
संतवाड्ःमयाच्या अभ्यासकाला समर्थ वाड्ःमय टाळुन पुढे जाताच येत नाही. इतर संतापेक्षा अगदी वेगळी वाट चोखळलेला हा शस्रधारी संत! स्वान्तुसुखाय अध्यात्ममार्गाच्या बरोबरी नं पुरुषार्थ घडणार भक्कम समाजरचनेची आलोचना करणारा हा संत! माणुस-माणुस अंतर्बाह्य पारखुन शिवकारणासाठी जोडण्याचा प्रचंड अभियान आयोजणारा हा द्रष्टा धर्मगुरु!
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!श्री समर्थ रामदास !!
श्री स्वामी समर्थ !!!
भाग – ११.
अंतरीच्या दिव्य प्रेरणेने रामदास विनम्र होऊन सीतामाईच्या पावलावर डोकं ठेवुन डोळे मिटुन घेतले, तोच भूमीकन्येचे मधूर शब्द कानावर पडले.. रामदासा! देव भक्तांच्या भेटीचा क्षण कालपुरुषानं आधीच निश्चित केलेला असतो. तुझी भेट पंचवटीतच घडणार आहे. इथल्या सार्या परिसराची महती आधी जाणून घे. तीन शतकापुर्वी नाथ संप्रदायाची सारी शक्ती इथं एकवटली आहे. माणसामधला अहंकार दूर होऊन सार्या चराचरात एकच परमेश्वर नांदतो हे चिरंतर सत्य उमजण्यासाठी,माणुस पण फुलवण्यासाठी महाशक्तीचा स्रोत निवृत्तीनाथांच्या अंंतःकरणांत गहिणी नाथांनी इथेच सांगीतले. निवृत्तीनाथांनी पुर्णज्ञान ज्ञानेश्वराला दिलं व ज्ञानेश्वरांनी मधुर वाणीनं समाजापुढे ठेवलं असं हे अलौकीक स्थान!
रामदास त्र्यंबकेश्वराचा सारा परिसर मनमुराद भटकले. नाथपंथांच्या गुहा निरखल्या. गौतमत्रृषींचा आश्रम पाहिला. सार्याच परिसरात एक परमेश्वरी चैतन्य असल्याचं रामदासाला जाणवलं! अचानक एख नाथपंथी जोगी समोर येऊन सद्गुरु गहिनी नाथांच्या समाधीकडे जात असल्याचे सांगीतल्यावर रामदास सुध्दा सोबत जायला निघाले. थोडे पुढे गेल्यावर जोगी एकदम अदृष्य झाला. घनदाट जंगलांत रामदास एकटाच भटकत, सार्या अंगाला काटेरी वेलींचे ओरखडे पडत, ठेचकाळत थकुन एका औंदुबराच्या झाडाखाली बसला.भुकेची आठवण झाल्याने जोगीने दिलेला लाडू झोळीतुन काढून खाण्यासाठी हाती घेतला असतां वरच्या फांदीवर बसलेल्या एका गलेलठ्ठ वानराने झपटा मारुन त्याच्या हातातला लाडु अलगद पळवुन वर चढुन, रामदासाकडे टुकुरटुकुर पाहत मिटक्या मारीत खाऊ लागला. एवढ्यात लांबुन उंच डोंगरगुहेतुन नाथपंथी जोग्याचा “अल्लख निरंजन!” असा आवाज घुमला. त्या औंदुबराच्या वृक्षछायेत रामदासाला क्षणार्धात सुखनिद्रा लागली…..
जठारामधील क्षुधाभावना मनांत जागृत झाली. डोळ्यासमोर भोजनपंगत साकारु लागली. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र वानरांना अनेक प्रकारच्या पक्वानांची मेजवाणी देत आहेत. एका बाजुने त्रृषी मंडळी, एकीकडे वानरगणांत….नळ, नीळ, सुग्रीव, मधे जाबुवंत यांची पंगत दिसत आहे. अरे! स्वतः मी पण आवडीने जेवतांना दिसत आहे. हातात सुवर्णपात्रे घेतलेले लक्ष्मण, भरत,शत्रुघ्न भराभर पक्वानं वाढत आहेत. स्वतः प्रभू रामचंद्र प्रत्येकाला आवर्जुन आग्रह करीत आहेत. माझ्या घशात मात्र एकही घास कां उतरत नाही? एवढ्या सर्वांमधे रामाचा दूत मात्र कुठेच दिसत नाही. म्हणुन आर्ततेने रामदास विचारतात… वायुपुत्रा! कपीनाथा! महारुद्रा तू कुठे आहेस? मी इथेच औंदुबराच्या वर आहे, असा धीरगंभीर स्वर उमटला. रामदास खडबडुन जागे झाले. समोर वानर बसलेला दिसला.
अंतरीची खुण पटली. रामदास नम्रपणे त्या बलभीम मूर्तीची मानसपुजा करुं लागले. कल्याणदायी स्वामीचे धीर गंंभीर शब्द आले…. रामकृपेचा क्षण जवळ आला. पंचवटीत जाऊन त्यांच्या आदेशाप्रमाणे साधना कर! स्वतःचा नवा पंथ तयार करायचा असल्यामुळे नाथजोग्याने दिलेला लाडु तुझ्या मुखी पडु दिला नाही.नाहीतर तुला नाथपंथी दिक्षा स्विकारावी लागली असती. तुझा दिक्षाविधी रामाने आधीच निश्चित केला आहे. त्याच्या पुरुषार्थाचा प्रचार करुन स्वतःचा समर्थपंथ स्थापुन शिष्यगण जोडुन त्यांच्या मनी जनहिताची फुंकर घालुन निवृत्त असुनही प्रवृत्तीचा विसर पडणार नाही ही किमया त्यांना शिकव!
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.
!! श्री समर्थ रामदास !!!
भाग – १२.
मारुतीराया पुढे म्हणाले,योग्यवेळी सह्याद्रिचा हा साराच परिसर तुझी कर्मभूमी होईल. आतां उठ! समोर भला मोठा कर्तव्याचा डोंगर पार पाडण्या साठी प्रभू रामाचा आशीर्वाद घेऊन त्यांच्याच सानिध्यात साधनेला आरंभ कर….. भुभुःकार करुन कपीवर गुप्त झाला. कुशावर्ताच्या ओवरीत अर्धजागृत अवस्थेत रामदासांच्या मनात मात्र हनुमंतस्तुतीची शब्दकळा जागी होत होती, “दुमदुमले पाताळ उठिला पडशब्द। धगधगिला धरणीधर मानीला खेद। कडाडिले पर्वत उड्डगण ऊच्छेद। रामी रामदासाचा शोध”।।
पंचवटीतील रामचंद्राच्या देवळाच्या अंगणांतल्या दिपमाळेला टेकून रामदास देवाकडे एकटक बघत बसले होते. सहा दिवस सहा रात्र न खातांपिता मनांत एकच ध्यास धरुन, रामचंद्राच्या सगुन दर्शनाची! त्याचच मनन, चिंतन, सार्या यातना भोगत राममय होण्याची आशा बाळगुन, मनाला विवेकाचा लगाम खेचुन, स्वतःची समजुत काढीत म्हणत होते… जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारे मना तूंचि शोधूनि पाहे! मनात्वा चि रे पूर्व संचित केले। तयासारखे भोगणे प्राप्त जाले।।
सातवा दिवस उजाडला.विटी दांडु खेळत असलेल्या मुलांची वीटी रामदासांच्या डोक्याला लागल्याने झालेल्या जखमेतुन रक्त भळभळुन शेवटी सुकले पण त्यांना कशाचेच भान नव्हते. ओठ सुजले, हातपाय शिथिल झाले, अंगातील रक्ताभिसरणही कांहीसं मंद झालं, सारी गात्र काष्टवत झालीत, पण डोळे मात्र सताड उघडे असुन मनांत अखंड रामनाम महती गर्जत होती. मुखावाटे शब्द पडत नव्हते, मनांतच शब्द उमटत होते….
मना पावना भावना राघवाची। धरी अंतरी सोडि चिंता भवाची। भवाची जिवा मानवा भूली ठेली। नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली।। त्याच अवस्थेत रामदासांच्या मनी एक अलौकीक प्रकाशदीप्ती सुरु झाली, शंख, सनई, दुदुंभी, चौघडा, वेणू, वीणा यांचे अवर्णनीय स्वर कानी गुंजराव करुं लागले. समोरच्या गाभार्याचे कुलूप आपोआप गळून पडले. गाभार्यातल्या निळसर प्रकाशाचे किरण ग्लानीत असलेल्या रामदासांच्या अंगावर पडले. ममतेच्या त्या स्पर्शानं काष्ठवत् पडलेल्या अवघ्या देहात संचारली. तिमिरच संपला. अंतरी ज्ञानसुर्य प्रगटला. त्या प्रकाशानं अवघं अस्तीत्वच झाकाळुन गेलं… आणि कानावर साद आली….
नारायणा!” जणूं परमेश्वराच्या मुखातुन प्रथम ओंकार स्वर बाहेर पडला. त्या प्रणवाच्या निनादामुळे सारे बंध गळुन पडले, रामदास पिसासारखे हलके झाले. त्या अवस्थेतच तरंगत पायर्या चढुन गाभार्यांत शिरले. पाषाण मूर्तीतुन निळं-सावळं रुप प्रकट झालं. मातेच्या कुशीत शिरावं,त्याप्रमाणे रामदासांनी अयोध्यापतीला कडकडुन मिठी मारली. त्या सगुन रुपानेही त्यांना ममतेने जवळ घेऊन मस्तकावरुन प्रेमळपणे हात फिरवला. जीवाशिवाची अलौकीक भेट झाली. देव-भक्त एकरुप झाले. अंतरीचे सारे स्वर ओंकाररुप झाले. सद् भक्ताला दिलेलं आश्वासन पुर्ण झालं.
सज्जनाच्या संरक्षणार्थ आणि दुष्टांच्या निर्दलनासाठी युगायुगांत मी अवतार घेत असतो. आतां अवताराची वेळ आली, कली युगाची सुरुवात झाली. दुष्ट मातले. सुष्टांचं, सज्जनाचं खच्चीकरण झालं. धर्माला ग्लानी आली हे सर्व दूर करायला माझ्या निर्गुण रुपाला कुणाचंतरी माध्यम हवंय. सुर्य कुळात जन्मलेल्या तुला अत्मज्ञानाचा महामंत्र देऊन आपलासा केला.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.
श्री समर्थ रामदास !!!
भाग – १३.
प्रभू पुढे म्हणाले, आजपर्यंतच्या घेतलेल्या कसोटीस तू पुर्ण उतरलास! आतां तुझ्या माध्यमातुनच अवतार कार्य पुर्ण करायचय. आणखी एक नरजन्म घ्यायचाय! या नरजन्मी पुर्ण पुरुषाची सारी लक्षणं, कलीयुगातील राजधर्म,धर्म स्थानांना अभय, प्रजाजनांनच दुःख, दुरित नाहिसे करणे, असुर संहाराचा कुलधर्म आचारणात आणायचा आहे, हे सर्व भविष्य काळांत घडवायचं असेल तर, नारायणा! पिंड प्रगल्भ होणे गरजे चे आहे. कार्यपूर्तीनंतर मी स्वस्थानी जाईन, मागोमाग तू येऊन माझ्याशी एकरुप होशील. शतकानंतर नियती आपला डाव खेळेल…….!”
नारायणा! तूच राम, तूच दास! स्वतःला रामोरामदास म्हणवून घे! आतां प्रथम कर्मयोगाचं आचरण स्वकारल्याने माझ्याकडे येण्याचा निवृती मार्गाचं द्वार खुलं झालय! बहुजन अज्ञ आहेत. त्यांचे वर संजीवनी मंत्राचा उपयोग करुन हा निद्रिस्त समाज जागा करायचा आहे. तुला लाभलेल्या ईश्वरीय प्रतिभाच्या माध्यमातुन मनावर मालिन्य आलेल्या व शिथिल समाजाला प्रवृत्तीमार्ग सांगुन त्यांना जागृत करण्यासाठी, नंदिनी नदीकाठावर एकांतवास पत्करुन सुर्योपसना, बलोपसना आणि शरीर मनाचं सामर्थ्य वाढव! वेळोवेळी हनुमंत तुला मार्ग दाखवीलच! मी तर तुझ्यामधे च वास्तव्य केललं आहे. उठ आतां! जागृत होऊन अवतारकार्यासाठी बध्दपारिकं हो…..!”
रामदासाच्या अंतरंगी आत्मस्वरु पाच्या, आत्मस्थितीचा व आत्मकर्तव्या चा पूर्ण प्रकाश पडला. प्रभूरामचंद्रांनी त्यांच्या गळ्यात एक सतेज पोवळ्याची माळ घातली. रामदास आज सर्वार्थाने अनुग्रहित रामदास झाले. भानावर आले तेव्हा ते सभामंडपाच्य खांबाशी बसले होते. गाभार्याचं दार व कुलुप पूर्ववत बंद होतं! पण सार्या वातावरणांत अलौकीक परिमळ पसरलेला होता. माथा टेकवुन प्रसन्नपणे रामदास मंदिरा बाहेर आले.
पंचवटी घाटावर अग्निहोत्री शास्रींची भेट झाली. त्यांनी रामदासांची चौकशी केल्यावर धर्मग्रंथ देण्याचे कबुल करुन त्यांच्या पाठशाळेत येण्यास सांगीतले. शास्रींच्या रुपाने परमेश्वरच रामदासांच्या पाठी उभे राहाले. त्यांच्याच आग्रहाने सप्ताहभर च्या अनशनाचं पारणं फिटले. त्यांच्याच आग्रहाने रामदासांनी श्र्लोक म्हटला.
“जगी पाहता देव हा अन्नदाता। तया लागली तत्वता सार चिंता। तयाचे मुखी नाम घेता फुकाचे। मना सांग पा रे तुझे काय वेचे।। अहंकाराला मारलेली ही सणसणीत चपराक ऐकुन ते स्तब्धझाले
भोजनोत्तर विष्णुशास्रींनी सारा ग्रंथ संग्रह…. चारी संहिता, उपनिषदे, व्याकरण, तर्क, सांख्य, धनुर्वेद, आयुर्वेद स्थापत्य, संगीत, पशुपालन, कृषिशास्र, महाभारत, रामायण अशा कितीतरी विषयांची ग्रंथसंपदा त्यांच्या समोर ठेवुन म्हणाले! तुला जेव्हा वाटेल तेव्हा, जो हवा तो ग्रंथ नेऊ शकतोस! साधना काळात प्रथम समग्र रामायण लिहुन काढायचा निर्धार रामदासांनी केला.
टाकळी या छोट्याश्या खेड्यात नंदिनी नदीच्या काठी, शतकापुर्वीची जीर्ण मठीत गुहेवजा भूयार व आजुबाजु चा परिसर रामदासांना आपल्या साधने साठी सुयोग्य वाटल्याने इथेच राहुन तपःसाधना, बलोपसना, गायत्री मंत्राचं पुरश्र्चरण, श्रीरामाचा तेरा अक्षरी मंत्राचं अखंड जप, ग्रंथ वाचन, मनन चिंतन करण्याचे निश्चीत झाल्यावर गांवच्या पाटलाची अनुमती घेतली. उद्या वैशाख शुध्द प्रतीपदेपासुन साधनेला सुरुवात करायचे निश्चित केले.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.
!!! श्री समर्थ रामदास !!!
भाग – १४.
तापसी झालेले रामदास सुर्य मध्यान्ही येईपर्यत नंदिनी नदीच्या पाण्यात उभ राहुन पुरश्र्चरण करीत असतांना पायाला मासे चावुन क्षत पडायची, पण वेदनाही आतां राममय होऊन कमरेपर्यंतचं अंग पांढरं पडायच! तरी रामदास अविचलपणे पुरश्र्चरण करीतच राही, दुपारी नाशिकमधे पांच घरी माधुकरी मागायची, येतांना विष्णु शास्र्यांकडुन ग्रंथ घेऊन टाकळीकडे परतायचय! दुपार कलल्यानंतर मठीची डागडुजी, कांही दिवसांत घुमटीचं स्वरुपच बदललं.मात्र हे सारं करतांना मनांत “श्रीराम जयराम जयजय राम”! या तेरा अक्षराचा जप अखंड सुरु असायचा. आणलेल्या ग्रंथाचं वाचन रात्री करायच.
एक दिवस रामदासांच्या मनी आलं
मारुतीराया कुठे आहे? त्यांची मुर्ती बनवावी. गांवातील बरीचशी मुलं कुतुहलाने मठीबाहेर जमा होत असत, त्यांना उपासना,बलदंड करायचं ठरविलं त्यांच्याच मदतीने रामदासाने मारुती रायाची मुर्ती तयार केली. मुलांबरोबर कांही गांवकरी पण रात्रीचे मठीत जमु लागलेत. त्यांनाही निःस्पृहपणे रामदास कांही उद्बोधक गोष्टी सांगत असत. दिवस भराभर उलटत त्रृतुचक्र फिरत होतं. रामदासांच्या साधनेचा वेग वाढला. धर्मग्रंथ, उपनिषदे, मेघदूत, कालीदासाचे अभिजात वाड्ःमय अशा विविध ग्रंथाचे वाचनांत त्यांना दिवस अपुरा पडु लागला. त्यांनी कृषिशास्र, वनस्पतीशास्र, आयुर्वेदशास्र, पशुपालन शास्र, स्थापत्यशास्र, अभ्यासुन त्याचा उपयोग कसा करायचा हे गांवकर्यांना शिकवित असे. त्यांच्या मदतीने रामनवमी व नंतर येणार्या हनुमान जयंती उत्सव करण्याचे ठरविले. रामदासांचाही जन्मदिवस रामनवमीच! ते आतां बाल्यावस्थेतुन युवावस्थेत पदार्पण करीत होते. टाकळी आणि आजुबाजुच्या पंचक्रोशीत रामदासां विषयीचं आकर्षन निर्माण झालं.
पंचक्रोशीती सर्वच स्तरांतील जनता आबालवृध्द नाशकाऐवजी टाकळीत जमा झालेत, रामदासांनी रामजन्माच्या निमित्याने रामकथाच श्रोत्यांसमोर उभी केली. रामाची कर्तव्यपरारणता, एक वचनी एकपत्नी व्रत वगैरे चित्रण साकार केलं. माणसामधील त्रृटी, दंभ, अंधश्रध्दा, निंदकांची तिव्र शब्दात हेटाळणी यावर रामदासांनी किर्तनाच्या माध्यमातुन प्रबोधन करुन श्रोत्यांपुढे ठेवले. हे समजावुन सांगतांना आपल्या देशात यवन कसा घुसला? तो रयतेवर अत्याचार, अन्याय कसा करीत आहे? धर्मभ्रष्ट कसा करीत आहे? आपण मुर्ती पुजक! तो मुर्तीभंजक! त्यात दुष्काळ! अस चित्रण साकार केले.
हा कसला सत्याधीश? कसला राजा, लोकनेता? हा तर लुटारुच! देव, देश आणि धर्म यांचा विच्छेद करणारा! मग त्याचा उच्छेद करण्यासाठी म्यानातील तलवारी बाहेर काढुन आपल्यातला पुरुषार्थ जागा करने हीच खरी रामनवमी. तोच खरा रामोत्सव…!कल्याण करी रामराया। जनहित विवरी।। तळमळ तळमळ होतचि आहे। हे जन हाती धरी।। अपराधी जन चुकत च गेले। तुझा तूंचि सावरी।। कठीण त्यावरी कठीण जाले। आतां न दिसे उरी कोठे जावे काय करावे। आरंभिली बोहरी।। दास म्हणे आम्ही केले पावलो। दयेसी नाही सरी।। ” या रामदासांच्या मंगलमय भजनाबरोबर त्यांच्या सोबत श्रोत्यांनाही म्हणायची प्रेरणा झाली. रामदासांच्या ओजस्वी, आवेशपुर्ण किर्तनाने लोकांमधे विशेषतः तरुणांमधे यवनाशी दोन हात करण्याचा जोश, आवेश निर्माण झाला. ठरल्याप्रमाणे तरुण मुलं शिकण्यासाठी मठीकडे येऊ लागले.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.
!!! श्री समर्ध रामदास !!!
भाग -१५.
आज चैत्र पोर्णिमा! हनुमान जयंती! रामदासांनी व मुलांनी मिळुन बनवलेल्या मारुतीरायाच्या मुर्तीची स्थापना गांवच्या बजाबा पाटलांच्या हस्ते झाली. सारी तरुण मुलं, गांवकर्यां नी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. सर्व एकत्रीत जमल्यावर रामदासांनी उपदेश द्यायला सुरुवात केली. मारुती हा दैत्या चा काळ! त्यांनी अनेक दानवांना लोळवलं! त्यांच्यापासुन आपल्याला बळ मिळाव, स्फुर्ती मिळावी यासाठी ते सुर्यमंत्र म्हणु लागले.” हिरण्य येनं पात्रे। सत्यस्यापिहितं मुख्यम्। तत् त्वं पूषन्पावृणु सत्यधर्मिय दृष्टये।।ध्येयः सदा सवित् मंडल मध्यवर्ती। नारायणः सरसिजा सरसन्निविष्टः। केयूरवान् मकटर्कुण्डलवान् किरिटी। हरि हिरण्यवपुः धृतशंखचक्रः।। बलोपासेचा दीक्षाविधी संपन्न झाला.
नंदिनीच्या घाटावर एक अभिनव पर्व सुरु झालं! गावातील लहान मोठ्या मुलांच्या सुर्यनमस्काराच्या हुंकाराने रोज ची पहाट दुमदुमुन जात. या सर्वामधे रामदासांना साधनेसाठी एकांत मिळेना. शोधतां शोधतां एक पुरातन विवर, कसा तरी एका माणसाला बसतां येईल येवढी जागा मिळाली. एकांत स्थान मिळाल्यावर बजाबा पाटलाकडुन चिवट कागद व काळी शाई मागवुन घेतली. दुंदुभीनाम संवत्सर माघ वद्य त्रयोदशीला आदिकांड लिहिल्यावर लगेच वद्य द्वादशीला आरण्यकांड लिहुन पुर्ण झाला.
येत्या चैत्र नवमीला रामदास पंधरा वर्षाचे झाले. अश्विन वद्य दशमी ला किष्किंधाकांड व मार्गशीर्षातील प्रतीपदेला सुंदरकांड लिहुन पूर्ण झालं. वयाच्या १६ व्या वर्षी एकशे चाळीस सर्गांचं युध्दकांड १२२ दिवसांत लिहुन रक्ताक्षीनाम सवंतला संपवल. वर्षा सव्वा वर्षात वाल्मिकी रामायणाची पांच कांडे लिहुन काढली. अयोध्या आणि उत्तरकांड मात्र लिहवेना. त्यातील शोक, विरह, नियतीचे चित्र विचित्र डाव,सहा रिपुंचा थयथयाट, कैकयीचा हट्ट,वचना चा पेच, दशरथ राजाचा मृत्यु, मानवी जीवनाची विफलता सांगणार उंत्तरकांड रामदासांच्या कवी ह्रदयाला पेलवेना. प्रजाकर्तव्य, राजकर्तव्य, व्यक्तिगत पती कर्तव्य या पेचात सांपडलेले प्रभू रामचंद्र! अंती सीतात्यागं, गृहस्थ असुन तापसी जीवन, प्रत्यक्ष पुत्रांशी युध्द,सीतेची पुनर्मेटही चिरविरहासाठीच, तीचा सदेह भूमीच्या उदरी प्रवेश आणि अखेर रामचंद्रांचं सरयुमधे देहार्पण! सारं कांडच वेदनेचं धगधगतं अग्निकुंड, विलाप आणि वेदनांचा असह्य तडिघात, हे अयोध्याकांड त्यांच्या उमलत्या वयात लिहायला नको वाटलं.
त्यांनी विचार केला पुढे पुरश्चरणां नंतर! अनुभवविश्व अधिक समृध्द झाल्यावर एखादी स्वतंत्र ग्रंथरचना प्रभुच्या कृपेने लिहुन काढु या!
या कालखंडात टाकळी येथे उग्र तपश्चर्या, रामनवमी, हनुमान जयंती, तरुणांची बलोपसना, वाल्मिकी रामायणाचं पुनर्लेखन, किर्तन प्रवचन, निरुपण, अडीअडचणीला योग्य सल्ला, यामुळे टाकळीतच नव्हे तर असपास च्या पंचक्रोशीतही वयाच्या १६ व्या वर्षी च आपल्या निरासक्त, निःस्पृह आणि व्रतस्थ राहिल्यामुळे सर्वीकडे आदरभाव निर्माण झाला.
या चार वर्षाच्या कालखंडात त्यांच्यामधे आमूलाग्र बदल झाला.आले तेव्हा बालयोगी होते, आतां १६ वर्षांचे तरुण स्वामी झाले. त्यांच्या सार्याच व्यक्तीमत्वावर तपश्चर्येचं आणि विद्वतेचं तेजाची झळाळी चढली. मनी कसलाच दंभ, गर्व, अभिमान नाही सदैव जन हिताची चिंता! पारतंत्र्याच्या पाशातुन मात्रृभूमीला मुक्त, गोब्राम्हणांना अभय, सार्याच समाजाला सुखशांतीचं वरदान स्वधर्माची ध्वजा उंच नेण्याची दाहक उर्मी त्यांच्या मनात दाटत असे.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.


