
संतवाड्ःमयाच्या अभ्यासकाला समर्थ वाड्ःमय टाळुन पुढे जाताच येत नाही. इतर संतापेक्षा अगदी वेगळी वाट चोखळलेला हा शस्रधारी संत! स्वान्तुसुखाय अध्यात्ममार्गाच्या बरोबरी नं पुरुषार्थ घडणार भक्कम समाजरचनेची आलोचना करणारा हा संत! माणुस-माणुस अंतर्बाह्य पारखुन शिवकारणासाठी जोडण्याचा प्रचंड अभियान आयोजणारा हा द्रष्टा धर्मगुरु!
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!श्री समर्थ रामदास !!
!!!! श्री समर्थ रामदास !!!
भाग – ६.
आईचे सांत्वन करीत गंगाधरपंत म्हणाले, आई! तो सुखरुप असेल. केवळ तुला दिलेलं वचन पुरं करण्या साठीच तो या विवाहसोहळ्यात सामील झाला होता. अंतरपाट धरल्या गेला, तुला दिलेल्या वचनानुसार बोहोल्यावर उभा राहिला. तुला दिलेलं वचन पुर्ण करुन त्याच्या मार्गाने तो गेला. आपल्या तेवीस पिढ्यांचा उध्दार करुन खडतड तपःसाधना करुन, सर्वार्थाने समर्थ साधक होईल. व्यर्थ शोक करुन स्वतःहा ला नाहक शिणवु नकोस. व्याह्याच्या पाया पडुन झालेल्या मनःस्तापाबद्दल क्षमायाचना मागीतली, लग्नाचं वर्हाड लग्न न लावताच आसनगांवावरुन जांब या गांवी परतले. त्याच्या दुःखाने वेडीपीसी झालेल्या राणुबाईची दृष्टी गेली ती परत नारायण येईपर्यत!
आसनगांवचा इनामदारांचा केशव, गावावर ठपका येऊ नये म्हणुन, नारायणाचा शोध घेण्यात यावाच या हट्टाने आजुबाजुची सर्व देवळं, रानं, पडक्या विहिरी, मशीद कांही म्हणुन शोधायचं बाकी ठेवले नाही. शोधता शोधता एका कांटेरी झुडपाला लटकलेल्या मुंडावळ्या दिसल्या, थोडं पुढे गेल्यावर बोरीच्या झाडाला जरीचा पांढरा कोशा, आणखी पुढे एका दगडा वर गेंदेदार हार दिसला. सर्वत्र शोध घेऊनही नारायण सांपडत नाही पाहुन सर्वजन आसनगांवला परतले.नारायणा ने आधीच आपल्या वस्तु अंबडच्या दिशेला विखरुन स्वतः चिंचेच्या झाडाच्या उंच शेंड्यावर फांद्याच्या बोचक्यात दडुन बसला. कमरेच्या वस्रा शिवाय बाकी वस्रांचा त्याग केला.
दीक्षाविधी न होताच तो दीक्षांत झाला होता. ठोसर घराण्यांत एक नारायण नसल्याने वंश थोडीच खुंटणार आहे? आतां मी क्षत्रिय,ब्राम्हण, वैश्य, शूद्र कोणीच नाही. चारही वर्णाची कर्मे माणुसपणाच्या विकासासाठी आचरेन. ब्राम्हणाप्रमाणे ज्ञान, क्षत्रियांची शस्र विद्या, वैश्याच्या विनिमयाप्रमाणे सद् विचारांची देवाण घेवाण, आणि जे भव्य
उदात्त, उतुंग, दिव्य दिसेल ते रामस्वरुप मानुन त्यांची अनन्यभावे सेवा करण्या साठी स्वतःच चातुर्वर्ण्य होऊन मग इतरांना सांगण्यासाठी प्रथम तपाचरण हवय! प्रभू रामचंद्राचा प्रसाद हवाच पुर्ण ज्ञानाच्या प्रकाशाकडे…. हा रामदास रात्रभर अविरत झपाट्याने चालत गोदावरीच्या काठच्या एका गावच्या डगरीवर पोहोचला.
गावसीमेवर असलेल्या गावदेवी जाखाईच्या देवळात मुक्काम करायचे ठरविले. खर्या अर्थाने आता साधनेला सुरुवात होणार! भूमीची शय्या आणि दिशांच वस्र हे साधकाचं प्रथम लक्षण रामदास आचरणांत आणु लागला. नारायण बालस्वामी रामदास झाला. मन चक्षुसमोर सदैव दिव्य राममूर्ती, अविरत करुणा भाकत आर्तपणे मनोमनी आळवीत होता.
गावदेवीचा भगत सांजची तेलवात करायला देवळात आला असतां, त्याला एक अनोळखी, उघडबंब, चेहर्यावर शांत प्रसन्न भाव असलेला पोर हाताची उशी करुन गाढ झोपलेला दिसला. कोण असावा?कुठुन
आला? या मुलाला उठवावं की झोपु द्याव? या विचारांतच देवीला दिवटीने ओवाळीत आदीमायेच्या असंख्य रुपांना जागवुन जागर गाऊ लागला. भगताच्या जागराने रामदासाची झोप चाळवली. भगताने त्याची माहिती विचारल्यावर नारायण म्हणाले, मी रामदास! रामाकडे निघालो. भगताने रात्रीचा मुक्काम इथेच करायला सांगुन जेवण अंथरुणाची व्यवस्था केली. कुठे जाणार विचारल्या वर, पंचवटी नाशिक क्षेत्री रामाकडे! भगताने आठवण म्हणुन एक तुंबा दिला. नारायण भगताला म्हणाले, मी इकडे आल्याचं कोणाला सांगु नकोस.
अस म्हणुन तुंबा घेऊन नारायण पांथस्थ झाले.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
!! श्री समर्थ रामदास !!
भाग – ७.
पश्चिमेच्या दिशेने नारायणाची अखंड वाटचाल सुरु होती. दिवसभर एखाद्या घुमटीत किंवा देवळात पडुन राहायचं आणि रात्री तहान,भूक, निद्रा आहार यावर सयंम ठेवुन, सारं चराचर निद्रिस्त असतं अशावेळी त्याची वाटचाल सुरु असे. जयजय रघुवीर समर्थ म्हणुन एखाद्या दारी उभे राही . भिक्षा मिळाली नाही की, दुसर्या, तिसर्या, चौथ्या दारी ललकारी द्यायची! चौथ्या दारानंतर मात्र अनशन! गोदावरीचे पाणी पिऊन सुर्यास्तापर्यत कोठेतरी आडोशाला पडुन राहायच! सुर्यास्तानंतर परत पुढची वाटचाल सुरु!
जांबपासुनबरंच अंतर पार पडल्या वर पाठलागावर कुणी येईल ही धास्ती नाहीशी झाल्यामुळे त्यांनी दिनक्रमात बदल केला. आतां रात्रीचा मुक्काम व सुर्योदयापासुन वाटचाल मजल दर मजल करीत गोदावरीच्या उगमाकडे अखंड वाटचाल करत घटिका,पळं,तिथी,मास याच भानच सुटलं होतं. चालत चालत नदीकाठच्या रानांतील एका खोपटीसमोर उभं राहुन रामदासांनी साद घातली, जयजय रघुवीर समर्थ!” म्हातारे पाटील बाहेर आले. या तेजस्वी बाल ब्रम्हचार्याला पाहुन क्षणभर स्तिमित झाले.
पाटलांनी नम्रपणे कुठे निघाले म्हणुन असे विचारल्यावर त्यांनी सांगीतले, नाथाच्या पैठणला नंतर राम द्वारी पंचवटीला….. पाटीलानी, प्रथम ज्ञानेशाचे आपेगांव, पैठण नंतर पंचवटी ला जाण्याचा सल्ला देऊन कांही रताळे त्यांना दिली. आजुबाजुच्या रानशेण्या गोळा करुन चकमकीने अग्नी चेतवला व पाटलांनी दिलेली रताळ खमंग भाजुन सारे नैवद्य झाल्यावर पहिला घास तोंडात टाकणार तोच कुणीतरी मागुन त्यांची मानगुटी धरली. रामदासा ने त्या हशमास हिसडा मारुन पुनः खाण्यास सुरुवात केली. हशम अपमाना ने लाल झाला. रामदासांनी विचार केला आपण एकटे! हा सशस्र! शिवाय आजुबाजुला याचे साथीदार असण्याची शक्यता! तेव्हा अक्कलहुशारीनेच याचा समाचार घ्यावा. विचार केल्याप्रमाणे त्या हशमाला डोहात बुडवुन, मारोतीरायाचे स्मरण करुन रामदास अपेगांवातील मंदिराजवळ पोहोचला.
विठ्ठल, रखुमाईच्या मुर्तीसमोर कांही माळकरी सुस्वरांत ज्ञानोबाचा अभंग मृदुंग, टाळांच्या तालावर गात होते. भ्रम धरिसी या देहाचा। विठ्ठल म्हणे कां रे वाचा। पडुनि जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पा सार।। रखुमादेविवरु अभयकरु। मस्तक ठेविला निर्धारी।।
रामदास तल्लीन होऊन ऐकत होते पसायनदान झाल्यावर या बालयोग्याला तिथल्या गावपाटलांनी कांहीतरी बोलण्याची गळ घातली. मग रामदासां नी दुष्काळाचे भिषण स्वरुप, यवनांचा अत्याचार, केव्हाही येऊन हशम घालीत असलेला धुमाकुळ, कुलीन स्रीया व आया बहिणींवर होणारे अत्याचार याचे त्यांनी भिषण चित्रण गांवकर्यांसमोर उभे करुन म्हणाले की, या सर्वांचे रक्षण करण्यासाठी कुणीतरी समर्थ हवा…त्या शिवाय पसायदानांतल मागणं पुर्ण होऊ शकणार नाही… कधीही पुर्ण होणार नाही.
या एवढ्याशा मुलाचे सुलतानशीही विरुध्दचे इतके दाहक व बाणेदार विचार! सार्या यवनी साम्राज्यावर कोरडे ओढलेले पाहुन गांवकरी घाबरले, गांगरले. आणि असे दाहक विचार सुल्तानाला कळल्यावर तो अत्याचार करेल या धास्तीने पाटलाच्या मुलाने नारायणाला ताबडतोब आपेगाव सोडण्यास सांगीतले. रामदासांनी तुंबा, झोळी उचलुन गांवकर्यांना नमस्कार केला. व झपाट्याने पैठणकडे प्रस्थान केले.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
!!! श्री समर्थ रामदास !!!
भाग – ८.
चालतां चालतां रामदासांच्या मनांत नानाविध विचारांची गर्दी झाली. देशातील भयानक उलथापालथ, रक्तांचे सडे, देवांच्या मूर्तींच्या विध्वंश, कित्येक चुडे फुटले, कुंकु पुसल्या गेले, गाई कापल्या जातात, त्यांत हे कमी की काय म्हणुन भयंकर दुष्काळ! रानं वनं उघडी बोडकी, गांवच्या गांव भस्म झालीत,ब्राम्हण बाटले, क्षत्रिय सेवक झाले, पण! मोठी झाडं, पर्वत सारे निश्चल! हे खरे गुरु! परतीची अपेक्षा न करतां आपल्याजवळचे सर्व देऊन टाकणे, गीतेत हेच वर्णन आहे. “सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ। हेच खरं पुर्णत्व, तटस्थता, खरा कर्मयोग, आनंद अवस्था! हे सर्व करण्यासाठी निसर्गाकडुन तटस्थपणाचं निरामय, निर्विकल्प स्थितप्रतिज्ञतेचं साधनतेशिवाय ज्ञान नाही, विकास नाही, जागृती नाही, जागृती शिवाय परिवर्तन, अंतीम मोक्ष नाही.
आतां तटस्थ, आंतरिक बाह्य शक्ती वाढवुन लोकांत मिसळायचं, पण समुदायापासुन दूर राहण्याची कला सुध्दा अवगत करायची. प्रजाहितासाठी लोकनायक घडवायचय! चातुर्वण्याने कर्तव्य कशी पार पाडायची याचे मार्ग दर्शन करायं, आतां ठरल! पंचवटीला रामचंद्राचा आदेश घेऊन उग्र साधना,तपोबल, मनोबल व व्यायामाने शरीरबल सामार्थ्य वाढवायचय! स्वतः रामकृष्णस्वरुप झाल्याशिवाय कर्मयोग सांगायचा नाही. असा पुढील आयुष्या चा विचार करतां करतां नाथाचं पैठण कधी आलं ते रामदासांना कळलच नाही
रामदास घराबाहेर पडल्यावर लागलेलं तिर्थस्थान, एकनाथांच्या वास्तव्याने पुनित झालेल, महाराष्र्टाची ही प्राचीन दैदीप्यमान, सौंदर्यपुर्ण राजधानी! पण भूतकाळात जमा झालेली. पेठणच्या ज्ञानमंदिराची ध्वजा अधिक उंच केली संत भानुदास कुळातील एकनाथ महारांजानी! प्रत्यक्ष दत्तात्रयांनी मलंगाच्या रुपात एकोबाला दर्शन दिले. देवगिरीच्या जनार्दन स्वामी चा अनुग्रह! संस्कृतातील ज्ञान प्राकृतात आणण्याची कावड खांद्यावर घेतलेली!परदुःखावर शितल शिंपण हातोटी, तहानेने तडफडणार्या गाढवाला काशी च्या गंगा, रामेश्वरावर वाहण्याआधी त्याच्या मुखात टाकली. यावरुनच एकनाथांचा विशाल दृष्टीकोण दिसुन येतो. घरच्या समृध्दीचा स्वतः उपभोग न घेतां, हवं ते कुणीही मागावं, रिक्तहस्ते नाथाघरुन कुणीही गेलं नाही. ज्ञानोबां च्या आदेशानुसार भावार्थ दिपीका शुध्द करायचं काम त्यांनी पार पाडलं.
पंढरीची वारी स्विकारली.भागवत संप्रदायातलं अद्वैत तत्वज्ञान सोपं करुन सांगीतलं. मधुरभक्तीमधला हा रसिकोत्तम! विप्रलंभ शृंगारामधला अंतीम शब्द लोक संस्कृतीचा श्रेष्ठ ऊपासक! जवळचं सारं समाजावर उधाळून गोदावरीच्या कुशीत जिवंत जलसमाधी घेऊन विसावलेल्या अशा नाथांच्या शब्दवैभवानं गजबजलेल्या, भारावलेल्या पैठणला तीन दिवस राहुन रामदास नाथमय झाले. भारावल्या सारखे रामदास समाधीमंदिराच्या पायरी शी ध्यानस्थ बसले. रामदासाच्या अंतःकरणाचे आतां कर्ण झाले. नाथशब्द ऐकण्यासाठी आतुरले. रामदासाच्या मनी ज्ञानसुर्य प्रकाशु लागला. नाथांचे शब्द कानांत पडु लागले.
“नारायणा, तूं रामदास! प्रभु रामचंद्राचा तुला वरदहस्त! इथली कावड रिती झाली. पंचवटीच्या परिसरात जाऊन साधना कर! रामकृपे ची कावड खांद्यावर घेऊन शिथील समाजावर फुंकर, स्वार्थकारणावर कोरडे ओढणे, मुर्खाच्या वर्मावर बोट
ठेवायचय, महाराष्र्टाच्या उज्वल भविष्यासाठी स्वयंसाधना करुन सर्वार्थाने समर्थ रामदास हो…..
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
!!! श्री समर्थ रामदास !!!
भाग – ९.
एकनाथ महाराजांकडुन रामदासां ना कौल मिळाला. मठाच्या ओवरीतली पैठणची अखेरची रात्र रामायणमय झाली. आत्मतेजाची प्रभा उमलुन मन निश्चल झालं. मनातल्या या नवनवीन विचारांच्या आवर्तनित प्रभुरामाला आळवायचं, त्यांची महती सांगण! कदाचित हाच एकनाथांचा प्रसाद असेल! अंतरी स्फुरण, आत्मतत्वाच स्मरण, अनुभव हीच खरी परमहंस अवस्था! स्वप्नांत, जागृतीत, सुषुप्तीमधे नित्य अवस्था असणं निष्कलंक ब्रम्हस्वरुपाचं पुर्ण ज्ञान! हीच खरी आत्मस्थीती, खरा साक्षात्कार!नाथांच्या समाधीला नमस्कार करुन अंतर्मनी रामरायाची अखंड करुणा भाकत भजनानंदात तल्लीन होत पंचवटीकडे वाटचाल सुरु झाली.
रामाकडे जाण्याची सारी वाटच राममय झाली. जयजय रघुवीर समर्थ हा गजर करीतच मुरेगांव, भामठाण! खानापुर संपुन पुणतांब्यांत प्रवेशले. चेत्र उजाडला. शालीवाहन शके १५४१ संपुन बेचाळीस आरंंभ झाला. घराघरा वर गुढ्या तोरणे उभारल्या होत्या.वतन दार जिवाजीपंत देशपांडेच्या वाड्याच्या अंगणात येऊन रामदासांनी स्वरचित नवीन श्र्लोक म्हणायला सुरुवात केली.”अनुदिनि अनुतापे, तापलो रामराया। परमदिन दयाळा, नीरसी मोहमाया। अचपळ मन माझे, नावरे आवरीता। तुजवीण शिण होतो धांव रे धांव आता।। जयजय रघुवीर समर्थ। रामदासांचे ओजस्वी, मधुर पण करुण्यपूर्ण स्वरातील नेमकं चंचलपणाच्या वर्मावर बोट ठेवलेला श्र्लोक ऐकुण जिवाजीपंत बाहेर येऊन पाहतात तो हा बालबटु! श्रीरामाचा आजवर कधीही न ऐकलेला असा गजर ऐकुन ते प्रभावित झालेत व पंगतीला बसण्याचा आग्रह केला. पहिला भात झाल्यावर जिवाजीपंतानी परत श्र्लोक म्हणण्याचा आग्रह केला. ” नसे मानसी नष्ट आशा दुराशा। वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा।त्रृणी देव हा भक्तीभावे जयाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा रामदासाची राममहती व रामनामाचा गजर ऐकुन सर्वजण थक्क झालेत.
सर्वांचे तृप्ततेने, कृतार्थतेने भोजन संपन्न झाले, रामदासांच्या पानापुढे ठेवलेली दक्षिणा तशीच ठेवुन कुठेही गुंतायचे नाही असंं ठरवल्यामुळे ते पडवी उतरुन निघाले पाहून जिवाजीपंतांनी कांहीतरी ऐकवावे अशी गळ त्यांना घातली. दुष्काळामुळे पिडीत जनतेची व्यथा या लोकांना ऐकवण्याची स्फुर्ती झाली. ते मुक्तपणे म्हणु लागले….”वेळे पाऊस पडेना। नासकबणी उघडेना। ऐसे कुळवाडियाचे भंड। दुःख जाहले उदंड। बहुपडी आले शेत।रेड्यापाड्याचे आऊत।कांही केल्याने पिकेना। धान्य वेळेसी विकेना। फाळा लाविला उदंड। अवघे जाहले थोतांड।वारी रोगाची वाजती। नाना आभाळे फिरती। टोळपक्षी मूषकादिक। खाती श्वापदे आणिक। दावेदारांची यातना। चोराचोरा राहवेना। नित्य पोटाचे मजुर। वेठीखाली निघे उर। घर खोपटे मोडके। एक फटकुर फाटके।बहु रोगे गुरे गेली। धारणीने मुले मेली। सर्व संसार बुडाला। दास म्हणे जोगी झाला।
रामदासांची ही करुण कथारुप काव्यरचना ऐकुन जो तो विचारांत पडला. जिवाजीपंतांना या व्युत्पन्न बालयोग्याचा सहवास सोडवेना. ते म्हणाले, तुझा राम आतां पंचवटीत कसा असेल? सध्या नाशिकक्षेत्री राम जन्माचा मोठा उत्सव सोहळा असल्याने हजारो येणार्या भक्तजनांना दर्शन देण्या करितां राम नाशिक क्षेत्री नांदतोय. म्हणुन तू आमच्यासोबत कुंभमेळ्याची अमृतभूमीत रामरायाचं दर्शन घेऊन मग पंचवटीला जा!
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.
!!! श्री समर्थ रामदास !!!
भाग – १०.
रामदास मनोमन सुखावले. जवळच अमृतकण विखुरलेलं त्र्यंबकेश्वर, जी गहनीनाथाची तपस्याभूमी, निवृतत्तीनाथाची अनुग्रह भूमी! रामरायाकडे जातांना पूर्वसूरीची दर्शन घडुन नाशिक, त्र्यंबकेश्वर तिर्थ क्षेत्राचं पुण्य पदरी पडेल या विचाराने रामदासाने होकार भरला. पुण्यतांब्याला थोडीही झळ कां नाही लागली याचे कारण विचारले असतां, त्यांना कळले की, शौर्याचे शिरोमणी शहाजीराजे भोसल्यांची जहागीर असल्यामुळे, त्यांच्या असलेल्या दबदब्याला कोण आव्हान देईल? या नरपुंगवाला पाहण्याची त्यांना उत्कट इच्छा झाली. समाजाचं नेतृत्व करणार्या, उत्तम कार्यकर्त्याची सारी लक्षणें शहाजीराजा मधे दिसत होती.
दुसर्या दिवशी प्रातःर्विधी आटोपुन सर्वांसाठी तयार असलेल्या, इनामदार, वतनदारांना शोभेश्या गाड्यां मध्ये रवाना झालेत. लोकसंपर्काचंं पहिलं बीज रामदासामधे असं रुमूजवल्या गेलं. शिंगवे, हिंगणी,बेळापूर, कारंजी अस करत सावळी,दारणा, संगम, कळवी, टाकळी प्रवास करत नाशकच्या पंचक्रोशीत सर्वजन पोहोचलेत. रामदासांना रामरायाच्या भेटीची तिव्र आस लागल्यामुळे जेवणखाण्याची पर्वा न करतां, कोणाच्याही आग्रही मोहाला बळी न पडतां रामदास गाडीतुन उडी मारुन दृष्टीआड झाले. विमनस्क मनःस्थितीत एवढ्या लहान वयात कोणत्याही मोहाला बळी न पडतां या बालयोग्याचे मनोधर्य पाहुन जिवाजीपंत अचंबित झाले. यात्रेकरुंच्या रेट्याबरोबर रामदास आपोआपच पुढे ढकलत गाभार्यापर्यत येऊन पोहोचले. पण त्यांच्या अंतरी असलेल्या सगुण रामरायाचे दर्शन न झाल्याने या कोलाहालात वेळ घालवण्यापेक्षा त्र्यंबकेश्वरी जाऊन ब्रम्हगिरीची सव्य प्रदक्षिणा करावी, गंगाद्वारी जाऊन यावं म्हणुन ते त्र्यंबकेश्वराकडे निघाले. मानसिक आणि शारिरीक थकव्याने एका झाडाखाली विसवले असतां तिथेच त्यांना झोप लागली.
भव्य छाती, रुंद कपाळ, धिप्पाड उंची, अजानबाहु, दुसर्याच्या अंतःकरणाचा वेध घेणारे डोळे असणार्या एका अनोळखी माणसाने त्यांना हलवुन उठवले. कोण असेल हा माणुस? तो सुध्दा त्याच्या यजमानाला शोधण्यासाठी त्र्यंबकेश्वरी जात आहे. दोघेही सोबत निघालेत. त्याअनोळखी माणसाने रामदासाला फळ खायला दिले. ते फळ खाल्ल्यावर थोड्याच वेळात रामदासांना विचित्र वाटु लागले. डोळ्यावर सारखी झापड येत असल्या मुळे रामदास एका झाडाखाली विसावले. तो मनुष्य तिथुन निघुन गेला.
क्षणार्धात रामदासांना गाढ झोप लागली. पण त्या गाढ निद्रेतही कसलातरी अवर्णीय आनंद, मधूर सूर, केशर कस्तुरीच्या मिश्रणाचा सुगंध रामदासाच्या अंतर्मनाला जाणवत होतं.त्यांनी डोळे उघडल्यावर काय दिसले तर त्र्यबंकेश्वराचं ज्योतिर्लिंग! ते चक्रावले. वाटसरु कुठे गेला? तेवढ्यात माथ्यावरच्या औंदुबरावरुन प्रेमळ हास्य ध्वनीचा हुंकार ऐकु आला. आणि एकदम जाणवले की, वाट्याड्या दुसरा तिसरा कोणी नसुन प्रत्यक्ष महारुद्र, अंजनीसुत मारोतीराया होय!
दुसर्या दिवशी कुशावर्तावर स्नान करुन सुचिर्भूत होऊन त्र्यंबकेश्वराचं दर्शन व ज्योतिर्लिंगावर बिल्वपत्रांचा अभीषेक करुन रुद्राचं आवर्तन म्हणत ध्यानस्थ बसले असतांना त्यांच्या समोर फलहाराची ताटली व गोरस एका माऊलीने ठेवले. त्यांनी ओळखले की, जगज्जननी जानकी माताच आहे. रात्री मारुतीरायाने चकवलं! खांद्यावर आणुन इथे सोडलं. आणि आतां माझ्या तहान भुकेचा विचार केलास, मला प्रभु रामचंद्रांना भेटवल्याशिवाय पाय सोडणार नाही तुमचे!
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.


