भक्त प्रल्हाद संपूर्ण भाग १, (१ ते ४)

ज्याला मुक्तीची चाड आहे त्याने नवविधा भक्तीचा अवलंब केल्यास इह लोकीचे सुखोपभोग व मृत्युनंतर परलोकी मुक्ती निश्चित मिळते. नवविधा भक्ती म्हणजे श्री दत्तप्रभुंचे स्मरण,वंदन सख्य(मैत्री) सेवन, अर्चना पुजन, दास्य, श्रवण, कीर्तन आणि सर्व( आत्म) निवेदन हे भक्तींचे नऊ प्रकार आहेत.या नवविधा भक्ती करुन महामुनी अत्री देवांना प्रिय होऊन देवपिता झालेत.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

ज्याला मुक्तीची चाड आहे त्याने नवविधा भक्तीचा अवलंब केल्यास इह लोकीचे सुखोपभोग व मृत्युनंतर परलोकी मुक्ती निश्चित मिळते. नवविधा भक्ती म्हणजे श्री दत्तप्रभुंचे स्मरण,वंदन सख्य(मैत्री) सेवन, अर्चना पुजन, दास्य, श्रवण, कीर्तन आणि सर्व( आत्म) निवेदन हे भक्तींचे नऊ प्रकार आहेत.या नवविधा भक्ती करुन महामुनी अत्री देवांना प्रिय होऊन देवपिता झालेत.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

भक्त प्रल्हाद

!!! भक्त प्रल्हाद !!!

भाग – १.

       आतांपर्यत मी ३९ वेगववेगळ्या विषयांवर व्यक्तीरेखा लिहून आपल्या समोर प्रस्तुत केले.आपणही भरभरुन कौतुक करुन,व प्रोत्साहन देऊन माझा उत्साह वृध्दींगत केला…

    आताही आपल्या समोर “भक्तप्रल्हाद”

सादर करीत आहे.नेहमीप्रमाणे आपल्या क्रीया प्रतिक्रीया अपेक्षित!

             प्रल्हाद हा हिरण्यकश्यपू राक्षसाचा पुत्र!प्रल्हादाबद्दल सांगण्यांपूर्वी हिरण्यकश्यपू व त्याचा बंधू हिरण्याक्ष विषयी सांगणे क्रमप्राप्त आहे.हे दोघे बंधू देवांचे विशेषतः विष्णूचे कट्टर शत्रू कां होते?

         महाविष्णूने जय आणि विजय असे दोन द्वाररक्षक नेमले होते.त्या दोघां ना वाटत होते,आपण स्वर्गाचे द्वाररक्षक, शिवाय श्रीविष्णूंच्या खास मर्जीतले आहोत,या भावनेने ते गर्विष्ट बनले होते. एकदा चार बालसाधू- सनक,सनंदन, सनत्कुमार आणि सनत सुजान श्रीविष्णूं च्या दर्शनास आले होते.त्यांची योगशक्ती पाहून प्रभावित झालेल्या विष्णूंनी त्यांना स्वर्गात प्रवेश दिला.परंतु उन्मत झालेल्या जय-विजय या द्वाररक्षकाने त्यांना अडवून त्यांचेशी उध्दटपणे व्यवहार केला ते साधू क्रुध्द होऊन म्हणाले,तुम्ही भगवान विष्णूजवळ राहूनही एवढे उर्मट झालात,त्यामुळे जोवर तुम्हाला सर्वश्रेष्ठ ज्ञान प्राप्त होणार नाही तोपर्यंत तुम्ही पृथ्वीवर भटकत रहाल.साधूंकडून असा शाप मिळाल्यावर जय-विजय भानावर आलें.आपली चुक त्यांना उमगली. श्रीविष्णूंची त्यांनी क्षमायाचना केली. परंतू विष्णू म्हणाले,हे साधू आत्मसंयमी व सात्विक असल्यामुळे त्यांची शापवाणी खोटी ठरणार नाही.

           आतां तुम्हाला पृथ्वीवर जाऊन ज्ञानप्राप्ती झाल्यावरच परत या.दोघेही शोकमग्न होऊन म्हणाले, देवा!आमच्या कडून अक्षम्य चुक झाली,आमच्या अज्ञानामुळे, तुमच्यापासून आम्ही दुरावलो तर आमचा निभाव कसा लागेल देवा!क्षमा करा…दूर नका हो लोटू. त्यांच्या कळकळीच्या विनंतीने विष्णूदेवां ना दया आली.माझ्या सहवासात येण्या साठी सात जन्म प्रतिक्षा करणार की, तीन जन्म शत्रुत्व पत्करणार हे तुम्ही ठरवा!

        देवा! तुमचा  सात जन्म विरह सहन करण्यापेक्षा, तुमच्या सानिध्यात लवकर यायचे तर शत्रृत्व पत्करण्यास तयार आहोत. तथास्तू!

         त्यानंतर जय-विजय स्वर्गातून पृथ्वीवर हिरण्यकश्पपू व हिरण्याक्ष

 रुपाने महाविष्णचे शत्रू म्हणून जन्माला आले. नंतर त्रेतायुगात रावण व कुंभकर्ण म्हणून जन्माला आले,तेव्हा विष्णूचा अवतार रामाच्या हातून त्यांना मृत्यु आला. द्वापरयुगा ते शिशुपाल व दंतवक्रा च्या रुपात प्रकटले तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना वधले.आणि याप्रमाणे दोघेही त्या साधूंच्या शापातून मुक्त झाले.   

          ज्यावेळी हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपूचा जन्म झाला,त्यावेळी सर्व देव भयभीत झाले.ही दोन्ही मुले अतिशय धिप्पाड व धष्टपुष्ट होती.हिरण्य कश्यपू पेक्षा त्याचा लहान भाऊ हिरण्याक्ष अधिक बलवान होता.एकदा हिरण्याक्षने स्वर्गावर स्वारी केली, त्या वेळी सर्व देवगण भीतीने लपून बसले असल्यामुळे त्याने वरुणदेवाला युध्दाचे आव्हान केल्यावर,वरुणदेव म्हणाले, माझेशी युध्द करण्यापेक्षा भगवान विष्णूं शीच लढाई कर!हे ऐकून हिरण्याक्ष विष्णूंना शोधू लागला.

           राक्षसांचा राजा हिरण्याक्षला आपल्या शक्तीचा गर्व झाल्यामुळे,त्रिभूव नांत आपल्यापेक्षा कुणीच श्रेष्ठ नाही ही त्याची दृढ समजूत झाली.देवांना तुच्छ समजूं लागला.आपणच देव आहो. आपलीच पूजा सर्वांनी करावी,विष्णूंची पूजा करणार्‍यांचा तो अतिशय छळ करुन,नंतर त्यांना मृत्युदंड देत असे.साधू संत,ऋषी मुनींचे तो भयंकर हाल करुं लागला.आबालवृध्द,सज्जनलोक त्याच्या त्रासाने त्रस्त झाले होते.संपूर्ण धरतीला त्याने त्राही त्राही करुन सोडले.सर्वजणं परमेश्वराचा धावा करुं लागले,देवांना विनवू लागले.

         उन्मत्त झालेला हिरण्याक्ष पृथ्वीवर अत्याचार करत करत इंद्रलोकात गेला. त्याला बघून सर्व देव पळून गेल्यामुळे तो विष्णूलोकात गेला,त्यावेळी विष्णूदेव ध्यानस्थ बसलेले होते.त्यांचे ध्यान भंग करण्यासाठी त्यांना आव्हान देत म्हणाला विष्णू!तू स्वतःला या विश्वाचा पालनहार समजतोस ना?पृथ्वीचा सर्व भार तूच वाहतोस ना?स्वतःस मोठा शक्तीशाली समजतो तर,उठ, आणि माझ्याशी मुकाबला करुन दाखव तुझी शक्ती!

         हिरण्याक्ष जोर जोराने भगवान विष्णूंना लढण्यासाठी आव्हान देत होता.

विष्णूदेव मात्र शांत आणि एकाग्रतेने ध्यानमग्न होते.हिराण्यक्षाचा आवाज त्यांना ऐकूच येत नव्हता.हिरण्याक्षनाने ललकारुन सुध्दा विष्णूदेव कांहीच प्रतिक्रीया देत नाहीसे बघून,तो अतिशय चवताळला.सर्वांगाची लाही लाही होऊ लागली.चिडून म्हणाला ज्या पृथ्वीचे तू पालन करतोस ती पृथ्वीच मी समुद्रात फेकून देतो.

                  क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
            दि. ८-१२-२०२१.

  भक्तप्रल्हाद  !!!

भाग – २.

           हिरण्याक्षने पृथ्वी समुद्रात फेकून देईन म्हटल्यावलसुध्दा श्रीविष्णूंनी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे,त्याचा संताप अनावर झाला आणि त्याने खरोखरच पृथ्वी हातात घेऊन खोल विश्वसागरात फेकून दिली.पृथ्वीमाता विश्वसागरात खोल खोल बुडूं लागल्या मुळे ती करुनेने विष्णूदेवांचा धावा करत म्हणाली,हे भगवंता, हे विष्णूदेवा!रक्षण कर!मी बुडली तर,सार्‍या प्राणीमात्रांचाही विनाश होईल,देवा!दया करा!मला या पृथ्वीला वाचवा…देवा या पृथ्वीला वाचवा.पृथ्वीमाता धावा करत गटांगळ्या खात विश्वसागरांत बुडु लागली…

          पृथ्वीमातेची विनवणी व धावा ऐकून विष्णूदेव समाधीतून बाहेर आले आणि त्यांनी मोठा उच्छवास टाकला, त्यातून एक मोठा प्राणी बाहेर आला, तेव्हा त्याचा आकार फारच छोटा होता. पण पाहतां पाहतां त्याचा आकार पहाडा एवढा झाला.तो प्राणी वराह असून,त्याचे मोठे सुळे बाहेर आलेले,अतिशय संतप्त होऊन,नाकातून उष्ण हवेचे लोट बाहेर पडत होते.डोळ्यातून अंगार धगधगत होता.प्रत्यक्ष श्रीविष्णूंनी वराह अवतार धारण केला होता.

‌       मग विष्णूंनी क्षणाचाही विलंब न करतां विश्वसागरात उडी घेतली व पोहत जाऊन बुडणार्‍या पृथ्वीला आपल्या सुळ्यांवर उचलून सागराबाहेर  आणले. ही पृथ्वी नंतर त्यांनी ब्रम्हदेवांना देऊन टाकली.वराहाचा पराक्रम बघून हिरण्याक्ष घाबरला होता.पण प्रत्यक्षात तसे न दाखवतां,गर्वोक्तीने म्हणाला, पृथ्वीला तू आपल्या सुळ्यांवरुन उतरवून तीला जागच्या जागी ठेव.मी ओळखले आहे तुला.तू वराहरुपातील महाविष्णूच आहेस.असे म्हणून त्याने वराहावर शस्रां चा मारा करुं लागला.हिरण्याक्ष

च्या उग्र रुपाने संपूर्ण पृथ्वी कंपित झाली तो वराहाला अपशब्द बोलून अपमान करुं लागल्याचे बघून त्यांनी पृथ्वी बाजू ला ठेवली.वराहाचे नेत्र आग ओकू लागले.नंतर दोघांत घनघोर युध्द झाले.हे युध्द स्वर्गातून देवदेवता बघत होते.संध्या समय होत आला तरी युध्द थांबण्याचे लक्षण कांही दिसेना.हे युध्द सूर्यास्तापूर्वी  संपावे असे ब्रम्हदेवास वाटत होते,कारण  रात्री राक्षसांची शक्ती वाढते.वराहाने मनोमन ब्रम्हदेवाची इच्छा जाणून,त्यांनी हिरण्याक्षवर सुदर्शन सोडून त्याचे सर्व शस्रे नष्ट केले.ते बघून संतापलेल्या हिरंण्यक्षनाने वराहाला बगलेत पकडण्या चा प्रयत्न केला,एवढ्यात वराहाने त्याच्या तोंडावर जोरदार मुष्टीप्रहार केला हा प्रहार एवढा भयानक होता की,तो खाली कोसळून जागीच तात्काळ मृत्युमुखी पडला.

          वराहाने पृथ्वीला सुरक्षित तिच्या जागेवर नेऊन ठेवले.ह्या वराहरुपातील विष्णूच्या चौथ्या अवताराचे सर्व देवांनी स्वर्गातून फुले उधळून,जयजयकार करुन त्यांचे स्वागत केले.

         हिरण्याक्षच्या मृत्युमुळे त्याची पत्नी वृषधभानु,मुले व आई दितीदेवी फार दुःखी झाले.हिरण्यकश्यपू सर्वांचे सांत्वन करत धीर देत म्हणाला,मृत्यु अटळ आहे.शोक करणे व्यर्थ आहे.माझा भाऊ हिरण्याक्ष पराक्रमी होता.लढता लढता त्याला विरोचित मरण आल्यामुळे त्याच्या मृत्युचा शोक करुं नका.वरवर हिरण्यकश्यपूने इतरांचे जरी सांत्वन केले पण मनोमन त्याला अतिशय दुःख झाले. ह्या घटनेपूर्वीही तो विष्णूंचा द्वेष करीत होताच,आतां तर त्याला विष्णूंचे नांव काट्याप्रमाणे सलत होते.विष्णूचे नुसते नांव कानावर पडले तरी त्याचे रक्त खळवळत असे.त्याने आपले सेनापती इल्वल व नमुचीला बोलावून,शक्य तेवढ्या लवकर विष्णूभक्तांना ठार करण्याचे आदेश दिले.

         हिरण्यकश्यपूच्या आज्ञेनुसार त्याच्या सेनापतींनी वेचून वेचून सार्‍या विष्णूभक्तांना त्रास द्यायला सुरुवात केली देवभक्तांची घरे,नगरे उध्वस्त करुन भस्मसात केली.मंदिरे जमीनदोस्त केली. राक्षसांच्या आसुरी अत्याचाराने,अनन्वित छळाने सर्व भक्तगण त्रस्त झाले.

         हिरण्याक्षच्या वधामुळे हिरण्यकश्यपू फारच चवताळला.हिरण्य क्षकानंतर त्याला राक्षसराज्यपद प्राप्त झाले.विष्णूदेवांनी आपल्या भावाला ठार केले.त्याचा सूड विष्णूंना पराजित करुन कसा घ्यावा हा विचार रात्रदिवस करुनही कांही सूचत नव्हते.विष्णूंवर विजय मिळवायचा असेल तर,कांही तरी असे कठोर कर्म करायला हवे,ज्यामुळे आपल्याला अमरत्व प्राप्त होईल. आणि सांपडला मार्ग….ब्रम्हदेवांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तप करण्याचे त्याने ठरविले.त्यानुसार मंदारपर्वतावर जाऊन घोर तपश्चर्या सुरु केली.एका पायावर उभं राहुन,दोन्ही हात वर नमस्कृतीत जोडून,दृष्टी आकाशाकडे अशा स्थितीत उन्हाळाच्या कडकडीत उन्ह,विजांच्या घनगर्जना,वादळ,वारा,पाऊस आणि हिवाळ्यातील तीव्र हिमवर्षात देखील तो तसूभरही न हलता त्याच स्थितीत राहिला.त्याच्या तपस्येदरम्यान अनेक विघ्ने आलीत पण ॐ ब्रम्हदेवाय नमः हा अखंड जप सुरुच होता.

                  क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
          दि. ८-१२-२०२१.

!!!  भक्तप्रल्हाद  !!!

भाग  – ३.

           हिरण्यकश्यपूचे अखंड व कठोर तप सुरु असल्यामुळे इंद्र दरबारात बरीच खळबळ माजली.त्याच्या तपसामर्थ्याने इंद्रसिंहासन डगमगू लागले.भयभीत होऊन इंद्रदेव दरबारातील देवांना म्हणाले हिरण्यकश्यपूची तपश्चर्या जर अशीच चालू राहिली तर,राक्षसांची शक्ती वाढून देवांना तापदायक तर ठरेलच,पण स्वर्ग ही आपल्या हातून निसटून जाईल. सर्वां शी विचारविनिमय होऊन,वासुदेव म्हणाले,हिरण्यकश्यपू तपसाधनेत व्यस्त असतांनाच जर आपण त्याच्या राक्षस राज्यावर आक्रमण केले तर?हा विचार सर्व देवांना पटल्यामुळे,देवांनी राक्षस राज्यावर आक्रमण केले.देवांचे अचानक झालेल्या हल्ल्याने राक्षसांना सावरायला अवधी मिळाला नाही.त्यामुळे त्यांचा पराभव झाला.देवांनी कोणालाही सोडले नाही.

          इंद्रांनी हिरण्यकश्यपूच्या महालात प्रवेश केला.तिथे त्याची गर्भवती पत्नी कयाधू भयभीत अवस्थेत इंद्राला दिसली.

कयाधू विनवत,गयावया करत म्हणाली, हे इंद्रदेवा! मी गर्भवती आहे.माझ्या पोटा तील निष्पाप जीवाचा काय अपराध? त्याला जीवदान द्यावे,पण त्यावेळी इंद्र कांहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. संतापून म्हणाले,कयाधू, तुझ्या पतीमुळे आम्हा सर्व देवांना आधीच खूप त्रास भोगावा लागला.तुझ्या पोटातून जन्माला येणार्‍या मुलाचा म्हणजेच राक्षसाची आणखी भर पडायला नको म्हणून तुला  नेऊन बंदीवासात ठेवणार आहे.असे म्हणून कयाधूला इंद्रदेव घेऊन गेले. कयाधूसह इंद्रदेव आकाशमार्गे स्वर्गात जात असतांना समोरुन नारद आले. त्यांनी कयाधूला कुठे नेत आहात असे विचारल्यावर,इंद्रदेव म्हणाले,हे महामुनी! कयाधू एक राक्षस पत्नी आहे.तीच्या पोटी येणारा राक्षसपुत्र,भविष्यात देवांना कटकारस्थानं करुन  त्रासदायक होऊ नये म्हणून,त्याला आतांच संपवणार आहे.

         त्रिकालदर्शी नारदमुनी म्हणाले, देवेंद्र! कयाधू जरी राक्षसपत्नी असली तरी तिच्या पोटी येणारा पुत्र देवांचा शत्रू होईलच असे नाही.शिवाय कयाधू ईश्वर भक्त आहे.विधिलिखितानुसार कयाधू च्या पोटी येणारं मूल भगवान विष्णूंचा महान भक्त असणार आहे.त्यामुळे तुम्ही कयाधूला अपाय नका करु!ठीक आहे. आपल्या इच्छेनुसार कयाधूला देतो सोडून.त्यावर कयाधू म्हणाली,हे ऋषीवर आपण मला सोडवले तरी मी आतां कुठे जाऊ?राक्षसराज्य तर नष्ट झाले.नारद म्हणाले, हे देवी कयाधू चिंता नको करुस हिरण्यकश्यपूचे तप पूर्ण होईपर्यत आपण माझ्या आश्रमात रहावे.त्यानुसार नारदमुनी कयाधूला आपल्या आश्रमात घेऊन आले.त्यांच्या आश्रमात कयाधू त्यांच्या सांगण्यानुसार श्रीविष्णूंचे नामस्मरण करुं लागली.नारदमुनीही तिच्यावर गर्भसंस्कार करीत विष्णूंचे गुणगाण ऐकवित असत.एक दिवस विष्णूंची महती सांगत नारद म्हणाले,देवी या सृष्टिचे जगतपालक भगवान विष्णू आहेत.सर्व प्राणीमात्रांचे रक्षण आणि पालन श्रीहरि विषाणूच करीत असतात. या तिन्ही लोकांत त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कुणीच नाही.

        नारदांचे भक्तीरसाने भारलेले बोलणे एकाग्रतेने कयाधू व पोटातील बाळही ऐकत होते.अशाप्रकारे कयाधूच्या पोटात असलेल्या बाळाच्या मनावर गर्भावस्थेत असतांनाच भगवान विष्णूंचे महात्म्य बिंबवल्या गेले.

        वर्षामागून वर्षे उलटली.हिरण्य कश्यपूचे तप अविरत सुरुच होते.या बारा वर्षात असंख्य संकटे,अडचणी येऊनही न डगमगता हिरण्यकश्यपूने आपले तप तटस्थपणे कायम सुरुच ठेवले.त्याच्या कठोर तपाचा परिणाम…त्याच्या अंगातून अग्निज्वाळा बाहेर पडू लागल्या.त्या ज्वाळांनी संपूर्ण ब्रम्हांड व्यापल्या गेले. नद्या,नाले,समुद्र उकळू लागले.पृथ्वी अस्थिर होऊन हलू लागली.भयभीत झालेले देव सत्यलोकात जाऊन हे संकट निवारण्याची ब्रम्हदेवांची विनवणी, करुणा भाकू लागले,

         अखेर बारा वर्षांनी हिरण्यकश्यपू च्या तपसाधनेने प्रसन्न होऊन आणि सर्व  देवांच्या विनवनीनुसार,आपल्या साधनेत तल्लीन असलेल्या हिरण्यकश्यपू समोर ब्रम्हदेव प्रगट झाले.त्याच्या तपःसाधनेवर प्रसन्न होउन म्हणाले,हे हिरण्यकश्यपा! मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालोय.ह्यापूर्वी असा तपस्वी कुणी झाला नाही.

             क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

     

!!!  भक्तप्रल्हाद  !!!

भाग – ४.

         हिरण्यकश्यपू आपल्याच साधनेत पूर्ण तल्लीन झालेला,अंतर्बाह्य आपल्या नामस्मरणाने ओथंबलेला बघून ब्रम्हदेव अतिशय प्रसन्न होऊन म्हणाले, तुझी साधना सफल झाली.तुला हवा तो वर माग!नंतर ब्रम्हदेवांनी त्याच्या शरीरावर अभिमंत्रीत पवित्र जल शिंपडले.त्याक्षणी  त्याचे शरीर सोन्यासारखे चमकूं लागले. त्याचे डोळे कृतज्ञतेने व आनंदातिरेकाने भरुन आल्यामुळे त्याच्या तोंडून शब्दही बाहेर पडू शकला नाही.थोडा शांत झाल्यावर गहिवरल्या स्वरात म्हणाला,हे भगवंता!तुम्ही ह्या अंधकारमय जगाला प्रकाशित करतां,सृष्टी निर्माण करणारे व तिचे रक्षक तुम्हीच आहांत,तसेच प्रलय करणारेही तुम्हीच आहांत,तुम्ही सर्वशक्तीमान, सर्वज्ञ,सर्वगुणसंपन्न व कृपाळू आहांत. अन्य देवांपेक्षा आपण लवकर प्रसन्न होऊन वर देता…हिरण्यकश्यपूच्या स्तुतीने ब्रम्हदेव संतुष्ट होऊन म्हणाले,तूं एवढी घोर तपश्चर्या कां केलीस?त्यावर तो म्हणाला,हे परमपिता ब्रम्हदेवा!मला अमरत्वाचा वर हवाय!अरे, या जगांत जो जन्माला येतो त्याला मरण कधीच चुकले नाही,तूं दुसरे कांहीही माग!

           देवा! आपल्या आशिर्वादाने माझे कडे सर्व कांही आहे.आपण खरच माझे वर प्रसन्न झाला असाल तर,मला असा वर द्या की,मला कोणत्याही शस्राने मरण येणार नाही,दिवस असो की,रात्र कोणत्याही वेळी मला मरण येऊ नये. तसेच देव,दानव,मनुष्य किंवा प्राणी या पैकी कुणीही मारुं शकणार नाही.ना घरात,ना बाहेर,ना धरतीवर,ना आकाशात कुठेही कुणी मारुं शकणार नाही असाच वर हवाय! तथास्तू! म्हणून ब्रम्हदेव अंतर्धान पावले.

           ब्रम्हदेवांकडून मनपसंत वर मिळाल्याने उन्मत्त हिरण्यकश्यपूचा अहंकार आणखी वाढत जाऊन शिगेला पोहोचला.या जगात आपल्याला कुणीही कश्यानेच मारुं शकणार नाही,एकप्रकारे अमरत्वच प्राप्त झाले या भावनेने तो मन मानी वागूं लागला.त्याने आपल्या दरबारात घोषणा केली व सेनापतीला म्हणाला,राज्यात सर्वीकडे दवंडी पिटवून सर्व जनतेला माझी आज्ञा प्रसारीत करा, आजपासून या धरतीवर कोणीही कोणत्याही देवाची पुजा करणार नाही, जर कोणी या आज्ञेचे उल्लंघन केले तर त्याचा शिरच्छेद केल्या जाईल.सगळी कडे फक्त आणि फक्त माझीच पुजा व्हायला हवीय!प्रत्येकाला माझीच आराधना करण्याची सक्ती करा.सेनापती नम्रतेने म्हणाला,महाराज! आपल्या आज्ञेचे तंतोतंत पालन केल्या जाईल. प्रत्येकाला आपलीच पुजा करण्यास भाग पाडूं असे म्हणून सेनापती राक्षसांच्या टोळींसह हिरण्यकश्यपूची आज्ञापालन करण्यास निघून गेला.

            हिरण्यकश्यपूचा सेनापती, राक्षसांच्या टोळीसह एका आश्रमाजवळ आला.तिथे यज्ञ सुरु होता.ॐ विष्णवे नमः। ॐ विष्णवे स्वाहाः… अशा मंत्रजपात ऋषीमुनी होमकुंडात आहुती देत होते.सगळीकडे मंत्रांचा उद्घोष सुरु असल्यामुळे वातावरण प्रसन्नतेने व्यापलेले होते.

          सेनापतीने हे सर्व पाहिले मात्र, त्याचे अंगाचा संतापाने तिळपापड झाला त्याने सर्व राक्षसांना आज्ञा केली,या धर्मा च्या ठीकाणी अधर्म प्रस्थापित करा.मंत्रा ऐवजी इथे आरोळ्या किंकाळ्या ऐकू यायला हव्यात.सेनापतीचा आदेशानुसार राक्षसांनी आश्रमावर हल्ला चढवून तिथल्या ऋषीमुनी,साधूंना लाथांनी उडवून लावले.होमकुंड उध्वस्त केला. पवित्र होमकुंडात हाडामासाचे तुकडे टाकून अपवित्र केले.अचानक झालेल्या हमल्यामुळे गर्भगळीत झालेले ऋषीमुनी, साधूसंत सैरावैरा आपला जीव वाचवत पळूं लागले.पण राक्षसांनी त्या सर्वांना पकडून सेनापतीसमोर हजर केले.

           सेनापती त्या सर्वांना सज्जड दम देत म्हणाला, आजच्यानंतर कुणीही देवां ची पुजा करणार नाही.करायची झालीच तर आमचे महाराज हिरण्यकश्यपूचीच पुजा करायची,तेच या जगाचे आतां तारणहार आहेत.आणि जो उल्लंघन करेल त्याला आपला जीव गमवावा लागेल.अशाप्रकारे हिरण्यकश्यपच्या नांवाने सेनापतीने सगळीकडे धुमाकुळ घालून दहशत पसरवू लागला.

          पृथ्वीवरील वैष्णव भक्तांच्या आश्रमात अन्याय,अत्याचार,अनन्वित छळ करुन सेनापती हिरण्यकश्यपूकडे परतून,आपल्या कार्याचा अहवाल देत, वंदन करुन म्हणाला,महाराज! आपल्या आज्ञेचे पालन करुन संपूर्ण पृथ्वीवर आपल्या नावाचा जयजयकार व दबदबा निर्माण केला आहे.आतां आपल्याशिवाय इतर कुणाचेही पुजन होणार नाही अशी ताकीद सर्वांना दिली आहे.

         सेनापतीच्या कार्याने हिरण्यकश्यपू अत्यंत हर्षित होऊन म्हणाला,हे सर्व ठीक आहे,पण ज्या विष्णूंनी माझ्या भावाचा वध केला,तो सूड घेतल्याशिवाय व त्याला दंडित केल्याशिवाय मला मनः शांती मिळायची नाही.

              क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

                         

भक्त प्रल्हाद संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading