
……रामाचा सत्कार करुन झाल्यावर ऋषी म्हणाले,रामा तूं सर्वांचा राजा आहे. तूं महारथी,धर्मप्रवर्तक असून माझ्यासह सार्या ऋषींना प्रिय आहेस,तसंच सर्वमान्य आहेस.ऋषीवर! आपण फार महान आहांत.आम्ही ज्या ज्या आश्रमां ना भेटी दिल्यात तिथे केवळ आपल्या गुणांचे,कार्यांची महतीच कानी पडली. रामाचे हे अनुभवाचे बोल…..
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
अभिनव रामायण
!!! अभिनव रामायण !!!
भाग – २६.
पश्चिमकडे जाणारी तुकडी सौराष्र्ट, बह्रीक (अफगाणिस्तान) जवळचा प्रदेश, चंद्रचित्रापर्यंत जाऊन पुढे अत्यंत दुर्गम पहाडी प्रदेश असल्यामुळे, त्या अवघड प्रदेशात न जातां पश्चिम समुद्राच्या बाजुने वळावे. यानंतर प्राग, ज्योतिष मेरु पर्वताचा उल्लेख करुन पुढील प्रदेशाची माहिती नसल्याचे सुग्रीवने सांगीतले (कारण पूर्वी आफ्रीका खंड अज्ञात होता.)
उत्तर दिशेला जाणारी तुकडी म्लेच्छ, पुलिन्द, शूरसेन, प्रस्थल, भरत या प्रदेशात सीताचा शोध घेऊन मग हिमालयात व उत्तरधृवाजवळील समुद्र व हिमगिरी मधे शोध घेत, उत्तर कुरु मार्गाने सोमगिरी पर्यंत जावे.
हनुमानाच्या कार्यकुशलतेचा अनुभव श्रीरामांना आला होताच. याच्यावर सोपवलेली कामगीरी पुर्णत्वास नेईल ही खात्री असल्याने त्यांनी आपली नाम विभूषित अंगठी हनुमानाला देत म्हणाले, हे कपिश्रेष्ठा! या अंगठीच्या खुणेमुळे सीतेची खात्री पटेल की, तूं माझा दूत आहेस. ती भयरहित होऊन तुझ्याशी बोलेल. वनश्रेष्ठ हनुमानाने ती दिव्य अंगठी मोठ्या भक्तीभावाने व्यवस्थीत ठेवुन, श्रीरामांना प्रणाम करुन सीतेच्या शोध मोहिमेवर निघाला.
सुग्रीवाने प्रत्येक तुकडीला एक महिन्याचा कालावधी दिला होता. तुकड्या परत येईस्तोवर प्रतिक्षा करत राम लक्ष्मण प्रस्रवणगिरीतील गुहेतच राहणार. पुर्व दिशेला वानर यूथपती विनत दक्षिणेला अंगदसहित हनुमान, पश्चिमेस वानरप्रमुख सुषेण आणि शतबली उत्तरेला यांच्या नेतृत्वाखाली तुकड्या रवाना झाल्या.
उत्तर, पूर्व, पश्चिम दिशेला गेलेल्या तुकड्या, सीता कुठेही न आढळल्याने हात हलवत परत आल्या, परंतु महिना उलटुन गेला तरी, दक्षिणेकडे गेलेली तुकडी परत आली नाही, की कांही माहितीही मिळाली नाही. हनुमानाच्या नेतृत्वाखाली गेलेल्या तुकडीकडे सर्वांचे डोळे लागले होते.
दक्षिणेकडील तुकडीने वने, पर्वत, नद्या, दुर्गम स्थाने, निबिड जंगले, गुहा, दर्याखोर्या, वनातील आश्रम, वस्त्या, अवघड पर्वतरांगा, भयाण अरण्य पालथे घातले, पण सीता कुठेच आढळली नाही. सर्व वानर पार थकुन गेले. एक महिन्याचा कालावधी उलटुन गेला. तेव्हा अंगदने त्यांचे मनोधैर्य वाढवत आपल्या तुकडीला म्हणाला, सुग्रीव फार कठोर शासक आहे. आपण कांहीच निकाल दिला नाही तर…. चला आतां आळस सोडुन उत्साह जागृतता व अपराजीत मनाने दिवसरात्र नव्या जोमाने शोधकार्यास लागु या! दक्षिणेतील अनेक प्रदेशात शोध घेतघेत वानर भारतखंडाच्या दक्षिण टोकाजवळ पूर्व सागर किनारी पोहचुन समुद्रकिनारी आपला डेरा टाकला असतां, जटायूचा भाऊ सम्पाती त्यांना भेटला. त्याने सांगीतले की, राक्षसराज रावण सीतेला घेऊन, दक्षिण पूर्व समुद्र बेटावर लंकेत घेऊन गेला. एवढा मोठा दुर्लभ समुद्र पार कसा करावा हा मोठा यक्ष प्रश्न वानरांपुढे पडला.
मग अंगदने प्रत्येकाला कोण किती योजने समुद्र लंघुन जाऊ शकतो हे विचारल्यावर, प्रत्येकाने आपल्या कुवती प्रमाणे सांगीतले पण समुद्र ओलांडुन परत येण्याइतकी शक्ती कुणातच पुरेशी नव्हती. तेव्हा वयोवृध्द कपी जांबुवानने हनुमानाला विचारले, तूं आमच्यात सर्वात बलवान व अचाट सामर्थ्यशाली आहेस, मग कां बरं गप्प? सर्व वानरांनी त्याला प्रोत्साहित केल्यावर तो समुद्र उलंघण्यास उभा राहीलेला हनुमान मानवातील उदात्त साहसशक्तिचे प्रतिक दिसत होता. खिन्न झालेल्या सर्व वानरांना म्हणाला, मी शिघ्रगामी व अत्यंत वेगवान वार्याचा पुत्र आहे. प्रबळ वायुच्या शक्तीला मर्यादा नसते. आकाशातील ग्रहगोल आणि नक्षत्रे ओलांडुन जाण्याचे सामर्थ्य माझ्यात असल्यामुळे, प्रचंड वेगाने हा समुद्र पार करुन सीतामाईचा शोध नक्कीच घेऊन मी परत येईपर्यत, तुम्ही सर्व माझी वाट बघत इथेच थांबा, असे म्हणुन हनुमानाने आपले मन एकाग्र करुन मनस्वी मनाच्या सामर्थ्याच्या जोरावर समुद्र ओलांडुन लंकेस जाण्यास सिध्द झाला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ११-३-२०२१.
!!! अभिनव रामायण !!
भाग – २७.
हनुमानााने चित्त एकाग्र करुन, आपले विशाल परिघाप्रमाणे असलेले दोन्ही बाहु पर्वतावर घट्ट रोवुन,सर्व अंग कटीच्या सीमेत आकुंचन,पाय एकत्र जोडुन ताठ,गर्दन व दोन्ही बाहु आकुंचित करुन घेतले.तेज,बल व पराक्रम यांचा आवेश संचारला.दूरवरच्या मार्गाचे अवलोकन करुन दृष्टी वर आकाशाकडे लावुन प्राण एकत्रीत केलेला हनुमान उड्डान करणारा वानरश्रेष्ठ, सर्व वानरांना उद्देशुन निश्चयपुर्क म्हणाला,मी यशस्वी होऊन सीतामाईला घेऊनच व रावणा सहित सारी लंका उध्वस्त करुनच परतेन मनांत कोणताही विकल्प न ठेवतां आकाशाच्या दिशेने प्रचंड वेगाने झेप घेतली.शंभर योजनांचा समुद्र पार करुन हनुमान पलिकडील तीरावर जेव्हा पोहोचला,तेव्हा हिरव्यागार वनश्रीने सुशोभीत लंका बेट दिसल्यावर,आपले प्रचंड रुप बघुन राक्षसांचे लक्ष वेधले जाऊ नये म्हणुन लहान रुप घेऊन समुद्रा काठी असलेल्या पर्वत शिखरावर उतरुन लंकेचे निरिक्षण करुं लागला.
हनुमानाने हिंदुस्थान व
लंकाबेटा मधील समुद्र कसा ओलांडला?तो पोहुन गेला की,आकाशमार्गे उडुन गेला हा विद्वानांच्या वादाचा विषय आहे.प्लव या क्रियापदाचा संस्कृतमधे उडणे आणि पोहणे असे दोन्हीही अर्थ होतात.सुंदर कांडात उड्डाणाचेच वर्णन दिसते तसेच तो छोटेमोठे रुप धारण करुं शकतो की नाही यावरसुध्दा विद्वानांत वाद आहे,पण सत्यनिष्ठेने केलेले प्रयत्न सुरुवातीला ठीणगीएवढेच असते.पण तीच ठीणगी फुलुन मोठी उर्जाशक्ती निर्णाण करते. हनुमानाने समुद्र कसा ओलांडला,यापेक्षा कोणतेही अवघड काम निश्चयात्मक प्रयत्नाने होऊ शकते हे जास्त महत्वाचे!
ठीणग्यांचा जेव्हा वणवा भडकतो, तेव्हा त्या वणव्यांंत कुकर्मी,अन्यायी शासक नष्ट होतात.समुद्राकाठच्या शिखरावरुन दूरवर फैललेल्या लंकेचे निरिक्षण करीत हनुमान कण्हेर,खजूर, नीम,कुटज,केवडा,पिंपळी,कदंब या घनदाट झाडीच्या आडोशाने गुपचुप कोणाला नकळत लंका नगरीच्या सीमा वर्ती तटाजवळ येऊन पोहचला.नगरीच्या चारही बाजुंना खोल खंदक खणलेले होते.आंत वैभवशाली महल व सुंदर घरे, सुवर्णमयी लंकेची श्रीमंती व अवती भोवती शहरांत जागोजागी बलिष्ठ राक्षसांची दले तैनात करुन लंकेला मोठ्या काळजीपूर्वक आणि सतर्कतेने सुरक्षित केले होते.
लंका नगरीचा चोख बंदोबस्त, संरक्षण व्यवस्था बघुन,एवढ्या सतर्कते तुन न कळत सीतेचा शोध कसा घ्यावा हा मोठाच प्रश्न हनुमानाला पडला. निरुपद्रवी छोटे रुप घेऊन रात्रीच्या अंधारात गुपचुप शिरायचे त्याने ठरविले. अंधार पडताच तटावरुन उडी मारुन कोणाच्या दृष्टीस न पडतां लंकेत प्रवेश केला.घराघरांवरुन जात सीतेचा शोध घेऊ लागला तेव्हा राक्षसांच्या समाजाचे चित्र त्याच्या लक्षात आले.या निरक्षणां तुन असे आढळले की,सामान्य लोकं सामान्यच असतात.जन्मतःच कुणी चांगला किंवा वाईट नसतो तर प्राप्त परिस्थितीतुन आणि मिळालेल्या संस्कारांनी माणुस देव,दानव,पाशवी बनतो.मग जसा नेता तशी ती बनतात.
फिरतां फिरतां महाबली हनुमान राक्षसराज रावणाच्या महालाजवळ आला.रावणाचे निवासस्थान वर्णनांतीत होते.त्याच्या प्रासादतुल्य घराघरांतुन तो सीतेचा शोध घेऊं लागला.त्याचे विचरण कुणाला न कळतां बिनधास्त,रावणाच्या कडेकोट बंदोबस्तातील प्रासादात न शिरतां इतर श्रेष्ठींचे घरांत शोध घेत होता. महापार्श्व,कुंभकर्ण,बिभिषण!महोदर, विरुपाक्ष,विधन,जिव्ह,सारण,विद्युनमलिक,वज्रदंष्र्ट शुक या क्रमाने जात तो इंद्रजितच्या महालापर्यंत पोहचला.तिथे ही सीता आढळली नाही.त्याच्या घराघरां वरील उड्यांना तर सीमाच नव्हती.नंतर शशीकेतू,सुर्यकेतू,वज्रकाम,जम्बुमालि, सुमाली,धूम्राक्ष अशा लंकेतील श्रेष्ठ व प्रमुख राक्षसांची घरे शोधली,पण व्यर्थ!
नंतर हनुमानाने रावणाच्या महाला कडे आपला रोख वळवला.रावणाचे राज भवन चारी बाजुंनी हत्यारबंद राक्षसांच्या देखरेखेखाली होते.त्याच्या अंतःपुराचे काय वर्णन करावे?अनेक सुंदर सुंदर स्रीयांनी अंतःपूर भरलेले होते.पण मन विकारी न होता शुध्द मनाने सीतेचा शोध घेत होता.विकारी परिस्थिती समोर दिसत असतांना सुध्दा त्याचे मन निर्विकार,बुध्दी स्थीर व कर्तव्यनिष्ठा असल्यामुळेच रावणाच्या सुंदर स्रीया पाहुनही विकृत भावना निर्माण झाल्या नाहीत.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ११-३-२०२१.
!!! अभिनव रामायण !!
भाग – २८.
रावणाचे संपुर्ण अंतःपूर शोधले पण साध्वी सीतेचे दर्शन न झाल्याने हनुमान खिन्न झाला.कुठल्या तोंडाने लंकेहुन परत फिरायचे?एवढा मोठा समुद्र उल्लंघुन आलो तो अचाट प्रयत्न फुकट गेला का? अशा विचारांत जी ठीकाणे राहीलीत ती पाहण्याचा निर्धार केल्यावर त्याला बरे वाटले.त्याची सद्तत्वावर निष्ठा होती,त्याने सीतेचा शोध व रावणाचा बिमोड करण्याचे जे काम अंगीकारले ते रामावरील निष्ठेमुळेच लंकेतील मोहमयी वातावरणांत फिरत असतांना सुध्दा हीच निष्ठा त्याच्या ह्रदयात जागृत होती.
रामायणांतील मारुतीच्या या शोधाला सुंदरकांड हे नांव दिले.त्यात सुंदर स्रीयांचे वर्णन आहेत म्हणुन नव्हे किंवा स्वर्णमयी लंकेचे वैभव चित्तारले म्हणुनही नव्हे तर, हे कांड सुंदर ठरले आहे,त्यातील भीमरुपी,महारुद्र मारुतीच्या सुंदर वागण्याने!म्हणुनच समर्थ रामदासांनी मारुतीला “सुंदरा जगदांतरा” असे संबोधले आहे.
आतां हनुमानाने सीतेचा शोध मोठ्या कसोशीने सुरु केला.छोटी मोठी घरें,गल्ल्या बोळ,चौकातील लता कुंज, तलाव,वेदिका,भूयारे,तळघरें तपासुन सुध्दा जेव्हा सीपा सांपडेना,तेव्हा त्याला शंका येऊ लागली की, रावणाच्या जुलमाने अवश होऊन प्राणत्याग तर केला नसेल ना?असा विचार करीत असतांनाच त्याला अशोकवाटिकेची आठवण आली.कलत्या उत्तररात्री अशोक वाटीकेच्या भींतिवर चढुन आंत डोकावु लागला.विविध फळांफुलांची झाडे,कृत्रिम उंचवटे,खोट्या गुंफा,स्वच्छ निळाशार पाण्याच्या शोभिवंत तलाव, वाटिका फार सुंदर रमणीय बनवली होती
सुर्योदयाच्या सुमारास तो एका अशोकवृक्षाच्या शेंड्यावर लपुन बसला. अशोकाच्या एका झाडाखाली,एक रुपवान पण मलिन वस्रे ल्यालेली,बरेच दिवसांपासुन नीट अन्नपाणी न घेतल्या सारखी कमालीची दुर्बल स्री राक्षसणीं च्या गराड्यात बसलेली दिसली.तरीसुध्दा ती अग्नीच्या ज्वालेसारखी तेजस्वी दिसत होती.रामांनी वर्णन केलेली सीता म्हणजे हीच ती स्री असल्याची त्याला खात्री पटली.सीतेला अशा अवस्थेत पाहुन त्याला कमालीचे दुःख झाले.पण सीता सांपडल्याचा पराकाष्ठेचा आनंदही झाला.केवळ पतीच्या प्रेमाखातर राज वैभव सोडुन वनातील कष्टांचा विचारही न करतां निर्जन दंडकारण्यांत श्रीरामासह कंदमुळे खाऊनही पतीसेवेत आनंद वाटत होता.रावणाने अनेक प्रकारे त्रास, प्रलोभने दाखवुनही,राक्षसांच्या गराड्यात आपले शील सांभाळुन मोठ्या धैर्याने दिवस कंठीत होती.
पहाट झाली.मंगल वाद्यांच्या गजरात जागा झालेला रावण वस्रालंका रांनी सजुन अशोक वाटीकेत आला. हनुमान झाडांच्या फांद्या,पानाआडुन त्याच्या हालचाली न्याहाळीत होता.महा पराक्रमी रावण दीन होऊन स्वीकार करण्याबाबत अनेक प्रलोभने दाखवुन सीतेची याचना करुं लागला.रावणाच्या मोहक मायावी बोलण्याला,तिरस्काराने पण, समजावणीच्या स्वरांत म्हणाली,तूं माझ्यावरचे मन हटव!निंदनीय कर्तव्य पराड्ःमुख कर्म करुं नकोस.मी मोठ्या घरची कन्या व मान्यवर कुळाची भामिनी असुन पतीशी एकनिष्ठ आहे.अरे!धर्म बाह्य वर्तन जो अन्यायी राजा करतो त्याचे राज्य,राष्र्टे,नगरे नष्ट होतात.मला रामाकडे पाठवुन आपले हीत साधुन घे.
सीतेच्या स्पष्टोक्तीचा संताप येऊन रावण मोठमोठ्याने ओरडत म्हणाला,येत्या दोन महिन्यात जर स्वतः माझ्या स्वाधीन झाली नाहीस तर तुझा विनाश निश्चित आहे.यावर जास्तच तिखट स्वरांत सीता म्हणाली,नीच राक्षसा! अपरिमित तेजस्वी रामाच्या पत्नीला असे पापकारक बोलतोस, निःसंदेह विध्यात्याने तुझा नाश होण्या साठीच तुला ही दुर्बुध्दी दिली.एवढा जर तूं पराक्रमी वीर होतास तर कपटाने कां अपहरण केलेस?त्यावेळी त्रैलोक्य जिंकणारे बळ कोठे गेले होते?
सीतेच्या पहार्यावर असलेल्या राक्षसीनींना हरप्रकारे तिचे मन वळवण्या स सांगुन पाय आपटत तो निघुन गेला. रावणासारखे दिशा चुकलेले नेते स्वतः बरोबर राष्र्टाचाही नाश करतात.अपवित्र भ्रष्ट,अन्यायाने वागणार्या नेत्याच्या हाती सत्ता गेली की,नगरे राष्र्ट अधोगतीस गेलेच म्हणुन समजावे.
रावणाला सीतेचा मोह होताच पण त्याहीपेक्षा स्वसामर्थ्याचा दर्प होता.तप, बळ,पराक्रम,धन,तेज,यश असणार्या रामापेक्षा आपण कशातही कमी नाही. आपल्या ऐश्वर्य व सामर्थ्यावर भाळुन आपल्याला पत्करावे असे त्याला वाटे.असे घडल्या खेरीज आपल्या वैभवाचे,
सामर्थ्याचे समाधान होणार नव्हते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ११-३-२०२१.
!!! अभिनव रामायण !!!
भाग – २९.
रावणाच्या आज्ञेप्रमाणे राक्षसीनीं सीतेला समजावत धमकावु लागल्या.वर बसलेला हनुमान हे सर्व बघत,ऐकत होता.थोड्या वेळाने राक्षसीनी दूर गेल्या वर आपल्या जवळील रामाने दिलेली अंगठी सीतेच्या पुढ्यात टाकली.अंगठी ओळखुन तीने आजुबाजुस व वर बघीतले असतां तीला झाडावर माकड दिसले.सीतेचे लक्ष त्याच्याकडे गेलेले पाहुन तो खाली उतरला व हात जोडुन म्हणाला,देवी!मी रामाचा दूत!त्यांची ही मुद्रिका खुणेसाठी आणली.रामदूत भेटल्याने सीतेला अतिशय आनंद झाला. साद्यंत हकिकत सांगुन लंकेवर चढाई करण्याच्या तयारीत राम असल्याचे सांगीतल्यावर,ती म्हणाली,सत्वर लंकेवर चढाई करुन तीची सुटका करावी.दोन महिन्यानंतर जिवंत राहणे कठीण आहे. सीतेने सुध्दा ओळखीची खुण म्हणुन आपला चुडामणी हनुमानाला दिला.
सीतेचा निरोप घेऊन हनुमान निघाला असतां,त्याच्या मनांत विचार आला.सीतामाईच्या शोधाचे काम तर झाले.मग शत्रुच्या शक्तीचा शोध घेण्या साठी दंडचा उपयोग करुन शत्रुपक्षाचे बळ कमतरता जोखली पाहिजे.अशा दुराचारी समाजकंटक नेत्यांना आणि शासकांना भीमटोला बसल्याखेरीज ते सुधारत नाही.सीतेच्या संरक्षणासाठी सुध्दा राक्षसांना थोडे नरम पाडणे जरुरी होते म्हणुन भीमटोल्याचा दंड मार्ग मारुतीने अनुसरला.
अशोकवनांतील शोभा पाहत असतांना हनुमानाच्या डोक्यात एक कल्पना आली.नंदनवनासारखी ही अनुपम बाग रावणाला फार प्रिय आहे.या वाटीकेपासुनच विध्वंशाला सुरुवात करावी.मग हनुमानाने अफाट वेगवेगळे मोठमोठी झाडे उलथुन टाकली.पुष्करणी मधे मातीचे ढीगारे ओतले.कृत्रिम डोंगरां ची शिखरे उडवुन दिली.अशोकवन त्याने पार उजाड करुन टाकले.हा भयानक विध्वंश अशोकवाटीकेतील पहार्यावर असलेल्या रक्षकांनी हा वृतांत रावणाला सांगीतला.सीतेच्या वास्तव्याखालील भाग सोडुन बाकीचे वन नष्ट झाल्याचे ऐकुन,कोण हा वानर?सीतेचा त्याच्याशी काय संबंध?हनुमानाच्या परिपात्यासाठी रावणाने किंकर राक्षसांची एक तुकडी अशोकवनाकडे पाठविली.किंकरांनी प्रबळ शस्रांनीशी त्याच्यावर हल्ला चढविला.हनुमानाने वाटीकेच्या दाराच्या लोखंडी खांब उपटुन त्याच्या तडाख्याने सर्व किंकर राक्षस ठार केले.किंकरचा दारुण पराभव झाल्यावर,राक्षसांचा सेना पती प्रहस्ताचा मोठा मुलगा जम्बुमाली सोबत मोठे सैन्य घेऊन पाठविले.जम्बु मालिने बाणांची वृष्टी केल्याने जखमी हनुमान कृध्द होऊन वाटीकेच्या दाराचा परीघच जम्बुमालीवर फेकल्याने त्याच्या प्रचंड भाराखाली पार चिरडुन गेला.
जम्बुमाली परास्त झाल्याचे कळतांच,रावनाने विरुपाक्ष,यूपाक्ष,दुर्धर, प्रहास आणि भासकर्ण या वीर योध्यांना मोठ्या सैन्यासह याठवले.त्यांना रावण म्हणाला,हा वानर साधा दिसत नाही, तुम्ही सावध राहुन त्याला हरप्रकारे पकडुन आणा.या पांच राक्षस वीरांच्या तीक्ष्ण बाणांनी झालेल्या खोल जखमांनी चिडलेला हनुमान उंच आकाशात उडुन प्रबळ उच्छसासाने बाणांची वृष्टी रोखली प्रचंड वेगाने दुर्धराच्या रथावर उडी मारुन रथच चक्काचूर झाला.दुर्धराच्या मदतीस आलेल्या विरुपाक्ष यूपाक्षावर शालवृक्ष उपटुन त्यांच्या फटक्याने तिघांनाही ठार केले.प्रहस व भासकर्णानी हल्ला केल्या वर दगडधोंड्याचा पर्वतच उचलुन फेकल्याने शिखराखाली दोघेही चिरडल्या गेले.मुख्य योध्देच गारद झाल्यावर बाकीचे सैन्य नष्ट व्हायला वेळ लागला नाही.
पंचयोध्यांच्या वधाची वार्ता ऐकल्या वर रावणाने आपला कनिष्ठपुत्र अक्षय कुमारवर हनुमानाला पकडण्याची जबाबदारी सोपवली.अक्षयकुमारचा पराक्रम बघुन हनुमानसुध्दा चकीत झाला,पण तो वरचढ होण्यापुर्वीच हनुमानाने त्याचा रथ तोडला,सारथी मारला,आणि अक्षयकुमारला गरगर वेगाने फिरवुन जमीनीवर आपटुन मारले. अक्षयकुमारच्या वधाने क्षुब्ध झालेल्या रावणाने,जेष्ठपुत्र मेघनाथ उर्फ इंद्रजीतला म्हणाला,तूं तपोबल,पराक्रम,अस्रविद्येत माझ्याइतकाच प्रभावी आहेस.त्या माकडाने आपल्या बलाढ्य राक्षसवीरांचा पराभव केला,विशेष म्हणजे अक्षयकुमार मारल्या गेला ही घटना सामान्य नाही. पिता म्हणुन तुला संकटांत टाकणे योग्य नाही पण राजनीती व युध्दशास्रानुसार तूच जाणे उचित होईल
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १२-३-२०२१.
!!! अभिनव रामायण !!!
भाग – ३०.
इंद्रजीत( मेघनाद) व हनुमानाचे भयानक युध्द सुरु झाले.मेघनादने सोडलेले लक्षवेधी अमोघ बाण हनुमाना समोर व्यर्थ ठरले.याला मारणे कठीण आहे हे जाणुन इंद्रजीतने ब्रम्हास्र सोडुन अस्राच्या शक्तीत हनुमानाला गुरफटुन टाकले.तो बांधल्या गेला असला तरी, त्याला भीती नव्हती,कारण या अस्रातुन कसे सुटायचे याचे ज्ञान ब्रम्हदेवाकडुन मिळाले होते.पण या निमित्याने रावणाशी आमना सामना होईल.मारत ठोकत अपशब्द बोलत बांधलेल्या हनुमानाला खेचीत रावणाच्या पुढ्यात आणण्यांत आले.बंधनमुक्त होण्याची विद्या माहित असुनही मारुती शांतपणे सारा प्रकार सहन करीत होता.भररस्त्या तुन ओढीत आणतांना राक्षसांनी खूप सतावले होते.प्रत्यक्ष रावण दिसल्यावर त्याचे तेज,रुप,धैर्य,महान शक्ती या सार्या लक्षणांनी युक्त रावणाच्या ठीकाणी अधर्माची वृत्ती प्रबळ नसती तर इंद्रासहित सर्व देवलोकांचा हा रक्षक झाला असतां हा विचार हनुमानाच्या मनांंत आल्या वाचुन राहिला नाही.
वास्तविक रावण भगवान शंकराचा महान भक्त!शंकर-पार्वतींची स्तुती करणारे रावणाचे स्तोस्र संस्कृतमधे प्रसिध्द आहे.पण वाट चुकल्यामुळे रावणाची वृत्ती राक्षसी झाली.अधर्माच्या दिशा बदलल्यामुळेच रावण राक्षस ठरला
निष्काम कर्मयोग व निष्ठा मुख्यत्वाने भगवद् गीतेत आहे.रामायणा चा आशय सामाजिक आहे,पण बैठक मात्र भगवद् गीतेच्या तत्वज्ञानाची आहे. राम-रावणाची तुलना केली तर,रावणा जवळ विद्या,अमाप संपत्ती,अमोघ शस्रास्रे,प्रचंड मनुष्यबळ,अफाट कर्मशक्ती आणि याहुन विशेष म्हणजे भक्तीसुध्दा आहे.रावणाला अहंकार असुन सद् तत्वावर निष्ठा नाही.परमेश्वरी सत्तेत शरणागती नाही.याउलट रामा जवळ विद्या,कर्तृत्व भरपुर असले तरी वनवासी असल्यामुळे पैसा,शस्रास्रे, मनुष्यबळ नाही,परंतु रामाची सद् तत्वा वर अपरंपार निष्ठा आहे.परमेश्वरी तत्वात शरणागती असल्यामुळेच रामाचे पारडे रावणाचे पारडे रावणापेक्षा जड आहे.
रामाने अर्थवादाची कास धरुन सद् तत्वांना कधीच मुरड घातली नाही.राज सिंहासनाला किंवा सत्तेला चिटकुन राहण्यासाठी पळवाटा शोधल्या नाहीत. म्हणुनच राम ‘अभिराम’ ठरले.सिंहासन सोडुन वनांत जावे लागले तो निर्णय नियतीचा म्हणुन स्विकारले.वनवासा मागील परमेश्वराचा हेतू,उद्देश,परमेश्वरी शक्तीतील शरणांगती सुसंगती होती म्हणुनच राम पुजनीय झाले.
हनुमानाला रावणापुढे हजर करतांच,अमात्यश्रेष्ठी प्रहस्ताने त्याची माहिती विचारुन युध्द कां आरंभले,असे विचारल्यावर,हनुमान स्पष्टपणे म्हणाला, राक्षसराज रावणाच्या भेटीसाठीच अशोकवन उजाडले.अयोध्येचे दशरथपुत्र श्रीरामाची भार्या,दंडकारण्यात वास्तव्यास असलेल्या रामपत्नी सीतेचे अपहरण करुन आणले.तीचा शोध घेत मी इथपर्यंत पोहोचलो.हे महाबली रावणा आपण विद्वान असुन धर्म,अर्थ याचे ज्ञान व तपश्चर्यासुध्दा मोठी आहे.परक्याच्या बायकोला जबरदस्तीने डाबुन ठेवणे कदापिही उचित नाही सीतेला रामाकडे परत पाठवावी.
हनुमानाचे हे बोलणे ऐकताच कांहीएक विचार न करतां या वानराला ठार मारण्याचा हुकुम दिला.रावणाचा भाऊ बिभिषण उठुन म्हणाला,महाराज! हा वानर रामाचा राजदूत आहे.राजदूता ला कोणताही राजा कधीही मारत नाही. त्याला जीवे न मारतां दुसरी शिक्षा द्यावी. पण रावण आपल्या बोलण्यावर ठाम असलेला पाहुन,बिभिषण विरोध करत म्हणाला,हा जे कांही बोलला ती भाषा याची नसुन याच्या राज्याची आहे.दूत सदा पराधिन असतो,तेव्हा प्राणदंडाची शिक्षा देणे उचित नाही.रावणाला बिभिषणाचे बोलणे पटल्याने,रावण म्हणाला,वानरांना त्यांचे शेपूट प्रिय असते,ते त्याचे आभुषण असते,म्हणुन त्याची शेपटी जाळुन त्याला सोडुन द्या. सैनिकाला म्हणाला,याच्या शेपटीला आग लावुन सगळ्या लंकेत फिरवून नगराबाहेर हाकलुन द्या.
ही शिक्षा ऐकुन हनुमानाला तर मुरादच मिळाली.लंकेला आग लावण्या चा निश्चय करुन,राक्षसांच्या तावडीतुन तो सहज निसटुन आपली जळती शेपटी घेऊना लंकेतील घराघरांवर उड्या मारुं लागला.लंकेत सगळीकेडे आगीचे तांडव सुरु झाले.एकामागुन एक घरे पेटत होती बिभिषणाचे घर वगळतां लंकेतील घरे आगीत भस्मसात झाली होती.लंकेचा विध्वंश करतांना सीता सुरक्षीत आहे याची खात्री करुन तीचा निरोप घेऊन, प्रचंड गतीच्या उड्डानाने समुद्रात शेपटी विझवुन समुद्र पार केला.आनंदानी सर्वाना भेटुन सीतेच्या शोधाची शुभवार्ता सांगुन विजयी वानराची टोळी किष्कींधा कडे निघाले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १२-३-२०२१.


