
……रामाचा सत्कार करुन झाल्यावर ऋषी म्हणाले,रामा तूं सर्वांचा राजा आहे. तूं महारथी,धर्मप्रवर्तक असून माझ्यासह सार्या ऋषींना प्रिय आहेस,तसंच सर्वमान्य आहेस.ऋषीवर! आपण फार महान आहांत.आम्ही ज्या ज्या आश्रमां ना भेटी दिल्यात तिथे केवळ आपल्या गुणांचे,कार्यांची महतीच कानी पडली. रामाचे हे अनुभवाचे बोल…..
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
अभिनव रामायण
!!! अभिनव रामायण !!!
भाग – ६.
रामाच्या राज्याभिषकाचे वृत्त कळताच नगरवासियांनी मोठ्या उत्साहात नगर सजावटीस सुरुवात केली अयोध्यानगरी अनुपम आनंदाने उजळुन निघाली.पण हे वृत्त ऐकुन एक व्यक्ती मात्र अत्यंत दुःखी झाली,ती म्हणजे राणी कैकयीची दासी मंथरा! मंथरा ही कैकयी च्या माहेरची म्हणजे कैकय देशाची होती. ती धावत पळत कैकयीच्या महालांत येऊन सुखासीन झोपलेल्या कैकयीला उठवत म्हणाली,तिकडे विपत्तीचा पहाड कोसळला असतां तुला झोप कशी ग येते
अग मंथरा एवढा आकांडतांकांड कशास्तव?राणी!भरत मातुलगृही गेल्याची संधी साधुन राजानी उद्या सकाळी श्रीरामाचा राज्याभिषेक ठरला आहे.अग!मग चांगलेच आहे की,राजधर्म जाणणारा,गुणवान,सत्यवादी,वचननिष्ठ, पवित्र,संयमी राजाचा जेष्ठ पुत्र राज्यावर बसणे सर्वथा योग्यच आहे. कैकयीचे हे बोलणे मंथरेला मुळीच रुचले नाही.तीला जेवढे गरळ ओकतां येईल,तेवढे ओकत म्हणाली,आतांपर्यंत तूं राजाची आवडती राणी होतीस,पण राम राज्यावर आल्या वर कौसलेचे महत्व वाढेल.
वास्तविक कैकयी रुपगुण संपन्न, कैकय देशाची राजकन्या,सर्व विद्येत विशेषतः शस्रविद्येत निपुन व राज्यकार भारात धुरंधर होती.तिच्यावर मंथरा सारख्या दासीने विष कालवुन मन बदलण्याइतकी लेचीपेची नक्कीच नव्हती.पण रामाचा साधा सरळ स्वभाव, पराक्रमी असले तरी,कांही ठीकाणी राजा ला कठोर निर्णय घ्यावे लागतात ती क्षमता रामाठीकाणी असेलच याबद्दल शासंक होती.त्यामुळे नेहमीसाठी आपल्याकडे वाईटपणा आला तरी चालेल पण,योग्य राज्य चालवण्यासाठी राम सर्वतोपरी सक्षम व्हावा,कर्मकठोर व्हावा,या दृष्टीने मंथराचे निमित्य धरुन, मनावर दगड ठेवुव कठोर निर्णय घेतला. कांही काळ रामाला,राज्य,आप्तेष्टांपासुन सुखसोयींपासुन दूर करुन,तावुन सुलाखुन निघाल्यावरच राम सुराज्य करण्यास पात्र होईल,या दृष्टीने स्वतःची आहुती देण्याचा कठोर निर्णय तिने घेतला.कैकयी कोपभवनात जाऊन बसली.दशरथ राजाला सौंदर्यवती तरुण पत्नी अतिशय प्रिय होती.तिची अशी दशा पाहुन राजा अतिशय कष्टी झाला. तिची अनेकप्रकारे आर्जवे,मनधरणी करुन कारण विचारल्यावर, महाराज! फार वर्षापुर्वी आपण मला दोन वर दिले होते.पैकी एका वराने रामाने वल्कले नेसुन तापसी बनुन चौदा वर्षे दंडकारण्या त घालवावे व दुसर्या वराने भरताला राज्य मिळावे…कैकयीची ही अनपेक्षित मागणी ऐकुन राजावर वज्राघात झाला. अग!राम तर तुला भरतापेक्षाही प्रिय ना? होय!म्हणुनच फक्त १४ च वर्षाचा वनवास….राजाने तिला हरप्रकारे विनवले पण कैकयी माघार घ्यायला तयार नव्हती.अश्या प्रकारे कैकयी आणि राजाची कठोर संवादात रात्र सरली.
दुसरे दिवशी सकाळी अत्यंत दुःखी मनाने रामाला तात्काळ बोलावणे धाडले.श्रीराम आणि सीता उंची वस्रे, दागिने घालुन समारंभासाठी तयार झालेले असतांनाच,कैकयीमातेच्या महलात बोलावल्याचा निरोप मिळाल्या बरोबर राम कैकयी महलात पोहचले. पित्याची अतिशय दयनिय अवस्था बघुन, रामाने कैकयीला विचारल्यावर,ती म्हणाली,एका संग्रामात राजाचे प्राण वाचवल्यामुळे त्यावेळी मला दोन “वर” दिले होते,तेच “वर” मी आज राजाकडे मागीतले,या “वरांनी” भरतासाठी राज्य व तुझ्यासाठी दंडकारण्यांतील १४ वर्षे वनवास….
कैकयीचे सर्वथा विपरीत बोलणे ऐकुनसुध्दा राम जरासुध्दा व्यथीत किंवा विचलित झाले नाही.माते! पितृज्ञा मला शिरसावंद्य!पित्याला सुन्नावस्थेत पाहुन, दोघांनाही प्रणाम करुन राम बाहेर पडले. आणि कौशल्यामातेच्या महालात प्रवेश करुन म्हणाले,माते! राजाज्ञेनुसार भरता ला राज्य व मी १४ वर्से दंडकारण्यांत वनवासाला जात आहे.हे ऐकल्याबरोबर कौशल्याची शुध्द हरपुन जमीनीवर कोसळली.लक्ष्मण विषण्ण नजरेने बघत होता.कौशल्या शुध्दीवर आल्यावर म्हणाली,रामा! मी जेष्ठ राणी असुन,पती सत्ताधीश असुनही मला उपेक्षितेचे जीवन जगावे लागले,कैकयीचा सर्वत्र उदोउदो होत होता.आतां वाटले आपल्या मुलाच्या राज्यात तरी सुख वाट्याला येईल पण….
कौशल्यामातेचा असा दुःखद विलाप बघुन संतापाने,क्रोधाने लक्ष्मण म्हणाला,विषयलंप्पट,विवेकशून्य राजाची आज्ञा नितीला धरुन नसल्याने अशी तत्वहीन आज्ञा कां पाळावी?राम एवढच म्हणाले,पितृज्ञा उलंघुन मी राज्य करुं शकत नाही.वनवासाला जाण्याचा माझा निश्चय झालेला आहे.
लक्ष्मणाला वाटले की,राजाने विकारवश होऊन दिलेली आज्ञा रामाने कां पाळावी?पित्याइतकीच मातासुध्दा आदरणीय असतांना तीला दुःखाच्या खाईत लोटुन पितृज्ञा पाळणे कितपत योग्य?रामाचे म्हणने, दशरथराजा कौशल्येचा पती,गती,आणि धर्म आहे. राजा हा पिता,गुरु, व वयोरुध्द असल्याने त्यांनी राग,हर्ष किंवा वासना अशा कोणत्याही वृत्तीने दिलेली आज्ञा पाळणे पुत्रकर्तव्य आहे.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! अभिनव रामायण !!!
भाग – ७.
लक्ष्मणाला रामाचे विचार पटले नाही.तो क्रोधाने नुसता धुसमसत होता.
अरे सुमित्रानंदन लक्ष्मणा!माझा होणारा राज्याभिषेक रद्द होणे,वनवासात जाणे, यामागे नियती आहे.नियतीच्या इच्छेनुसारच घटना घडत असतात,तेव्हा कैकयीमाते कडुन,पित्याला आणखी मनस्ताप होण्यापेक्षा सत्वर वनाकडे प्रस्थान करावे.
एरवी प्रेमळ,सावत्रपणा कधीहि न दाखवणारी,भरतापेक्षाही जास्त प्रेम करणारी कैकयी अशी विपरित वागण्या मागे नक्कीच नियतीची योजना,प्रेरणा आहे.पण लक्ष्मणाला नाही पटले.रामा! आतांच राजाचे प्रभुत्व नष्ट करुन तुला राज्यावर बसवु शकतो,तूं फक्त आज्ञा दे! नाही,पित्याची आज्ञा पाळण्यास मी कटी बध्द आहे.रामाचा दृढनिश्चय पाहुन कौशल्यानेसुध्दा सोबत येण्याचा हट्ट धरल्यावर,राम म्हणाले,आई!आपणां दोघांसाठी राजा आपला स्वामी,गुरुश्रेष्ठ व इश्वराच्या ठीकाणी…स्रीच्या जीवनांत पती हेच दैवत…तेव्हा पतीच्या सेवेत दिवस काढुन माझी प्रतिक्षा कर!मी परत आल्यावर तुझ्या सार्या इच्छा पूर्ण करेन.
कौसल्यामातेचा निरोप घेऊन राम सीतेच्या महाली आले.सीतेला या सर्वांची कांहीही कल्पना नसल्याने,ती तयार होऊन समारंभास जाण्यास वाट बघत बसलेली…सीतेला पाहतांच इतकावेळ आवरुन धरलेला मानसिक तान रामाच्या चेहर्यावर दिसतांच,तिने काय झाले असे विचारले असतां,रामाने घडलेली हकिकत सांगुन म्हणाले वनांत जाण्या पुर्वी तुझा निरोप घ्यायला आलोय..
रामाचे बोलणे ऐकुन तात्काळ सीता म्हणाली,हे नरश्रेष्ठा!माझा कसला निरोप?मी तर आपली सावली…पती पत्नीचे भाग्य एकच असते.आपल्याला मिळालेली आज्ञा मलाही लागु होते.लोक परलोकात स्रीला पतीशिवाय दुसरी गती असुच शकत नाही.पतीपुढे दुसर्या कोणत्याही नात्याला महत्व नाही.सीता एवढे बोलल्यावरही राम विचारांत पडलेले पाहुन,आत्यांतिक मनस्तापाने भोवळ आलेल्या सीतेला आपल्या सशक्त बहुपाशात घेऊन म्हणाले,तुझी इच्छा जाणल्याशिवाय वनात चल कसे म्हणु शकत होतो?मी माझ्या सावलीला कसे सोडु शकतो?चल वनांत जाण्याची तयारी कर!तुझ्याशिवाय स्वर्गसुध्दा मला तुच्छ आहे.
कांही वेळापुर्वी आलेल्या लक्ष्मणा ने दोघांचे बोलणे ऐकल्यावर व्याकुळ व दुःखावेगाने आपणही येतो म्हटल्यावर रामानी त्याला थोडे चाचपुन पाहिले.पण त्याचा सोबत वनात येण्याचा दृढनिश्चय पाहुन रामाने अनुज्ञा दिली.
ज्या उत्सुकतेने सीता समारंभा साठी सजली होती,तेवढ्याच अलिप्त पणे वल्कले परिधान करुन राम लक्ष्मणा सोबत राजा दशरथाचा निरोप घेऊन वल्कले नेसलेल्या तिघांना राज रस्त्याने पायी निघालेले पाहुन प्रजा शोकाने व्याकुळ झाली.जनतेने विचार करुन आपणही सहपरिवार त्यांच्या सोबत जाऊ,रामाशिवाय जगण्याची कल्पनाच करुं शकत नाही..त्यांची अवस्था पाहुन रामाने सर्वांना धीर धरण्यास सांगुन परत येईयर्यंत प्रतिक्षा करण्यास सांगुन सुमंता ने आणलेल्या रथात तिघेही आरुढ होऊन शोकाकुल अयोध्या वासीयांच्या गर्दीतुन वाट काढत रथ वना कडे निघाला.हताशपणे राजा दशरथ गेलेल्या रथाकडे पाहत होते.खचलेल्या व अगतिक झालेल्या राजाला कौशल्या आपल्या महाली घेऊन गेली.
प्रजेचा लाडका राम वनाकडे निघाले ले पाहुन,त्यांच्यावर पराकाष्ठेचे प्रेम असणारे लोक त्यांच्या मागुन जाऊं लागले.रामांनी त्यांना परत फिरण्यासाठी हरप्रकारे समजावल पण ते ऐकेनात.सर्व नागरिक दुःखी होऊन अश्रू गाळत श्रीरामाच्या रथामागुन जातच राहिले.सर्व जण तामसानदीच्या रमणीय तटावर पोहोचले.आजची रात्र तिथेच मुक्काम करण्याचे ठरविले.राम सीतेला झोप लागलेली पाहुन,लक्ष्मण आणि सुमंत अनेक विषयांवर चर्चा करीत होते.
रामाने हा निर्णय कां घेतला असेल? नुकतच विश्वामित्रांच्या आज्ञेने राक्षसांशी संघर्ष केलेला,रावणाचे राक्षसी वर्चस्व निर्मुलन करण्याची संधी नियतीने दिली असे रामाला वाटले असावे.भरत राज्य सांभाळण्यास सक्षम असल्याची त्यांना खात्री होती.राक्षसांपासुन,दुष्ट प्रवृत्ती पासुन प्रजेचे संरक्षण करणे राजाचे कर्तव्य,म्हणुनच श्रीरामाने नियतीचा हेतू जाणुन रावणाबरोबरच्या संघर्षाचे आव्हान स्विकारले असावे.अशाच अनेक प्रकारच्या चर्चेत सुमंत-लक्ष्मण रात्रभर जागे होते.पहाट होताच राम लक्ष्मणाला म्हणाले, सोबत आलेले लोकं गाढ झोपेत असतांनाच,आपण इथुन निघुन जावे, अन्यथा हे लोकं ऐकणार नाही.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ६-३-२०२१.
!!! अभिनव रामायण !!!
भाग – ८.
सुमंताने आणलेल्या रथात तीघेही आरुढ होऊन लोकं जागे व्हायच्या आंत रथ भर वेगाने दूर जाऊ लागला.सकाळी जागे झालेल्या लोकांना राम आपल्याला टाकुन गेलेले पाहुन,दुःखी अंतःकरणाने अयोध्येकडे परतले.श्रीरामाचा रथ खेडी, शहरे मागे टाकत झपाट्याने पुढे जात होता.छोटी मोठी गांवे ओलांडुन वेदश्रुती नदी ओलांडली वअगस्ती ऋषींच्या आश्रमाच्या दक्षिण दिशेने वेगाने जाऊं लागले.गोमती ओलांडुन कोशल देशाच्या सीमेवरील एका मोठ्या जनपथकाजवळ पोहचले.तेथील लोकांची विचारपुस करुन त्रिपशा गंगा नदी किनारी पोहचले. पवित्र आणि पापनाशी गंगेच्या काठाने शृंगवेरपुराजवळ नदीच्या पात्राजवळ इंगुदीवृक्षाखाली रात्र काढण्याचा निश्चय केला.शृंगवेरपुरवर निषाद राजा गुहक राज्य करीत होता.श्रीराम आपल्या राज्यात आले आहे हे समजताच,आपले मंत्री आणि परीवारासह श्रीरामाला भेटायला आला.गुहकाने आपल्याबरोबर बरीचशी खाद्यसामुग्री व इतरही वस्तु आणल्या होत्या,पण घोड्यांसाठी वैरण ठेवुन घेऊन बाकी सर्व वस्तु साभार परत केल्या.
सकाळ होताच गंगा नदीच्या पैलतीरी जाण्यासाठी गुहकाने उत्तम नौकेची व नावाडीची व्यवस्था केली. नौकेत चढण्याआधी श्रीरामाने सुमंताला प्रेमाने निरोप देत म्हणाले,महाराजांच्या आज्ञेने इथपर्यंत रथातुन आलोत.पुढचा वनातील प्रवास पायीच करुं तेव्हा रथ घेऊन अयोध्येस परतावे. शोक आवरुन, सद्गदित स्वरांत सुमंतने १४ वर्षे सोबत राहु देण्याबद्दल विनंती केल्यावर,श्रीराम त्याला समजावत म्हणाले,तुमची आवश्यकता अयोध्येला जास्त आहे. भरताचा राज्याभिषेक बिनाविलंब करण्यास पितांजींना सांगा.तसेच भरताला सांगा की, पिताजी आणि तिन्ही मातांना नीट सांभाळावे.अशाप्रकारे सुमंतला समजावुन अयोध्येकडे रवाना केले.
गुहकाला निरोप देत राम म्हणाले, राजाने सैन्य,खजाना,किल्ले आणि जन पदे बद्दल विशेष जागरुक राहुन राज्याचे रक्षण करावे.गंगापार करुन पैलतीरी पोहचल्यावर रामांनी नौका गुहकाकडे परत पाठवली.नंतर श्रीराम,सीता,लक्ष्मण समृध्दशाली वत्सदेशात पोहचल्यावर तेथील रानांतील मोठ्या वृक्षाखाली रात्र काढली.दुसर्या दिवशी सकाळी तिघांनी पुढच्या प्रवासास सुरुवात केली.लवकरच ते प्रयागजवळील भारद्वाज ऋषींच्या आश्रमांत पोहचले.श्रीराम भेटल्यावर भारद्वाज ऋषी म्हणाले,मी तुझ्या येण्या ची दीर्घकाळापासुन प्रतिक्षेत होतो. श्रीरामाला विश्वमित्रांनी प्रभावी अस्रविद्ये चे प्रशिक्षण,संस्कृतीचा विध्वंश करणार्या राक्षसांचे निर्दालन करण्या साठी दिले होते व आतां भारद्वाज म्हणतात की,श्रीराम येण्याची चिरकाल वाट बघत होते,हा निव्वळ योगायोग असु शकतच नाही.श्रीरामांचा यथोचित सत्कार झाल्यावर श्रीराम म्हणाले, ऋषीवर!आम्हाला राहण्यायोग्य एकांती सुखकारक स्थान सुचवावे.
महामुनी भरद्वाज म्हणाले,येथुन दहा कोसांवर मधूर फळांफुलांनी बहरलेला,शुभ्र स्वच्छ झरे व रमणीय परिसर असलेला चित्रकुट नांवाचा सुंदर पर्वत आहे,तिथे तुम्ही वास्तव्य करावेस.
दुसर्या दिवशी भरव्दाज ऋषींचा निरोप घेऊन तिघेही चित्रकुट पर्वताकडे निघाले. त्यानंतर रस्ता आक्रमत यमुना तटावर पोहचल्यावर ही मोठी नदी ओलांडण्या साठी,राम लक्ष्मणाने लाकडे गोळा करुन एक बेडा तयार केला.सीतेसह त्यावर बसुन तिघांनी नदी ओलांडुन चित्रकुट पर्वताजवळ पोहचले.तेथील आश्रम वासीयांची ओळख करुन घेतली.तो रम्य प्रदेश पाहुन तिघेही आनंदीत झाले.एक सपाट जागा पाहुन लक्ष्मणाने सुंदर पर्ण कुटी तयार केली.श्रीरामांनी त्या कुटीवर वास्तुशांतीचे मंत्र म्हणुन वास्तुदेवतेची पुजा केल्यावर,सीता,लक्ष्मणासह श्रीरामांनी मोठ्या पवित्र भावनेने कुटीत प्रवेश केला.सुंदर चित्रकुट पर्वत आणि सुजला मंदाकिनी नदीचा परिसर पाहुन तिघेही प्रसन्न झाले.आपल्या वैभवसंपन्न राजधानीपासुन कोसो दूर प्रवासाचे कष्ट पार विसरुन गेले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ७-३-२०२१.
!!! अभिनव रामायण !!!
भाग – ९.
गुहकाने दिलेल्या नौकेच्या सहाय्या ने गंगानदी ओलांडुन तिघेही दक्षिण तीरा वर उतरलेले भरल्या डोळ्यांनी सुमंताने बघीतले.त्यानंतर ४-८ दिवस गुहकाकडे सुमंतने वास्तव्य केले.श्रीराम,सीता, लक्ष्मण भारद्वाज ऋषींच्या आश्रमात पाहुणचार घेऊन चित्रकुट पर्वतावर एक कुटी बांधुन तिथे निवासास राहिल्याचा समाचार गुहकाच्या गुप्तहेरांनीआणल्या वर,श्रीरामाच्या वास्तव्याच्या ठीकाणाची माहिती घेऊनच सुमंत अयोध्येकडे परतला.महाराजांच्या महाली जाऊन, सुमंताने श्रीरामांचा निरोप आणि त्यांच्या वात्सव्याची माहिती दशरथ राजाला दिल्यावर,अति असहाय्यतेने विलाप करत राजा म्हणाले,हे रामा,हे लक्ष्मणा, हे तपस्विनी सीते!तुमच्याशिवाय एखाद्या अनाथासारखे स्वतच्याच दुःखाच्या भारा खाली पिचुन कसे दिवस ढकलत आहे हे तुम्हाला कधीच कळणार नाही.आर्त स्वरात विलाप करीत कौसल्या,राजाला म्हणाली,मागचा पुढचा विचार न करतां माझ्या प्रिय माणसांना सुखाचे आयुष्य सोडुन त्यांना घराबाहेर काढले,आज ते रानोमाळ भटकत आहे.
कौसल्येचे संतापी बोलणे ऐकुन, दशरथराजाला त्यांच्या पुर्वीच्या एका दुष्कृत्याचे स्मरण झाले.एकदा फार पुर्वी शिकार करतांना शब्दवेधी बाण,पाण्या वर हरिण आले,समजुन एक ऋषीकुमार श्रावणावर सोडल्याने त्याचा मृत्यु झाला. श्रावणावर अवलंबुन असलेल्या त्या असहाय्य म्हातार्या आईवडिलांनी “तुलाही पुत्र शोकाने मृत्यु येईल” असा शाप दिला होता.ही कडु आठवण येऊन राजाचे मन उद्गिन्न झाले.ही हकिकत सांगीतल्यावर,कौसल्या धीर देत म्हणाली महाराज! शोक आवरावा.पुत्रशोकाने व्याकुळ राजाला आतां जगण्याचीच इच्छाच नष्ट झाली.शेवटी दुःखभार असह्य होऊन रडत,बोलत असतांनाच राजाचे प्राण अनंतात विलिन झाले. कौसल्या आणि सुमित्रा राजाचा करुण मृत्यु अगतिकतेने बघत राहील्या.दोघीं च्या डोळ्यांतुन अश्रूंचा पूर लोटला.
राज्याच्या निधनाची बातमी ऐकताच कैकयीसह बाकी राजस्रीया त्वरेनं कौसल्याच्या महाली आल्या आणि रडण्याचा एकच आकांत उठला.राज अधिकारी पण आले.राम लक्ष्मण वनांत गेलेले,भरत शतृघ्न आजोळी!राजाचा कुठलाच पुत्र नसल्यामुळे,राज्याच्या अंत्यसंस्काराला विलंब लागत असल्या मुळे,राजाचे मृत शरीर तेलाच्या मोठ्या द्रोणीत वसिष्ठ मुनींच्या आज्ञेनुसार ठेवण्यात आले.
मंत्रीगण व वसिष्ठादी लोकांनी मसलत करुन भरताला ताबडतोब बोलावुन राज्यभार सोपवावा,कारण राजावाचुन राज्यात अराजकता माजुन राष्र्टाचा विनाश ओढवु शकेल.सर्वानुमते राजाच्या मृत्युची बातमी भरताला कळु न देतां,पुरोहित व मंत्रीगणांनी आवश्यक राजकार्यासाठी अयोध्येला बोलावले,तरी तात्काळ यावे असा निरोप देऊन दूत कैकयदेशाकडे रवाना केला.
लांबचा प्रवास करुन दूत भरताच्या आजोळी गिरिव्रत राजधानीत पोहचला. त्याआधीच्या रात्री भरताला दुःस्वप्ने पडल्याने त्याचे मन अकारणच विषण्ण झाले होते.सकाळी अयोध्येहुन आलेला दूत भरताला भेटुन सत्वर अयोध्येला चलण्याविषयी विनंती केल्यावर,सर्वांचा निरोप घेऊन शतृघ्नासह त्वरेने प्रवास करुन अयोध्येजवळ पोहचले.पण अयोध्या नगरी भकास दिसत होती.शहरा चे सौंदर्य,रस्ते,हवेल्या सर्वत्र सन्नाटा पसरला होता.त्यांच्या स्वागतासाठी कुणी न आल्याने भरताचे मन अनिष्ट अशुभ शंकेने चरकुन खिन्न होऊन धैर्य खचल्या सारखे झाले.
राजप्रसादात येताच भरत प्रथम पित्याच्या महाली गेला.तिथे पिताश्री न दिसल्याने कैकयीच्या महाली आला. बर्याच दिवसांनी पुत्र दिसल्याने त्याला ह्रदयाशी कवटाळुन माहेरचे क्षेमकुशल विचारले.भरताने पित्याबद्दल चौकशी केल्यावर त्यांच्या मृत्युची बातमी एकुन त्याच्यावर वज्राघात झाला.नंतर राम कुठेय?त्याला सत्वर बोलावुन घे.त्यावर कैकयी म्हणाली,तुझा मार्ग निष्कंटक व्हावा,तुझा राज्याभिषेक व्हावा म्हणुन, फार वर्षापुर्वी तुझ्या पित्याकडुन दोन ‘वर’ मिळाले होते,त्या ‘वराचा’ उपयोग करुन तुझ्यासाठी राज्य व रामाला १४ वर्षे वनवास मागुन घेतले.केवळ तुझ्याच साठी हे केले,तरी आतां राजसत्तेचा स्विकार कर!
आपली माता कैकयीकडुन ही हकिकत ऐकुन भरत अतिशय क्रोधीत होत म्हणाला,तु माझी आई आहेस याची सुध्दा लाज वाटत आहे.हे दुष्ट माते! हे तू काय केलेस?
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ७-३-२०२१.
!!! अभिनव रामायण !!
भाग – १०.
भरताच्या अकल्पित वागण्याने भांबावलेली कैकयी डोळे विस्फारुन त्याच्याकडे बघतच राहीली. तिला कुलांगार ठरवुन,तूं राजधर्म पाळला नाहीस,पण मी असे होऊ देणार नाही. परंपरेनुसार जेष्ठ राजपुत्रच राज्याचा उत्तराधिकारी असतो.मी निष्पाप रामाला परत आणुन त्याचे राज्य त्याच्या सुपुर्द करीन,
श्रीराम राज्य सोडुन वनात गेल्या वर दोन अकल्पित घटना घडल्या.अल्पा वधीत राजाचा ओढवलेला मृत्यु!दशरथां ना आपल्या आवडत्या लाडक्या मुलाला दूर करावे लागले हे दुःख तर होतेच,पण त्याहुन जास्त ताण,चुकीचा निर्णय व त्या मुळे झालेल्या नामुष्कीने त्यांचे स्वतःचेच मन खात होते.एवढ्या बलाढ्य सम्राटाला आयुष्याच्या अखेरीस स्वकृत्याने तोंडाला काळोखी फासुन घेतली.हे अनावर दुःख, ताण सहन न होऊन राजाचा अकाली मृत्यु झाला.
दुसरी परिणामकारक व फारच जगा वेगळी घटना म्हणजे,ज्या भरताला राज्य मिळावे म्हणुन कैकयीने एवढा अट्टाहास केला होता,त्याच भरताने मिळालेले राज्य नाकारुन जगावेगळा स्वार्थत्याग केला.राजा दशरथाने आपले सत्यवचन सिध्द करण्यासाठी मोहमयी कैकयीला दिलेल्या ‘वरांच्या’ निमित्याने आपल्या सद्गुणी,लोकप्रिय व कर्तुत्ववान जेष्ठ पुत्राला वनात पाठवल्यामुळे नामुष्कीचे मरण आले.रामाने राज्याची अभिलाषा व सत्तेचा हव्यास न बाळगता पितृज्ञेनुसार वनांत गेले,त्या रामाच्या अत्युच्च त्यागा वर,कडी मात्र भरताने करुन अनायसे, सहजगत्या मिळालेले राज्य नाकारल्या मुळे भरताची प्रतिमा जनमानसांत उजळुन निघाली.
शोकसंतप्त भरताला मोठ्या प्रयासाने वसिष्ठ मुनींनी समजावल्यावर राजा दशराथाच्या अंतेष्टीसाठी त्यांचे मृत शरीर तेलाच्या द्रोणीतुन बाहेर काढण्यांत आले.सजवलेल्या रथात दशरथ राजाची अत्यंयात्रा शाही इतमामाने निघाली.भरत शतृघ्न या राजपुत्रांनी मंत्राग्नि संस्कार केला.दहा दिवस सारी अयोध्या सुतकात होती. ११ व्या दिवशी आत्मशुध्दी,१२ व्या दिवशी पिंडदान,१३ व्या दिवशी राज्याच्या अर्थी पवित्र गंगेत विसर्जित करण्यांत आल्या.
सुतक संपले तरी शोक संपला नव्हता.भरत शतृघ्न दुःखीत मनाने बसले असतां,दुःखी कष्टी राजवाड्यांत सार्या अरिष्टाचे मुळ असलेली,नटुन थटुन आलेली कुब्जा मंथरेला पाहुन द्वारपाला ला संताप आल्याने तीला फरफटत आणुन शतृघ्नच्या स्वाधीन करत म्हणाला,जिच्यामुळे श्रीरामांना वनवास पत्करावा लागला,राजाच्या मृत्युचे कारण तीच ही दासी मंथरा!तीला पाहताच शतृघ्न क्रोधाने पेटुन उठला आणि तिला फरफटत भरताकडे नेत असतांना तिच्या ओरडण्याने कैकयी तिच्या मदतीस आली असतां,तिलाही कठोर शब्दात फटकारले.भरताकडे हे प्रकरण जाताच, भरत म्हणाला,अरे!स्री अवध्य असल्या मुळेच कैकयीमाता वाचली.मी मातृवध केल्याचे श्रीरामाला निश्चितच आवडले नसते.कुब्जेलाही मारले तर रामाला आवडणार नाही,सोडुन दे तिला…
दुसर्या दिवशी राजसभा भरल्या वर भरत शतृघ्नला सभेत आमंत्रित केले. अनेक मान्यवरांनी विभूषित,दैदीप्यमान सभागृहात भरताने शतृघ्नासह प्रवेश करुन आपापली सुवर्णासने स्विकारली. ज्ञानी राजगुरु वसिष्ठ ऋषींनी औपचारिक रित्या सभेला संबोधल्यावर भरताला उद्देशुन भाषण सुरु केले.भरता!धन धान्यांनी परिपूर्ण असे पृथ्वीचे राज्य देऊन,धर्माचे आचरण करीत राजा दशरथ स्वर्गवासी झालेत.तसेच सत् प्रवृत्त श्रीराम पित्याची आज्ञा प्रमाण मानुन वनवास पत्करला.तुझ्या पित्याने व जेष्ठ भावाने निष्कंटक राज्य स्वाधीन केले आहे,तरी राज्य सांभाळण्यासाठी सत्वर राज्याभिषेक करुन घे..
वसिष्ठांचे भाषण ऐकुन भरताला अतिशय दुःख झाले.अश्रूभरल्या सद्गदीत आवाजात सभेला संबोधत म्हणाला,गुरु देव आणि सभासद हो! ज्ञानी,विद्या विभूषित,कर्तव्यधर्माचे सदैव बिनचुक पालन करणार्या श्रीरामाचे राज्य माझ्या सारखा माणुस कसा घेऊ शकेल?मीच काय पण,राजा दशरथांचा कोणताच मुलगा,मोठ्या भावाला डावलुन राज्या धिकार कसा बळकावेल?हे राज्य आणि मी स्वतः रामाचे आहोत.मी रामाचा अनुयायी आहे.श्रेष्ठ रामच या साम्राज्या चा राजा आहे.ही वस्तुस्थिती समजुन न्याय्य आणि राजधर्माला साजेसा निर्णय घ्यावा.सभासद हो! मी श्रीरामाला परत आणण्याचे सारे प्रयत्न करणार आहे.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.


