनच जीवन व्यतीत व्हाव! धर्मनिष्ठांना या जगात कांहीही दुर्लभ नाही. बिभिषणाला मिळालेल्या ‘वरा’ची कुचेष्टा करुन दशग्रिव म्हणाला “मला मिळालेल्या ‘वरा’ने आपण सामर्थ्यशाली होऊन देव,यक्ष, गंधर्व किन्नर यांना चांगला धडा शिकवु, पण तुमची साथ मिळेल असं काही दिसत नाही.” पितामहांनी दिलेल्या वरदानाच्या गर्भात शाप लपलेला आहे. शाप…. हिरवळीतल्या सर्पासारखा!!
क्रमशः
मिनाक्षी देशमुख.
मंदोदरी
भाग -८
बिभिषणाने दशग्रिवाला समजावत म्हटले, “इतिहास सांगत आहे की, *’वरां’* मुळे ज्यांनी ज्यांनी ऊन्मत्त होऊन दुसर्यांना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला त्यांना अखेर नष्टच व्हावं लागलं आहे.” त्याचं बोलण ऐकुन दशग्रिव अतिशय संतप्त झाला. त्याने बिभिषणाची निर्भत्सना केली. एवढ्या वर्षाचे पारणे फेडण्यासाठी दशग्रीव व कुंभकर्ण शिकारीराठी घनदाट अरण्यात गेले आणि बिभिषण मात्यापित्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आश्रमाकडे निघाला.
दशग्रिव, कुंभकर्ण आणि विभिषण यांची तपश्चर्या पुर्ण होऊन अलौकीक “वरां” ची प्राप्ती झाली ही वार्ता पाताळात सुमाली पर्यंत पोहोचली. सायंसंध्यास्नानासाठी विश्रावा पर्णकुटीच्या बाहेर पडल्याची संधी साधुन नातवांना भेटण्याचे निमित्याने सुमालीने कुटीत प्रवेश केला. नातवांना दृढ अलिंगन देऊन सुमाली म्हणाले, “पराक्रमी पुरुषांनी उज्वल भविष्याची स्वप्न पुर्ण करण्यासाठी बाहुबळावरच पुढचा मार्ग निर्धारीत केला पाहिजे.”
दशग्रिवाने सुमालीला विचारले, “दिसते कां एखादी जागा?”
सुमाली म्हणाला, “लंका कां नाही..?”
दशग्रिव जरा दचकलाच! त्याची महत्वाकांक्षा मोठी असली तरी भावाचे नाते पायदळी तुडवावे असे वाटेना..!
सुमाली म्हणाला, “नात्या-गोत्याच्या जंजाळात गुंतलास तर उन्नती होऊ शकणार नाही. लंका आम्हा राक्षसांचीच होती. तिथून सार्या ब्रम्हांडाला थरथर कापायला लावत होतं. परंतु विष्णुने पराभव करुन तिथे राहणे अशक्य केल्यामुळे, युध्दात माझ्या भ्रात्याचा वध वध केला तो सूड घेण्यासाठी लंका जिंकलीच पाहिजे.”
सुमालीच्या सांगण्याचा दशग्रिवावर चांगलाच परिणाम झाला. तो म्हणाला, “माझ्या महत्वाकांक्षेच्या जो कोणी आड येईल त्याला चांगलाच धडा शिकविनच.” कैकसीला पटलं नाही, ती म्हणाली, “अशा आसुरी मार्गाने राक्षसकुळांचा उध्दार केल्या जाईल हे त्यावेळी माहित असते तर, जेव्हा पृथ्वीवर पाठवले तेव्हा विश्रावामुनींशी लग्नच केले नसते. माझ्या साध्याभोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन तुम्ही राजकारण साधले जे मला समजलेच नाही.” विश्रावा आल्याची चाहूल लागल्याबरोबर सुमालीने असंतुष्टाचे निखारे फुलवुन कुटीबाहेर पडला.
दशग्रिवाने सुमाली प्रभुती राक्षसांची लंका परत करण्याविषयी कुबेराला निरोप पाठवला. कुबेर आई-वडीलांचा सल्ला घेण्याकरितां विश्रावाच्या आश्रमात आला. विश्रावा म्हणाला, “दोघांच्याही कल्याणासाठी दशग्रिवाला खुप समजावले परंतु माझ्या शापाने क्रुर आणि ब्रम्हदेवाच्या ‘वराने’ ही तो उन्मत्त झाला आहे, म्हणुन तू लंका त्याला द्यावीस. आणि तू कैलासावर जीथे मंदाकिनी नदी, अति रम्य परिसर आहे. अप्सरा, उरग, गंधर्व, किन्नर तिथे विहार करतात. देव सुध्दा क्रीडा करतात तीथे तू जावेस.”
वडिलांच्या सल्ल्यानुसार दशग्रिवाला बोलावुन कुबेर म्हणाला की, “वास्तविक जे माझं आले ते भ्राता या नात्याने तुझेही होतेच, पण तुला मी नको ना? म्हणुन ही नगरी, अमुल्य रत्नासह राज्य तुझ्या स्वाधीन करत आहे. धनागाराच्या किल्ल्या दशग्रिवाच्या स्वाधीन करुन कुबेर खाली मान घालुन प्रासादाबाहेर पडला. पुष्पक विमानांत बसणार एवढ्यात दशग्रिव म्हणाला, “विमानही एक अमुल्य रत्न आहे.”
क्रौर्याचे अनोखे दर्शन झाल्याने काहीही न बोलता, विमान तिथेच सोडून जड पावलांनी भारावल्या मनाने लंका सोडुन कुबेर निघुन गेला. ही वार्ता कळतांच सुमाली, मारीच, प्रहस्त, विरुपाक्ष, महोदर या मंत्र्यांसह तसेच नीलमेघतुल्य अनेक राक्षस तिथे जमा झालेत. राक्षसांचे अधिराज्य सुरु झाले. मोठ्या उत्सवात दशग्रिवाचा अभिषेक झाला दशग्रिव *लंकाधिश* झाला.
क्रमशः
मिनाक्षी देशमुख.
मंदोदरी
भाग – ९
कैकसीने आश्रमात जाण्यापुर्वी मंदोदरीला माहिती देण्याच्या ऊद्देशाने बोलावले होते. ती येईपर्यंत कैकसीच्या मनःचक्षुपुढे गत भूतकाळ साकार झाला. एक मोठा उसासा सोडून तीने मंदोदरीला सांगायला सुरुवात केली. “मंदोदरी..! दशग्रिव अत्यंत पराक्रमी, धाडसी व जिद्दी आहेक तपश्चर्येने मानवाशिवाय इतर सर्वाकडुन अवध्य असल्याचा ‘वर’ ब्रम्हदेवाकडून मिळवला. हे लंकाधिशाला भूषणास्पद असले तरी तो शापीतही आहे.”
मंदोदरीचा विश्वासच बसेना. भीतीने ती गारठुन गेली. दशग्रावाचा जन्मवृतांत सांगुन कैकसी म्हणाली, “दशग्रिव उतावीळ, अविवेकी व स्वभावाने क्रुर आहे. त्याचा स्वभाव बदलावा, कुबेराप्रमाणे सात्विक वृत्तीचा व्हावा म्हणून त्याला तपश्चर्येला पाठविले. तप केले पण राक्षसवृत्तीला साजेसे वर मागीतले. श्रेष्ठ त्रृषी-मुनींचे शब्द कधीच खोटे ठरत नसतात. जिवनांत सगळ्याच गोष्टी मनाप्रमाणे घडत नसतात. जसं जीवन येईल तसं स्विकारुन मार्ग काढीत जीवननौका पैलतिरीला लावणं हेच कौशल्य असते आणि नेमकं तुला हेच करावं लागणार…..”
” तू केवळ सांसारीक सामान्य स्री नसुन लंकाधिशाची पत्नि तसेच महाराणी आहेस. या राज्यातील प्रजाजनांची माता आहेस. या सर्व कठीण भूमिका पार पाडायच्या आहेत, ही जबाबदारी वाटते तितकी सोपी नाही. त्याच्या अविवेकाला तुझ्या विवेकाचा लगाम, त्याच्या राक्षसी वृत्तीला तुझ्या सात्विकतेच्या तेजाने निष्र्पभ, उतावीळपणाला संयमाचा बांध, अधर्मचाराला धर्ममर्यादेने परावृत्त, कधी मायेच्या ममतेने तर कधी पत्नीच्या बरोबरीच्या नात्याने, कधी प्रेमाने तर कधी रागानेही त्याला परावृत्त करावे लागेल.”
“हे अवघड आहे पण अशक्य नाही. घरचा आणि राज्याचा संसार सांभाळतांना पदरांत निखारे बांधुन पुढे जावे लागेल पण पदर पेटता कामा नये अन् निखारे विझताही कामा नये. हेच सांगण्यासाठीच तुला मुद्दाम बोलवले होते.”
आजपर्यत स्वतःला भाग्यवती, जीवन सफल झाले असे मानत होती, पण कैकसीने सांगीतलेले ऐकुन मात्र दशग्रिवासारख्या अविवेकाशी झगडावे लागणार या कल्पनेनेच मंदोदरी भयंकर खिन्न झाली. भावी आयुष्यातले भीषण चित्र डोळ्यासमोर तरळु लागल्याने ती भांबवलेली पाहुन कैकसीने तिच्या पाठीवर हात ठेवीत सांगीतले, “भगवान शंकराची आराधना कर”
मंदोदरी तीच्या महालात गेल्यावर थोड्याच वेळात विभिषण कैकसीच्या महालात आला. प्रणाम करुन दशग्रिवाबरोबर इथेच राहण्याचा मनोदय व्यक्त केल्यावर ती म्हणाली, “चार भिंतीत आनंदाने राहतां येते असच थोडच आहे. दशग्रिवाच्या आणि इतर राक्षसांची राक्षसी आचार-विचारात तुला मोकळेपणाने जीवन कंठता येईल का?”
“तूं म्हणतोस इतकं साध सोपं गणित नाही. तुझ्या वडीलांनी राक्षसवृत्तीला आधार दिला नाही म्हणुन त्यांनी आम्हाला खुप छळले होते. तुझ्या वडिलांचा वचक, तपस्या होती म्हणुन जीवावर बेतले नाही इतकेच! तुझ्याभोवती हे राक्षस दिवस-रात्र थैमान, नंगानाच करतील. अमर्याध दुष्ट उद्दान प्रवृत्तींच्यापुढे दुबळ्या सात्विक प्रवृत्तीचा नेहमीच पराजय होत आला. तुला एकटेपणाची जाणीव होईल.”
क्रमशः
मिनाक्षी देशमुख
मंदोदरी
भाग – १०
बिभिषण मातेला म्हणाला, “माझे सुंदर, उदात्त, पवित्र, समाजहितैषी विचारांनी या राक्षसामधे राहुनच त्यांचे आचार-विचार, त्यांचे जीवनांत परिवर्तन आणायचा निश्चय केला.”
कैकसी म्हणाली, “राक्षस सापासारखे आहेत. त्यांच्या शरीराची रचनाच अशी आहे की, त्यांना कितीही दुध पाजले तरी विषच होणार. श्र्वानपुच्छ नळीत घातले तरी कधीच सरळ होत नाही. दुष्ट आपली दुष्टता कधीच सोडत नाही.”
“दशग्रिवाने तर वेदांचा अभ्यास, षडशास्रांचेक्षक्ष अध्ययन, तपस्याही केली पण उपयोग काय? त्याच्या इच्छेविरुध्द वागलास तर तुझी दुर्दशा तो केल्या शिवाय राहणार नाही.”
” माते…! दुःखाला, संकटांना समोर न जातां निवीर्य सुरक्षितता काय कामाची? भोवताली पसरलेल्या मायाजालाला, कपटजालाला छिन्नभिन्न करुन अधर्माचा अंधार व्यापुन राहिला असतां स्वधर्माचा प्रकाशकिरण टाकुन अंधार नाहीसा करणे म्हणजेच खरी धर्मबुध्दी!”
ती म्हणाली, “मंदोदरी तुला मातेसमान! तुम्ही दोघेच दशग्रिवाला सावरु शकाल.”
दशग्रिवाने भावडांचे विवाह करुन दिलेत. शूर्पणखाचा विवाह विद्युजिव्हा राक्षसाशी, विरोचनपुत्राची नात वज्रज्वालाचा कुंभकर्णाशी करुन दिला. एकदा विभिषण गंधर्वलोकी गेला असतां लंकाधीशाचा भ्राता म्हणून गंधर्वराज शैलुष याने यथोचीत स्वागत करुन आपल्या रुपसंपन्न सरमाचा स्विकार करण्याची विनंती केली. मानस सरोवराच्या तिरावर या कन्येचा जन्म झाला. पर्जन्यकाळात सरोवराचे पाणी वाहुन थेट या कन्येपर्यंत येऊन ठेपल्याने ती रडायला लागली. तीची माता घाबरुन बालिकेला छातीशी घेत म्हणाली, “सरो मा वर्धत” त्याबरोबर पाणी वाढायचे थांबल्यामुळे तीचे नांव सरमा पडले.
दशग्रिवाने त्याचा विवाह मोठ्या थाटामाटाने लावुन, स्वतःच्या प्रासादासारखाच भव्य प्रासाद बिभिषणाला बांधुन दिला. सरमाही सात्विक विचारांची असल्यामुळे दोघांचे मीलन दुग्धशर्करा योगच ठरला.
प्रेमाने वसेवेने त्यांचं मन जिंकता येईल का? अविवेकी प्रवृत्तीला प्रेमबंधनात बध्द करतां येईल का? माता कैकसीने सांगीतलेल्या अनेक गोष्टींचा मंदोदरी विचार करीत असे. त्यातुन मार्ग कसा काढायचा याच चिंतनांत दंग राही. पतीचे आकर्षक व असामान्य व्यक्तीमत्व तीचे मन वेधुन घेत. पण त्याच्या वृत्ती-प्रवृत्ती, अधिरता, अभिलाषा या अविवेकी अतिरेकाने मात्र ती नाराज, खिन्न होत असे.
शरीर आणि मन सुखदुःखाच्या द्वदांत असतांनाच मंदोदरीला मातृत्वाची चाहुल लागली. नवीन जन्माला येणारं बाळ, अप्सराच्या कुळाचं सौंदर्य, देवकुळातील शुध्दता, सात्विकता, पराक्रम दिगवंत किर्ती मिळवेल असा बाळ तीला हवा होता. गर्भावर उदात्त संस्कार व्हावेत असे प्रयत्न ती सतत करीत होती.
परंतु दैवगती मात्र विचित्र होती. ब्रम्हदेवाच्यि ‘वरा’ ने दशग्रिव अजिंक्यही व अवैध्य असल्यामुळे त्याची असुरी प्रवृत्ती, पराक्रम त्याला स्वस्थ बसुं देत नव्हता. त्याला त्रिखंडाचे राज्य हवे! म्हणुन स्वकियांवरील आक्रमणा पासुनच सुरुवात केली.
एके दिवशी राक्षसांच्या प्रचंड सेनेसह दशग्रिवाने लंका सोडली. राक्षसराज्यांवर आक्रमणे करुन ती पादाक्रांत केली. आधीच असुरुप्रवृत्ती अन् त्यात पराक्रमाची विजयाची धुंदी! त्यातुनच अत्याचाराचा जन्म झाला. निरपराध स्रीयांही सुटल्या नाहीत.
क्रमशः
मिनाक्षी देशमुख.


