अभिनव रामायण  संपूर्ण भाग ४, (१६ ते २०)

रामाचा सत्कार करुन झाल्यावर ऋषी म्हणाले,रामा तूं सर्वांचा राजा आहे. तूं महारथी,धर्मप्रवर्तक असून माझ्यासह सार्‍या ऋषींना प्रिय आहेस,तसंच सर्वमान्य आहेस.ऋषीवर! आपण फार महान आहांत.आम्ही ज्या ज्या आश्रमां ना भेटी दिल्यात तिथे केवळ आपल्या गुणांचे,कार्यांची महतीच कानी पडली. रामाचे हे अनुभवाचे बोल

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

……रामाचा सत्कार करुन झाल्यावर ऋषी म्हणाले,रामा तूं सर्वांचा राजा आहे. तूं महारथी,धर्मप्रवर्तक असून माझ्यासह सार्‍या ऋषींना प्रिय आहेस,तसंच सर्वमान्य आहेस.ऋषीवर! आपण फार महान आहांत.आम्ही ज्या ज्या आश्रमां ना भेटी दिल्यात तिथे केवळ आपल्या गुणांचे,कार्यांची महतीच कानी पडली. रामाचे हे अनुभवाचे बोल…..

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

अभिनव रामायण

!!!  अभिनव रामायण  !!!

भाग  –  १६.

          यथावकाश तिघेही पंटवटीत पोहचले.श्रीरामांनी प्रदेशाची पहाणी करुन,पर्णकुटी बांधण्यासाठी योग्य जागा निवडल्यावर लक्ष्मणाला कुटी बांधण्याची आज्ञा दिली.लक्ष्मणाने सुंदर,प्रशस्त पर्णशाला उभारली.पर्णकुटी पाहुन राम फार खुष झाले.पर्णकुटीची वास्तुशांती झाली.पराक्रमी रामांना गोदावरीच्या पवित्र  काठी पंचवटीत स्वतःचे घर मिळाले.पंचवटीतील सुंदर,सुखद निवासांत पावसाळा व्यतीत होऊन, हेमंताची उल्हासीत करणारी थंडी जाणवु लागली.गोदावरी नदीत तिघांनीही स्नान करुन परतल्यावर,लक्ष्मण कंदमुळे आणण्यास जवळच झाडीमधे गेला होता श्रीराम ध्यान संध्या आटोपुन सीतेबरोबर गप्पागोष्टी करीत बसले असता,राक्षस राजा रावणाची बहिण शूर्पणखा,स्वतःचे कुरुप,बेडौल रुप बदलवुन सुंदर तरुणी च्या रुपात रामासमोर येऊन उभी राहिली

         शूर्प म्हणजे सूप(धान्य पाखडण्याचे) दुसरा अर्थ-प्रस्फोटन, राक्षसी प्रवृत्तींची वाढलेली नखे,जी सर्व समाजजीवन कुरतडुन टाकल्याने भडका उडतोच उडतो.शूर्पणखाने स्वतःचा खरा  परिचय रामाला देत म्हणाली,विश्रावासा ऋषींचा पराक्रमी पुत्र आणि राक्षसांचा बलाढ्य राजा रावणाची मी बहिण,दुसरा भाऊ कुंभकर्ण जो गाढ झोपलेला असतो आणि प्रख्यात योध्दे खर,दुषण हेही माझेच भाऊ आहेत.याला अपवाद भाऊ बिबिषण आहे.अशी मी प्रतिभासंपन्न, शिवाय माझी इच्छा आणि ताकद कुठेही दाखवुं शकते.तरी हे रामा! तूं माझा पत्नी म्हणुन स्विकार कर!काममोहित शूर्पणखे ला श्रीराम म्हणाले,मी एकपत्नी व्रत आचारले असुन सीता माझी पत्नी आहे.

          परंतु माझा लहान भाऊ लक्ष्मण, शीलवान,रुपवान असुन लग्न त्याचेही झालेले आहे,पण त्याने बायकोला इथे आणलेले नाही,त्याची इच्छा असेल तर.. श्रीरामाचे बोलणे ऐकुन,रामाला सोडुन झाडावरची फळे काढणार्‍या लक्ष्मणाकडे जाऊन म्हणाली,तुझ्या रुपाला साजेसी  मी योग्य भार्या असल्याने,माझ्याशी लग्न करुन,या दंडकारण्यांत आपण सुखाने संसार करु!लक्ष्मण हसुं आवरीत म्हणाला,मी रामाचा दास,दासाची दासी होण्यापेक्षा रामच तुझ्या योग्य आहे. लक्ष्मणाच्या बोलण्यातील उपहास तिच्या लक्षात आल्याने,ती सरळ रामाकडे येऊन संतापाने ओरडुन म्हणाली,आतां तुझ्या समोर या मानवी स्रीला खाऊन टाकते असे म्हणुन तिने सीतेवर झडप घातली.स्री अवध्य,तेव्हा हिला विरुप करुन हाकलुन देण्याचा लक्ष्मणाला आदेश दिला.लक्ष्मणाने तीक्ष्ण खड्डःगाने शूर्पणखेचे नाक-कान कापल्यावर,वेदनां नी विव्हळत शूर्पणखा त्या जनस्थानाती ल रानांचे अधिपत्य रावणाने दिले असलेल्या खर दुषणकडे जाऊन अश्रू गाळत म्हणाली,राजा दशरथपुत्र आपल्या रानात एका सुंदर स्रीसह घुसले आहे.त्या स्रीमुळेच माझी अशी अवस्था झाली आहे,तरी त्या तिघांना ठार कर! त्यांचे रक्त पिल्यावरच मला शांती मिळेल

          ‘खर’ म्हणजे तीक्ष्ण,दुसरा अर्थ गाढव(अमरकोष १८६१)व ‘दुषण म्हणजे साक्षात दोषांचे प्रतिक! शूर्पणखाची केलेली विटंबना पाहुन,खर-दुषण भयंकर संतापुन,राम लक्ष्मणाचे पारिपत्य करण्यासाठी १४ हजार पराक्रमी राक्षस सैन्यासह पंचवटीकडे निघाले.आणि राम राक्षसांच्या विपरीत,भ्रष्ट आणि क्रुर कारवायांना पायबंद घालण्यासाठी कटीबध्द झालेत.

          वरवर पाहतां वाल्मीकऋषींना क्रौंचपक्षाचा व्याधाकडुन वध झाल्याचे बघुन त्यांना रामायण लिहिण्याची स्फुर्ती झाली असे म्हटल्या जाते,पण ही केवळ अनुकंपा किंवा भूतदया नव्हती तर, निरपराध जनसामान्याचे,ऋषीमुनींचे जगने दुभर करुन,वाईट कृत्यांचा अभिमान बाळगुन राक्षसी वृत्तीने असंख्य निष्पाप जीवांशी खेळणारे आततायी नराधम राक्षसांना नष्ट करण्या साठीच त्यांनी श्रीरामाला तयार करुन पुढे सरसावले होते.

       खर-दुषणचे मोठ्या संखेत राक्षस सैन्य शस्रअस्रसहित आपल्यावर चालुन येत असल्याचे पाहुन सीतेला लक्ष्मणा च्या संरक्षणांत जवळच्याच एका गुहेत आश्रय घ्यायला सांगुन,स्वतः एकटे राम धनुष्याची प्रत्यंचा खेचुन  पवित्र्यात उभे राहिले.थोड्याच वेळांत त्यांच्याभोवती हजारो राक्षसांचा गराडा पडला,पण ते जराही न डगमगता,सहजतेने,मोठ्या आवेशाने आपले धनुष्य मंडलाकार फिरवित काळाच्या पाशासाररखे हजारों दुर्धरबाण राक्षसांवर सोडुन हजारों राक्षस एका क्षणांत मृत्युमुखी पडले.

                 क्रमशः
 संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
          दि.  ९-३-२०२१.

!!!  अभिनव रामायण  !!!

भाग –  १७.

          या संहारातुन वाचलेले सैनिक रण भूमी सोडुन पळु लागलेले पाहतांच, त्यांना परत फिरवुन पुन्हा युध्दास प्रेरीत केले आणि दुषण ने ५००० राखीव सैन्य घेऊन स्वतः श्रीरामावर धावुन गेला असतां, रामांनी त्याचा रथ मोडला,सारथीचे शीर उडावले व दुषणचे दोन्ही हात बाणांनी तोडुन टाकले.रक्तबंबाळ दुषण जमीनी वर कोसळला.आपला सेनापती पडल्या चे पाहुन स्थूलाक्ष  आणि प्रमाधी, महाकपाळ हे सेनेचे म्होरके रामावर तुटुन पडले.पण रामांनी या तीन्ही वीरांना क्षणात ठार मारले.दुषण पडला आणि त्याच्या सैन्याचा झालेला झालेला दारुण पराभव पाहुन खर संतापाने आपल्या जवळील राक्षस सैन्याला एकत्रीत करुन मोठ्या त्वेषाने रामावर धावुन गेला.रामा च्या बाणाने सर्व सैन्याची धुळदाण झाली फक्त खर आणि त्रिशिरा दोघेच त्या संहारातुन वाचले.त्रिशिरा चालुन गेला असतां श्रीरामाने त्याची छाती विध्द केली एकट्या पदाती रामाने पराक्रमी राक्षस सेनेला नष्ट केलेले पाहुन,अस्राचा वापर करुन रामासमोर गेला पण,अल्पावधित खरचा रथ भग्न होऊन कवचहीन खर जमीनीवर पडला.

        गदा घेऊन खर रामावर धावुन गेल्यावर,श्रीरामाने वज्रासारखा प्रचंड अवाज करत बाण खरच्या छातीत घुसुन बाणाच्या आगीत जळत खर गतप्राण झाला.खर आणि दुषण दोघेही महा बलाढ्य राक्षस अनेक प्रकारची अस्रेशस्रे आणि बलशाली आणि आपल्या पराक्रमाने त्रैलोक्याला जिंकणार्‍या रावणाचे सामर्थ्य त्यांच्या पाठीशी होते. याउलट,लक्ष्मण सोडला तर राम एकटे होते.रामाची बाजु राक्षसांपेक्षा वरपांगी दुर्बल होती,तरीही एकट्या पदाती रामाने खर आणि दुषण सारख्या बलाढ्य राक्षसांना त्यांच्या मोठ्या सैन्यासह ठार केले,कारण रामाचे अलौकिक मनोधैर्य, सद्तत्वार अपरंपार निष्ठा,म्हणुनच अन्यायी आणि भ्रष्ट प्रवृत्तीच्या विरोधात उठलेल्या लोकक्षोमाची ज्वाला रामाच्या रुपाने प्रगटली.असेच माणसं नवा इतिहास घडवतात.विजापूर,अहमदनगर च्या सुलतान शाह्या आणि त्यांच्याहुन प्रबळ असलेल्या मोगल बादशहाच्या तुलनेत शिवाजी महाराजांजवळ काय होते?मुठभर मावळे आणि सह्यांद्रीवरचे दोन चार किल्ले,पण त्याच शिवाजींनी तीन्ही शाह्यांना खडे चारलेच ना?समर्थ रामदासांनी त्या काळात उभ्या महाराष्र्टा त जो राम जागवला,तो याच रामायणांती ल रामाच्या स्फुर्तीनेच ना?शेतकर्‍यांमधे च नव्हे तर भटभिक्षुकांतही औरंगजेब सारख्या प्रतिरावनाशी झुंज देण्याचे मनो धैर्य आणि सामर्थ्य याच रामायणाने दिले.

           खर आणि दुषण यांना ठार मारल्यावर संघर्ष संपत नाही,उलट संघर्षाला सुरुवात झाली.आततायी,घात पाती आणि भ्रष्ट अपप्रवृत्ती सामोपचारा ने मिटवता येत नाही.आणि युध्द करुनही   सहजासहजी नामोहरण होत नाही. रामायणांतसुध्दा खर-दुषणच्या वधानंतर संघर्षाची पातळी वरच्या स्तरांवर जाणार होती.नाक कान कापलेली शूर्पणखा,खर दुषण आणि राक्षसांचा संहार पाहुन ती राक्षसराज रावणाकडे त्वरीत रवाना होते. ती जेव्हा रावणाकडे पोहचते,तेव्हा पौलस्य ऋषींच्या कुळात जन्मलेला राक्षसराजा रावण प्रलयकाळांत संहार करण्यास उद्युक्त वस्रालंकारांनी सजुन अमात्यांच्या सभेत सिंहासनाधीत होता.

         अमात्य सभेत नाक कान कापलेली शूर्पणखा बेधडक शिरुन अत्यंत चिडुन लोकांना रडविणार्‍या रावणाला म्हणाली,छानsss इथे तूं आनंदात दिवस व्यतीत करतोहेस आणि जी तूं गुप्तचारांमार्फत माहिती मिळवावयास हवी होती,तिकडे दंडकार ण्यात महाघोर व भीतीदायक परिस्थिती निर्माण झालेली असतां तू…ती असे बोलत असतांनाच त्याचे लक्ष तीच्या कापलेल्या नाक कानाकडे गेल्यावर, त्याने कारण विचारले असतां,दंडकारण्या त घडलेली समग्र घटना कथन करुन म्हणाली,तेथील ऋषीमुनींना व अन्य वन वासीयांना अभय देऊन दंडकारण्यांत शांतता प्रस्थापीत केल्याचे सांगीतल्यावर मोठ्याने गर्जना करीत,रामासंबंधीची माहिती शूर्पणखेला विचारल्यावर ती म्हणाली,अयोध्येचा राजाादशरथाचा जेष्ठ पुत्र रामाला पित्याच्या आज्ञेनुसार लहान भाऊ लक्ष्मण व पत्नी सीतासह दंडकार ण्यांतील पंचवटीत एक कुटी बांधुन वास्तव्यास आहे.दोघेही भाऊ महा पराक्रमी!पदाती एकट्या रामाने तीक्ष्ण शरांचा वर्षाव करुन अवघ्या दीड मुहुर्त वेळांत खर दुषण सहित सर्व राक्षसांचा संहार केला. या घटनेची तूं दखल घे!

             क्रमशः
 संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
           दि.  ९-३-२०२१.

!!!  अभिनव रामायण  !!!

भाग  –  १८.

      शूर्पणखा पुढे म्हणाली,श्रीरामाची पत्नी सीता अप्रतिम सुंदर आहे.ती त्या तापसी रामापेक्षा तुलाच शोभण्यासारखी आहे.तुझ्यासाठी मी तीला पळवण्याच्या प्रयत्नात त्या दुष्ट लक्ष्मणाने माझी ही अवस्था केली.दंडकारण्यांतील संहार सांगतांना शुर्पणखेने दोन गोष्टी पदरच्या सांगीतल्या,एक म्हणजे तीने सीतेला पळवण्याचा प्रयतानाची व दुसरी रावणा चा लंपट स्वभाव लक्षात घेऊन सीतेच्या अपहरणाचे बीज त्याच्या मनांत पेरण्याचे

         इतिहासाला हे कांही नवीन नाही. दुय्यम अधिकार्‍याचा कल,जबरदस्त सत्ताधार्‍याला सत्तेपेक्षा त्याला जे आवडेल तेच सांगण्याकडे व करण्याकडे असतो.याउलट श्रीरामांसारख्या थोर पुरुषांचे असते.त्यांना सहजगत्या कुणी बहकवु शकत नाही आणि त्याचमुळे आत्मवंत लोक त्यांच्या कर्तव्यधर्माला अनुसरुनच निर्णय घेऊन वागतात.

        रावण या शब्दाचा अर्थच रडवणारा असा आहे.रावणाने सद् प्रवृत्त लोकांनाच शत्रु ठरवले होते.निरपराध लोकांच्या कत्तली,विश्वविद्यालयाचा नाश,संग्रालये, ग्रंथ जाळणारे,भ्रष्टाचारी,राक्षस प्रवृत्तीचे लोक जन्माला येतच राहतील आणि त्यांचे निर्दालन करण्यासाठी रामा सारख्या व्यक्तिला अवतार घ्यावाच लागतो.म्हणुनच “रामायण” नित्य नवा आणि सर्वव्यापी आहे.

           शूर्पणखाने सांगीतलेली हकिकत ऐकल्यावर रावणाने आपल्या मंत्र्यां बरोबर मसलत विचारविमर्ष करुन सोन्याने सजवलेल्या रत्नजडीत विमानात स्वार होऊन समुद्र पार करुन एकांतात असलेल्या,काळ्या हरणाचे कातडे पांघरलेल्या जटामंडल धारण केलेल्या मारीच्याच्या आश्रमात प्रवेश केला.मारीच्याने रावणाचे यथोचित स्वागत केल्यावर येण्याचे प्रयोजन विचार ल्यावर,दंडकारण्यांत रामाने केलेल्या राक्षस सेनेचे निर्दालनवृत्त सांगुन,रावण मोठ्या तिरस्काराने रामाबद्दल जेवढे वाईट सांगतां येईल तेवढे सांगीतले. मारीच कांहीही प्रतिक्रीया न देतां,कोणते ही भाव न दाखवतां गप्प राहुन रावणाचे बोलणे ऐकत होता.तुझ्यासारख्या सहाय्यकामुळेच मी देवानांही जिंकु शकलो.आजपण तुझ्या मदतीची गरज आहे.तू सुंदर सुवर्णमृग बनुन पंचवटीत रामाच्या कुटीसमोरुन जा.सुवर्णमृग बघताच ती रामलक्ष्मणाला मृग पकडुन आणण्याचा हट्ट धरेल.मग हुलकावणी देत त्या दोघांना पर्णकुटीपासुन दूर अरण्यात घेऊन जा.इकडे आश्रमांत सीता एकटीच असल्याने मी तिला सहज पळवु शकेन.सीतेचे अपहरण रामाला दुःखी,दुर्बल करेल.खचलेल्या रामावर हल्ला केल्यास त्याचा पराभव अटळआहे

         राक्षसी व आततायी वृत्तीच्या लोकांचे एक वैशिष्ट्य असते.छोट्या मोठ्या उपद्रवांबरोबर दुसर्‍यांच्या मर्मावर आघात करणें त्यांना फार आवडते.एवढा बलिष्ठ रावण,पण श्रीरामाशी  सरळ युध्दाला उभे न राहतां रामाचे मर्मस्थान असलेल्या सीतेला पळवुन नेण्याचा कुटील डाव,मारीच्याला मायावी मृग बनवुन घातक उद्दीष्ट साधायचे होते.

         रावणाचे कुटील कारस्थान ऐकुन मारीच भयाने थरारला.धैर्य एकवटुन,हात जोडुन,विनंती करत रावणाला म्हणाला, राजा!तुला वास्तविकतेची कल्पनाच नाही.तुझ्यासारख्या स्वेच्छाचारी,भ्रष्ट, पापी,दुर्बध्दी असलेला राजा स्वतःला,व स्वतःच्याच लोकांना आणि राष्र्टाला विनाशाकडे नेतो.राम दुराचारी नसुन प्रज्वलित अग्निसारखा तेजस्वी आणि पराक्रमी असल्यामुळे तूं रामाच्या वाटेस न जातां बिभिषण व मंत्रीगणांच्या सल्ल्याने जे हितकारक असेल ते करावे. रावणाला त्याचे म्हणने पटले नाहीसे पाहुन, विश्वामित्रांच्या यज्ञाच्या वेळचा स्वतःचा अनुभव कथन केला.

         राम त्यावेळी केवळ १२ वर्षाचे बालक असुनसुध्दा माझ्यासह सर्व राक्षसांचा पराभव केला होता.तेव्हा तर ते शस्रविद्या शिकत होते.हरप्रकारे रावणाल समजावण्याचा प्रयत्न करुनही रावण ऐकत नाहीसे पाहुन,अखेर मारिच म्हणाला राजा! तुझ्या अंतःपुरात हजारो स्रीया आहेत.दुसर्‍याच्या पत्नीवर आसक्ती ठेवण्याइतके दुसरे पाप नाही. तुझे सौख्य टिकवायचे असेल तर,रामास दुखवु नकोस.मरण जवळ आलेला रोगी जसा औषध नाकारतो तसेच रावणाला मारिचाचे बोलणे आवडले तर नाहीच, उलट संतापुन राजाला विरोध करण्याची शिक्षा म्हणुन त्याला ठार मारण्याची धमकी दिली.शेवटी मारिचाने विचार केला,कांहीही केले तरी दोन्हीकडुन मरण अटळ आहे तर, मग रामासारख्या सत्पुरुषाकडुन कां नाही?

          रावण आणि मारिचा मधील संवाद म्हणजे,भ्रष्टाचारी राजकीय पुढार्‍यांसारखेच!आपल्या विरोधांतील सज्जन,सदाचारी,निष्ठावान लोकांना हेच भ्रष्ट नेते बदनाम करुन स्वहिताचा दिलेला सल्ला यांना पटत नाही.प्रसंगी जोरजबरदस्ती,हिंसा करण्यासाठीही मागे पुढे बघत नाही.

             क्रमशः
 संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
       दि.  ९-३-२०२१.

!!!  अभिनव रामायण  !!

भाग  –  १९.

          राक्षसांचा राजा रावण कुणी अक्राळविक्राळ चेहर्‍याचा,हिंस्र श्वापदा प्रमाणे सुळे पुढे आलेला  नव्हता तर,तो पौलस्य कुळांत विश्रावा ऋषींचा पुत्र आणि वैश्रवणाचा म्हणजेच कुबेराचा भाऊ होता.झाले असे की,श्रवति इति विश्रवा आणि विपरीतं श्रवतिं इति विश्रवाच!रावणाने वडिलांकडुन घेतलेले ज्ञान विपरीत स्वरुपात घेतले तर, वैश्रवणाने सद्भावनेने घेतले,म्हणुन वैश्रवणकडे दैवी संपत्ती गेली,तर रावणा कडे राक्षसांचे अधिपत्य आले.

          रावणाने धमकी दिल्यामुळे,त्याचे ऐकण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. रावणाने त्याला विमानांत बसवुन आकाशमार्गे पंचवटीत घेऊन आला. विमान थांबवुन दोघेही रामाच्या कुटी पासुन जवळच उतरले.रावणाच्या सुचने  नुसार मारीच्याने सुंदर सुवर्ण मृगरुपात साकार होऊन आश्रमासमोरील हिरवळी वर कोवळे गवत खात फिरुं लागला.पुर्वीच कधीही न बघीतलेला तो अद्भुत अनुपम सुंदर मृग दिसल्यावर सीता राम लक्ष्मणाला  हाकारु लागली.लक्ष्मणाला संशय आला. श्रीरामाला म्हणाला,हा मारीच राक्षस मृग रुपात आपल्या समोर आला असावा. जगांत असा रत्नजडीत सुवर्णमृग अस्तित्वात किंवा पाहण्यांत असल्याचे आढळले नाही.मारीच्याच्या कपटाने सीतेची विचारशक्तीच नष्ट झाली.तीने रामाकडे तो अद्भुत मृग पकडुन आणण्या चा हट्टच धरला.नाईलाजाने लक्ष्मणाला सीतेचे रक्षण करण्याचे सांगुन,श्रीराम मृगाला पकडायला येताच कधी लपत, कधी पळत,रामाला पर्णकुटीपासुन खुप लांबवर आणले.तो हाती लागत नाहीसे पाहुन,रामाने त्याला मारलेला बाण वर्मी लागला.पण मरतां मरतां लक्ष्मणाला कुटीबाहेर काढण्यासाठी रामाच्या आवाजाची नक्कल करत,हे सीतेss !हे लक्ष्मणाss धाव.. हा ध्वनी त्या अरण्यात प्रतिध्वनी होत असतांनाच मृगाचे बाह्यरुप जाऊन मारीच राक्षस मरुन पडला,पण त्याच्या ओरडण्याने राम चिंतेत पडले.

            वास्तविक मारीचला रावणाचा सीताहरणाचा बेत पटला नव्हता,तो तपाचरण करीत असे,पण राजाशी इनाम राखुन मरेपर्यंत पटले नसले तरी,आपली आहुती देऊन कर्तव्य पार पाडले होते.

         इकडे पर्णकुटीत रामाचा करुण आवाज ऐकुन,लक्ष्मणाला रामाच्या मदतीस जाण्यास सीता सांगत होती,पण तो रामाच्या आज्ञेनुसार सीतेला एकटी सोडु शकत नव्हता,तीच्या संरक्षणाची जबाबदारी त्याचेवर होती.तो जात नाहीसे पाहुन वाटेल तसे अपशब्द बोलु लागली.सौमित्रा!तूं आपल्या भावाचा शत्रु आहेस,माझ्या प्राप्तीसाठी संकटात पडले ल्या भावाचा विनाश इच्छित असुन भावा च्या मदतीला जात नाही.

         इतके जहाल बोलल्यावरही, लक्ष्मण समजावत म्हणाला,देवी!राम केवळ अवध्य आहे,तूं असे भलते सलते बोलुं नकोस.तुला या भयान वनात एकटे सोडुन जाऊं शकत नाही.राम अपरिमत बलवान आहे.रामाचे कोणीही वाईट करुं शकत नाही.राक्षस मायावी असतात.ते कोणाच्याही आवाजाची नक्कल करुं शकतात.रामाने माझ्यासंरक्षणाखाली ठेवलेली तूं ठेव आहेस.

       पण लक्ष्मणाचे समजावणे व्यर्थ गेले उलट क्रोधाने भडकुन म्हणाली,राम संकटात असुन त्यांना वाचवायचे सोडुन माझ्या अभिलाषेने तूं इथेच थांबलास..

आतां मात्र लक्ष्मणाची सहनशक्ती संपुष्टात आली.तिचे बोलणे त्याला असहाय्य झाले,म्हणाला वैदेही सीते!तूं सामान्य चंचल स्रीच्या स्तरावर येऊन, बुध्दी भ्रष्ट झाल्याने संशय घेऊन वाटेल तसे आरोप केल्यामुळे जात आहे,तूं स्वतःवर संकट ओढवुन घेत आहेस.तरी सुध्दा दाराबाहेर एक रेषा ओढुन जात आहे ती तूं कोणत्याही परिस्थितीत ओलांडायची नाही.अन्यथा…आणि सीतेला पर्णकुटीत एकटी सोडुन रामाला शोधायला निघुन गेला.

          संस्कृती आणि सद् वर्तनाच्या जीवावर उठलेले राक्षसी मनोवृत्तीचे लोक अनेक प्रलोभनांची मोहमयी माया निर्माण करतात व त्यांत चांगली सुशिक्षित माणसं सहजच फसतात. लक्ष्मणासारखी जागृत,सजग माणसे, सीतेसारख्या भान हरपलेल्याना सावध करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात,पण त्यांच्याच निष्ठेबद्दल संशय घेऊन नको ते आरोप केले जातात.लक्ष्मणाच्या बाबती त नेमके हेच घडले.

जवळच्या झाडीत लपुन बसलेला रावण, सीतेला एकटे सोडुन लक्ष्मण गेल्याची संधी साधुन संन्यासाच्या वेशात पर्णकुटीच्या दारी आला.

                 क्रमशः
 संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
        दि.  १०-३-२०२१.

!!!  अभिनव रामायण  !!!

भाग  –  २०.

रावण सीतेच्या पर्णकुटीच्या दारी येऊन सहज स्वरांत, सीतेला म्हणाला, हे कल्याणी! या राक्षस असलेल्या भयान जंगलांत एकटीच कशी? कोण आहेस तू भीती नाही का वाटत? मी मिथीलेचे राजा जनकाची कन्या व अयोध्येचे नरेश श्रीरामांची पत्नी सीता…पण हे ब्राम्हणा! तूं कोण आहेस? इथे कशास्तव आलास? कठोर शब्दात रावण उत्तरला, सीते! ज्याच्या नांवाच्या नुसत्या उच्चाराने देव, असुर आणि मानव घाबरुन थरथर कापतात, तो राक्षसराज रावण आहे. समुद्रपलीकडे असलेली लंका माझी राजधानी आहे. अनेक सुंदर सुंदर  स्रीयांना मी पळवुन नेले आहे. तुझ्यावर माझे मन जडले. या वनवासी रामासोबत राहण्यापेक्षा, माझ्यासारख्या संपन्न राजा बरोबर तूं सुखाने राहु शकशील.

रावणाचे उन्मत बोलणे ऐकताच सीता अत्यंत क्रोधीत होऊन त्याला हाकालण्याच्या आवेगात लक्ष्मणाने आखुन दिलेली रेषा ओलांडुन बाहेर आल्याबरोबर, त्याने सीतेला उचलुन विमानांत घालुन शिघ्रगतीने पळवुन नेत असतां तिच्या आक्रोशपुर्ण ओरडण्याने जवळच असलेल्या जटायूने रावणाच्या विमानावर झडप घालुन, बराच वेळ त्याला हैराण केले, रावणाने जटायूचे पंखच तोडल्याने घायाळ होऊन तो जमीनीवर पडला. आक्रंदन करणार्‍या सीतेला तीव्र गतीने आकाशमार्गे घेऊन जाणारा रावण त्याच्या विनाशाचे जहर घेऊन जात होता.

सीतेला कोणी सहाय्यक दिसत नव्हता, मदत मिळण्याची शक्यता नव्हती अखेर तीने कांही आभुषण अलंकाराची एक पोटली बांधुन, एका पर्वतशिखरावर पांच मोठी वानरे बसलेली दिसली, त्यांच्यामधे ती छोटी पोटली टाकली. रावण घाईत असल्याने त्याच्या लक्षात ही गोष्ट आली नाही. चंपा सरोवर ओलांडुन, मग समुद्र ओलांडुन रावनाचे विमान लंकेत उतरले. सीतेला ओढत रावणाने आपल्या अंतःपुरांत नेऊन ठेवले, जणुं स्वतःच त्याने मृत्युलाच आपल्या घरांत घेतले.

भयानक राक्षसी स्रीया, सीतेच्या रखवालीसाठी नेमुन, माझ्याशिवाय कोणालाही भेटु देऊ नये ही आज्ञा दिली, तसेच तिला कोणीही अपशब्द किंवा अनादर केल्यास त्याला कडक शासन केल्या जाईल. तीची कोणतीही मागणी, गरज तात्काळ पुर्ण करण्यांत यावी. नंतर रावण विश्रांतीसाठी महालात गेला पण तत्पुर्वी आठ पराक्रमी राक्षस रामास मारण्यासाठी दंडकारण्यात पाठवुन दिले.

दुसर्‍या दिवशी सीतेच्या इच्छेविरुध्द रावणाने आपले सारे वैभव दाखवुन, तीचा अनुनय करीत म्हणाला! आतां राम इथे कधीच येऊं शकणार नाही, तरी त्याचा विचार त्यागुन माझी इच्छा पुर्ण कर. सीता दुःखी कष्टी असुन सुध्दा निर्भयपणे तिरस्कारयुक्त स्वरांत म्हणाली अरे राक्षसा! तू साक्षात मृत्युलाच आमंत्रण दिले आहेस. तुझा आणि तुझ्या या वैभवसंपन्न साम्राजाचा विनाशकाल जवळ आला आहे. मी धर्मपरायण श्रीरामांची पत्नी, पतिव्रता धर्माचे निश्चयाने पालन करीन. सीतेचे कठोर बोलणे ऐकुन रावण धमकी देत म्हणाला, तुला १२ महिण्याची मुदत देतो, या अवधीत स्वतःहुन माझ्या स्वाधीन न झाल्यास, मुदत संपल्यावर, राक्षस तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करतील. एवढे बोलुन तीला अशोकवनांत नजरकैदेत, गोड बोलुन किंवा कठोर शब्दांनी तिचे मन वळविण्याची कामगिरी पहार्‍यावरील मुख्य स्रीवर  सोपवली. रावणाच्या आज्ञेनुसार सीतेचे जीवन अशोक वनात सुरु झाले.

इकडे मृगरुपातील मारीचचा वध करुन राम शिघ्रतेने काळजीतच आश्रमाकडे परतले. मरतांना मारीचने आपला आवाज काढल्याने सीतेला एकटी सोडुन लक्ष्मण आवाजाच्या अनुरोधाने निघाला तर नसेल ना? ही  शंका मनांत डोकावत असतांनाच खरोखरच लक्ष्मण येतांना दिसल्यावर मात्र रामाचे धाबे दणाणले. अरे लक्ष्मणा! सीतेला एकटी सोडुन… तुझ्या भरवशावर सीतेला सोडुन मी मृगा मागे आलो होतो, मग कां आलास? क्षण भर लक्ष्मण सुन्न झाला. रामा! मी स्वेच्छेने नाही आलो, तर तीच्या कठोर वाक् बाणा ने व माझ्या हेतूविषयी शंका घेतल्याने, नाइलाजास्तव तीला एकटी सोडुन यावे लागले.  

रामाचा पराक्रम आणि राक्षसी भुलावणी या दोन्हीबद्दल खात्री असुनही लक्ष्मणाने आपली जागा सोडली. भ्रामक भूलण्याच्या मागे लागुन सीतासारखी परिपक्व बुध्दीची लोकं जेव्हा लक्ष्मणसारख्या निष्ठावान, स्थीर बुध्दीच्या माणसांविषयी शंका घेतात तेव्हा स्थितप्रज्ञ लोकांचे मनसुध्दा विचलित होते. अशा सरकत्याक्षणी स्वतःला सावरणे जरुरीचे असते.

‌         क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १०-३-२०२१.

                         

अभिनव रामायण  संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading